वा. ना. उत्पातांनी समाजाची माफी मागावी
संजय सोनवणी यांची मागणी
होळकर घराण्याबाबत वारंवार खोटे आक्षेप घेत प्रवाद पसरवले जातात. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यासही होळकरांबद्दल असलेल्या असुयेपोटी विरोध केला जात होता. ‘विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिले तर समाजात तेढ माजेल’ असे वादग्रस्त विधानही शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी केले होते. आता विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर ज्यांचा पोटशूळ उठला आहे ते आता अनैतिहासिक वायफळ वाद उकरुन काढत आहेत. यामुळे समाजात नाराजी पसरली असून धनगर समाजाची एक तरी मागणी मान्य झाली म्हणून झालेल्या आनंदावर विरजण घालण्याचा अक्षम्य प्रकार श्री. उत्पातांकडून घडला आहे.
– संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहास संशोधक
पुणे – ‘अहिल्या की अहल्या’ हा वाद केवळ विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिल्याबद्दल पोटशूळ उठलेल्या मंडळींचे प्रतिनिधी श्री. वा. ना. उत्पात यांनी निर्माण केला आहे. यामुळे जनसामान्यांत संभ्रम पसरला असून नामविस्तारामुळे झालेल्या आनंदावर विरजन पडले आहे. वैदिक धर्माचे अभिमानी लोक प्रत्येक शब्दाचे कृत्रीम संस्कृतीकरण करत तेच शब्द मुळचे आहेत असा दावा आजवर करत आले आहेत. अगदी सालाहनचे शालिवाहन, सूग या मुळच्या शब्दाचे शृंग असली असंख्य मूळ प्राकृत शब्दांची पोरकट संस्कृत रुपांतरे केल्याने इतिहासाची अक्षम्य हानी झालेली आहे. अहिल्या हे नाव चुकीचे असून अहल्या हे नाव असले पाहिजे असे श्री. वा. ना. उत्पातांचे मतही याच प्रकारात मोडते. त्यांनी दिलेली अहल्या या शब्दाची व्युत्पत्तीही चुकीची असून ‘अहेव लेणे ल्यालेली ती अहिल्या’ असा या जनमानसात रुळलेल्या मुळच्या प्राकृत शब्दाचा अर्थ आहे. समाजात उगाचच गोंधळ माजवून सामाजिक तेढ पसरवण्याचे काम केल्याबद्दल श्री. उत्पात यांनी जनतेची जाहीर लेखी माफी मागीतली पाहिजे, अशी मागणी आदिम हिंदू महासंघाचे अध्यक्ष व इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी केली. महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश खाडेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
वैदिक परंपरेतील संस्कृतकरण केलेल्या अहल्या या शब्दाचा अहिल्या या शब्दाशी व त्याच्या मूळ अर्थाशी काहीही संबंध नाही. प्राकृत हीच मुळची भाषा असून संस्कृत भाषा ही इसवी सनाच्या दुसर्या शतकात जन्माला आली. प्राकृतातील अगणित शब्द या भाषेने ध्वनीबदल करुन स्वीकारले, पण या उद्योगात अनेक शब्दांचा मूळ अर्थ व संदर्भ हरपला. ही इतिहासाची नासाडी करणारी बाब होती परंतु वैदिक धर्माभिमानी आपल्या वर्चस्ववादाच्या नादात सामान्य हिंदुत सातत्याने अपसमज पसरवत राहिले आहेत आणि त्यामुळे सामाजिक हानी होत आहे असेही श्री. सोनवणी म्हणाले.
अहिल्या हा शब्द पहिल्या शतकातील गाथा सप्तशतीतही आलेला आहे. संस्कृत भाषा तेव्हा जन्मालाही आलेली नव्हती. शिवाय सुभेदार मल्हारराव होळकर ते स्वत: अहिल्यादेवींना लिहिलेल्या आपल्या पत्रांत अहिल्या असाच उल्लेख करत आले आहेत. नाना फडवणीस ते दिल्लीचा बादशहाही त्यांच्या पत्रांत अहिल्याच म्हणतात. समकालीन शिलालेखांतही अहिल्या हेच नाव आलेले आहे. जनमानसात अहिल्या हेच नाव लोकप्रिय व आदरणीय राहिले आहे. खुद्द अहिल्यादेवींनाच चूक ठरवू पाहण्याचा अश्लाघ्य प्रकार श्री. उत्पात यांच्याकडून घडला आहे. प्राकृत भाषेतील शब्दांना मूळ न मानता नंतर आलेल्या संस्कृत भाषेत असलेले शब्द मूळ मानणे हा वैदिक परंपरेचा डाव आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला दिले हे सहन न झाल्याने पोटशूळ उठलेल्यांनी हा वाद निर्माण केला आहे. आदिम हिंदू महासंघ या प्रवृत्तीचा निषेध करतो व श्री. वा. ना. उत्पातांनी समस्त समाजाची लेखी जाहीर माफी मागावी अशी मागणी करतो, अन्यथा त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशाराही श्री. संजय सोनवणी यांनी केला. या प्रसंगी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश खाडेही उपस्थित होते.