अन मी पोरका झालो

अन मी पोरका झालो

Share this post on:

२२ मार्च २०२०, रात्रीचे दहा वाजले होते, नुकतीच आमची जेवणे उरकली होती. मी आणि बायको वंदना दूरदर्शनवरील बातम्या बघत बसलो होतो. कोरोना विषाणूचा जगभर जोमाने पसरत चाललेला प्रादुर्भाव व त्या संदर्भातील बातम्या ऐकून थोडेसे धास्तावल्या सारखे झाले होते. कालच जनता कर्फ्यू होऊन गेलेला होता. त्यामुळे सगळीकडे जरासे चिंतेचेच वातावरण पसरलेले होते.

नाही नाही ते विचार मनात येत होते. मध्येच एक ब्रेकिंग न्यूज आली आणि त्या बातमीने तर अंगावर काटाच उभा राहिला. ती बातमी होती चीन मधील वूहान ह्या शहरात हजारोंच्या संख्येने कोरोनाने बाधित झालेले रुग्ण मरण पावले आहेत अशी!

आता हा विषाणू जगभर पसरतो आहे व त्याने इटली, इंग्लड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी ह्या देशांमध्ये हाहा:कार माजवायला सुरवात केली आहे, अशी बातमी मराठी बातमी वृत्तवाहिनीवरून मोठमोठ्याने दिली जात होती.

माझा जीव हे ऐकून हळहळत होता आणि मनातल्या मनात देवाचा धावा करून त्याला साकडे घालत होता की; “देवा कृपा कर आणि भारताला ह्या सगळ्यापासून बाजूला ठेव रे बाबा”. जर ह्या सुधारित देशांची व पृथ्वीतलावरील सर्वोत्तम वैद्यकीय व्यवस्था असलेल्या देशांची ही अवस्था आहे तर; आपल्या देशाची काय अवस्था होईल ह्याचा विचारच करायला नको! १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जर का ह्या कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तर परिस्थिती फारच अवघड होऊन बसेल!

बातम्यांमधून सतत सांगत होते की वयस्कर लोकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच ज्यांची अन्जिओप्लस्ति अथवा बायपास सर्जरी झालेली आहे त्यांनाही कोरोनाचा संसर्ग सहज होऊ शकतो. त्यामुळे त्यांनीही जास्त काळाजी घ्यावी. शक्यतो घरातून बाहेर पडू नये, वगैरे वगैरे. माझी तर पाचावर धारणच बसली होती. कारण दोनच वर्षांपूर्वी माझी अन्जिओप्लस्ति झालेली होती. मनातल्या मनात मी आपल्याला काही होणार नाही असे म्हणतच स्वत:ची समजूत काढत होतो व अजिबात घरातून बाहेर पडायचेच नाही असे ठरवून बसलो होतो.

असे मी ठरवले आणि इतक्यात माझ्या धाकट्या भावाचा मला फोन आला;
हेल्लो, दादा, मी किशोर बोलतोय !

मी : “हा बोल ना रे किशोर. काय रे इतक्या उशिरा कसा काय फोन केलास. सगळे काही ठीक आहे ना?” असे एका मागून एक प्रश्न मी त्याला विचारले.

किशोर : “आरे दादा जरा महत्वाचे होते म्हणूनच तुला जरा उशिरा फोन केला आहे. तसं फार सिरीयस काही नाही पण आईला मी आत्ताच रत्ना मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे”.

त्याचे हे बोलणे ऐकून माझे मन एकदम सुन्न झाले. मी स्वत:ला कसेबसे सावरून त्याला मध्येच थांबवून विचारले की;
मी : “एकदम काय झाले ममीला? तुला मला जरा आधी फोन नाही का करता आला” !

किशोर : “दादा ऐक, एवढे काही सिरीयस नव्हते पण संध्याकाळपासून तिला खूपच त्रास व्हायला लागला होता. तिने एकदमच अंग टाकून दिले होते. मग काय करणार? शेजारच्या संजूला बरोबर घेतले आणि गाडीत घालून आत्ताच दवाखान्यात दाखल केले आहे. तिला युरीन इन्फेक्शन झाले आहे असे डॉक्टर म्हणालेत. आत्ता तिला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे”. थोडे बरं आहे. तू लगेच यायची घाई करू नकोस कारण इथे अतिदक्षता विभागात कोणाला आत सोडत नाहीत”.

मी : “ते ठीक आहे रे! पण डॉक्टर जर भेटले तर त्यांना सगळे सविस्तर विचारून घे. मी उद्या सकाळी येतोच आहे”.

किशोर : “दादा तू उद्या सकाळी ११ वाजता ये. त्यावेळेस डॉक्टर येणार आहेत. तू आलास की आपण त्यांच्याशी चर्चा करून काय करायचे ते ठरवू”.

मी : ‘ठीक आहे. मी फोन ठेवतो, पण समजा कधीही काहीही लागले तर मला आधी फोन कर. चल ठेवतो मी फोन”.

आमचे हे संभाषण वंदनाने ऐकले होते. तिने मला लगेच विचारले की; “आपण जायचे का आत्ता हॉस्पिटलमध्ये” !

मी तिला समजून सांगितले की एवढी काही तातडीची परिस्थती नाहीय. उद्या सकाळी ११ वाजता आपण जाऊ आणि डॉक्टर काय म्हणताहेत ते बघू. असेही आपण काय करणार आहोत तिथे जाऊन!

कशीबशी ती रात्र काढली. आधीच ह्या कोरोनाच्या भीतीने मनात घर केलेले होते. त्यात मला तर हॉस्पिटलमध्ये जावेच लागणार होते. दुसरा काही पर्यायच नव्हता माझ्या समोर. दुसऱ्या दिवशी सकाळी तोंडाला मास्क लावून १० वाजताच हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. वाटेत खूप ठिकाणी पोलिसांनी अडथळे घालून रहदारीवर नियंत्रण आणले होते. सहकारनगर आणि लॉ कॉलेज रोडवर मला थांबवले होते. आई सिरीयस आहे म्हणून सांगितल्यावर त्यांनी फारसे काही न विचारता सोडले होते.

शेवटी ही सगळी अडथळ्यांची शर्यत पार करत १०.४५ला हॉस्पिटल मध्ये पोचलो होतो. आई अतिदक्षता विभागात असल्यामुळे तिच्याकडे फक्त एक नजर टाकून लगेचच परत आलो. असेही खूप विनवण्या केल्यावर सुरक्षा रक्षकाने आमच्यावर उपकार म्हणून आम्हांला एक एक करून आत सोडले होते.

बरोबर ११ वाजता डॉक्टरीन बाई आईला तपासून बाहेर आल्या. आम्हीं त्यांना भेटलो. त्या म्हणाल्या की; “तुमच्या आईची एक किडनी काम करत नाहीय, युरीन इन्फेक्शन मुळे रक्तातले हिमोग्लोबिन, सोडियम खूप कमी झाले आहे. उद्या आपण एक छोटीशी प्रोसिजर करून किडनी स्वच्छ करून काही उपयोग होतो आहे का ते पाहू कारण त्यांच्या वयानुसार दुसरा कुठलाच उपाय करता येणार नाही. डायलिसीसचा एक उपाय करता आला असता पण त्यांच्या वयाला ते झेपणार नाही”. डॉक्टर अगदी स्पष्टच बोलत होत्या.

आईचे वय ८० असल्यामुळे त्यांना उपचार करतांना खूप मर्यादा येत होत्या. त्यात दुसरीकडे ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. हॉस्पिटलमध्ये कोणालाही कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात होती.

डॉक्टरांनी आम्हांला सांगितले की; “आपण ही प्रोसिजर करून पाहू. आपल्या नशिबाने त्यांच्या तब्बेतीला काही फरक पडलाच तर चांगलेच आहे. नाही तर त्यांना नुसत्या औषधांवरच ठेवावे लागेल”. त्यांचे ऐकण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मी त्यांना होकार दिला व पुढील तयारी करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी लगेचच त्यांच्या सहकारी डॉक्टरांना उद्याची तारीख प्रोसिजरसाठी ठरवून घ्यायला सांगितली व दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांची तशी वेळ घेण्यास सुचवून त्या आल्या तशा निघून गेल्या.

एकापेक्षा जास्त नातेवाईकास पेशंटजवळ थांबून देत नव्हते. त्यामुळे मी आणि वंदना घरी निघून आलो. संध्याकाळी बातम्या लावल्या आणि उडालोच.. कारण उद्यापासून म्हणजे २४ मार्चपासून दोन आठवड्याचा ‘संचारबंदीचा’ आदेश संपूर्ण भारतात लागू करण्यात आला होता. आपल्या देशातला पहिला ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प होणार होते. अगदीच अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या होत्या.

माझ्यासमोर डोळ्यासमोर उद्याचा दिवस उभा राहिला होता. आईची प्रोसिजर करायचे ठरले होते. त्यात मला हॉस्पिटलला जाता येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. एकतर हॉस्पिटल सेनापती बापट रोडवर होते जे माझ्या घरापासून म्हणजे धनकवडी पासून १२ किलोमीटर दूर होते. त्यात किमान पाच ते सहा ठिकाणी तरी अडथळे लावून रस्ता बंद करण्यात आलेला असणार ह्याची मला खात्री होती. कारण तसे बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेलं होते.

थोडासा विचार करून मी किशोरला फोन केला आणि त्याला ह्या सर्व परिस्थितीची कल्पना दिली. त्यातून मी काहीही झाले तरी उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये येतो आहे सांगून त्याला जरा दिलासा दिला.

त्या बिचाऱ्याची एकट्याची ह्या सगळ्यात इतकी धावपळ होत होती की काही विचारू नका. आई त्याच्याकडेच पंचवटी पाषाणला राहायला असल्यामुळे तो आणि संध्या (माझी भावजय) तिचा अतिशय प्रेमाने संभाळ करत होते. नाही म्हणायला मी आणि धाकटी बहिण साधना काही लागले तर येऊन जाऊन होतोच त्यांच्या आधाराला. पण ह्या दोघांवरच आईची सगळी जबाबदारी होती. ते ही ती अगदी मायेने व आनंदाने निभावत होते हे मात्र नक्की.

मी सर्वात प्रथम माझ्या मोबाईलवरून पोलीस पास साठीचा अर्ज दाखल केला. २४ मार्चला सकाळी पोलिसांच्या चौकशीतून वाट काढत मी कसाबसा हॉस्पिटलमध्ये पोचलो. आईचे छोटेखानी ऑपरेशन झाले. तिला भेटलो तिच्याशी छान गप्पा मारल्या. ही प्रोसिजर झाल्यामुळे तिला जरा बरं वाटतं होते. किडनीतून खराब रक्त काढून टाकल्यामुळे तिला जरा तरतरी आल्यासारखे झाले होते. तिला ऑपरेशन थेटरच्या बाहेरच्या खोलीत ठेवले होते तिथे डॉक्टरांनी मला भेटायला सांगितले तेंव्हा मला म्हणाली; “आता मला एकदम बरं वाटतंय”. “डॉक्टरांना सांग मला घरी सोडायला”.

मी तिची कशी बशी समजूत काढली आणि सांगितले की; “अजून दोन दिवसांनी तुला घरी सोडणार आहेत”! तिने विचारले किशोर कुठे आहे. तिचा भारी जीव त्याच्यावर आणि का असू नये !

किशोर खाली डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणायला गेला होता. तो आल्यावर मी त्याला आईला भेटायला सांगितले. तो तिला भेटून आला. आईला वरच्या रूममध्ये न्यायला दोन तास तरी लागणार होते.

किशोर म्हणाला “दादा तू जा आता घरी. कारण तुला पोलीस आडवतील. माझ्याकडे हॉस्पिटलचा पास आहे त्यामुळे मला काही कोणी आडवणार नाही आणि तू उद्या यायची काही घाई करू नकोस. जरूर पडली तर मी तुला फोन करतो”.

मी दुपारच्या वेळेस हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. चारचाकी गाडी होती म्हणून बरं. बालभारतीच्या चौकात माझी चौकशी झालीच. तरी बरं मी रत्ना मेमोरील हॉस्पिटलची वाहनतळाची पावती जपून ठेवली होती. अगदीच गरज पडली तर पुरावा म्हणून दाखवायला. पोलिसांनी माझी गाडी थांबवलीच. मला विचारले “कुठे निघालात?”

मी त्यांना सांगितले की; “आत्ताच आईचे ऑपरेशन झाले आहे. हॉस्पिटलमधून घरी चाललो आहे”. त्यांनी मला “पास आहे का” विचारले! मी त्यांना “पाससाठी रिक्वेस्ट पाठवली आहे पण अजून स्वीकारल्याचा मेसेज आला नाही. माझे येणे अत्यंत गरजेचे होते म्हणून आलो होतो.”

त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, “तुमचं सगळं बरोबर आहे, तुमची गाडी ह्या सहा कॅमेऱ्यात दिसत आहे. तुमच्यावर खटला दाखल होऊ शकतो.”

मी साहेबांना म्हणालो; “साहेब तुम्हांला जे योग्य वाटते ते करा, पण माझ्या आईचे ऑपरेशन तर मी काही थांबवू शकत नव्हतो हो”.

साहेबांना काय वाटले! त्यांनी माझी गाडी सोडली आणि जातांना म्हणाले की, “ह्यापुढे पास असेल तरच बाहेर पडा. उगाच तुम्हांला त्रास नको आणि आम्हांलाही.”

त्यांना मी नमस्कार केला आणि निघालो.

आज सुटलो होतो. माझा पोलीस पास काही आला नव्हता. दोन दिवस असेच गेले. नाईलाज म्हणून किशोरबरोबर रोज फोनवरूनच बोलणे होत होते. त्यात जरा चांगली गोष्ट म्हणजे आईची तब्बेत हळूहळू सुधारत होती. तिसऱ्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले होते. किशोर तिला घरी घेऊन आला होता.

आईची तब्बेत बरी आहे असे समजल्यावर माझा जीव भांड्यात पडला. त्याच दिवशी संध्याकाळी तिने किशोरला माझ्याशी बोलण्यासाठी व्हिडीओ कॉल करायला लावला. मी तिच्याशी पाच मिनिटे बोललो पण तिचा तो थोडासा सुजलेला चेहरा आणि हाता पायावर असलेली सूज पाहून माझ्या काळजात एकदम धस्स झालं. असंही तिला गेले एक वर्षभर दिसायचे आणि ऐकायला यायचे कमी झाले होते. तरी ती बिचारी सगळ्यांशी तिच्या नेहमीच्या मिश्कील शैलीत संवाद साधून आमचे एक प्रकारे सांत्वनच करत होती.

का कोण जाणे, मला तिचा मृत्यू जवळ येत असल्याची चाहूल लागली आणि मन विषण्ण होऊन गेले. कसबसे मी तिच्याशी बोलत होतो. ती मात्र हॉस्पिटलमधून घरी आल्याच्या आनंदात होती. मला म्हणाली “मी आज सगळ्यांशीच बोलले आहे.” ताईलापण म्हणजे माझ्या बहिणीलाही तिने असाच फोन केला होता. वरती मला सांगत होती की, “कोण जाणे परत मला तुमच्याशी बोलता येईल की नाही म्हणून आत्ताच बोलून घेते.” तिचा नेहमीचा चेष्टा मस्करीचा सूर होता पण त्यात ही बहुतके तिलाही तिचे दिवस भरत आल्याची चाहूल लागली असावी हे जाणवत होते. म्हणूनच तर ती सगळ्यांशी फोनवरून व्हिडीओ कॉल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा उठवत होती.

एकतर ह्या कोरोनाच्या मुळे सगळीकडे ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला होता आणि घराच्या बाहेरही पडणे मुश्कील होऊन बसले होते. अगदी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सकाळी दोन तासांसाठी काही दुकाने उघडी ठेवलेली होती. सगळीकडचे वातावरणच एकदम बदलून गलेले होते. त्यात आमच्या म्हणजे सहकारनगर-धनकवडी भागात काही रुग्ण आढळल्यामुळे आमचा संपूर्ण परिसर सील केला गेला होता. माझा जीव आईला भेटण्यासाठी तळमळत होता. ती तिकडे भावाकडे पुण्याच्या उत्तरेला पाषाणला होती आणि मी दक्षिणेला धनकवडीला. पुण्याची दोन टोके होती ही.

त्यातल्या त्यात किशोरशी फोनवरून बोलणे चालूच होते. आईची तब्बेत सुधारते आहे हे ऐकून मला जरा बरं वाटले होते. चार पाच दिवस असेच मजेत गेले. पुण्यातल्या पुण्यात असूनही आईच्या तब्बेतीची विचारपूस फोनवरून करण्याची वेळ ह्या कोरोनाने आणलेली होती. हातपाय झाडून सुद्धा काही उपयोग नव्हता.

असाच आठवडा गेला आणि एकदिवस सकाळीच किशोरचा फोन आला. त्याचा ह्या वेळेस फोन आला म्हटल्यावर माझ्या छातीचे ठोके थोडेसे वाढले होते. मनातल्या मनात मी देवाचा धावा करत होतो की, कुठलीही वाईट बातमी नसू दे!

किशोर : “दादा काल मध्यरात्रीच ममीला परत रत्नात आणले आहे. तिला हृदयविकाराचा हलकासा झटका येवून गेला आहे असे डॉक्टर म्हणाले. आत्ता ती अतिदक्षता विभागातच आहे. तू लगेच यायची घाई करू नकोस कारण दवाखान्यात कोरोनामुळे कोणालाही आत सोडत नाहीत”.

आईला हृद्यविकाराचा झटका येवून गेला आहे म्हटल्यावर माझी बोबडीच वळाली होती. मी कसेबसे स्वत:ला सावरले आणि किशोरला म्हणालो, “ठीक आहे पण तू मला फोनवर कळवत रहा”. मी त्याला खोट्या का होईना धीराने म्हणालो.

काय करणार, ह्या कोरोनामुळे माझ्या आईला सुद्धा भेटायला जायची सोय राहिली नव्हती. मनातल्या मनात मला खूप राग आला होता, चीड चीड झालेली होती. त्याच तंद्रीत मी मोबईलवरून पोलीस पाससाठी तीन दिवसांची रिक्वेस्ट टाकली.

संध्याकाळी ८ वाजता माझी रिक्वेस्ट स्वीकारल्याचा मेसेज आला आणि तीन दिवसांची आईला भेटण्याची निश्चिती झाली. मी वंदनाला सांगून तिला आईसाठी उद्या काय हवे नको ते किशोरला आणि संध्याला (भावजयीला) विचारायला सांगितले. तिला डॉक्टरांनी भाताची पेज किंवा सूप द्यायला सांगितले होते. मग काय मी आणि वंदना दुसऱ्यादिवशी सकाळी ११ वाजताच डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. ह्यावेळेस माझ्याकडे पोलीस पास होता त्यामुळे काळजी नव्हती.

हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनी आम्हांला आतच सोडले नाही. रीस्पेशनमध्ये अर्धा तास बसवून ठेवले. शेवटी मी किशोरला फोन करून बोलवून घेतले. त्याचा पास घेऊन आम्ही दोघे एक एक करून आईला भेटून आलो. ह्या कोरोनामुळे आम्हांला माझ्या आईशी जवळून बोलताही आले नाही. सिस्टरने आम्ही नेलेला डबा ठेवून घेतला आणि म्हणाली की त्यांना जेवायला आम्हीं देऊ. तुम्हीं आता गेलात तरी चालेल. असेही आई बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतीच. तिला ऑक्सिजन लावल्यामुळे हालचालही करता येत नव्हती. मी हळूच तिच्या पायांना हात लावला व हलकेसे दाबून पहिले. पण फार काही संवेदना मला जाणवल्या नाही. तिची ही अवस्था पाहून मला तर अजूनच कसतरी व्हायला लागलं.

नवसाने झालेला तिचा जेष्ठ पुत्र मी. तिची ही अशी अवस्था पाहून बेचैन झालो होतो. परिस्थितीपुढे लाचार झालेलो होतो. ह्या परिस्थितीवर मी मात करू शकत नव्हतो त्यामुळे पुरता हतबल झालो होतो.

थोडावेळ थाबुन शेवटी वैतागून मी आणि बायको हॉस्पिटलमधून घरी यायला निघालो. बालभारतीच्या चौकात पुन्हा एकदा माझी गाडी अडवली गेली. मी त्यांना माझा पास दाखवला. पण साहेब म्हणाले अहो, तुम्हांला साधा नियम कळत नाही का! गाडीत दोघांनी शेजारी शेजारी बसायचे नाही ते! अनवधानाने माझी झालेली चूक माझ्या लक्षात आली. मी वंदनाला मागच्या सीटवर बसायला सांगितले. साहेबांना माफ करा म्हणालो आणि तिथून सुटका करून घेतली. त्या बिचाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर आणि हवालदारांची काय चूक होती हो! ते स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचे कर्तव्य निभावत होते! त्यानंतर मात्र मी पुन्हा अशी चूक कधी केलीच नाही. म्हणजे मी प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून आईला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटत होतो.

असेच दोन आठवडे गेले आईच्या तब्बेतीत चढ उतार होत होता पण अतिदक्षता विभागातून काही तिची सुटका होत नव्हती. एक दोन वेळेस मला तिला भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळेस ऑक्सिजनचा मास्क नव्हता तेंव्हा माझ्याशी बोलली. मला ओळखले तिने. म्हणाली, “मला ही सिस्टर जेवायलाच देत नाही”. मला त्याही परिस्थितीत हसायला आले. तिला नळीने भरवल्यामुळे खाल्याचे जाणवत नव्हते. ती असेच काहीसे असंबद्ध बोलत होती.

मला म्हणत होती; “बाहेर पाऊस पडतोय खूप, तू रेनकोट आणलाय का” ! मी तिला म्हणालो; “पाऊस थांबलाय आता. मी मोठी गाडी घेऊन आलोय”. असे सांगितल्यावर ती थोडी शांत झाली. बाहेर टक्क उन पडलेले होते. एकतर मे महीन्याचा उन्हाळा अंगाची लाही लाही करत होता पण हे तिला सांगण्यात काहीच हशील नव्हता. ह्या अशा अवस्थेतही ती माझी काळजी करत होती हे पाहून माझे मन मात्र अजूनच घायाळ झाले होते.

आई ती आईच शेवटी.

कुठे ती ममी जी कधीही भेटली की थोडीफार तरी चेष्टा मस्करी केल्याशिवाय राहायची नाही आणि आज तिची ही अवस्था पाहून मला खूप गलबलून आले. परिस्थिती गंभीर होती. मला तिची ही अवस्था अजिबात सहन होत नव्हती. मी तसाच बाहेर निघून आलो व बाकड्यावर सुन्न होऊन बसून राहिलो. किशोर वेटिंग रूममध्ये त्याच्यासाठी मी घरून आणलेला डबा खात होता. त्याचे जेवण झाल्यावर मी डबे घेतले व तडक घरी निघून आलो. गेले दोन आठवडे जेंव्हा पोलिसांचा पास मिळेल तेंव्हा आईसाठी आणि किशोरसाठी मी डबा घेऊन जात होतो. तेवढाच संध्यावरचा ताण कमी करणे व आईची थोडीफार सेवा करणे हाच काय तो उद्देश मला त्यातल्या त्यात मनाला थोडेसे समाधान देत होता.

अधून मधून माझी मुलगी पूर्वा आणि जावई मयुरेश, जे लॉकडाऊन मुळे आमच्याकडे राहायला आले होते, ते पोलीस पास मिळवून आजीला भेटून येत होते. आजीने तर पुर्वाशी चागल्या गप्पा मारल्या होत्या म्हणे ! साधना ताई आणि तिचा धाकटा जावई स्वप्नील, काजलचा नवरा सुद्धा तिला एक दोनदा भेटून गेले होते. ताईच्या मोठ्या मुलीला स्वप्नालीला आणि जावई अलोकला मात्र पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे आजीला भेटता येत नव्हते त्याचे त्यांना खूप वाईट वाटत होते. पण ह्या परिस्थिती पुढे कोणाचे काहीच चालत नव्हते. सगळेच ह्या परिस्थितीमुळे नाराज झाले होते. आमच्या डोळ्यासमोर दोन महिन्यांपूर्वीच माझ्या आणि वंदनाच्या निवृत्ती निम्मित आयोजित केलेल्या पार्टीत, आम्हीं सगळ्यांनी एकत्रितपणे डीपी रोडवरील हॉटेलातले जेवण आठवले होते. त्यावेळेस आईने आमची सगळ्यांची खूप करमणूक केली होती. तिचा स्वभावाच फार विनोदी होता. ती होती पण खूप हजर जबाबी. आम्ही जेंव्हा केंव्हा एकत्र भेटत असू तेंव्हा तिचे आपले सारखे एकच पालुपद असायचे ते म्हणजे, स्वप्नाली, पूर्वा आणि काजल ह्याच्याकडे पाहून ती म्हणायची; “मी आता झाली म्हातारी, पिकलं पान कधी गळून पडेल ह्याची खात्री नाही. त्यामुळे पोरींनो लवकरच मला नातवंडांचे तोंड पाहूदेत. म्हणजे मी मरायला मोकळी”. तिच्या ह्या तीनही नाती आजीला कडकडून मिठी मारायच्या आणि विषय टाळायच्या. पण एक आहे ह्या सगळ्यात काजल आणि स्वप्नीलने मात्र आजीची ही शेवटची इच्छा पूर्ण केली होती. पंधरा दिवसांपूर्वीच आजीला भेटून तिला ही गोड बातमी त्यांनी दिली होती. हे विशेष. त्याच वेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून आईचे “सहस्त्रचंद्रदर्शन” लवकरच करण्याचे योजिले होते. आमचे हे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. तिला मात्र हे असले सोहळे नकोच होते म्हणूनच तर ती लवकर निघून गेली असावी.

मरण कोणाला चुकले आहे हो ! पण ह्या कोरोनामुळे मला माझ्या आईची ह्या दिवसांत थोडीफार का होईना सेवा करायला मिळेल असे काही वाटत नव्हते. शेवटी नको तो दिवस आलाच. २५ एप्रिलला डॉक्टरांनी किशोरला बोलावून सांगितले की, आईची तब्बेत जरा जास्त आहे. जरूर पडली तर आपण त्यांना व्हेन्तिलेटरवर ठेवू आणि मग बघू. अर्थात व्हेन्तिलेटरवर ठेवून फार फायदा होईल असे वाटत नाही, असेही सांगायला त्या कचरल्या नाहीत. तरी तुम्हीं म्हणत असाल तर …..

किशोरने लगेचच मला फोन करून सांगितले आणि विचारले की; “दादा तुझे काय म्हणणे आहे, त्याने माझ्या आधी ताईला फोन करून विचारले होते, तिनेही दादाला विचार म्हणून सांगितले होते”.
माझ्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली होती. मी माझ्या सद्विवेक बुद्धीला विचारले आणि त्याला सांगितले की डॉक्टरांना सांग तिला व्हेन्तिलेटरवर नको ठेवायला. जे काही असेल ते सध्या ऑक्सिजन मशीननेच उपचार करा. शक्यतो तिला वेदना कमी होतील असे बघा.

हे सगळे मी माझ्या काळजावर दगड ठेवून बोलत होतो. पण कल्पना होती की मी जे काही बोलतो आहे त्याने माझ्या आईचा मृत्यू लवकरात लवकर होणार आहे. पण माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. कारण हळू हळू आईचा एक एक अवयव निकामी होत होता. तिचा शेवट जवळ येत चालला होता. डॉक्टरांचे सर्व उपचार संपलेले होते. म्हणूनच डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जा म्हणून सांगितले होते. आमच्या काही नातेवाईकांना आई हॉस्पिटलमध्ये आहे हे कळल्यावर मला त्यांचे फोन वर फोन येत होते. ते बिचारे तिला भेटण्यासाठी तळमळत होते पण ह्या कोरोनामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते.

किशोरही म्हणत होता की, मी तिला घरी घेऊन जातो. तिला मृत्यू यायचाच असेल तर तो घरी येउदेत. त्याचेही म्हणणे बरोबर होते. मला एकदम आठवले की, ३० वर्षांपूर्वी माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत असेच झाले होते. १३ दिवस ते दवाखान्यात होते आणि कंटाळून शेवटी त्यांना आम्ही घरी आणले तर दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांनी प्राण सोडले होते. माझ्या ह्या अनुभवावरून मी त्याला होकार दिला होता.

त्याने तात्पुरते भाडेतत्वावर ऑक्सिजनचे यंत्र, ऑक्सिजन सिलेंडर आणि हवेची गादी वगैरे सामानाची कशीबशी जुळवाजुळव केली. एकतर ह्या लॉकडाऊनमुळे सगळीच दुकाने बंद होती. हॉस्पिटलच्या ओळखीने हे सामान त्याला मिळाले आणि त्याने आईला घरी नेण्याची परवानगी मागितली.

२७ एप्रिलला डॉक्टरांनी आईला घरी नेण्याची परवानगी दिली. त्याने आईला घरी नेले. घरी किशोरच्या आणि संध्याच्या मदतीला मुले ज्ञानदा, सुश्रुत आणि भाची आजीच्या सेवेला हजरच होतीच. तसेच आईची मोठी बहिण माझी मावशी जिचे वय ९० आहे ती आईच्या मागच्याच गल्लीत रहात असल्यामुळे तिला भेटण्यासाठी तळमळत होती. नियतीने ह्या दोघी बहिणींची शेवटची भेट घडवून आणली होती हे मात्र खरं.

पण माझी मात्र पंचाईत झाली कारण मला पोलिसांचा पास काही मिळणार नव्हता. इतके दिवस मी हॉस्पिटलचे कारण सांगून पास घेत होतो. त्यामुळे मी जरा जास्तच हळहळलो. पण नशिबापुढे कोणाचे काहीच चालत नाही असे म्हणून गप्प बसलो.

शेवटी २९ मेला सकाळी ८.३० किशोरचा फोन आला.
किशोर : “दादा ममीला खूप ताप भरलाय आणि तापात ती असंबद्ध बोलत आहे”. “ताप काही केल्या उतरत नाहीय. मी डॉक्टरांना फोन केला होता. त्या म्हणाल्या काही उपयोग नाही. काही करू नका. हा ताप आता उतरणार नाही”
मी : “किशोर डॉक्टरांनी सांगितले आहे म्हणजे तिचा काळ जवळ आला आहे”. “मन घट्ट कर”.
किशोर : “दादा तिचे ते ऑक्सिजनचे यंत्र काढू का आता”
मी : “आरे ते आहेच का लावलेलं अजून. लगेच काढून टाक. म्हणजे तिला जरा कमी त्रास होईल”
मी एखादा डॉक्टर असल्यासारखा सल्ला किशोरला देत होतो. मला माहिती होते की ऑक्सिजन काढला की काही वेळातच तिचा शेवटचा स्वास ती घेईल व ह्या यातनेतून तिची सुटका होईल. खरं सांगू का ! मला इतक्या दुरूनही तिला होण्याऱ्या यातना जाणवत होत्या ! म्हणूनच मी मोठ्या हिमतीने त्याला ऑक्सिजनचे मशीन काढायला सांगितले होते.
किशोरने माझे ऐकून ऑक्सिजन काढून टाकला व मला म्हणाला तू लवकरात लवकर इकडे पाषाणला ये. मी ताबडतोब पोलिसांच्या पाससाठी रिक्वेस्ट टाकली. पूर्वा आणि मयुरेशला शेजारच्या मयूरच्या गाडीचा नंबर घेऊन पोलीस रिक्वेस्ट टाकायला सांगितली. पोलिसांच्या नवीन नियमानुसार एका गाडीत दोनच जण जाऊ शकत होते. म्हणून माझी आणि मयूरची गाडी अशी व्यवस्था मी आधीच करून ठेवली होती. असेही ही वेळ तर सांगूनच आलेली होती आमच्यावर !

असेही २८ एप्रिलची रात्र मी झोपलेलो नव्हतो. मला झोपच येत नव्हती. एकसारखे आईचं डोळ्यापुढे येत होती. त्यात मी विरंगुळा म्हणून १४ एप्रिल पासून “अनोख्या रेशीमगाठी” ही कादंबरी लिहायला घेतलेली होती. मला ती लवकरात लवकर पूर्ण करून आईला द्यायची होती. तिला माझ्या कवितांचे आणि लेखांचे खूप कौतुक होते. अभिमानाने सर्वाना ती माझा मोठा मुलगा कवी आणि लेखक आहे सांगत असे. त्यांना आवर्जून माझे काव्यसंग्रह देत असे. ह्या नादातच २९ एप्रिलला पहाटे ५.३० वाजताच मी कादंबरीचा शेवट केलेला होता. त्या नंतर झोप येत नाही म्हणून कादंबरी वरून एक नजर टाकत बसलेलो असतांनाच ८.३०ला किशोरचा फोन आला होता.

त्याच्या फोन नंतर मी आणि वंदनाने लगेचच आवराआवर सुरु करून जाण्याची तयारी करून ठेवली होती व पोलीस पास येण्याची वाट पाहत होतो. परंतु इतक्यात पुन्हा एकदा सकाळी १०.३० किशोरचा फोन आलाच. की आई गेली म्हुणुन. काय नशीब आहे बघा माझं ! तिच्याशी शेवटचं बोलायचंही राहून गेलं. त्यात ह्या कोरोनामुळे अजूनच आफत झालेली होती.

आता मात्र “पोलीस पास वगैरे सगळे गेले चुलीत” ! असे म्हणून मी आणि मयुरेश दोन गाड्या घेऊन पाषाणला पोचलो. नशिबाने पोलिसांनी आम्हांला अडवले नाही. किशोरने तोवर जवळच्या डॉक्टरांकडून मृत्यूचा दाखला आणलेला होता. सोसायटीतील सुनील आणि संजूने अम्बुलंस बोलवली होती.
कोरोनाचे सगळे निर्बंध पाळून सोसायटीतील सर्व जण त्यांच्या लाडक्या आजीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संखेने जमलेले होते. विशेष म्हणजे त्यांचे आमच्याशी कुठलेही नाते नव्हते. होते ते फक्त माणुसकीचे आणि ते ही आमच्या आईने कमावलेले.

मी वर घरात जाऊन आईचे शेवटचे दर्शन घेतले आणि एक अध्याय संपला असे मनातल्या मनात म्हणत मी जिन्यातून खाली येत पुढील सर्व सूत्रे हातात घेतली. कोरोनामुळे अम्बुलंस मध्ये फक्त चौघांनाच परवानगी होती आणि वैकुठातही अंत्यसंस्कारासाठी फार फार तर ८ ते दहा जणांनाच परवानगी होती.

शेवटी नाईलाजाने मी, किशोर, माझा मावस भाऊ सतीश आणि सुनील असे चौघेजण अम्बुलंस मधून वैकुठात गेलो. पूर्वा आणि मयुरेश त्यांच्या गाडीतून आले. साधना ताई आणि तिचा जावई स्वप्नील त्यांच्या म्हात्रे पुलावरील घरून परस्पर वैकुठात आले. त्याला आधीच फोन करून सांगून ठेवले होते की त्यांनी परस्पर वैकुठातच यावे. असेच अजून दोन तीनजण वैकुठात आले होते.

वैकुठात विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार करायचे होते. कोरोनामुळे गुरुजी हजर नव्हते. शेवटी अनिलने एक मडके कुठूनतरी पैदा केले. मी किशोरला सांगितले की, जरी तो लहान असला तरी त्याने आईचे अत्यसंस्कार करावेत. आयुष्यभर त्याने तिची सेवा केली आहे त्यामुळे हा अधिकार त्याचाच आहे ! असो, पण माझे हे म्हणणे खोडून काढण्यात आले व मलाच मोठा मुलगा म्हणून तिचे अंत्यसंस्कार करावयास सांगण्यात आहे. त्या घडीला माझाही नाईलाज झाला. गपुचूप मी ते मडके पाण्याने भरून तिन वेळा आईच्या मृतदेहाला प्रदक्षिणा घालून तिचा अत्यसंस्कार केला.

अतिशय जड अत:कारणाने तिचे पार्थिव विद्युत दाहिनीच्या कर्मचाऱ्यांच्या सुपूर्द केले. त्यांनी भट्टीचे दार उघडून आईचे पार्थिव आत ढकलले. आईचे कलेवर बघता क्षणी अनंतात विलीन झाले.
उपस्थित सगळ्यांनी ह्या सगळ्या गडबडीत, वैकुठ स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आवर्जून आभार मानले. त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच होते. आईला शेवटचा नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो.

आमचे हे सोपस्कार चालू असतांना अजून तीन चार पार्थिव तिथे आले होते. हे सगळे कोरोना नसलेलं होते. कोरोनाने मृत्यू झाला असेल तर त्याची सोय बाजूच्या ग्यास वाहिनीत केली होती आणि तिथे तर घरच्यांना एकालाच यायची परवानगी होती. प्ल्यस्तिक मध्ये गुंडाळून आणलेला मृतदेह सरळ ग्यास वाहिनीत टाकला जात होता. कुठल्याही प्रकारचे विधी करण्याची सोय ठेवलेली नव्हती. हे सगळे चित्र इतकं विदारक होतं की विचारू नका. मला तर मनोमन वाटत होते की ह्या काळात कोणीही आजारी पडू नये आणि मृत्यू तर येऊच नये !

आईचे अंत्यसंस्कार उरकल्यावर तिथल्या कर्मचार्यांनी उद्या सकाळी ८ वाजता अस्थी घेऊन जा म्हणून सांगितले. त्याचबरोबर एक सूचना केली की, येतांना फक्त दोनचजण या अस्थी न्यायला. त्यांच्या ह्या सौजन्याचेही मला एवढ्या दु:खातही कौतुक वाटले. कोरोनाचे संकट किती भीषण आहे ते वैकुंठात आल्यावर आम्हांला सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवत होते.

दुसऱ्या दिवशी किशोर आणि सुनील दोघेच वैकुठात जाऊन अस्थी घेवून त्या संगम पुलावर नेऊन तिथे विधिवत विसर्जन करून आले. अर्थात ह्या कोरोनामुळे आळंदीला अस्थी विसर्जनासाठी जाण्यास बंदी करण्यात आली होती. संगमावर अस्थी विसर्जन करून दिल्या हे ही आमच्यासाठी खूप होते. कोरोनामुळे आम्हांला कोणालाही आमच्या आईच्या अस्थींचेही दर्शन घेता नाही आले हे दु:ख मात्र मनाला खूप बोचत होते.

आईच्या दशक्रिया विधीवरही कोरोनाचे सावट होतेच. वैकुठातच अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पहाटे ६.३० वाजता दशक्रिया विधी उरकण्यात आला. पिंड ठेवल्या बरोबर कावळा शिवला होता हे विशेष. आईचा जीव खरचं कशातही अडकलेला नव्हता हे मात्र नक्की. ती तिचं जीवन अगदी व्यवस्थित जगली होती. भरपूर माणुसकी कमावली होती तिने. ह्या कोरोनाचे संकट जर नसते ना, तर कमीत कमी हजार दोन हजार माणसे तिच्या अंत्यविधीला आणि दशक्रियेला हजर राहिली असती.

दशक्रिया विधी करणाऱ्या गुरुजींनी तर तोंडाला मास्क आणि काचेची तबकडी लावलेली होती. नाव्ही सुद्धा जय्यत तयारीतच होता. सगळे कसे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत होते. स्वच्छता कर्मचार्यांनी सगळीकडे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची फवारणी केलेली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासन आणि सरकार त्यांच्या परीने खूप मेहनत घेत होते. अत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी पार पडण्यास ह्याही काळात मदत करत होते. मला तर गेल्यापासून नातेवाईकांचे नुसते फोनवर फोन येत होते. जो तो त्यांना येता येत नाही म्हणून हळहळत होता. आईचा तेरावा दिवस आम्ही ह्याच मुळे घरच्या घरी केला व त्याचा नैवद्य मात्र वैकुठात आणून गाईला खायला घातला. तेराव्याला माझी मावशी माझ्या गळ्यात पडून जी काही रडली होती त्याने माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले होते.

३ एप्रिल २००३ माझे पितृछत्र हरवले होते आणि आता बरोबर १७ वर्षांनी म्हणजे २९ एप्रिल २०२०ला माझे मातृछत्र हरवले होते अन मी पोरका झालो होतो…..

माझ्या आईला माझ्याच एका कवितेने काव्यात्मक श्रद्धांजली अर्पण करतो.

|| आई ||

आयुष्याचा एक एक क्षण उधार होता,
जन्मास घातलेस मज हा उपकार होता ||
बालपण गेले माझे तुझ्या अंगाखांद्यावरी
चिमुकल्या पावलांना तुझाच आधार होता ||
घडविलेस तू मला जागून कित्येक रात्री
लोचनी तुझ्या निद्रेला ही नकार होता ||
तरुणाईत विसरलो तुझ्या साऱ्या कष्टांना
तुझ्या डोळ्यात मात्र ममतेचा सागर होता ||
उमेदीत विस्मरला मज त्याग तुझा
तुझ्या त्यागातच तुझा संस्कार होता ||
वार्ध्यक्यात तुझ्या मज बालपण दिसले
मुखी तेंव्हाही माझ्याच नावाचा उच्चार होता ||
आई कसे फेडू मी तुझे हे उपकार,
जन्म हा माझा तुझाच उपहार होता ||
दाखवीन तुला मी आता दिवस सोनियाचे
श्वासात तुझ्या तेंव्हा संथ नकार होता ||
फेडण्याचा पांग तुझे मी निश्चय केला
रथ तेंव्हा तुझ्या शरीराचा थंडगार होता ||
स्मरली मज तुझी माया तुझी अंगाई
आई हाच माझा अखेरीस परमेश्वर होता ||

हा लेख लिहिण्याच्या मागचे कारण की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन जीवतोडून मेहनत घेत आहे. त्यात हे असे प्रसंग आल्यावर काय करावे तेच सुचत नाही.

ह्या कोरोनामुळे मला माझ्या आईची शेवटच्या दिवसांत सेवा करण्याचे भाग्य लाभले नाही त्याच्या मनाला खूप यातना होत होत्या आणि अजूनही होत आहेत. हे शल्य आयुष्यभर बोचत राहणार हे नक्की.

दोष तरी कोणाला द्यायचा. उलट ह्या कठीण परिस्थितीत आपले सरकार, प्रशासन, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून देशाची सेवा करत आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

आमच्या सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे आभार. ह्या सगळ्यांची आईच्या अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधीला येण्याची खूप इच्छा होती. परंतु आमच्या विनंतीला मान देवून त्यांनी वैकुठात येण्याचे टाळले त्यासाठी त्यांचा मी ऋणी आहे.

“आईच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो”.

– रवींद्र कामठे, पुणे
९८२२४ ०४३३०

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

2 Comments

  1. आई.हि आईच असते, पण.तिचे.महत्व ति असताना फार कमी लोकांना समजते. आई अनंतात विलीन झाल्यावर नंतर गुणगान करून काय उपयोग. सेवा करण्याचे.भाग्य नशिबी असावे लागते. धन्यवाद रविंद्र कामठे, आपण लिहिलेल्या या लेखनामुळे जणजाग्रती होईल असे वाटते.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!