महामंडळ ‘तरूण’ झाले!

Share this post on:

डॉ. ग. ना. जोगळेकर हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. त्यावेळी एका साहित्यिक मासिकात एक वाचकपत्र प्रकाशित झाले. साहित्य परिषदेची कंपूशाही नव्या लेखकासाठी कशी घातक आहे, उमलत्या अंकुराचे पंख तिथे कसे छाटले जातात, ही संस्था काहीच काम कसे करत नाही अशा आशयाची त्याची मांडणी होती. मुळातच कर्तव्यकठोर लेखक, भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक असलेल्या जोगळेकरांनी ते वाचले आणि ज्याने पत्र लिहिले त्याला बोलवून घेतले. जोगळेकर म्हणाले, ‘‘फुलाफळांनी पिकलेल्या झाडालाच सगळे दगडं मारतात. तुम्हाला साहित्याविषयी इतकेच वाटत असेल तर इथे या आणि सकारात्मक बदल घडवून दाखवा. बाहेरून टीका करणे यात काही मर्दुमकी नाही.’’


त्या पत्रलेखकाने ते आव्हान स्वीकारले आणि साहित्य परिषदेचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. इतकेच नाही तर ते आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाले आहेत. होय, एका पत्रामुळे साहित्य परिषदेशी जोडले गेलेले प्रा. मिलिंद जोशी आता साहित्यातील महत्त्वाच्या संस्थेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाले आहेत. मराठवाड्यातील परांडा तालुक्यातील माणकेश्वरसारख्या छोट्या गावातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कराडला येऊन अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळवली. महाविद्यालयीन जीवनात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारख्या दिग्गजाचा सहवास त्यांना लाभला आणि या क्षेत्रातील त्यांच्या जाणिवा विकसित झाल्या. इंजिनिअर झालेला हा उमदा लेखक दगड-विटांबरोबरच शब्दांचे बांधकामही तितक्याच भक्कमपणे करू लागला. आजच्या महाराष्ट्राचा विचार करता लेखणी आणि वाणीवर ज्यांचे जबरदस्त प्रभुत्व आहे, अशा हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या लोकात ते अग्रस्थानी आहेत. त्यासाठीची त्यांची धडपड, प्रामाणिक प्रयत्न आणि कठोर परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत.
सुरूवातीच्या काळात पुण्यात आल्यानंतर दोन महिने त्यांना कॉट बेसीसवरही खोली मिळाली नव्हती. त्यावेळी एका हॉस्टेलवर मित्रासोबत त्यांना पॅरासाईट म्हणून राहावे लागले. शिवाजीनगरहून पर्वतीपर्यंत येण्यासाठी तिकिटापुरतेही पैसे नसल्याने चालत यावे लागणार्‍या मिलिंद जोशी यांनी परिस्थितीवर यशस्वी मात केली. ते करताना त्यांनी आपल्या दुःखाचा बाजार मात्र कधीही मांडला नाही. ते म्हणतात, माझ्या आयुष्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य शिवाजीराव सावंत आणि प्रा. डॉ. शिवाजीराव कदम हे तीन ‘शिवाजी’ आले आणि त्यांनी माझे आयुष्य आमूलाग्र बदलले. सुरूवातीच्या काळात निदान उपजिविकेपुरते चार पैसे मिळावेत म्हणून छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन करणार्‍या मिलिंद जोशी यांनी स्वतःला सिद्ध केले आणि या क्षेत्रात धु्रवतार्‍याप्रमाणे अढळ स्थान मिळवले. गेल्या काही वर्षाचा विचार करता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड करताना त्यांचा निर्णय निर्णायक ठरला आहे, यातच सारे काही आले.
एक मोठा संघर्ष करून त्यांनी साहित्य परिषदेत प्रवेश मिळवला. सदाशिव पेठेपुरती मर्यादित डबके झालेली परिषद प्रा. जोशी यांच्या नेतृत्वाखाली खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचली. परिषदेच्या इमारतीचा चेहरामोहरा बदलताना त्यांनी तरूणांचा सहभाग वाढवला. रोज साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. साहित्यातली ही मातृसंस्था खर्‍याअर्थी बाळसे धरू लागली. पूर्वी काही जणांच्या वागणुकीमुळे साहित्य परिषदेत येण्यासही घाबरणारे होतकरू लेखक इथे आनंदाने येऊ लागले. विविध उपक्रमात सहभागी होऊ लागले.
हा उमदा लेखक संमेलनाध्यक्ष व्हावा, अशी अपेक्षा जागतिक व्यवस्थापन तज्ज्ञ आणि परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केली होती. या माणसाच्या पाठिशी तुम्ही ठामपणे उभे राहा, असे आम्हाला सांगताना त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू मी बघितले आहेत. एका विदुषिने प्रा. जोशी यांना साहित्य परिषदेपासून दूर ठेवण्यासाठी जंग जंग पछाडले होते. त्या सगळ्यावर मात करून ते सगळ्यात कमी वयाचे कार्याध्यक्ष झाले. त्यानंतर आता सगळ्यात कमी वयाचे महामंडळाचे अध्यक्ष होऊन त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
परिषदेवर विजयी होऊन येताच त्यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला. अनेक बहुभाषिक लेखकांना त्यांनी सन्मानाने बोलावले. गोव्यात प्रचारासाठी गेलेले असताना मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांनी प्रा. मिलिंद जोशी यांच्या मांडीवर देह ठेवला होता. असा महान लेखक केवळ इथल्या राजकारणामुळे संमेलनाध्यक्ष होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना वाटायचे. त्यामुळेच टोकाचा संघर्ष करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेएवजी संमेलनाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत जाऊन आंदोलन केले. परिषदेतील अंतर्गत राजकारण मोडीत काढल्याने इथे होणारी कूजबूज मोहिम बंद झाली. घटनादुरूस्ती सारखे वादळ त्यांनी ओढवून घेतले. परिणामांचा विचार न करता विचारांचा परिणाम घडवायचा, हा त्यांच्या कार्यशैलीचा महत्त्वाचा गुण आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात त्यांनी जो ठसा उमटवला तो केवळ अतुलनीय आहे.
व्याख्यानाच्या निमित्ताने खेड्या-पाड्यात गेल्यानंतर तिथल्या लेखक-कवींना भेटणे, त्यांचे सुख-दुःख जाणून घेणे, त्यांना शक्य ती संधी देणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या रोजी रोटीसाठी काही करता येते का? याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हाही त्यांचा विशेष गुण मी जवळून बघितला आहे. ‘एकवेळ माझे साहित्य बाजूला ठेवा पण या नवोदिताला संधी द्या, हा उत्तम लिहितोय’ असे अधिकाराने सांगणारे मिलिंद जोशी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांच्या कामाचा वेग आणि निर्णय घेण्याची क्षमता कुणालाही धडकी भरवणारा आहे. मात्र सचिन तेंडुलकरला आपण ‘बाबा रे, सावकाश खेळ बरं का’ असे म्हणत नाही, त्याप्रमाणेच प्रा. मिलिंद जोशींचे आहे. आगामी 99 वे, 100 वे आणि 101 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याने ते त्यांच्या साहित्यिक नेतृत्वाची चुणूक त्यातून दाखवून देतीलच.
प्रा. मिलिंद जोशी यांच्या बरोबरीने प्रकाशन क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या सुनीताराजे पवार यांची कार्यवाहपदी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात तळपणार्‍या दै. पुण्य नगरी परिवाच्या विनोद कुलकर्णी यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याने हा एक परिपूर्ण संघ तयार झाला आहे. सुनीताराजे यांनी खुरपण ते प्रकाशन असा संघर्षमय प्रवास केला आहे. साहित्य परिषदेवर, प्रकाशक परिषदेवर, अभ्यास मंडळावर कार्य करताना त्यांनी नवनवीन लेखक पुढे यावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.
विनोद कुलकर्णी यांनी सातार्‍यातील शाहूपुरी शाखेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काम सर्वदूर पोहोचवले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांना एक लाख पत्रे लिहिली होती. दिल्लीच्या आंदोलनाचे संपूर्ण नेतृत्व त्यांनी केले होते. अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष डॉ. रंगनाथ पठारे यांनी नुकतीच त्यांची याबद्दल सन्मानाने दखल घेतली. सातारा जनता बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना सहकाराच्या माध्यमातून त्यांनी जी माणसे जोडली त्याचाही उपयोग साहित्य संस्थांना होत आहे.
अनेकांनी टोकाचा विरोध करूनही सर्वांविषयी प्रेमभाव जपणार्‍या प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारखा खमक्या अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला मिळाल्याने साहित्याच्या माध्यमातून कोणती लोकोपयोगी कामे करता येतील, साहित्यसंस्था लोकाभिमुख कशा होतील आणि मराठी भाषेला लागलेले प्रतिसादशून्यतेचे ग्रहण कसे सुटेल हे ही मंडळी दाखवून देतील. वृद्धत्वाकडे झुकलेले महामंडळ या सर्वांमुळे तुलनेने तरूण झाले असे म्हणता येईल. त्यासाठी या नव्या चमूला मनःपूर्वक शुभेच्छा!
घनश्याम पाटील
7057292092

प्रसिद्धी – दैनिक पुण्यनगरी, 13 एप्रिल 2025

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

One Comment

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!