सातारा येथील वाचकप्रिय असलेल्या दै. ‘ऐक्य’मध्ये ज्येष्ठ संपादक वासुदेव कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘लोलक’ या सदरात आज (19 फेब्रुवारी 2019) संपादकीय पानावर ‘चपराक’च्या उपक्रमाची दखल घेतली आहे. प्रकाशक म्हणून हा आम्हाला मोठा सन्मान वाटतो. अवश्य वाचा. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
महाराष्ट्रातील मराठी भाषकांची लोकसंख्या दहा कोटी असली तरीही गेल्या वीस वर्षात दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, व्हॉटस ऍप, फेसबुक अशा झपाट्याने वाढलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीला ग्रहण लागल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. मुळातच मराठी भाषिक वाचकांना पुस्तके विकत घेऊन वाचायची सवय खूप कमी असल्याने एक हजार पुस्तकांची आवृत्तीही दोन-चार वर्षात संपत नसल्याचे मराठी प्रकाशकांचे म्हणणे आहे. मराठी भाषिकांची लोकसंख्या प्रचंड असतानाही पुस्तकांची विक्री आणि वितरण मात्र मोठ्या प्रमाणावर होत नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या ‘चपराक प्रकाशन’चे संचालक घनश्याम पाटील यांनी येत्या वर्षभरात आपल्या प्रकाशन संस्थेद्वारे रोज एक याप्रमाणे तब्बल 365 पुस्तकांच्या प्रकाशनाची केलेली धाडसी घोषणा, नव्या वाचन संस्कृतीला आणि नवलेखकांना उमेद, प्रेरणा देणारी ठरावी.
इतिहास, क्रीडा, कृषी, शिक्षण आरोग्य, सहकार, विज्ञान-तंत्रज्ञान, चित्रपट, युद्ध कथा, पत्रकारिता, पर्यावरण, बालसंगोपन, मानसशास्त्र, ग्रामीण विकास, समीक्षा, कथा, कादंबरी, कविता अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा या आगामी प्रकाशन मोहिमेत समावेश आहे. येत्या वर्षभरात ‘चपराक प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध होणार्या 51 पुस्तकांचा पहिला संच 17 एप्रिल 2019 रोजी समारंभपूर्वक प्रकाशित होईल.
या अभिनव प्रकाशनाच्या पहिल्या टप्प्यात डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनावरील ‘राजमान्य राजश्री’ हा ग्रंथ, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ‘झुंडीतली माणसं’ हे पुस्तक, डॉ. द. ता. भोसले यांच्या तीन दीर्घकथा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे ‘उभारणीचे दिवस’ हे आत्मकथन, अनघा कारखानीस यांचा ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हा कथासंग्रह यासह विविध कथासंग्रह, चरित्रे, बालकथा, संस्कृत भाषा परिचय अशा प्रथितयश आणि नवोदित लेखकांच्या साहित्यग्रंथाचा समावेश आहे.
एकाच वर्षात 365 पुस्तकांचे प्रकाशन करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च येईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी घनश्याम पाटील यांना राज्य सरकार किंवा संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळालेले नाही. गेली पाच वर्षे या प्रकल्पाची आखणी करीत त्यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक निधीची तरतूद केली आहे. गेल्या 15 वर्षात 153 दर्जेदार ग्रंथांचे प्रकाशन करून, काही पुस्तकांच्या पाच/सहा आवृत्या काढायचाही मोठा अनुभव पाटील यांना आहे. मराठी पुस्तकांना वाचक आहे आणि या प्रकल्पातील सर्व पुस्तकांच्या प्रती संपतीलच असा दुर्दम्य आशावादही त्यांना आहे. याच प्रकल्पातील 50 पुस्तकांचे ‘ऑडिओ बुक’ आणि दृष्टी नसलेल्या ज्ञानोपसकांसाठी ब्रेल लिपीतही रूपांतर ते करणार आहेत. या प्रकल्पातील संपादन झालेली 200 पुस्तके छपाईसाठी सज्ज आहेत. मराठीत कसदार लेखन करणार्या लेखकांचे साहित्यही हे प्रकाशन प्रसिद्ध करणार आहे.
17 वर्षांपूर्वी लातून जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंप्पळनेर या आडवळणी गावातून घनश्याम पाटील विद्यानगरी पुण्यात आले. पुण्यातील ‘संध्या’ या दैनिकात बातमीदाराची नोकरी करीत महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी खिशात पैसे नसताना जिद्दीने ‘चपराक’ हे मासिक सुरू करून, ते लोकप्रिय केले. गेली काही वर्षे ते ‘चपराक’चा 500 पानांचा दर्जेदार दिवाळी अंक प्रसिद्ध करीत आहेत. गेली काही वर्षे ते ‘चपराक’ हे परखड साप्ताहिकही चालवित आहेत. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी 365 पुस्तकांच्या प्रकाशनाचे धाडस करणार्या या युवा प्रकाशकाला मराठी भाषक आणि संस्थांनी आर्थिक पाठबळ द्यायला हवे. या धडपडणार्या मुलाच्या प्रकाशन प्रकल्पाला शुभेच्छा!!!
वासुदेव कुलकर्णी
(दै. ऐक्य, 19 फेब्रुवारी 2019)
Chan