पत्र आणि पत्रावळ

पत्र आणि पत्रावळ

आजच्या संगणक किंवा मोबाईलच्या युगात पत्रलेखन हा कालबाह्य पर्याय असावा. कोरा कागद, शाईचं पेन आणि मनाच्या झर्‍यातून वाहतं खळखळ पाणी. पांढर्‍या शुभ्र कागदावरचं ते टपोर्‍या मोत्यांसारखं अक्षर वाचताना समोरचा हरखून जाई कधीकाळी.

मजकूराच्या इतकंच त्यातल्या वळणदार वा गिचमिड अक्षराला महत्त्व होतं पण आता मात्र गेले ते दिन गेले म्हणायची वेळ आलीये. मोबाईलच्या एका रिंगने समोरचा उपलब्ध होतो. काम, निरोप, व्यक्त होणं या संदर्भात जे जसं असेल तसं माणूस बोलतो, संपला विषय. भावनांना तसा थारा कमीच. समाज जास्तीत जास्त व्यवहारी बनत चाललाय.

वाचनातून पुढे आलेला भुर्जपत्राचा काळ आठवतोय आत्ता मला. कमीत कमी साधनातून भावनांचं प्रगटीकरण! मोरपिसाची लेखणी, फुलांचे किंवा वनस्पतींचे रंग आणि साकारलं जायचं ते पानावरील पत्र. त्या लिखाणाला कदाचित मर्यादा असतील पण त्यातले भाव वाचणार्‍याच्या मनाचा किती ठाव घेत असतील? त्यातला एखादा संकेत, एखादा इशारा, प्रेमळ अभिव्यक्ती काहीही असेल पण मानवी हातांचा खराखुरा आपल्यापर्यंत पोहोचणारा स्पर्श त्याला होता. आता माध्यमच बदललंय. बोटं तीच पण स्पर्शाचं माध्यम बदललंय आणि भाव ते मात्र अंमळ कोरडे झालेत. शुष्क जणू. भावनेची लसलस कमी झालीय.

एक मात्र लक्षात आलंय, की शालेय अभ्यासक्रमात मात्र पत्रलेखनाला पर्याय नाही. अगदी चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पत्रलेखन आवर्जून शिकवलं जातं. ‘फॉर्मल आणि इनफॉर्मल’मधला फरक समजावला जातो. त्याच्या पायर्‍या लक्षात आणून दिल्या जातात. म्हणजे मग ते पत्र अजूनही जिवंत आहे कारण पत्रलेखनातील जादू काही औरच आहे. नेमक्या शब्दात आपल्या भावना पोहचवणं, हे कसब आहे. ऐंशी नव्वदच्या दशकापर्यंत व्यक्त होण्याचा पत्र हा राजमार्ग होता. मनातले विचार आपल्या कुवतीनुसार प्रभावी शब्दात मांडून इच्छित व्यक्तिकडे पोहचवण्याचा तो हुकमी एक्का होता. काळ नावाच्या राक्षसाने बरेच काही पळवले, त्यात पत्रलेखनही गेलं.

प्रत्येक पत्राच असं वेगळ व्यक्तिमत्त्व होतं. जसं पोस्टकार्ड, सरळ साधं, रोखठोक! लिहिलेला मजकूर कोणीही वाचावा असा. थोडंसं खाजगी असेल तर झाकता येणारं आंतर्देशीय पत्र. हिरव्या किंवा निळ्या रंगाचं! जरासं लाजरंबुजरं. घुंगटातून डोकावणार्‍या चेहर्‍यासारखं पण व्यवस्थित घडी घातलेलं. आतला मजकूर तसा वाचायला कठीण पण न फोडता हे पत्र वाचायचा प्रयत्न मात्र अनेकदा व्हायचा आणि अगदी दिल की बात असेल तर मात्र बंद पाकीट! पाकीटाच्या जाडीवरूनच आतल्या मजकुराची कल्पना वाचणार्‍याला यावी आणि मग अगदी हलक्या हाताने ते पाकीट फोडणं हे कौशल्य असे. भावनांचा आरसा म्हणजे प्रेमीजनांची ही बंद पाकीटं! बंद पाकीट पण ते जर वजनानं हलकं असेल तर समजावं की शब्दांनी असहकार पुकारलेला असावा किंवा नात्यांचे रंग विटलेले असावेत.

आपण फक्त अंदाज बांधतोय पण त्रयस्थ भावनेनं नोकरी करणार्‍या त्या पोस्टमनने किती भावनांचं वितरण केलं असेल? त्यातल्या काही वाचता आल्या असतील का त्याला? की तो फक्त कोरडाच राहिला असेल यातून? काही पत्र ही मनाला हुरहूर लावणारी किंवा हुरहूर वाढवणारी असतात. पत्र वाट पहायला लावतात. सध्या सेकंदाला मेसेज येतात जातात तेव्हा आठवडे लागायचे पत्र मिळायला. तेव्हा पत्रांना सुगंधही असायचा. पण तो नाकाला नाही मनाला जाणवणारा असे. एक पत्र वाचून संपताना दुसर्‍याची प्रतीक्षा स्वस्थ बसू देत नसे. भल्याभल्यांनाही पत्रलेखनाचा मोह सुटला नाही, आम्ही तर सामान्य माणसं. व्यक्त होण्याचा साधा, सरळ नामचिन मार्ग! हल्ली कोणाची पत्रं येत नाहीत किंवा पाठवलीही जात नाहीत. आयुष्याचा एक हिस्साच हरवून गेल्यासारखं वाटतं मग. पंगत उठल्यावर उकिरड्यात फेकून दिलेल्या पत्रावळीच्या वेदना होतात मनाला.

-नीता जयवंत
अंबरनाथ
9637749790

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा