जाज्ज्वल्य देशभक्तीचे पाईक मोहन रानडे

जाज्ज्वल्य देशभक्तीचे पाईक मोहन रानडे

चपराक दिवाळी अंक 2019

आपल्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक रणसंग्राम झाले. निरनिराळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या. सत्याग्रह झाले. अनेक लढवय्ये क्रांतिकारक हसत-हसत फासावर गेले; तसेच अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिवीर, स्वातंत्र्यसैनिवकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक महापुरूषांनी कठोर कारावास भोगला. हालअपेष्टा सहन केल्या.

इंग्रजांची जुलूमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वसामान्य लोकानीही लाखांच्या संख्येने स्वातंत्र्यचळवळीत हिरीरीने भाग घेतला. प्रसंगी ब्रिटिश राजवटींच्या गोर्‍या सैनिकांच्या लाठ्यांचा सामना केला. आपल्या छातीवर निडरपणे गोळ्या झेलल्या.
अनेक महापुरूषांच्या, क्रांतिवीरांच्या, स्वातंत्र्यप्रेमी देशवासीयांच्या कठोर परिश्रमानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजी राजवटीतून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र आनंद साजरा करण्यात येऊ लागला. मात्र आपल्याच देशातील काही संस्थाने अद्यापही स्थानिक संस्थानिकांच्या ताब्यात होती! तसेच संपूर्ण गोवा प्रांत पोर्तुगिजांच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे तेथील रहिवाशांना स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद उपभोगता आला नाही. उलट पोर्तुगिजांच्या जाचक यंत्रणेने सामान्य नागरिक मेटाकुटीला आले होते. जेव्हा सार्‍या देशात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंदोत्सव साजरा केला जात होता त्यावेळेस गोव्यातील जनता मात्र अतोनात हाल-अपेष्टांचा सामना करत होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने आपलीही लवकरच पोर्तुगिजांच्या जाचातून सुटका व्हावी ही तीव्र भावना त्यावेळी गोव्यातील सर्वसामान्यांची होती. त्यासाठी अनेक धाडसी युवकांनी गोवा मुक्ती संग्रामात उडी घेतली. यात अग्रभागी होते क्रांतिकारक मोहन रानडे! त्यांच्यासोबतच प्रामुख्याने बाळकृष्ण भोसले, शंभू पालकर, सीताराम कुबल, विठ्ठल व्यंकटेश नागवेकर, सोयरू दिवकर, गोपाळराव कोरगांवकर, आत्माराम नाईक, प्रभाकर सिनारी, मनोहर पेडणेकर, बाळा मापारी, यशवंत आगरवाडेकर इत्यादी क्रांतिवीरांचा समावेश होता.
मोहन रानडे यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली येथे दि. 25 डिसेंबर 1930 रोजी झाला. 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी ते विद्यार्थी होते. 1942 च्या 9 ऑगस्ट रोजी सांगलीत निघालेल्या विशाल मोर्चाचे रूपांतर एका भव्य सभेत झाले. तेथे होणारा स्वातंत्र्याचा गगनभेदी जयजयकार मोहन रानडे यांनी पहिल्यांदाच ऐकला. त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले! त्यानंतर सभा सुरू असतानाच ब्रिटिश शिपायांनी तेथे येऊन अत्यंत निर्दयतेने लाठीचार्ज सुरू केला. नंतर गोळीबारही केला. एकच गोंधळ उडाला आणि लोक सैरावैरा पळू लागले. पत्रावळे नावाचा एक युवक पोलिसांच्या गोळीने धारातिर्थी पडल्याचे रानडे यांनी आपल्या डोळ्याने बघितले. त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला; मात्र आपण काही करू शकत नाही याचे त्यांना वाईटही वाटले. ही घटना त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवण्यास कारणीभूत ठरली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा प्रभावही त्यांच्यावर होता.
सन 1943 साली थोर क्रांतिकारी देशभक्त बाबाराव सावरकर सांगली येथे रूग्णशय्येवर पडून होते. अंदमान कारागृहातील दीर्घ कारावास आणि कष्टप्रद जीवन त्यांनी भोगले होते. सांगलीला असल्यामुळे मोहन रानडे आणि त्यांच्या मित्रांनाही बाबारावांचा सहवास लाभला. ते तुरूंगात भोगलेल्या हाल-अपेष्टांची ‘आपबिती’ जेव्हा मुलांना सांगायचे तेव्हा त्यांचे हात-पाय असहनीय वेदनांनी थरथरायचे. बाबारावांच्या कापर्‍या आवाजात ऐकलेल्या अनुभवांनी आणि सहवासाने मोहन रानडे यांच्या अंतःकरणात देशप्रमाची ज्योत आणखी प्रकर्षाने प्रज्वलीत झाली. 1945 साली बाबाराव या चैतन्यमय जगाचा निरोप घेऊन अनंतात विलीन झाले! त्यानंतर 1947 मध्ये ब्रिटिशांच्या जुलमी साम्राज्यवादाने देशाचे दोन तुकडे करून धर्मांधतेला जणू खतपाणीच घातले. ‘नोआखाली’ येथे भयंकर रक्तपात सुरू झाला. त्याकाळी वृत्तपत्रातील बातम्या वाचून रानडे आणि त्यांच्या साथीदारांचे रक्त सळसळायचे. ते विचार करायचे, आपण आत्ता उठावं आणि नोआखालीला जाऊन अन्यायाचा प्रतिकार करावा!
शेवटी त्यांनी एकदिवस घरी न सांगता आपल्या साथीदारांसह मुुंबई गाठली. तेथे त्यांनी थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली. मग जोशातच त्यांना आपला उद्देश सांगितला. त्यावेळी स्वातंत्र्यवीर त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही आता विद्यार्थी आहात. आधी आपलं शिक्षण पूर्ण करा, मग थोडं मोठं झाल्यावर राजकीय वा सामाजिक कार्याचा विचार करा.’’
त्यावेळी रानडे यांना वाटलं, स्वातंत्र्यवीर बहुतेक आपली परीक्षा घेत असावेत. सामान्य व्यवहाराच्या गोष्टी सांगून आपली पारख करत असणार! नंतर थोडा विचार करून अचानक रानडे यांनी स्वातंत्र्यवीरांना प्रश्‍न केला, ‘‘तुम्ही जेव्हा आमच्यासारखे युवावस्थेत होता तेव्हा या गोष्टींचा विचार का नाही केला? त्यावेळी तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंचे पोवाडे रचून गायचे, तसेच तुम्ही विलायती कपड्यांची होळी केली. त्यासाठी लोकाना प्रोत्साहित केलं आणि परिणामी तुम्हाला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं!’’
रानडे यांचं बोलणं ऐकून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभावीत झाले आणि म्हणाले, ‘‘शत्रुने तयार केलेल्या रणभूमीवर आपण लढायला जाणं योग्य नाही. आपण आपल्या सोयीनुसार रणभूमीची निवड करावी आणि शत्रुला तेथे येण्यास बाध्य करावे.’’
हे मर्मभेदी वक्तव्य ऐकून रानडे आणि त्यांच्या साथीदारांनी नोआखाली येथे जाण्याचा विचार सोडून दिला. मात्र स्वातंत्र्यवीरांचे वरील वक्तव्य त्यांच्या काळजात कोरले गेले. नंतर ते गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी रणनीती आखायला अत्यंत सहायकारी ठरले.
यावेळी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोवा येथे पहिली सत्याग्रह चळवळ उभारल्याची बातमी सांगलीला पोहोचली तेव्हा पहिल्यांदाच गोमन्तक भूमिचं नाव मोहन रानडे यांच्या कानी पडलं. त्यावेळी गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता असल्यानं तेथील लोकाचे डोळे मोठ्या आशेने त्या सत्याग्रहाकडं लागले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याने आता गोवासुद्धा लवकरच पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त होणार असंच सर्वांना वाटत होतं. थोर स्वातंत्र्यसैनिक स. का. पाटील यांनी ‘आता चोवीस तासांच्या आत गोव्यातील ‘आग्वाद’ किल्ल्यावर तिरंगा फडकताना दिसणार’ अशी गर्जना केली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या; मात्र दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा 1948 साल संपले तरी ‘आग्वाद’वर फडकला नाही. मग 1949 सालही संपत आले. मोहन रानडे व त्यांचे सांगलीचे मित्र बापू साठे बेचैन झाले. गोवा मुक्तीसाठी आता आपणच पुढाकार घ्यावा असा विचार करून एका पिशवीसह रानडे यांनी मित्रासह सांगली सोडली.
गोव्याच्या सीमेवर असलेल्या बांदे या गावात पोहोचताच रानडे यांनी डॉ. र. के. बर्वे यांचे घर गाठले. तेथे त्यांना समजले, गोव्यातील समस्त जनतेला मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण हवंय मात्र पोर्तुगीज सरकारचा त्याला विरोध होता. तरीही गोव्यातील शाळांमध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांना विशेष मागणी होती. अशाप्रकारच्या शाळा अनधिकृत मानल्या जायच्या. म्हणूनच या शाळा मंदिरात किंवा धर्मशाळेत भरायच्या. त्यासाठी गोमन्तक जनता वर्गणी गोळा करून शिक्षकांना वेतन द्यायची. काहीजण त्यांच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्था बघायचे. गोव्यात त्यावेळी गावागावात मराठी शिक्षकांना खूप मान होता. त्याकाळात पोर्तुगीज सरकारमधील अधिकारी पर्वतराजीमध्ये वसलेल्या खेडेगावात जाण्याचं सहसा टाळायचे कारण तेथे जाण्यासाठी अवघड घाटरस्ते होते. या संधीचा फायदा घेण्याचे मोहन रानडे यांनी ठरवले आणि त्यांनी शिक्षकी पेशा पत्करून आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. त्यासाठी त्यांना सावई गावचे पटवारी पद्माकर सावईकर यांची मोलाची मदत झाली. दुसरं असं की, रानडे यांनी एक पैसाही मानधन न घेता आपलं शिक्षण कार्य सुरू केलं. त्यामुळं ते अल्पावधीतच गोव्यात लोकप्रिय ठरले.
गोवा मुक्ती चळवळीला तेथील स्थानिक रहिवाशी ‘जय हिंद आंदोलन’ या नावानं ओळखायची. या आंदोलनाशी संबंंधित अण्णा देशपांडे यांच्याशी रानडे यांचा परिचय झाला. ते डॉ. लोहिया यांचे सहकारी होते. त्यावेळी त्यांचे डोंगरी या गावी राहून हिंदी, इंग्रजी शिकवण्याचे कार्य सुरू होते. त्यांच्याकडूनच रानडे यांना गोवामुक्ती चळवळीची बरीच माहिती मिळाली. मात्र थंडावलेली चळवळ एका मोठ्या आंदोलनात रूपांतरीत करायची प्रतीक्षा सर्वांनाच होती. अशातच मध्यंतरी एका दुर्दैवी घटनेला रानडे यांना सामोरं जावं लागलं. झालं असं की… कुणी एक पाताळयंत्री इसम रानडे यांच्या उपक्रमाबाबत पोर्तुगीज अधिकार्‍यांना कळविणार असल्याची गोपनीय माहिती त्यांच्या मित्राला समजली. तो तत्परतेनं रानडे यांना येऊन भेटला व ताबडतोब त्यांना गोव्याबाहेर पडण्यास सुचवलं. त्यावेळी ‘मनोहर आपटे’ या आपल्या सांगलीतील खर्‍या नावानं रानडे तिथं शिक्षणकार्य करायचे; मात्र मित्रांमार्फत गोपनीय माहिती मिळताच त्यांनी लगेच गोवा सोडण्याचा निर्णय घेतला.
जड अंतःकरणानं रानडे यांनी गोव्याची हद्द ओलांडली, ती परत एकदा दृढ निर्धार करून गोवामुक्तीसाठी परतण्याची! मग काही काळानंतर म्हणजे 1950 च्या एप्रिल महिन्यात गोव्यात परतले ते ‘मोहन रानडे’ हे नाव धारण करून. ज्याला गोव्याची खडान्खडा माहिती होती अशा बाळा पर्येकर या मित्रासोबत ते मोर्ले येथून पणजी जवळच्या नावशी या खेडेगावी येऊन पोहोचले. नावशी हे एक मागासलेले गाव होते. त्याठिकाणी रानडे यांना कुणी ओळख्याचा प्रश्‍नच नव्हता. लवकरच त्यांनी गावकर्‍यांच्या मुलांना मराठीत प्राथमिक शिक्षण देणे सुरू केले तसेच त्यांच्याकडून थोडीफार कोकणी भाषाही शिकून घेतली. विनामूल्य शिक्षण देणे हे ध्येय समोर ठेवल्याने रानडे नावशीमध्ये लवकरच लोकप्रिय झाले. काही दिवसातच प्रौढ मंडळीही शिकायला येऊ लागली. या सर्व धामधुमीत रानडे यांनी तेथील लोकाचं जीवनमान जवळून अनुभवलं. पणजीला जाण्यासाठीचे सर्व मार्ग माहिती करून घेतले.
मात्र त्यांच्या लवकरच लक्षात आलं, नावशीसारख्या छोट्या गावात राहून आपलं व्यापक कार्य आपण करू शकणार नाही. मित्रांसोबत विचारविनिमय केल्यावर नावशी गाव सोडून मोहन रानडे 1952 च्या फेबु्रवारीत सावई येथे पोहोचले. तेथे त्यांनी प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. विनामोबदला शिक्षण असल्यानं त्याला प्रतिसादही उत्तम लाभला. याठिकाणी त्यांना शंभू पालकर सारखा निधड्या छातीचा, जिवाभावाचा साथीदार भेटला, ज्यानं पुढं गोवामुक्तीसंग्रामात अनेकांना सहभागी करून घेतलं. काही दिवसातच 1953 च्या मार्च महिन्यात अण्णा देशपांडे सावई गावात आले. त्यांनी गोवा हद्दीबाहेरील ‘वजरा’ येथे होणार्‍या गोवा नॅशनल कॉंग्रेसच्या बैठकीबाबत रानडे यांना सांगितले. नंतर अशाप्रकारे बैठका, शिबिरांना जाऊन मुक्तीसंग्रामासाठीची तयारी सातत्यानं सुरू होती.
गोव्याच्या हद्दीलगत सावंतवाडीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या आंबोली येथे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हा भाग दाट जंगलानं वेढलेला आणि आणि डोंगरमाथ्यावर होता. त्याठिकाणी ‘आझाद गोमन्तक’दलाची माहिती आणि पोर्तुगिजांची सत्ता उलथवून लावण्यासाठी सशस्त्र उपाययोजनेची आवश्यकता तसेच त्यासाठी युद्धकलेचं शिक्षण देण्याबाबत सर्वांना अवगत करण्यात आलं. तिथं मेणबत्तीच्या अंधुक उजेडात दलाच्या संचालकांनी मोहन रानडे आणि त्यांच्या साथीदारांना शपथ देवविली… ‘‘दीव, दमण आणि गोवा हे भारताचे अविभाज्य घटक आहेत. या प्रदेशातील पोर्तुगिजांची जुलमी सत्ता यथाशक्ती उपायांनी नष्ट करून भारतात पुन्हा विलीन करण्याच्या उद्देशाने मी आज ‘आझाद गोमन्तक’ दलाचा स्वयंसेवक म्हणून शपथ घेत आहे. या दलाच्या उद्देशपूर्तीसाठी मी आपल्या सर्वस्वाचा होम करण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि आपल्या साथीदारांसोबत तथा दलाशी कधीही विश्‍वासघात करणार नाही. जय हिंद!’’
‘वजरा’ हे आझाद गोमन्तक दलाचं प्रमुख केंद्र बनलं होतं. तेथील 1954 च्या बैठकीत दादरा-नगरहवेली मुक्तीसाठी बरीच चर्चा करण्यात आली. काही दिवसातच बातमी येऊन धडकली… 23 जुलै 1954 रोजी स्थानिक सत्याग्रहींच्या अथक प्रयत्नांनी दादरा स्वतंत्र झाल्याची. त्यावेळी मोहन रानडे सावई या गावातील शाळेत शिकवत होते. त्यांच्या मित्राने बाळा पर्येकराने ही बातमी त्यांना दिली. त्यानंतर त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास नगरहवेलीची राजधानी ‘सिल्व्हासा’वर आक्रमण करण्याच्या उद्देशाने विश्‍वनाथ लवंदे आणि राजाभाऊ वाकणकर यांच्याशी रानडे यांची चर्चा झाली. नगरहवेली मुक्तीसाठी उत्साह संचारला. शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरू झाली. 31 जुलैच्या रात्री नगरहवेलीच्या हद्दीत प्रवेश करण्याचं ठरलं. याच काळात रानडे यांचा परिचय संगीतकार सुधीर फडके यांच्याशी झाला. ते चित्रपट संगीतासाठी नव्हे तर मुक्तीसंग्रामात योगदान देण्यासाठी तेथे पोहोचले होते. मुंबईहून येताना त्यांनी ‘सतार’च्या बॉक्समध्ये काही शस्त्रास्त्र देखील आणले होते. सारखा पाऊस पडत असतानाही सर्वांना रात्रीचा पायी प्रवास घडला. त्यावेळी रानडे यांच्यासोबत सुधीर फडके आणि इतर चार-पाच साथीदार पहाटे नरोली या गावी पोहोचले. तेथे मध्यरात्रीच दुसर्‍या रस्त्याने पोहोचलेले प्रभाकर सिनारी, राजाभाऊ वाकणकर, नाना काजरेकर, कृष्णा माईनकर यांच्यासह बर्‍याच कार्यकर्त्यांची भेट झाली.
उत्साहात सर्वांनी मसलत करून समोर दिसणार्‍या पोलीस चौकीवर ताबा मिळवला. चौकीत असलेले शिपाई त्यावेळी पळून गेले होते. त्यानंतर नगरहवेलीची राजधानी सिल्व्हासापासून पाच-सहा किमी अलीकडे असलेल्या चौकीवर आक्रमण करून ती सुद्धा ताब्यात घेण्यात आली. तेथील दोन शिपायांना बंदी बनवण्यात आले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सिल्व्हासावर आक्रमण करण्याची योजना आखण्यात आली. मात्र भारत सरकारच्या उदासीनतेमुळे आणि अपुर्‍या शस्त्र सामुग्रीमुळे सिल्व्हासा ताब्यात घेण्यास चार-पाच दिवस लागले. पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेले नगरहवेली आता मुक्त झाले होते. राजधानी सिल्व्हासा येथील पोर्तुगीजांचे झेंडे उतरवून तिरंगा फडकावण्यात आला. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला! आता सगळ्यांचे डोळे लागून राहिले ते गोवा मुक्तीसाठी. येणार्‍या 15 ऑगस्ट 1954 ला भारतीय सेना गोवा ताब्यात घेऊन गोवामुक्तीची घोषणा करणार असे सर्वांनाच वाटत होते, मात्र ज्याप्रकारे जास्त प्रतिकार न करता दादरा आणि नगरहवेली मुक्त करण्यात आले त्याच सहजतेने गोवा मुक्त होणे शक्य नव्हते. याबाबत रानडे आणि त्यांचे नेते व सहकारी चांगल्या प्रकारे जाणून होते.
10 ऑगस्ट 1954 रोजी मोहन रानडे आपल्या साथीदारांसह वजरा या ठिकाणी परत आले. नंतर बाळा पर्येकराच्या मदतीनं सर्वजण हद्द ओलांडून गोव्यात दाखल झाले. नगरहवेली मुक्तीसंग्रामाच्या यशस्वीतेनंतर गोव्यातील स्थानिकांना खात्री पटली होती की, आता लवकरच आपल्याकडं स्वातंत्र्यसंग्रामासाठी युद्ध होणार! त्यासाठी लोकानी फटाके खरेदी करून ठेवले. कित्येकांनी शिंप्याकडं जाऊन भारतीय तिरंगा शिवून घेतला. सर्वजण 15 ऑगस्टची प्रतीक्षा करण्यात गुंग होते. बर्‍याच दिवसांनी लोकाच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता. आता लवकरच भारतीय सेना गोव्यात येणार या आशेवर स्थानिक वाट पाहत होते.
15 ऑगस्ट 1954 चा दिवस उजाडला… मात्र सगळ्यांचाच अपेक्षाभंग झाला. ना भारतीय सेना गोव्यात आली, ना गोवा मुक्तीची घोषणा झाली. मोहन रानडे यांना एकाच गोष्टीचं दुःख झालं… पोर्तुगीज शासन नगरहवेली हातातून गेल्यानं घाबरलेलं होतं. त्याचा फायदा भारत सरकार घेऊ शकत होतं. पोर्तुगीजांच्या कमजोरीचा लाभ उठवण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र त्याचा भारतीय नेत्यांना लाभ उठवता आला नाही हे दुर्दैवच! गोवामुक्तीची सुवर्णसंधी भारत सरकारनं गमावली असंच म्हणावं लागेल कारण त्यानंतर गोव्यातील पोर्तुगीजांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढला. ते पूर्वीप्रमाणं शिरजोर झाले. मग संशयित गोमन्तकीयांचं पकडसत्र सुरू झालं. सावई येथे छापा मारून विश्‍वनाथ सावईकरांना पकडण्यात आलं. तेथे रानडे यांची चौकशी करण्यात आली. सुदैवानं त्यावेळी ते दूर टेकडीवर होते म्हणून बचावले.
1954 सालच्या 31 डिसेंबरची रात्र. आत्माराम जांभुळकर यांच्या झोपडीवजा घरी दासू, शंभू पालकर या साथीदारांसह मोहन रानडे जमले होते तेव्हाच शिवोली येथून बापू साठे, बाबला, येशी, लाडू, पुंडलिक इत्यादी सहकारी पण तेथे येऊन त्यांना सामील झाले. आत्मारामच्या घरापासून पाच-सहा किमीवर असलेल्या बाणस्तरच्या पोलीस चौकीवर हल्ल्याची योजना आकाराला आली. चौकी लुटून तेथील बंदुका हस्तगत केल्या जाऊ शकत होत्या. नगरहवेलीच्या संग्रामातून नजर चुकवून आणलेलं एक पिस्तूल अन् तुटपूंजी शस्त्रे हातात होती. तसेच सोबत बांबुच्या लाठ्याही होत्या. रानडे आणि त्यांच्या सहकार्‍यांना त्यावेळी वाटलं… भारत सरकार तर आम्हाला शस्त्रास्त्रांची मदत करणार नाही, न करो! पण आमच्या हृदयात भडकलेलं देशभक्तीचं अग्निकुंड कसं विझवणार? आम्हा आझाद गोमन्तक दलातील कार्यकत्यांना तसेच गोवामुक्तीसाठी लढणार्‍या इतर देशभक्तांना आपल्याच सरकारच्या प्रतिकूल वागणुकीचा सामना करावा लागत आहे तरीही आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही दृढ संकल्प केला आहे. आता माघार नाही!
सर्वानुमते पहाटे चार वाजता बाणस्तरच्या चौकीवर हल्ला करायचा असं ठरलं, कारण त्यावेळी रात्रगस्त पाहरेकरी पेंगुळलेल्या अवस्थेत किंवा अर्धवट झोपलेले असतात. रानडे यांच्यासह आठजण आपापल्या लाठ्या घेऊन चौकीच्या आसपास पोहोचले. दासूजवळ त्याची छोटी पिशवी होती. रानडेंनी त्यांची पिस्तूल बापूकडं सुपूर्त केली. दोघंही आवाज न करता चौकीजवळ गेले, तेवढ्यात कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजानं पहारेकर्‍याला जाग आली. तीन-चार जण आत झोपलेले होते. पाहरेकर्‍यानं आपली बंदुक घेण्याचा प्रयत्न करताच त्याच्यावर लाठ्या बरसल्या आणि बाळूनं त्याच्यावर पिस्तूल रोखली. तो गयावया करायला लागला. पहारेकर्‍याच्या आवाजानं आतील शिपाई जागे झाले अन् ओरडले, ‘‘आम्हाला मारू नका, आम्ही बाहेर येतो.’’
सर्वांचं लक्ष तिकडं गेलं मात्र तेवढ्यात पहारेकर्‍यानं संधी साधून बाळूच्या हातचं पिस्तूल हिसकण्यासाठी झटापट केली. ते बघून दासू पुढं आला अन् त्यानं पहारेकर्‍यावर दोन फायर केले. त्याच्या किंकाळीनं आतल्या शिपायांचा आरडाओरडा सुरू झाला. पहारेकर्‍याजवळची पिस्तूल बाळूनं आपल्या ताब्यात घेतली आणि तो दोन्ही हातात दोन पिस्तूलं घेऊन आत जाण्याच्या तयारीत असतानाच मोटारगाडी येत असल्याचा आवाज आला. एव्हाना साडेचार वाजले होते. चौकीवर 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला होता. अधिक काळ तिथं राहणं म्हणजे धोका पत्करण्यासारखं होतं. त्यामुळं सगळ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’च्या घोषणा देत चौकी सोडली. जंगलाच्या रस्त्यानं सर्व पसार झाले!
1 जानेवारी 1955 हा दिवस मोहन रानडे आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस मानतात कारण बाणस्तरच्या चौकीवर हल्ला केला त्यावेळी बाळू साठे अन् स्वतः रानडे सोडले तर बाकीचे सहाजण शेतकरी होते. कसलंही प्रशिक्षण नसताना हातात लाठ्या घेऊन अन् देशभक्तीनं प्रेरित होऊन हत्यारबंद पहारेकरी चौकीत असताना त्यांनी हल्ल्याचं अभूतपूर्व धाडस केलं. दुर्दैवानं चौकीवर ताबा मिळवता आला नाही मात्र या घटनेनं सर्वांचाच आत्मविश्‍वास दुणावला होता. त्यामुळं जानेवारीच्या शेवटी गाळेली आणि कळंगुट येथील पोलीस चौक्यावर हल्ल्याची योजना साकारली गेली. परंतु तिथं एक पिस्तुल अन् काही काडतुसे याव्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही. विशेष कामगिरी करण्यासाठी शस्त्रास्त्रांची गरज होती. काही दिवसातच अस्नोडा गावचा गोपी चोडणकर हा धाडसी कार्यकर्ता रानडे यांच्याकडं खबर घेऊन आला… अस्नोडाच्या पोलीस चौकीत भरपूर शस्त्रास्त्रं आहेत. त्यामुळं सगळ्यांची आशा जागवली गेली. त्या रात्रीच बैठक घेऊन पुढील योजना ठरवण्यात आली.
अस्नोडाची चौकी गोव्यातील म्हापसा-डिचोलीच्या मोठ्या रस्त्याच्या कडेला होती. जवळच बाजार होता. या चौकीवर यशस्वी हल्ला करून शस्त्रास्त्रं हस्तगत करणं खूपच जिकिरीचं काम होतं. सर्व साथीदारांसह दि. 5 फेबु्रवारी 1955 च्या सायंकाळच्या अंधारात रानडे अस्नोडा गावी पोहोचले. तेथील स्थानिक कार्यकर्ता बाळा मापारी चौकीच्या मागील बाजूच्या झोपडीत रहायचा. त्याच्या घरी गोपी चोडणकर आधीच येऊन बसला होता. बाळा अन् गोपी अस्नोडा गावी शेतमजूरी करायचे. सर्व साथीदार गोळा झाल्यावर बाळाच्या घरीच योजना आखून रात्री नऊ वाजता बाहेर पडायचं ठरलं. रानडे, अनंत थळी आणि सुखा पुढं चौकीकडं निघाले. पाठोपाठ येशी, लाडू, दत्ता दुसर्‍या बाजूनं जाऊन थांबले. बाळा मापारी आणि गोपी स्थानिक असल्यानं त्यांना चौकीकडं येऊ न देता दुरून लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं. चौकीजवळ पोहोचताच रानडे यांच्या लक्षात आलं, आतून चौकीचा दरवाजा बंद आहे. एक शिपाई गस्त घालण्यासाठी गेल्याचं समोरच्या दुकानदारांकरवी कळलं. त्या शिपायाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मग काहीतरी विचार करून रानडे, अनंत थळी अन् सुखा बाजाराच्या दिशेनं जाऊन थांबले. त्याचप्रमाणं दत्ता आणि इतर दोघं दुसर्‍या रस्त्यावर नजर रोखून होते. सुदैवानं 15-20 मिनिटांत शिपाई येत असल्याची चाहूल लागली. रात्र झाल्यानं सर्वत्र सामसूम झालं होतं. शिपाई जवळ येताच रानडे यांच्यासह तिघंही अचानक त्याच्या समोर आले. शिपायानं दचकून विचारलं, ‘‘कौन हो तुम लोग?’’
काही उत्तर न देता अनंत थळीनं डाव्या हातानं त्याच्या कानाखाली वाजवली. त्याचा ओव्हरकोट खाली पडला. खांद्यावर 303 बंदूक लटकत होती. त्याचवेळी रानडे यांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि आडदांड सुखानं त्याची बंदुक ताब्यात घेऊन त्याचे दोन्ही हात पाठिमागं बांधले. अचानक झालेल्या हल्ल्यानं शिपाई चांगलाच घाबरला. गयावया करू लागला… ‘‘मुझे मत मारो, जो कहोगे वो करूंगा।’’
‘‘ये ओरडू नकोस… आवाज न करता चौकीकडं चल.’’ रानडे त्याच्यावर खेकसले.
शिपायाला घेऊन चौकीजवळ येताच दत्तासोबत दुसर्‍या बाजूला असलेले दोन्ही साथीदार रानडे यांना येऊन मिळाले. नंतर शिपायाने चौकीचा दरवाजा ठोठावून आवाज दिला. लगेच दरवाजा उघडला गेला. आत फक्त एकच शिपाई होता. तो आपल्या जोडीदाराची अवस्था बघून चांगलाच भयभीत झाला. त्याच्यावर पिस्तूल रोखत रानडे यांनी त्याला भिंतीकडे तोंड करून उभं राहण्यास फर्मावलं. अनंत थळी अन् सुखा दोन्ही शिपायांवर लक्ष ठेवून होते. बाकीच्यांनी चौकीतील बंदुका, पिस्तूले आणि काही काडतुसे ताब्यात घेतली. नंतर सर्वजण तेथील कुलूप घेऊन बाहेर पडले. दोन्ही शिपायांना आत डांबून कुलूप ठोकण्यात आले. दूरवर बाळा मापारी अन् गोपी लक्ष ठेवून होते. मग सर्वजण अधिक वेळ न दवडता रातोरात शिवोलीला जाऊन पोचले. या घटनेने पोर्तुगीज सत्तेला चांगलाच हादरा बसला. दुसर्‍या दिवशी संपूर्ण गोव्यात अस्नोडा चौकी घटनेचीच चर्चा होती.
या घटनेनंतर प्रत्येक चौकीच्या दरवाजावर रात्रंदिवस बंदुकधारी पहारेकरी दिसू लागले. चार-पाच दिवसांनी अस्नोडा येथे परतताच बाळा मापारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला जबर मारहाण करण्यात आली. मात्र बाकी कोणीच पोलिसांच्या हाती लागलं नाही. बाळा मापारीनं शेवटपर्यंत आपल्या साथीदारांची नावं ओठावर येऊ दिली नाहीत. त्यानं पोर्तुगीजांच्या अतोनात हाल-अपेष्टा सहन केल्या. परिणामी त्याला पणजीच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवानं गोवा मुक्ती सशस्त्र आंदोलनाचा तो पहिला हुतात्मा ठरला! स्वांतत्र्यदेवतेच्या वेदीवर बाळानं आपली आहुती दिली. रानडे आणि साथीदारांना ही बातमी समजली तेव्हा सर्वजण सुन्न झाले. बाळा मापारीला मूक श्रद्धांजली वाहण्यात आली. तरीही पुढील संकटं ओळखून जराही विचलित न होता रानडे आणि त्यांचे सहकारी सावई अन् शिवोली डोंगर-दर्‍यात राहू लागले. त्यानंतर संधी मिळताच एप्रिल 1955 मध्ये रावण या चौकीवर हल्ला करण्यात आला; मात्र दुर्दैवानं तो अपयशी ठरला. मग अजिबात निराश न होता पुढील योजना आखण्यात आली. हळदोण पोलीस चौकीवर केलेला हल्ला चांगलाच यशस्वी ठरला. त्यावेळी रानडे यांना रामदास चाफाडकर, माधव कोरडे, बाळकृष्ण भोसले या साथीदारांची जिवाभावाची साथ लाभली. या हल्ल्यानंतर दोन सक्तीचे नियम सर्वांनी पाळायचं ठरवलं. एक म्हणजे कोणीही दारूला स्पर्श करणार नाही दुसरा म्हणजे हल्ला करतेवेळी रूपये, पैसे लुटायचे नाहीत.
बाणस्तर पोलीस चौकीवरील हल्ल्यापासून सुरू केलेल्या सशस्त्र आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणजे 15 शस्त्रांची प्राप्ती. ही पिस्तुलं, बंदुका शस्त्रं पोर्तुगीज शिपायांशी लढताना हस्तगत केली होती. आता कमीत कमी 15 जणांची सशस्त्र टीम तयार असल्यानं रानडे आणि सहकार्‍यांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढला होता. या फलनिष्पत्तीसाठी प्रत्यक्ष कार्यवाहीत लाठ्या-काठ्यांसह भाग घेणार्‍या शेतमजूरांचा सहभागही मोलाचा होता. तसेच आपल्या झोपडीवजा घरात आश्रय देणार्‍या, आपल्या भाकरीतून अर्धी भाकरी खाऊ घालणार्‍या दिलदार गोमन्तकीय लोकाचा तसेच दाट जंगलातून भर पावसात रस्ता दाखविणार्‍या स्थानिकांची नि:स्वार्थ साथ लाखमोलाची होती.
1955 च्या 15 ऑगस्टला गोवा मुक्तीच्या लढ्यासाठी भारतातील अनेक देशभक्त नेत्यांनी सत्याग्रह आयोजित केला होता. अगदी सकाळपासूनच भारताच्या कानाकोपर्‍यातून हजारो सत्याग्रही गोव्याच्या हद्दीजवळील सावंतवाडी येथे गोळा होण्यास येऊ लागले. ‘भारत माता की जय’चे नारे दुमदुमू लागले. शेकडो लोकानी तिरंगा हातात घेत गोव्याची हद्द ओलांडून सावंतवाडी येथे प्रवेश केला. सत्याग्रहाला सुरूवात झाली; मात्र काही वेळातच पोर्तुगीज सैनिकांनी जमावावर गोळीबार सुरू केला. तरीही भारतीय हद्दीतून सत्याग्रहींचा लोंढा उत्स्फूर्तपणे सावंतवाडीकडं सरकतच होता. जे सीमा ओलांडून गोव्यात प्रवेश करण्यात यशस्वी झाले त्यांना बलिदान द्यावे लागले. महात्मा गांधींच्या अहिंसक पद्धतीनं सत्याग्रह सुरू असतानाच जुलमी पोर्तुुगिजांनी अमानुषपणे गोळीबार करणं म्हणजे अत्याचारच होता. अशावेळी भारत सरकारनं मदतीसाठी भारतीय सेना तर पाठवली नाहीच, या घटनेचा साधा निषेधही नोंदवला नाही. या अभूतपूर्व घटनेचे दुसर्‍या दिवशी भारतभर तीव्र पडसाद उमटले. अनेक संघटनांनी, संस्थांनी राज्याराज्यातून भारत सरकारच्या तटस्थ भूमिकेची अतिशय तीव्र शब्दात निंदा करून जाहीर निषेध व्यक्त केला.
या घटनेेनं गोव्यातील स्थानिकात अस्वस्थता पसरली. रानडे आणि त्यांच्या साथीदारांनी डोंगरावरील निर्जन ठिकाणी बैठक घेतली. सर्वांचंच रक्त सळसळत होतं. प्रत्येकजण आपापला रोष व्यक्त करत होता. एक साथीदार ओरडला, ‘‘इस खून का बदला हम लेकर रहेंगे!’’ नंतर सगळ्यांना शांत करत रानडे यांनी पुढील योजना कशा आखायच्या याबाबत आपले विचार व्यक्त केले. स्फोटके तयार करण्यासाठी लागणार्‍या जिलेटीनच्या गोदामावर हल्ला करून ते हस्तगत करण्याची योजना पूर्णत्वास आली. त्यासाठी शिरगावचे गोदाम निश्‍चित करण्यात आलं.
सन 1955 सालच्या ऑक्टोबरची 5 तारीख! पहाटे पाच वाजता पन्नासजण तयारीत होते. प्रभाकर सिनारी यांच्याकडं पुण्याहून आणलेली स्टेनगन होती तर बाराजण इतर शस्त्रांनिशी तयार होते. सर्वजण शिरगावच्या टेकड्यातील गुहेतून गोदामावर व शेजारच्या वस्तीवर दिवसभर लक्ष ठेऊन होते. नंतर काही साथीदार हळूहळू आसपासच्या परिसरात आपली जागा घेऊ लागले. जवळपास रात्री नऊ वाजता अत्यंत सावधगिरीनं गोदामाकडं कूच करण्यात आली. रानडे यांच्यासोबत बाळकृष्ण भोसले आणि कान्होबा नाईक होते. तर त्यांच्या मागे अंतर राखत गटागटाने बाकी साथीदार निघाले. गोदामाच्या मुख्य द्वारात एक चौकीदार दिसताच तो काही हालचाल करण्याआधीच बाळकृष्ण आणि कान्होबानं त्याला पकडलं. त्याचे हातपाय बांधण्यात आले. तिथून पन्नासएक फुटावर दोन-तीन चौकीदार होते. गोदामाला कुलूप होतं. रानडे आणि इतर साथीदार तसंच प्रभाकर सिनारी यांच्या हातातील स्टेनगन बघून तिन्ही चौकीदार गर्भगळीत झाले आणि लगेच शरण आले. त्यांच्याकडं कुलूपाची चावी नव्हती. मग बर्‍याच प्रयत्नानंतर कुलूप तोडण्यात आलं. आत गेल्यावर झटपट 30-35 जिलेटीनचे बॉक्स बाहेर काढले आणि बाकी साथीदारांनी चारही चौकीदारांना आत कोंडून बाहेरून कान्होबानं कडी लावली.
नंतर पाच-पाचच्या गटानं सर्व बॉक्स घेऊन टेकड्या, जंगल मार्गानं वजरापर्यंत वाटचाल करणं भाग होतं. त्यासाठी रात्रभर पायी प्रवास करणं हा एकच पर्याय होता. रस्त्यावरून जाण्याचा धोका न पत्करता अत्यंत सावधगिरीनं सगळेजण वजरा येथे पोहोचले. तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. काळोखात मोहिम फत्ते झाली होती. दुसर्‍या दिवशी घटनेची माहिती मिळताच पोर्तुगीज सरकारची पाचावर धारण बसली. मग प्रत्येक संशयास्पद ठिकाणी, टेकड्यांवर छापे टाकून पोर्तुगीजांनी शोधकार्य सुरू केलं; मात्र कुणी हाती लागलं नाही. कारण सर्व माल आधीच हद्दीबाहेर वजरा येथे सुरक्षित ठिकाणी पोहोचला होता. हस्तगत केलेल्या या जिलेटीनमुळे पुढील कार्यवाहीत बरीच मदत झाली. कधी पूल उडवण्यात आले तर कधी पोर्तुगिज सरकारच्या जीप जाळण्यात आल्या. बॉंब बनवण्याच्या कामातही जिलेटीनचा खूप उपयोग झाला. या अभूतपूर्व यशामुळं रानडे आणि त्यांच्या साथीदारांचा उत्साह द्विगुणीत झाला. त्यानंतर लवकरच मोठा हल्ला करण्याचा बेत ठरवण्यात आला. आता चौकी नाही तर अख्खे पोलीसस्टेशन ताब्यात घेण्याची योजना आकाराला येऊ लागली.
‘बेती’ पोलीस स्टेशन हे राजधानी पणजीला लागून होते. तसेच तेथून पोम्बुर्पाचं जंगलही जवळ होतं. मोठी कामगिरी करण्याच्या उद्देशानं रानडे आपल्या साथीदारांसह पोम्बुर्पाच्या जंगलात राहू लागले, जेणेकरून बेती पोलीस स्टेशनची व आसपासची माहिती घेणं सोयीचं होईल. बेती हे राजधानी पणजीचं प्रवेशद्वारच होतं. सर्व दृष्टिनं महत्त्वाचं ठिकाण. दासू चाफाडकर, शंभू पालकर आणि माधव कोरडे यांना पोर्तुगीजांचा सहकारी किस्तुदच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सर्वत्र चौकशी सत्र सुरू होतं. पोर्तुगीज अधिकारी मोन्तेरूची गोव्यात जबरदस्त दहशत होती. 22 ऑक्टोबर 1955 रोजी मोहन रानडे आणि बाळकृष्ण भोसले बेती पोलीस स्टेशनची दुरून पाहणी करण्याच्या उद्देशानं त्या परिसरात पोहोचले. दर्शनी भागात दोन शिपाई बंदुका घेऊन उभे होते तर काही शिपायांच्या कंबरेला पिस्तूल लटकवलं होतं. आतल्या भागात बंदुका असल्याचं खिडकीतून बाळकृष्णाच्या नजरेस पडलं. तेथून परतल्यानंतर 25 ऑक्टोबरला सायंकाळी बेती पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचं ठरवण्यात आलं. त्यानुसार मग 25 तारखेच्या दुपारी एका सहकार्‍याला सविस्तर माहिती काढायला पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलं; मात्र तो परत आला तेव्हा समजलं, पोलीस स्टेशन बेती येथे पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मग त्यादिवशीची योजना रद्द करून दुसर्‍या दिवशी निश्‍चित करण्यात आली.
26 ऑक्टोबर 1955 चा दिवस उजाडला. मोहन रानडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली… आधी बेतीला जाऊन पोलीस स्टेशनची एकंदर स्थिती पाहणं, नंतर त्यानुसार तिथून टॅक्सी घेऊन पोम्बुर्पाला पोचणे आणि आपल्या सर्व साथीदारांना शस्त्रास्त्रासह परत बेतीसाठी बेतीसाठी रवाना होणं असं नियोजन ठरलं. मग त्यानुसार दुपारनंतर सूट-बुट घालून रानडे बेतीसाठी रवाना झाले. पोलीस स्टेशनजवळ पोचताच तेथील हवालदाराचा आरडाओरडा त्यांच्या कानी पडला. तर काही शिपाई परिसरात दिसून आले. समोरच असलेल्या चहाच्या टपरीवरून रानडे त्यांचे निरिक्षण करत होते. सर्व परिस्थिती आवाक्यात असल्याचं लक्षात आल्यानंतर ते लगेच टॅक्सी करून पोम्बुर्पासाठी निघाले. गावाच्या वेशीवरच बाळा पर्येकर डोक्यावर शॉल घेऊन उभा असलेला त्यांना दिसला. टॅक्सी थांबताच बाळानं इशारा केला. जवळच्या शेतात लपलेले सर्व साथीदार बाहेर निघून टॅक्सीत बसले. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्साह दिसत होता. मनोहर पेडणेकरने पाव बाहेर काढले. ते सर्वांनी कसेबसे खाल्ले. ड्रायव्हरला पण खाऊ घातले. सात वाजेपर्यंत बेती-म्हापसा रोडवर टॅक्सी पोचली. टॅक्सीतून उतरून सर्वजण वेगवेगळ्या दिशेनं चालू लागले. मनोहर पेडणेकर, शिवलिंग भोसले, सुखा शिरोडकर व रघुनाथ शिरोडकर आपापली जागा घेण्यास पोलीस स्टेशनकडं निघाले. सर्वांकडेच पिस्तूल होते. रानडे त्यांच्या मागे स्टेनगन घेऊन चालू लागले. बाळकृष्ण भोसले बंदुकीसह रस्त्यावर लक्ष देण्यासाठी आणि बाळा पर्येकर डोक्यावर शॉल पांघरून अंधारातून नजर ठेवण्यासाठी सजग होता. रस्त्यावर लोकाची थोडी ये-जा सुरू होती. स्टेनगनधारी रानडे झपाझप पाऊले टाकत सर्वांच्या पुढं झाले. पोलीस स्टेशन परिसरात येताच हवेत फायर करून ओरडले, ‘‘हॅन्डस् अप!’’ व्हरांड्यात गप्पा करत बसलेले व गाफिल असलेले शिपाई आश्‍चर्यचकित झाले. सर्व शिपाई निशस्त्र असल्यानं त्यापैकी पाच जणांनी हात वर केले मात्र त्यांच्या हेडकॉन्स्टेबलनं आत घुसण्याचा प्रयत्न करताच त्याच्यावर रानडे यांनी स्टेनगन रोखून, बुटाची लाथ मारून बाहेर ढकललं. त्यावेळीही त्यांना पूर्ण विश्‍वास होता, हेड कॉन्स्टेबलसह सर्व शिपायांचा बंदोबस्त मागे असलेले आपले साथीदार करणारच! रानडे सावधगिरी बाळगत, स्टेनगन रोखत आतील शस्त्रागाराजवळ पोचले. तेवढ्यात पिस्तूलमधून फायर केल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. रानडे यांनी वळून बघितले तर मगाशीचा हेड कॉन्स्टेबल पिस्तूलमधून गोळ्या झाडत होता. एक गोळी रानडे यांना लागली. लगेच त्यांनी फायर केले. हेडकॉन्स्टेबलच्या हातातील पिस्तूल खाली पडलं तसा तो, रानडे यांच्यावर झेपावला. स्टेनगन हिसकण्यासाठी चांगलीच झटापट झाली. त्याला ढकलून परत एकदा रानडे यांनी त्याच्यावर फायर केलं. तेवढ्यात पेढणेकर व बाळकृष्ण पिस्तूल चालवत तेथे पोचले. हेड कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मग शिवलिंग, बाळकृष्ण, पेडणेकर यांनी पोलीस स्टेशनमधील बंदुका इत्यादी शस्त्रास्त्रं ताब्यात घेऊन ते बाहेर पडले. रानडे जखमी अवस्थेत असल्यानं सिनारी यांच्या सहाय्यानं बाहेर पडले. उद्दशे सफल झाला होता. मोहिमही फत्ते झाली होती परंतु रानडे यांना आता चालवत नव्हतं. शुद्ध हरपल्यासारखं वाटत होतं. त्यांनी आपली स्टेनगन बाळकृष्णकडं दिली व वेळ न दवडता सर्वांना तिथून लवकर निसटून जाण्यास सांगितलं. कोणत्याही क्षणी गस्तीवरचं वाहन किंवा इतर कोणी आलं तर धोका संभवणार होता. त्यानंतर जड अंतःकरणानं सर्व साथीदार शस्त्रास्त्रासह तिथून बाहेर पडले. थोड्याच वेळात रानडे यांची शुद्ध हरपली!
दुसर्‍या दिवशी सकाळी रानडे शुद्धीवर आले त्यावेळी ते पणजीजवळच्या दवाखान्यात होते. खूप तहान लागल्यानं त्यांनी पाणी मागितलं पण ‘पाणी मिळणार नाही, तुमच्या पोटाचं ऑपरेशन झालं आहे’ असं तिथल्या नर्सनं सांगितलं. नंतर त्यांना नाव विचारण्यात आलं. ‘श्याम नारायण सिंह’ रानडे यांनी उत्तर दिलं. बाहेर दोन बंदुकधारी पोर्तुगीज पोलीस त्यांना दिसले. ‘‘तीन-चार दिवस आता काही खाता येणार नाही’’ जाताजाता नर्स त्यांना म्हणाली. नंतर तिसर्‍या दिवशी म्हापसाचा पोलीस कमांडर दवाखान्यात आला. त्यानं रानडे यांना बरेच प्रश्‍न विचारले. त्यांनी मोघमपणे उत्तरं दिली. मग दोन दिवसांनी साध्या वस्त्रातील एक व्यक्ती आली आणि इंग्रजीत रानडे यांना विचारलं, ‘‘ओळखलंस का मला? मला मोन्तेरू म्हणतात.’’ त्याला बघून रानडे यांना हसायला आलं. दवाखान्यात पडून काहीच करता येत नाही याचं त्यांना वाईट वाटलं. अचानक मग कुसुमाग्रजांची एक कविता त्यांना आठवली… गर्जा जयजयकार क्रांतिचा… ती गुणगुणत ते झोपी गेले.
दहाव्या दिवशी 4 नोव्हेंबरला रानडे यांना दवाखान्यातून सोडण्यात आलं आणि लगेच पोलिसांनी त्यांना हातकड्या घातल्या. नंतर त्यांना पणजी पोलीस स्टेशनच्या कोठडीत डांबण्यात आलं. दवाखान्यातील कपडे काढून कैद्याचे कपडे त्यांना घातले… फाटकी हाप पॅन्ट आणि बटणं नसलेला सदरा. काही दिवसांनी मोन्तेरू परत आला आणि उलटसुलट प्रश्‍न विचारून त्यानं रानडे यांना भंडावून सोडलं. त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिलं, ‘‘मला जे काही सांगायचं आहे ते कोर्टात सांगणार, तुम्हाला काहीच सांगणार नाही.’’ मात्र पोलिसांना बरीचशी माहिती आधीच अवगत झाली होती. फक्त रानडे यांच्या तोंडून त्यांना ती ऐकायची होती. आता रानडे यांना कोठडीत हाल-अपेष्टा सहन करत दिवस काढणं हेच काम उरलं होतं. कैद्यांना रोज मारझोड करणं, गलिच्छ शिव्या हासडणं हे नित्याचं झालं होतं.
29 डिसेंबर 1956 ला सर्व कैद्याना पोर्तुगीज लष्कराच्या कोर्टात पेश करण्यात आलं. तेथे सर्वांना निरनिराळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या. रानडे यांना ‘दहशतवादी’ घोषित करत एकूण 26 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. शंभू पालकरला 21 वर्षे, तसेच दासू चाफाडकर, माधव कोरडे, पुंडलिक नाईक, दत्ता नागवेकर यांना प्रत्येकी 22 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. बाळकृष्ण भोसलेला मध्यंतरीच्या काळात वीरमरण प्राप्त झालं. तसंच बाळा मापारी व प्रभाकर नाईक यांना पोलिसांनी मारल्यामुळं ते हुतात्मा झाले होते.
जेव्हा कठोर तुरूंगवास भोगायची वेळ येते तेव्हा मी मी म्हणणारेही आतून उद्ध्वस्त होतात. कोणत्याही कैद्यासोबत बोलायचं नाही की इशारे पण करायचे नाहीत एवढे कडक नियम तिथं होते. त्यामुळं रानडे यांनी ठरवलं, स्वतःशीच बोलायचं… कविता गुणगुणायच्या… त्याही हळू आवाजात! त्या अंधार कोठडीत खिडकी नसल्यानं सदैव अंधाराचंच साम्राज्य होतं. बाहेरचं जग बघायला दरवाजाजवळ येण्यास बंदी! रात्री व्हरांड्यात दिवे लागल्यावरच दरवाजातून कोठडीत थोडाफार उजेड यायचा. रानडे यांच्या कोठडीसमोरच नवीन आणलेल्या कैद्यांना अमानुषपणे मारहाण व्हायची. ते बघण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. नंतर 1956 च्या एप्रिलमध्ये सांगलीला पत्र पाठविण्याची त्यांना अनुमती मिळाली. त्यामुळं एका वर्षापेक्षाही जास्त काळानंतर नोव्हेंबर 1957 मध्ये रानडे यांना त्यांची आई अन् भावाचं दर्शन झालं. मात्र बाहेरून येणारं एकही पत्र त्यांच्यापर्यंत पोचत नव्हतं. त्याच दिवशी रानडे यांचा भाऊ परत आला. त्याच्या हातात काही पुस्तकं, साबण, घरगुती साहित्य होतं. ते पोलिसांनी तपासून रानडे यांना दुसर्‍या दिवशी दिलं. तब्बल दोन वर्षानंतर परत काही पुस्तकं आणि खाद्यपदार्थांसाठी परवानगी मिळाली.
जवळपास पाच वर्षांची कठोर शिक्षा भोगल्यानंतर रानडे यांची पणजीच्या तुरूंगातून पोर्तुगालच्या तुरूंंगात रवानगी होणार होती. हजारो दिवसानंतर ते बाहेरचं जग बघणार होते. 5 ऑक्टोबर 1960 रोजी तब्बल दीड महिन्यानंतर समुद्रातून प्रवास करत जहाज पोर्तुगालला पोचलं. राजधानी लिस्बनजवळ असलेल्या कशीयशच्या ‘अल्जुव’ नावाच्या तुरूंगात रानडे यांना ठेवण्यात आलं. तेथे पोचताच त्यांच्याजवळचं सर्व साहित्य जप्त करण्यात आलं. कोठडीतील एकांतवास परत सुरू झाला. त्यानंतर 16 एप्रिल 1961 ला रानडे यांना दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात आलं. तेथे आपल्यासारखेच कैदी असल्याचं बघून त्यांना थोडं बरं वाटलं. तब्बल साडेपाच वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी ‘मौनात’ काढला होता. ते फक्त स्वतःशीच बोलत होते. पोर्तुगालच्या तुरूंगात राहूनही त्यांना आता एकाच गोष्टीचं समाधान होतं… आपल्याला आता आपल्यासारख्याच माणसांशी संवाद साधता येणार! मात्र काही वेळातच समजलं, सोबत असलेल्या कैद्यात एक जर्मनीचा होता, तर दुसरा डच होता. तिसरा इंडोनेशियन होता तर चौथा स्पॅनिश! कुणालाच कुणाची भाषा कळत नव्हती. नंतर एका पोर्तुगीज कैद्याची त्यात भर पडली. रानडे यांना इतक्या दिवसांच्या तुरूंगवासात पोर्तुगीज भाषा थोडीफार कळत होती! त्यामुळं त्या पोर्तुगिज कैद्यांशी हावभाव करून संवाद साधण्यात रानडे यांना थोडं समाधान लाभायचं. मुख्य म्हणजे छोट्याशा अंधारकोठडीतला एकांतवास आता नशिबी नाही याचाच त्यांना आनंद झाला होता.
कधीकधी पोर्तुगीज वर्तमानपत्रं तुरूंगात बघायला मिळायचं. 20 डिसेंबर 1961 चा अंक रानडे यांच्या हाती पडला. त्यात मुख्य बातमी होती… पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त झाल्याची! 19 डिसेंबरला गोवा प्रांत स्वतंत्र झाला होता. त्यांनी परत परत तीच बातमी वाचली. आनंद गगनात मावत नव्हता… अन् कोणासोबत वाटताही येत नव्हता! कारण सोबत असलेले कैदी भारतीय नव्हते. आता तेथील सर्व कैदी पोर्तुगालचे गुन्हेगार होते. त्यांना गोवा मुक्तीशी काहीच देणं-घेणं नव्हतं. तरीही रानडे यांनी त्यांच्यासमोर त्यांच्याच भाषेत आपलं मन मोकळं केलं. डोळ्यातून आसवं गळत होती! गोव्यासाठी केलेला मुक्तीसंग्राम त्यांना थोडक्यात सांगितला. आता लवकरच आपली यातून सुटका होणार, आपण आपल्या मातृभूमीला परतणार या एकाच आशेवर रानडे जगत होते. प्रत्येक उगवणारा दिवस आशेचा किरण घेऊन येत होता अन् निराशेत रूपांतरित होऊन मावळत होता.
गोवा स्वतंत्र झाल्याची बातमी समजल्यापासून रानडे यांना आता एकेक दिवस युगासारखा वाटत होता. 16 जानेवारी 1962 रोजी संयुक्त अरब गणराज्याच्या राजदूताने त्यांना भेटून सांगितले, ‘‘बंदी केलेले पोर्तुगीज सैनिक आणि भारतीय युद्धकैद्यांची लवकरच अदलाबदल होणार आहे. आठ दिवसांतच तुमची मुक्तता होणार!’’
नंतर आठ दिवस कधी संपले, महिना संपला! 20 एप्रिलच्या पोर्तुगीज वर्तमानपत्रात बातमी आली, भारत-पोर्तुगालमध्ये लवकरच कैद्यांची अदलाबदल होणार! नंतर 15 मे 1962 रोजी जाहीर करण्यात आलं, गोवा किंवा भारतात एकही पोर्तुगीज बंदी उरला नाही. भारत सरकारच्या उदासीन कारभारामुळे रानडे अद्यापही शिक्षा भोगत होते. मध्येच त्यांच्या कानावर बातमी आली, तीन पोर्तुगीजांच्या बदल्यात पाच भारतीय कैद्यांना सोडण्यात आले. ते कोण कैदी होते याचा सुगावाही लागला नाही. आता कोणावर अन् कशावर विश्‍वास ठेवावा हेच त्यांना कळत नव्हते. त्यांची अवस्था विमनस्कासारखी झाली होती. तरीही ते कमालीचा संयम बाळगून होते. तिकडे भारतात रानडे यांचे मित्र बापू साठे आणि संगीतकार सुधीर फडके यांचे त्यांच्या सुटकेसाठी कसोशीनं प्रयत्न सुरू होते.
आपल्या देशातील नेत्यांच्या चमत्कारिक नीतिमुळेच रानडे पोर्तुगालच्या तुरूंगात अडकून पडले होते. मग त्यांनी सांकेतिक भाषेत प्रभाकर सिनारी आणि कराडच्या आत्माराम पाटील यांना पत्र लिहून स्वतःच प्रयत्न सुरू केले. मात्र तेवढ्यात भारत-चीन युद्ध सुरू झाल्यानं त्याचा उपयोग झाला नाही. 1962 हे वर्ष संपलं. वर्षाअखेरीस आत्माराम मयेकर यांना ‘काका’ नावानं रानडे यांनी पत्र पाठवलं. नंतर 1963 च्या जानेवारीमध्ये अचानक अप्पा सरमळकर यांचं पत्र रानडे यांना मिळालं. त्यात काकांचा उल्लेख होता. सोबत बारा पौंडचा चेकही होता. पत्र वाचून रानडे समाधानी झाले. चेकद्वारे त्यांनी आधी गरम कपडे घेतले. कारण कडाक्याच्या थंडीमुळं तिथं राहणं दुरापस्त होतं. 1964 पर्यंत कौटुंबिक पत्र व आर्थिक सहाय्य मिळणं सुरू होतं. नंतर ते अचानक बंद झालं. 1 ऑक्टोबर पासून रानडे यांना पहिल्यांदाच तुरूंगाबाहेरील मोकळ्या जागेत नेण्यात आलं. तिथं त्यांना मोकळा श्‍वास घेता आला. दुसर्‍या कोठड्यामधील कैद्यांनाही आता ते बघू शकत होते. बोलण्याची मात्र मनाईच होती. नोव्हेंबर 1964 मध्ये सोबत असलेला मार्कुश नावाचा पोर्तुगीज कैदी मित्र मुक्त झाला. साश्रू नयनानं त्यानं रानडे यांचा निरोप घेतला व ‘‘तुम्हीही लवकरच भारतात परतणार’’ असा आशावाद प्रकट केला. काही दिवसांनी त्यांना ‘रेडक्रॉस’कडून पाठविलेली पुस्तकं वाचण्याची परवानगी मिळाली. त्यात एक भूगोल व दुसरं विज्ञानाचं होतं आणि ‘न्यूयार्क टाइम्स’ वृत्तपत्रही होतं. खूप दिवसांनी रानडे यांना ‘ग्रेप्स ऑफ रॅथ’ ही स्टाईकनबेकची सुंदर कादंबरीही वाचायला मिळाली.
एक दिवस भारताचे त्याकाळातील राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना रानडे यांनी सविस्तर पत्र लिहिलं. ते पत्र रजिस्टर करून मेक्सिकन दूतावासामार्फत पाठवलं. नंतर काही दिवसांनी मेक्सिकन दूतावासानं कळवलं की, ‘‘तुम्हाला सुटकेसाठी वकील नेमावा लागेल; कारण तुम्हाला पोर्तुगाल सरकारनं 26 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.’’
3 मार्च 1965 च्या विद्यार्थी दिनानिमित्त पोर्तुगालच्या सालाजारशाही विरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. परिणामी बर्‍याच विद्यार्थ्यांना तुरूंगात डांबण्यात आलं. तिथं काही विद्यार्थी रानडे यांच्या संपर्कात आले. त्यांना श्री. कामत नावाचे पोर्तुगालस्थित मूळचे भारतीय वकील मदत करत असल्याचं रानडे यांना समजलं. मग त्या विद्यार्थ्यांमार्फत कामत वकिलांची भेट झाली तेव्हा चर्चेदरम्यान रानडे यांना आपली मुक्तता होऊ शकते असा विश्‍वास वाटू लागला. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच कामत यांनी वकीलनामा तयार करून रानडे यांची सही घेतली. मग कामत यांनी आपले प्रयत्न सुरू केेले. मात्र बर्‍याच अडचणी येत होत्या. पोर्तुगाल कोर्टाच्या दोन मुख्य अटी होत्या… एक म्हणजे, दिलेल्या शिक्षेतील निम्मा अवधी पूर्ण करणे आणि दुसरी अट तुरूंगात असताना संबंधित कैद्याकडून आदर्श व्यवहार! ऍड. कामत यांनी रानडे यांना दिलासा दिला, ‘‘तुमच्या दोन्ही अटी पूर्ण असल्यानं आता कसलीही अडचण नाही.’’
ऍड. कामत 2 डिसेंबर 1968 रोजी तुरूंगात येऊन रानडे यांना भेटले आणि त्यांना खूशखबर ऐकवली, ‘‘माझ्या मते तुम्ही या महिना अखेर किंवा जास्तीत जास्त पुढच्या महिन्यात नक्कीच मुक्त होणार!’’
बिनशर्त सुटकेसाठी न्यायालयात मे महिन्यात त्यांनी अर्ज दाखल केला होता. त्याचा निकाल 23 डिसेंबर 1968 ला लागणार होता; मात्र काही कारणास्तव निकाल पुढं ढकलण्यात आला. नंतर 23 जानेवारी 1969 रोजी दुपारी आपल्या कैदी मित्रांसह तुरूंगात जेवण करत असताना रानडे यांना ऍड. कामत यांचे कार्ड मिळाले. त्यावर त्यांच्या सुटकेची आनंददायी वार्ता आलेली होती. बातमी कळताच सर्वांनी त्यांचे अभिनंदन केलं. त्यानंतर 24 जानेवारीला तेथील औपचारिकता पूर्ण करून ते 25 जानेवारी 1969 रोजी आपल्या प्रिय मातृभूमीसाठी स्पेन, इटलीमार्गे रवाना झाले.
1 फेब्रुवारी 1969 च्या पहाटे पाच वाजता एअर इंडियाचे विमान मुंबईच्या सांताकु्रझ विमानतळावर उतरले. मोहन रानडे विमानातून बाहेर पडत असताना ‘भारत माता की जय’च्या गर्जना सर्वत्र दुमदुमत होत्या. साश्रू नयनांनी रानडे यांनी सर्वांना नमस्कार केला. विमानतळावर सुधीर फडके आणि मित्र बापू साठे तसेच इतर सहकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. भारतात परतल्यावर ते गोव्यात स्थायिक झाले. त्यानंतरही स्वस्थ न बसता ‘गोमन्तक मराठी शिक्षण परिषद’ या शिक्षण संस्थेची रानडे यांनी स्थापना केली. या संस्थेचे कार्यवाह म्हणून ते सक्रिय होते. तसेच 1986 मध्ये ‘महिला व बालकल्याण गृहा’ची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ‘चिंबल’ येथील गरीब, गरजू व उपेक्षित महिला अन् मुलांसाठी कार्य केले. त्यानंतर 1988 ते 1992 पर्यंत ते भारतीय रेडक्रॉस गोवा शाखेच्या अध्यक्षपदी कार्यरत राहिले. 21 मार्च 2001 रोजी त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल करण्यात आला. जुलै 2001 मध्ये ‘स्वामी विवेकानंद जीवनज्योत’ संस्थेची स्थापना करून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत कार्य केले.
सांगलीचा एक शाळकरी विद्यार्थी. 1942 च्या ‘करा किंवा मरा’ या आंदोलनातील एका घटनेेनं त्याच्या मनात स्वातंत्र्यासाठीची ठिणगी पेटते. नंतर बाबाराव सावरकर यांच्या सहवासात त्याची अंतःप्रेरणा जागृत होते. देशासाठी काहीतरी केले पाहिजे ही तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नाही. पुढं आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यावरही, सारा देश स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत असताना हा घर सोडून गोवा स्वातंत्र्यमुक्तीसाठी जिवाचं रान करतो, जुलमी पोतर्र्ुगीजांशी दोन हात करताना स्वतःला झोकून देतो, आपल्या साथीदारांसोबत सशस्त्र क्रांतिकार्य करत कितीतरी दिव्यांना सामोरं जातो. गंभीर जखमी होऊन पोर्तुगीजांच्या हाती सापडल्यावर दीर्घ कालावधीची त्याला शिक्षा सुनावण्यात येते. त्यांनतर गोवा स्वातंत्र्य झाल्यावरही तब्बल सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी पोर्तुगालच्या तुरूंगात हाल-अपेष्टा अन् मनस्ताप सहन करण्यात जातो. शेवटी अथक प्रयत्नानंतर त्याचे भारतात आगमन होते. अशा या देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या थोर क्रांतिवीराचे, मोहन रानडे यांचे कार्य अतुलनीय, प्रेरणादायी होते. भारतात परतल्यावरही देशकार्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील आणि अनेक विधायक कार्यात भरीव योगदान होते. त्यांचं अष्टपैलू कार्य आपणा भारतीयांसाठी सदैच प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही.
या थोर भारतीय सुपुत्राचं वयाच्या नव्वदाव्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात 25 जून 2019 रोजी निधन झालं. त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!
‘‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।
देखना है जोर कितता बॉंजूए कातिल में है॥

– विनोद श्रा. पंचभाई, पुणे
9923797725
चपराक दिवाळी अंक 2019

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा