थोडं मनातलं…

‘चपराक’ साप्ताहिकासाठी दर आठवड्याला एक तरी वाचनीय  लेख तुम्ही लिहावा, अशी प्रेमळ ताकीद संपादकांकडून मिळाली आणि मग सर्वसामान्य माणसाला (कॉमन मॅन) डोळ्यासमोर ठेवून, दैनंदिन जीवनात त्याला पडणारे निरनिराळे प्रश्न, त्यांच्या समस्या याविषयी लिहित गेलो. आपण एकटे का पडतो? माणसं अशी का वागतात? आजचे शिक्षक गुरू कधी होणार? तुमचं तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे का? इतका आटापिटा कशासाठी? ग्राहक राजा कधी होणार? ही जीवघेणी लालसा कधी थांबणार? प्रामाणिकपणा म्हणजे काय रे भाऊ? यासारखे वेगवेगळे माणसाला आपल्या जीवनात नेहमी भेडसावणारे प्रश्न सुचत गेले. मग त्यावर अविरतपणे लिहित गेलो. अर्थातच त्यासाठी वेळोवेळी संपादकांनी प्रोत्साहित केले हे मी येथे नम्रपणे नमूद करतो.
लिखाणात सातत्य वाढल्याने तेव्हा शंभराच्यावर लेख लिहिले गेले. त्याला वाचकांकडून प्रतिसादही प्रचंड लाभला. त्यावेळी प्रतिक्रियांचे बरेच फोन यायचे. आपण एकटे का पडतो? हा लेख वाचून मराठी भाषेसाठी कार्यरत असणारे प्रा. अनिल गोरे यांनी मला फोन केला.. ‘‘अहो मी सुध्दा कधीकाळी असाच एकटा पडलो होतो. मला तुम्हाला भेटायला आवडेल!’’ मान्यवरांच्या अशाप्रकारच्या पावत्या मिळत गेल्याने लिखाणाचा हुरूप वाढला. ‘साहित्य चपराक’ मासिक, साप्ताहिक व दिवाळी अंकासाठी तसेच इतर दिवाळी अंकासाठी पण लिहिणे सुरू होते. अशातच एक दिवस संपादक घनश्याम पाटील यांनी ध्यानीमनी नसताना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. ते म्हणाले, ‘‘तुमची लेखनाची भट्टी छान जमली आहे. बरेच लेख सडेतोड व वाचनीय झाले आहेत. ते सामान्य वाचकांपर्यंत सर्वदूर जाण्यासाठी त्यावर आता तुमचं पुस्तक झालं पाहिजे!’’
मग काय…. सुरू झाली आमची लगबग. उत्साहाने जुळवाजुळव केली आणि काही चपराक साप्ताहिकात प्रकाशित झालेले तर काही अप्रकाशित असे एकूण निवडक 45 लेख एकत्र करून त्याचा लेख संग्रह प्रकाशित करण्याचे ठरले! मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्या नावानं कुठलं पुस्तक प्रकाशित होणार! मला सांगताना खूप अभिमान वाटतो… ती किमया घनश्याम पाटील यांच्या पुढाकाराने साध्य झाली आणि त्यांनी लेखसंग्रहाला पुस्तकरूप बहाल केले… थोड़ं मनातलं. बरंच काही सांगून जाणारं ‘थोड़ं मनातलं’ हे पुस्तक प्रचंड वाचकप्रिय ठरलं आणि बघता बघता पहिली आवृती संपली. आता दुसरी आवृतीही संपण्याच्या मार्गावर आहे हे सांगताना मनस्वी समाधान वाटतंय.
आता थोड़ं ‘मुलांच्या मनातलं’ या माझ्या दुसर्‍या पुस्तकाविषयी! ‘हल्ली बालसाहित्य फारसं लिहीलं जात नाही…’  बोलण्याच्या ओघात घनश्याम पाटील पुढं म्हणाले.. ‘‘भाईकाका, आपल्या साप्ताहिकातील  व थोड़ं मनातलं मधील तुमच्या ‘बालपण देता का बालपण’ या लेखानं डोळ्यात खरंच पाणी आणलं! तुम्ही खूप लिहू शकता यावर…’’  संपादकांनी अशाप्रकारे प्रेरित केल्यानंतर मग आपल्या समाजात घडणार्‍या घटना, मुलांचं भावविश्व, त्यांचं आजी आजोबासोबत असणारं नातं, त्यांच्या गंमतीजमती, संवेदनशीलता, हल्लीच्या  मुलांना वाटणारं एकाकीपण अशा अनेक विषयांवर लिहित गेलो. मग काही दिवसातच मुलांच्या मनातलं हे पुस्तक तयार झालं! ‘चपराक साहित्य महोत्सवा’त या पुस्तकाचं थाटात प्रकाशन झाल्यानं त्याला महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद लाभले हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येतो! ‘मुलांच्या मनातलं’ वाचनीय व बोधप्रद ठरल्याने त्याला उदंड  वाचकप्रियता लाभली. या पुस्तकातील शेवटचा लेख ‘पप्पा जल्दी घर आना’ वाचून माझ्या एका ड्रायवर मित्राने फोन केला व म्हणाला, ‘‘यार विनोद, खरंच माझ्या मनातलं लिहीलंस… रस्त्याने गाडी चालवताना मुलांची आठवण आली की घरी लवकर पोहचण्याची ओढ लागते..!’’
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रबाबू प्रसाद यांनी ज्यांना ‘राष्ट्रसंत’ हा बहुमान बहाल केला, असे कर्मयोगी संत तुकडोजी महाराज यांची भजने, भक्तिगीते, देशभक्ती गीते महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभर लोकप्रिय आहेत. मात्र राष्ट्रसंतांबद्दल, त्यांचे विचार, चरित्राबाबत इकडे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना विशेष माहिती नाही. तेव्हा भाईकाका तुम्ही राष्ट्रसंतांवर एक छोटेखानी चरित्रात्मक पुस्तक लिहाच असे  संपादकांनी आस्थेने सुचवले. आमच्या दादांना (वडिलांना) राष्ट्रसंतांचा दीर्घ काळ सहवास लाभल्याने नकळत त्यांचे संस्कार लहानपणापासूनच आमच्या मनावर बिंबले गेलेत! त्यामुळे तो श्रद्धेचा व आपुलकीचा विषय असल्याने मग लागलीच कामाला लागलो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्म, बालपण, तपोसाधना, भटकंती, प्रभावी खंजरी भजने, अमोघ वक्तृत्व,स्वातंत्र्य चळवळीतील प्रत्यक्ष सहभाग, जपान यात्रा, भूदान चळवळ असे बरेच विषय थोडक्यात मांडून छोटी छोटी प्रकरणे लिहून काढली. महाराजांच्या ‘ग्रामगीता’  ग्रंथातील निवडक प्रासंगिक ओव्या, त्यांच्या जीवनातील काही रोचक प्रसंग तसेच राष्ट्रसंतांचे आचार्य अत्रे, महात्मा गांधी यांच्याशी भेटीचे प्रसंग लिहून ‘आपले राष्ट्रसंत’ हे चरित्रात्मक पुस्तक पूर्ण केले. या पुस्तकाचे सुध्दा ‘चपराक साहित्य महोत्सवा’त माजी अ. भा. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले! वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आणि तीन चार महिन्यातच पहिली आवृती संपली. आता  दुसरी आवृती लवकरच प्रचंड प्रतींसह नवीन रूपात वाचकांसाठी प्रकाशित होणार आहे.
मध्यंतरी महाराष्ट्राच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नक्सलग्रस्त भागात नोकरी करण्याचा योग आला! तेव्हा तेथील लोकांचे जीवन, राहणीमान, हलाखीची परिस्थिती, विशेषत: तेथील स्त्रियांची होणारी उपेक्षा व ससेहोलपट बघून अक्षरश: हादरून गेलो! मग मुळात संवेदनशील असलेलं मन सतत बेचैन रहायचं… तेव्हा प्रकर्षानं जाणवलं… आता ‘ती’च्या बद्दल लिहून आपल्या भावना मोकळ्या करायच्या! तेथील महिला पोलिसांची अगतिकता, शेतीत काम करणार्‍या अर्धपोटी शेतमजूर महिला, रेल्वे स्टेशनवर हमाली करणार्‍या व त्यांना हिडीसफिडीस करणारे मुकादम, नक्सलींच्या दहशतीखाली दुर्गम खेडेगावातून ये-जा करणार्‍या, पायात चप्पल नसलेल्या विद्यार्थीनी, गावातील शासकीय दवाखान्यातील गंभीर  रूग्णासाठी रात्र रात्रभर जागणार्‍या परिचारिका, वसतीगृहातील मुलींच्या समस्या असे हृदय पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग अनुभवले! मग त्यावर लिखाण करू लागलो. त्यात भावनेचे रंग भरताना गलबलून यायचं! मात्र लिखाणाची चिकाटी सोडली नाही. लिहिताना एक विचार सारखा मनात यायचा, आपल्या तथाकथित पुढारलेल्या  समाजात आजही दुर्गम भागातील गावात असो किंवा आधुनिक शहरात असो ‘ती’ मात्र उपेक्षितच आहे!
अशाप्रकारे ‘ती’च्या साठी लिहिलेलं ‘ती’च्या मनातलं’ हे माझं चौथं पुस्तक! या पुस्तकासाठी शुभांगीताई गिरमे यांनी सुरेख, विवेचनात्मक प्रस्तावना लिहून साज चढविला आणि संपादकांनी त्यावर यथोचित संस्कार करून ‘ती’च्या मनातलं’ नावारूपाला आणलं! नुकत्याच पुण्यातील पत्रकार भवन येथे पार पडलेल्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त विक्रमी 19 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला! त्यात माझ्या ‘ती’च्या मनातलं’ ला मान मिळाला. सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यिक व सडेतोड संपादक, पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते ‘ती’च्या मनातलं’चं प्रकाशन थाटात पार पडलं! येथे एक आवर्जून सांगावेसे वाटते… माझ्या वरील ‘थोड़ं मनातलं’, ‘मुलांच्या मनातलं’, ‘आपले राष्ट्रसंत’ या तिन्ही पुस्तकांना संपादक प्रकाशक घनश्याम पाटील यांनी अगदी मनापासून समर्पक प्रस्तावना लिहिल्याने त्यांना एकप्रकारचा मानदंड लाभला आहे आणि त्यामुळेच या पुस्तकांना उत्तरोत्तर लोकप्रियता मिळत आहे! संपादकांच्या सततच्या प्रोत्साहनामुळेच एवढं लिहू शकलो आणि आता आत्मविश्वासानं लिहीत आहे!

– विनोद श्रा. पंचभाई
9923797725

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा