सुप्रसिद्ध लेखक सुनील पांडे यांचे ‘तीरे तीरे नीरा…’ हे नीरामाईच्या परिक्रमेवर आधारित वाचनीय पुस्तक ‘चपराक’कडून प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील त्यांची 29 दिवसाची परिक्रमा वाचकाला एका वेगळ्याच विश्वाची तर सफर घडवतेच पण नद्या या आपल्या जीवनवाहिन्या कशा आहेत हेही शिकवते. या पुस्तकातील हे एक खास प्रकरण…
नीरेच्या उपनद्या
नीरामाईचा उगम भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाट मार्गावरील शिरगाव या ठिकाणी एका डोंगरात 1170 मिटर उंचीवर झाला आहे. नीरा नरसिंहपूर या ठिकाणी ती भीमेला मिळते. उगमापासून संगमापर्यंत तिला मिळणार्या उपनद्या पुढीलप्रमाणे –
1 कर्हा
2 वेळवंडी
3 गुंजवणी
4 पूर्णगंगा
5 बाणगंगा
नीरा नदीवरील धरणे
1 नीरा देवघर
2 वीर धरण
नीरा नदीची उपनदी वेळवंडीवर ‘भाटघर’ धरण असून नीरा परिक्रमेत वाटेवर भोजजवळ हे धरण लागते.
नीरामाईची विविध रूपे
नीरामाईची परिक्रमा करताना उगमापासून ते संगमापर्यंत नीरामाईच्या विविध रूपांचे दर्शन घडले. परिक्रमेत नीरामाईने फार लाड केले. काळजी घेतली पण अतिलाडाने बिघडू नये म्हणून कठोर होऊन परीक्षाही घेतली.
नीरामाई कधी शांत वाहते तर कधी रौद्र रूप घेते. गावोगावी बंधारे बांधल्याने, तिचा प्रवाह अडवल्याने ती बंदिस्त झाली आहे. बहुतेक ठिकाणी नीरामाई स्वच्छ, टापटिप दिसते तर काही ठिकाणी मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे, कारखानदारीमुळे ती दुषित झाली आहे. भर उन्हाळ्यातही काही ठिकाणी नीरामाईला भरपूर पाणी पहायला मिळाले तर काही भागात सोनगावपासून ते नीरा नरसिंहपर्यंत उन्हाळ्यात नीरामाई ठणठणीत कोरडी दिसली. तिच्याकडे पाहवत नाही. काही ठिकाणी शेवाळ इतके होते की वाटले नीरामाईने हिरवा शालू घातला आहे. काही ठिकाणी पाणी इतके नितळ, स्वच्छ पाहिल्यावर नि दुपारचे उन तिच्यावर पडल्यावर नीरामाईने चंदेरी साडी घातली आहे असे वाटते. रात्रीच्या वेळी ध्यानाला बसल्यासारखी शांत भासते. ऋतु बदलला की तिची रूपे बदलताना दिसतात.
नीरामाईकडून काय शिकावे?
आई नीरा, तू फक्त नदी नाहीस, आई आहेस. जन्मदाती आई काही काळ स्वतःचे दूध पाजून बाळाला वाढवते पण आई, तू तर आम्हाला आयुष्यभर तुझे दूध पाजतेस. या दुधाला आम्हाला जागता येऊ दे. तू शांत वाहतेस. तुझी ही शांत वृत्ती आमच्यात येऊ दे.
तू प्रवाही आहेस. वाटेतील दगड, धोंडे, कपारींना टक्कर देत आपला मार्ग स्वतः शोधून काढतेस. परिस्थितीशी दोन हात करायला तुझ्याकडून आम्हाला शिकता येऊ दे. तू जशी लोकवस्तीतून वाहतेस तशी अति दुर्गम भागातूनही वाहतेस. वाटेतील डोंगर, दर्या, निसर्गाशी, तुझ्या काठांवरील वेली, फुलांशी, वृक्षांशी तू संवाद साधतेस. निसर्गाशी अशी तुझ्यासारखी छान मैत्री आम्हाला करता येऊ दे.
नीरामाई, तुझ्या जलात अनेक पक्षी विहार करतात. अनेक परदेशी पक्ष्यांचेही तू छान स्वागत करतेस. त्यांचा पाहुणचार करतेस. तुझ्यासारखी ही ‘अतिथी देवा भव’ ही वृत्ती आमची होऊ दे. तुझ्या जलात अनेक मासे, जलचर प्राणी राहतात. माणसांप्रमाणे आई तू त्यांनाही प्रेम देतेस. त्यांना जगवतेस. अशी मुक्या प्राण्यांशी मैत्री आम्हाला करता येऊ दे. नीरामाई, सरळ वाहणे तुला माहीतच नाही. किती वळणे घेतेस तू? इकडून तिकडे धावत असतेस. तुझी ही ‘बालस्वरूप’ वृत्ती आमच्यात येऊ दे.
उगमापासून ते संगमापर्यंत तू सर्वांना भरभरून देतेस. प्रत्येक गावाचे नंदनवन करतेस. तीही कोणतीही अपेक्षा न ठेवता. आई, ही परोपकाराची, देण्याची वृत्ती आमच्यात येऊ दे. तुला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यांची तू मोठी बहीण होतेस. त्यांना प्रेमाने जवळ करतेस. समाजातील अशा गोरगरिबांना, अनाथांना, लहानांना माणुसकीने आम्हाला प्रेमाने जवळ करता येऊ दे.
नीरा नरसिंहपूरला तू भीमेला मिळतेस. तिला आपले सर्वस्व देऊन टाकतेस. कमीपणाची भावना तुला वाटत नाही. तुझी ही नम्रता, लीनता आमच्यात येऊ दे. फार वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नदीवरील धरणांचा व जलप्रकल्पांचा ‘आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे’ म्हणून गौरव केला आहे. त्या दृष्टीने, लोकहीताच्या दृष्टीने तुझ्यावर ‘नीरा देवघर’ आणि ‘वीर धरण’ बांधले गेले. सामाजिक कार्यासाठी ही सर्वस्व देण्याची वृत्ती आमच्यात येऊ दे.
आई नीरामाई, तू जशी बाहेर आहेस तशी आमच्या हृदयात, शरीरातही प्रगट हो. म्हणजे दुसर्यांना देण्याची परोपकारी वृत्ती आमच्यात येईल. आई, एवढेच तुला मागणे आहे.
प्रदुषण घालवा… नीरा वाचवा!
पुराणांमध्ये नद्यांना देवीचे रूप मानले आहे. त्यांना आई संबोधले जाते. जशा नर्मदा मैय्या, गंगा मैय्या. हा पूज्यभाव आपल्याकडे फार कमी दिसतो. केवळ इंद्रायणी, चंद्रभागेपुरता हा पूज्यभाव नको. सर्वांविषयी ती श्रद्धा हवी. तिच्याविषयी आपले पण काही कर्तव्य आहे. ते समजून घेतले पाहिजे.
नद्या माणसाला काहीच मागत नाहीत. त्या मुक्त हस्ताने देत असतात पण माणसाची भूक न संपणारी आहे. वाढती वृक्षतोड, जंगलतोड, वाळूचोरी, कारखानदारी, निसर्ग नियमाविरूद्ध वर्तन यामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. नद्या दुषित होत आहेत.
पाण्याची किंमत आपण करूच शकत नाही. माणसाइतकीच ती प्राणीमात्रांचाही गरज आहे. माणसालाच नव्हे तर प्राण्यांनाही पाण्याची किंमत मोजावी लागते. जंगलामध्ये पाणी पिण्यासाठी येणार्या प्राण्याला कुणाची ना कुणाची शिकार व्हावीच लागते. जिथे भरपूर पाणी असते तिथे पाणी हवे तसे वाया घालवले जाते. जिथे पाणी नसते तिथे चार चार कोसावरून पाणी कावडीने आणावे लागते. त्यांना पाण्याची किंमत कळते. पाणी हे उधळण्यासाठी नसते. लग्नात ‘पाण्यासारखा पैसा उधळला’ यावरून पाणी हे हवे तसे ‘उधळण्यासाठी’ असते का? असा प्रश्न पडतो.
नद्यांनी आमचे जीवन समृद्ध केले पण आम्ही मात्र नद्यांची पुरती वाट लावली. आता गंगा नदीही पूर्वीसारखी राहिली नाही. ती आता गटारगंगा झाली आहे. इथून तिथून सर्वच नद्यांबाबत हेच भीषण चित्र आहे.
परिक्रमेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पाहिले की सर्रास ठिकाणी वाळू चोरी चालू आहे. बहुतेक ठिकाणी नद्यांकाठी धार्मिक विधी, दशक्रिया विधी चाललेले असतात. हार, फुले, अष्टगंध, नारळ, बांबू, अस्थी, देवांचे फोटो वगैरे नद्यांत टाकून एकप्रकारे नद्यांचाच दहावा-तेरावा आपण घालत आहोत. हे आता कुठेतरी थांबायला हवे.
बहुतेक ठिकाणी नदीला पाणी आहे ते केवळ शेतीसाठी वापरले जाते. पिण्यासाठी पाणी दुषित असल्याने वापरले जात नाही. नद्या स्वच्छता ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. आपण सर्वांनीच याबाबत जागृत झाले पाहिजे. नद्या स्वच्छ करता आल्या नाही तर किमान दुषित करता कामा नये.
खरेतर ‘नीरा’ या शब्दाचा अर्थ आहे, स्वच्छ, निर्मळ, शुद्ध. आम्ही माणसाने आपल्या स्वार्थासाठी नीरामाईचे हे रूपच बदलून टाकले आहे. म्हणून सर्वांना एकच सांगणे आहे, प्रदूषण घालवा, नीरा वाचवा.
नद्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल
1 नद्या आपल्या माता आहेत हे लक्षात ठेवावे.
2 नदीत पैसे टाकू नयेत. पैशांचा तिला काय उपयोग? हा पैसा गरिबांना द्या.
3 नदीत निर्माल्य टाकू नये. घरातील शिळे हार, फुले नदीत टाकून आपण तिचा अपमानच करतो. नद्यांबाबत आपल्या मनात खरेच श्रद्धेची भावना असती तर आपण तिला कधी चांगला हार, फुले तिच्या काठावर नेऊन ठेवून तिची पूजा का करत नाही? हे जमत नसेन तर कृपया नदीत निर्माल्य टाकू नये.
‘न पाहिलेल्या देवाच्या फोटोला
इथे हार घातले जातात
रोज दिसणार्या नदीला मात्र
मूर्ख माणसे निर्माल्य टाकतात.’
4 प्रत्येकाला शेवटी नदीवरच जावे लागते. मग जिवंतपणी थोडा वेळ काढून तिच्याकडे आपण का जात नाही? पावसाळ्यात नदीला पूर आला, पाणी आले म्हणून ते पहायला लोक नद्यांच्या काठावर गर्दी करतात पण उन्हाळ्यात नद्या कोरड्याच असतात. त्यावेळस तिच्याकडे जावे असे आपल्याला वाटत नाही.
5 मृत व्यक्तींच्या अस्थी नदीत टाकल्या जातात. जिवंतपणी त्या नद्यांशी आपल्याला एकरूप होता आले नाही. मृत्युनंतर तिच्याशी एकरूप होता येईल का?
‘जिवंतपणी जिच्यासाठी वेळ नसतो
मेल्यावर माणुस नदीवरच जातो
जिवंतपण एकरूप होता आले नाही
मेल्यावर तिच्याच अस्थी टाकण्यात
खरेच काही अर्थ नाही.’
6 मरताना माणूस पाणीच मागतो. पैसा, धन, दौलत मागत नाही. त्यामुळे पाणी जपून वापरले पाहिजे. आपण वाया घालवत असलेले पाणी कोणाची तरी तहान भागवू शकते.
‘भक्तीशिवाय देव
भेटत नाही
मेल्याशिवाय स्वर्ग
दिसत नाही
जी भक्तीशिवाय भेटते
त्या नदीचे महत्त्व
आम्हाला कळत नाही
जिवंतपणीही…
तिच्या काठावरचे स्वर्गसुख
आपल्याला शेवटपर्यंत घेता येत नाही.’
7 नदीत दगड मारून मुले नेमबाजी करत असतात. असे दगड मारणे म्हणजे आईला दगड मारल्यासारखे आहे. नदीत थुंकणे, तिच्या काठी कोणता विधी टाळावे.
8 वाळू उपसा बंद झाला पाहिजे.
‘नदीमाय नदीमाय
तू अशी कशी?
बोलत कधी न्हाय
मागत कधी न्हाय
कधी रागवत न्हाय
कधी रूसत न्हाय
देते सर्वांना भरभरून…
माणसाचा तुला
उपयोग काय असून-नसून?
देणं तुझा स्वभाव
पण माणसांची…
संपत न्हाय कधी हाव!’
9 नदीत कचरा टाकू नये. सांडपाणी सोडू नये. ती आम्हाला किती चांगल्या चांगल्या गोष्टी देते. आम्ही मात्र नद्या घाण करतो.
‘नदीमाय नदीमाय
पोटात तुमच्या काय काय?
शंख, शिंपले, वाळू नि
मासे छोटे मोठे नि खेकडे
नदीमाय नदीमाय
तुमचे महत्त्व सांगू काय?
तुम्ही भागवता सर्वांची तहान
जगात तुमच्याविना ना कोणी महान
नदीमाय नदीमाय
माणुस करतो तुला किती घाण?
कचरा टाकतो… करतो प्रदूषण
माणसासारखा अडाणी दुसरा जगात न्हाय!’
10 नर्मदामैय्या, गंगामैय्या श्रेष्ठच आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गावातून वाहणार्या छोट्या नद्याही आमच्यासाठी श्रेष्ठ आहेत. कारण त्याच आमची तहान भागवतात. आम्हाला जगवतात.
‘माणसा माणसात
आम्ही नेहमीच करतो तुलना
हा छोटा-तो मोठा
हा ज्ञानी-तो अज्ञानी
हा व्यसनी-तो निर्व्यसनी
हा माणुस-तो देवमाणुस
आता होते…
नद्यानद्यांतही तुलना
गंगा श्रेष्ठ-नर्मदा सर्वश्रेष्ठ
नको हा भेदभाव
सर्व नद्यांविषयी ठेवू
आपण सारखाच पूज्यभाव.’
11 पाणी जपून वापरले पाहिजे. आपण वाया घालवत असलेले पाणी कोणाची तरी तहान भागवू शकते.
‘तहान लागली की…
माणुस विहिर खोदतो
असताना पाणी
माणुस भसाभसा वापरतो.
गावच्या नदीला
दरवर्षी यायचा हमखास पूर
पाणी मिळे भरपूर
आता मात्र…
हंडाभर पाण्यासाठी जावे लागते
चार-चार कोस दूर दूर
तुझ्या आठवणीने आता
डोळ्यांत येतो आसवांचा पूर.’
12 उत्तर भारतात नद्यांना आई म्हणून संबोधले जाते. जशा नर्मदामैय्या, गंगामैय्या… पण आम्ही महाराष्ट्रीयन मात्र नदी म्हणतो.
‘नदीला नदी म्हणे
तो एक वेडा
नदी नाही आई आहे
माणसा विचार कर थोडा.’
13 जगावे कसे हे आपण नद्यांकडून शिकायला हवे.
‘नदीमाय
तुम्ही स्वतःचा मार्ग
स्वतःच शोधता
वाटेतील दगड-धोंडे
तुम्हाला अडवू शकत नाही
संकटाशी दोन हात करत
पुढे पुढे जात राहता
तक्रार करणं कधी
तुमच्या स्वभावातच नाही
पण माणुस…
संकटात गडबडतो
देवाच्या मागे धावतो
नशिबावर भरोसा ठेवतो
संकट गेल्यावर…
देवाला मग विसरतो.’
14 आई जवळ असताना तिची किंमत कळत नाही.
‘जवळ असताना आई
तू कधी कळलीच नाहीस
दुष्काळ पडल्याशिवाय
पाण्याची किंमत कळत नाही.’
लेखन खूपच आत्मितयेने केले आहे. लेखकाचे तसेच वेगळ्या विषयावरील लेखनास प्रकाशात आणण्याच्या प्रकाशकांच्या प्रेरक धोरणासा सलाम!
मन:पूर्वक धन्यवाद सर.