१९५६-५७ या वर्षामध्ये यवतमाळ येथे काम करीत असतानाच राम शेवाळकर यांच्या मनात नांदेडला जाण्याचा विचार घोळत होता. त्यावेळी पीपल्स कॉलेज नांदेड येथे प्राध्यापक पदाची एक जागा रिक्त होती परंतु अचानक यवतमाळ येथील ज्या महाविद्यालयात शेवाळकर प्राचार्य म्हणून काम बघत होते त्या कॉलेजचे संस्थापक बाबाजी दाते यांचा अपघात झाला आणि शेवाळकर यांच्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी असल्यामुळे शेवाळकरांना तो विचार स्थगित ठेवावा लागला.
त्यांचे मित्र मधू वाबगावकरांना पीपल्स कॉलेज, नांदेड येथे काम करायची संधी मिळाली; मात्र योगायोग, विधिलिखित अशा गोष्टींचे महत्त्व अशा वेळी जाणवते. त्याचे असे झाले की, उन्हाळ्याच्या सुट्टीत वाबगावकरांनी पीपल्स कॉलेजचा निरोप घेतला. तिकडे दाते यांची प्रकृती सुधारली. एक वेळ हुकलेली संधी पुन्हा राम शेवाळकर यांच्या दारात उभी होती. त्यांनी दाते यांच्याकडे त्यांचे कॉलेज सोडून नांदेड येथे जाण्याची परवानगी मागितली. दाते यांनी परवानगी देताच शेवाळकरांनी पीपल्स कॉलेज, नांदेड यांच्याकडे रीतसर अर्ज पाठविला.
त्यांच्याकडून हैदराबाद येथे मुलाखतीस आमंत्रित केल्याचे पत्र आले; परंतु हाय रे दैवा ! मुलाखतीचा नियोजित दिवस निघून गेल्यावर तब्बल पंधरा दिवसांनी ते पत्र शेवाळकरांना मिळाले. एखाद्या व्यक्तीने कंटाळून, ही संधी आपणासाठी नाही, अशा नकारात्मक विचाराने प्रयत्न सोडून दिले असते; परंतु शेवाळकरांनी जिद्द सोडली नाही. ‘कोशिश करनेवालोंकी हार नही होती’ याप्रमाणे त्यांनी पुन्हा दुसरा अर्ज पाठविला. सोबत मुलाखतीचे पत्र उशिरा मिळाल्याचा पुरावा म्हणून मुलाखतीच्या पत्राचा लिफाफा ज्यावर पोस्टाच्या तारखेची मोहर होती, तो लिफाफाही पाठविला आणि पुन्हा संधी देण्याची विनंती केली. शेवाळकरांचे सुदैव असे, की साऱ्या परिस्थितीचा विचार करून
व्यवस्थापनाने शेवाळकरांना पुन्हा नांदेडला मुलाखतीसाठी पाचारण केले.
मुलाखतीसाठी सात उमेदवार उपस्थित होते. मुलाखत तीन टप्प्यांमध्ये झाली. पहिल्या वेळेस नियामक मंडळाने चर्चा केली आणि प्रत्यक्ष वर्गावर नेऊन उमेदवारांची शिकविण्याची हातोटी, विषयाचे ज्ञान, सभाधीटपणा अशा बारीकसारीक गोष्टींची पाहणी केली. दुसऱ्या टप्प्यात नरहर कुरुंदकरांनी उपस्थित उमेदवारांची मुलाखत त्यावेळी इतर सारे उमेदवार धास्तावलेले होते, रडवेले झाले होते. कारण विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर चुकल्यास किंवा उत्तर न आल्यास कुरुंदकर ओरडत होते. त्यामुळे सारे उमेदवार चिंतेत होते. शेवाळकर मात्र नरहर कुरुंदकरांच्या परीक्षेत ‘पास’ झाले. शेवटची मुलाखत स्वत: स्वामी रामानंद तीर्थ यांनी घेतली. इतर उमेदवारांपेक्षा शेवाळकर निश्चितच सरस होते. दोन विषयांमध्ये एम.ए. सुवर्णपदकाचे मानकरी, ‘असोशी’ हा साहित्यिक मानदंड, त्यांनी चालविलेली वाङ्मयीन चळवळ आणि व्याख्यानमाला. पदासाठी आवश्यक पात्रतेच्या चार पावलं पुढे असणाऱ्या राम शेवाळकर यांची पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. अशा रीतीने स्वामीजींच्या नेतृत्वाखालील नावाजलेल्या संस्थेत काम करण्याची शेवाळकरांची इच्छा पूर्ण झाली.
१५ जुलै १९५७ या दिवशी शेवाळकर पीपल्स कॉलेजला उपस्थित झाले. नांदेडच्या वास्तव्यात त्यांचे वाङ्मयीन, साहित्यिक आणि सामाजिक कार्य भरभराटीस आले. अनेकानेक दिग्गजांसोबत नांदेडच्या सर्वच क्षेत्रांतील कार्याला जवळून बघण्याची आणि स्वत:चा सहभाग नोंदविण्याची संधी त्यांना मिळाली. म्हणून नांदेड येथील वास्तव्यास ते ‘सोनेरी दिवस’ असे संबोधत असत. येथे लाभलेल्या अनेक मित्रांमध्ये नरहर कुरुंदकर हे त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र. त्यांच्यासोबतचे कार्य आणि आठवणी यांवर एक वेगळे पुस्तक होईल. गोपाळशास्त्री देव हे शेवाळकरांसाठी पितृतुल्य व्यक्तिमत्त्व. सुरुवातीपासूनच शेवाळकरांना खाद्यपदार्थांची भारी आवड. त्यांची झणझणीत व चमचमीत पदार्थ खाण्याची हौस सौ. देव यांनी सातत्याने, उत्साहाने पुरविली, हे सांगताना शेवाळकर गद्गद् होत असत.
कै.ग.ना. आंबेडकर यांच्याविषयी बोलतानाही शेवाळकरांचे अंत:करण भरून येई. वाङ्मयीन चळवळीशी संबंधित प्रत्येक उपक्रमास अंबेकर तन मन-धनाने साहाय्य करीत असत. अंबेकर यांना स्वत:ला नाटकाची प्रचंड आवड होती. त्यांच्या आवडीमुळेच अनेक नामवंत कलाकारांची हजेरी नांदेड येथे लागत असे. विशेष म्हणजे कलाकारांचा मुक्काम अंबेकर यांच्या घरीच असे. त्यांचे आदरातिथ्य, पाहुणचार करताना अंबेकर कुटुंबीयांना वेगळेच समाधान आणि धन्यता वाटत असे. कै.ग.ना.अंबेकरांनी त्या काळात स्थापन केलेले गोदावरी मुद्रणालय आजही सुस्थितीत चालू आहे. या प्रेसमध्ये शेवाळकर आणि मित्रमंडळ फावल्या वेळेमध्ये बसत असत. यावेळी प्रामुख्याने वाङ्मयीन चर्चा अधिक रंगत असत. संपन्न झालेल्या कार्यक्रमाची उजळणी आणि भविष्यात होऊ घातलेल्या कार्यक्रमांचे नियोजन-आखणी होत असे. गरमागरम कॉफीचा आस्वादही घेतल्या जाई. याच गप्पांमध्ये ‘साप्ताहिक प्रतोद’ आणि ‘वार्षिक दीपकळी’ यांचा जन्म झाला. यापैकी प्रतोद आजही चालू आहे.
अंबेकर यांच्याविषयी शेवाळकर म्हणतात, की सांस्कृतिक विश्वाला पडलेले आणि प्रत्यक्षात उतरलेले स्वप्न म्हणजे ग. ना. अंबेकर! नांदेडच्या साहित्यिक विश्वाला अंबेकर नावाचे व्यसन जडले होते. अशा प्रचंड प्रमाणात अंबेकरांनी वाङ्मयीन कार्यक्रमांना वाहून घेतले होते. अंबेकरांच्या ‘प्रियदर्शन’ मध्ये अनेक व्यक्तींचा राबता असायचा. त्यामुळे त्या वास्तूचे घरमालक अंबेकर हेच जणू तिथे किरायेदार होते. शेवाळकरांना भावलेली अंबेकरांची एक गोष्ट म्हणजे अंबेकरांजवळ असलेली प्रचंड नियमितता. रात्री ठरलेल्या वेळी ते झोपणार म्हणजे झोपणारच. वाङ्मयीन कार्यक्रमास त्यांची उपस्थिती हा त्यांच्या नियमिततेसाठी ठरणारा अपवादात्मक छेद! रात्री कितीही उशिरा झोपले तरीही अंबेकर पाचच्या ठोक्याला उठणारच!
दे.ल. महाजनांविषयी शेवाळकरांना प्रचंड आदर आणि कौतुकही वाटायचे. एक प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून महाजन ख्यातकीर्त होते. त्यांच्या कीर्तनाबरोबरच त्यांच्याजवळ असलेले नकलेचे भांडार, कोट्यांची शिदोरी आणि विनोदाचा खजिना भरपूर आवडायचा. शेवाळकर यांच्याप्रमाणेच महाजनही खवय्ये होते. महाजनांबाबतचा एक विनोदी किस्सा राम शेवाळकर सांगत असत. महाजन घरी आले, की चहा-फराळ ही ठरलेली बाब असायची. त्यावेळी शेवाळकर त्यांच्याकडे असलेले तबक महाजनांसमोर ठेवायचे. त्या तबकामध्ये पांढरी शुभ्र श्रीवर्धनी सुपारी असायची. काही दिवसांनंतर शेवाळकरांच्या लक्षात एक गोष्ट लक्षात आली, की त्या पांढऱ्या धवल सुपारीस महाजन स्पर्शही करीत नसत.
काही भेटीनंतर त्यांनी सुपारी न खाण्याचे कारण महाजनांना विचारले. त्यावेळी महाजन म्हणाले,
“अहो, वय झाल्यामुळे ही सुपारी चावत नाही हो. एकदा ही मस्त सुपारी खाण्याचा मोह आवरला नाही म्हणून सुपारीचे एक खांड तोंडात टाकले. खूप वेळ चघळले. शेवटी सुपारी दातांनी फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु सुपारीच्या टणकत्वापुढे दात हरले. सुपारी थुकली तेव्हा तोंडातून दोन तुकडे पडले. आश्चर्य याचे वाटले, की सुपारी तोंडात फुटलीच नाही तर मग दोन तुकडे कसे ? वेगळ्याच शंकेने ते दोन्ही तुकडे तपासले तेव्हा लक्षात आले, की त्या सुपारीने आपल्या दाताचा बळी घेतला, त्याचाच तो अवशेष.” त्यांच्या त्या स्पष्टीकरणावर सारे हसले.
शेवाळकरांचे प्राध्यापक या नात्याने पीपल्स कॉलेज, नांदेड येथे आठ-नऊ वर्ष वास्तव्य होते. भारावलेला स्वप्नवत असा तो काळ असल्याचे शेवाळकर सांगत. मोठमोठी माणसे त्यांनी जोडली. त्यांच्या विद्वत्तेला न्याय देणारा हा कालावधी होता. शेवाळकर पीपल्स कॉलेजमध्ये उपस्थित झाले तशातच त्यावेळेसचे प्राचार्य डॉ.सुरेंद्र बारलिंगे यांनी पीपल्स कॉलेज सोडले. हैद्राबाद संस्थानामध्ये त्यांनी अनेक महाविद्यालये काढली. त्या नव्या महाविद्यालयांची भरभराट व्हावी, या हेतूने डॉ. बारलिंगे यांनी पीपल्स कॉलेज सोडले आणि सोबतच पीपल्स कॉलेजातील अनेक विद्वान सहकाऱ्यांना त्यांच्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नेमणूक दिली. त्यामुळे पीपल्स कॉलेज खरे तर अडचणीत आले; परंतु कॉलेजमध्ये नवीन आलेल्या शेवाळकरांसारख्या तरुण प्राध्यापकांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्या परिस्थितीचा शेवाळकरांना असा फायदा झाला, की त्यांना स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची जवळून संधी मिळाली.
स्वामीजी स्वतः कॉलेज, विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडे बारकाईने लक्ष ठेवून असत. हैद्राबादहून कामानिमित्त नांदेडला आले की, ते कॉलेजमध्ये येत. विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून कॉलेजच्या सर्वांगीण बाबींची चौकशी करत. नंतर ते ग्रंथालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करत. प्राध्यापकांनी नेलेल्या पुस्तकांची पाहणी वाटप पंजिकेवरून करताना ते एक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करीत, की अभ्यासाच्या व्यतिरिक्त प्राध्यापक कोणत्या पुस्तकांचे वाचन करताहेत, त्यांची ज्ञानलालसा कशी आहे ? नंतर त्यांची भेट असे प्राचार्यांशी. त्यांच्याशी बोलणी झाली की मग स्वामीजींचा मोर्चा वळे तो प्राध्यापकांकडे. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेमध्ये नवीन काय चालले आहे. प्राप्त झालेल्या नवीन माहितीचा, ज्ञानाचा प्रत्यक्ष अध्यापनाशी संबंध जोडता येइल का, त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा देता देईल अशी चर्चा करताना प्रसंगी वरिष्ठ प्राध्यापकांना न दुखविता, आपल्या जुन्या ज्ञानासोबत नवीन ज्ञानाचा संबंध अध्यापन- अध्ययनात आणून त्यात सचेतना कशी आणता येईल याची सविस्तर चर्चा करत.
प्राचार्य शिरवाडकर, प्रा.पाध्ये, प्रा. डोळे, प्रा. धर्माधिकारी अशा ज्ञानवंत प्राध्यापकांसोबत विविध विषयांवर खोलवर चर्चा होई. विषय कुणाचाही असला तरी त्यावर सर्वांगीण चर्चा झाल्यामुळे प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होत असे. विषय कुठलाही असो, सभा कोणतीही असो, तुम्ही शेवाळकरांना आवाज द्या. ते तत्परतेने होकार देत. तेवढ्याच ताकदीने वेळ साजरी करत. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांबाबत जयंत साळगावकर लिहितात,
‘सुमंगल प्रेसने रामदासांचे अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध केले होते. त्याचा प्रकाशन सोहळा सिद्धीविनायक मंदिरात होता. परंतु त्यादिवशी नेमके मुख्य पाहुणे आजारी पडले. अगदी आयत्यावेळी राम शेवाळकर यांना विनंती झाली तरीही शेवाळकर त्यावेळी समर्थांवर एवंढं सुंदर बोलले, की ऐकणारांचे कान धन्य झाले.”
कालांतराने नरहर कुरुंदकर पीपल्स कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून उपस्थित झाले. त्यामुळे कुरुंदकर-शेवाळकर यांच्यातील वैचारिक- साहित्यिक जुगलबंदी पीपल्सच्या विद्यार्थ्यांना आणि नांदेडकरांना ऐकायला मिळाली. प्रत्येक विषयावर हे दोघे ठरवून बोलल्याप्रमाणे वादात्मक बोलायचे त्यामुळे प्रत्येक विषय सर्व बाजूंनी स्पष्ट होत असे. ह्या दोन व्यक्ती म्हणजे नांदेडकरांना मिळालेला दैवी साहित्यिक आशीर्वाद होता. दोघेही एकमेकांना स्वत:पेक्षा श्रेष्ठ मानत. चर्चात्मक वादामध्ये कुणीच कुणाला हार जायचे नाही.
नरहर कुरुंदकर अकाली गेले, त्याचे सर्वाधिक दुःख शेवाळकरांना झाले. त्या दुःखद घटनेनंतर जेव्हा जेव्हा कुरुंदकरांचे नाव निघायचे त्या -त्या वेळी शेवाळकरांचे डोळे पाणावलेले असत. दुसऱ्याच क्षणी ते म्हणायचे,
‘कुरुंदकर अकाली गेले. त्यांनी मराठी सारस्वताची पताका महाराष्ट्राबाहेर उंचावली. ते माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान, माझे नाव राम परंतु या सारस्वताच्या क्षेत्रात ते राम व मी लक्ष्मण आहे. आता ही पताका मी खांद्यावर घेऊन जगभर फडकवीन.’
यवतमाळ येथील वास्तव्यात शेवाळकरांनी जोपासलेल्या व्याख्यानमालेस खरे म्हणजे नांदेड मुक्कामी खतपाणी मिळाले. नादेडकरांनी त्या अंकुरास जणू वटवृक्षाचे रूप दिले. मराठवाडा विद्यापीठाने बहि:शाल व्याख्यानमालांचे आयोजन केले होते. शेवाळकरांची त्यासाठी व्याख्याते म्हणून निवड झाली. त्यानिमित्ताने त्यांना अनेक गावी पुन्हा पुन्हा जाण्याची संधी मिळाली.
या व्याख्यानमालांच्या मागे विद्यापीठाचा हेतू असा होता की, ग्रामीण भागातही लोकांना चांगले विचार ऐकायला मिळावेत, चांगल्या ज्ञानाची भर पडावी. विद्यापीठाचा तो विचार शेवाळकर आणि इतरांच्या व्याख्यानामुळे पूर्णत्वास गेला. त्यामुळेही शेवाळकरांच्या विद्वत्तेला धुमारे फुटले. शिवाय व्याख्यानानंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारावेत, अशी प्रथा होती. त्यामुळे व्याख्यात्याला संभाव्य प्रश्नांची तयारी करण्यासाठी त्या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागे. त्यामुळे ज्ञानाची खोली, क्षमता, आत्मविश्वास, हजरजवाबीपणा इत्यादी गुणांनी परिपूर्ण असलेल्या शेवाळकरांचे व्यक्तिमत्त्व अधिक झळाळून निघाले. त्या काळात नांदेडातील साहित्यिक चळवळीने असे उत्तुंग शिखर गाठले, की वक्ते म्हणून, पाहुणे वा मार्गदर्शक म्हणून रा.कृ.पाटील, डॉ. चिंतामणराव देशमुख, राज्यपाल श्री प्रकाश, न्यायमूर्ती गोपाळराव एकबोटे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, निर्मलाबेन देशपांडे, प्रा.मोहगावकर, वा.ल. कुलकर्णी, पु.भा.भावे, गो.नी. दांडेकर, जगन्नाथ जोशी, पन्नालाल सुराणा, प्रा.अनंत काणेकर, कवी कान्त, वसंत बापट, कवी यशवंत, पु.ल.देशपांडे यांच्यासारख्या अनेक महान व्यक्ती नांदेड मुक्कामी भेट देऊन गेल्या आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ नांदेडकरांना झाला.
पीपल्स कॉलेजचा विषय निघताच शेवाळकर विनयाने म्हणतात, ‘पीपल्सने मला सर्व काही भरभरून दिले. प्राध्यापक म्हणून प्रतिष्ठा दिली, वक्ता म्हणून नावलौकिक दिला. माझ्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास केला. शिरवाडकर, गाडगीळ, कुरुंदकर, डोळे यांच्यासारख्या विद्वानांच्या सहवासातून निर्माण झालेली वैचारिक बैठक जोपासण्यासाठी बळ मिळाले. स्वामीजींच्या संपर्कातून जे संस्कार झाले तीच माझी खरी शिदोरी आहे आणि या सर्व संचिताचा परिपाक म्हणून भविष्यात विनोबाजींच्या आचार्यकुलात प्रवेश मिळणे सोपे झाले…’ बोलता बोलता अचानक भावनाविवश होवून शेवाळकर म्हणतात, ‘मी फक्त एक नांदेड सोडले; पण त्यामुळेच अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या’.
शेवाळकरांच्या महान विद्वत्तेचे दर्शन नांदेडकरांनी पावलोपावली अनुभवले. ‘स्मृति तरंग’ हे कै.ग.ना. अंबेकरांचे आत्मकथनपर पुस्तक वाचण्याची अपूर्व संधी मिळाली. त्यांच्या जीवनातील हजारो अनुभवांपैकी एकूण ९६ अनुभव ज्यांस त्यांनी ‘लाट’ असे नाव दिले आहे, त्यांतील ‘लाट ७८’ यामध्ये त्यांनी नांदेड येथे झालेले ३१-१२-१९६४ ते ०३-०१-१९६५ या चार दिवसीय नाट्य परिषदेच्या अधिवेशनाचा वृत्तान्त अक्षरबद्ध केला आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी पु.ल.देशपांडे होते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कामांची विभागणी, समित्यांची निर्मिती झाली होती. इतर अनेक कार्यासोबत राम शेवाळकर यांच्याकडे नाट्य अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी आभार प्रदर्शन जबाबदारी होती. शेवाळकर यांनी त्यावेळी जे आभारप्रदर्शन केले ते उपस्थितांवर जबरदस्त छाप पाडून गेल्याचे अनेक रसिक आजही सांगतात.
ग.ना.अंबेकर या प्रसंगाचे वर्णन असे करतात, ‘अन्यत्र होणारी आभारप्रदर्शनाची भाषणे अत्यंत रटाळ होतात हे आम्हास माहिती आहे. या पार्श्वभूमीवर प्रा.शेवाळकरांनी केलेले पाऊण तासाचे आभारप्रदर्शन मनाला चटका लावून गेले.’ त्यापुढे कै.ग.ना.अंबेकर राम शेवाळकरांच्या आभाराच्या भाषणातील काही ओळी सांगतात, ‘शेवाळकर म्हणाले –
मित्र हो, नांदेडच्या या नाट्यसंमेलनाची स्मृती आपण आपल्या हृदयसंपुटात संपादून आपआपल्या घरी परत जाल. गोदातीरीच्या सोमवती यात्रेची गर्दी ओसरून जावी त्याप्रमाणे या सुखद यात्रेनंतर आपण ही गंधर्वनगरी सुनी करून जाल. आपणा रसिकांची मने श्रीमंत संपन्न होतील; पण आमचे काय ? गेले १५-२० दिवस इथे कसे चैतन्य हुंदडत होते, आता सर्वत्र शुकशुकाट होईल व त्यानंतर आमची रीती झालेली मने कशी उदासवाणी होतील, कल्पनाच करवत नाही.’
त्यानंतर सहा महिन्यांनी राम शेवाळकरांनी २७.७.६५ ला नांदेड सोडले. त्यावेळी कै. ग.ना. अंबेकर लिहितात, त्यांनी आपल्या आभारप्रदर्शनाच्या भाषणांतून जणू त्यांच्या रसिक चाहत्यांना निरोप समारंभानंतरच्या सुन्न व विषण्ण अशा उदासीन वातावरणनिर्मितीची पूर्वकल्पनाच देऊन ठेवली होती. त्यांनी नांदेड सोडले. वणी येथील प्राचार्यपद स्वीकारले. संमेलनोपरांत निर्माण झालेली मनःस्थिती शेवाळकरांच्या निरोप समारंभानंतर नांदेडकरांना अनुभवयाला मिळाली.
पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून साधारणत: आठ-नऊ वर्ष काम केल्यानंतर त्यांना वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी काम करण्याची संधी मिळाली. पीपल्स कॉलेज, नांदेड येथे असतानाच शेवाळकरांना वणी, देगलूर औरंगाबाद, कारंजा आणि पुसदहूनही प्राचार्यपदासाठी निमंत्रणे आली होती; परंतु शेवाळकरांनी आपली पसंती वणीच्या पारड्यात टाकली. यामागे शेवाळकर यांचा मनोदय असा होता, की १९१९ या वर्षापासून त्यांच्या वडिलांचा-भाऊसाहेब शेवाळकरांचा वणीशी कीर्तनामुळे दृढ परिचय झाला होता. त्यानंतर जवळपास चाळीस वर्षे भाऊसाहेब दरवर्षी वणीला जात होते. हा ऋणानुबंध पुढे चालू राहावा, अशीही राम शेवाळकर यांची इच्छा होती.
वणीच्या नियामक मंडळाला आपला होकार कळविल्यानंतर शेवाळकर यांच्यापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला की, पीपल्स कॉलेज सोडतोय ही बाब संचालक मंडळापुढे आणि प्रत्यक्ष स्वामीजींना सांगावी कशी ? तसेच स्वतः शेवाळकरही द्विधा मन:स्थितीत होते. एकीकडे प्राचार्यपद खुणावत होते. वेगळे काही तरी, मनातील शैक्षणिक कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याची संधी होती. दुसरीकडे गत आठ-नऊ वर्षे शेवाळकर नांदेडमध्ये रमले होते. शिवाय त्यांच्या एकूण कार्याचा उत्कर्ष नांदेडनेच केला होता. नांदेड सोडावे लागणार, हा विचार त्यांना स्वप्नातही आला नव्हता. भरपूर विचारांती मनाचा कौल वणीकडे पडला. दुसरा प्रश्न त्यांचे परमस्नेही नरहर कुरुंदकरांनी सोडविला. त्यांनी शेवाळकरांचा तो निर्णय संस्थेचे चिटणीस भगवानराव गांजवे यांच्या कानावर घातला. प्रथम गांजवे यांनाही वाईट वाटले; परंतु शेवाळकर यांच्या भविष्यातील उत्कर्षाचा विचार करून त्यांनी जड अंत:करणाने शेवाळकरांना परवानगी दिली. शेवाळकर नांदेड सोडणार, या बातमीने खुद्द स्वामीजींसह सारेच व्यथित झाले.
नंतर पंधरा-वीस दिवस ठिकठिकाणी निरोप समारंभ झाले. नांदेडकर नागरिकांतर्फे कलामंदिरमध्ये शेवाळकरांना निरोप देण्यात आला. नांदेडचे जिल्हा न्यायाधीश गोविंदराव भोज हे अध्यक्षस्थानी होते. प्रा. के. रं. शिरवाडकर, डॉ.स.रा.गाडगीळ, प्रा.कुरूंदकर यांची निरोपाची भाषणे झाली. सकाळी सहाच्या बसने शेवाळकर कुटुंबीय वणीला निघाले. प्रभाकर कानडखेडकर यांच्या प्रचंड श्रमातून सगळे सामान अगोदरच ट्रकने मार्गस्थ झाले होते. रात्री उशिरा झोपलेले शेवाळकर कुटुंब सकाळी चार- साडेचारलाच उठले. सर्वांचा निरोप घेऊन शेवाळकर साडेपाचलाच बसस्थानकावर पोहचले. तेथे सहकारी, मित्रपरिवार निरोपासाठी उपस्थित होता.
सौ. विजयाताई व आशुतोष बसमध्ये बसले. वाहक घंट वाजवत होता. शेवाळकरांना चाहते सोडत नव्हते. अखेरीस गर्दीतून वाट काढत शेवाळकर बसकडे निघाले. काही पावले जातात न जातात तोच कुरूंदकर हात पसरून उभे राहिले. त्यांच्या जवळ जाताच शेवाळकर त्यांच्या पायाशी वाकले. नरहरांनी रामांना अर्ध्यातून उठवून छातीशी कवटाळले. मोठ्या महत्प्रयासाने नरहरांनी रामाला विलग केले. त्यांचा हात धरून कुरुंदकरांनी शेवाळकरांना बसमध्ये चढवले. जणू ‘अयोध्येच्या रामाचा वनवास प्रस्थान प्रसंग’ नांदेडच्या बसस्थानकावर पुन्हा जिवंत होत होता. सर्वांचे डोळे पाणावले होते, अनेकांना हुंदका आवरणे कठीण जात होते. बस निघाली, नांदेड- हदगाव हा दोन तासांचा प्रवास राम शेवाळकर यांचे नयन अश्रू प्रसवीत होते. हदगावला बस पोहचल्यानंतर तीन वर्षांचा आशुतोष म्हणाला,
“बाबा, रडू नका ना…”
ते ऐकून राम शेवाळकरांना हुंदका आवरणे कठीण गेले…
नागेश सू. शेवाळकर, पुणे
संपर्क ९४२३१३९०७१.
व्व्व्वा! सरजी तुमच्या या लेखामुळे शेवाळकरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख नव्याने झाली! खूपच छान लिहलंय !