जयाजीपेक्षा महत्त्वाचा आहे शेतकरी संपाचा विजय

शेतकरी नेते शरद जोशी यांनी संपूर्ण हयात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर खर्ची घातली मात्र राज्यातील वा देशातील शेतकरी कधीच एकजुटीने जागृत झाला नाही. विपूल नैसर्गिक साधनसंपत्ती आणि त्यातून येणारी आर्थिक सधनता ही या असंघटितपणाला कारणीभूत होती. यामुळे बळीराजाने काळानुरूप स्वतःत आणि शेती पध्दतीत बदल करत आपल्या भवितव्याची काळजी  घेतली नाही.

मात्र आज परिस्थिती बदलली आहे. जागतिक तापमान वाढ, बेसुमार वृक्षतोड, घटते पर्जन्यमान यामुळे शेती हा व्यवसाय आज आतबट्ट्याचा व्यवसाय होऊन बसला आहे. त्यातच वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे शेती व्यवसायाकडे अनेकजण पाठ फिरवू लागले. आज ग्रामीण भागातील घरटी एक माणूस नोकरीसाठी शहरात वास्तव्यास आहे. एकेकाळी शंभर एकर शेती असल्याचे छातीठोकपणे सांगणार्‍या बळीराजाचा शहरात वास्तव्य करणारा वारसदार आज शंभर फूट जागेसाठी उभी हयात लोकाकडे नोकरी करत आपले आयुष्य कंठत आहे. ही दयनीय अवस्था बळीराजावर का आली याची शेकडो कारणे आपल्याला सांगता येतील. मात्र आता ती वेळ नाही. कारण आज सबंध राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. त्याला त्याची चूक उमगली आहे. त्यामुळे तो एकवटला आहे. पिकाला हमीभाव, कर्जमाफी आदी मागण्यांसाठी तो आता संपावर गेला आहे.

1 जून पासून संपावर गेलेल्या शेतकर्‍यांनी आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यावर दूध ओतले, पालेभाज्या टाकून दिल्या. त्यामुळे राज्यातील पांढरपेशावर्गाला मात्र त्याचे अतीव दु:ख झाले. कारण कोणत्याही स्थितीत शेतकर्‍याने दूध वा भाजीपाला रस्त्यावर फेकायला नको होता. मात्र आजच्या घडीला शहरातील हॉटेलच्या बाहेर सर्वात जास्त कचरा हा अर्धवट खाल्लेल्या अन्नाचा असतो. शेतकर्‍यांना अक्कल शिकवणार्‍या पांढरपेशावर्गाने आधी स्वतःच्या आत डोकावायला हवे. कोणतेही आंदोलन वा संपाला एक विशेष प्रतीक असणे आवश्यक असते. त्या प्रतीकाद्वारे आंदोलक आपल्या भावना समाज आणि सत्ताधार्‍यांपर्यंत पोहोचवत असतात. आज राज्यातील शेतकर्‍यांनीही तेच केले आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पध्दतीबाबत बोलण्याचा अधिकार केवळ आणि केवळ शेतकर्‍याला आहे. इतरांना तो कदापिही नाही. आज रस्त्यावर पडलेल्या पालेभाज्या पांढरपेशावर्गाला नाश होताना दिसत आहेत. मात्र शेतकरी जेव्हा भल्यापहाटे उठून पिकवलेला भाजीपाला बाजारात आणतो तेव्हा त्याच्या मालाला मिळालेला भाव त्याच्या कष्टाची चेष्टा करणारा ठरतो. कित्येकदा त्याला भाव न मिळाल्याने आणलेला भाजीपाला परत नेण्याइतपतही पैसा त्याच्याकडे नसतो. त्यावेळी तो आपला भाजीपाला तिथेच टाकून जातो. मात्र एकही पांढरपेशा याबाबत दु:ख व्यक्त करत नाही. हा झाला ऐतिहासिक शेतकरी संपाचा पहिला भाग.

कधी नव्हे तो शेतकरी पहिल्यांदाच एकजुटीने रस्त्यावर उतरला आहे. एक निश्चित मागणी घेऊन तो संपावर गेला आहे. केवळ तीन दिवसांच्या संपाने संपूर्ण राज्यसत्ता हदरुन गेली आहे. मात्र त्यात फूट पाडण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. शेतकरी संपाच्या दुसर्‍याच रात्री मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या कोअर कमिटीसोबत चर्चा केली. तब्बल चार तास चर्चा करुन शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या. माझ्या माहितीप्रमाणे इतक्या तत्परतेने शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री असावेत. वास्तविक पाहता फडणवीस सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मग बाजार समितीतील अडत्यांची मक्तेदारी मोडीत काढून शेतकर्‍यांसाठी बाजार समित्या खुल्या करणे असो की सोसायटीमध्ये सामान्यातल्या सामान्य शेतकर्‍याला सोसायटीचा सभासद होण्याचा अधिकार असेल. या निर्णयामुळे शेतकर्‍याला मोठ्याप्रमाणात फायदाच झाला आहे. कारण यापूर्वी काही ठरावीक शेतकरीच सोसायटीचे सभासद होत असत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मिळणारे कर्ज केवळ सोसायटीचा सभासद असणार्‍या शेतकर्‍यालाच मिळत असे. मात्र फडणवीस सरकारने त्या जाचक पध्दती मोडीत काढल्या. राहता राहिला प्रश्‍न संपाबाबतच्या सरकारने मान्य केलेल्या मागण्या आणि त्यासाठी मागितलेला अवधी.

कोणत्याही सरकारला कोणत्याही प्रकारच्या मागण्या मान्य करण्यास काही काळ लागतो. कारण दीर्घकालीन निर्णय घेताना त्यावर सूक्ष्म विचार करणे गरजेचे असते. कोणताही निर्णय घेताना तो निर्णय योग्य की अयोग्य हे सांगणे कठीण असते. निर्णयानंतर येणार्‍या परिणामावरुनच तो योग्य की अयोग्य हे ठरते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन तूर्तास शेतकर्‍यांनी मान्य करुन हे आंदोलन मागे न घेता स्थगित करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे या आंदोलनाच्या यशामुळे आलेला फायदा भविष्यातील आंदोलनाला प्रेरणादायी ठरला असता. कोणतेही सरकार कोणत्याही आंदोलकांच्या मागण्या शंभर टक्के मान्य करत नसते. अर्थात आंदोलकांच्या सर्वच मागण्या रास्त असतात असेही नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार कर्जमाफीबाबत त्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ द्यायला हवा होता. किंबहुना तो द्यावा. अन्यथा डाव्या आघाडीचे नेते दत्ता सामंत यांनी कामगारांच्या संपाबाबत घेतलेली भूमिका ज्याप्रमाणे कामगारांना देशोधडीला लावण्यास कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे या शेतकरी संपात डाव्या आघाडीचे भारतीय किसान संघ हे आंदोलन फोल ठरवण्यास कारणीभूत ठरु शकते. कोणतीही क्रांती एकदाच होत असते हे जरी सत्य असले तरी तिचा कालावधी किती काळ ठेवावा हे त्या क्रांतीचे नेतृत्व करणार्‍या नेतृत्वाच्या हातात असते. त्याप्रमाणे हे आंदोलन केवळ आत्ताच तीव्र आहे. भविष्यात ते इतके तीव्र होऊ शकत नाही असे मानणे म्हणजे ठार वेडेपणा ठरेल.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतही डावी विचारसरणी प्रणित भारतीय किसान संघाचे सचिव डॉ. अजित नवले यांनी आक्षेप घेत बैठकीतून बाहेर जाणे पसंत केले. वास्तविक पाहता त्यांना मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव मान्य नसला तरी कोअर कमिटीचे एक सदस्य म्हणून त्यांनी बैठकीतून बाहेर पडणे योग्य नव्हते आणि नाही. कारण डॉ. नवले हे केवळ एका संघटनेचे नेते म्हणून नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून ते बैठकीत सामील झाले होते. त्यामुळे त्यांनी आक्रस्ताळी भूमिका घेत बैठकीतून जाणे गैर होते. राहता राहिला जयाजी सूर्यवंशी या कोअर कमिटी सदस्याचा प्रश्‍न. त्यांनाही यांनी सूर्याजी पिसाळ ठरवले. वास्तविक पाहता आंदोलनात फूट पाडण्याची नेमकी हीच खेळी कोअर कमिटी ओळखू शकली नाही. इतिहासात कधी नव्हे ते शेतकरी कोणतेही नेतृत्व नसताना स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला आहे. त्याची ती स्वयंप्रेरणा जपत आंदोलन अधीक तीव्र करणे गरजेचे असताना डॉ. नवले आणि काही लोकांनी आक्रस्ताळी भूमिका घेत जयाजी सूर्यवंशी यांना व्हिलन ठरवण्यातच धन्यता मानली. त्यानंतर राज्यभरात शेतकरी मागण्या हा विषय बाजूला पडून केवळ जयाजी सूर्यवंशी हा एकच विषय चर्चिला गेला आणि चर्चिला जातोय. खर्‍या अर्थाने इथेच ही शेतकरी संपाची कोअर कमिटी चुकली आहे. यापुढे तरी शेतकर्‍यांच्या कोअर कमिटीने जयाजी हा विषय बाजूला ठेवून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणे गरजेचे आहे. माध्यमांनीही जयाजी किंवा तत्सम गिड्डे यांचे रसभरीत वृत्तांकन बाजूला ठेवत शेतकर्‍याच्या या भवितव्याची दिशा ठरवणार्‍या संपाचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणे क्रमप्राप्त आहे. शेतकर्‍यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी जयाजीला सूर्याजी ठरवण्याऐवजी आपल्या मागण्यांवर लक्ष केंद्रीत करावे. कारण जयाजी हा या संपातील एक छोटासा घटक आहे.
सागर सुरवसे, सोलापूर
9769179823

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा