लहानपणापासूनच घरात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य उपलब्ध होते. कथा, कादंबर्या, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची रेलचेल असायची. ग्रामोफोन असत्यामुळे एचएमव्हीच्या जुन्या चित्रपट गाण्यांच्या रेकॉर्डही असायच्या. संध्याकाळच्या वेळी वडील चित्रपटांचे सुमधूर आणि आशयघन अशी गाणी ऐकायचे. त्यामुळे सी रामचंद्र, नौशाद यांच्या तालवाद्यावर आणि लता मंगेशकर, तलत मेहमूद, बेगम अख्तर यांची अजरामर गाणी ऐकायला मिळायची. एक प्रकारचं भारलेलं वातावरण असायचं आणि त्याचमुळे अवीट चवीची, शब्दालंकाराने गीतरचना भावायला लागली. वाचनाची आवड वाढायला लागली आणि साहित्यातील रूची निर्माण झाली. अंतरीच्या गाभार्यातून शब्द उसळी मारू लागले. शब्दाला शब्द जोडून ओळ तयार झाली आणि पाचवीत असताना जीवनातील पहिली कविता उदयास आली. पुण्याच्या आपटे विद्यालयात या आवडीचे व्यासंगात रूपांतर झाले. गद्य-पद्य रूपात अंतर्यामीची अनुभूती प्रकट होऊ लागली. शिक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळू लागली, प्रेरणा मिळाली. अनेक कविता त्या काळात निर्माण झाल्या. नववीमध्ये चक्क एक कादंबरी लिहिली आणि सुरू झाला साहित्य प्रवास!
पण त्यावेळी साहित्यविषयक उपक्रम मर्यादित होते. प्रथितयश, नावाजलेल्या साहित्यिकांचेच साहित्य प्रसिद्ध व्हायचे. नवोदितांना वावच नव्हता. मासिके, नियतकालिकेही कमी प्रमाणात यायची. त्यावेळी कधी एखादी कविता छापून आली तर अपरिमित आनंद व्हायचा. मराठीबरोबर हिंदीचीही गोडी लागली होती. प्रेमचंद, शरतचंद्र, गुलशन नंदा यांचेही साहित्य वाचनात आले. महादेवी वर्मा, मीनाकुमारी, शिवमंगलसिंह यांच्याही कविता आवडू लागल्या आणि हिंदी कवितांचा आविष्कार झाला. त्या कविता धर्मयुग, साप्ताहिक हिंदुस्थानला पाठवू लागले. झुमरीतलैय्या, भोपाल येथूनही काही प्रकाशित झाल्या. पुढे एम. एस. डब्ल्युला फिल्डवर्क रिपोर्टमध्ये माझ्या साहित्यिक भाषेवर आक्षेप घेण्यात आला कारण त्यांना अलंकारीक भाषेमध्ये रिपोर्टींग नको होते; तरीही कॉलेजच्या इतर उपक्रमामध्ये शेरो शायरी, कविता, नाटके, अभिनय सर्वामध्ये सहभाग असायचाच. पुढे विवाहाउपरान्त कौटुंबिक जबाबदार्यांमुळे साहित्य लिखाण कमी झालं. जर्नालिझम पण केलं, तरी साहित्यनिर्मिती झाली नाही; पण 2002 साली एक नव पर्व घडलं ‘साहित्य चपराक’च्या पर्यायाने ‘चपराक’चे सर्वेसर्वा घनश्यामजी पाटील या पोरसवदा पण तडफदार, हाडाच्या पत्रकाराच्या सान्निध्यात आले आणि साहित्य क्षेत्रातील मुशाफिरी त्यांच्या प्रेरणेने सुरू झाली.
2012 साली आजारपणाच्या निमित्ताने जवळजवळ एक महिना घरी होते. वेळ जाता जात नव्हता म्हणून चिटोर्यांवर डायरीत लिहिलेल्या कवितांचे संकलन करून ठेवले. एके दिवशी ‘दखलपात्र’ हे अग्रलेखांचे पुस्तक प्रकाशित करतोय ही बातमी द्यायला घनश्याम पाटील साहेब घरी आले. त्यावेळी त्यांचे अभिनंदन करून मी माझ्या कविता एकत्रित केल्याचे त्यांना सांगितले आणि त्यांनी निर्णय घेतला. ‘दखलपात्र’बरोबरच माझ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करायचे. एका दिवसात नाव, मुखपृष्ठ तयार करण्यात आले आणि ‘आर्यमा’ हा माझा पहिलावहिला काव्यसंग्रह ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, निवेदक सुधीर गाडगीळ, सकाळचे उपसंपादक श्रीराम पचिंद्रे आणि श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थित दणक्यात पार पडले. याच सारं श्रेय माझ्या या मानसपुत्राला, त्याच्या तत्परतेला, धडपडीला जातं कारण असं पुस्तक प्रकाशित करावं असं कधी माझ्या मनातच आलं नव्हतं. जे काही मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे यामध्ये छापून येत होतं त्यातच मी समाधानी होते; पण माझ्या या बेट्याने हे अपूर्व दान माझ्या ओटीत घातले. धन्यवाद बेटा!
