सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव ‘अहल्या’ असावे अशी अपेक्षा साहित्यिक आणि विचारवंत वा. ना. उत्पात यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर धनगर बांधवात असंतोष पसरला होता. समाजशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी उत्पातांचे विधान सप्रमाण खोडून काढले. ‘चपराक’ने हे वृत्त प्रकाशित करताच वा. ना. उत्पात यांनी त्यांचा खुलासा ‘चपराक’कडे पाठवला आहे. तो त्यांच्याच शब्दात.
पुण्याश्लोकी अहिल्याबाईंच्या नावाला माझा विरोध नाही – उत्पात
सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोकी अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असे दुरूस्त करावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. अहल्याबाईंची थोरवी सर्व भारतात बद्रीनाथ ते कन्याकुमारी पर्यंत आजही गायिली जाते. त्यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिल्याने सोलापूर विद्यापीठाचा गौरव झाला आहे.
माझ्याकडे धनगर समाजातील काही बांधव आले व त्यांच्या आहे त्या नावाचा आग्रह आहे, असे सांगितले. माझा त्या नावाला विरोध नाही.
मी पुण्यश्लोकी अहल्यादेवींवर पुस्तक लिहिले आहे. त्यांचा स्मृतीदिन मी श्री रूक्मिणी मंदिरात अनेक वर्षे साजरा करीत होतो. त्यांच्या जीवनावर मी अनेक व्याख्याने दिली आहेत. इतका त्यांच्याविषयी मला आदर आहे. या विषयावर कलह होऊ नये. सर्व समाजाला आहे हे नाव मान्य असेल तर माझा काहीही आक्षेप नाही.
– भागवताचार्य वा. ना. उत्पात
पंढरपूर
संजय सोनवणी यांची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा –
श्री. उत्पातांचे व्यक्तिगत मत जे काही असेल ते त्यांनी व्यक्तिगतच ठेवायला पाहिजे होते. त्याच्या सार्वजनिक जाहीर प्रदर्शनाची काहीच गरज नव्हती. प्रकरण अंगाशी आल्यावर ‘ चपराक ‘ आड दडून आपली कातडी बचावण्याचा जरी उत्पातांचा प्रयत्न असला तरी त्यांचा माज अद्यापही उतरलेला नाही, हे त्यांच्या पात्रातील अहिल्यादेवींच्या “अहल्या” उल्लेखावरून दिसून येत आहे. सार्वजनिकरित्या जाहीर लेखी माफी मागितल्याशिवाय श्री. उत्पातांची आता सुटका नाही.
श्री. वा. ना. उत्पात यांचा खुलासा पुरेसा नाही. व्यक्तीगत मत कोणाचेही काहीही असू शकते. पण ते जेंव्हा जगजाहीर होते व त्यातून जे दुष्परिणाम अथवा संभ्रम उत्पन्न होत एका मोठ्या समाजाचे मानसिक खच्चीकरण केले जाते तेंव्हा ते मत व्यक्तीगत म्हणून दुर्लक्ष करण्याजोगे नसते. श्री. वा. ना. उत्पातांच्या “व्यक्तीगत” मतामुळे केवळ कोणा एका समाजाचा आनंद हिरावला गेला नाही तर खुद्द अहिल्यादेवींचाही अवमान झाला. अकेडमिक लेव्हलवर अशी चर्चा त्यांना मागेही करता आली असती व भाषाशात्रीय चर्चा करुन ते कसे चुकीचे आहेत हे अन्य विद्वानांनी सिद्धही केले असते. पण नामविस्ताराच्या नंतर हे “व्यक्तीगत” मत प्रसार माध्यमांसमोर व्यक्त करणे ही दुष्ट हेतुने केलेली लबाडी आहे व त्यांच्या मताला व्यक्तीगत म्हणता येत नाही. त्यांचा कशाला आक्षेप आहे आणि कशाला नाही याशी आम्हा अहिल्याप्रेमींना घेणे-देणे नसून त्यांनी व्यक्त केलेल्या जाहीर मताबद्दल तीव्र आक्षेप आहे. अहिल्यादेवी आणि समस्त समाजाचा अवमान करणे हे निषेधार्ह असून त्यांनी अहिल्यादेवी व समस्त समाजाची लेखी व जाहीर “माफी” मागितली पाहिजे अशी माझी व समस्त अहिल्याप्रेमींची मागणी आहे. आणि हे माझे “व्यक्तीगत” मत नाही. हे येत्या रविवारपर्यंत न केल्यास त्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले जाणार हे नक्की आहे. तशी तयारीही सुरु झाली आहे. श्री. वा. ना. उत्पातांना मी आवाहन करतो की त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या विषयावर पडदा टाकावा. त्यांच्या व्यक्तीगत मताशी आम्हाला काहीएक घेणेदेणे नाही. ते आयुष्यभर आपल्या भाषिक समजुती खुशाल कुरवाळत राहू शकतात. पण त्यांचे जगजाहीर झालेले व्यक्तीगत मत हे अहिल्यादेवींचा अपमान करणारे आणि समाजाला अस्वस्थ करणारे असल्यामुळे जाहीर माफीची आम्ही मागणी केलेली आहे. श्री. उत्पातांनी काय ते ठरवावे. – संजय सोनवणी