सर्वार्थाने गुरू

सर्वार्थाने गुरू


विष्णू बाळकृष्ण
ऊर्फ मधू कुलकर्णी म्हणजेच माझे वडील. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मराठीचे गाढे अभ्यासक, कथाकथन करायचे. उत्कृष्ट वक्तृत्व! ‘वळण’, ‘यात्रा’ ‘ते दहा दिवस’ असे तीन कथासंग्रह प्रकाशित. ललित साहित्यातील आकृती बंधाची जडण आणि घडण (फॉर्म) या विषयावर पी.एचडी. केली. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा या गावातील विश्‍वासराव नाईक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून 1984 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुण्यामध्ये 23 मे 1995 रोजी प्राणज्योत मालवली.

इस्लामपूर (जिल्हा – सांगली) हून जवळच असणारं कापूसखेड हे आम्हा सर्वांचं मूळगाव. याच गावात मामाचं लहानपण गेलं. त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी वडील आणि नंतर लगेच सातव्या वर्षी आई गेली. चार बहिणी आणि हे एकटेच त्यांचे भाऊ. कोणताही सल्ला द्यायला घरचं असं मोठं कुणीच नव्हतं. त्यावेळी त्यांची आजी (आईची आई) म्हणजेच आक्का तिथे राहायला आली आणि तिनं या सगळ्यांना वाढवलं. आक्का खूपच हुशार होती, असं आम्ही मामांकडून नेहमीच ऐकायचो. गांधीवधानंतर सर्व ब्राह्मण समाजाला खूपच भोगावे लागले. आमचेही घर त्यातून सुटले नाही. घरची पाणस्थळ शेती असल्यामुळे मोठा वाडा, धान्य, गुळाच्या ढेपा वगैरेंनी भरला होता. तो जाळण्याकरिता हातात पेटत्या मशाली घेऊन जमाव वाड्यापुढे आला. तेव्हा मामा 15 वर्षांचे होते. ‘वाडा जाळून तुम्हाला काय मिळणार? त्यापेक्षा सर्व घेऊन जा. वाडा जाळू नका’ असं सांगून मामांनी वाडा वाचविला. धैर्य, वक्तृत्व, धाडस, प्रसंगावधान याच्या जोरावर ते या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडले पण नंतर आक्कांनी घर इस्लामपूरला हलवलं. ‘ते दहा दिवस’ या कथा संग्रहात मामांनी हेच सारे सत्य लिहिलंय.

शिक्षणाची खूप आवड. सल्ला, मार्गदर्शन द्यायला कुणीही नसताना स्वत:च शिकत गेले. एम. ए., पीएच. डी. झाले. हे होत असताना प्राध्यापक होण्याची प्रचंड इच्छा होती. इस्लामपूरमधील शिक्षकाची नोकरी सोडून लांब मराठवाड्या कंधार येथे प्रथम प्राध्यापक म्हणून नोकरीत लागले. घरदार, बायको मुलं सर्वांपासून एकटे राहिले. कारण आपल्याला काय करायचंय याच्याशी ते नेहमी एकनिष्ठ राहिले. नंतर गडहिंग्लज येथे व शेवटी 32 शिराळा येथे नोकरी केली. प्राचार्य म्हणून काम केल्यानंतर तब्येतीच्या कारणाअभावी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

माई आत्या, शांताक्का, इंदु आत्या आणि सुशा आत्या या मामांच्या चार बहिणी. शांताक्काला आम्ही कधीच पाहिले नाही. कारण आम्हा भावंडांच्या जन्माआधीच ती गेली. माई आत्याचे यजमान पोलीस होते ते टायफॉईडने गेले. त्यावेळी तात्या म्हणजेच शरद (बाबू) आत्याच्या पोटात होता. माई आत्याला सुभाषदादा, मीनाताई व तात्यास घेऊन मामांकडे कायमचे राहायला येण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याचदरम्यान शांताक्का गेली. अशोक आण्णा (तिचा मुलगा) त्यावेळी चार वर्षांचा होता. त्यांचे वडील म्हणजेच बह्याचे दादा. थोड्या वर्षांनी शिक्षणाकरिता मामांनी अशोक आण्णालाही इस्लामपूरला आणले तेही कायमचेच. ही सर्व भाचेमंडळी मामा म्हणायची म्हणून आम्हीही वडिलांना मामा म्हणायचो. सर्व भाच्यांनी शिक्षण करून, नोकरी लागून, कामं करून स्वतंत्र संसार थाटेपर्यंत मामांनी सर्वांना सांभाळून घेतलं. बर्‍याच वर्षानंतर पेपरमधील छोट्या बातमीच्या आधारे माई आत्यास पेंशन मिळवून देण्याकरिता मामांनी खूप खटपट केली. हे सर्व करताना आपण काही वेगळे करतोय अशी भावना त्यांची नव्हती. त्यांच्या रक्तातच असावं. या सर्वांची जाणीव मात्र सर्वांनाच होती. आजही आहे. जीवंत असतानाच कुणाचीही सेवा करावी, मेल्यानंतर फोटोला हार घालून समाजात मोठेपणा मिरवणं मामांना पसंत नव्हतं. मामांचा धर्मकांडावर फारसा विश्‍वास नव्हता. मूर्तीपूजेवर अजिबात नव्हता. श्राद्ध करणे ही त्यांची कल्पना खूप वेगळी होती एकदा घराच्या जवळ कोपर्‍यावरच्या चांभाराला बायकोसह मामांनी जेवायला बोलावलं. चांगलं जेवण आग्रहानं खायला घालून दोघांना कपडे दिले आणि नमस्कार केला. तेव्हा तो चांभार अक्षरश: रडायला लागला. मामांनी त्याला सांगितलं, ‘‘आज त्यांच्या वडिलाचं श्राद्ध आहे म्हणून!’’

आमच्या घराजवळ दलितांची थोडी वस्ती होती. 10-12 घरं होती. त्या सर्व लोकांना जेवायला बोलवायचे (श्राद्धादिवशी) मोठमोठ्या हंड्यामध्ये स्वयंपाक व्हायचा. असं श्राद्ध करणं योग्य की अयोग्य या वादात मला शिरायचं नाही पण मामांच्या मनानं कौल दिला तसं ते वागत गेले. मेल्यानंतर त्यांचं स्वत:चं कोणतंही धार्मिक कृत्य किंवा श्राद्ध करू नये असं त्यांच्या एका लेखात त्यांनी लिहून ठेवलंय आणि आम्हा सर्वांना सांगितलंही होतं. त्यांच्या इच्छेला मान देऊन आम्ही काहीही विधी केले नाहीत.

पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठामध्ये बीए ला मराठी विषयात प्रथम येईल त्याला कायमचं बक्षीस ठेवलं आहे. इस्लामपूरच्या एका आश्रमशाळेमध्ये 10 वीला मराठीत जास्त मार्क मिळतील त्यालाही कायमचं बक्षीस ठेवलं आहे. ही सर्व बक्षिस 1996 पासून सुरू आहेत आणि कायम चालू राहतील. पुणे येथील स्मृतिवनामध्येही त्यांच्या नावानं आम्ही लावलेलं झाडही आता वृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. इस्लामपूर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने 23 मे रोजी स्मृतिदिन म्हणून प्रसिद्ध साहित्यिकांना बोलावून दहा वर्षे कार्यक्रम केले. मामांनी केलेल्या श्राद्धांची परंपरा जपण्याचा आम्हीही प्रयत्न करतोय.

मामांना सिगरेटचं व्यसन होतं. त्यामुळेच त्यांची प्रकृती खालावली. कराडला कृष्णा हॉस्पिटलला असतानाही त्यांनी रेकॉर्ड केलंय. त्यांची रक्तातील साखर 700 च्या पुढे होती आणि त्यावेळी ते पूर्ण शुद्धीवर असून, मोटारसायकल चालवत होते! कालांतराने पथ्यपाण्याअभावी मधुमेह कंट्रोल न झाल्यामुळे त्यांचा डावा पाय मांडीपासून काढावा लागला. कायम फिरणं व भटकण्याची आवड असताना असं होणं ही एक नियतीच त्यांना शिक्षाच असावी. इस्लामपूरच्या त्यांनी बांधलेल्या ‘कृष्णकुंज’ या घराच्या खिडकीतून बाहेर जेवढं दिसेल तेवढंच जग झालं. ऑपरेशन झाल्यानंतर एकदाच भरपूर रडले पण त्यानंतर त्यांनी कधीही वाईट वाटून घेतलं नाही किंवा आजाराचं भांडवल केलं नाही.

त्यांच्या आजारपणापूर्वी ते खूप फिरले. त्यांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती. इस्लामपूरला कराड, कोल्हापूर, सांगली मिरज येथे जाऊन कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशीर झाला तरी एकटे मोटारसायकलवरून घरी परत यायचे. ललित साहित्याची आवड असल्यामुळे शिराळ्याच्या कॉलेजच्या कार्यक्रमाकरिता प्रसिद्ध साहित्यिकांना बोलवायचे. पाडगावकर, बापट, करंदीकर, शांता शेळके, नारायण सुर्वे, शंकर पाटील, नरहर कुरुंदकर, म. द. हातकणंगलेकर, श्रीनिवास कुलकर्णी वगैरे आमच्या घरी राहून गेले आहेत. उशीरा रात्रीपर्यंत मामा त्यांच्या मित्रमंडळींना बोलावून साहित्यिक गप्पांचा वेगळा जल्लोष चालायचा. आम्ही लहानपणी हे सर्व बघून आनंदून जायचो. खूपच वेगळा काळ होता तो.

मामांना स्वच्छतेची खूप आवड होती. स्वत: काही करायचे नाहीत. इतरांकडून करून घ्यायचे. पांढर्‍या शुभ्र कपड्यांची प्रचंड आवड. घरी येणार्‍या सर्वांचं योग्य आदरतिथ्य व्हायलाच पाहिजे, याकडे बारीक लक्ष असायचे. कापूरखेडचा मांग घरी आला तरी तो जेवल्याशिवाय कधीही परत गेला नाही. मामांना नाविन्याची खूप आवड होती. 1972 साली ‘कृष्णकुंज’ बांधलं तेही म्हणजे तयार भिंतीचं घर. फक्त 60 दिवसांत मोठा बंगला बांधून तयार झाला. इस्लामपूरहून शिराळा 20 किलोमीटर, सोयीचं व्हावं म्हणून राजदूत मोटारसायकल घेऊन वयाच्या 50 वर्षानंतर शिकले. या वयात मला जमेल की नाही अशी भावना कधीही नाही. आत्मविश्‍वास दांडगा होता. त्यांच्यासारखा प्रामाणिकपणा मला कुठे बघायला मिळाला नाही.

कापूरखेडला शेती होती. पिढ्यानं पिढ्यांचे वाटेकरी होते. त्यांनी कधी मन लावून शेती केलीच नाही. तरीही घरचे आंबे यायचे. सर्व प्रकारच्या भाज्या, सीताफळं यायची. यातलं सर्व वाटायला सांगायचे. कधीही कोणतीही गोष्ट विकल्याचं मला आठवत नाही. कूळकायद्यात बर्‍याच जणांच्या जमिनी गेल्या. पण मामांची नाही गेली. या सगळ्याचे कुठं तरी ऋण त्यांच्या मनात असणारच. जेव्हा ही शेती विकयचं ठरलं तेव्हा गावातून खूप लोक-पुढारीही आले. मागाल तेवढे पैसे देतो म्हणाले, पण मामांनी सर्व वाटेकर्‍यांना त्यंाच्या ऐपतीनुसार जमिनी अगदी नगण्य किंमतीत विकल्या. एका वाटेकर्‍याने तर दहा वर्षांत पैसे फेडले पण मामांनी पैशासाठी माणुसकी सोडली नाही.

माणसं जोडण्यात त्यांचा हातखंडा होता. शांताक्काचे यजमान म्हणजेच बद्याचे दादा. त्यांच्याशी मामांचं विशेष सख्य होतं. दादांनीही मामांवर मुलासारखं प्रेम केलं. दादा शेतकरी, अडाणी असूनही समंजसपणा खूप. नवीन काळात नवीन माणसांत समरस होणं त्यांच्याकडून शिकावं. मामांचा जेव्हा पाय काढला त्यावेळी खूप लोक भेटून गेले पण हॉस्पिटलच्या शेजारी असूनही दादा मामांना भेटले नाहीत. म्हणाले, अशा अवस्थेत मी मधूला बघू शकणार नाही. थोड्या दिवसांनी मानसिक तयारी झाल्यानंतर मग भेटले. दादांना नाईलाजाने शांताक्का गेल्यामुळे दुसरं लग्न करावं लागलं तरीही महिन्यातून किमान एक वेळा तरी दादा मामांना भेटायला यायचे. एकाची बहीण आणि एकाची बायको गेल्यानंतर एकमेकांवर 40-45 वर्षे (दोघांच्याही मृत्युपर्यंत) इतकं जीवापाड प्रेम करणारं माझ्या बघण्यात तरी कुणी नाही. विश्‍वास, श्रद्धा, समंजसपणा, प्रेम, आपुलकी असं सगळं एकवटल्याशिवाय हे कसं शक्य आहे.? सध्याच्या काळात असं कुणी असेल तरी काय?

जनरेशन गॅप प्रत्येक पिढीत असतेच. फक्त त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. पथ्य पाळणं हा एक विषय सोेडला तरी आम्हा दोघांमध्ये कधीच मतभेद झाले नाहीत. माझं लग्न मीच ठरवलं. उगीचच्या उगीच विरोध कधीच केला नाही. सुरुवातीला बाईकवर आम्ही ट्रीपला जायचो पण तुम्ही बाईकवरच का जाता, आताच का जाता, दवाखाना बुडत नाही का असं आम्हाला कधीही विचारलं नाही. फक्त परत येण्याचा दिवस पाळण्याची ताकीद असायची. ती मात्र मी कायम पाळायचो. त्यांचा आदर म्हणून मी 1982 ला प्रॅक्टीस सुरू केली. ते 95 ला गेले. ‘तुला किती पैसे मिळतात’ असं मला त्यांनी एकदाही विचारलं नाही. 1995 च्या सुरुवातीला मुलांच्या शिक्षणाकरिता पुण्यात सर्वांसह जायचे आहे असं सांगितल्यानंतर त्यांनीही सहकार्य केले. तुम्ही पुढे जा, प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर आम्ही दोघं येऊ असं म्हणाले, त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव माझ्याबरोबरच तुम्ही यायचं आहे, असं सांगितल्यानंतर तेही तयार झाले.

चित्रा माझी मोठी बहीण. नंतर मी, मग स्वाती व रवी असे आम्ही चौघं. मामांनी चौघांवरही समान प्रेम केलं. कुणालाही डाव उजवं केलं नाही. घरी कुणी तरी डॉक्टर व्हावं असं मात्र त्यांना कायम वाटायचं. मी दहावी झाल्यानंतर मला म्हणाले तुला पुढे काय शिकायचंय ! मला गणिताची आणि इंजिनिअरींगची आवड. पण दोन्ही व्यवसायांचे फायदे तोटे त्यांनी समजावून सांगितले. आणि केवळ त्यांची इच्छा म्हणून मी डॉक्टर झालो. पण त्यांनी कुणावरही सक्ती किंवा जबरदस्ती कधीच केली नाही. स्वत: प्राध्यापक असले तरी आम्हा चौघांना त्यांनी घरी कधी फारसं शिकवलं नाही. पण आमच्या अभ्यासाकडे निकालाकडे बारीक लक्ष असायचं. एक वडील म्हणून मला त्यांच्यासारखं वागायला जमेल!

महत्त्वाच्या गोष्टींची टिपणं काढायची मामांना सवय होती. लेख, कथाकथन, भाषणं, अभ्यासाची, अगदी पाठवायच्या निमंत्रणांचीही! त्यांचा पत्रिकेवर विश्‍वास नव्हता. तरीही त्यांच्या बहिणींची, आम्हा भावंडांच्या पत्रिका, त्यांनी जपून ठेवल्या आहेत. काही त्यांच्या हस्तक्षरात आहेत. मागील पिढीचा इतिहासही असाच नोंदवहीत आहे. त्यांचं हस्ताक्षर खूप उत्तम होतं. प्लॅनिंग ऍडमिशनचं बाळकडू मी त्यांच्याकडूनच घेतलं असावं. मामा साहित्यिक असूनही आम्हा चौघांमध्ये ही कला (वाचनाशिवाय) काही आली नाही पण आमच्यात साहित्यिक गुणधर्म नाहीत म्हणून त्यांनी कधीही वाईट वाटून घेतलं नाही. गुणग्राहकताही मामांकडे खूप होती व एखाद्याकडे काही कला असेल तर त्याला ते प्रोत्साहीत करायचे. त्यांचा एक मित्र (अगदी जवळचा) मध्य वयातच गेला. चार मुलं, पत्नी यांना कुणाचाच आधार नव्हता. आर्थिक प्रॉब्लेम बरेच होते. मामांनी स्वत: पुढाकार घेऊन इतरांनाही मदत करण्यास भाग पाडले. ती चारही मुलं आज त्यांच्या संसारात सुखी आहेत.

मामांच्या एकूण आजारपणात कराडच्या डॉ. आर. आर. देसाई आणि इस्लामपूरच्या डॉ. सतीश गोस्वामींची खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच मामांना किमान 10 वर्षे बोनस आयुष्य मिळाल. त्यांच्या आजारपणात एक डॉक्टर म्हणून मामांची जी सेवा मला घडली ती आणि मी आज काहीतरी लिहिलं आहे अशा दोन गोष्टी म्हणजेच त्यांना गुरूदक्षिणा असावी….

– डॉ. बी. व्ही. कुलकर्णी,
पुणे
भ्रमणध्वनी : 9422010682
पूर्वप्रसिद्धी – चपराक, जुलै 2010

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “सर्वार्थाने गुरू”

  1. Navnath Patil

    खूप छान…

  2. Sahasrabudhe

    खूप छान लेख..

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा