मोदी युग 2 परफॉर्मन्स व पॉप्युलॅरिटी

article by dadumiya

दादूमियॉं
राजकीय अभ्यासक, बडोदा
चलभाष : 9106621872

मला शनिवारी रात्री दहा वाजता कोल्हटकरांचा फोन आला. मी दवाखान्यातून नुकताच घरी आलो होतो व जेवण घ्यायच्या तयारीत होतो. फोनवर मला कोल्हटकर म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुमच्या मोदींना मानले. ते पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून येणार यात शंका नाही.’’
‘‘कोल्हटकर, तुम्हाला एकदम काय झाले? संध्याकाळी तर तुम्ही राहुलच्या बाजूने बोलत होतात?’


‘‘ती चूक होती. म्हणून तर तुम्हाला आता फोन केला.’’
‘‘पण असे काय झाले आणि तुम्ही तुमचे मत बदलले? मी आत्ताच दवाखान्यातून परत येत आहे. ताजे असे काय घडले व तुमचे मत पालटले?’’
‘‘सांगतो सारी हकीकत. तुम्ही आधी जेवून घ्या. मी तुम्हाला पुन्हा फोन करतो.’’
त्यांचा नंतर फोन आला. त्यात ते म्हणाले, ‘‘तुम्ही सतत जे परफॉर्मन्स म्हणता ते अनुभवले. मोदी केदारनाथच्या भेटीस गेले. आपण तेथे दोन दिवस राहणार, असे त्यांनी जाहीर केले. तेथे त्यांनी शिवाची व्यवस्थित पूजा केली. अठरा तास गुहेत बसून ध्यान केले. मी सेक्युलर समाजवादी आहे. मला धार्मिक शेरे काही करायचे नाहीत पण या सर्वांचा उत्तर प्रदेशातील जनतेवर केवढा मोठा परिणाम होईल हे मी चांगले जाणतो. मोदी हॅज वन.’’
गेला महिनाभर माझी व कोल्हटकरांची रोज ही चर्चा चालू आहे. सुरुवातीला रोज तीन-चार फोन यायचे. हळूहळू ते कमी होत गेले. महिनाभर निवडणूक म्हणजे शेवटी शेवटी तर कंटाळा येऊ लागला होता. शेवटी ममतांनी जरा मजा आणली. तिच्या हिस्टेरीकल वागण्याने व बोलण्याने पुन्हा आमच्यातील फोन वाढले.
कोल्हटकर समाजवादी व मी हिंदुत्त्ववादी. मोदी आता हरणार, असे त्यांचे मन त्यांना सांगे व तसे ते मला वारंवार बोलून दाखवित. मी त्यांना सांगे, ‘‘मोदी हा परफॉर्मर आहे, तो सरतेशेवटी जादू करेेल व जिंकेल. पहा तुम्ही.’’ हे आजचे नाही, ते 2014 सालपासून चालू आहे. त्याही वेळा ते मला ‘‘मोदी तर हरणारच’’, असे सांगत. मी त्यांना खात्रीपूर्वक सांगे, ‘‘मोदी हरुच शकत नाहीत.’’
त्यावेळच्या निवडणुकीच्या मोसमात कुबेर बडोद्यास माझ्याकडे आले होते. त्यावेळी ते ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे पत्रकार होते.
त्यांना देखील मी तेवढ्याच खात्रीपूर्वक सांगितले होते, मोदी येणार. त्यांनी विचारले, ‘‘शंभर टक्के?’’
मी म्हणालो, ‘‘नाही, दोनशे टक्के.’’
मोदी निवडून आल्यावर व ते पंतप्रधान झाल्यावर कुबेरांनी मला फोन करुन सांगितले, ‘‘तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मोदी निवडून आले व ते पंतप्रधान होणार. मला ताबडतोब त्यांच्यावर एक लेख लिहून पाठवा, हे असे का झाले? मी वाट पाहत आहे.’’
ह्यावेळी ते इकॉनॉमिक टाइम्समध्ये नव्हते. ते ‘लोकसत्ते’चे संपादक झाले होते. त्यांच्या विनंतीनुसार मी लेख धाडला. लोकांना तो फार आवडला. तो रविवार होता. थेट मध्यरात्रीपर्यंत मला लोकांनी लेख आवडल्याचे फोन केले होते. लेखात मी तीन गोष्टींवर भर दिला होता. मोदी संघाचे स्वयंसेवक होते, त्यांना संघाच्या दोन गुरुंनी राजकीय शिक्षण दिले-बडोद्याचे लक्ष्मणराव इनामदार व अहमदाबादचे वसंतराव गजेंद्रगडकर. वकील उर्फ इनामदारांनी त्यांना कायदेशीरपणा शिकवला. जे कराल ते साधे व सरळ करा. गजेंद्रगडकरांनी त्यांना नेतृत्वाचे गुण शिकवले. विशेषत: पॉप्युलॅरिटीसाठी आवश्यक असणारा परफॉर्मन्स. बोथ आर अ मस्ट! लोकशाहीत पॉप्युलर नसाल तर तुम्ही नेते बनूच शकत नाही. तुमचा परफॉर्मन्स नसेल तर तुम्ही पॉप्युलर होऊच शकत नाहीत. परफॉर्मन्स नसेल तरीही तो केल्याचा आव आणणे व त्याचा दावा करणे म्हणजे राजकारण. याचा सरळ अर्थ, राजकारण खरेच असते असे नाही, तो खोटा दावा असू शकतो. पण तो दावा खरा आहे हे पटविणारे वक्तृत्व तुमच्या जवळ पाहिजे. खोट्या गोष्टी झाकण्यासाठी तुमच्याजवळ पडदा पाहिजे. पडदा मोठा व मजबूत पाहिजे. पडदा सांभाळणारा तेवढा उस्ताद पाहिजे. मुख्य म्हणजे तो विश्वासू पाहिजे. बडबड्या नको. मोदींनी आल्या आल्या ते काम आधी केले. अमित शहांना पक्षाचे अध्यक्ष बनवून टाकले. मोदी 14 वर्ष मुख्यमंत्री राहिले याचे कारण अमित शहांचे संपूर्ण सहाय्य. कॉंग्रसने त्यांना गुजरात राज्याच्या बाहेर काढले होते. पूर्ण पाच वर्ष मोदी व शहा यांनी पडद्याबाहेर राज्य केले. व्यासपीठावर सतत फक्त ते दोघे होते. बाकीची पात्रे फक्त येत व जात. शहांनी पडद्यामागे काय काय गोष्टी केल्या ते कोणासच माहीत नाही. त्याची गरज नाही. व्यासपीठावर झाला तो परफॉर्मन्स.

आणीबाणीत महाराष्ट्रातून ना. ग. गोरे, एसेम जोशी वगैरे मोठे समाजवादी नेते माझ्या घरी उतरत. त्यावेळी आमच्यात चर्चा होई. तरुण मोदी तेथे येत व शांतपणे ती चर्चा ऐकत असत. त्यानंतर आमचे चहापाणी होई. मोदी कपबशा धुऊन आणत व या नेत्यांकडून शाबासकी मिळवत. मी त्यांना रागावे. त्यावर ते म्हणत, ‘‘हे समाजवादी, आपण हिंदुत्ववादी. या दोघांत मी मैत्री घडवून आणली तर तुमचा काही विरोध आहे का?’’ मी हसून त्यांना म्हणे, ‘‘चालू दे तुझी नाटकबाजी, त्यास माझा विरोध नाही.’’ त्या काळापासून मी मोदींच्या परफॉर्मन्सचा साक्षी आहे. बाप रे, व्हॉट अ परफॉर्मन्स!
मोदींनी मला परफॉर्मन्सचा अभ्यास करण्यास शिकवले. आगरकर चुकीचे नव्हते ते आज आपण चांगले अनुभवतो पण परफॉर्मर टिळक ‘लोकमान्य’ बनले व अमर झाले. गांधी, नेहरु व इंदिरा परफॉर्मर होते व ते त्याकाळी घोडचुका केल्या तरी अमर होते. सावरकर परफॉर्मर होते तोपर्यंत गाजले म्हणून इंग्रजांनी त्यांना अंदमानात डांबून त्यावर झाकण बसविले. त्यांचा परफॉर्मन्स दिसू नये त्यासाठी त्यांना रत्नागिरीत डांबले. कॉंगे्रसने त्यांना सोेडले नाही, त्यांना कुपर समितीने मोकळे केले व या आजारी सावरकरांच्या परफॉर्मन्सने भारतास वेडे बनविले. त्यांनी अपमानित सुभाषबाबूंना जर्मनीस धाडले, पुढे जपानची मदत घ्यायला लावले व भारताबाहेरच्या स्वतंत्र राज्याचे प्रमुख बनले. माय गॉड, व्हॉट ए परफॉर्मन्स!

तो झाकून टाकण्यासाठी नेहरुंनी सावरकरांना व संघास गांधी खुनाच्या केसमध्ये अडकवून टाकले. कॉंग्रेसच्या दृष्टिकोनातून तो नेहरुंचा सर्वात मोठा परफॉर्मन्स होता. सावरकर लोकसभेत येण्याचा मार्गच त्यांनी बंद करुन टाकला. खुन्याला कोण मत देणार? इंदिरेच्या हत्येचा पूर्ण फायदा घेऊन राजीवने 400च्या वर जागा जिंकून निवडणुकीत बडा परफॉर्मन्स दाखविला पण व्ही. पी. सिंगांनी बोर्फोस गन वापरुन केवळ परफॉर्मन्सच्या जोरावर राजीवला निष्प्रभ केले. मंडल कमिशनच्या वेडेपणामुळे त्यांना अकरा महिने व आठ दिवसानंतर पंतप्रधानपद सोडावे लागले व त्यानंतर जमाना नरसिंगराव व वाजपेयींचा होता. दोघे सिझन्ड परफॉर्मर होते. एकाने भारताचे आर्थिक धोरण बदलले तर दुसर्यावने भारतास न्युक्लिअर क्लबात दाखल केले. त्यावेळच्या छोट्या नरेंद्र मोदीसाठी तो परफॉर्मन्सचा मोठा धडा होता. कच्छच्या भूकंपाच्या निमित्ताने त्यांना भ्रष्टाचारी केशूभाईंना हटवून मुख्यमंत्री व्हायची व नंतर चाळीस रामभक्तांना जाळणार्यांचवर सूड घ्यायची संधी मिळाली व ते हिंदूहृदयसम्राट बनले. तेथून पंतप्रधानपदावर उडी मारणे हे या परफॉर्मरला अवघड नव्हते.

मोदींपासून जगाने काय शिकावे?
आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी मी लोकांना वसंत गजेंद्रगडकरांनी मोदींना शिकविलेले पुढील मंत्र सांगतो :
लोकप्रियता :
1) Being known by everybody is not the same as one being loved by everybody.
2) you have to pay the price for your popularity.
3) the price is your performance.
कार्यशीलपणा :
1) people prefer performance
2) if you perform,then do it the best
3) performance demands preparation.
4) but don’t mistake activity with achievement.

विरोधी ‘आऊट’
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून विरोधकांना दुर्बल करुन सोडायच्या त्यांच्या नीतीमुळे त्यांच्या शासनास एक प्रकारची स्थिरता मिळाली आहे. त्या आधी केशूभाई पटेल विरोधी नेत्यांना चक्क ‘विकत घेत’. ‘‘भले, तुम्ही सत्तेवर नाही पण राजकारणात तुम्ही पैसे कमविण्यासाठी आलात, ते पैसे तुम्हाला मिळत राहतील त्याची मी व्यवस्था करतो, तुम्ही घाबरु नका.’’ असे केशूभाईंचे धोरण होते. त्यामुळे विरोधक त्यांना त्रास देत नसत पण त्यामुळे राज्यात भ्रष्टाचार फार वाढला. भ्रष्टाचार वाढला की ‘लॉ अँड ऑर्डर’च्या समस्या निर्माण होतात. या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर केशूभाईंना जावे लागले. त्यांच्या जागी मोदी आले. त्याच मुद्यावर मोदी पुढे दिल्लीत आले. 2014 व 2019 च्या निवडणुकींमुळे मोदींचे विरोधी अगदी कमजोर व निष्क्रीय होऊन गेले आहेत. पाच वर्षांच्या निरोद्योगामुळे ते आणखी कमजोर होत गेले व भाजपाचा विजय नक्की करतील.

राहुल व कॉंग्रेस कोठे कमी पडली?
1. राहुल पूर्वी पप्पू म्हणून एवढा टवाळला गेला की मोदींशी करिष्मा, क्रेडीट व कम्युनिकेशन स्कील या गोष्टीत त्या दोघांची तुलना होऊ शकत नव्हती.
2. राहुलची सल्ला देणारी टीम ‘स्थिर’ नव्हती. तेथील लोक सारखे बदलत रहायचे. आज अहमद पटेल व रणदीप सुरजेवाला त्याचे सल्लागार असत तर उद्या ते बदलून के. सी. वेणूगोपाल आणि राजीव सातव त्यास सल्ला देत. त्यामुळे आज जर ते बालाकोटच्या एअर स्ट्राईकच्या सरकारच्या बाजूने असतील तर उद्या ते विरुद्ध असायचे.
3. राफेल लढाऊ विमानाच्या बाबतीत राहुल मोदींच्या विरुद्ध होता. ग्रामीण प्रजेला त्यात मोदींनी नेमका भ्रष्टाचार केला काय ते समजावणे अवघड काम होते. मोदींची प्रतिमा भ्रष्टाचारविरोधी होती. राहुल त्यांनाच भ्रष्टाचारी ठरवत होता. बाजू राहुलवर उलटली.
4. गेल्या पाच वर्षात कॉंग्रेस पक्षाची संघटना बांधण्याचे काम कोणी केेलेच नाही. मोठ्या राज्यात ˆ उत्तर प्रदेश, प.बंगाल. बिहार, तमीळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा ˆ कॉंग्रेसचे काम ठप्प झाले होते. त्यांच्या 243 जागा होत्या. त्यात कॉंग्रेस ‘मार्जिनल प्लेअर’ होती.
5. काही राज्यात-मध्यप्रदेश, गुजरात, आसाम व उत्तराखंड- कॉंग्रेसपक्ष टिकून आहे पण तेथे स्थानिक नेतृत्व वाढविण्याची काहीच कोशीश केली गेली नाही. राजस्थानात सचिन पायलट, महाराष्ट्रात अशोक चव्हाण व कर्नाटकात सिद्धरामय्या यांना पक्षाचा विस्तार करण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते पण त्यांना घोटाळे करण्याची सवय होती, काम करण्याची नव्हती.
6. राहुलने काही न समजण्यासारख्या नेमणुका केल्या. त्या अनुत्पादक ठरल्या. आसामात हरीश रावतला नेमले. त्याला आसामची काहीच माहिती नव्हती. तो उत्तराखंडचा तज्ज्ञ होता. शक्तिसिंग गोहील गुजरातचा स्कॉलर आहे पण त्याला बिहारचा इनचार्ज नेमला. बिहारमध्ये कॉंग्रेसला फारसे स्थान नाही. मल्लिकार्जुन खडगे यांना कर्नाटकचे संपूर्ण ज्ञान आहे पण त्यांना महाराष्ट्राचा इनचार्ज केले. गौरव गोगोईंना फारसा अनुभव नाही. त्यांना प. बंगालचे प्रमुख बनविण्यात आले. ज्यांना ज्ञान नाही, कामाचा अनुभव नाही, अशांना महत्त्वाच्या जागा देऊन कामात यश कसे मिळणार?
7. सोशल मीडियावर कॉंग्रेसने भाजपला चांगला लढा दिला पण कॉंग्रेस निरनिराळ्या खात्यात सहकार्य आणण्याची विसरली. सहकार्य नाही म्हणजे साथ नाही म्हणजे कामात विकास नाही. प्रत्येक खात्यात काम खूप असते त्यामुळे अहंकाराच्या समस्या फार. त्या सोडविण्यासाठी कोणी मोठा लागतो, तो मनभेद जास्त वाढू देत नाही व समस्या मिटवतो. तसे होऊ शकले नाही.
8. खेळाची दिशा बदलण्यासाठी ‘न्याय’ निर्माण केला गेला पण तो निर्माण करण्यात फार उशीर झाला होता. राहुलशिवाय त्यास कोणी वापरलेच नाही.
9. राहुलचा शिवभक्त ज्ञाने उद्धरीचा नवा हिंदू अवतार भाजपची नक्कल वाटली. उत्तर प्रदेश, प.बंगाल व आसाम या तीन महत्त्वाच्या राज्यात पूर्वी कॉंग्रेसला मुस्लिम व्होट बँकेचा मोठा फायदा होई. या नव्या अवतारामुळे हा हक्काचा फायदा नाहिसा झाला. कॉंग्रेसने सपा व बसपा यांच्याशी समझोता केला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यांना मार खावा लागला. दिल्लीत कॉंग्रेसने आपबरोबर हातमिळवणी केली नाही त्यामुळे भाजपास तेथे फायदा मिळाला नाही.
10. कॉंग्रेसला खरोखरीच फंडाचा अभाव होता. त्यांचा जो काही मर्यादित फंड आहे तो देखील उमेदवारांपर्यंत पोचू शकला नाही.

मोदींची डोकेदुखी
1. आर्थिक अडचणी : संघ काय किंवा हिंदू महासभा काय, त्यांचे अर्थशास्त्राशी नाते शून्य असे. त्याकाळी अर्थशास्त्र फारसे गुंतागुंतीचे नव्हते. आज तर ते आंतरराष्ट्रीय बनले आहे. कॉम्प्युटर युगात ते जास्त क्लिष्ट व गुंतागुंतीचे बनले आहे. सोनियाने मनमोहन सिंगाना पंतप्रधान व अर्थमंत्री बनवून तिचे शासकीय काम सोपे करुन टाकले होते. मोदींना चांगला अर्थमंत्री मिळू शकला नाही. जो होता तो अर्थशास्त्री नव्हता, तो सुप्रीम कोर्टाचा वकील होता. त्यांनी मोदींचा बचाव चांगला केला. ते अर्थशास्त्री असते तर नोटबंदीतील उतावीळपणा त्यांनी थांबवला असता.
मोदींचे आर्थिक निर्णय चांगले होते, दानत शुद्ध होती पण अनुभव नसल्यामुळे घोटाळे खूप झाले. अमित शहा अर्थमंत्री झाले तर घोटाळे वाढतील.
2. भ्रष्टाचार : पंजाबचे मुख्यमंत्री फार भ्रष्टाचारी आहेत अशी तक्रार नेहरुंना सतत करण्यात येत होती. नेहरुंनी तिकडे लक्ष दिले नाही. ‘‘तो काळा पैसा शेवटी भारतात राहतो ना?’’ असा नेहरुंचा प्रश्नु असायचा. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या काळी त्यांचा खून करण्यात आला. इंदिरेचे तेच धोरण होते. विकास होतो आहे ना? मग थोडा भ्रष्टाचार झाला तरी चालेल, असे तिचे धोरण होते. राजीवला बोफोर्सच्या भ्रष्टाचारात सत्ता सोडावी लागली. मोदींसमोर हा फार मोठा प्रश्नण आहे. त्यांच्या पहिल्या टर्मवरुन ते तो प्रश्नर सोडवू शकतील असे वाटते. काळ ते ठरवेल.
3. लोकसंख्या : चीन कम्युनिस्ट असल्यामुळे त्याने ती समस्या बरीच सोडविली. आपण लोकशाही मानतो. मतांसाठी कोणास दुखविणे म्हणजे मोठे पाप असते. मुसलमान व ख्रिस्ती यांनी लोकसंख्या नियंत्रण मानायचे नाही कारण ते त्यांच्या धर्माविरुद्ध आहे. आजवर ते चालले. मोदींनी तेथे सैलसर धोरण ठेवले तर भारत उद्या इस्लामी देश होणार यात शंका नाही. मोदींची ही फार मोठी परीक्षा आहे. त्या बाबतीत मोदींना गांधीजी सोडून सावरकरांनाच फॉलो करावे लागेल. हिंदुनी नियंत्रण केले आहे पण ते पुण्य आज पाप ठरत आहे.
4. भारतीय मुसलमान : भारताची फाळणी झाली ती धर्मावरुन. गांधीजींनी व नेहरुंनी भारतास निधर्मी म्हणजे मुसलमानांचे लांगुलचालन असे धोरण स्वीकारुन या देशाचा आर्थिक विकास खड्ड्यात टाकला. ‘आधी आमच्या देशाचा कायदा मग तुमचा धर्म’ असे आता धीटपणे त्यांना सांगण्याची वेळ आली आहे. ते मोदींनी केले नाही तर उद्या ते नायकाच्या ऐवजी खलनायक समजले जातील. उत्तर प्रदेशात त्यानी योगींना आणून तेथे जो राष्ट्रवाद स्थापन केला आहेे त्यावरुन ते ती चूक करणार नाहीत असे वाटते.
5. पाकिस्तान : इंदिरेची इच्छा होती की पाकिस्तान म्हणजे फक्त पंजाब, सिंध, बलुचिस्तान वगैेरे इतर प्रांतांनी स्वतंत्र व्हावे. मोदींनी इंदिरेचे अर्धे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे. त्यासाठी भारतीय मुसलमानांना त्यांनी प्रथम सरळ करावे लागेल. त्यांना मदत करणार्याा सर्व विरोधी गटांना साफ करावे लागेल. त्यासाठी आतंकवाद विरोधाचे जे धोरण स्वीकारले आहे ते अत्यंत उपयोगी आहे पण हे सारे अवघड आहे. पाकिस्तानला सध्या चीन संपूर्ण मदत करतो. एवढे सारे कार्य यशस्वी करायचे म्हणजे केवढा पैसा पाहिजे! त्यासाठी आपली आर्थिक नीती मजबूत पाहिजे. लोकसंख्या नियंत्रित पाहिजे. काम फार अवघड आहे.

काही समजण्यासारखी
काही न समजण्यासारखी राज्ये

1. बिहार : एनडीए 39 (2014 साली 31) युपीए 1 (2014 साली 7) इतकी वर्षे बिहारचे राजकारण जातींवर चाले पण मोदींनी त्यास खलास केले. लालूप्रसाद यादवांचा मुस्लीम-यादव रणनीती व पक्ष दोन्ही संपले. लालूची कन्या मीसाभारती, शरद यादव व कॉंग्रेसवाले मीराकुमार, तारीक अनवर, रणजीत रंजन आणि नवा सभासद शत्रुघ्न सिन्हा हे सारे पडले.
2. मध्य प्रदेश : भाजपा 28 (2014 साली 27) कॉंग्रेस 1(2014 साली 2) ज्योतिरादित्य शिंदे गुण्याहून पडले ते मोठे आश्च र्य होते. सहा महिन्यांपुर्वी खरे म्हणजे कॉंग्रेस येथे जिंकली होती व कमलनाथ सरकार सत्तेवर आले होते. त्यांना लोकसभेची निवडणुक जिंकण्यास अडीच महिने मिळाले होते.
3) राजस्थान : एनडीए 25 (2014 साली 25) कॉंग्रेस 0 (2014 साली 0) भाजपा व संघांच्या मंडळींना वसुंधराराजेंना हरवायचे होते. त्यांची घोषणा होती, ‘वसुंधरा तेरी खैर नही। मोदी हमे बैर नही।’ नव्या गहिलोत सरकारला ‘आम्ही शेतकर्यां ना दहा दिवसात 2 लाख रुपयांचे कर्ज देऊ’ हे वचन पाळता आले नाही. मोदी सरकारने एलपीजी गॅस व संडासाचे वचन दिले होते ते त्यांनी पाळले.
4. काश्मीर : भाजपा जम्मू व लडाख 2 (2014 साली 2) नॅशनल कॉंग्रेस खोर्याेत 3 ( 2014 साली पीडीपी 3) पीडीपी व मेहबूबा मुफ्ती यावेळी साफ खतम. ही निवडणूक म्हणजे भारत-पाक लढाई होती, त्यात भारत व भाजप जिंकले. रॅलीत भाजपाच्या नेत्यांनी कलम 370 व 35 ए आम्ही काढणार नाही असे पुन्हा पुन्हा जाहीर केले. पहिले जम्मू व काश्मीरचे स्वातंत्र्य कायम ठेवते तर दुसरे येथील कायमच्या वास्तव्याचा प्रश्न सोडवते. नॅशनल कॉन्फरन्सने (शेख अब्दुल्ला कुटुंब) यावेळी समंजस भूमिका घेतली होती.
5. पंजाब : एनडीए 4 (2014 साली 25) कॉंग्रेस 8 (2014 साली 0) आप 1. पंजाब व दक्षिणेतील दोन राज्यांनी भाजपास अजिबात मदत केली नाही. अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असल्यामुळे 13 पैकी 8 जागा कॉंग्रेस जिंकले. शिरोमणी अकाली दलाचा तेथे पार धुव्वा उडाला. दल तेथे भाजपाचा साथी आहे. त्यास 3 पैकी 2 जागा मिळाल्या. नट सनी देओल व सोम प्रकाश. ‘आप’ पक्षाला 4 पैकी 1 जागा मिळाली. 2014 साली ‘आप’ने 4 जागा जिंकल्या होत्या. पंजाबमध्ये लष्करभर्ती चांगली होते तरीही बालाकोटच्या प्रचारास अमरिंदर सिंग आळा घालू शकले हे विशेष.
6. हरयाणा : एनडीए 10 (2014 साली 25) कॉंग्रेस 0 (2014 साली 0). हरयाणा म्हणजे देवीलाल, भजनलाल, बन्सीलाल व हुडा यांची एकेकाळची घराणेशाही पण 2019 साली लोक मोदींच्या बाजूने होते. त्यांनी नामदारांना 2014 सालाप्रमाणे साफ खतम केले.
7. दिल्ली : एनडीए 25 (2014 साली 25) कॉंग्रेस 0 (2014 साली 0) दिल्लीत कॉंग्रेस व आप दोन्ही साफ झाले. पूर्वी देशावर कॉंग्रेसचे राज्य असायचे पण दिल्ली जनसंघाच्या किंवा भाजपाच्या ताब्यात असायची. काही काळ ती आपच्या ताब्यात होती. आज देश व देशाच्या राजकीय आणि आर्थिक राजधान्या भाजपाच्या ताब्यात आहेत.
8. प.बंगाल : भाजपा 18 (2014 साली 25) तृणमुल कॉंग्रेस 22 (2014 साली 34) अमित शहांनी गेले दीड वर्ष तेथे सपाटून काम केले होते. त्यांनी तृणमुलचा दुसर्या क्रमांकावर असलेला मुकूल रॉय भाजपाकडे आणला. ‘आपण लोकसभेसाठी 42 पैकी 23 बंगाली मंडळी दिल्लीत खासदार म्हणून धाडायची’ असे त्यांनी नक्की केले होते व 23 नाही पण 18 खासदारांना निवडून आणले. बंगालला बदल हवा आहे हे अमितभाईंच्या डोळ्यांना जाणवले. तेथे चार पक्षांची लढत होती पण डावे कम्युनिस्ट व कॉंग्रेसवाल्यांनी त्यांच्या मतदारांना ‘त्यांची मते भाजपला द्या, ममताला नाही’ असे बजावले.
9. ओडीसा : लोकसभेत एनडीए 8 (2014 साली 1) बीजेडी 12 (2014 साली 20) विधानसभेत भाजपा 23, (2014 साली 10) व बीजेडी 112 (2014 साली 117)
10. कर्नाटक : भाजपा 25 (2014 साली 17) युपीए 2 (2014 साली 11)
12. आंध्र प्रदेश : वायएसआर कॉंग्रेस पार्टी 22 (2014 साली 8) टीडीपी 2 (2014 साली 12) हैदराबादेहून असाउद्दीन ओवेसी (एआयएमआयएम) जिंकले. खम्मममध्ये कॉंग्रेसच्या रेणूका चौधरी पडल्या. चंद्राबाबू नायडू आता पाच वर्षे ऐकूच येणार नाहीत एवढी त्यांची शोकांतिका झाली. 25 पैकी वायएसआरसीपीच्या जगमोहन रेड्डींनी 22 जागा जिंकून रेकॉर्ड निर्माण केले. चंद्राबाबू नायडू मोदींबरोबर 2014 साली होते पण गेल्या डिसेंबरमधील निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड यांच्यातील भाजपच्या पराभवाने चंद्राबाबू भाजपाच्या एकदम विरुद्ध झाले व त्यांनी आपला सारा वेळ विरोधकांना एकत्र आणण्यात घालविला. त्याचा पुरा फायदा जगमोहन रेड्डींनी घेतला. चंद्राबाबूंची पंतप्रधान व्हायची स्वप्ने मोदींनी पूर्णपणे खलास केली.
13. केरळ : युडीएफ 19 (2014 साली 11) एलडीएफ 1 (2014 साली 9) 20 पैकी 19 जागा कॉंग्रेसचे नेतृत्व असलेल्या युडीएफने जिंकल्या. एलडीएफला फक्त 1 जागा लाभली. भाजपला? इल्ला, कुछ नही! भाजपास शबरीमाला मंदिराच्या प्रकरणामुळे फायदा व्हायला होता पण तसे घडले नाही. थरुर 1 लाखाने तर राहुल 4 लाखांनी निवडून आले. राहुल अमेठीला पडला हे विसरुन चालणार नाही. कम्युनिस्टांना 2014 साली 9 जागा मिळाल्या. त्यांना यावेळी फक्त एकच जागा?
14. तेलंगणा : टीआरएस 9 (2014 साली ) भाजपा 4 (2014 साली ) आपण 16 च्या 16 लोकसभेच्या जागा जिंकणार अशी केसीआरने बढाई मारली होती पण त्याच्या उद्धटपणामुळे बाजू उलटली. केसीआरला फक्त 9 जागा मिळाल्या. त्याची कविता नावाची मुलगी बिचारी हरली. लोकांनी घराणेशाही संपवली. त्याने मोदींवर खूप टीकास्त्र सोडले पण मोदींना (म्हणजे भाजपला) 4 खासदार तेथे आणता आले. कॉंग्रेसला 3 जागांचा लाभ झाला.
15. ईशान्य भारत : एनडीए 19 (2014 साली 8) युपीए 4 (2014 साली 8) ईशान्य भारत नेहरुंमुळे ख्रिस्ती बनला. तेथे भाजपा सत्तेवर असेल अशी कल्पना करणे अशक्य होते. भाजपाने सिक्कीम जिंकून अशक्य ते शक्य करुन दाखविले. 1947 साली जनसंघ वा भाजपा नव्हता. त्यावेळी सत्ता सावरकरांच्या हाती असती तर ईशान्य पूर्णपणे त्यांनी आपल्या ताब्यात ठेवला असता. सार्याज मिशनर्यां ना त्यांनी हाकलून लावले असते.
16. गुजरात : भाजपा 25 (2014 साली 26) कॉंग्रेस 0 (2014 साली 0). मोदींचा उदय गुजरातपासून झाला. त्या गुजरातचा संपूर्ण ताबा मोदींच्या हाती असणे आवश्यक आहे. ‘गांधीजीनु गुजराथ, मोदींनु गुजराथ’.
17. महाराष्ट्र : एनडीए 41 (23+18) (2014 साली 23+18=41) युपीए 5 (2014 साली 7) सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले व नट डॉ.अमोल कोल्हे जिंकले. प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 8 जागा पाडल्या; त्यात सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), अशोक चव्हाण (नांदेड) व विशाल पाटील (सांगली) होते. अजित पवारांचा मुलगा पार्थ हरला ही पवार कुटुंबियांसाठी मोठी ‘चपराक’ होती. राज ठाकरे हे भाऊबंदकी करायला गेले व चांगलेच आपटले. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेसमोर त्या तोडीचे नेतेच उभे नव्हते. लोकाना पर्याय न दिसल्यामुळे भाजपा व शिवसेनेस त्यांनी जिंकू दिले, असे भाऊ तोरसेकर म्हणतात. शरद पवारांनी धमकी दिली होती, ‘‘माझी कन्या सुप्रिया जर पराभूत झाली तर माझा लोकशाहीवरील विश्वालस उडेल.’’ त्यांच्या सुदैवाने ती निवडून आली पण लोकाना शरद पवारांचे वक्तव्य आवडले नाही. वाढत्या वयाबरोबर त्यांच्यात परिपक्वता आली नाही, अशीच लोकाची भावना झाली. त्यांनी बारामतीला संपन्न केले, त्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिले असते तर जास्त चांगले झाले असते असे लोकाचे मत पडले. त्यांच्याप्रमाणे जातीवाद व वैयक्तिक स्वार्थ यांना आश्रय न देता फडणवीसांनी जास्त चांगले काम केले, असे म्हणावे लागेेल.
18. उत्तर प्रदेश : एनडीए 64 (2014 साली 73) कॉंग्रेस 1 (2014 साली 2) एस-पी-बीएसपी 15 (2014 साली 5). वीर (नायक) राजेंद्रसिंग, हेमामालिनी, अनुप्रिया पटेल व अखिलेश यादव. राहुल अमेठीत हरला, स्मृती इराणी जिंकली. कॉंग्रेसचे नाक कापले गेले. फक्त कॉंग्रेसची सोनिया रायबरेलीतून जिंकली. कॉंग्रेसने सहा महिन्यांपूर्वी तीन राज्ये (राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड) जिंकली होती; तेथील 65 जागांपैकी कॉंग्रेसला फक्त 3 जागा जिंकता आल्या. उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ व राज्यपाल राम नाईक यांनी चांगला सांभाळला.

रडका राहुल
1 परमगुरु (थिंक टँक) : ते पाच. के.सी.वेणुगोपाल, अहमद पटेल, रणदीपसिंग सुरजेवाला, के.राजू व गुलाम नबी आजाद. त्यांनी चेल्याला खूप शिकविले पण ते सारे नापास झाले कारण राहुल त्याला जे पाहिजे तेवढेच घ्यायचा.
2 त्याचे आठ प्रादेशिक मार्गदर्शक: कमलनाथ, सचिन पायलट, अशोक गहेलोत, ज्योतिरादित्य सिंधीया, भूपिंदरसिंह हुडा, अशोक चव्हाण, सिद्धरामय्या व शीला दीक्षित. सहा महिन्यांपूर्वी या तिघांनी (नाथ, गहेलोत व सिंधीया) तीन राज्यात विजय मिळविला होता पण त्या विजयाचा वेग ते टिकवू शकले नाहीत. दोन मार्गदर्शक – हुडा आणि चव्हाण त्यांच्या स्वत:च्याच चिंतेने फेल गेले. सिद्धरामय्या आंतरिक बंडास तोंड देत होता. शीलाबाई आल्या पण फार उशिरा. त्यांना काही डागडुजी करायला पुरेसा वेळच मिळाला नाही.
3. डेटा मॅन प्रवीण चक्रवर्ती : त्यांनी 200 प्रदेश वेगळे काढून ठेवले होते. तेथे कॉंग्रेसला जिंकणे सोपे गेले असते पण त्यांच्या योजनेला बाजूला काढून ठेवण्यात आले.
4. परराष्ट्रीय सल्लागार : ते म्हणजे सिताराम येचुरी. या सीपीआय (एम)च्या जनरल सेक्रेटरीचे व राहुलचे चांगलेच सख्य होते. त्याला समाजवादी ठेवण्यात त्यांना खूप यश लाभले होते पण त्यांचे हा राहुल पुढे ऐकायचाच नाही.
5 वारसाईने मिळालेले बडबडे सल्लागार ः आधी मणीशंकर अय्यर. त्याने मोदींना ‘चायवाला’ व ‘नीच’ ठरवले होते. ते राहुलला खूप नडले. नंतर आले ‘सॅम’ (श्याम) पित्रोडा. 1984 मधील हजारो शिखांच्या हत्येला त्यांनी ‘हुवा तो हुवा’ असे म्हणून दिल्ली व पंजाबमधील सारी शिखांची मते घालवली. हे दोघे राजीवचे खास दोस्त.

यांना घरी बसवले :
पाश्चिघमात्य लोकसभेत बरीच तरूण मंडळी चांगले काम करताना दिसतात. म्हातार्या लोकाना लॉर्ड बनवितात. सत्ता आपल्याकडे वारसाई हक्काने पिढ्या न पिढ्या चालते. म्हातारे खासदार काम न करता उगाच जागा अडवितात. बरेच जण खासदार असल्यामुळे अमेरिकेत सरकारी खर्चाने जाऊन आपली ऑपरेशन्स फुकट करवून घेतात. सत्तेवर असल्यामुळे काम न करता चैनीत राजधानीत राहता येते. मोदींना ते जुने चित्र बदलायचे आहे.
1 लालकृष्ण अडवाणी : रथयात्रा सुरू करून लोकाना ‘खोट्या’ निधर्मीपणापासून दूर खेचले व भाजपास वर आणले. बाबरी मस्जिदीच्या नाशानंतर भाजपचा जोर वाढला व भाजपा सत्तेवर आला.
2 मुरलीमनोहर जोशी : भाजपा सत्तेवर आल्यावर शिक्षणाच्या भगवेकरणाचे काम वाजपेयींना जोशींना सोपवले. त्यांनी ते काम छान केले. अडवाणी यांच्यापेक्षा ते जास्त बेधडक होते.
3 देवे गौडा : 2018 च्या निवडणुकीत 86 वर्षाच्या या माजी पंतप्रधानाने कुमारस्वामी या आपल्या मुलास कर्नाटकचा मुख्यमंत्री बनवले व ‘भाजपास सत्तेबाहेर ठेवण्या’साठी त्यांनी स्वतः निवडणुकीत भाग घेतला. सत्तेसाठी माणूस काहीही करू शकतो.
4 यशवंत सिन्हा : हे जुने आयएएस बाबू. त्यांना राजकारणात वाजपेयींनी आणले व अर्थमंत्री बनवले. सत्तेची हाव इतकी जबरदस्त असते की त्यांनी आपण पुन्हा अर्थमंत्री व्हावे यासाठी खूप प्रयत्न करून पाहिले पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.
5 सुमित्रा महाजन : महाजन? ओहऽ बापरे! नको होत्या म्हणून स्पिकर बनविल्या. वयाचे छान कारण मिळाले म्हणून तिकिटच दिले नाही. त्यांनी प्रथम 1989 मध्ये मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पी. सी. सेठी यांना हरविले. त्यानंतर एकंदर 8 वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या. आजवर त्या एकही निवडणूक हरल्या नाहीत. मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी ‘सभापती’ म्हणून सुंदर काम केले होते.
6 सुषमा स्वराज : इंदिरा गांधी यांच्याविरूद्ध एकदा त्या उभ्या होत्या. त्यांच्याकडे त्यावेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहिले जाई. 2016 साली त्यांचे किडनी ट्रान्सप्लान्टचे ऑपरेशन झाले. बहुदा त्यांना राज्यसभेवर घेतले जाईल.
7 उमा भारती : सहावेळा खासदार व एकदा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री झालेल्या उमा भारती यांचे व मोदी यांचे फारसे सख्य नसल्यामुळे मोदी यांच्या राजकारणात त्यांना फारसे जबाबदारीचे काम दिले गेले नव्हते.
8 मुलायमसिंह यादव : 79 वर्षांचे मुलायमसिंह एकेकाळी कुस्तीबाज होते. ते 7 वेळा लोकसभेसाठी निवडून आले होते व केंद्रीय मंत्रीसुद्धा होते. हे त्यांचे शेवटचे खासदारपण असेल.
9 सोनिया गांधी : 1998 साली त्या अमेठी व बेल्हारी येथून निवडून आल्या. त्यानंतर त्या 5 वेळा लोकसभेत खासदार म्हणून राहिल्या आहेत. पंतप्रधानपदाची जबाबदारी न घेता ते काम मनमोहन सिंग यांच्याकडे सोपवून त्या 10 वर्षे (2004 ते 2014) मस्त मजेत ‘सत्तेवर’ होत्या. राहुलला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांनीच बसविले व त्याने राजीनामा दिल्यावर, त्याने त्या पदावर आपली सत्ता चालूच ठेवावी असाही त्यांचा आग्रह आहे. त्या यावेळी उभ्या न राहता आपली रायबलेरीची जागा प्रियांकाला देतील असे लोकाना वाटले होते पण ‘सत्ता सोडणे’ त्यांना फायदेशीर वाटले नाही. अजून त्या युपीएच्या अध्यक्षा आहेत पण मोदींनी त्यांना जवळजवळ केराच्या टोपलीत फेकले आहे.
10 इतर मंडळी : भाजपाचे शांताकुमार, बी. सी. खंडुरी आणि भगतसिंग कोशयारी हे सर्व माजी मुख्यमंत्री.

बड्यांच्या बिचार्या बेटाबेटी :
मोदींनी नव्या पिढीसाठी सत्तेवर वारसाईने येण्यापेक्षा आपल्या कामाच्या बळावर निवडून यावे असे आवाहन केले आहे. निवडणुकीतील प्रचाराच्या प्रत्येक भाषणात त्यांनी गांधी, नेहरू कुटुंबाच्या घराणेशाही सत्तेवर कडाडून हल्ला केला होता.
1 प्रिया दत्त : सुनील दत्तची कन्या. असली काय नसली काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
2 मिलिंद देवरा : मुरली दत्तचा मुलगा. असला काय नसला काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
3 अशोक चव्हाण : हेडमास्तर शंकरराव चव्हाण यांचा मुलगा. मोठा स्कॅमवाला. खरे म्हणजे तो तुरूंगात हवा.
4 पार्थ पवार : शरद पवारांचा नातू. असला काय नसला काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
5 दिपेंदर सिंग : हरयाणाच्या भूपेंदर सिंग या मुख्यमंत्र्यांचा मुलगा. असला काय नसला काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
6 आश्रय शर्मा : केंद्रीय मंत्री सुखरामचा मुलगा. असला काय नसला काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
7 दुष्यंत चौतुला : हरयाणाच्या मुख्यमंत्री प्रकाश चौतालांचा मुलगा. असला काय नसला काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
8 वैभव गहिलोत : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहिलोत यांचा मुलगा. असला काय नसला काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
8 ज्योतिरादित्य सिंदीया : राजमातेमुळे वाजपेयी. म्हणून वाजपेयींनी सुनेला महत्त्व दिले. मोदींनी सुनेला शिताफिने जाऊ दिले. आता अनुराग ठाकूरला सिंदीयांच्या ब्रेन वॉशिंगचे छान काम मिळाले आहे. तो ते काम चांगले काम करत आहे. उद्या हा भाजपकडे येणार.
10 मौसमा बेनझिर : ए. बी. ए. घनी खान चौधरी यांची ही पुतणी. असली काय नसली काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
11 सुश्मिता देव : कॉंग्रेसच्या केंद्रमंत्री संतोष मोहन देवांची कन्या. असली काय नसली काय? राजकारणात काही फरक पडत नाही.
12 कल्वकुंतला कविता : तेलंगण्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या. असली काय नसली काय? राजकारणात काही फरक पडत नाही.

सरतेशेवटी :
कालपर्यंत आपण नुसते पोस्टर्स बघत होतो. ‘अब की बार, मोदी सरकार’ आता प्रत्यक्षात ते मोदी सरकार आलेले आपण अनुभवत आहोत. आता लोकाना सांगण्याची वेळ आली आहे, नरेंद्र मोदी भगवान नाहीत. भगवान पण सर्व गोष्टी पूर्ण करू शकत नाही तर मोदी त्या आपल्यासाठी आपल्या सार्यार मागण्या कोठून पुर्यान करणार होते? इंग्रज वसाहतवाद्यांनी भारतावर 1857 पासून 1947 पर्यंत 90 वर्षे राज्य केले ते इंग्रज ‘मायबाप सरकार’ म्हणून. इंग्रजांनी आपल्याला तारायंत्र, टपाल, रेल्वे, ग्रामोफोन वगैरे सुखसोयी देऊन आपल्यास शिकविले. ‘तुम्ही मागा, आम्ही तुमच्या मागण्या पुर्याा करू’ त्या सवयीचा शेवट स्वातंत्र्याने झाला. आपण स्वतंत्र भारत होण्यासाठी लढत होतो. इंग्रजांनी असे काही नाटक केले की, आपल्याला वाटले, इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य देऊन टाकले व त्यांनी भारत देश सोडून ते त्यांच्या देशास चालते झाले. अहिंसेचे व्रत शिकवणार्यास कॉंग्रेसने आपल्यापैकी बरेचजण लढले व त्यात ते मरण पावले असे सत्य कधी शिकवलेच नाही. कॉंग्रेसच्या खोट्या गप्पा ऐकावयाची सवय झालेल्यांनी या खेपेस मोदींना निवडून आणले. आता ते म्हणतील, ‘मोदींना जिंकून आणण्याचे काम आम्ही केले. मोदी, आता तुम्ही तुमचा चमत्कार दाखवा.’

‘आम्ही मोदींना दुसर्यांददा जिंकून आणले, आता मोदींनी त्यांची जादू करून दाखवावी’ असे बोलण्याचे आपण आता बंद करावे. फक्त निवडणुकीत आपण आपले मत आपण मोदींना द्यावयाचे एवढेच आपले काम नाही हे आता मोदींनी लोकाना सांगायचे महत्त्वाचे काम बाकी आहे. मोदींची खरी परीक्षा आता सुरू आहे. हा देश मागण्यांचा आहे. अपेक्षांचा देश आहे. सख्खी आईसुद्धा मुलीला तिने मुलीसाठी काय केले ते सांगत असते. कमी दृष्टिच्या आईबापांना कावडीत बसवून त्यांना भारतातील तीर्थस्थाने दाखवून आणणारा श्रावणबाळ आपल्याला आदर्श वाटतो. अमेरिकेत वा ऑस्टे्रलियात जाऊन आईबापासाठी मोठी कमाई करणारा मुलगा आपल्याकडे एवढा सन्माननीय नसतो. स्वतःच्या संसारास आपले घर अपुरे पडते म्हणून स्वतंत्र घर बांधून तेथे रहायला जाणार्याव मुलाला आपल्याकडे ‘नक्कामा’ समजतात.

आपल्याकडे प्रत्येक गोष्टीस गुंतवणूक समजण्याची सवय लागलेली आहे. मी एवढे केेले, म्हणजे समोरच्याने आता तेवढे करायला पाहिजे, असे आपल्या मनात आधी येते. मी मोदींना मत दिले, आता मोदींनी माझ्यासाठी एवढ्या गोष्टी केल्या पाहिजेत, असे आपले गणित तयार असते. आपल्या भारतीयांची स्मरणशक्ती अमुक गोष्टीत खूप मजबूत असते, अमूक ठिकाणी ती अशक्त आढळते. अमक्याने आपल्याला कशी मदत केली किंवा आपल्यासाठी काय केले, याबाबत ती एकदम कमी असते. कोणी आपल्यासाठी काहीच केले नाही, ते आपल्याला चांगले आठवते. मोदींनी लोकासाठी काय केले ते आपल्याला आठवत नाही. त्यांनी आपल्यासाठी काय केले नाही किंवा ते कोठे कमी पडले हे आपल्यास चांगले स्मरते. 2014 साली मोदींनी आपल्याला काय दिले नाही याविषयी आपण फारशी चर्चा केली नाही. कारण त्यांची शक्ती आपल्याला फारशी माहीत नव्हती पण त्यांच्या पाच वर्षानंतरच्या काळात आपल्याला त्यांची ताकत बरोबर माहीत झाली आहे. आपल्या मनात त्यांची एक चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. ते आपल्याला खूप काही देऊ शकतात याविषयी आपल्या मनात आता खूप अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आपल्या मनात म्हणजे मोदी भक्तांच्या व विरोधकांच्या मनात! 5 वर्षानंतर ती मोठी समस्या उभी राहणार आहे. 125 कोटी लोकाच्या मनात कम से कम 125 कोटी यापेक्षा! मुलांच्या, तरूणांच्या व म्हातार्यां च्या मनात निरनिराळ्या अपेक्षांचा सागर भरलेला असेल. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांना राहुलसारखा ‘चौकीदार चोर आहे’ असे सांगणारा नेता भेटणार आहेच. त्यावेळी केनेडीप्रमाणे ‘मी एवढे केले, तुम्ही मला कोणती साथ दिलीत?’ असे मोदींनी विचारले तर मोदी नायक न राहता खलनायक ठरतील, याची मला भीती वाटते. मोदींनी शपथ घेतल्यानंतर लोकाना ‘मी एवढे करेन, तुम्हाला एवढे करावे लागेल’ असे ठामपणे सांगणे आवश्यक आहे असे मला वाटते.
SAHITYA CHAPRAK JUNE 2019

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा