पू. साने गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन

पू. साने गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा स्त्री विषयक दृष्टिकोन

पू. साने गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन

पांडुरंग सदाशिव साने
अर्थात पू. साने गुरुजी यांची विपुल साहित्य संपदा आहे. अभ्यासू आणि ज्ञानपिपासू गुरुजींना अध्यापन, पत्रकारिता, समाजकारण आणि राजकारणाचा मोठा व्यासंग. अनुभवांच्या कसोटीवर खरे उतरलेले आणि हृदयाच्या आतून आलेले असल्याने त्यांच्या साहित्याला वैचारिक अनुष्ठान होते. सततच्या सूक्ष्म अशा चिंतनातून आल्यामुळे त्याला वेगळी जीवनदृष्टी आहे.

त्यांच्या लेखनाला मराठी वाङ्मयात स्वतंत्र स्थान आहे. त्यांनी 19 कादंबर्‍या, 15 कथासंग्रह, 16 कथा वाङ्मय, 2 कवितासंग्रह, 12 निबंध, 20 चरित्र, 14 अनुवादीत, 2 संकलन आणि अप्रकाशित बरचसं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. या सार्‍यांचे स्वतंत्र चिंतन समीक्षणही झालेलं आहे. प्रस्तुत लेखात गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा स्त्रीविषयक ‘दृष्टिकोन’ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

साने गुरुजींच्या काळात जे वाङ्मय निर्माण होत होते. त्यात प्रा. ना. सी. फडके यांनी आपल्या कथा, कादंबर्‍यांतून प्रतीपुष्प शृंगार रसाने सजविले होते. श्री. ग. त्र्यं. माडखोलकर, श्री. वि. स. खांडेकर यांच्या कादंबर्‍यांतूनही शृंगाराचा ओतप्रोत आविष्कार होता. या पार्श्‍वभूमीवर गुरुजींच्या कथा, कादंबर्‍यांची दखल घेतली तर त्यात शृंगाराला अजिबात स्थान नव्हते. प्रीतिची वर्णनेही वत्सलरसाने भारुन टाकली होती असेच दिसून येते. उत्तानता तर सोडाच साध्या शृंगाराचे वर्णनही त्यांच्या कथा-कादंबर्‍यात दिसत नाही. श्यामच्या आईमधील आई यशोदाबाई, क्रांतीची नायिका मीना, चित्रकार रंगामधील नयनाताई, गोड शेवट मधील कावेरी, संध्या मधील संध्या, सतीची मैना, रामचा शोलामधील सरला आस्तिकमधील वत्सला आणि तीन मुले मधील मधुरी या सार्‍या स्त्रीपात्रांची गुरुजींनी मांडणी केली आहे. त्यात सोशिकता, सात्विकता, दृढ निश्चयीपणा आणि वेळ प्रसंगी बंडही दिसून येते. या सार्‍या पत्रांच्या मागे उदात्ततेचा प्रयत्न दिसून येतो. एव्हढेच नव्हे तर त्यांच्या कथा कादंबर्‍यातील पात्रांची कथा, त्यांचे संवाद वत्सल रसाने ओतप्रोत भरली आहेत. जी तत्कालीन पार्श्वभूमीवर स्वतःचे असे वेगळेपण उमटवते. स्त्री जीवनातल्या अनेक विसंगती विषमता, अन्याय अत्याचार, दुःखे पाहून ते दुःखी होत. त्या मागचे कारुण्य, ममत्व त्यांना दिसे. म्हणूनच स्त्री पात्र उभे करताना, त्यात त्यांनी दिखाऊपणा, कृत्रिमता, तंत्रवाद येऊ दिला नाही. जे लिहिलं ते कळकळीनं म्हणून त्यात स्वाभाविकता आहे.

गुरुजींच्या साहित्यातील स्त्री सृष्टीचा विचार केला तर त्यांनी पुरुष पात्रापेक्षा स्त्री पात्रांना उजवे स्थान दिले आहे. म्हणूनच त्यांच्या कादंबर्‍या, कथांमधील स्त्री पात्रे वाचकांवर अधिक प्रभाव गाजवतात. स्त्री पात्र रंगवताना गुरुजी अधिक तादात्म्य पावतात. हा त्यांच्यावर असलेल्या मातृत्वाचा प्रभाव आहे. यामुळे त्यांच्यात स्त्री सुलभ व मातृ सुलभ स्व विसर्जनाची प्रवृत्ती दिसून येते. याचेच प्रतिबिंब त्यांच्या स्त्री पात्रात उतरते. गुरुजींची स्त्री पात्रे वाङ्मयीन व्यक्तिरेखा म्हणून अविस्मरणी वाटतात आणि वाचकांच्या अंतःकरणात स्थान मिळवतात. यावरुन असे स्पष्ट होते की, गुरुजी आपल्या कथा-कादंबर्‍या स्त्री पात्रांच्या व्यक्तीरेखा प्रभावीपणे चितारण्यात यशस्वी झाले आहेत.

श्यामच्या आईमधील ‘यशोदाआई’:
‘श्यामची आई’ ही गुरुजींची पहिली कादंबरी मातेबद्दलचे प्रेम, कृतज्ञता यात गुरुजींनी शब्दरुप केले आहे. मराठी साहित्यातील मातृप्रेमाचे मंगलस्त्रोत म्हणजे श्यामची आई’. प्रापंचिक जीवनात प्रपंचाचा गाडा ओढताना स्त्रीची-आईची जी कुतरओढ होते. त्यातली खडतरता, काठीण्य, यशोदाआईने अनुभवले. जीवनातील अनेक दुःख सहन केले. आपल्या मुलांना सदाचाराचे, सन्मार्गाचे धडे दिले. त्यांच्या अंगी ध्येय आणि सामर्थ्य निर्माण करताना प्रसंगी ती कठोर झाली. यामुळेच श्यामचे मन संस्कारी झाले. गुरुजी म्हणून तर म्हणतात ‘आई माझा गुरु, आईच माझा कल्पतरु’, श्यामच्या आईमधील यशोदाआई, प्रेम, कृतज्ञता, भक्ती यांच मुर्तीमंत रुप म्हणून समोर उभं राहतं. या कादंबरीतलं हे पात्र सुंदर, सुगंधी, सुरस आणि पवित्र असं आहे. श्यामची आई वाचतांना वाचकाला अश्रू आले नाहीत तर त्याच्या हृदयात पाषाण असावा असं म्हणतात. गुरुजी तर म्हणत अश्रू आले नाहीत तर माझं लेखन त्याज्य, व्यर्थ, नीरस असावे, यशोदाआई वाचकांसमोर उभी करताना गुरुजींनी आईची म्हणजे समस्त स्त्री वर्गाची सेवावृत्ती आणि निरहंकारीताच साकारली आहे. कर्तव्यतत्पर स्वाभिमानी, तेजस्वी आणि करारीपणा दाखविताना गुरुजींनी ग्रामीण भागालातील आईला-स्त्रीला योग्य न्याय दिला आहे.

श्याम पुस्तक घेण्यासाठी पैसे चोरतो. त्याचे समर्थन करताना श्याम म्हणतो, आई मोठा होण्यासाठी पुस्तक वाचायचे असे म्हणतात ‘‘त्यासाठी पैसे घेतले तर काय बिघडलं?’’

त्यावर आई म्हणते, ‘‘अरे पहिल्याच पुस्तकात चोरी करु नये असे म्हटले आहे ते अजून शिकला नाहीस मग दुसरे पुस्तक कशाला?’’

अशा अर्थगर्भ बोलण्यातून आईने मुलांना सत्यनिष्ठा, धीटपणा, स्वावलंबन, स्वाभिमान, भूतदया, बंधुप्रेम, कर्तव्यनिष्ठा आदी गुणांची शिकवण पेरली. अशा प्रसंगात आई, गुरु-शिक्षक म्हणून उभी राहते.

आपल्या पतीला रागवणार्‍या वडिलांना आई म्हणते, ‘‘नाना माझ्या घरात तुम्ही बसला आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसर्‍याला दिली, आता वाटेल असे बोलू नका. भरल्या घरात अवकळा आली, वाईट दिवस आहेत. म्हणून माझ्यादेखत माझ्या पतीची निर्भत्सना करु नका’’ यातून आईचा करारीपणा, स्वाभिमान, संकटात पतीला सोबत करण्याची वृत्ती दिसून येते. घराचे कर्ज वसूल करायला आलेल्या सावकाराच्या माणसाने ‘बायको विका’ असे म्हटल्यावर शांत, संयमी आईतली वाघीण जागी होते आणि ती म्हणते, ‘‘या ओटीवरुन चालते व्हा! बायको विकायला सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्हाला बायको आहे की नाही, येथून चालते व्हा!’’ यातून तिचा करारीपणा प्रत्ययाला येतो.

दिवाळीला भावाने ओवाळणी दिली ती पतीच्या धोतरजोडीसाठी खर्च करणारी यशोदाबाई, मथुरी कांडपणाची वास्तपुस्त करणार्‍या यशोदाबाई श्यामला गोयलेवालीला मदत करायला लावणार्‍या यशोदाबाई अशी विविध रुपे गुरुजींनी चितारली आहेत.
गुरुजींची आई वाचतांना आपण आपल्या आईलाच नव्याने भेटतोय असे वाचकाला वाटतं. आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागतात तेच त्याला कळत नाही. श्यामची आई तुमची, आमची सर्वांचीच आई होऊन जाते. यातूनच गुरुजींचा आईविषयक स्त्री विषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो.

क्रांतीतली ‘मीना’
क्रांती या कादंबरीतली मीना ही कुटुंबातली एकुलती लेक. ती घोड्यावर रपेट मारते, ड्रायव्हिंग करते, बॅडमिंटन खेळते, सिनेमाला जाते. यातून गुरुजींनी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कारच केला आहे. मीनाचं स्वच्छंदी, स्वतंत्र विचारसरणीचं वागणं दाखवतांना गुरुजी या पात्राला गरीबांबद्दलचा जिव्हाळा, कळवळा यांची जोड देतात. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच तर गुरुजींना दाखवायचे नसेल. पुढे हीच मीना एका संन्याश्यासोबत लग्न करते. यातून स्त्री मुक्तीचं दर्शन घडतं. कादंबरीच्या शेवटी मीना आपले सारे ऐश्वर्य, संपत्ती मजुरांच्या मदतीसाठी आश्रमाला देते. यातून तिचे दातृत्त्व दिसून येते. मीना स्वतःसाठी खादीचा वापर करते, यातून तिची राष्ट्रभक्ती व सेवाकर्म प्रकट होते. मीना या व्यक्तिरेखेला असे असंख्य कंगोरे जोडून गुरुजींनी स्त्रीविषयक आपली भूमिकाच मांडल्याचे स्पष्ट होते.

चित्रकार रंगामधल्या ‘काशी-नयना’
आपल्या पहिल्या बाळंतपणात काशीला मुलगा होतो. काही काळाने तिच्या आई वडिलांचा मृत्यू होतो. काशीबाई रंगाला घेऊन भावाकडे जाते. तेथे तिला भावजय त्रास देते. घरातून हुसकावून लावते. सर्वसामान्य स्त्रीच्या नशिबी येेतात ते भोग काशी भोगते. धुणी-भांडी, स्वयंपाकाची कामे करताना घरमालक तिच्याकडून अनैतिक कर्माची अपेक्षा करतो. काशी त्याला स्पष्ट नकार देते. यातून तिची चारित्र्याची बाजू अधिक उजळून उठते. तिचा मुलगा रंगा चित्रकार बनतो. त्याचा नयनाशी विवाह होतो. श्रीमंत नयना रंगाला साथ देते. आपल्या पैशांनी रंगाकडून ‘भारत चित्रकला धाम’ उभं करते. स्वतः स्वतंत्र्ययुद्धात सहभाग घेते. काशीच्या जीवनातली होरपळ आणि नयनाचं उदात्त प्रेम आणि राष्ट्रभक्ती गुरुजींनी साकारली आहे. हे मांडतांना गुरुजींनी काशीच्या कष्टाला अतिरंजीत केले नाही. आणि नयनाचे प्रेमही उत्शृंखल होऊ दिलेलं नाही. गुरुजींच्या मनातला संयतपणाच या पात्रातून आला आहे.

संध्यामधली ‘संध्या’:
संध्या ही स्वतःच कादंबरीची नायिका आहे. संध्याच्या वागण्या-बोलण्यात ध्येयवाद डोकावतो. तिच्या वागण्यातून तिची लहान वयातली मोठी समज प्रकट होते. संध्या कल्याणच्या भेटीतून संवादातून त्यांच्यातली शुद्ध प्रीती दिसते. या कादंबरीत, लीला, यमुना, तारा, मीना इत्यादी स्त्री पात्रही येतात. मात्र संध्याची व्यक्तीरेखा अधिक प्रभावी आणि प्रत्ययकारी साकारण्यात गुरुजी कमालीचे यशस्वी झालेले आहेत.

‘सती’मधील ‘मैना’:
सती या कादंबरीतील मैना म्हणजे नशिबाचे चक्र उलटे फिरलेली एक सामान्य स्त्री. धोंड भटजी व सावित्रीबाईंची ही कुशाग्र, अपूर्व स्मरणशक्ती असलेली एक लेक. वेदमंत्र, सूक्त, गीता, स्तोत्र, पाठांतर करुन कथा, कीर्तन, करणारी भटजी मैनेचे लग्न श्रीमंत, वृद्ध जहागीरदाराशी लावून देतात. जरठ-कुमारी विवाहाचा प्रश्न गुरुजी येथे मांडतात. काही दिवसात वृध्द पतीचे निधन होते. व मैना सती जाते. या कादंबरीत इंदू व मैनाचे संभाषण आहे. इंदू म्हणते ‘बायकांना दुःख विचारायचे नसते, मैने, बायका म्हणजे गाई. शेतकर्‍यांच्या बायका बर्‍या. त्यांना थोडे तरी स्वातंत्र्य असते. त्या मोलमजुरी करतात, नवर्‍याला बोलू शकतात; पण आपण पिंजर्‍यातल्या मैना. कधी डाळींब मिळेल, कधी थोबाडीत मिळेल, मैने, स्त्रिया म्हणजे संसारातील संन्याशिनी’’, यावर मैना म्हणते, ‘‘आपण मारु नाही शकलो, निदान मरु शकतो? का रहावे अशा स्थितीत?’’ याद्वारे इंदूद्वारे बायकांची व्यथाच वदविली आहे. मैनेचा कोंडमारा व तिची असहायताच मांडून गुरुजी या वेदनेला वाचा फोडतात.

या कादंबरीत गुरुजींनी पुरुषत्वहीन पतीशी दुर्दैवाने जखडल्या गेलेल्या स्त्रियांचं दुःख प्रभावीपणे मांडलं आहे. या कादंबरीत मैनेचे गोपाळवर प्रेम असल्याचं समजून तिचा पती तिला म्हणतो, ‘‘मैने माझ्या कुळाची अब्रू तिची काही किंमत आहे की नाही?’’ यावर मैना त्वेषाने बाणेदारपणे उत्तरते ‘‘चार चार बायका करणार्‍यांना काही लाज आहे का? अनाथ स्त्रियांना जिवंतपणे मृतवत करणार्‍याला काही अब्रू आहे का? देवाघरी तुमच्या अब्रूचे कधीच दिवाळे निघाले आहे. बायकांना गायीप्रमाणे विकत घेणारे त्यांच्या अब्रूची मला नाही काळजी. पावित्र्याला खोट्या शिव्या शापांची, नालस्तेची पर्वा नाही’’ यातून मैनेची दृढ वैचारिक बैठक, प्रामाणिकपणा स्पष्ट होतो. बंड करत नसली तरी मैनेचे विचार विद्रोही मात्र आहेत हे नाकारता येत नाही.

गोड शेवटमधील ‘कावेरी’:
या कादंबरीत जगन्नाथ हा दक्षिण भारतीय कावेरीशी लग्न करतो. गुरुजींच्या स्वप्नातल्या आंतरभारतीय स्वप्नाला हा आंतरप्रांतीय विवाह बळकटी देतो. प्रांत, भाषावादावर मात करण्याचाच त्यांचा प्रयत्न. कावेरीचे वैचारिक स्वातंत्र्य यातून दिसून येते.

