उगवतीला सलाम!

उगवतीला सलाम!

निवडणुकीचे दिवस होते. एक उमेदवार पंधरा वीस पाठीराख्यांचं मोहोळ घेऊन वॉर्डात प्रचाराला आले. अत्यंत नम्रपणे कमरेत (त्यांच्याच) वाकून प्रत्येकाला बत्तीशी दाखवत नमस्कार करीत होते. तरुणांना मिठी मारत होते. मलाच मत द्या म्हणून लाचार आवाहनही करीत होते. माझ्या ते चांगल्या परिचयाचे होते. मी स्वागताला तयार होतो. शेजारच्या लहान मुलाला कडेवर घेऊन आपुलकी दाखवत होते पण अचानक मला न भेटताच तो लवाजमा पुढे निघून गेला.

मला आश्चर्य वाटलं. मी मागे असणाऱ्या एकाला विचारले, “साहेब असे एकदम का गेले?” तर तो म्हणाला, “साहेब ज्या वॉर्डात उभे राहिले आहेत त्यात तुमचे घर येत नाही. तुमचा उमेदवार वेगळा आहे!” पुढे हे साहेब निवडून आल्यावर आमच्या गल्लीतच काय शहरात कुणाला दिसले नाहीत. मिठी मारलेला त्यांना भेटायला गेला तेव्हा साहेबांनी त्याला दहा फुट लांब उभं केलं आणि ओळखलंही नाही.

जमानाच उगवत्या दिशेला नमस्कार करण्याचा आहे. परीक्षा जवळ आली की देवळात चकरा वाढतात तशी सरांशी सलगीही वाढते. एरवी जाड्या, ढापण्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरांच्या घरची भाजीही आणून देण्याची तयारी असते. इंटर्नल मार्क देणाऱ्या सरांचं इंटेरियर डेकोरेशनही फुकट केलं जात. एखाद्या ऑफिसातून काम करून घ्यायचं असेल तर शिपायालाही साहेब म्हणावं लागतं. महादेवाअगोदर नंदीला नमस्कार करावा तसा त्यांना नमस्कार करावा लागतो. मुलाच्या शाळा प्रवेशासाठी हेडमास्तरांच्या घरी आणि शाळेत पन्नास चकरा मारणारा पालक मुलाला प्रवेश मिळाल्यानंतर, हेडमास्तर चक्कर येऊन पडलेले दिसले तरी ढुंकून बघत नाही. एवढच काय उसने पैसे मागताना तोंड बारीक करून, गयावया करून, हातापाया पडून पैसे मागतो, पगार झाला की लगेच परत करतो म्हणून वचनही देतो. एकदा का पैसे दिले की महाराज गायबच होतात. अनेक पगार झाले तरी पैसे परत येत नाहीत. न रहावून “अरे उसने दिलेले पैसे परत देतोस का?” असं विचारलं की तो सुनावतो “काय राव एवढ्या पैशाच… मी काय पळून चाललोय का काय? देतो म्हटलय नां.” अशी परिस्थिती. पूर्वजांनी केलेल्या म्हणी किती सार्थ आहेत, ‘गरज सरो आणि वैद्य मरो!’

एका कारमधून पंचवीस वर्षापूर्वी सिनेसृष्टी गाजवलेला एक नट आणि चालू जमान्यातला एक नट चालले होते. कार थांबून दोघं बाहेर आले तेव्हा या नव्या नटाशी बोलायला, त्याची सही घ्यायला लोक तडफडत होते. टीव्हीवाले लवाजमा घेऊन एकमेकांना धक्के देत पुढे सरकत होते. लांबवर एकटा उभा राहून हा पूर्वीचा सिनेसम्राट उदास चेहेऱ्याने सगळं न्याहाळत होता. पूर्वी ज्याला सिनेमात घेण्यासाठी निर्माते बंगल्यासमोर लाईन लावत होते, आज ते त्या नटाला एक्स्ट्रा म्हणून घ्यायलाही तयार नव्हते. हे कटू सत्य आहे. एखादा दिग्दर्शक आपल्याला काम देईल म्हणून त्याच्या पाया पडणारा कलावंत, मोठा झाला की त्याच्याकडे पहातही नाही किंवा त्या दिग्दर्शकाचा एखादा सिनेमा पडला तर त्याचं सांत्वनही करायला जात नाही. इतकी निष्ठुर आहे ही दुनिया.

जो माझ्या कामाचा असेल तो माझा मित्र. मग मी त्याचं कौतुक करायचं आणि त्यांनी माझं करायचं, माझ्याशी जो गोड बोलेल तो माझा चेला. एखादं बक्षीस मिळवण्यासाठी लायकी नसणाऱ्याकडे चकरा मारणारे जाणकार पाहिले की त्यांची कीव येते आणि आश्चर्यही वाटते. अशावेळी त्यांच्याकडे न जाणारा एखादा विद्वान डावलला जातो, त्याच्याशी कोणाला देणेघेणे नसते. रोज वर्तमानपत्रात फोटो येतो तो मोठा. ऐसाही जमाना है. हे झालं थोरा मोठ्यांचं! पण एखादा सामान्य इसम जेव्हा निवृत्त होतो तेव्हा त्याची किंमत संपते कारण दरमहा पैसे देणारं ते यंत्र बंद पडलेलं असतं. मग ते अडगळीतच फेकण योग्य असतं. हा सरळ सरळ व्यवहार आहे. तिथे दया माया या शब्दांना किंमत नसते. म्हणून तर नटसम्राटावर भिक मागण्याची वेळ येते. त्याच्यावर सख्खे चोरीचा आळ घेतात कारण तो सूर्यास्ताला चाललेला असतो, तो उगवतीचा असतो.

जिथे फायदा आहे तिथे जायला हरकत नाही पण तो फायदा प्रामाणिकपणे मिळतोय की नाही हे पहायला नको का? पैशांनी, सौंदर्याने, लाच देऊन काम करून घेतल्यावर मिरवावेसे वाटणे याचेच आश्चर्य वाटते. कोण साव आणि कोण चोर? चांगलं खेळणाऱ्या क्रिकेटियरला लोक डोक्यावर घेतात पण तो एक सामना हरला तर त्याचं घर जाळायला कमी करत नाहीत.

पाठ्यपुस्तकापेक्षा गाईडला जास्त मागणी असते. मग भले त्याची किंमत दुप्पट का असेना. परीक्षेच्या वेळी मदत करणाऱ्या परीक्षकाला पार्टी दिली जाते तर मदत न करणाऱ्याला दम दिला जातो. पैसेवाल्याला सलाम केला जातो, त्या पैसेवाल्याने काळे धंदे करून पैसे मिळवले असले तरी आणि गरीबाचा अपमान केला जातो. जरी तो प्रामणिकपणे कमावत असला तरी. बढती मिळवण्यासाठी नको त्या वरिष्ठांची लाचारी करायची लाज वाटत नाही. कारण उगवतीला नमस्कार करण्याची प्रथा रूढ झाली आहे. एकाच व्यवस्थापनात काम करणाऱ्या सगळ्यांनाच दिवाळीची भेट मिळत नाही. जे लोक त्यांचे काम करतात त्यांनाच दिवाळीच्या शुभेच्छा असतात.मग बढतीची मेजवानी सुद्धा काही निमंत्रितांसाठीच असते. सर्वसामान्यांसाठी नसते. अशा लोकाना सूर्यफुलाची उपमा दिली जाते. जिकडे सूर्य जाईल तिकडे तोंड वळवणार. फायदा असणारा मित्र भेटल्यावर जुन्या मित्राला सहज सोडून देणारा वा नवा पैसेवाला मित्र मिळाला की गरीब प्रियकराला सोडून देणारी प्रेयसी ही अशा सूर्यफुलाची उदाहरणे.

यात कुणाचा दोष आहे कुणाचा नाही ज्याचं त्यांनी ठरवावं आणि कस वागावं हे पण ठरवावं. कुणाबद्दल चांगलं मत होतं, कुणाबद्दल वाईट हे पण बघाव. संस्काराचं बीज चांगलं पेरलं गेलं तरच येणारा वृक्ष चांगली फळं देईल. त्याची मुळं जरी अशुद्ध पाण्याकडे वळली तरी ती ते पाणी शुद्ध करूनच घेतील. केवळ फोफावण्यापेक्षा हिरवंगार होण्यासाठीच ते करतील प्रयत्न. फुलापानांना सुद्धा समजत प्रकाशाच्या दिशेने वाढावं म्हणून. मग आपणच का करतो सलाम उगवतीला? उगवत्या सूर्याला जरूर नमस्कार करावा पण तो करताना प्रार्थना करावी हे सूर्यदेवा, मला तुझ्यासारखं देदीप्यमान कर! माझ्या मनातला अंधार नाहीसा कर! आणि मावळत्या सूर्याला पण नमस्कार करावा, आजचा दिवस मला चांगला दाखवलास म्हणून!

सदानंद भणगे.
पसायदान,कलानगर सोसायटी
गुलमोहर रोड,सावेडी,अहमदनगर ,414003
9890625880

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

9 Thoughts to “उगवतीला सलाम!”

 1. Vinod s. Panchbhai

  सुंदर लेख!

 2. प्रकाश भास्करवार,नागपूर

  स्वार्थी स्वभावाचे यथार्थ, विदारक वर्णन फार सुरेख केले आहे !!!🙏🙏🙏👍👍👍

 3. Nagesh S Shewalkar

  वास्तव रेखाटले आहे.
  खूप छान.

 4. अनिल पाटील.

  खूप सत्य आणि डोळे उघडणारे अंजन. सर, अतिशय वास्तव लिखाण. खूप आवडले. असेच लिहिते राहा.

 5. मिलिंद पाटील

  छान लेख, जगाचं, भीषण वास्तव, उत्कृष्ट रेखाटले आहे

 6. रविंद्र कामठे

  भणगे सर किती छान स्वार्थी लोकांची ओळख करुन दिलीत.

 7. Bapu Rajale

  खूप छान लेख..शेवटी उगवणाराही कधीतरी मावळतच असतो…म्हणून दोघांनाही सलाम..!!

 8. Ramkrishna Adkar

  फारच सुंदर लेख ! चपराक च्या पठडीतील म्हणायला हवा ! समाज इतका कृतघ्न झालाय याचं वैषम्य तर आहेच पण आपण सारेच त्यासाठी जबाबदार आहोत असे वाटते.
  सध्या पेपर मध्ये गरिब,हुशार दहावी बारावी पास मुलांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले जात आहे, अशी प्रथा गेली अनेक वर्षे सुरू आहे. दात्यांचीही कमी नाही.पण यापैकी किती जणांना त्याची कायम जाणीव राहिल आणि यापूर्वी मदत मिळालेल्यंनी हे समाजऋण फेडण्यासाठी विचार तरी केला असेल याची मला शंका आहे!
  आणखी एक उदाहरण, सन९८,९९ च्या सुमारास एक विमान अपहरण केले होते त्या प्रवाशांच्या सुटकेसाठी काही खतरनाक अतिरेक्यांना सोडावे लागले होते। त्यापैकी किती प्रवाशांनी देशासाठी काय योगदान दिले? पण गरज सरो आणि वैद्य मरो हेच तत्व वापरले असणार हे नक्की !
  दुर्दैव देशाचे !😔😔

 9. Aasavari Desai

  खरंय।
  आजकाल लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात। गरज असेपर्यंत गोड बोलतात आणि काही बिनसलं की सगळंच संपलं।

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा