कस्तुरी गंध

कस्तुरी गंध

कुमुदिनी काय जाणे परिमळ ।
भ्रमर सकळ भोगितसे ॥

संत तुकोबांच्या या अभंगाला लतादीदींनी किती सुमधुर स्वरात गायलं आहे.

हा अभंग जाणिवेच्या एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातो. गहिरा अर्थ सांगून जातो. खरेच, कमळाला कुठं ठाऊक असतो ना त्याच्या अंतरीचा परिमळ? त्याचा भोग तर भ्रमरच घेत असतो.
आपलंही असंच होत काहीसं. स्वतःजवळ काय आहे हे बहुधा स्वतःलाच ठाऊक नसतं अन् त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही करत नाही. निबीड अरण्यामध्ये, तळपत्या उन्हात, हरीण मृगजळामागं सैरावैरा धावत राहतं. हा आभास आहे हे उमगत नाही त्याला. या आभासांचा पाठलाग करताना स्वतःच्या अंतरीचा सुगंध घ्यायलाही जमत नसेल बहुधा त्याला. की तोही अनभिज्ञ असेल? त्यालाही ठाऊक नसेल आपणही दरवळतो आहोत, सुगंधी, सुवासिक, मोहक ‘कस्तुरी गंध’ लेवून!

जगण्याच्या प्रवासात आपणही अहोरात्र पाठलाग करतो अशा कितीतरी आभासांचा. सध्यातर, मोबाईलच्या आत बंद असलेल्या आभासी जगात माणसं बंदिस्त होवू लागली आहेत. सोशल मीडियावर हजारोंशी संवाद साधणार्‍यांना मात्र घरातील व्यक्तिंशी संवाद साधायला वेळ नाहीये. माणसाच्या जाणिवाच बधीर होत चालल्या आहेत असं वाटतंय. कुणाला पैशाचं, कुणाला प्रतिष्ठेचं, सुखाचं, प्रसिद्धीचं… मृगजळ खुणावतं आहे. प्रत्येकाचं मृगजळ वेगळं. मात्र आपली अवस्था त्या मृगापेक्षा फारशी काही वेगळी नाहीये. धाव धाव धावतो या मृगजळामागं. ते गाठण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो अन् ते मात्र सतत हूल देत राहतं. अगदी समीप आलं आहे असं वाटत असताना ते दूरवर गेलेलं असतं. स्वतः जवळची सगळी ऊर्जा शक्ती खर्ची पडते पण समाधानाचा टिपूसही गवसत नाही. गलितगात्र नेत्रांनी बघत राहाण्याशिवाय हातात काहीच उरत नाही. सारं जगणंच सैरभैर होवून जातं. हतबलता येते.

ज्यासाठी आपण इतकं उतावीळ होतो, बेचैन होतो ते केवळ मृगजळ आहे हे ज्याचं त्याला समजलं तर किती बरं होईल ना? मग शोध सुरू होईल स्वत:चाच स्वतः मध्ये. खोल तळात रूतलेला, आतला गंध दरवळू लागेल अन् मोहाचे धागे हळूहळू निसटू लागतील अंतरीच्या जाणिवेतून. आपलाच परिमळ आपल्याला सुखावून जाईल. जगण्याला नवे आयाम मिळतील चैतन्याचे, स्वानंदाचे, परिपूर्णतेचे.

आपली आवड काय आहे, कोणत्या कामामुळं कष्टातूनही आनंद मिळतो, समाधान मिळतं. कोणतेही आभास नाहीत. कितीही धावलं तरीही थकवा येत नाही. ध्येयपूर्तीच्या प्रवासात मनाला चैतन्यमयी अनुभूती मिळते. जिथं दु:खाचा लवलेशदेखील नाही. फक्त ध्येयाचे भास, तेही अगदी समीप!

हा अंतरीचा कस्तुरीगंध प्रत्येकाला गवसला तर? जगण्याची फरफट नक्की थांबेल अन् सुरू होईल समाधानाचा प्रवास…!

-मीनाक्षी पाटोळे
राजगुरूनगर
9860557125

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “कस्तुरी गंध”

  1. Vinod s.Panchbhai

    अंतर्मुख करणारं लेखन!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा