महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. वारकरी संतांनी आपल्या विचारातून व कार्यातून समाजात प्रबोधन घडवून आणले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखोबा, संत मुक्ताई इत्यादी संतांच्या अभंगांनी समाजात जागृती घडवून आणतानाच मराठीला समृद्ध केले आहे. संतसाहित्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे व वर्तमानातही होत आहे. ‘संत वाटिकेतील जाईची वेल’ म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या संत जनाबाईंच्या निवडक अभंगांचा विवेचक अभ्यास प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी ‘संत जनाबाईंच्या निवडक अभंगांचा पुनर्विचार’ या ग्रंथातून केला आहे.
डॉ. बोबडे महिला महाविद्यालय, कराड येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून अध्यापनाचे कार्य करत असून त्यांच्या महिरप, मत्सालय, अग्निकुंड या कादंबर्यां प्रसिद्ध आहेत. त्यांचे काही समीक्षा ग्रंथ उपलब्ध असून एक व्यासंगी प्राध्यापक म्हणून ते ओळखले जातात.
सदर ग्रंथामध्ये पाच प्रकरणातून त्यांनी आपल्या विषयाची मांडणी केली आहे. ग्रंथ लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना डॉ. बोबडे म्हणतात, ‘संत जनाबाईंचे अभंग म्हणजे सुंदर भावगीते आहेत. स्त्री मनाचा हळूवारपणा, परंपरा आणि भक्तीभावनेची उत्कटता तिच्या अभंगामध्ये असली तरी तिच्या मनोवृत्तीमागे असणारे जे मनोविज्ञान आहे त्यांचा विचार फारसा कोणी केला नसल्यामुळे अनेकांनी तिने सांगितलेले चमत्कार जसेच्या तसे मान्य केले. त्या चमत्कारांमागे संत जनाबाईंच्या मनाची नेमकी भावना आणि भूमिका काय असावी याचा विचार होणे मला गरजेचे वाटल्यामुळेच काही निवडक अभंग घेऊन येथे त्यांचा पुनर्विचार करण्याचा हा प्रयत्न आहे. पुनर्विचार करताना श्रद्धा डोळस असाव्यात अशीही भूमिका ते स्पष्ट करतात.
‘नामयाची जनी’ असे म्हणवून घेणार्यात संत जनाबाईंच्या आत्मपर अभंगांचा पुनर्विचार डॉ. बोबडे यांनी पहिल्या प्रकरणात केला आहे. नामयाचे ठेवणे जनीस लाभले, स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास, डोईचा पदर आला खांद्यावरी इत्यादी अभंगांचे सोप्या भाषेत लेखकाने विवेचन केले आहे. पहिल्या प्रकरणाचा समारोप करताना लेखक म्हणतात, ‘संत जनाबाईने जागोजागी स्वतःचा उल्लेख ‘नामयाची जनी’ किंवा ‘नामयाची दासी जनी’ असा केला आहे. हा संत जनाबाईंचा तर मोठेपणा आहेच पण तिने स्वतःच संत नामदेवांनाही मोठेपणा दिलेला आहे.
दुसर्यास प्रकरणात संत जनाबाई आणि विठ्ठलामधील भक्तिभावनेचा पुनर्विचार लेखकाने केला आहे. संत जनाबाईंच्या अंतःकरणातील पांडुरंगाविषयीच्या भक्तीचा कळवळा अभंगांतून व्यक्त झालेला आहे. देवा देई गर्भवास, आई मेली बाप मेला। मज सांभाळी विठ्ठला॥ ये गं ये गं विठाबाई। माझे पंढरीचे आई॥ धरिला पंढरीचा चोर। गळा बांधोनिया दोर॥ झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी॥ डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी॥ नाम विठोबाचे घ्यावे। मग पाऊल टाकावे॥ अरे विठ्या विठ्या। मूळ मायेच्या कारट्या इत्यादी अभंगांचे सोदाहरण विवेचन डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी केले आहे. ‘धरिला पंढरीचा चोर’ या अभंगाचे विवेचन डॉ. बोबडे यांनी नेमकेपणाने केले आहे. ‘हा चोरही रम्य आहे आणि त्याची चोरीही रमणीय आहे. हा चोर म्हणजे चटोर असा चित्तचोर आहे’.
संत जनाबाईंनी अनुभवलेल्या काही क्षणचित्रांचा पुनर्विचार या तिसर्या प्रकरणात ज्ञानाचा सागर। सखा माझा ज्ञानेश्वर॥ परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्वरू॥ या अभंगातून संत ज्ञानेश्वरांविषयीचा आदर आढळतो. विठो माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा ॥ या अभंगातून सार्यात संतांचा मेळा आपल्या अंगाखांद्यावर गोळा करणारा विठू कसा लेकुरवाळाआहे हे अत्यंत जिव्हाळ्याच्या भूमिकेतून संत जनाबाईंनी रेखाटले आहे. या प्रकरणाच्या शेवटी निष्कर्ष नोंदवताना डॉ. बोबडे म्हणतात, ‘संत नामदेवांच्या घरात जरी जनाबाईला नीचत्वाची वागणूक मिळत नसली तरी देवाच्या दारात मात्र आपल्याला नीच म्हणून बाहेर थांबावे लागत असल्याबद्दलची खंत जनाबाईंच्या स्त्रीसुलभ मनात असल्याचे जाणवते.
चौथ्या प्रकरणात संत जनाबाईंच्या उपदेशवाणीपर निवडक अभंगांचा पुनर्विचार लेखकाने तपशीलवार केला आहे. चला पंढरीसी जाऊ। रखमादेवीवरा पाहू॥ मना लागो हाचि धंदा। रामकृष्ण हरि गोविंदा॥ स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास। साधुसंती ऐसे मज केले॥ इत्यादी अभंगावर विवेचन केले आहे. स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास… या अभंगाचा पुनर्विचार करताना डॉ. बोबडे म्हणतात, ‘ज्याकाळी संत जनाबाई जन्माला आली त्या काळी समाजाचा स्त्रीकडे आणि स्त्री जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा प्रगल्भ नसावा कारण त्या काळी समाजमनावर मनूच्या विचारसरणीचे प्राबल्य होते आणि मनूने ‘स्त्री आणि शूद्र यांना स्वातंत्र्य देऊ’ नये असे स्पष्टपणे म्हटल्यामुळे शूद्र समाजाची आणि स्त्री वर्गाची मनूच्या विचारसरणीमुळे स्पष्टपणे कुचंबणा होत होती.
‘जनी जपावी मनी’ या शेवटच्या प्रकरणात नाम फुकट चोखट। नाम घेतां नये वीट।, जेवी जेवी बा मुरारी। तुज वाढिली शिदोरी॥ पाषाणाचा देव बोलेचि ना कधी। हरि भवव्याधी केंवि घडे॥ आदी अभंगावर डॉ. बोबडे यांनी विवेचन केले आहे. या प्रकरणाच्या शेवटी डॉ. बोबडे म्हणतात, ‘एकंदरीत जनीची अभंगवाणी पुन्हा पुन्हा मनी घोळवावी आणि मनी आळवावी अशी आहे. तिच्या अभंगात तिने जरी अनेक चमत्कारिक प्रसंगांची वर्णने केली असली तरी ती तिच्या भक्तवत्सलतेतून आली आहेत. साहजिकच हे जसे स्त्रीमुक्तीचे गीत आहे तसेच श्रममुक्तीचेही गीत आहे.
डॉ. बोबडे यांनी स्पष्टपणे व डोळस दृष्टिकोनातून संत जनाबाईंच्या अभंगाचा पुनर्विचार सदर ग्रंथातून केला आहे. संतसाहित्याच्या अभ्यासकांबरोबरच वाचकांनाही हा ग्रंथ उपयुक्त आहे.
संत जनाबाईंच्या निवडक अभंगांचा पुनर्विचार
लेखक – डॉ. सुहासकुमार बोबडे, 8999600486
प्रकाशक – शांती पब्लिकेशन, पुणे
पृष्ठ – 160, मूल्य – 240
प्रा. डॉ. राजेंद्र थोरात
पुणे
9850017495