महाभारतावर आजपर्यंत अतिशय परिष्कृत विपुल असं लेखन झालेलं आहे. महाभारतासारख्या ग्रंथाचं समाजमनाशी भावनिक नातं असते. ते नातं जपत त्यातील श्रद्धा, धारणा केलेल्या चमत्कृतीचे विवेचन व विस्तार हा लेखकासाठी कसरतीचा भाग असतो. कधीकधी सत्य, वास्तव मांडत असताना समाजावर भावनिक आघात होत असतात. ते आघात व त्यातूनच वास्तवाचे पृथक्करण हाच ऐतिहासिक कादंबरी लेखनाचे मोठे तत्त्व असते. त्याच कादंबऱ्या वाचकास विचार प्रवृत्त करतात. त्याच पठडीतील पूर्व ज्ञानाशी वैचारिक मतमतांतरे करावयास लावणारी कादंबरी म्हणजे ‘पाच आऱ्याचं चाक’ होय.
समग्र मानव जातीच्या वर्तनात महाभारताच्या तत्त्वाचे चांगले व वाईट परिणाम समाज मनावर स्पष्टपणे दृगोचर झालेले दिसतात. महाभारतात कृष्णाच्या रूपाने जीवनाचं अंतिम सत्य सांगणारी ‘गीता’ मिळते. कौरवांची कुटनीती व सूडतंत्र दिसते. पांडवांत शूरता, धर्माचरण व परिस्थितिजन्य जगणं दिसते. याज्ञसेनी, कुंती, अंबा, अंबालिका व गांधारी यांच्या माध्यमातून सहनशीलता हे गुणधर्म दिसतात. महाभारत एक ‘सुडाचा प्रवास’ वाटतो. हा प्रवास द्रोणाचार्य यांच्यापासून सुरू होतो. राजा द्रुपद, दुर्योधन, कर्ण, भीम, याज्ञसेनी व अश्वत्थामा यांच्यापर्यंत येऊन थांबतो. गुरू ते गुरुपुत्र हा प्रवास भारतवर्षात आजही पारायणाचा विषय आहे.
माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तीचे वास्तवदर्शन महाभारतात आढळते. प्रारंभी महर्षी व्यास, पुढे वैशंपायन, त्यानंतर हा प्रवास देवबोध, विमलबोध, सर्वज्ञ नारायण, अर्जुन मिश्रा व नीलकंठ अशा कितीतरी आवृत्त्यांच्या माध्यमातून हे अखंड पारायण पिढ्यान् पिढ्या पुढे चालूच आहे. आधुनिक लेखकांनी हे महाकाव्य जनसामान्यात साधकीय विमर्ष व परामर्षातून चांगलेच रुजवले. महाभारताचं लालित्य वेगवेगळ्या संदर्भांने आधुनिकतेतही व्यापून राहिलेलं दिसते. परिणामी अधिक लेखकांना महाभारतावर लिहिण्याचा मोह होतो. अनेकांनी अनेक वेळा अन्वयार्थ लावूनही या महाभारताची आकर्षित मोहनी अद्यापही तिळभर कमी झालेली दिसत नाही. याचाच एक भाग म्हणून याज्ञसेनी ही व्यक्तिरेखा लेखकांस याज्ञसेनीच्या अगाध क्षमतांच्या परिप्रेक्ष्यात लेखकाच्या मनःपटलावर कोरल्या गेलेल्याचं कादंबरीतून प्रतीत होते. लेखकाच्या जाणिवेच्या पातळीवर आध्यात्मिक, वैचारिकता, स्थितप्रज्ञता , तात्त्विकता, सत्यता, राजधर्म व सौंदर्यता हे याज्ञसेनीचे अंर्तभाह्य गुण रुंजी घालू लागतात. त्यामुळेच चाकोरी व चाकोरीच्या बाहेरील लेखकांच्या लिखाणात याज्ञसेनीचे रूप बदलून गेलेले कादंबरीतून जाणवते. कुटिल राजनीती तिला वनवासाचा रस्ता दाखवते. मग ती सुडाने पेटून उठते. तिच्या जीवन एकात्मिकतेचा आत्मशोध व अनेकांनी उगारलेल्या वाईट कटाक्षाचा हा सगळा प्रवास लेखकाने या कादंबरीत उद्बोधक पद्धतीने मांडला आहे. ‘याज्ञसेनी’ या एकाच ठायी असलेल्या ‘पार्षती’, ‘अग्निकन्या’, ‘पांचाली’, ‘कृष्णा’ व ‘द्रौपदी’ या नावाचं एक आकलनपूर्ण सौंदर्यसंपन्न रूपगंधाचं प्रतिबिंब देवीदास फुलारी यांनी ‘पाच आऱ्याचं चाक’ या कादंबरीत मांडलेलं आहे.
लेखकांनी याज्ञसेनीला केंद्रस्थानी ठेवत तिच्या अंतर्मनाच्या दोलायमान भावनांचे द्वंद्व ह्या कादंबरीत मांडलेले दिसते. याज्ञसेनीच्या जन्माच्या आधीपासून ही कादंबरी सुरू होते. कादंबरीत लेखकांनी द्रौपदी ह्या नावाचा नामोल्लेख कोठेच केलेला दिसत नाही. ‘याज्ञसेनी’ या नावाचाच नामोल्लेख संपूर्ण कादंबरीत आलेला दिसतो. कदाचित तिच्या आंतरिक सुडाग्नीला व ज्वालांना प्रतिबिंबित करणारं ‘द्रौपदी’ ऐवजी ‘याज्ञसेनी’ हे नाव प्रत्ययकारी वाटते. लेखकांनी या कादंबरीत याज्ञसेनीच्या व्यक्तित्वाचे सूक्ष्मातिसूक्ष्म पदर अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने रेखाटले आहेत. तिचे दु:ख तिच्यावरील झालेल्या अन्यायाचे सूड घेण्यासाठी पांडव व श्रीकृष्णाकडे केलेले हट्ट व आग्रह यातील बारकावे लेखकांनी नेमकेपणाने मांडलेले आहेत. याज्ञसेनीचे खरे प्रेम पार्थावर असते. पण बहुपतित्वामुळे पार्थ उदासीन होऊन, याज्ञसेनी पासून दूर जाताना दिसतो. युधिष्ठिराचे धर्मनिष्ठ व तात्त्विक विचार याज्ञसेनीस अनेक संकटांना आमंत्रण देणारे व अक्षम्य वाटतात. प्रत्येक संकटात निधड्या छातीने पुढे जाणारा भीम याज्ञसेनीला आवडता होता. तिच्या दुःखांना समजावून घेणारा भीम निरागस, प्रेमळ व अतिशय जवळचा वाटायचा. याज्ञसेनीचं वैचारिक अधिष्ठान असलेलं हळवं, तेजस्वी व वेळप्रसंगी कठोर रूप लेखकांनी आखीव व रेखीवपणे रेखाटले आहे.
सृजन-सोहळ्याचं मांगल्य घेऊन जन्माला आलेली याज्ञसेनी तिच्या साध्या स्पर्शाने फुलं गांधार गान गात असत. याज ऋषीच्या आश्रमात औपचारिक-अनौपचारिक शिक्षणाचा नित्य प्रवाही झ-यामुळे तिच्या अंतर्मनाच्या बौद्धिक क्षमता रुंदावत गेल्या व ती सौंदर्याच्या अद्वितीय रूपाबरोबर गुणसंपन्न बनते. याज्ञसेनीसारख्या प्रतिभावंत स्त्रीला निसर्गाचं प्रचंड आकर्षण होतं. निसर्गाच्या दालनात उगवलेली दोन पानं याज्ञसेनीच्या आगमनाप्रित्यर्थ टाळ्या वाजवत. ऋतू आणि आभाळाच्या नात्याचं गुज तिला उमगायचं. निसर्ग तिच्यासोबत एक मौन संवाद असायचा. सुख भोगून संपत नाही, दुःख सांगून जात नाही. दुःख जीवनातलं घनगंभीर अरण्य अन् सुख कुठेतरी क्वचित काताळातील एखादा खळखळ झरा, असं तिचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं. सर्वसामान्य माणसाची जन्मापासून सुरू होणारी कथा मृत्यूपाशी संपते पण याज्ञसेनीची कथा जन्मापूर्वी सुरू होऊन थांबलेली नसते. याज्ञसेनी अग्निकन्या पण आयुष्यभर तिचा धगधगत्या अग्नीने पिच्छा सोडलाच नाही. असं याज्ञसेनीचं धगधगतं धीरगंभीर व स्थितप्रज्ञ जीवन लेखकांनी या कादंबरीत मांडले आहे.
कौरव वंशातील स्त्रियांना अस्वस्थतेच्या शापातून त्यांच्या वाट्याला पराकोटीची विमुक्तता आलेली. प्रत्येकाच्या दुःखाची जातकुळी वेगळी, तपशील वेगळा पण दुःख मात्र सारखेच होते. कुरू वंशातली सत्यवती तिच्या नशिबी वैधव्य होतं. पुत्रवती असूनही पुत्र नसल्यासारखे दुःख पदरात घेऊन तिने या जगाचा निरोप घेतला. सुडाने पेटलेली बाला म्हणजेच आंबा. तिच्या दुःखाला तर अंत व परिसीमा नव्हती. आयुष्यभर अविवाहित जीवनाचे घाव सहन करत शेवटी भीष्माचार्यावर सूड उगवते. तरीही ती शांत होत नाही. अंबिका आणि अंबालिका या पुत्रप्रेमापासून वंचित राहिलेल्या स्रिया होत्या. गांधारीलाही समाधान नव्हते. धृतराष्ट्राची महाराणी अशीच तिची कीर्ती होती. शेवटी चौदा पुत्र मारले जाऊन ती निपुत्रिकाचं जीवन जगते. कुंतीला तर वैधव्य भोगावे लागले. उत्तरा शेवटी तीही विधवा होते. ह्या सर्व व्यथांच्या प्राण असणाऱ्या कथा त्यातलीच याज्ञसेनीही एक पाईक होय. याज्ञसेनीचा त्याच वाटेवरचा जीवनप्रवास त्याहीपेक्षा खडतर व भीषण होता, असे लेखकाने संवेदनशीलपणे कादंबरीत मांडलेला आहे.
याज्ञसेनीच्या अनेक वैचारिक रूपाबरोबर धगधगतं तात्त्विक व समंजस अशी विविध रूपे कादंबरीतून वाचकांसमोर येतात. त्याचबरोबर पाच पतीबरोबर बांधलेल्या आयुष्याचे नियतीने वाट्याला आलेले जीवन लेखकांना तिचे जीवन हे ‘पाच आऱ्याचे चाक’ असे वाटते. त्यात पाच आरे म्हणजे पांडव व सर्वांना एकसंघ बांधून ठेवणारे चाकाचे लोखंडी रिंग म्हणजे याज्ञसेनी होय. अशी कल्पना म्हणजे ‘पाच आऱ्याचं चाक’ होय.
भारद्वाज नावाच्या महातपस्वी ऋषी अग्निवेश यांच्या आश्रमात मातीत खेळत ऋषिपुत्र द्रोण व क्षत्रिय पुत्र द्रुपद या दोघांच्या रूपानं निर्व्याज आणि निरागस मैत्री नांदत असते. ज्ञान आणि रणात पारंगत द्रोण. क्षत्रियपुत्र द्रुपद एका सम्राटाचा पुत्र. वेदाध्ययन, विद्याभ्यास व ब्रह्मश्चार्यश्रम संपल्यावर द्रुपद व द्रोण यांनी संवंगडीपण जपण्याचं आश्रमातून वचन घेऊन परस्परांचा निरोप घेतात. परशुरामाने आपले सर्वस्व ब्राह्मणांना दान देत होते, हे समजल्यावर द्रोण त्यांच्या शोधात गेला पण तोपर्यंत परशुरामाकडील सर्व द्रव्य दान देऊन संपले होते. ते द्रव्यहीन व दीनवाणे होऊन वनात फिरत होते. परशुरामाकडे फक्त त्यांची अस्त्रविद्या उरलेली होती. अस्त्रविद्या म्हणजे परशुरामांचे भूषण होते. परशुरामाकडील सर्व द्रव्य संपल्यामुळे द्रव्यापेक्षाही संपन्न अस्त्रविद्या द्रोणास देण्याचं मान्य केलं. द्रोण परशुराम यांच्याकडून अस्त्रविद्या संपन्न झाले. द्रुपतराजा व ऋषिपुत्र द्रोण यांच्या बालमैत्रीने मुख्य कथेची लेखकांनी ओघवती सुरुवात केलेली आहे.
द्रोणपुत्र अश्वत्थामा भुकेने व्याकूळ होऊन रडू लागतो, तेव्हा त्यांच्या पत्नीने पाण्यामध्ये पीठ टाकून त्यास दूध म्हणून प्यायला देते. ते पिऊन अश्वत्थामा शांत झाल्याचे आचार्य द्रोणांनी बघितले. त्यांचे पितृहृदय विदीर्ण व व्याकूळ झाले. मग आपला बालसंवगडी राजा द्रुपदाकडून काहीतरी मदत मिळेल, या उद्देशाने ते त्यांच्याकडे जातात. विद्येचा अहंभाव मनात बाळगून राजाला निरोप पाठवतात. ‘राजा द्रुपदा! छत्रवतीनगरीत तुझा मित्र द्रोण आलेला आहे’, त्यासाठी महाराज द्रुपदांने अस्त्रविद्या संपन्न द्रोणाच्या सन्मान व स्वागताला यावे. हा निरोप ऐकून द्रुपदांना राग येतो. संतापाच्या भरात द्रुपदाने द्रोणास बोलावून घेतलं. द्रोणास म्हणाले,’ अरे द्रोणा! तू माझा मित्र कसा होऊ शकतोस? वेदज्ञ असेल तो वेद्ज्ञ नसलेल्याचा मित्र होऊ शकत नाही. जो राजा नसेल तर राजाचा मित्र होऊ शकत नाही.’ द्रोणास अपमानित झाल्यासारखं वाटते. राजाद्रुपदाचा सूड उगवण्याचा निश्चय ते करतात. द्रोणांनी द्रुपदाला पाठवलेल्या संदेशाला विनयाचे अधिष्ठान नव्हते. द्रुपद सम्राट झाला म्हणून काय झाले? एकेकाळी तर तो सवंगडी होता. बालमित्र या नात्याचे भाव होते. एक शिष्टाचाराचा भाग म्हणून का होईना द्रोणाचार्यांनी महाराज द्रुपदाला सन्मान द्यायला पाहिजे होता, असे झाले नाही. महाराज सम्राट असले तरी त्यांच्या अंत:करणात द्रोणाविषयी प्रेम, सहानुभूती, करुणा जागली असती. राजा द्रुपद एक ऋषी म्हणून द्रोणाच्या भेटीला जावयास पाहिजे होते. मैत्रीच्या प्रकरणात दोघांनीही थोडे सामोपचाराने घेतले असते तर; द्रोणाच्या मनातील सूडाचा वन्ही शांत झाला असता. येथेच सुडाग्नीचे बीजारोपण झाले. असं याज्ञसेनीचं चिंतन कादंबरीत प्रत्ययास येते.
पुढे भीष्माचार्याच्या आदरातिथ्याने द्रोणाचार्य सुखावले व कुरुवंशातील राजकुमारांना शिक्षण देण्याचं मान्य केलं. द्रोणाचार्य यांनी सर्व राजकुमारांना विद्यागुणसंपन्न व पारंगत केले. पार्थ हा धनुर्धारी विद्येत पारंगत झाला. एकदा वनात द्रोणाने धनुर्धारी एकलव्य व त्याची विद्या पाहून अचंबित झाले. कोणताही अनुग्रह न देता त्यांच्याकडून गुरुदक्षिणा मागणाऱ्या द्रोणास एकलव्याने तत्काळ उजव्या हाताचा अंगठा काढून दिला. एकलव्याने अंगठा देऊन गुरुपेक्षाही मोठा ठरला. आता कोणताही प्रतिस्पर्धी न उरल्याने अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. द्रोणाने सुडाग्नीची अभिलाषा ही धनुर्धारी राजकुमारांच्या गुरुदक्षिणेच्या वचनातून पूर्ण करून घेतली. पृषतपुत्र द्रुपद यांना पराजित करून मुसक्या बांधून शरण यायला भाग पाडलं. सत्तेपुढे मैत्रीभाव कस्पटाप्रमाणे लेखत अहंभावाचे खाचखळगे घेत काताळातून वाहणारं मैत्री नावाचं निखळ पाण्यास अहंकारमिश्रित गटार बनवल्याची जाणीव द्रोणांनी राजा द्रुपदास करून दिली. द्रोणाचा संताप वाढत राहिला. द्रोणांनी चुकांचे खापर अपमानाने खजील झालेल्या द्रुपद राजावर फोडत त्यांना पुन्हा पुन्हा अपमानित करून अपमानाचा बदला अपमानाने घेतला. एक निर्व्याज बालमैत्री ते दोघांतील अहंभाव यांचा युद्धजन्य परामर्श कादंबरीत येतो.
द्रोणांनी केलेल्या अपमानाने राजा द्रुपदाच्या हृदयाला चरे पडले. एक निमिषही त्यांच्या अंत:करणातून अपमानाची भावना जात नसे. अपमानाचा आवेग विसरला जात नव्हता. राजा द्रुपद कृश होत चाललेला होता. त्यांना वाटू लागले, आपणास एक पराक्रमी पुत्र व्हावा. आपल्या पुत्रांपैकी एकही असा पुत्र नाही की, तो द्रोणाचा पराभव करू शकेल. यांचे त्यांना कमालीचे वैषम्य वाटत असे. या पृथ्वीतलावर आज द्रोणा इतका पराक्रमी पुरुष नाही. त्यांचा पराभव करायचा असेल तर आपणास एक शूर व पराक्रमी पुत्र असावा, असे वाटत होते. त्यामुळे अघोरी तंत्रविद्येने एक पुत्र व्हावा म्हणून ते याज ऋषीच्या आश्रमात गेले. तेथे त्यांनी याज ऋषीच्या सांगण्यावरून यज्ञ कर्माची सिद्धता केली. हवनाच्या प्रसंगी याजऋषींनी महाराणीला हविर्भाव दिला. पुढे याजऋषीच्या आश्रमात महाराणीला एक महातेजस्वी पुत्र झाला. तोच पुत्र म्हणजे दृष्टद्युम्न होय. याज्ञसेनीच्या जन्माचे काहीच प्रयोजन नव्हते, पण लगेच राजपुत्र यांच्या जन्मानंतर राजकन्येचा जन्म झाला. ती सुकन्या म्हणजे काळाचं भविष्य होतं. ऋषीच्या दूरदृष्टीत ती सुकन्या तर स्त्रियांमध्ये श्रेष्ठ ठरण्याचं भाकीत होतं. याज्ञसेनीचा जन्म झाला तेव्हा याज ऋषींचा यज्ञकुंड अक्षरश: धगधगत होता. या धगधगत्या यज्ञकुंडाचा कदाचित याज्ञसेनीवर परिणाम झालेला असेल. त्यामुळेच धगधगती ज्वाला व्यक्तिमत्त्वात घेऊन ‘याज्ञसेनी’ अर्थात ‘अग्निकन्या’ जन्माला आली. प्रयोजन नसताना याज्ञसेनीचा जन्म हा खऱ्या महाभारताच्या भविष्याची सुरुवात म्हणायला हरकत नव्हती. अशी याज्ञसेनीच्या जन्माची कहाणी लेखकांनी चितारली; पण वास्तव परंपरागत कथेचा विचार जर केला तर याज्ञसेनीचा जन्म हा अग्निकुंडातून झालेला आहे. येथे वाचकांच्या ज्ञात संकल्पांना छेद जातो.
ऋषिमुनींच्या आश्रमात दृष्टद्युम्न सर्व शिक्षण घेऊन निपुण होत होता. याज्ञसेनीस ऋषिमुनी, तत्त्वज्ञान, पंडित चर्चा व तत्त्वज्ञानाच्या अमृत चर्चेतून जगण्याचे गूढ कळून गेले. गुरुवर्य याज ऋषींनी यांनी याज्ञसेनी विख्यात ऋषीमुनी सोडले तर तिच्याइतकी धर्मशास्त्राची माहिती कुणालाही नाही असं भाकीत केलं होतं. ती ‘ब्रह्मवादिनी’ आहे. पांचाल राज्याला पडलेलं एक वास्तव स्वप्न आहे. तिचा विवाह विचारपूर्वक असा ‘पण’ लावूनच करावा लागेल. तो ‘पण’ असा की, जो दिग्विजयी वीरच जिंकू शकेल. असं याज ऋषींनी द्रुपदास समजावून सांगितलं होतं. पुढे द्रुपद राजाने ऋषी-मुनींची कल्मिषनगरी सोडून कांम्पिल्यनगरीत आल्या नंतर याज्ञसेनीचा विवाह करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांना आमंत्रित करण्यात आले. ‘पण’ जिंकणाऱ्या उचित राजकुमारास निवडण्याचा पूर्ण अधिकार याज्ञसेनीवर सोडण्यात आला. एक विप्रपुत्र रूपातील पार्थांने ते ‘पण’ जिंकले. याज्ञसेनीने पार्थाच्या गळ्यात वरमाला टाकली. येथे भारतीय परंपरेत स्त्री-स्वातंत्र्य व स्त्री-मताला किंमत होती. हे याज्ञसेनीस स्वयंवर निवडण्याचा पूर्ण अधिकार दिला होता, या मुद्द्यावरुन लक्षात येते.
एक विप्रपुत्र पण जिंकतो हे पाहून दुर्योधन पेटून उठतो. हा क्षत्रियांचा उपमर्द आहे. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती. तेव्हापासून ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यांत वितुष्ट निर्माण झाले. हा भ्रम पेटवत या स्वंयवरास विरोध करतो. पण पांडवापुढे कोणाचेच काहीही चालले नाही. भेदभावाचं महाभारतीय राजकारण येथे दिसते.
पाच भाऊ एकत्र राहतील त्यांच्या एकीमुळेच त्यांचे कल्याण होईल. याज्ञसेनीमुळे पाच भावात फूट पडू नये. यासाठी याज्ञसेनीचा विवाह पाचही भावांसोबत होईल असा कुंतीने निर्णय घेतला. या निर्णयास श्रीकृष्णाने पुष्टी दिली व या विचाराचे समर्थन केले. पण पार्थ मात्र या निर्णयामुळे उद्विग्न झालेला होता. बहुपतित्वाचा खल बराच वेळ चालू असतो. शेवटी ‘बहुपतित्व’ हे शास्त्राला धरूनच आहे. पांडव हे हिमालयातून आलेले शेवटचे चंद्रवंशीय आहेत. प्राचीन काळी बहुपतित्वाची पद्धत होती. परंपरेतून असा विवाह निषिद्ध नाही. हा विवाह व्यवहारकुलक्रमागतच आहे. गौतम कुलोत्पन्न जटिला नावाच्या एका विदुषीचा विवाह सात ऋषींबरोबर झालेला होता. तसेच प्रचेतस ह्या एका नावाचे दहा बंधू होते. मुनिकन्या वक्षीने त्या दहा भावांशी विवाह केला होता. पाच पांडव वेगवेगळ्या पाच बलपुरुषांपासून जन्माला आलेले आहेत. यात वाईट काही नाही. ही पद्धत प्राचीन काळापासून रूढ आहे. सर्व पांडव व याज्ञसेनी यांना कुंतीने असा इतिहास समजावून सांगितला. तेव्हाच तेथे याज्ञसेनीचे दादा दृष्टद्युम्न व पिताश्री द्रुपद आले. हे सर्व कुंतीचे बोलणे त्यांनी बाहेरून ऐकले होते. बहुपतित्वाच्या या सूत्रास द्रुपद राजाने नकारात्मकता दर्शवली, पण श्रीकृष्णाने मध्यस्थी केल्यामुळे पार्थ व राजा द्रुपद यास मान्यता दिली.
पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळीच्या प्रत्येक शब्दाला व आज्ञेला किंमत होती. पांडव स्वयंवर जिंकून वास्तव्यात असलेल्या कुंभारशाळेत याज्ञसेनीस घेऊन आले. पांडवांनी कुंती मातेला आवाज दिला व म्हणाले, “बघ माते, आम्ही काय आणलंय?” कुंतीमाता कामात व्यस्त असल्यामुळे पांडवांना म्हणाली, “जे काही आणलं, ते सर्वांनी वाटून खावं.” ह्याच आज्ञेने पुढे याज्ञसेनीस पाच पांडवांची पत्नी बनवलं, ही कथा सर्वश्रुत व ज्ञात आहे. पण लेखकांनी मांडलेला याज्ञसेनी व पांडवांच्या विवाहाबाबतीत घटनेमुळे इतिहासाला बगल देणारी आहे. या युक्तिवादास परामर्षिय संदर्भ मिळत नाही.
पाच पांडवांच्या विवाहानंतरचा तिढा सोडवण्यासाठी कुंतीने ऋषी नारद यांना पाचारण केलं. ऋषी नारदमुनी यांनी पाच पांडवांना निकुंभ राज्याच्या सुंद आणि उपसुंद या पराक्रमी पुत्राची कथा सांगितली. दोघा भावांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते. त्यांनी विंध्य पर्वतावर घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव यांच्यावर संतुष्ट झाले. ब्रह्मदेवाची कृपादृष्टी झाली. पुढे ते बंधू शक्तीच्या उन्मादाने इंद्रलोक जिंकले. सर्वांना वेठीस धरू लागले. सर्व देवांना त्रास सुरू झाला. शेवटी ब्रह्मदेवाने विश्वकर्म्यास एक सुंदर स्त्री बनविण्यास सांगितले. विश्वकर्म्याने तिळतिळ सौंदर्य एकत्र करून ‘तिलोत्तमा’ नावाची एक सुंदर व रूपगर्विनी बनवली. तिला त्या दोघा भावांकडे पाठवले. तिच्या सौंदर्याने मोहित होऊन त्या दोघा भावांमध्ये भांडण जुंपले. ते दोघे आपापसात लढूनच मरून गेले. हे सौंदर्याचे परिणाम ऋषी नारदांनी पांडवांना सांगितले. सुंदर स्त्री ही भाऊबंदकीच्या नात्यास तोडणारं एक हत्यार आहे, हा तर रूपाचा परिणाम आहे. पण यावरील उपाय सुचविण्यास कुंतीने आग्रह केला. तेव्हा त्यांनी याज्ञसेनी प्रत्येक पांडवाकडे एक एक वर्ष वैवाहिक जीवन जगावे, असा ऋषी नारद यांनी सल्ला दिला. सर्वांना आशीर्वाद देऊन त्यांनी इंद्रप्रस्थनगरीचा निरोप घेतला.
पांडवासोबत एक एक वर्ष वैवाहिक जीवन जगावे असा महर्षी वेदव्यास यांनी याज्ञसेनीने व पांडवास सल्ला दिला असा महाभारतात दाखला आहे. पण लेखकांनी हा संदर्भ ऋषी नारदमुनी यांच्याशी जोडला, ह्याकडे वाचकांचं लक्ष वेधलं जाते.
आपण ‘पण’ जिंकून याज्ञसेनीने बहुपतित्व स्वीकारणं हे पार्थास मान्य नव्हतं. तो उद्विग्न होतो. एक दिवस त्याने इंद्रप्रस्थ नगरी सोडून तीर्थयात्रेला जाण्याचा मनोदय व्यक्त करतो. तो कोणाचेही काही न ऐकता तीर्थयात्रेसाठी न तीर्थयात्रेच्या दरम्यान चित्रवाहनाची कन्या चित्रांगदा व नाग राजाची उलुपी ह्या दोघींशी विवाह करतो. चित्रांगदापासून बभ्रुवाहन मुलगा होतो. नंतर सुभद्रेचा पार्थाशी विवाह होतो. या श्रीकृष्णाच्या मतास राजमाता कुंतीने संमती दर्शवते. त्यामुळे निदान श्रीकृष्णाच्या नात्याची विण घट्ट होईल व त्यानिमित्ताने पार्थ तीर्थयात्रेहून वापस येईल, असे कुंतीचा कयास होता. पार्थामुळे युद्धिष्ठिर व याज्ञसेनी यांच्यातील वैवाहिक एकांतवास तोडलेली शिक्षा म्हणून यात्रेस जातो का? किंवा याज्ञसेनीचं बहुपतित्व या कारणाने नाखूश होऊन यात्रेस जातो, हा प्रश्न वाचकास पडतो.
पार्थाचे सुभद्रेशी लग्न झाले. पांडवांना याज्ञसेनी प्रतिविंध्य, सूतसोम, श्रुतकर्मा, शतानिक, श्रुतसेन असे अनुक्रमे युधिष्ठिर, भीम, पार्थ, नकुल व सहदेव यांचेकडून पुत्र जन्मले व सुभद्रेस पार्थाकडून अभिमन्यू असा पुत्र झाला. पांडवाच्या प्रगतीचा वारू चौफेर धावू लागतो. पांडवाने इंद्रप्रस्थचा विस्तार करण्याचे ठरविले. ह्या विस्तारासाठी खांडववन जाळून टाकल्या जाते. खांडववन जाळण्यासाठी श्रीकृष्ण व पार्थ यांनी अपरिमित कष्ट घेतात. अग्निप्रपातातून पार्थाने मयासुरास जीवनदान दिले जाते. मयासुरांच्या मनात पार्थाविषयी कृतज्ञताभाव होता. तो एक अद्भुत जाणकार व वास्तू कलेचा कारागीर होता. त्यांनी इंद्रप्रस्थनगरीमध्ये ‘मयसभा’ नावाची एक अभिनव वास्तू उभी केली. शिल्पविद्यानिपुण मयासुराने उभी केलेली ही वास्तू वास्तुशिल्प कलेचा एक चमत्कार होता. मयसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमहाल हा अद्वितीय होता. या महालात चमत्कृतीचे साक्षात विविध नमुने होते. जेथे पाणी व पाण्यासाठी तलाव बनवलेला होता, पण तेथे फरशी बसल्याचा भास होत होता. इंद्रप्रस्थ नगरीमध्ये बनवलेले सभागृह श्रीकृष्णाला खूप आवडले. असे सभागृह संबंध पृथ्वीतलावर कुठेच नाही म्हणून वास्तुशांती करावी, हे वैभव इतरांना दाखवावे, असा युधिष्ठिराने श्रीकृष्णापुढे मनोदय व्यक्त केला गेला. त्या अनुषंगाने राज्याचा विस्तार करण्यासाठी चार भाऊ पार्थ, भीम, नकुल व सहदेव यांनी चार दिशेतील वेगवेगळे प्रांत पादाक्रांत करत विजयी कामगिरी केली. या विजयामुळे ‘राजसूय’ यज्ञ करण्याचे ठरले होते. या यज्ञात अनेक राजे सहभागी होते. राजसूय यज्ञ संपल्यानंतर इंद्रप्रस्थ नगरीमध्ये कौरव चांगलाच पाहुणचार घेत होते. एक दिवस दुर्योधन, दु:शासन, कर्ण व शकुनीमामा महालात फिरत होते. फिरत असताना एके ठिकाणी पाणी व फरशी याचा अंदाज न कळाल्यामुळे दुर्योधन तलावात कोसळतो. त्याच्या नाकातोंडात पाणी जाते. तेव्हा याज्ञसेनी मोठ्याने हसत म्हणते, “अरेरे !ऽऽ आंधळ्या राजाचा पुत्रही आंधळाच की!” तेव्हाच दुर्योधनाच्या मनात सुडाचा अग्नी पेटतो. या अपमानाचा बदला म्हणून कौरवांकडून युधिष्ठिरास कपट कारस्थान असलेल्या द्युतक्रीडेचं आमंत्रण दिलं जाते. या द्युतक्रीडेत दुर्योधनाचा विजय होतो. सर्व धन व राज्य पणात हरल्यानंतर शेवटी युधिष्ठिराने याज्ञसेनीस पणाला लावतो. मग दु:शासनाकडून याज्ञसेनीचा विनयभंग व वस्त्रहरण हा प्रकार घडतो. सर्व विद्वानांनी भरलेली सभा खाली मान घालून चुप्प बसते. सभागृह कर्ण, दुर्योधन व दु:शासन यांच्या वाईट कारस्थाने चालत राहतात. ‘जी अनेकांसोबत विवाह करते, ती वेश्या असते’ असे कर्ण बोलतो. शेवटी गांधारी या कठीण प्रसंगी धाव घेते. सभेला उद्देशून म्हणते, “श्रीकृष्णाची सखी याज्ञसेनीची तुम्ही ही काय अवस्था केली आहे? महाराज धृतराष्ट्र हे सर्व जर श्रीकृष्णाला कळाले तर आपलं हे राज्य क्षणात धुळीला मिळण्याची शक्ती श्रीकृष्णामधेच आहे. हे कुणाला सांगायची आवश्यकता नाही?” तेव्हा हे वस्त्रविमोचन थांबवलं जाते. एकदाचा हा अनिष्ट प्रसंग गांधारीमुळे टळतो. ह्या पातकाचा पश्चात्ताप म्हणून धृतराष्ट्राने याज्ञसेनीला हवा असलेला वरदान मागण्याचं आवाहन करतो. तेव्हा याज्ञसेनीने पाच पतींची दास्यातून मुक्तता करण्याची मागणी करते. याज्ञसेनीला तिचे पाच पती, हरलेलं राज्य व सर्व संपत्ती वापस मिळते. लेखकांनी वस्त्रहरण हा प्रसंग गांधारीने श्रीकृष्णाचे नाव घेऊन सभेचे व धृतराष्ट्राचे डोळे उघडल्यामुळे टळले जाते. येथे लेखकाने मुळ संदर्भास बगल देऊन स्त्री श्रेष्ठत्व म्हणून गांधारीचा संदर्भ जोडलेला आहे की, काय? असे वाटते. येथे वाचकाच्या कृष्णप्रेमास तडा जातो.
पुन्हा दुसऱ्यांदा कौरवांच्या कडून द्युतक्रीडेचे आमंत्रण दिले जाते. त्यास युधिष्ठिराने राजधर्म म्हणून होकार देतो. युधिष्ठिराच्या धर्मशास्त्र, नीती व आचारसंहिता यापुढे कोणाचं काही चालले नाही. पुन्हा पांडवांचा पराजय होतो. मूल्यसंकल्पनेच्या बेगडी तत्त्वज्ञानाखाली सामर्थ्यशाली बाहूही पांगळे झालेले येथे दिसते. जे हरतील त्यांनी बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात काढायचं, असं ठरलेलं होतं. येथे बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास पांडवांच्या वाट्याला येतो. येथे नैतिकता, धर्म व राजधर्म अनैतिकतेपुढे पराजित होतो.
पांडव यांनी बारा वर्षाच्या वनवासात काम्यकवन,द्वेतवन व तीर्थयात्रा असा प्रवास केला. यांचं काळात पार्थ यांनी पाच वर्ष हिमालयामध्ये जाऊन विविध शस्त्रे, अस्त्रे व पाशुपतास्त्र अशा अनेक विद्या हस्तगत केल्या. एकदा वनात सर्व पांडव शिकारीसाठी गेले असता सिंधू देशाचा सम्राट बृहद्रथाचा पुत्र जयद्रथ आश्रमात पाणी पिण्यासाठी म्हणून येतो. जयद्रथ याज्ञसेनीस स्वताची महाराणी बनण्यासाठी आमंत्रण देतो व विनवतो. याज्ञसेनीने नकार दर्शवल्यामुळे बळजबरीने रथावर बसून वनात घेऊन जातो. पांडवांकडून जयद्रथ परास्त होतो. तो शरण येतो. येथे राजधर्माचे पालन म्हणून युद्धिष्टिरांकडून त्यास सोडून दिले जाते. येथे याज्ञसेनीकडून जयद्रथ यांचे मुंडन व पाच शेंडी बांधण्याच्या शिक्षेचे लेखकांने संदर्भ टाळलेला आहे. हे वाचकांच्या लक्षात येते.
आश्रमात आलेल्या एका साधूने हरणाने अग्नीचे साहित्य त्यांच्या शिंगास अडकून पळवले. ते मला मिळवून द्यावे अशी पांडवांना विनंती केली. त्यामुळे पांडव हरणाच्या मागे लागले. तहानेने व्याकूळ होऊन पाण्यासाठी डोहावर गेल्यामुळे तेथे मुर्छित होतात. त्यातच त्यांना यक्ष प्रश्नांना सामोरं जावं लागले.
अज्ञातवासाचे आयुष्य घालवण्यासाठी युधिष्ठिर ‘कंक’ नावाचा ब्राह्मण बनतो. भीम ‘बल्लव’ नावाचा पाकशास्त्रज्ञ होतो. नकुल ‘ग्रंथिक’ अश्व प्रशिक्षक भूमिका वटवतो. सहदेव ‘तंतिपाल’ गोपरीक्षक व याज्ञसेनी दाशी ‘सैरंध्री’ होते. विराटराजा पापभीरू, सरळमार्गी व रसिक होता. मत्स्यदेशाच्या सुरक्षेसाठी राणी सुदेष्णाने पराक्रमी भाऊ किचकास बोलावून घेतले. किचक म्हणजे महादेवाच्या पिंडीवरचा विंचू होता. याज्ञसेनीवर वक्रदृष्टी केल्यामुळे भीमाने किचकाचा वध करतो. या गोष्टीवरून त्रास देणाऱ्या सर्व उपकिचकाचाही वध केला जातो. विराट राज्यांवर चालून आलेल्या कौरवांचा अज्ञातवासातील पांडवांकडून पराजय होतो. याज्ञसेनीचे भीमकर्तृत्व विश्वासास येथे सार्थ ठरते.
वनवास व अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांकडून अर्धे राज्य कौरवांना मागितले जाते. पांडव पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं अनेक निमंत्रित राजांकडूनही बोललं जाते. पण कौरवांनी सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी पांडवांना देणार नाही, हे ठरवलं होतं. हे एक युद्धाचं कारण ठरलं होतं. तर दुसरं कारण वस्त्रहरण यामुळे याज्ञसेनीच्या मनात सतत जळणारा सुडाग्नी हे कौरव-पांडव युद्धाचं सर्वात मोठं कारण होतं. या युद्धात मदत करण्यासाठी श्रीकृष्ण कौरव व पांडव या दोघांनाही टाळू शकत नव्हते. श्रीकृष्णाने दुर्योधन व पार्थ या दोघांनाही बोलावून घेतलं. तुम्ही दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. मला दोघांनाही मदत करणे अगत्याचे आहे. त्यासाठी एकीकडे माझी शस्त्र पारंगत सेना व दुसरीकडे मी स्वतः राहीन, तेव्हा या दोन्हीपैकी कोण काय स्वीकारणार ते ठरवा, तेव्हा दुर्योधनाने श्रीकृष्णाची सेना घेण्याचे मान्य केले. पांडव सैन्याकडून हातात शस्त्र न घेणारा नामधारी श्रीकृष्ण तेवढा उरतो. मग श्रीकृष्णाकडून पार्थाच्या रथाचे सारथ्य केले जाते.
या युद्धात द्रोणाचार्यांनी हातातले अस्त्रशस्त्र खाली ठेवल्यावर दृष्टद्युम्नाकडून त्यांचा वध केला जातो. भीष्माच्या हाती शस्त्र नसताना श्रीखंडीला ढाल करून पार्थाने भीष्मांचे शरविव्हल केले होते. कर्णाच्या रथाचे चाक भूमीत अडकल्यावर पार्थाकडून त्यास ठार केले जाते. एवढेच नव्हे भीमाने अधर्माने दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करतो. कौरव-पांडव यांचे युद्ध तब्बल अठरा दिवस चालले. कौरवांचा पराभव होतो. याज्ञसेनीच्या सा़गण्यारून दुर्योधनावर घाव करून अर्धमेले अवस्थेत भीमांनं सोडलेलं असते. दुर्योधन एका सरोवरात लपतो.
द्रोणाच्या वधाने अश्वत्थामा सुडाला पेटतो. अश्वत्थाम्याने पांडवाच्या सैनिक छावणीवर रात्रीला अचानक हल्ला करून याज्ञसेनीच्या पाचही पुत्रांना कापून काढतो. द्रोणाच्या वधाचा बदला घेतो. त्याच्याकडे अस्त्रविद्या होती. अस्त्रविद्येचा बाण सोडून शेवटी उत्तरेच्या गर्भातील पांडवाचा शेवटचा वंश यांच्यावर वार करतो, पण मृत बाळ श्रीकृष्ण सर्व पुण्याई एकत्र करून जिवंत करतो. त्याचं नाव परिक्षित होतं. तोच अखेरचा पांडव वंश होता. विजयानंतर शेवटच्या क्षणाला पांडवांचा गाफीलपणा पांडवपुत्राच्या वधाचं कारण ठरतो. याज्ञसेसेनीतील वात्सल्याच्या गावाचं मातृत्वरूपी अधिष्ठान व तत्त्वज्ञान येथे अक्षरश: पांगळं होते. कादंबरीत कुंती, याज्ञसेनी, गांधारी, सुभद्रा यांच्यातील मानसिक संघर्ष मनोवेधक, पण चटका लावणारे लेखकांनी साकारले आहे. याज्ञसेनीच्या करुण व आर्त दुःखाचा टाहो वाचकाला अक्षरशः बधिर करतो.
‘पाच आऱ्याचं चाक’ ही कथा याज्ञसेनीच्या दैवदुर्विलासाची व्यथा वाटते. नियतीचा निर्विकार चेहरा तिच्या आयुष्यातील सर्व सुखाची रांगोळी करतो. तिच्या जाज्वल्य सामर्थ्याचा, गुणाचा, मनाचा व बौद्धिक ज्ञानाचा कस सूड होऊन पांडवामध्ये सुडाग्नी कायमचं तेवत ठेवण्याचं काम करतो. रणातले पराक्रमी याज्ञसेनीची धगधगती आग होऊन कौरवांच्या पराभवाचे मूळ कारणं बनतात, हे लेखकांनी कादंबरीत ज्वलंतपणे मांडलेले आहे.
अशोक वाटिकेतील घारीच्या पाच पिल्लांना पार्थाकडून बाणाने मारण्याचा प्रसंग व तसेच सरस्वती नदीमध्ये पाच छोटे मासे व तिची आईचा प्रसंग काल्पनिक, पण भविष्यातील अघोरी घटना व घटितांचे प्रतीकं वाटतात. काही अद्भुत घटनांना बगल देऊन कादंबरीतील काही प्रसंग लेखकांनी तर्कसंगतपणे रेखाटलेले आहेत, असं प्रत्ययास येते आकलनक्षमता, प्रेमशक्तीचं रितं आयुष्य, मातृत्वाला आलेलं करुणेचं उधाण, भावनेतील पराकोटीचा पूर, सामर्थ्यशाली मातृत्वाचा विफल व विकल चाकाचा प्रवास, हेच याज्ञसेनीच्या मातृत्वाची सत्त्व परीक्षा हीच कादंबरीची मध्यवर्ती भूमिका वाटते. याज्ञसेनीच्या मनात पेटलेला धगधगता सुडाग्नी शेवटी याज्ञसेनी पर्यंत येऊन पोहोचतो. सुडाचा प्रवास सुडापर्यंत येऊन थांबतो.
सुडाग्नीचे महाभारत सामाजिक सुडाचे पैलू याज्ञसेनीच्या माध्यमातून कादंबरीत उकलत जातात. लेखकांनी विवेकबुद्धीतून, तार्किक बुद्धिवादाला धरून महाभारतातील घटनांतून याज्ञसेनीच्या जीवनाचे सत्यशोधन करण्याचा प्रामाणिक व डोळस प्रयत्न केला आहे. अत्यंत वाचनीय अशी ही कादंबरी आहे. महाभारतात अनेक ठिकाणी आलेल्या अंधश्रद्धा व चमत्कार तसे नसून त्यांची वस्तुस्थिती अशी असावी, याची तर्कसंगत मांडणी लेखकांनी केली आहे.
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे
लेखक : देवीदास फुलारी
मुखपृष्ठ : कैवल्या राम मशीदकर
पृष्ठे : ३५२
किंमत : ३५०/
प्रा. व्यंकट सोळंके, नांदेड.
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
फारच छान
अप्रतिम परीक्षण