श्री घनश्याम पाटील या तरुण, तडफदार संपादकाच्या लेखणीतून उतरलेल्या निवडक अग्रलेखांचा संग्रह ‘दखलपात्र’ वाचण्यात आला. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा सारा प्रवास खरोखरच वाचनीय नि दखलनीय असाच आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. त्याचबरोबर प्रथमदर्शनी असाही प्रश्न पडतो की, संपादक म्हणजे लेखनीस सर्वस्व मानणारा प्राणी असे असताना मुखपृष्ठावर लेखनीला जोडून तलवार का बरे असावी? मात्र पुस्तकाचे अंतरंग उलगडत असताना या प्रश्नाचे उत्तर आपोआप सापडते.
प्रत्येक अग्रलेख वाचताना लेखनीसोबत धारदार शब्दांची अशी काही गुंफण आढळते की, त्याची जखम, बोचणी संबंधितास झाल्याशिवाय राहात नाही. न पटलेल्या गोष्टींवर आणि व्यक्तिंवर संपादक असे काही वार करतात की बस्स! ‘अरे, बाप रे! मलाही या मानवाबद्दल असेच वाटत होते…’ अशीच प्रतिक्रिया वाचकाच्या ओठावर अलगद येते. अर्थात हे सारे ‘कुण्याही जीवाचा न घडो मत्सर’ याच वृत्तीतून शब्दांकित झाल्याचे जाणवते. संपादकीय शैली जशी आक्रमक आहे तशीच ती ओघवतीही आहे. त्यामुळे हातात घेतलेल्या पुस्तक संपूर्ण वाचल्याशिवाय हातावेगळे होतच नाही. अनेक सामाजिक विषयांचा आणि व्यक्तिंचा परामर्श घेतलेला आहे. हे करताना कुणावरही विनाकारण टीका करणे किंवा विरोधासाठी विरोध ही वृत्ती मुळीच दिसून येत नाही. मनाला जे पटले नाही त्याला विरोध, त्यावर टीका आणि त्याचबरोबरीने मनाला जे भावले त्या गोष्टींची मुक्तकंठाने प्रशंसा करताना संपादक घनश्याम पाटील हातचे काही राखत नाहीत. ‘माझे ते खरे नसून खरे तेच माझे’ असाही प्रशंसनीय प्रयत्न हे अग्रलेख रेखाटताना झालेला आहे.
मराठी वृत्तपत्रांमध्ये अनेक थोर संपादकांची परंपरा फार मोठी आहे. जहाल आणि मवाल प्रवृत्तींचे संपादक वाचकांनी अनुभवलेले आहेत. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर सामना या वृत्तपत्राचे संपादक, हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नांदेड येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक प्रजावाणीचे संपादक सुधाकर डोईफोडे यांची नावे ठळकपणे समोर येतात. त्यांच्या धारदार, सडतोड, आक्रमक आणि परिणामांची चिंता न करणाऱ्या लेखनीची आणि विचारांची आठवण घनश्याम पाटील यांचे अग्रलेख वाचताना येते. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ अशी सडतोड विचारणा करण्याची ताकद आणि पात्रता हा तरुण संपादक बाळगून आहे हे निश्चित!
मराठवाड्याच्या मातीतील लातूर जिल्ह्यातील हा युवक वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी पुण्यात येतो काय, पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘संध्या’ या सायं दैनिकात उपसंपादक होतो काय, बारावी वर्गात शिकत असताना स्वतः मालक, प्रकाशक आणि संपादक असलेले ‘चपराक’ हे नियतकालिक काढतो काय हे सारे स्वप्नमय आणि सिनेमात घडणाऱ्या घटनांप्रमाणे अचंबित करणारे तर आहेच पण हे सारे दिव्य पार पाडताना अनुभव नि पाठबळ यासंदर्भात काय तर लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भुकंपाच्या लिहिलेल्या बातम्या हीच काय ती पत्रकारितेची शिदोरी आणि अनुभव! परंतु लहान वयातच मनामध्ये विचारांची, संस्काराची एक निश्चित अशी बैठक तयार झाली. त्यातूनच लेखन अर्थात पत्रकारिता हा हौसेचा विषय नाही तर ते एक सामाजिक जाणीवा प्रकट करण्याचे व्यासपीठ आहे. त्यात निष्ठा, धैर्य, संयम ओतला आणि कोणतीही कसूर केली नाही तर आपोआप समाजसेवा घडते अशी विचारधारा पक्की होत गेली. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे भविष्यातील रोखठोक, निष्ठावान, संयमी परंतु आक्रमक पत्रकाराचा जन्म किल्लारीच्या दुर्दैवी घटनेतून झाला. त्यातून घनश्याम यांची स्वतःची अशी काही तत्त्वं निर्माण झाली. आजूबाजूला घडणाऱ्या अप्रिय घटनांबद्दलची संतापजनक तिडीक त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांचे मार्गक्रमण सुरु झाले.
एकदा दिशा ठरली, वाट गवसली की माणूस त्या वाटेने जाण्यासाठी सिद्ध होतो. वाटेत येणारे खाचखळगे, काटेकुटे यावर तीच व्यक्ती मात करू शकते जिचा निश्चय दृढ असतो, मांड पक्की असते. तिथे अनुभवाचा प्रश्न निर्माण होत नाही, तिथे होणाऱ्या यातनांची मोजदाद नसते फक्त एक ध्यास, एक ध्येय समोर असते. घनश्याम यांनीही अर्थार्जनाचे इतर सारे पर्याय धुडकावून पत्रकारितेचा ध्यास घेतला. या क्षेत्रात पदार्पण करीत असताना तात्या काणे आणि गोपाळराव बुधकर यांच्या विचारांनी प्रवृत्त झाल्याचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. ‘सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर’ हे ब्रीद कायम काळजात जपून ठेवलेल्या घनश्याम यांनी वयाच्या अठराव्या वर्षी सुरू केलेले ‘चपराक’ हे प्रकाशन आज साप्ताहिक आणि मासिकाच्या रुपाने वाचकांच्या मनात आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात तसेच प्रकाशन विश्वात मोठ्या रुबाबात घट्ट पाय रोवून उभे आहे. प्रकाशन क्षेत्रात उडी घेतल्यापासून इतर लेखकांची शेकडो पुस्तके प्रकाशित करून लेखकांना एक सशक्त व्यासपीठ मिळवून देत आहेत.
मनोगतात पाटील लिहितात की, ते लेखनाच्या बाबतीत आळशी आहेत. हे वाचून असे वाटते की, लेखनाचा कंटाळा असणारा माणूस लेखनामध्ये एवढी प्रगती करू शकतो तर ह्या गृहस्थाजवळ कंटाळा नसता तर एव्हाना यांनी क्रांती घडवून आली असती अर्थात त्यांची त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. कदाचित त्यांचे जे तात्त्विक विरोधक आहेत त्यांना इशारावजा सूचना असू शकते की, बघा मी जर आळस झटकला तर…? गमतीचा भाग सोडला तर घनश्याम यांचे वाचन आणि स्मरणशक्ती दोन्हीही ‘कम्माल’ आहेत हे त्यांच्या लेखनात शब्दाशब्दातून जाणवते. त्यांनी प्रसंगानुरूप दिलेले दाखले असतील, संदर्भानुरुप दिलेल्या काव्यपंक्ती असतील सारे काही चपखल असते.
‘वंदनीय ते वंदावे नि निंदनीय ते निंदावे’ असा त्यांच्या लेखनाचा मंत्र आहे. दखलपात्र लेखसंग्रहात २००३ ते २०१३ या कालखंडातील एकूण ४१ अग्रलेखांचा समावेश करताना नानाविध व्यक्ती आणि अनेकानेक विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. ही यादी तशी फार मोठी होईल. प्रचंड मेहनतीने, ताकदीने, अतिशय अभ्यासपूर्ण लेखांची सुनियोजित मांडणी केलेली दिसून येते.
शरद पवार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखनीचे आणि वाणीचे हक्काचे गिऱ्हाईक तर गोपीनाथ मुंडे यांच्या सातत्यपूर्ण टीकेचे धनी! या दोघांइतकी टीका पवार यांच्यावर कुणी केली नसेल. या दोघांचे वारसदार म्हणून घनश्याम पाटील यांनीही शरद पवार यांच्यावर वारंवार टीका केलेली आढळून येते. मात्र हे करीत असताना त्यांनी कुठेही तोल जाऊ दिला नाही उलट दिल्लीत एका माथेफिरूने शरद पवार यांच्यावर हल्ला केला त्यावेळी अण्णा हजारे यांनी ‘एकही मारा क्या?’ असा उपरोधिक प्रश्न विचारला त्यावेळी घनश्याम पाटील यांनी ‘अण्णांचा गांधीवादाचा बुरखा फाटला…’ अशी टीकाही अण्णांवर केली आहे. अण्णा हजारे यांच्या वारंवार बदलत जाणाऱ्या भूमिकांवरही घनश्याम पाटील यांचा आक्षेप होता. ‘मिरवण्याची हौस म्हणून उपोषणे केली का?’ असा खडा सवाल ते विचारतात.
आज सर्वत्र ब्राह्मण समाज टीकेचा विषय झाला आहे. ब्राह्मणांनी काही लिहिले किंवा ब्राह्मणांची बाजू कुणी मांडली की, तो मनुवादी असा एक प्रवाह सध्या सुरू आहे. मात्र घनश्याम पाटील यांनी ‘ब्राह्मण द्वेष थांबवा, राष्ट्र वाचवा’ या अग्रलेखातून ब्राह्मण समाजाची बाजू समर्थपणे मांडली आहे. ते लिहितात, ‘ब्राह्मणांना झोडपणे, त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांना त्रास देणे म्हणजेच पुरोगामीत्वाचे लक्षण असा ग्रह काही समाजकंटकांनी करून घेतलेला दिसतोय. समाज भटमुक्त करण्याचा विडा उचलणाऱ्या फुरफुरत्या घोड्यांना आवरले नाही तर त्याचे गंभीर परिणाम राष्ट्राला भोगावे लागतील…’ असे निर्भीड वास्तव मत मांडून ते पुढे लिहितात,
‘सरकारच्या उदासीन धोरणांमुळे ब्राह्मणांनी नोकऱ्या सोडल्या आणि अतिशय जिद्दीने, चिकाटीने विविध उद्योगधंद्यात यश मिळवले. गुणवत्तेच्या बळावर यश मिळू शकते यावर विश्वास असल्याने त्यांनी शक्य होतील ते उद्योग केले अगदी हॉटेल चालविण्यापासून ते केशकर्तनालयापर्यंत कोणताही व्यवसाय वर्ज्य नाही हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. कष्ट करताना कोणताही व्यवसाय अथवा पर्याय ब्राह्मण समाजाने निषिद्ध मानला नाही हेच सिद्ध होते…’ ते पुढे असेही लिहितात की, ब्राह्मण समाज शासकीय नोकऱ्यांपासून दूर गेला आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण लक्षणीय वाढले, असा कुणी निष्कर्ष काढला तर आश्चर्य वाटू नये…
दखलपात्र या संग्रहातील प्रत्येक लेखाची दखल घेणे क्रमप्राप्त आहे परंतु इच्छा असूनही जागेच्या मर्यादेमुळे ते शक्य नाही तरीही माझ्या मनाला भिडलेल्या काही लेखांची नोंद घ्यावी लागणार आहे. आज सर्वत्र स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर तेवढा मोठा लढा होऊनही अत्याचार तसूभरही कमी झालेले नाहीत हे पाहून संपादक घनश्याम पाटील कमालीचे अस्वस्थ होतात. त्यांची अस्वस्थता संग्रहातील ‘ही लढाई जिंकलीच पाहिजे’, ‘सद्गुणांचा स्फोट अटळ’, ‘नव्या युगाचा हा झंकार’, ‘तडकलेली कळी, माणुसकीचा बळी’, ‘… उन्हे बाजार दिखाया!’ या लेखांमधून प्रकट होते. महिलांवर होणारे अन्याय, त्यांची छळवणूक आणि सामाजिक औदासिन्य यावर पाटील पोटतिडकीने प्रकाश टाकतात. याच विषयाशी सुसंगत असणाऱ्या लोककवी म. भा. चव्हाण यांच्या काही ओळी त्यांनी दिलेल्या आहेत…
१) ‘जनी’ असो, ‘जिनी’ असो
बाई बाईच असते,
देश कोणताही असो
आई आईच असते।२) आई कुणाचीही असो
तिचा सन्मान करावा
तिने टाकलेला शब्द
फुलासारखा झेलावा!३) अवमानिती स्त्रियांस
त्यांची पुस्तके वाचू नका
सोडूनी जाती त्यांना
स्वतःच्याच बायका!
हे सांगताना संपादक घनश्याम पाटील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिकवणीची आठवण करून देतात…
‘परद्रव्य आणि परनारी यांच्या आहारी जाणे हाच खरा विटाळ! यांच्यापासून जे दूर आहेत तेच खरे सोवळे!’ यावरून संपादकांची लेखणी किती अभ्यासू आणि चपखल आहे याची साक्ष पटते.
मराठी राजकारणी दिल्लीत म्हणावा तसा रमत नाही आणि जो रमतो तो महाराष्ट्राचा राहत नाही.’औरंगजेब कि आखिरी रात…’ या लेखाची आठवण करून देणारा एक अग्रलेख म्हणजे या संग्रहातील ‘एक पट्टेवाला…’ हे संपादकीय! या लेखात सुशीलकुमार शिंदे यांना झालेली कल्पनातीत पश्चात्तापादग्ध भूमिका अत्यंत उत्तम रीतीने पाटील यांनी रेखाटली आहे. कदाचित भविष्यात शिंदे यांनी आत्मचरित्र लिहिले आणि त्यात वास्तव मांडले तर ते कसे असेल याची झलक म्हणजे हा अग्रलेख! यामध्ये ‘नक्कल करायला अक्कल लागते’ हा नेहमीचा नकारात्मक वाक्प्रचार आजचा नेता कसा गौरवाने आणि सकारात्मकतेने घेतो हा विरोधाभास अत्यंत उत्कृष्टपणे मांडला आहे.
सामान्य, गरीब असलेला कार्यकर्ता निवडून येतो आणि नंतरच्या काळात स्वतःची आर्थिक प्रगती कशी घडवतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘विधायक विचारांचा जागर घाला!’ हा अग्रलेख! या लेखात एका उमेदवाराच्या भाषणातील काही अंश दिला आहे जो वास्तवाची जाण देणारा आहे. ही परिस्थिती सर्वत्र आढळत असूनही जनता कशी शांत बसते, पाच वर्षांनंतर मिळणारी संधी कशी वाया घालवते ही वेदना संपादक व्यक्त करतात.
‘वरून कीर्तन आतून तमाशा!’ या अग्रलेखात विजय मल्ल्या, शरद पवार यांच्यावर टीका करताना घनश्याम यांची लेखणी आर. आर. पाटील यांच्यावरही घणाघात करते. ते लिहितात,
‘माढ्याजवळील ‘अतिथी’ या बिअर बारचे आणि रेस्टॉरंटचे उद्धाटन मोठ्या थाटात करून गृहमंत्री रावसाहेब पाटील यांनी पवार घराण्यावरील आपली निष्ठा प्रत्यक्ष दाखवून दिली आहे. या प्रसंगी मला आपल्या दोन माजी पंतप्रधानांमधील संवाद आठवतो. पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी एकदा लोकसभेत सांगितले की, ते आत्ताच एका पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन करून आले आहेत. तत्क्षणी एक तरुण खासदार ताडकन उभे राहून म्हणाले की, माननीय पंतप्रधानांनी एका हॉस्पिटलऐवजी एका हॉटेलचे उद्घाटन केले ही माझ्या जीवनातील अत्यंत दुःखदायक घटना आहे. असे खडे बोल सुनावणारे ते खासदार होते अटलबिहारी वाजपेयी!
आपण नेहमीच असे म्हणतो की, हे सारे एकाच माळेचे मणी आहेत परंतु माळेला शिरोमणी असतो हे मात्र आपण विसरतो. संपादक पाटील म्हणतात, ‘ढोबळे आणि पाटील हे ज्या माळेचे मणी आहेत त्या माळेचा शिरोमणी अशा नेत्यांचे संरक्षण करण्यासाठी समर्थ असल्याने नेहमीप्रमाणे सामान्य माणसाचा आवाज दाबला जाईल.’ संपादक इथेही म. भा. चव्हाण यांच्या काव्याचा दाखला देतात…
‘शहाण्याने राहू नये
दारुड्याच्या चाकरीला,
कष्ट केले तरीही
वास येतो भाकरीला!’…
संपादक घनश्याम पाटील यांच्या लेखणीतून साहित्य संमेलने आणि त्यातील अर्थपूर्ण व्यवहार सुटलेला नाही. त्यांच्या लेखणीतून जन्मलेले, ‘संमेलनाचा सोपस्कार उरकला!’, ‘संमेलनाचे पावित्र्य जपावे’, ‘यांना आवरा त्यांना सावरा’, ‘कुणाचे पुण्य? कुणाचे भुषण?’ असे तब्बल चार सणसणीत अग्रलेख दखलपात्र या संग्रहाची शान वाढवताना घनश्याम पाटील यांच्या लेखणीची विविधता दर्शवितात. या सर्व अग्रलेखातून त्यांनी संबंधितांवर ओढलेले ताशेरे मनाला भावतात.
लोककवी मनमोहन आणि रॉय किनीकर या व्यक्तिंविषयी घनश्याम यांची लेखणी कमालीचा आदर प्रकट करते. त्यांची विनयशीलता त्यातून प्रकट होते. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विलासराव देशमुख यांच्या बाबतीतही संपादकांची लेखणी नेहमीप्रमाणे आक्रमक होत नाही. अर्थात हे दोन्ही प्रसंग कडवट नाहीत. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर हे अग्रलेख लिहिलेले असल्याने देशमुख यांच्याबाबत आदर व्यक्त करणे हे स्वाभाविक असले तरीही त्यातून विलासराव यांचे अजातशत्रू या व्यक्तिमत्त्वाचा पुन्हा परिचय होतो. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अग्रलेख लिहिलेला असल्याने त्यांच्याबद्दल व्यक्त झालेल्या भावना ह्या प्रसंगानुरूप असल्या तरी त्यातून संपादकांचा लेखणीवर असलेला ताबा, संयम, धीर या गुणांची प्रचिती देऊन जातो.
पृथ्वीराज चव्हाण, सुधीर गाडगीळ, अमिताभ बच्चन, राहूल गांधी, जयदेव गायकवाड, शीला दीक्षित, विश्वनाथ कराड, अजित पवार, आर.आर. पाटील, जयंत पाटील इत्यादी व्यक्तिंना घनश्याम पाटील यांच्या लेखणीने नायकत्व प्रदान केले आहे. अनेकानेक विषय, विविध नेते यांना घेऊन जन्मलेल्या चाळीसपेक्षा अधिक लेखांचा संग्रह ‘दखलपात्र’ च्या द्वितीय आवृत्तीच्या रुपाने वाचकांसमोर आला आहे. जबरदस्त, अभूतपूर्व, वाचनीय, अनुकरणीय अशी एक गुंफण वाचताना मनस्वी आनंद होतो. या परिचय लेखाचा शेवट करताना घनश्याम पाटील यांनी संग्रहात समाविष्ट केलेल्या या ओळी…
‘लबाड बांधती इमल्या माड्या
गरिबांना त्या झोपड्या,
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा
वेश्येला मणिहार…
उद्धवा, अजब तुझे सरकार!’
श्री घनश्याम पाटील यांच्या पुढील चौफेर प्रवासासाठी अनंत शुभेच्छा!
(तळटीप:- दखलपात्र हा संग्रह ०७ मे २०१३ रोजी प्रकाशित झाला आहे. त्याचवर्षी मी करून दिलेल्या या संग्रहाच्या परिचयात्मक लेखाचे हस्तलिखित नुकतेच हाती लागले आणि तात्काळ ते जशास तसे टंकलिखित करून आज ०८ ऑगस्ट रोजी मित्रवर्य घनश्याम पाटील यांच्या जन्मदिनी समूहात प्रकाशित करीत आहे. घनश्यामजी, वाढदिवसाची ही भेट स्वीकारावी…)
– नागेश सू. शेवाळकर.
94231 39071
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
लेख प्रकाशित केल्याबद्दल श्री घनश्यामजी आणि श्री वैभव धन्यवाद!
अतिशय सुरेख वास्तव अनुभूतीचे दर्शन घडविले…
शेवटी कार्याचा गाभा… त्या मागची भावना व विचार च
महत्त्वाचा असतो….
ही निर्भीडता सर्वच पत्रकारात येवो।महाराष्ट्र् आज जी विश्वासार्हता गमावत चालला आहे त्याला आळा बसेल।चाकरीत रमलेल्यांनो जागे व्हा।
दादा, शेवाळकरांची ‘दखलपात्र’वरील प्रतिक्रिया वाचली आणि ते पुस्तक केव्हा एकदा हातावेगळं करतो असे झालंय. लोकमान्य टिळकांच्या भाषेशी आणि बाळासाहेबांच्या निर्भीडपणाशी नाते सांगणारी तुमची लेखनशैली भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडवायला पुरेशी ठरते. तुमचे लेखन वाचताना गांधीवादाचा तिरस्कार तर नाही, मात्र त्यातील फोलपणा वाचकांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. समाजातील अनिष्ट विचारांच्या राजकारणी, समाजकारणी व्यक्ती, त्यांचे आचार आणि त्यांची दांभिकता यांवर सडेतोड विचार मांडण्याची धमक क्वचित पाहायला मिळते. अलीकडील काळात कातडीबचाव धोरण अवलंबून लेखन करणाऱ्या लेखणी बहाद्दरांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालावे अशी तुमची लेखनकला अशीच बहरत जावो…💐