‘‘जीवनात तुम्हाला लिखाणाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?’’ असा प्रश्न मला कोणी केला तर माझं उत्तर असेल – ‘‘जीवनाकडूनच!’’
होय! आपण जर जगता-जगता या जीवनाकडे बारकाईने पाहिलं तर आपल्याला ते खूपकाही सांगत असतं, दाखवत असतं.
2010 साली पुण्यात ‘एमबीए’ शिक्षणासाठी आलो आणि इथे त्या दोन वर्षांमध्ये जे जीवन जगलो ते अतिशय विलक्षण होतं.
बाहेर गावाहून चार मुलं एकत्र येतात, ‘हॉस्टेल रूममेटस्’ बनतात, त्यांची मैत्री होते आणि ती वेळेसोबत कशी घट्ट बनत जाते ते प्रत्यक्ष अनुभवलं. याच मैत्रीचं विस्तारीकरण होत गेलं आणि दोन वर्षात एक ‘गँगच’ तयार झाली. अर्थात त्या ‘गँग’मध्ये फक्त निखळ मैत्रीच होती.
कॉलेज म्हटलं की मैत्रीसोबत ‘प्रेम’ हे आलंच. आमच्या त्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तशा प्रेम कहाण्याही जवळून पाहिल्या; पण… पण या फक्त मैत्री आणि प्रेमाच्या मधेही एखादं नातं असू शकतं ही गोष्ट मात्र मनाला आश्चर्य करणारी होती. कॉलेजचे ते दिवस संपताना मित्राला वचन दिलं होतं की ‘आपली मैत्री दुनियादारीच्या ओघात हरवू न देण्यासाठी काहीतरी नक्की करेन’ आणि त्यातूनच ‘कॉलेज गेट’ कादंबरीची कल्पना आली.
एमबीए पूर्ण झाल्यावर मग जॉबच्या फंद्यात पडण्याअगोदर मैत्रीवर पुस्तक लिहिण्याचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं. अर्थात या अगोदर मला लिखाणाचा कोणताही अनुभव नव्हता. जमेल तशी शब्दांची जुळवा-जुळव करीत गेलो. कॉलेजच्या त्या आठवणी येतील तशा मागे-पुढे डायरीत उतरवीत गेलो आणि तब्बल अकरा महिन्यांनंतर एका ‘कहाणी’चं रूप आलं.
‘कॉलेज गेट’ कादंबरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी आल्या, जे अनुभव आले, जो एक प्रवास घडला त्यातून पुन्हा एक नकळत प्रेरणा मिळाली ती हे खरं शब्दबद्ध करण्याची आणि यातूनच ‘लायब्ररी फ्रेंड’ ही दुसरी कादंबरी उदयास आली.
या कादंबरीमध्ये ‘मानव’ नावाचं पात्र आपलं छोटंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे उद्योग करतो ते सर्व मांडले. ‘सचिन तेंडुलकरला शंभर रन (सेंच्युरी) करण्यासाठी पहिल्या रनापासून सुरूवात करावी लागते’ हे वाक्य मानवला प्रेरणा देतं आणि तोही आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतो. सातत्याने त्या स्वप्नाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतो. सातत्याने त्या स्वप्नाचा पाठलाग करून तो स्वप्न पूर्तीस नेतोच.
‘कॉलेज गेट’ आणि ‘लायब्ररी फ्रेंड’ या पुस्तकांमुळे एक लेखक म्हणून ओळख निर्माण होऊ लागलीये. दोन्ही पुस्तकांना वाचकांकडून प्रचंड प्रतिसादही मिळतो आहे. या दोन्ही पुस्तकांमागे लिखाणाचा हेतू वाचकांचं मनोरंजन हा होताच; पण आता पुढच्या काही लिखानाची वाटचाल वेगळी असेल. पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांशी, समाजाशी संवादही साधता येतो हे लक्षात आल्याने पुढचं लिखाण काहीतरी बदल घडविण्यासाठी असेल. (अर्थात खूप मोठी चळवळ उभी करण्याचं स्वप्न नाहीये.)
गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर लिहितात,
‘मावळतीला जाणार्या सूर्याला चिंता पडली विश्वाची! माझ्यानंतर अंधारलेल्या या जगाला प्रकाश कोण देईल?
तेव्हा एक इवलीशी पणती पुढे येते आणि म्हणते
– मी देईन प्रकाश, जमेल तेवढा, माझ्या परीनं.’
या वाक्यानं खरंच पुढच्या लिखाणासाठी प्रेरणा दिली आहे. ‘काशिनाथ-विश्वनाथ’ ही राजकारण आणि तरूणांवर आधारित कादंबरी लवकरच सर्वांच्या भेटीस घेऊन येत आहे.
– सागर कळसाईत
9970019591