पर्यावरण दिन विशेष : डार्विन चुकला ?

Share this post on:

डार्विन या थोर शास्त्रज्ञाने शोध लावला, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट! याचा अर्थ, जो प्राणी जगण्यासाठी फिट आहे, म्हणजेच लायक आहे , तोच प्राणी आणि त्याचाच वंश काळाच्या ओघात टिकून राहतो. जो निसर्गात झालेल्या व होणार्‍या बदलांप्रमाणे स्वतःच्या सवयींमध्ये आणि शरीरात बदल करतो, स्वतःला घडवतो तोच प्राणी जगण्यास योग्य ठरतो आणि इथेच डार्विन चुकला!


डार्विनने फक्त निसर्ग, निसर्गातील बदल, प्राण्यांचे शरीर व मन यांचाच विचार केला आणि एका महत्त्वाच्या शास्त्रीय तत्त्वाचा शोध लावला. त्याच्या निरागस मनात हा विचारच आला नाही की, निसर्गाच्या पलीकडे अशी एखादी गोष्ट असेल की जी माणसाचे हृदय आणि मेंदू यांच्यावर सर्वात मोठा प्रभाव टाकू शकेल. ती गोष्ट म्हणजे  पैसा! याच पैशाने निर्माण केली माणसामध्ये इर्षा आणि स्पर्धा.

डार्विन

डार्विन बिचारा साधा, भोळा. तो जर लबाड असता तर त्याने लिहून ठेवलं असतं, सर्व्हायवल ऑफ द रिचेस्ट! अर्थात ज्याच्याकडे पैसा तो जगण्यास लायक किंवा समर्थ! पैसा ही सामाजिक सोय किंवा सुविधा न राहता ती जीवनावश्यक गोष्ट झाली. परिस्थितीवर मात करण्यासाठी, ऐषोरामासाठी माणूस पैशाचा, त्या पैशात मिळणार्‍या ऐहिक साधनांचा उपयोग करत गेला. याही पुढे जाऊन पैशाचे महत्त्व एवढे वाढले की तो आणखीन पैसा मिळवण्याचे, सत्ता मिळवण्याचे, ती टिकवण्याचे, अनिष्ट इच्छापूर्तींचे साधन बनला. आधी पैसा गरजा भागवण्यासाठी, नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी वापरला जात असे, तोच आता निसर्गावर कुरघोडी करण्यासाठी वापरला जातोय.

डार्विनचं निसर्गावर, प्राणीसृष्टीवर, मानवावर प्रेम होतं. पृथ्वीबद्दल, निसर्गाबद्दल नितांत आदर होता. आपण लावलेल्या शोधाचा मानवाला त्याच्या भावी वाटचालीत फायदा होईल असे त्याला वाटले असावे. त्याने मानवाच्या प्रगतीचे स्वप्न पाहिले. तिथेच त्याने दुसरी चूक केली. मानवानेच निर्माण केलेली एक अद्भूत गोष्ट म्हणजे पैसा, मानवावरच सत्ता गाजवेल याचा त्याने विचारच केला नाही. एकीकडे विश्वाचा वेध घेणारा मानवी मेंदू दुसरीकडे ऐहिक गोष्टींचा शोध लावत गेला. वैज्ञानिक प्रगती, तंत्रज्ञान आणि विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडत राहिला. अतिरेकी औद्योगीकरण, बेबंद खाणकाम, बेसुमार जंगलतोड, प्रमाणाबाहेर लोकसंख्या, बेलगाम शिकारी, अनिर्बंध शहरीकरण आणि अविवेकी प्रदूषण करून निसर्गाचा विध्वंस करत गेला.

आणि आता निसर्गावरच स्वतःत बदल करायची वेळ आली. जागतिक तापमानात वाढ होत चालली आहे. नको त्या वेळी नको तिथे पाऊस, अवर्षण, पूर येताहेत. ऋतूमान बदलतंय. हवामानातील बदल सामान्य माणसे, शेतकरी, पिके आणि पाणी यांच्यापर्यंत पोचलेत. पर्वतांवरचे धृवीय प्रदेशातील बर्फांचे थर वितळायला लागलेत. ओझोनचे आवरण फाटत चाललेय. निसर्गाने खूप तडजोड करण्याचा प्रयत्न केला पण स्वतःला वाचवण्यासाठी निसर्गच आता जणू उलटा वार करू लागलाय. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतेय. त्यामुळे किनारपट्ट्यांना धोका उत्पन्न होतोय. वादळांचे प्रमाण वाढतेय. ती अधिकाधिक भीषण होत आहेत. डार्विन जर आत्ता असता तर मानवाच्या करणीमुळे निसर्गच बदलतोय हा ‘चमत्कार’ त्याला पहायला मिळाला असता. आपल्या संशोधनाची लागलेली वाट पाहून त्याला ग्लोबल वार्मिंगमुळे वितळत चाललेल्या हिमनद्यांच्या पाण्यात नक्कीच जीव द्यावासा वाटला असता.

पण पुढे काय? हवामान-बदलाच्या चक्रीवादळाला आपला पैसा तोंड देऊ शकेल? निसर्गाला मानवाची गरज नाही पण मानवाला निसर्गाची गरज आहे असे पर्यावरणवादी आणि वैज्ञानिक पोटतिडीकीने सांगत आहेत. तरीही मांजरासारखे डोळ्यावर कातडे ओढून आपण निसर्गाचे सात्विक दूध पितच चाललोय. तो संपत चाललाय आणि आपण माजत चाललोय. आपण इतर प्राणीमात्रांचे, वनस्पतींचे जीवनच धोक्यात आणलेले नाही, तर स्वतःच्या पायावरही कुर्‍हाड मारून घेतोय. एकेकाळी निसर्गाशी साहचर्याने, नम्रतेने वागणारा माणूस असा उलट्या काळजाचा कसा झाला? बुद्धिमान मानवाने निसर्गाचा एवढा र्‍हास कसा केला? याचे कारण केवळ स्वार्थ, हव्यास, लालसा.

खरंच आज डार्विन असता तर त्याने हा निष्कर्ष काढला असता की, मनुष्यप्राणी हाच या पृथ्वीवर राहण्यास लायक नाही! डार्विन आत्ता चुकलाच नसता. खरेतर तो आधीही चुकला नव्हताच कारण आपण जर आपली चूक लगेच सुधारली नाही, मर्यादा जाणल्या नाहीत, आपण आत्ता आपल्याला बदलले नाही तर आपली मानवजात नामशेष होईल. तशी ती कधीतरी होणारच आहे पण हे अतिशय लवकर, नजीकच्या भविष्यकाळातच घडेल. त्याला कारण आपणच असू आणि पृथ्वी परत एक निर्जीव ग्रह बनून राहील.

– अपर्णा कडसकर
पुणे, 9657712500

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >
error: Content is protected !!