2014 साली महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोशिएशनचे अध्यक्ष यांनी ‘शब्द’ या संस्थेमार्फत थायलंडला ‘शब्द विश्व साहित्य संमेलन’ घ्यायचे ठरविले. सर्व तयारी झाली. ते निमंत्रण पत्रिका द्यायला आले तेव्हा म्हणाले, ‘‘तुमचं एखादं पुस्तक तेथे प्रकाशित करू या’’ अवघा आठ दिवसाचा अवधी. माझ्या मुलीच्या जन्माच्या आधीपासून ते ती एक वर्षाची होईपर्यंत एका आईच्या नजरेने टिपलेली स्थित्यंतरे, तीची अनुभूती या कोणत्याच काव्यप्रकारात न मोडणार्या पण भावोत्कटतेने ओथंबलेल्या अशा त्या कविता होत्या. खूपच सुंदर कविता म्हणून संजय सिंगलवार आणि घनश्याम पाटलांनी पसंतीचे उद्गार काढले. ‘अनुभूती’ हे शीर्षक आधीच मनात होतं. त्वरीत मुखपृष्ठ तयार झालं आणि आठ दिवसाच्या आत ‘अनुभूती’ भारताबाहेर सातासमुद्रापार, बँकॉकला पोहोचलं. ‘सौमित्र’च्या हस्ते दिमाखदार प्रकाशन झालं. परत आमच्या चपराक टीमचे टीमवर्क किती उत्कृष्ठ आहे याचा प्रत्यय आला.
नंतर सातत्याने साहित्य क्षेत्रातील नवनवीन विभागामध्ये प्रवेश करता आला. घनश्याम पाटील या माझ्या मानसपुत्राच्या सततच्या प्रोत्साहनाने, आग्रहाने त्यांनी माझ्याकडून व्यक्तीवेध, ललित, काव्य, कथा, समीक्षण, परीक्षण, प्रस्तावना सर्व साहित्य प्रकार अधिकाराने लिहून घेतले. नाहीतर प्रसंगानुरूप लिखाण प्रपंच माझ्याकडून घडला असता.
त्यानंतर माझे तिसरे पुस्तक, कथासंग्रह ‘सत्यापितम’ नावाने प्रकाशित झाला, तो ‘चपराक’च्या साहित्य महोत्सवात चक्क महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते. याचा सार्थ अभिमान आणि समाधान आहे.
माझ्या आई बडोदे येथील राजघराणे गायकवाडांच्या हे ज्ञात झाल्यावर आमच्या संपादक साहेबांनी मला सुचवलं की, ‘‘सयाजीराव महाराजांवर प्रकाशित झालेली पुस्तके ही ऐकीव माहितीवर आधारित आहेत; पण तुमच्या आईनी तर त्यांना प्रत्यक्ष बघितले आहे. त्यांचा सहवास, दरबारी पार्ट्यांचा आस्वाद घेतला आहे. ते सारं लिहा.’’ आणि ‘पेरते व्हा’ सारखे मी ‘लिहिते व्हा’ झाले. माझ्या आईकडून अनेक किस्से ऐकले आणि शब्दबद्ध केले. ‘लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या रूपाने. याची पहिली आवृत्ती पाहता-पाहता संपली देखील. इतकं हे पुस्तक वाचनीय ठरलं. त्याची दुसरी आवृत्ती लवकरच निघत आहे.
2016 जानेवारी. मकरसंक्रांतीच्या संक्रमणाच्या दिवशी शब्द विश्व साहित्य संमेलनात दुबईला ज्ञानेश वाकुडकरांच्या हस्ते माझा तिसरा काव्यसंग्रह ‘अरूणिमा’ प्रकाशित झाला.
लवकरच ‘सत्याभास’ नावाचा गूढकथासंग्रह आमचे ब्रह्मेकाका, स्वप्निल पोरे आणि अर्थातच घनश्याम पाटल यांच्या सद्प्रेरणेने अस्तित्वात येतोय. तसेच ‘शांतीदूत लालबहादूर शास्त्री’ या प्रभाकर तुंगार लिखित पुस्तकाची हिंदी आवृत्ती आणि एक हिंदी कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
अशाप्रकारे साहित्य विश्वात, साहित्य सहवासात माझे आयुष्य समृद्ध झाले आहे. जे मनी उमटले, ते शब्दरूपेन कागदावर रेखाटले, त्याला मूर्तरूप संपादकांनी दिले आणि एक शिल्प निर्माण झाले. ‘चपराक प्रकाशन‘च्या रूपाने योग्य असे कोंदण माझ्या साहित्याला मिळाले अन् म्हणूनच त्याचे मूल्य अनमोल झाले. त्याबद्दल आमचा ‘चपराक’ परिवार त्यातील सर्व सदस्य, सहकारी, हितचिंतक, शुभेच्छुक, प्रशंसक, प्रेरणास्त्रोत त्यांची मी अत्यंत ऋणी तर आहेच पण माझ्या मानसपुत्राच्या धडपडीमुळेच प्रत्येक वर्षी एक पुस्तक याप्रमाणे मी एवढा मोठा पल्ला गाठू शकले. लिखाणात विविधता आणू शकले, साहित्य जगतात छोटेसे योगदान देऊ शकले, म्हणून कृतज्ञता व्यक्त करणे हे या मातेला अभिमानास्पद वाटते. प्राजंळपणे कबूली देताना एवढेच म्हणावेेसे वाटते, माझ्या साहित्य प्रवासात खरे योगदान माझ्या मानसपुत्राचे, घनश्याम पाटील यांचे आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय एवढे मोठे शिवधनुष्य पेलताच आले नसते. नव्हे; माझी सर्व साहित्य निर्मिती ‘चपराक’ला समर्पित करण्यातच धन्यता वाटते. पुन:श्च एकदा ‘चपराक’ला माझा मानाचा मुजरा!
– सौ. चंद्रलेखा बेलसरे
9850895051