दि. 7 व 8 जानेवारी 2017 रोजी पहिले ऐतिहासिक आदिवासी धनगर साहित्य संमेलनं सोलापूर येथे पार पडले. या साहित्य संमेलनामुळे नवा इतिहास घडला. धनगर समाजबांधवांना जगण्याची नवी उर्मी मिळाली. शेकडो वर्षांचा त्यांच्या जीवनातील काळोख दूर झाला. धनगरांचा एक नवा साहित्यिक प्रवाह सुरू झाला. सद्या सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सर्व काही अभिमानास्पद आणि सुखद असेच आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे.
हे संमेलन आयोजित करण्यामागे संयोजकांचा हेतू हा होता की, धनगर समाज आणि साहित्य याचा काही संबंध आहे का? याचा शोध घेणे! जर संबंध असेल तर मग हा समाज साहित्याच्या क्षेत्रापासून अलिप्त का आहे? तसेच धनगर समाजात कोण साहित्यिक आहेत की नाहीत? आणि नसतील तर मग का नाहीत? या कारणांचाही शोध घ्यावयाचा होता. तसेच जर धनगर समाजामध्ये साहित्य आणि साहित्यिक निर्माण झाले असतील तर मग या साहित्याचे आणि साहित्यिकांचे एकूणच मराठी साहित्यासह इतर साहित्यामध्ये नेमकं काय स्थान आहे? जर हा समाज साहित्य क्षेत्रापासून लांब असेल तर तो का लांब राहिला आहे? समाजाने त्याकडे दुर्लक्ष केले की, साहित्यिकांनी या समाजाला, समाजातील साहित्यिकांना आणि समाजाच्या साहित्याला दुर्लक्षित केले? या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधायचे होते आणि त्यामध्ये आम्ही बर्यापैकी यशस्वी झालो. या संमेलनामुळे साहित्यासारख्या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या क्षेत्रात आपण कुठे आहोत, हे लक्षात आले आहे.
एका बाजूला हे सर्व करत असताना हे संमेलन यशस्वी करण्यासाठीही कठोर मेहनत घ्यावी लागली. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी केवळ इच्छा व्यक्त करुन चालत नाही. केवळ मनामध्ये तळमळ आणि कळकळ असून काही उपयोग होत नाही. त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी असावी लागते आणि त्याचवेळी आपण करत असलेले कार्य योग्य आहे हे सांगणारे, त्यासाठी सदिच्छा व्यक्त करणारे, मार्गदर्शन करणारे, पाठीवर हात ठेवून शाबासकीची थाप देणारे आपले लोक आपल्याजवळ लागतात आणि याबाबतीत आम्ही नशीबवान होतो! कारण आदरणीय संजयजी सोनवणी यांच्यासारखे एक ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आमच्या पाठीशी होते. जर संजयजी सोनवणी नसते तर हा सारा प्रपंच होवूच शकला नसता. त्यामुळे त्यांचे ऋण कसे व्यक्त करावेत हे समजत नाही. समाजमान्यतेशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणे शक्यच नव्हते आणि त्यासाठी समाजाच पाठबळ असलेल्या नेत्याची गरज होती, आणि ही गरज संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय जयसिंगतात्या शेंडगे यांच्यामुळे पूर्ण झाली. तात्यांच्या सक्रियतेमुळे या संमेलनाचे नियोजन करताना हत्तीचे बळं मिळाले. केवळं स्वप्नं पाहण्याऐवजी त्या स्वप्नांच्या पुर्ततेसाठी स्वतःला झोकून द्यावं लागतं हेदेखील तितकंच खरं आहे. त्यासाठी वेळप्रसंगी काळाच्या मुखात उडी घेवून काळाला भेडसावता आलं पाहिजे आणि हे सर्व करण्याचे धाडस या संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी केले. त्यामुळे या साहित्य संमेलनाने बाळसे धरले. कोणताही मोठा कार्यक्रम यशस्वी करायचा झाल्यास त्याला आर्थिक पाठबळं असावं लागतं आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष छगनशेठ पाटील यांनी त्यामध्ये मोलाची भर टाकली. त्याशिवाय समाजबांधवांनीही तन, मन, धनाने प्रचंड मदत केली. दुसरीकडे या संमेलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्रावणदादा वाकसे आणि सौ. जयश्रीताई वाकसे यांनी स्वतःला वाहून घेत फिरते ग्रंथ प्रदर्शन आणि साहित्ययात्रेचे आयोजन केले होते. त्यामुळे जवळपास 1 महिना संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. त्याशिवाय डॉ. विष्णुपंत गावडे, आण्णामहाराज, रमेश गावडे यांनीही प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी लागणार्या भौतिक सोई-सुविधा उपल्ब्ध करुन देण्यासाठी जीवाचं नावं शिवा ठेवून कामं केल आणि या सर्वांच्या ध्येयनिष्ठतेमुळेच हे संमेलन यशस्वी होवू शकलं.
आज एकीकडे जाती – पातीच्या राजकारणाला ऊत आला आहे. जातीय अस्मिता बळकट होवू लागली आहे. त्यामुळे जाती – पातीमध्ये तणाव वाढत आहेत. मात्र या नकारात्मक पार्श्वभूमिला छेद देण्याचे काम धनगर जमातीने केले. जातांधळेपणाने न वागता, जे चांगले आहे त्याला चांगले म्हणण्याची हिंमत दाखवली आणि सर्व जाती, धर्माच्या विचारवंताना या विचारपीठावर निमंत्रित केले. परिणामी या विचारपीठाची उंची प्रस्थापित व्यासपीठांच्या उंचीपेक्षा अनेकपटींनी वाढली. यानिमित्ताने धनगर बांधवांनी पुरोगामी विचारांवरील विश्वासही या विचारपीठामुळे कायम राहील याची काळजी घेतली. त्यामुळेच संमेलनाध्यक्ष श्री. संजय सोनवणी यांनी हे संमेलन म्हणजे जातीभेदातीत जाणारे कदाचित महाराष्ट्रातले पहिले साहित्य संमेलन असावे असे गौरवोद्गार काढले.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने साहित्यनगरी, हाल सातवाहन यांच्या नावाने ग्रंथनगरी आकाराला आली. इतकेच काय तर साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटनही एका सर्वसामान्य गृहिणीच्या शुभहस्ते करुन प्रस्थापित साहित्य संमेलनांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला, तर साहित्य संमेलनाचे उद्घाटनही भंडारा उधळून केले आणि कर्मकांडाला आळा घालत आम्हीही आता वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होत आहोत, आमचीही जीवन जगण्याची एक स्वतंत्र शैली आहे हे जगाला दाखवून दिले. ग्रंथ दिंडीच्या उद्घाटनात सामील झालेले सर्व समाजबांधव, वारकरी मंडळी, शालेय विद्यार्थी, धनगरी गजनृत्य, धनगरी वालूग, ढोलवादनं हे सर्व पाहताना आणि अनुभवताना धनगर समाजबांधवांसह तमाम महाराष्ट्राची आणि देशाची मानं उंचावली असेल. कोणताही गोंधळ नाही की गडबड नाही. एकदम सुरळीत आणि खास धनगरी ढंगात हे सर्व पार पडले. ग्रंथ दिंडीच्या मार्गावरील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासही समाजबांधव विसरले नाहीत.
समाजबांधवांची बाद्धिक भूक भागवणारा हा कार्यक्रम अप्रतिम होता. याची पोहचपावती परिसंवादासाठी उपस्थित असलेल्या समाजबांधवांनी दिली. 7 जानेवारीला साहित्य संमेलनाचे रितसर उद्घाटन झाल्यानंतर विचारमंचावर आदिवासी धनगरांचे गजनृत्य आणि शानदार ओव्यांचे सादरीकरण झाले. त्यानंतर पहिला परिसंवाद होता तो म्हणजे आदिवासी धनगर पुरातनाचे एक वास्तव! या अत्यंत महत्त्वाच्या परिसंवादाचे अध्यक्ष होते, ‘चपराक’चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील तर वक्ते होते प्रकाश पोळ, विशाल फुटाणे आणि प्रा. दत्ताजी डांगे. यावेळी सर्वच वक्त्यांनी उपस्थितांना ज्ञानाचे धडे दिले. ज्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. यानंतरचा दुसरा परिसंवाद होता आदिवासी धनगर समाजाच्या महिलांसमोरील समस्या आणि नवयुगातील आव्हाने. विशेष म्हणजे या परिसंवादात केवळ दोनच महिलांनी सहभाग घेतला तो म्हणजे प्रा. डॉ. सौ. संगीता चित्रकोटी आणि सौ. रुक्मिनी गलांडे यांनी. मात्र या दोघींनी महिलांच्या प्रश्नांना वाचा तर फोडलीच त्याशिवाय त्यांना उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी सज्ज करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे हा परिसंवाद प्रचंड गाजला. यानंतरचा तिसरा परिसंवाद होता तो म्हणजे आदिवासी धनगर समाजाचा इतिहास. या परिसंवादाने तर सर्व वातावरणच इतिहासमय झाले. परिसंवादाचे अध्यक्ष होते प्रा. डॉ. शिवाजीराव दळणर तर प्रमुख वक्ते होते प्राचार्य आर. एस. चोपडे आणि श्री विठ्ठलराव गावडे. या सर्वांनी ऐतिहासिक संमेलनातील हा इतिहासावर आधारित परिसंवादही ऐतिहासिकच करुन टाकला. यानंतर रात्री 9 वाजता कवी संमेलन असे रंगले की शब्दापलीकडे… सर्व जाती – धर्माच्या कवींना हे विचारपीठ खुले असल्याने कवींचा उदंड प्रतिसाद मिळाला. कविता आणि गझल गायनाबरोबरच अनेक काव्यप्रकारही याठिकाणी अनुभवायला मिळाले. कवी संमेलनाचे अध्यक्ष शामसुंदर सोन्नर महाराजांनी आपल्या अनेक रचना सादर करत अध्यक्षपदाची धुराही व्यवस्थित सांभाळली.
संमेलनाच्या दुसर्या दिवशी 8 जानेवारीला पहिला परिसंवाद होता तो प्रसारमाध्यमांशी निगडित. दरम्यान या प्रसारमाध्यमांनी साहित्य संमेलनाला प्रचंड प्रसिद्धी दिली होती. त्यामुळे संयोजकांसह समाजबांधवांचाही आत्मविश्वास वाढला होता. संमेलन यशस्वी झाले याची ही पोहचपावती होती. 8 जानेवारीचा पहिला परिसंवाद होता तो माध्यमातील धनगर समाजाचे चित्रण. या परिसंवादाचे निवेदन स्वतः संमेलनाध्यक्ष संजयजी सोनवणी यांनी केले तर राजाराम कानतोडे, सुभाष बोंद्रे आणि विकास पांढरे यांनी लाखमोलाचे विचार मांडत समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. दुसरा परिसंवाद होता तो साहित्यासंदर्भातला. या परिसंवादाचे नाव होते मराठी साहित्यात धनगर दुर्लक्षित का? अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाच्या या परिसंवादाचे अध्यक्ष होते, सचिन परब तर वक्ते होते सिद्धराम पाटील आणि उज्ज्वलकुमार माने. या सर्वांनी आपल्या विषयाला न्याय देत अनेक संदर्भांसह साहित्य आणि धनगर समाज या दोन्ही घटकांवर प्रकाश टाकला. त्यानंतरचा तिसरा परिसंवाद होता तो धनगर समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा राजमार्ग या विषयावर. या परिसंवादात खास कर्नाटकातून आलेले प्रा. लक्ष्मणराव चिंगळे, डॉ. यशपाल भिंगे, डॉ. जे. पी. बघेल यांनी धनगर समाजाचा भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा आढावा घेत साहित्य संमेलन एका उंचीवर नेवून ठेवले. यानंतर तरुणांना भवितव्याच्या सहसा माहीत नसलेल्या अनेक नव्या दिशा दर्शविणारा संवादी कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये संवादक महेश गजेंद्रगडकर यांनी अत्यंत कमी वेळात मात्र तितक्याच प्रभावीपणे सर्वांना मार्गदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर धनगर समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्या धनगर आरक्षणावर खास परिसंवाद ठेवला होता. या परिसंवादाचे नाव होते, धनगर आरक्षण लढाई सभागृहात आणि सभागृहाबाहेर. तर या विषयावर बोलण्यासाठी आदरणीय खासदार राजू शेट्टीसाहेब आणि खा. डॉ. विकास महात्मे यांनी परिसंवादात भाग घेतला होता. यावेळी या दोन्ही खासदारांचा धनगर आरक्षणाच्या प्रश्नाला संसदेत वाचा फोडल्याबद्दल खास धनगरी सत्कारही करण्यात आला. यावेळी खा. शेट्टी आणि खा. महात्मे यांनी आरक्षणाची ही लढाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे सांगत सर्व समाजबांधवांची मने जिंकली. यानंतरच्या समारोप समारोहात राज्याचे जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे सरकारचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. त्यांच्यासमोरच साहित्य संमेलनामध्ये 5 ऐतिहासिक ठराव करण्यात आले आणि हे ठराव शिंदे यांच्याकडे विचारपीठावरतीच देण्यात आले. त्यावर शिंदे यांनी या मागण्या रास्त असल्याचे सांगत सरकारकडून या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी स्वतः लक्ष घालू असे सांगितले. तसेच सरकारने या संमेलनाची दखल घेतली असून हे संमेलन 100 टक्के यशस्वी झाल्याचेही जाहीर केले तर समारोपाच्या कार्यक्रमात समाजाचे ज्येष्ठ नेते आणि आ. गणपतराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्याशिवाय अन्य 9 जणांनाही त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी सर्व सभागृहात आनंदाला पारावार राहिला नाही. उपस्थितांनी जाग्यावर उभे राहून सर्व पुरस्कार विजेत्यांना टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या.
एकंदरीतच या ऐतिहासिक संमेलनामधून समाजाला खूप काही मिळाले. ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
■ अमोल पांढरे
प्रसिद्धी प्रमुख, आदिवासी-धनगर साहित्य संमेलन
9920704113