रामाचा शेलामधील ‘सरला’
या कादंबरीची नायिका सरला. जन्मतःच अभागी. सरलाशिवाय दुसरे अपत्य जगले नाही. शिवाय आईही गेली म्हणून अपशकुनी ठरलेली. वाईट पायगुणांची म्हणून वडिलांची तुसडी वागणूक झेलणारी. सावत्र आईचा त्रास सोसणारी. लग्न झाल्यावर पतीचा मृत्यू झाल्याने कोलमडून पडलेली. उदय नावाच्या तरुणाकडून स्नेह मिळतो. त्याचे प्रेमात रुपांतर होते. लग्नाचा आणाभाका होतात. ताटातूट होऊन विवाहपूर्व संततीचा शाप भोगणारी. परिस्थितीशी झुंज देणार्‍या स्त्री जन्माची ही विदारक कहाणी. वाट चुकलेल्या वाटसरुची होते तशी फसगत होऊन कुुंटणखान्यात पोहोचलेली. समाजातल्या ढोंगी रामभक्त गब्बूशेटच्या वासनेची भूक भागविण्यासाठी सदैव वाढली गेलेली. मात्र स्वतःला भ्रष्ट होण्यापासून वाचवणार्‍या सरलाची ही कहाणी. रामाचा शेला तिला हे बळ देतो. वारांगनाऐवजी वीरांगना बनवतो. नरकात टाकण्याऐवजी तेथून बाहेर काढतो. या कादंबरीला दुर्लक्ष करताना अंधश्रद्धाळू बाप, स्वार्थी समाजव्यवस्था आणि वासनांध ढोंगी भट या सार्‍यांवर मात करणारी धाडसी, दृढ सरला. गुरुजींनी सरलाच्या रुपात विधवा स्त्रियांच्या वाट्याला येणारा अन्याय, त्यांच्या जीवनात येणार्‍या समस्या यावर कठोर आघात करुन समाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.

स्त्री ही जिद्दी असते, तिचा चांगुलपणावर विश्वास असतो आणि आलेली संकटाची स्थिती पालटून सारे सुरळीत होईल हा आशावाद तिच्याच जिवंत असतो. ही सारी स्त्री गुणवैशिष्ट्ये गुरुजींनी सरला या पात्रात ओतली आहे ती आलेल्या सर्व संकटांना धीराने सामोरी जाते. वासनांध, ढोंगी भटाला आवाहन करुन त्यातल्या माणसाला जागृत करते. जो तिच्याशी शैय्यासोबत करु इच्छित होता त्याच्यातील बापालाच ती जागृत करते. तिच्या जिद्द-चिकाटीमुळेच भट सरलाला मुलगी म्हणून समाजासमोर स्वीकारतो. या ठिकाणी सरला ढासळली असती, वाकली-मोडली असती तर भटाची हिंमत वाढून तो पशुसारखाच वागला असता. स्त्री ही घरात तसेच समाजातही सुरक्षित नाही मात्र तिने आपले आत्मभान जपले तर ती स्वत्व टिकवू शकते. हाच संदेश गुरुजींनी सरलाच्या रूपातून दिला आहे. हे सारं मांडतांना गुरुजींची सकारात्मकताच दिसून येते.

आस्तिकमधील ‘वत्सला’:
जनमेजयाच्या सर्पसत्र व आस्तिक सत्रावर आधारीत आस्तिक कादंबरीत आर्य आणि नागांच्या संघर्षाचा पट आहे. वत्सला ही या कथेची नायिका. सुश्रुतेची नात वत्सला संकटात सापडते तिला नागानंद वाचवितो. त्याच्यावर आरक्त होऊन सुश्रुता नागानंदशी विवाह करते. हे जनमेजयाला खटकते. आर्य सुश्रुता व नाग नागानंद यांचा विवाह तो नाकारतो. त्यांचा छळ करतो; मात्र वत्सला जुमानत नाही. ती त्याला सडेतोड उत्तर देते. ‘‘आर्यपुरुष आणि स्त्री यांचा धर्म एकच आहे. मी नागाशी लग्न केले म्हणून मी दोषी. आणि आर्य पुरुषांनी नागकन्यांची विटंबना केली त्याचं काय? आम्ही मरु, मात्र तुझ्या अभद्र राज्यात राहणार नाही’’ पुढे आस्तिक येवून जनमेजयाला मानवतेचा मंत्र सांगतात आणि आर्य-नाग यांचे ऐक्य होते. जाती, धर्म भेदावर भाष्य करणारी ही कादंबरी असून वत्सलेच्या स्वतंत्र विचारांचा पुरस्कार करणारी आहे. अस्पृष्यता, हिंदू-मुस्लिम वैर यावर गुरुजींनी यातून समर्पक भाष्य केले असून स्त्री ठाम राहिली तर ती ऐक्य निर्माण करु शकते हा संदेश दिला आहे.

तीन मुलेमधील ‘मधुरी’:
तीन मुले या कथेत मधुरी ही नायिका आहे. ती श्रीमंत मुलाला नाकारुन गरीब मुलाशी विवाह करते. प्रेमाला महत्त्व देेते. गरीबीशी दोन हात करते. संकटांना सामोरी जाते. संसारातील ओढाताण, जीवनाची वाताहात मांडताना गुरुजींनी मधुरीची व्यक्तीरेखा करुणरम्य, उदात्त प्रेमाने भारलेली अशी उभी केली आहे. संसार सावरण्यात पुरुषांपेक्षा स्त्रीची भूमिका महत्वाची असते हे दाखवत गुरुजींनी स्त्री विषयक आपल्या विश्वासाला दृढ केले आहे.

निष्कर्ष :
वरील सर्व कथानकांमधील स्त्री पात्रांची गुरुजींनी केलेली रचना त्यांच्या महत्त्वाला विशद करणारी आहे. गुरुजींच्या नायिका तत्कालीन समाज व्यवस्थेचं प्रतिनिधीत्व करतात. त्याचं वागणं, बोलणं, वेष परिधान करणं संयत आणि संस्कारी आहे. त्या आरश्यासारख्या निर्मळ आहेत. प्रेमाचा परिस्फोट सरळ करतात. त्यात सूचकता, संकोच नाही, मात्र उत्तानताही नाही. सर्वच स्त्री पात्रांत निर्व्याजिता, भावोत्कटता दिसून येते. त्यांच्यात खल प्रवृत्ती अभावानेच दिसून येते. कथा कादंबर्‍यात सवंगता नाही, उत्तानता तर राहोच साधा शृंगाराचे वर्णनही नाही. त्यांची सर्वच स्त्री पात्रे वत्सल रसाने मनोरम झाली आहेत. त्या मांगल्य, बंधुता, सत्य, शिव आणि सौंदर्याशी निर्व्याज नातं सांगणारर्‍या आहेत. गुरुजींची स्त्री पात्रे उगाच रडवी नाहीत. त्याचं कारुण्य हे कर्तव्य प्रेरक आहे. रडणं हे असहाय-अबलापणाचं नसून दुःख, अन्याय व्यक्त करणारं मानवता निर्माण करणारं आहे. गुरुजींची स्त्री पात्र समाजाला दीन-दुबळी बनवणारी नाहीत तर जगण्याचा नवा आशावाद पेरणारी आहेत. वाचकांना हवी तशी सवंग, हलक्या वृत्तीची पात्र न रंगवता गुरुजींनी समाजाला दिशा देणारी, सकारात्मकता पेरणारी, संकटांना सामोरी जाणारी, जगणं सुंदर करणारी स्त्री पात्रे निर्माण करुन त्यांच्या एकूणच निर्मळ, मातृवत्सल व्यक्तिमत्त्वाची साक्ष दिली आहे. म्हणूनच गुरूजींचं साहित्य हे अक्षर वाङ्मय ठरले असून त्यांची स्त्री पात्रे आदर्श म्हणून समोर येतात.

प्रा. बी.एन. चौधरी
धरणगाव
9423492593

मासिक ‘साहित्य चपराक’ मार्च २०१७

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा