मारुतीच्या पारावर पाटील हसला की समोरच्या चार-पाच गल्लीत ऐकायला जात असे. त्याचं हसूच होतं तसं. तो खो-खो हसायचा. त्या हसण्यातसुद्धा एक प्रकारची जरब होती, धाक होता. उंचापुरं, धडधाकट शरीर त्याच्या हसण्याला साथ देत असे. अंगात पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच पांढरेशुभ्र धोतर आणि पायात करकर आवाज करणारे जोडे अशा थाटात पाटील गावातुन चालू लागला की बाया-बापड्या घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असत.
आजही पाटील पारावर बसून खो-खो हसला तशी त्याच्याबरोबर बसलेली एक-दोन माणसंही हसली. नेमका त्याचवेळी गवताचा भारा डोक्यावर घेऊन सदानाना घराकडं निघाला होता. पाटील नेमका त्याचवेळी बोलला.
‘‘…अरे लेकाच्या, घरावर इमला घालणार हाईस म्हणं?’’
‘‘व्हयं पाटील, इमला घालावं म्हणतोय’’ सदानाना आदबीनं म्हणाला.
‘‘घाल घाल! चांगलं हाय’’ पाटील हसून बोलला तसा सदानाना पुढे चालू लागला. पाठीमागून पाटलाचा आवाज त्याच्या कानावर आला, ‘‘ह्यो काय इमला घालतोय? पाच-पाच पोरीची लग्नं करता करता फासी घिईल हा. म्हणं इमला घालतोय…’’ पाटलाने असे म्हणताच शेजारची माणसं पुन्हा हसली.
‘‘तसं नव्हं पाटील! इमला घालणाराय तो’’ एकजण म्हणाला.
‘‘अरे घालु दी रे, पर दोन खणच का हुईना रंदागुली इमला घालावं ह्येनं, तसं झालं तर पायात जोडे घालणार न्हाई.’’ पाटलाच्या अंगात खुमखुमी होती.
पाटलाचे हे बोल सदानानाच्या कानावर पडले आणि त्याचे काळीज चिरत गेले. निराश होऊन तो घरी आला. गवताचा भारा टाकला. हातपाय धुऊन गप्प बसला. कुणालाच काही न बोलता.
‘‘काय झालंय? कोण काय बोललं का?’’ बायकोने असे विचारताच त्याने एका दमात मगाशी घडलेली घटना सांगितली.
‘‘असं व्हय! मग त्याचं काय ह्यवढं मनाला लावून घ्याचं?’’ ती म्हणाली, तो मात्र गप्पच बसला.
पेटून उठलेल्या मनाची उभारी माणसाला कामाच्या पूर्णत्वाकडे घेऊन जाते. मनाची जिद्द माणसाचे अर्धे काम करते व राहिलेले अर्धे त्याचे कष्ट.
सदानानानेही कित्येक उन्हाळे -पावसाळे बघितले होते. कित्येक सुख-दु:खाचा तो साक्षीदार होता. थोडे का चटके सोसले होते त्याने त्याच्या आयुष्यात? पण त्याने स्वत:चे मन कधीच खचू दिले नव्हते. आज मात्र त्याला कसेसेच झाले. तरीही त्याने मनाला उभारी देण्याचा प्रयत्न केला.
खरंच, मला टाकणं हुईल का इमला? तो स्वत:शीच म्हणाला.
त्याच्या मनाची घालमेल बायकोला कळत होती. ती त्याला म्हणाली, ‘‘आवं, म्या काय म्हणते, हुईल सगळं! कशाला जीवाला लावून घ्यायचं?’’
‘‘तसं नव्हं! पर लोक असं बोलले की जीवाला लागतंय की’’ तो काकुळतीनं म्हणाला.
‘‘बघू, यंदा शेतात चांगला माल झाला तर करू काय तर!’’ तिने नवर्याला धीर दिला.
त्यावर्षी पाऊसकाळ चांगला झाला. पीकपण बर्यापैकी आलं. पर खाणारी तोंडं जास्त असल्यामुळं शिल्लक किती राहील याचीही काळजी होती. दोघा नवरा-बायकोनी काटकसर केली. इकडचं-तिकडचं काय काय केलं अन् एका दिवशी इमला करायचं ठरलं. शेजारच्या गावाचा सुतार आला. रानातली दोन तीन मोठी झाडं तोडली. त्याची कटाई करून आणली. इमला तयार होऊ लागला. एक वडारी बोलावून त्याला जोतं बनविण्याचं काम दिलं. कामाला जोरात सुरुवात झाली. इमला तयार होत आला आणि एका दिवशी सुतार सदानानाला म्हणाला,
‘‘सदानाना, सोप्याला तीन खणाचा रंदागुली इमला घाला, चांगला दिसंल.’’
‘‘पर त्याला दाम लई लागल की’’ सदानाना म्हणाला.
‘‘तुम्हाला काय कराचाय? मी हाय की!’’ सुताराने असे म्हणताच सदानाना म्हणाला, ‘‘असं म्हणतूस! तर कर! पर दाम जरा उशीरा मिळल बघ.’’
‘‘तुम्हाला जवा द्याचाय तवा द्या’’ असं म्हणून त्यानं तीन खणाचा रंदागुली इमला तयार केला.
जोतं बांधलं. त्यावर फडतरं टाकली. चांगला मुहूर्त बघितला व एके दिवशी इमला उचलायचं ठरलं.
गावातले लोक आले. आता इमला उचलणार एवढ्यात सदानानाची बायको म्हणाली,
‘‘थांबा! इमला उचलायचा न्हाय! अगुदर पाटलांना बोलवा, मगच त्यांच्या हातानं उचला इमला.’’
पाटलाला बोलावून आणलं. पाटील दारात आला. तो मध्ये येऊ लागताच ती म्हणाली,
‘‘पाटील! जोडा बाहीरच काढा अन् मग मधी या!’’
पाटलाला खाडकन पारावरचे बोल आठवले. त्याने जोडा काढला आणि खजिल होऊन मध्ये आला. त्याने इमल्याला हात लावला.
इमला उचलता उचलता पाटील बोलला,
‘‘सदानाना, तुम्हा नवरा-बायकुच्या जिगरीनं माझ्या जोड्याची करकर कायमची थांबली की रे!’’
– माधव गिर
चपराक, पुणे
8975878803
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
वा वा छानच