आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक!

आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक!

डॉ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर यांची विशेष मुलाखत

केवळ भारतीयच नव्हे तर मॅक्समुलर, गटे, शोपेनहावर प्रभृती पाश्चात्य विचारवंतांना देखील संस्कृत साहित्याने प्रभावित केले होते. भारतातीलच नव्हे तर जगातील एक प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेची ओळख आहे. श्रावण पौर्णिमेला सर्वत्र ‘संस्कृतदिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त संस्कृत भाषेचे अभ्यासक, कवी आणि संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे पुरस्कर्ते प्रा. डॉ. चंद्रहास सोनपेठकर यांची ही विशेष मुलाखत.

नमस्कार सर, काय वाटतं, संस्कृतला सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत का?
संस्कृतला नेहमीच अच्छे दिन असतात पण ते आपल्यापेक्षा पाश्चात्य देशांमध्ये आहेत की काय असं वाटतं कधीकधी. शासन शासनाच्या जागेवर असतं. आपण संस्कृतकडे कसं पाहतो हे महत्त्वाचं आहे.

म्हणजे?
संस्कृत ही केवळ उजव्या विचारांची भाषा नाही. ती केवळ पूजापाठाची भाषा नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. संस्कृतात इहवादी चार्वाक सुद्धा आहे. जो भस्मीभूत देहाचे पुनरागमन होत नाही असे सांगून पुनर्जन्माचा, कर्माचा सिद्धांत देखील नाकारतो. त्यामुळे संस्कृतात सर्व प्रकारच्या विचारांना स्थान आहे पण लोक संस्कृत न शिकता संस्कृतविषयी पूर्वग्रह करतात. संस्कृत न शिकता संस्कृतविषयी सकारात्मक किंवा नकारात्मक कोणताही ग्रह कोणाचा असू नये असे माझे स्पष्ट मत आहे.

संस्कृत शिक्षणाची सद्यःस्थिती कशी आहे?
अतिशय उत्तम! विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मंडळाच्या शाळांमध्ये आठवीपासून संस्कृत घेता येते. 100 गुणांचे पूर्ण संस्कृत किंवा 50 गुणांचे संयुक्त संस्कृत अशा दोनही प्रकारे ऐच्छिक विषय म्हणून घेता येते. आनंदाची गोष्ट ही आहे की, बहुतेक शाळांमध्ये संपूर्ण 100 गुणांचे संस्कृत घेणार्‍यांची संख्या अधिक आहे. उच्च शिक्षणात ही संख्या काही कमी होत जाते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे सर्वच महाविद्यालयात संस्कृत विषय घेण्याची सोय नसते.

संस्कृतमध्ये करिअर घडवण्यासाठी कितपत संधी आहेत?
प्रचंड! प्रचंड प्रमाणात संधी आहेत. शाळांमधून संस्कृत शिक्षकांची प्रचंड मागणी आहे. इंग्रजी माध्यमांच्या, सी. बी. एस. ई. शाळांमध्ये संस्कृत शिक्षक मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्याशिवाय युपीएससी, पाण्डुलिपी, अनुवाद अशा अनेक क्षेत्रांत संस्कृत शिकणार्‍यांना संधी आहेत.

संस्कृत शिक्षणाच्या क्षेत्रात नेमके कोणते बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं?
संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. कला, काव्य, साहित्यमीमांसा, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, कृषी, इतिहास, भूगोल, विज्ञान, आयुर्वेद, योग अशा अनेक अनेक विषयांवर संस्कृत भाषेतील ग्रंथ आहेत. त्या बाबतीत दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. अनुवाद आणि अन्वेषण म्हणजे संशोधन. ही दोनही कार्ये करण्यासाठी विद्यार्थी सक्षम होईल अशी रचना अभ्यासक्रमांची असली पाहिजे. अन्यथा संस्कृतातील या प्रचंड ज्ञानसाठ्यावर संशोधन करून पाश्चात्य अभ्यासक पेटंट मिळवतील आणि आपल्याला ते आपले ज्ञान असूनही आपण त्यावर हक्क सिद्ध करण्यास, ते लोकांपर्यंत पोचवण्यास आपण कमी पडलो असे होईल.

आपण आधुनिक तंत्रज्ञान आणि संस्कृत याकडे कसं पाहता?
सर्वप्रथम आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत केले पाहीजे. तंत्रज्ञान हे फार सोपे आणि उपयुक्त साधन आहे हे समजून घेतले पाहीजे. ब्लॉग, फेसबुक, व्हाट्सऍप अशा समूह संपर्क साधनांचा उपयोग संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आपण अधिकाधिक प्रमाणात केला पाहीजे. मौखिक, लिखित आणि आता मुद्रित हे बदल विकासात्मक आहेत. आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक आहे.

आपण संस्कृत भाषेत काव्यलेखन करता त्याविषयी काय सांगाल?
संस्कृत भाषेत काव्य दोन प्रकारचे असते. गद्य काव्य आणि पद्य काव्य. पद्य काव्य वृत्तबद्ध असते. अनुष्टुप्, भुजंगप्रयात अशी अनेक वृत्तं आपण जाणतो. मी संस्कृतात अशा वृत्तबद्ध श्लोकात्मक काव्यरचना करू शकतो हे मलाच माहीत नव्हते. टिळक महाविद्यालयातील ज्येष्ठ सहकार्‍यांनी काव्यरचनेबाबत सूचविले आणि दोन-तीन वर्षांत एक हजाराहून अधिक श्लोकात्मक रचना विविध वृत्तांमध्ये करता आल्या. सूचत गेल्या. त्या ब्लॉगवर शेअर करीत गेलो. लोकांचे प्रोत्साहन मिळत गेले. मिळतेय. ब्लॉग आणि फेसबुक यांचा या संदर्भात फार चांगला उपयोग झाला. संस्कृतात आधुनिक काव्य निर्माण झाले पाहीजे, हा माझा आग्रह आहे. कारण काव्यात समकालीन विषय येत असतात. ते विषय लोकांना अपिलिंग असतात. त्यामुळे समाजमन त्या भाषेकडे वळत असते. अनेक संस्कृतज्ज्ञ मंडळी यासाठी प्रयत्नरत आहेत. विकिपिडीयावर देखील संस्कृत साहित्याबाबत पुष्कळ माहिती आहे. आज राजकीय नेत्यांच्या वेबसाईट्स देखील संस्कृतात तयार होत आहेत.

संस्कृत विषयाच्या अध्यापनासंदर्भात आपण कोण कोणते नवीन उपक्रम करता?
गरज ही शोधाची जननी असते पण आपण गरज उत्पन्न होण्यापूर्वी शोध केला तर ते अधिक सकारात्मक ठरतं. संस्कृत-अभिरुची-संवर्धन-कार्यक्रम आम्ही म्हणजे मी, माझे विद्यार्थी, मित्र यांनी तयार केला. तो एका शाळेत राबवला. त्याची परिणामकारकता तपासून पाहीली. तो प्रयोग यशस्वी झाला. त्याचे सादरीकरण एन. सी. ई. आर. टी. दिल्ली येथे केले. शाळांमध्ये कौशल्यपूर्ण संस्कृत शिक्षकांची गरज आहे. इंग्रजी, संस्कृत माध्यमातून संस्कृत अध्यापनाचं कौशल्य असणारे शिक्षक शाळांना हवे आहेत, हे लक्षात आलं. त्यासाठी अलीकडेच एक स्वतंत्र एक वर्षाचा अभ्यासक्रम तयार केला आणि तो अभ्यासक्रम टिळक शिक्षण महाविद्यालय, पुणे येथे सुरु देखील केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

संस्कृतभाषेच्या प्रसारासाठी आपल्या आगामी योजना काय आहेत?
हल्ली चॅनल्स, वृत्तपत्र यात काही वेळा भाषिक व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या चूका आपल्याला दिसून येतात. त्यामुळे संस्कृत व्याकरणाच्या आधारे पत्रकारांसाठी शुद्धलेखनाबाबत क्रॅशकोर्स तयार करण्याची एक योजना आहे. तसेच संस्कृत अध्ययनासाठी काही ऑनलाईन कोर्सेस, ऍप्स तयार करण्याच्या योजना आहेत. ‘चपराक’ या आघाडीच्या प्रकाशनातर्फे लवकरच संस्कृत भाषाध्यापनावरील पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्याला राष्ट्रीय संस्कृत संस्थान दिल्लीचे अंशत: अनुदान देखील मंजूर झालेले आहे.

॥ संस्कृतस्य जीवनं, संस्कृताय जीवनम् ॥

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

6 Thoughts to “आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक!”

 1. man

  अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम

 2. Vinod s.Panchbhai

  खूपच छान!
  संस्कृत बद्दल अतिशय उपयुक्त माहिती …

 3. चंद्रहास शास्त्री

  सादर धन्यवाद!

 4. Abhijnan

  डॉ. शास्त्रीजींची मुलाखत म्हणजे ज्ञानाचा खजिना……!

 5. Prachi

  खूप छान!
  अतीव उत्तमम् !

 6. Mrs Aparna Anil Bhalerao.

  खरं संस्कृत ही भारतातील प्रथम (मुळ) भाषा आहे. ह्या भाषेचा प्रयोग रोजच्या जीवनात करायला हवा. श्री चंद्रहास शास्त्रीजी यांच्या मुलाखतीतील भाष्यास आम्ही सहमत आहोत.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा