कलंदर काकाची चाराछावणी!

कलंदर काकाची चाराछावणी!

Share this post on:

परिसरात चाराछावण्यांची चर्चा सुरु होती.
दुष्काळ पडलाय का? तर हो पडलाय!
कोणाला दुष्काळ आहे तर सर्व मुक्यापशूंना. चाराछावणीवाल्यांनी थोडा वाटून घेतलाय. माणसं या मोदीसरकारनं बिघडीलीत… आपसात एकच चर्चा…

‘‘लाल्या अनुदान आलं का?’’
‘‘ईमा आला का?’’
‘‘कर्ज माफ झालं का?’’
‘‘खालच्या बँकीत आलं का?’’
‘‘वरच्या बँकीत आलं का?’’
‘‘माव्ह संमदं कर्ज माफ झालं.’’
‘‘हे बग मेसिज आलाय.’’
याशिवाय बोलणं नाही की चर्चा नाही. हे वाईटच आहे. भिकार्‍याला तुकडे टाकल्यासारखे झालेय.
त्याच्यावर भीक मागण्याची पाळीच येऊ नये, अशी व्यवस्था सरकारने करावी.
शेतकरी मित्रहो, रासायनिक खताची गोणी 1500/ रुपयाला झाली. हे ऐकून डोळे पांढरे होतील… मनात आले डोळे उघडा!
हॉटेलमध्ये जाऊन शांतपणे कोण काय म्हणतेय, ते कान देऊन ऐकत होतो. बोलणारे बिनधास्त बोलत होते.
‘‘आमच्या छावणीतल्या बैलाला आज उपवास आहे.’’
‘‘आज टँकर आलंच नाही’’
‘‘आम्हाला तर काल दहा किलोच चारा दिला. पेंड तर बघायला मिळाली नाही.’’
‘‘च्यायला ते तपासणीवाले आले, खरं बोललो तर मला बैलासकट बिनाचारापाण्याचं छावणीवाल्यानं हाकीललं.’’
‘‘परवा असंच यकाला हाकीललं. तं तहसीलदारानं कसून चौकशी करुन खरा आकडा लिहिला. हाकीलल्याची दुसर्‍या छावणीत सोय केली.’’
‘‘आमच्या छावणीत आठवड्यात तीन-चार येळस तरी एकादस्या असत्यात. अधिकारी पैसे खाऊन सह्या ठोकतेत.’’
‘‘ये गड्यानू, ती मानूरची खलंदर पठाणची छावणीहे बा. यक छटाक कमी देत नाय. फिल्टरचं प्यायला पाणी. जेवानबी देतोय बिट्या. तशी छावणी जिल्ह्यात नाय म्हणतेत.’’
‘‘कुणाची छावणी?’’ मी विचारले.
‘‘खलंदरची, टाकळी वाटालाहे. पंधरासी-सोळासी गुर्र हाईत जणू.’’
‘‘आर्र यवढंच नाय. आज जर दोन किलू चारा कमी पडला तं उद्या, त्यो अठरा आन् कालचा दोन किलू, आसा ईस किलू चारा देतू… याला मंतेत माणूस…’’
मी बोलणं ऐकत होतो. मनात आलं आज कलंदर पठाण यांची छावणी बघायचीच. तालुक्यात चर्चा, गावागावात चर्चा. माणसामाणसात तोंडातोंडी चर्चा, नेमकं काय आहे बघूच, म्हणून निघालो…
सायंकाळची वेळ. आभाळ भकासवाणे. नुस्तं भर्राभर्रा वारं सुटलेलं, जमिनी सताड मेल्यावानी पडलेल्या. ढेकळं तसीच. थेंबच पडले नाही म्हणून मशागती नाही. पाऊस बी लई रागराग करु लागलाय. एखादं वर्ष चांगलं की, पुढचे दोन वर्ष टांग हाणलीच. शेतकर्‍यांनी सुधरायचंच नाही, त्याची दैना त्याचा पाठलाग सोडीना. मानूरच्या शिवारातून चाललो. गाव दिसत होते. रस्त्याच्या कडेला श्रीगुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज महाविद्यालय स्व. गुरुलिंग स्वामिंनी मेहनतीने आणलेले. नागनाथ मंदिराचे ते मठाधिपती होते. महाराजांचा संपर्क दांडगा होता. अधिकारी, राजकारणी यांच्यात उठबस असायची म्हणून मठाची कामं अडत नसत.
आता गावाजवळ आलो…
बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरचे गाव मानूर. शिरुर-कासार तालुक्यातले हे गाव. या गावात नागनाथांचे मंदिर आहे. दूरदूरवरुन भाविक भक्त दर्शनाला येतात. या मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळावा म्हणून गुरुलिंग स्वामींनी खूप प्रयत्न केले… गुरुलिंग स्वामी महाराजांचे ऐन उमेदीच्या काळात निधन झाले. त्यामुळे मानूरच्या विकासाला खीळ बसली. याच गावात प्राचीन अशी महत्त्वाची शिल्प आहेत. त्याचे जतन करायला शासकीय पुरातन कार्यालयास वेळ मिळत नाही. त्यामुळे ऐतिहासिक ठेव्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मठात शासनमान्य जंगली महाराज सार्वजनिक वाचनालय आहे. माजी आमदार राम पंडागळे याच गावचे. मुबईला गेले. आमदार झाले अन् गावाला विसरले. त्यांचे नाव घ्यावे अशी एकही योजना त्यांनी जन्मगावासाठी आणली नाही. कधीकधी प्रसंगाने ते मानूरला येतात, गावाने वाढवून मोठा झालेला हा एकमेव माणूस पण गावाबद्दल आस्था नाही,
… असं हे मानूर गाव.
गावातून टाकळी रोडकडे निघालो. अर्ध्या किलोमीटर अंतरावर कलंदर पठाण यांचे शेत. सूर्य मावळतीकडे झुकलेला… लाईट लागलेल्या, दुरून तर भव्य दिव्य दिसू लागले. मी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावली. पठाण कुटुंबाचा अन् माझा परिचय स्व. गुरुलिंग स्वामी यांच्यामुळे झाला. हे कुटुंब महाराजांचे-मठाचे भक्त. पठाण कुटुंबियाची आठ-दहा घरं असतील अन् बाकी इतर समाजाची. गुण्यागोविंदाने राहणारी. सर्वच लोक सर्व सण करतात. भेदाभेद नाहीच. याच गावचे अकबरशेठ पंचायत समिती सदस्य म्हणून बहुसंख्य हिंदू मतदारातून निवडून येतात. साखर कारखान्याचे संचालक होतात. अगदी याच गावचे सरपंच आणि पाटील मुस्लिमांपैकी होते. एवढे सख्य. कलंदर पठाण धर्माने मुस्लिम… पारंपरिकता सांगते पशूची विक्री करणे, कापून मटनाची विक्री करणे अशा उद्योगी माणसाला खाटीक म्हणतात. हा पोटापाण्याचा व्यवयाय. अशा कुटुंबात जन्म घेऊन पशूप्रेम सतीच्या वाणासारखे तळहातावर सांभाळणे महाकठीण. ते सहजशक्य केलेय ते पशूप्रेमी कलंदर पठाण यांनी.
‘‘तुमच्या चारा छावणीबद्दल जिल्हाभर लोक कौतुकाने बोलतात…’’ याबद्दल पठाण हसतच म्हणाले, ‘‘हे सगळं पशूंच्या आशीर्वादाने घडतेय. मी नाममात्र आहे.’’
चाराछावणीवर मुस्लिम बांधवाचे पशूधन पन्नासेक असतील. मग इतर कोणत्या समाजाचे पशूधन आहे हे आपण शोधा. या चाराछावणीत आलेल्या बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजबांधवाचे पशूधन आणि पशूपालक आहेत. या मंडळीसाठी कलंदर पठाण गळ्यातला ताईत बनलेत. म्हणून छावणीवर लोक त्यांना आपुलकीने ‘काका’ म्हणतात. एवढे प्रेम कलंदर यांना लोकांनी दिलेय… परंतु या राजकारण्यांनी हिंदू-मुसलमान तेढ निर्माण करुन; मुस्लिम खतरे मे, हिंदू खतरे मे अशी विषारी बीजं पेरली अन् एकमेकांच्या आपुलकीला गालबोट लागले… विष पेरुनही लोक आजही माणुसपणाने एकमेकांच्या सुखदुःखात जात-धर्माला गाडून धावून जातात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, रक्ताच्या थेंबाथेंबात समाजसेवा भिनलेले समाजसेवी, माणूस असलेले कलंदरकाका पठाण हे नाव जिल्हाभर आपल्या कार्याने चर्चेत आहेत.
कलंदर यांनी यापूर्वी 2004 ते 2019 या कालावधीत चार वेळा चाराछावणी चालवलीय. अनुभव दांडगा आहे. माणुसकी वाढवायची. मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद मिळावेत, त्यात मला आनंद मिळतो म्हणून हे कार्य आनंदाने करतो, असे ते म्हणाले.
रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला चारा छावणी दिसली. कार्यालयावरचा बोर्ड दिसला. स्व. खा. केशरबाई क्षीरसागर-काकु सह. संस्था संचलित जनावरांची चारा छावणी, मानूर, ता. शिरुर-कासार, जि. बीड. बोर्ड वाचला अन् पशूपालकांची धावपळ दिसू लागली. जनावरात बैल, गायी, म्हशी, वासरं होती. अधिक प्रमाणात बैलं, नंतर गायी, मग म्हशी असे मला दिसले. पश्चिमेकडील छावणीकडे चाललो, झाकड पडल्याने मला कोणी ओळखत नव्हते. जवळपास जनावरांच्या बैठका होऊन आळोखे-पिळोखे देत होते तर काही रवंथ करत होते. काही पशुमालक बैलाजवळच चटईवर, भुईवर लोळत होते. खाऊन शिल्लक राहिलेले खाद्य दावणीत दिसत होते. खाद्य ऊसाची कुटी होती. प्रत्येक दावणीत किमान टोपलंभर तरी खाद्य होतं. पाण्याची सोय नंबर एक. भरलेले तीन टँकर उभेच होते. पाणी मुबलकच मिळताना दिसले. निवार्‍याची सोय छानच.. एकटाच या लाईनीतून त्या लाईनीत पाहत हिंडत होतो. आता पूर्व दिशेतील छावणीकडे जनावरांच्या लाईनला निघालो… काहीच फरक नाही. तेच खाद्य. प्रमाणात काटकसर नाही. पाण्याची उत्तम सोय. सगळीकडे एकच नियम. कसलीच नाराजी नाही, कुरकुर नाही. ‘‘कलंदरभाई ये क्या जादू चलाई ईस गरीबो पर’’ असे माझे मनच मला बोलत होते.
यामुळे लोक पठाणांच्या छावणीचे गुणगान गातात, हे मनोमन पटले. चलत-चलत बैल सोडून नेलेल्या दावणीवर गेलो. हातात चारा घेतला. पाहिला. गारगार वाटला. तो ताजाच होता… टोपलंभर तरी तो चारा होता. म्हणजे इथे खाद्य नियमापेक्षा जास्त दिले जात होते… अहो कमतरता नाही, नाराजी नाही…
पारदर्शक व्यवहार मला दिसला. ऊसखाद्याची ट्रक उतरणे सुरु होते तर काहीजण जेवणाच्या तयारीला लागले. आता धावपळीला गती आली होती. जवळ जाऊन पाहिले तर चारा वाटप सुरु झालेले. शासनाच्या नियमाप्रमाने अठरा किलो मोठ्या जनावराला तर नऊ किलो लहान जनावरांना.
शेतकरी रांगेत उभे राहून शिस्तीने चारा घेताना पाहिले. कुटी असते, कधीकधी भुसाही असतो. चारा उपलब्ध होईल ते दिले जाते.
तर आठवड्यातून एका जनावरास तीन किलो पेंड दिली जाते. पेंडीच्या पोत्याची थप्पीच मी पाहत होतो. प्रत्येक दावणीजवळ पाण्याचे बँरल पशुपालकाने आणले आहे, ते जागेवरच भरून दिले जाते. याउपरही मोठा सिमेंटचा हौद आहे. त्या हौदावर एकावेळेस वीस-पंचवीस पशू सहज पाणी पिऊ शकतात… एकूण गैरसोय शोधत होतो परंतु सापडत नव्हती. चारा घेताना पशुपालक नसेल तर त्याला ऊसाची मोळी दिली जाते. तो मग आडकित्याने कापून पशूंना टाकतो. इथे एक दिसले, नाही हा शब्दच ऐकायला मिळाला नाही. नाही या शब्दाला हुशारीने कलंदर पठाण यांनी पर्याय निर्माण केलेत.
जेवणाची गोष्ट सांगायची राहिली…
या छावणीवर साधारणपणे पाच-सहा किलोमीटर अंतरावर पशूपालकांची गावं-घरं आहेत. दुपारपर्यंतच्या जेवणाचा प्रश्न येत नाही. प्रश्न असतो तो संध्याकाळच्या जेवणाचा. छावणीवर हॉटेल नाही. जवळपास खानावळ नाही. तेव्हा जेवण किंवा खायला मिळणे अशक्यच. एकेदिवशी रात्री दहा वाजता दोन-तीन शेतकरी ऊसाच्या डेपोकडे आले. प्रत्येकाने दोन दोन ऊसं मोडून दावणीकडे घेऊन गेले अन् खाऊ लागले… पशूंची रवंथ करीत बैठक चालू होती. सगळीकडे शांतता… फक्त या ऊस खाणार्‍या शेतकर्‍यांच्या खाण्याचा आवाज छावणीत येत होता. कलंदर पठाण यांनी या गोष्टीचा शोध घेतला. तेव्हा कळले या पशूपालकांची घरं, गावं दूर असल्यानं जेवणं-डब्बे आलेच नाहीत. म्हणून भुकेची आग विझवण्यासाठी ऊस खात होते. (जनावरांच्या भुकेसाठी; ऊसाची कुटी अन् पशूपालकाच्या भुकेलाही ऊसच?) हे पाहून हळव्या अन् माणूस असलेल्या कलंदरने त्या शेतकर्‍यांना पोटभर जेऊ घातले. त्याच्या दुसर्‍या दिवसापासून संध्याकाळचे जेवण स्वतःच्या खर्चाने नियमितपणे पशूपालकांना देणे सुरु झाले. जेवण घरच्यासारखेच. मी ती चव घेतली. कलंदरभाई आपण भूकेल्याला अन्न ही माणुसकी दाखवली. आपल्याला दंडवतच…!
मानूर गावात विविध जातीधर्माचे लोक राहतात. नागनाथ देवस्थानाची मोठी यात्रा भरते. त्यात लेकराबाळासह मुस्लिम बांधव सहभागीच नाही तर निर्णायक भूमिकेत असतात.
जातीनिहाय टक्केवारी अशी –
वंजारी 38%, मुस्लिम 18% , मराठा 10%, दलित 08%, धनगर 08%, माळी05%, वाणी 02%, तेली 02%, गोसावी 02%, ब्राह्मण 01%, कोल्हाटी 01%, भिल्ल 01%, सुतार 01%, कुंभार 01%, चांभार 01%, न्हावी 01% या जातीधर्माची लोकं माणसाप्रमाणे वागतात.
छावणीवर पशुपालक चिंतामुक्त आहेत. जनावरांनी बैठक मारली की ही माणसं एकमेकांशी गप्पा मारतात किंवा आराम करतात. हे नेहमीचेच आहे.
पशुंचे आरोग्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच पशुपालकांचेही. म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर प्लॉंट आहे. स्वच्छ आणि शुद्ध पाणी तेही पोटभर सतत मिळते.
रात्री लेखाचे टाइप करताना पाणी प्रश्न कसा हाताळताय याची माहिती घ्यायची होती. रात्रीचे दोन वाजले होते. लिहायचा-टाइप करायचा मूड होता. म्हणून मी कलंदरकाकांचे व्हाटस् ऍप पाहिले. टाइप करत असतानाचा नेटचा सिग्नल दिसू लागला. मी लगेच काही फोटो पाठवा, असा मेसेज पोष्ट केला. फोटो मिळू लागले अन् काकांनी फोन केला.
‘‘बोला सर!’’
‘‘अहो अशा दुष्काळात पाण्याचे काय?’’
‘‘सर हे बघा, आता पाण्याचे दोन टँकर आलेत…’’
रात्रीचे दोन वाजलेत. पशूपालक काकांच्या जिवावर झोपले. पशूसुद्धा रवंथ करण्यात मग्न अन् कलंदर काका पशूंना उद्या दिवसभर लागणार्‍या पाण्याच्या नियोजनात…
याला म्हणायचे माणूस.
मला कोणी विचारले, देव कुठे आहे?
तर मी सांगेन – प्रामाणिकपणे पशूंची काळजी जो कोणी चाराछावणी चालक घेतोय, त्याच्या हृदयात आहे. रात्रीच्या दोन वाजता देव, मला कलंदर पठाणांच्या हृदयात दिसला.
‘‘…पशूसाठीचे पाणी टँकरने वनवेवाडी, नागतळा, माळेवाडी येथून आणले जाते. कमीअधिक दिवसाकाठी दहा-बारा टँकर पाणी लागते. त्यात परवा एक बोअर घेतला. त्याला पशूंच्या आशीर्वादाने भरपूर पाणी लागले,’’ अशी माहिती चेअरमन कलंदर पठाण यांनी दिली. वीस एकराच्या परिसरात विस्तारलेली ही छावणी आज 1700 पशूसंख्या आहे. एकूण चाळीस कर्मचारी या छावणीवर पशूपालकांच्या सेवेत रात्रंदिवस आनंदाने काम करताना दिसून आले.
‘‘जेवायला बसा, जेवायला बसा’’ अशी आरोळी दादा महानोर याने ठोकली अन् लोक जेवायला रांगेत बसू लागले. तर वाढपेही वाढू लागले. मीसुद्धा पंगतीला भाजी वाढली. अशाही बिकट स्थितीत चेहर्‍यावर दुःख झाकून ही कष्टकरी माणसं आपल्या जनावरांसाठी खळखळून आनंदाने जगतात. हे फक्त शेतकरीच करु शकतो. इतरांची औकातच नाही… जनावरांची सोय झाली, मालकाच्या पोटाची सोय झाली! आणखी काय हवे! अशा दुष्काळी परिस्थितीत तहान आणि भूक छावणी मालकांनी वाटून घेतली. छावण्या नसत्या तर साठ-सत्तर टक्के जनावरे चारापाण्यावाचून तडफडून मेली असती, ही वस्तूस्थिती कोणीच नाकारु शकत नाही. गावशिवारातल्या विहिरी आटून गेल्या. बोअर कोरडे पडले. अन्नपाणी या समस्येमुळे लहान-मोठे पक्षी मरणाभेनं शिवार सोडून गेले. रानपक्षी माणसांच्या आश्रयाला आलेत. अशा बिकट परिस्थितीत शासन आणि छावणी चालकाचे योगदान अतिमहत्त्वाचे आहे.
पशूमालक आता मोडक्या फांदीवर आलेत. साठवणीचा पाऊस झाला की घर गाठणार आहेत. त्यांना पावसाची काळजी लागलीय. शेतीची चिंता लागलीय… शेती पेरायचीय, जगाला जगवायचेय… शेतकरी शेती पिकवतोय म्हणून आपल्याला दोन वेळचे अन्न खायला मिळतेय. हे उपकार आपण सारे काळजात जपूया.
आज शेतकर्‍यांवर वाईट वेळ आली. त्याला सामोरे जाण्यासाठी कलंदर पठाण यांच्यासारख्या मनाचा दिलदारपणा दाखवणार्‍याला आभाळभर शुभेच्छा देऊ!

-डॉ. भास्कर बडे
लातूर
चलभाष – 94225 52279

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!