प्राक्तन – प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा 

प्राक्तन - प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा 

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019

बहारो फुल बरसाओ,
मेरा महेबूब आया है…

हे गाणं मंडपात वाजायला लागलं आणि सार्‍यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडं वळल्या. अंगावर लाल रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाचं नऊवारी भरजरी वस्त्र ल्यालेली नववधू मोठ्या डौलदार चालिनं एक एक पाऊल टाकत मंडपात प्रवेशकर्ती झाली. तिच्या खांद्यावर आपले हात ठेवत तिचा भावी पती आश्वस्त होत संयमानं तिच्या चालीशी स्वतःची चाल जुळवत तिच्या मागून चालत होता.

त्यांच्या पुढं पाच-सहा चिमुरड्या हातात फुलांच्या परड्या घेवून आणि त्यातील फुलं दोघांवर उडवत पुढं चालत होत्या. नवरीसोबतच्या करवल्या आणि नवरदेवाचे भाऊ, मित्र असा गोतावळा दोघांच्या मागं. अशी ही वरात व्यासपीठाकडे गेली. ब्राह्मणानं दोघांना समोरासमोर उभं केलं. दोघांच्या मामांच्या हातात आंतरपाट दिला गेला.
शुभ मंगल सावधान… मंगलाष्टकांना सुरवात झाली आणि मंडपात नवरीच्या आईची शोधाशोध सुरु झाली. ती मंडपाच्या एका कोपर्‍यात गर्दीत उभी होती. नवरीची आत्या लगबगीनं तिच्या जवळ आली.
‘‘सुनिधीवहिनी, अगं तू इथं काय करतेय? चल तिकडं. मंगलाष्टकं सुरु झाली. तुळशीला पाणी तुलाच घालायचं ना! अगं तू नवरीची आई आहेस. हा मान तुझाच आहे. चल बाई तिकडं.’’
असं म्हणत तिनं हातातली पाण्यानं भरलेली तांब्याची छोटी कळशी तिच्या हातात दिली. तिला सहारा देत दोघं नवरदेव-नवरी उभे होते तिथं पोहचले. तिथं एका उंच स्टुलवर छोटंसं तुळशीवृंदावन ठेवलं होतं. त्यात हिरवीगार तुळस प्रसंगाचं मांगल्य वाढवत होती. सुनिधी तुळशीजवळ पोहचली. तिनंही लग्नानिमित्त नऊवारी साडी नेसली होती. साडीचा पदर डोक्यावर ओढत ती तुळशीला पाणी घालू लागली. तिची नणंद तिच्याकडं मोठ्या कौतुकानं पाहत होती. लाऊडस्पीकरवर मंगलाष्टकांचा आवाज सुरु होता. सुनिधीच्या मुखावर आयुष्यभराचं समाधान विलसत होतं. तिचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. हा दिवस आपल्या आयुष्यात येईल याची तिला खात्रीच वाटत नव्हती. आपल्या नशिबावर ती आज भलतीच खूश होती. त्या आनंदात, कळशी हातानं कलती करत तिनं एका हातानं दुसर्‍या हाताला बारीक चिमटी घेतली. शरीरात एक सणक उठली. तिला वेदना झाली आणि तिला खात्री पटली. हे स्वप्न नव्हे तर वास्तव होतं. या सुखद अनुभूतीतच ती भूतकाळात गेली. तिला तिच्या लग्नाची गोष्ट आठवली.
सुनिधी तिच्या आईवडिलांची मोठी लेक. शिक्षिका म्हणून नुकतीच नोकरीला लागलेली. तिला एक लहान भाऊ होता. आईवडिलांना नातेवाईक येता-जाता अनेक स्थळं सुचवायची. सुनिधीचं शिक्षण झालं. मास्तरीण म्हणून नोकरीही लागली. आता छानसा मुलगा शोधून तिचे हात पिवळे करायला हवेत असं म्हणायचे. अनेक मुलांकडून लग्नाचे प्रस्ताव यायचे पण सुनिधी हसून टाळायची.
‘‘आईबाबा, मी एवढी मोठी झाली का हो? का मी तुम्हाला जड झाले?’’
तिच्या या प्रश्‍नांनी आईबाबा गांगरुन जायचे. आई तिला समजावत म्हणायची, ‘‘सुनिधी, अगं लेक का कुणाला जड होते का बेटा? मात्र, वय झालं तर लेकीचं लग्न करावंच लागतं. कन्यादान करायला मिळणं याहून मोठं भाग्य नाही बरं! आणि हो, तुझं लग्न व्हावं, घरात लहान बाळकृष्ण यावा, त्याच्या बोबड्या बोलानं हे घर किलकिलावं असंच आता आम्हालाही वाटतं.’’
अशाप्रकारच्या संवादांनी घरात लग्नाची चर्चा सुरु झाली आणि तो दिवसही उगवला. सुनिधीला बघायला एक दिवस एक मुलगा त्याच्या आईवडील आणि बहिणीसह आला. मुलगाही शिक्षक होता. देखणा आणि रुबाबदार. सुहास सार्‍यांना पहिल्या भेटीतच आवडला.
सुनिधीनं आतल्या खोलीच्या खिडकीला लावलेला पडदा हातानं बाजूला करुन मुलाला पाहिलं. त्या प्रथम दर्शनानंच ती हुरळून गेली. तिनं स्वप्नात ज्या राजकुमाराची छबी तयार केली होती त्याहून तो काकणभर सुंदरच होता. तिला आपल्या नशिबाचा उगीच हेवा वाटला. तिनं मनोमन त्याला पसंत केलं. एक लहर तिच्या संपूर्ण शरीरातून वीजेसारखी तराळून गेली. त्या गडबडीत तिचा धक्का जवळच्या टिपॉयवर ठेवलेल्या पितळी डब्याला लागला. तो खाली पडला. त्या आवाजानं त्याचं लक्ष खिडकीकडं गेलं. दोघांची नजरानजर झाली. ती चपापली. तो उल्हासित झाला. त्या क्षणभराच्या नेत्रकटाक्षानं ती लाजून चूर झाली. तिच्या चेहर्‍यावर गुलाबी छटा पसरली. आपसूक तिची नजर खाली झुकली. हातातला पडदा गळून पडला. दोघात पुन्हा पडद्याची भिंत उभी राहिली. तिनं सुस्कारा सोडला. छातीवर हात ठेवत ती आपल्या श्वासांच्या गतीवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाली. तोच बाहेरुन आलेली चिमुरडी स्वाती तिला बिलगली. गाल फुगवत ती म्हणाली.
‘‘ताई, ताई… आम्ही बाहेर एक गंमत पाहिली… तुला नाही सांगणार आम्ही!’’
तिनं स्वातीला लाडात जवळ ओढून मिठीत घेतलं.
‘‘काय गंमत बघितली आमच्या छकुलीनं?’’
‘‘आम्ही नाही सांगणार… तू चॉकलेट दिलं तरी नाही सांगणार!’’
‘‘हो का? मग मी हे मोठं कॅडबरीचं चॉकलेट कुणालला देऊन टाकते आता.’’
‘‘हे गं काय तायडे? दे ना मला ते चॉकलेट. मी सांगते तुला गंमत.’’
सुनिधीनं आपल्या ओच्यातलं चॉकलेट स्वातीला दिलं. डोळे मिचकावत स्वाती म्हणाली, ‘‘बाहेर जे बसले आहेत नं, ते माझे जिजू होणार आहेत असं आज्जी म्हणाली आणि ताई, मला किनई ते खूपऽऽ खूपऽऽ आवडलेत बरं का!’’
सुनिधीला तिचं हे निखळ बोलणं खूप भावलं. ती अधिकच गोरीमोरी झाली. तिनं स्वातीचा गालगुच्चा घेतला. हातात पडलेलं चॉकलेट घेऊन ती माजघरात पळाली. तयारी म्हणून नेसलेली साडी सावरत ती बाहेरचा कानोसा घेऊ लागली.
बैठकीत दोन्हीकडची माणसं एकमेकांच्या ओळखी काढत गप्पा पुढं नेत होती. सुनिधीच्या मामांनी आतल्या खोलीत आवाज दिला.
‘‘बेटा, सुनिधी… पोहे झाले असतील तर आण बाहेर.’’
लाजत, मुरडत सुनिधी बाहेर आली. हातातला पोह्यांचा ट्रे टिपॉयवर ठेवत तिनं प्रत्येकाला प्लेट हातात दिल्या. नेहमीचंच काम मात्र साधी प्लेट देतानाही तिचे हाथ थरथरत होते. सार्‍यांनी बोलत बोलत पोहे, मिठाई संपवली. चहा झाला. जुजबी बोलणं झालं. हाच काय तो बघण्याचा कार्यक्रम.
जवळच्या नातेवाईकांकडून स्थळ आलेलं असल्यानं बाकी काही फारसं बघायची गरज नव्हती. दोघांनी एकमेकांना पसंत केलं. देण्याघेण्याच्या गोष्टी झाल्या. लग्न ठरलं. घरात जणू आनंदाची उधळण झाली. लवकरच लग्नाचा बार उडाला. आईवडिलांनी लाडक्या लेकीचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात लावून दिलं. त्यांनी मनातल्या सार्‍या इच्छा पूर्ण करुन घेतल्या. साश्रूपूर्ण नयनांनी लेकीला सासरी निरोप दिला.
सासरी जाणार्‍या मुलींना रडताना बघून सुनिधी त्यांची नेहमी टिंगल उडवायची. ‘असं कसं रडू येतं या मुलींना, नेमकं सासरी जाताना गाडीत बसल्यावर?’ असं ती हसत म्हणायची. ‘मला नाही बाई असं रडू येणार सासरी जाताना’ हे तिचं नित्याचंच पालूपद. मात्र आज सजवलेल्या गाडीत नवरदेवासह बसून खिडकीतून आईवडिलांना हात हलवत निरोप देताना तिच्या मनात कालवाकालव सुरु झाली होती. रडू आलं तरी रडायचं नाही असा दृढ निश्चय करुनही तिच्या पापण्या ओलावत होत्या आणि शेवटी तिचा अश्रूंचा बांध फुटलाच. कसं, कुठून तिच्या डोळ्यांना धारा लागल्या ते तिलाही कळलं नाही. आई… बाबा… असं पुसटसं बोलून ती स्वतःला सावरत होती. तिला निरोप देणारेही सद्गदित झाले होते. गाडी सुरु झाली. सारे नजरेसमोरुन दूर दूर होवू लागले. आता तिला जाणवलं आत काहीतरी तुटतंय. आपलं काही तरी हरवलंय असं. आपण पोरके होत आहोत ही जाणीव तिला आतून कोरु लागली. दुःख जड होऊ लागलं. अश्रू वाहू लागले. तशात सुहासनं तिच्या खांद्यावर ठेवलेल्या हातानं तिला थोपटायला सुरवात केली. तो तिला धीर देऊ लागला. तिलाही त्याचा आधार हवाहवासा वाटू लागला. ती सर्वस्व विसरुन अलगद त्याच्या कुशीत शिरली. हमसून हमसून रडताना ती म्हणाली…
‘‘सुहास, अशीच साथ आयुष्यभर दे. आता तुझ्याशिवाय कुणीच नाही हं माझं. देशील नं अशी साथ?’’
त्यानं तिला अधिकच जवळ ओढत तिच्या केसांमधून मायेनं हात फिरवला. त्यातील उब तिला जाणवत होती. तो स्पर्श तिला विश्वासाचा वाटत होता. आपली स्वप्नं, आपल्या आशा-अपेक्षा आता याच्याशीच जुळलेल्या आहेत या भावनेनं ती त्याला पूर्ण शरण गेली. जणू आपली जबाबदारी त्याच्याकडं सोपवून ती निर्धास्त होऊ पाहत होती. गाडी वेगात धावत होती. खिडकीतून येणारा गार वारा झोंबत होता. बघता बघता तिचे डोळे लागले.
‘‘सुनिधी, अगं उठं. घर आलं आपलं.’’
त्याच्या हळू आवाजाच्या बोलण्यानंही तिला जाग आली. तिनं स्वतःला सावरलं. ती गाडीतून खाली उतरली. सासरी तिचं खूप छान स्वागत झालं. आनंद, हसणं, गंमत उडवणं यात तिचे लग्नाचे दिवस कधी पुढं सरकले ते तिलाही कळलं नाही. ती खर्‍या अर्थानं सासरची झाली होती. सासरी रमली होती.
बघता बघता वर्ष उलटलं. दोन्हीकडची वडीलधारी ‘माणसं घरात बाळ आणा’ म्हणून सुहास-सुनिधीला लडिवाळ आग्रह करु लागले. ते दोघं सुशिक्षित, नोकरीवाले आहेत म्हणून प्लॅनिंग करत असावेत असं घरच्यांना वाटत होतं. एके दिवशी सासूनं जेवताना विषय छेडलाच…
‘‘पोरांनो, दोन वर्ष झाली. अजून घरात पाळणा हलला नाही. आम्ही किती दिवस दुसर्‍यांच्या बाळांना खेळवायचं? आता बास झालं तुमचा सशिक्षीतपणा. घरात बाळ आणा म्हणजे आणा! आम्ही आहोत धडधाकट त्याला सांभाळायला.’’
सुनिधी-सुहासनं चोरट्या नजरेनं एकमेकांकडं बघितलं. ती थोडी लाजलीच.
‘‘आत्याबाई, आमचं काही प्लॅनिंग वगैरे नाही हं. मात्र, बाळ होणं हे काय आपल्या हातात असतं का? होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा.’’
सारे शांत झाले. उदास शांततेतच जेवणं पार पडली. आवरसावर करुन ती दोघं आपल्या बेडरूममध्ये गेले. सुहासनं तिला लाडात जवळ ओढलं.
‘‘सुनिधी… खरंय गं… हे आपल्याही लक्षात यायला हवं होतं.’’
‘‘म्हणजे…?’’
‘‘अगं आपल्या लग्नाला दोन वर्षे झाली. आपण दोघं सुदृढ आहोत. त्यात आपलं प्लॅनिंग वगैरेही नाही. मग बाळ का येत नाही आपल्या घरात?’’
सुहासच्या या प्रश्नानं सुनिधीही बुचकळ्यात पडली.
‘‘खरंय सुहास तू म्हणतोय ते. हे चिंताजनक आहे. आपण डॉक्टरांकडे जायचं का?’’
दोघांचं यावर एकमत झालं. सकाळी उठल्यावर डॉक्टरांकडं जायचं असं ठरवून ते दोघं झोपी गेले.
सकाळी उठल्यावर दोघांनी आपल्या शाळांमध्ये रजेवर असल्याचे अर्ज आणि निरोप दिले. चहा, नाश्ता करुन घरच्यांची परवानगी घेऊन ते हॉस्पिटलला जायला बाहेर पडले. दिवसभर फिरण्याचा प्रोग्रॅम आणि दवाखान्यातल्या तपासण्या करुन ते घरी आले.
दिवसामागून दिवस जात होते. मात्र, त्यांना हवी ती आनंदाची बातमी मिळत नव्हती. अनेक तपासण्या, औषधोपचार, किरकोळ ऑपरेशनं करुन झाली पण ईलाज होत नव्हता. सुरवातीला गंमतीचा वाटणारा हा विषय आता गहन चिंतेचा झाला होता. अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांचे सल्ले घेऊन झाले. आज डॉ. कृष्णा त्यांना अंतिम रिपोर्ट देणार होते. त्यांच्या हॉस्पिटलच्या वेटींगरुममध्ये ते दोघं धास्तावून बसले होते. नर्सनं त्यांचं नाव घेत त्यांना आत जायला सांगितलं. डॉक्टरांच्या टेबलसमोर बसत त्यांनी उत्सुक नजरेनं डॉक्टरांकडं पाहिले. हातात विविध रिपोर्ट्सच्या फाईली बघत डॉक्टर बोलू लागले…
‘‘सुनिधी-सुहास… हे रिपोर्ट्स म्हणजे अंतिम नाहीत. अजूनही खूप उपचार उपलब्ध आहेत. देशात आणि विदेशातही. या रिपोर्टसला तुम्ही सिरीयस घेवू नका. मात्र हे खरे आहेत, हेही विसरु नका.’’
‘‘डॉक्टर, काही सिरीयस आहे का?’’ सुहासनं पुढं सरकत चिंतेनं विचारलं.
‘‘हो… सिरीयसच आहे. वरवर सर्व रिपोर्टस नॉर्मल असले तरी सुनिधी आई होऊ शकेल अशी कोणतीही शक्यता मला या रिपोर्टसमध्ये दिसत नाही. आपल्याकडच्या सर्व टेस्ट करुन झाल्या आहेत. मला भीती वाटते, सुनिधी भविष्यात कधीही आई होऊ शकणार नाही.’’
डॉक्टरांच्या या खुलाशानं दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्या धक्क्यात ते घरी पोहचले. हा रिपोर्ट ऐकून सासू-सासरे सून्न झाले. सार्‍यांच्याच स्वप्नांचा चुराळा झाला होता.
बघताबघता वर्षे सरली. सुनिधीला आता घरात चोरट्यासारखं वाटू लागलं. आपलं शिक्षण, नोकरी, सासर तिला खायला उठे. मैत्रीणी, शेजारी, नातेवाईक यांची दूषणं, टोमण्यांनी ती हैराण झाली. शेवटी जे व्हायचं तेच झालं. सासरच्यांनी तिला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला आणि एक दिवस घटस्फोट झालाही. वरवर सुंदर, देखणी, सुदृढ दिसणारी सुनिधी आई होऊ शकत नाही हे तिचं दुर्भाग्य बनलं. या दुर्भाग्यानं तिचं सर्वस्व हिरावून घेतलं. नवरा, सासर आणि जगण्याची उमेदही. तिचं वांझपण तिला आतून कुरतडू लागलं. ती माहेरी आली. तिच्या येण्यानं तिचं माहेरही करपून गेलं. होत्याचं नव्हतं झालं होतं. नियती इतकी निष्ठूर कशी होऊ शकते याचं कोडं तिला सुटत नव्हतं. मात्र, प्राक्तनाचे भोग भोगावेच लागतात ही समजूत तिच्या आईवडिलांनी तिला घातली.
आपल्याच नशिबी हे दुःख का यावं? या प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नव्हतं. मीच का? असं कित्येकदा ती स्वतःला विचारी. मनानं हळवी, संवेदनशील असलेली सुनिधी या अनपेक्षित आलेल्या आपत्तीनं पार कोलमडून गेली होती. तिच्या सार्‍या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. किती, किती स्वप्न पाहिली होती तिनं आपल्या सुखी संसाराची. नवर्‍यावर तिचा किती जीव? किती विश्वास? आपल्यासाठी तो सार्‍या जगाला लाथ मारु शकेल असं तिला वाटायचं परंतु वेळ आली, तेव्हा तोही तोंड फिरवून निघून गेला. त्याचेही पाय मातीचेच निघाले. आपल्याला मुलं होणार नाही हे ऐकलं, तेव्हा तिचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. डॉक्टरांनी दोष तिच्यातच आहे हे सांगितलं तेव्हा तर ती भोवळ येऊनच पडली होती. हे आयुष्यच संपवून टाकावं असा टोकाचा विचारही तिच्या मनात येऊन गेला होता. त्यावेळी तिला सावरताना तो म्हणाला होता…
‘‘सुनिधी, सावर स्वतःला. अगं मुल झालं नाही म्हणून का जग थांबून जातं की काय? आणि नाहीच झालं मुल तर आपण दत्तक घेऊ एखादं मुलं.’’
किती समंजस वाटत होता तिला तो तेव्हा. आपल्याला मुल होणार नाही या दुःखापेक्षा जास्त, त्याचं धीर देणं तिला आवडलं होतं परंतु आईवडिलांचे, नातेवाईकांचे गैरसमज दूर करायला तो कमी पडला. त्यानं मानून घेतलेला पराभव तिच्या मनावर खोल जखम करुन गेला. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. मात्र बेफिकीर होत तिनं ते अश्रू बोटावर घेत त्यांना तुच्छतेनं उडवून लावलं. आता तिला रडून चालणार नव्हतं. तिनं मनाशीच ठरवलं, आता रडायचं नाही, आता लढायचं. आलेल्या आपत्तीशी, संकटाशी आणि दुःखाशी सुद्धा. तिनं स्वतःला सावरलं. आता ती सिद्ध झाली होती आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्यायला.
दिवस येत होते तसंच भुर्रकन निघून जात होते. घटस्फोट झाला. त्याचं कारण ऐकून तिचं अवघं आयुष्य आता एकटंच, एकाकी जाणार, असं येणारा जाणारा प्रत्येकजण तिला सांगून जात होता. आता उर्वरीत आयुष्य एकट्यानंच काढायचं असं तिही स्वतःला समजवू लागली. लग्न, नवरा, सासर, लेकरं यासह आपलं दुःख विसरुन ती आईवडिलांना आनंद देण्याचा प्रयत्न करु लागली. एकमेकांचं जगणं सुकर करु लागली.
आणि… एक दिवस वठलेल्या खोडावर पालवी फुटावी तशी घरात एक आनंदाची वार्ता आली. सुनिधीला बघायला पाहुणे येणार होते. कुणाला सांगूनही ही वार्ता खरी वाटली नसती परंतु हे प्रत्यक्षात घडत होतं. सुनिधी या सार्‍याला तयार नव्हती. जे दुःख पुढ्यात मांडून ठेवलं आहे त्याला पुन्हा सामोरं जाण्यात कुठला शहाणपणा आहे? ती विचारायची. मात्र, आईवडिलांनी सुनिधीला मिनतवार्‍या करुन घरी थांबायला तयार केलं होतं. त्यांचं मन राखावं म्हणून ती घरी थांबली. ठरल्यावेळी पाहुणे आले. मुलगा, त्याची आई, वडील आणि बहीण. नेहमी होतो तसा बघण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलगा बिजवर होता. त्याची पहिली पत्नी हार्टऍटॅकनं अचानक वारली होती. एवढी माहिती कर्णोपकर्णी सुनिधीला कळली होती. मात्र, आपल्याला मूलबाळ होऊ शकत नाही हे यांना कळलं तर हे थांबतील का आपल्या घरी? या शंकेनं ती आतून पुन्हा एकदा थरथरली होती. बघू पुढचं पुढे म्हणत, ती आल्या प्रसंगाला सामोरी गेली. पोहे, चहा, बघणं झालं. ‘आताच बोलणी करुन घ्या’ म्हणत बोलणीही सुरु झाली.
‘‘आम्हाला पसंत आहे मुलगी. तुमचा निर्णय सांगा?’’
‘‘आम्हालाही पसंत आहे स्थळ. आता पुढचं बोलू या.’’
दोन्हीकडच्या लोकांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. सर्वांना मांगल्याची चाहूल लागली. काहीही करुन हे लग्न आता जुळायलाच हवं अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती. तोच नवरा मुलगा प्रकाश बोलला…
‘‘हे बघा, मला पसंतच आहे मुलगी. लग्नालाही मी तयार आहे. मात्र माझी एक अट आहे.’’
‘‘अट… ?’’
प्रत्येकाच्या मुखातून एक शंका एकमुखानं बाहेर पडली.
‘‘हो, एक अट आहे माझी. देणं, घेणं, हुंडा वगैरे काही नको. परमेश्वर कृपेनं सर्व आहे माझ्याकडे. घरात एक गोड छोकरीही आहे. अर्चना! अर्थात, माझी मुलगी. खूप गोड आहे ती. खरं तर तिची आई गेल्यावर मी पुन्हा लग्न न करण्याची शपथ घेतली होती परंतु तिला आई मिळावी ही सार्‍यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तयार झालो.’’
त्याच्या या खुलाशानं सुनिधीला घरात एक लहान मुलगी असल्याचं कळालं. तरीही तिनं मनोमन होकार द्यायचा निर्णय घेतला परंतु त्याच्या अटीचं काय? ती पुन्हा साशंक झाली.
‘‘अट तरी काय आहे तुमची?’’ बाबांनी चर्चा पुढं वाढवली.
‘‘अट एकच आहे. लग्न झालं तरी मला पुढे मुलं होऊ द्यायचं नाही. तसं मी वचन दिलंय माझ्या पत्नीला. माझ्या मुलीसाठी.’’
‘‘हो चालेल आम्हाला.’’ सुनिधीची आई म्हणाली.
‘‘चालेल नाही, तुमच्या मुलीचाही होकार हवा याला. वचनच हवं तसं. नाहीतर लग्नानंतर ‘स्वतःचं मुल हवं’ अशी अपेक्षा ती करेल. तिला मुलबाळ झालं तर अर्चनाकडे तिचं दुर्लक्ष होईल. तिला सापत्न वागणूक मिळेल आणि मला तेच नको आहे’’ त्यानं खुलासा केला.
सुनिधीच्या मनात एकाच वेळी आनंद-दुःख अशा संमिश्र भावना फेर धरुन नाचू लागल्या. नियती आपल्यावर अशी खूश होईल याची तिला पुसटशीही अपेक्षा नव्हती. मोठ्या उमेदीनं ती ताडकण उठली. तरा तरा आत जाऊन तिनं हातात जाडजूड फाईल आणलं. ते प्रकाशच्या हातात देत ती म्हणाली…
‘‘हे घ्या माझं वचन. फक्त शब्दांनी नाही तर सर्टीफाईड. एमडी, एमएस डॉक्टरांचं.’’
फाईलमधील रिपोर्ट्स वाचून प्रकाशच्या डोळ्यात वेगळं तेज चमकलं. त्याच्या चेहर्‍यावर आनंद पसरला.
‘‘ठरलं हे लग्न. तुमचा होकार असेल तर मला मोठा गाजावाजाही नको. रजिस्टर लग्न करु या. लवकर. तुला काय वाटतं सुनिधी?’’
सुनिधी कित्येक वर्षात पहिल्यांदा चक्क लाजली. घर पुन्हा एकदा आनंदात न्हाऊन निघालं. सुनिधी-प्रकाशचं लग्न झालं. घरात एक गोड छोकरी होतीच. तिच्या सानिध्यात तिघांचं आयुष्य बहरुन निघालं.
सुनिधी एकांतात असे तेव्हा ती विचारात गुरफटून जाई. डॉक्टरांचे रिपोर्ट हातात पडले तेव्हा ती स्वतःला जगातली सर्वात दुःखी, कमनशिबी समजत होती. मुल होणार नाही ही गोष्ट तिच्या घटस्फोटाचं कारण झाली होती आणि त्याच रिपोर्टमुळे तिचं घर पुन्हा एकदा वसलं होतं. रीपोर्ट तोच! मात्र आता वेळ बदलली होती. निकष बदलले होते. प्राक्तनाचा हा निर्णय तिनं आनंदानं स्वीकारला होता. या नव्या बदलानं तिच्या जगण्याच्या कक्षा विस्तारल्या गेल्या. तिनं नशिबावर मात करायचं ठरवलं. नियतीनं हिरावून घेतलेलं मातृत्व तिला तिच्या प्राक्तनानं पुन्हा बहाल केलं होतं. ते तिला अर्चनावर उधळून लावायचं होतं. अर्चना तिच्या जगण्याचा श्वास झाली. तिचा जीव अर्चनात गुंतू लागला. पोटच्या पोरीसारखं तिनं अर्चनाला वाढवलं. अर्चनाला जितका जीव सुनिधी लावत होती तितकी ती प्रकाशच्या विश्वासाला पात्र ठरत होती. त्यालाही हेच तर हवं होतं नं! लहान अर्चना शिक्षणाच्या एकएक पायर्‍या चढत यशाच्या शिखरावर पोहचली आणि बघता बघता लेक लग्नाची झाली. त्या अर्चनाचंच हे लग्न होतं. कुणाला सांगून खरंही वाटलं नसतं की, अर्चना ही सुनिधीची सावत्र मुलगी आहे.
वाजंत्री सावधान, वर्‍हाडी सावधान. शुभमंगल सावधान! बँडनं ठेका धरला. त्या आवाजात नवरदेव नवरीनं एकमेकांना हार घातले. सर्व उपस्थितांनी वर-वधूवर अक्षता उधळल्या. सुनिधीच्या कळशीतलं पाणीही तुळशीला वाहून झालं. तिचा हात एकदम खाली झुकला. वृंदावनातल्या अगरबत्तीचा तिच्या हाताला चटका बसला आणि ती भानावर आली. तिच्या डोळ्यातून आसवांचा पूर वाहत होता. बघणार्‍यांना वाटलं, लेक सासरी जाणार म्हणून ती व्याकूळ झाली आहे. तिला मात्र आपलं आयुष्य पुन्हा रितं झालं याचं दुःख होतं.
‘‘वहिनी, आवर हे रडणं. सावर स्वतःला. लेकीला हसून निरोप द्यायचा असतो.’’
तिच्या नणंदेनं स्वतःच्या पदरानं तिचे डोळे पुसले आणि सुनिधीला कवेत घेऊन ती मायेनं थोपटू लागली. मंडपात कन्यादानाची लगबग सुरु झाली होती.
– प्रा.बी.एन. चौधरी
धरणगाव
9423492593
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा