हेल्लारो : मृतप्राय झालेल्या गुजराथी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारा आगळा स्त्रीवादी चित्रपट

Share this post on:

1932 साली ‘नरसी मेहता’ द्वारे गुजराथी चित्रपटसृष्टीचा उदय झाला तेव्हापासून हजारो चित्रपट निर्माण होऊनही गुजराथीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार हुलकावण्या देत राहिला होता. तो मिळवून देणारा चित्रपट होता ‘हेल्लारो’ (2019) ज्याने हा पुरस्कार खेचून आणत त्या काळात जवळपास मृतप्राय झालेल्या गुजराथी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देत विलक्षण उंचीवर नेले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या आरंभ काळापासून हिमांशु रॉय, मेहबूब खान, व्ही. शांताराम, बिमल रॉय, श्याम बेनेगल, नागेश कुकनूर, अपर्णा सेन अशा दिग्दर्शकांची मांदियाळी शोषित स्त्री-जीवनाच्या विविध पैलूंचे वास्तवदर्शी चित्रण करणार्‍या चित्रपटांची निर्मिती करत आली आणि अलीकडे गौरी शिंदे, अश्विनी अय्यर-तिवारी, मेघना गुलजार, रेवती, अनिरुद्ध रॉय-चौधरी, सुजोय घोष, कंकणा सेन-शर्मा, अलंकृता शर्मा अशा ताज्या दमाच्या रंगकर्मींनी धर्म-समाज-राजसत्तेने पिढ्यानपिढ्या चिरडलेल्या पण ‘स्व’चे भान जागे होऊ लागलेल्या, स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवणार्‍या, प्रसंगी बंडखोरी करणार्‍या स्त्रीचे दर्शन घडवणार्‍या चित्रपटांचा एक सशक्त प्रवाह निर्माण केला. या प्रवाहाशी नाते  जोडणारा तरीही आपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये घेऊन अवतरलेला चित्रपट म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या राष्ट्रीय  पुरस्कारावर आपले नाव कोरणारा ‘हेल्लारो’.

‘हेल्लारो’ म्हणजे उद्रेक, आक्रोश, पुनरुत्थान. ‘हेल्लारो’ हे सगळे काही व्यक्त करताना या पलीकडच्या व्यापक आशयाकडे घेऊन जातो. कच्छच्या रणातल्या दुर्गम भागात जिथे अजून कोणत्याही पायाभूत सुविधा, एसटी, पोस्ट, शाळा, बँक, ग्रामपंचायत अस्तित्वात नाही अशा एका अनाम खेड्यात 1975 साली ही कथा घडते. काळाचा हा संदर्भ यात ठळकपणे येतो कारण चित्रपटाच्या सुरुवातीलाच गावकरी इंदिरा गांधींनी केलेली अणीबाणीची घोषणा रेडिओवरून ऐकताना दिसतात. इंदिराजींनी अणीबाणीद्वारे सगळी सूत्रे आपल्या हाती घेत  देशभरातल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार हिसकावून घेतले तर इकडे गावात ‘मावडी’ अंबामातेवरची श्रद्धा, मुखियाची राजसत्ता आणि बाप-पतीची कौटुंबिक सत्ता यांच्या अघोषित अणीबाणीत स्त्रीचे जगणे पिढ्यानपिढ्या बंदिस्त झाले आहे. जेव्हा जेव्हा धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येतात तेव्हा पुरुषसत्ताकी चिरेबंदीत स्त्रीचे सगळे हक्क हिरावून घेतले जात, तिला गुलामगिरीत जगण्याची सक्ती केली जाते अशी व्यापक पार्श्वभूमी लाभलेली ही कथा केवळ भारतीय मातीतली कथा राहिली नाही, ती जगातल्या सगळ्या दबलेल्या, दबवलेल्या स्त्रियांचा हुंकार बनून अवतरली.

कच्छच्या रणातल्या कुठल्याशा ठिपक्या एवढ्या खेड्यात बाप, सासरा, मुखिया, नवर्‍याच्या एकाधिकारशाहीत जगणार्‍या महिलांचे घुसमटलेले जिणे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. हा विषय तसा परिचयाचा, अनेक व्यावसायिक तसेच समांतर सिनेमा-नाटकातून, अगदी गुजराथी नाटकातून, लोकनाट्यातूनही अनेकदा अवतरलेला असल्याने त्या अर्थी सर्वपरिचित आहे पण या चित्रपटातल्या कथेच्या मांडणीतली तिहेरी गुंफण, यातल्या स्त्री-व्यक्तिरेखांची विविधता आणि या भूमिका निभावणार्‍या मुलींच्या अभिनयातली लक्षवेधक सहजता ही त्याची बलस्थाने  त्याचे वेगळेपण अधोरेखित करतात. यातल्या प्रत्येक स्त्रीचे  व्यक्तिमत्त्व वेगळे, कौटुंबिक पार्श्वभूमी, जीवनकथाही वेगळी  पण व्यथेची जातकुळी मात्र एकच आहे, ती या स्त्रियांना सहकंपाच्या, सहवेदनेच्या सूत्रात बांधून ठेवते. या चित्रपटात रूढ अर्थी ‘नायिका’ नाही पण वेदनेचा सामूहिक  उद्गार  बनणार्‍या या चौदा-पंधरा जणी ‘नायिकत्व’ मिळवून घेतात त्याची ही  जितीजागती कहाणी आहे.

गुजराथी स्त्रीच्या रक्तात गरबा भिनलेला आहे पण इथे माँ अंबेसमोर हातात तलवार घेऊन लयबद्ध रिंगण धरत गरबा करण्याचा हक्क फक्त पुरूषांनाच दिला गेला आहे. गरबा हे त्यांच्या लेखी शौर्याचे, पुरुषी मर्दुमकीचे प्रतीक आहे. त्यांनी ते आदिमायेच्या चरणी अर्पण केले असले तरी घरच्या स्त्रीला  मात्र माथ्यावरच्या घुंघटात चेहरा झाकून घर आणि पाणी भरण्याच्या तलावाचा काठ एवढ्याच अवकाशात बंदिस्त होण्याची सक्ती केली गेली आहे. पुरुषी आक्रमकतेच्या अवकाशात स्त्रीसाठी कोणताच मायेचा ओलावा नसणार्‍या या गावावर आदिमाया कोपली नाही तर नवलच. गेली तीन वर्षे इथे पाऊस पडलेला नाही. जितकी वैराण ही भूमी, तितकेच कोरडेठक्क हे सगळे अडाणी पुरुष आहेत पण यातल्या प्रत्येकाला धर्मपरंपरेने हक्क  गाजवण्यासाठी एक बायको दिली आहे. त्यांच्यात वेळोवेळी  उफाळून येणारी हिंसा, ते क्रौर्य लादून त्यांनी या स्त्रियांची आयुष्ये वैराण करून टाकली आहेत. इथे स्त्रीच्या सर्जनशीलतेला थारा  नाही, शिक्षण-सुधारणेचा वारा नाही, फक्त राबणे आणि दबणे, दबवून घेणे नशिबी असलेल्या या बायांनी जायचे कुठे? स्त्री-मुक्तीचा कोणता मार्ग शोधायचा, इथे तर त्यांना स्वतःच्या अंगीभूत स्त्री-शक्तीची जाण नाही.

व्यापक पटाचा विचार करता 1975 या साली सगळे जगच नवक्रांतीच्या विचारांनी भारून गेले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे महिला वर्ष आणि 8 मार्च हा महिला दिवस म्हणून घोषित केला होता. भारतात विद्यार्थी संघटना, शेतकरी, गिरणी कामगार, दलित, आदिवासी, स्त्रिया असे  समाजात दुय्यम स्थानावर ढकलले गेलेले घटक आंदोलने उभारून आपल्या आवाजाची जाणीव करून देऊ लागले होते पण दुसरीकडे चण्डिकेचा अवतार धारण केलेल्या इंदिराजींनी अणीबाणी पुकारून देशावरची आपली पोलादी पकड अधिक मजबूत केली होती आणि या गावात तर धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्याने वर्षानुवर्षे अघोषित अणीबाणी नांदत आलेली होती. देशाला स्वातंत्र्य मिळून तीन दशके होत आली, संविधानाने स्त्रीला समान हक्क दिले, शिक्षणाचे वारे देशातून पावले उमटवत गेले पण अशा अगणित भारतीय खेड्यात कुठे पोहोचले होते सरकार, शासनव्यवस्था आणि सुधारणेचे वारे? मग कुठून येणार होता स्त्रीमुक्तीचा विचार? टपाल आणि इतर गरजेच्या वस्तू घेऊन वाळवंटातून उंटावरून येणारा ‘भागलो’ एवढाच काय तो शहर आणि गाव यांच्यामधला संपर्कदुवा होता. त्यातून काही विधायक घडणे अशक्य होते. चराचरावर अधिपत्य  असणारी मावडी, देशावर सत्ता गाजवणारी हुकूमशहा आणि मर्यादेपेक्षा काहीच मोठं नाही असे बजावणार्‍या बाप-सासरा-मुखिया-नवर्‍याची अधिकारशाही अशा उतरंडीखाली दबलेल्या ग्रामीण महिलांच्या जगण्यातले पेच या चित्रपटातल्या लहानलहान घटनांतून उमटत आले. यातून या चित्रपटाला अगदी ठळक अशी राजकीय-सामाजिक चौकट लाभली पण दिग्दर्शक अभिषेक शाहला राजकीय भाष्य करण्यात रस नाही. त्याला या पोलादी पिंजर्‍यात अडकलेल्या स्त्रियांच्या जगण्यातले पेच आणि त्यातून उद्भवणारे विरोधाभास मांडायचे आहेत म्हणून ही पटकथा स्त्री-पुरुष संबंधातल्या तिढ्यांवर केंद्रित होत या स्त्रियांना जगण्याची लय सापडण्याच्या उत्कर्षबिंदूकडे वाटचाल करत जाते.

रणरणत्या उन्हात तापलेल्या वाळवंटातून, डोईवर हंड्यांचा भार घेऊन अनवाणी पायांनी पाणी भरायला जाणे या स्त्रियांच्या पाचवीला पुजले आहे. घर ते तलावाचा काठ एवढ्याच परिघात त्यांचा वावर सीमित केला गेला आहे पण त्यांच्या बंदिस्त आयुष्यात तेवढाच काय तो मोकळेपणाचा, सुटकेचा अवकाश आहे. ग्रामीण स्त्रीचे उपजत शहाणपण, परिस्थितीशी जुळवून घेत एकमेकींना सहाय्य करण्याची वृत्ती आणि छोट्याछोट्या बाबींतून विनोदाच्या छटा निर्माण करत जगण्याचा काच सहन करण्याची शक्ती इथे व्यक्त होते. यातली एक पोटुशी असल्याने  घरात बसणे गरजेचे असलेली, दुसरी विधवा म्हणून पाणी भरण्याचा हक्क नाकारला गेलेली, तिसरी परंपरेविरुद्ध गेले तर मावडीचा कोप होईल म्हणून घाबरलेली आणि आपण गरब्याला का जायचं  नाही गं आई? हा प्रश्न विचारणारी लहान मुलगी अशा ग्रामीण स्त्रियांच्या व्यक्तिरेखांचा एक वैविध्यपूर्ण आलेख इथे उभा राहतो. या प्रत्येकीची घुसमट या स्त्रियांना एका सूत्रात बांधून ठेवते. या लेकीसुनांमध्ये शहरात चार पुस्तकं शिकलेल्या नव्या सुनेचा -मंजिरीचा प्रवेश होतो आणि अधिकारशाहीच्या उतरंडीला धक्के बसण्याची नांदी होते.
मुखिया, भागला, सैन्यात भरती झालेला मंजिरीचा नवरा असे गावातले काही मोजके पुरुष जगण्यासाठी हातपाय हलवताना दिसतात. बाकीचे इथे-तिथे गप्पा मारण्यात, हिंदी सिनेमाच्या पांचट  स्टोर्‍या’ ऐकण्यात  रमलेले दिसतात . धर्मपरंपरेने  असल्या निष्क्रीय पुरुषांना देवीसमोर गरबा करण्याचा हक्क बहाल केला आहे. या गावात जशी मंजिरी येते तसाच एके दिवशी अचानक  येतो एक निर्वासित ढोलिया. पाणवठ्याच्या वाटेवर तापत्या उन्हात  बेशुद्ध  पडलेला हा माणूस या स्त्रियांना  दिसतो. त्याला तसेच  तडफडत  टाकून आपल्या वाटेने निघून जाणे त्यांच्यासाठी इष्ट ठरले असते, ठीक झाले असते पण अंतरंगात माणुसकीचा झरा झुळझुळत असलेली मंजिरी त्याला पाणी पाजते. जीव वाचलेला ढोलिया त्या कृतज्ञतेपायी त्यांच्यासाठी ढोल वाजवतो. हा माणूस दलित आहे, धर्म-जातिव्यवस्थेने त्याचे सर्वस्व बेचिराख करून त्याला भणंगावस्थेत जगण्यासाठी मजबूर केले आहे हे उपकथानकाद्वारे उलगडत जाते. या  निर्वासित, भ्रमिष्ट  ढोलियाच्या  हातात  इतकी विलक्षण जादुई करामत आहे पण या सर्जनशील  माणसाचे जीवन धर्म-जातिपरंपरेने, भेदाभेदांच्या भिंतींनी चिरडून टाकले  आहे. तळागाळातल्या जाती-जमातींना दिल्या जाणार्‍या दुजाभावाचे प्रतीक असलेला ढोलिया आणि अन्याय सोसत गुलामगिरीत जगण आलेल्या स्त्रिया असे शोषित, वंचित घटक या कथेच्या प्रवाहात एकत्र येतात तेव्हा वाळवंटाला हादरे देणारे  विलक्षण नाट्य घडू लागते. या हतभागी स्त्रिया आणि ढोलिया  रणातल्या शुष्क भूमीत एकत्र येतात तेव्हा एकीकडे गावात तीन वर्षे पाऊस पडला नाही म्हणून गरबा करून देवीला साकडे घालणारे पुरुष तर दुसरीकडे अंगीभूत नैसर्गिक लय पकडून गरबा करणार्‍या स्त्रियांचे वर्तुळ गावाबाहेरच्या वाळवंटात विलक्षण जादू घडवत जाते.

पिढ्यानपिढ्या घरात कोंडलेल्या स्त्रीचे पाऊल अखेरीस घराबाहेर पडते तो प्रसंगही इथे अतिशय संयमाने चित्रित केला गेला आहे. ही बाई बंड पुकारत नाही, ती विद्रोहाचे हत्यार हाती घेत नाही. तिचे पाऊल ठामपणे उंबर्‍याबाहेर पडते, ती उघड्या चौकात येते तेव्हा तिच्या माथ्यावरची ओढणी आपसूकच गळून पडते आणि ती एका आंतरिक ऊर्मीत गरब्याचा ठेका धरत जणू त्या आदिमायेलाच आवाहन करू लागते. निसर्गातल्या चराचर सृष्टीत वास करणारी आदिमाया कृपाळू होत तिची माया पावसाच्या सरी बनून बरसू लागते. झडीत चिंब होणार्‍या स्त्रियांच्या पावलांचे ढोलाच्या लयबद्ध ठेक्यावर गरब्याचे वर्तुळ आकार घेत जाते. कुणीच नसतात ते एकमेकांचे पण तो सर्वस्व हरपलेला फाटका  माणूस या स्त्रियांच्या मुक्तीच्या मार्गावर पाठीराखा बनून जीव पणाला लावून खडा ठाकतो. अखेरीस ढोलाच्या तालावर या स्त्रियांचा गरबा गतिमान होत रंगत जातो, या स्त्रियांना मोकळा श्वास मिळतो, ढोलियाची घुसमट थांबते, मनगटात नवा जोम येतो, दोहोंसाठी मुक्तीचा मार्ग खुला होतो आणि त्या आवर्तात  अडकलेले पुरुष थक्क होऊन बघत राहतात. इथे चित्रपट रूढ अर्थी संपतो पण खरंच तो संपतो का? राजापासून गावकुसाबाहेरची माणसे  एका अवकाशात एकमेकांचा ताल आणि तोल सांभाळून, निसर्गाच्या साथीने जगायला शिकतील तेव्हा सर्वांचे जिणे  आनंदमय, मंगलमय होईल, त्यातून एक निरामय, समताधिष्ठित समाज निर्माण होईल अशा अनेक शक्यतांचे सूचन करून तो  थबकतो. माणसाचे जिणे पुढे प्रवाहित होत राहणार असते.


निर्माता -दिग्दर्शक अभिषेक शाह आणि प्रतीक गुप्तालिखित पटकथा, ज्येष्ठ साहित्यिक सौम्य जोशी यांचे कच्छच्या बोलीभाषेशी जवळीक साधणारे गुजराथी संवाद आणि गीते, रखरखीत पार्श्वभूमीवर उठून दिसणारे रंगाचे पॅलेट, लोकसंगीत, नृत्य यांच्या संगमातून हे नाट्य फुलत, आकार घेत जाते. या चित्रपटातल्या -‘सपना विना नी रात’, ‘वाग्यो  रे ढोल’, ‘असवार’ आणि ‘हैय्या’ या चार गरबागीतांमध्ये कवी सौम्य जोशी आणि लोकसंगीतात मुरलेले संगीतकार मेहुल सुरती यांची किमया प्रत्ययाला येते. या गीतांमुळे कथानकात चैतन्य येते शिवाय ती  अतिशय चपखलपणे पेरल्यामुळे कथाप्रवाह पुढे जाण्यास मदत होते. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले ढोल हे वाद्य भारताच्या विविध संस्कृतींमधल्या दुव्याचे प्रतीक आहे. हिंदू मंदिरातल्या सण-उत्सवात, मशीद-दर्ग्यातल्या कव्वालीत, अभिजात आणि लोकनृत्त्यात, शेतात तसेच रणभूमीत ढोलाचे स्थान आहे. सूफी संप्रदायात आध्यात्मिक तृप्तीची आस असणार्‍या भक्ताला तंद्रावस्थेत नेण्यासाठी ढोलाचे ताल विकसित केले गेले आहेत. शहर, गाव वा जंगल असो हे साधेसुधे वाद्य जगभरात सगळीकडे प्रचलित आहे, इथे ते स्त्रीमधल्या चैतन्यतत्त्वाला आवाहन करून, सर्जनशील जगण्याचा मार्ग दाखवणारा घटक म्हणून येते. त्यामुळे ही कहाणी रणातल्या चार बायकांची कहाणी रहात नाही, बाई शहरातली असो की गामड्यातली, सगळ्यांचं दुःख सारखंच,  हे वास्तव भिडणार्‍या, त्यातून मुक्तीची वाट शोधू पाहणार्‍या  प्रत्येकाची ती कहाणी बनते. रूढ अर्थाने चित्रपट संपतो पण कहाणी संपत नाही. देवीसमोर गरबा करायला स्त्रीचे पाऊल उंबरठ्याबाहेर पडले म्हणून ती स्वतंत्र, मुक्त झाली असे होत नाही. तिच्यावर हक्क गाजवणारा पुरुष तिला ओढत नेऊन पुन्हा  घरात डांबणार नाही, पूर्वीपेक्षा जास्त अत्याचार करणार नाही  कशावरून ? ग्रामीण स्त्रीने परिवर्तनाच्या दिशेने उचललेले हे पहिले-वहिले पाऊल आहे, ते यशस्वी व्हावे असे वाटते पण प्रत्यक्षात ते होईल की नाही अशी प्रश्नचिन्हे निर्माण करत चित्रपट संपतो तेव्हा प्रेक्षागृहात दाटून येणारी सुन्न शांतता तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहते.

गुजराथी चित्रपटसृष्टी मृतप्राय झालेली असताना अभिषेक शाहसारख्या नाट्यकर्मींने चित्रपटनिर्मिती करण्याचे स्वप्न बघणे, एवढेच नव्हे तर दिग्दर्शन, कथा,पटकथालेखन अशा जवाबदार्‍या उचलणे, त्याला प्रतीक गुप्ता, मीत जानी आणि आशिष पटेल या मित्रांची साथ मिळून ‘हेल्लारो’चा जन्म होणे हीच एक मोठी कमाल होती. आज आपल्या देशात जिथे चित्रपट व्यवसाय वा  संस्कृती अस्तित्वात नाही अशा गावा-शहरांकडून ताज्या दमाचे रंगकर्मी पुढे येऊन चित्रपट, लघुपट, माहितीपट, चलचित्रपट  अशा विविध क्षेत्रात नवनवे प्रयोग करू लागले आहेत. त्यातून  नवनव्या कथा, वेगवेगळे ‘जॉनर’ येऊ लागले आहेत, त्यामागे या धडपड्या तरुणाईची नवनवोन्मेषशाली ऊर्जा आहे. अशाच तरुणाईतून अनुराग कश्यप, नागराज मंजुळे पुढे आले होते. त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात सगळेच काही परिपूर्ण नव्हते, त्यावर टीकाही झाली पण त्यांनी आपली दखल घ्यायला भाग पाडले आणि मागून येऊ घातलेल्या अनेकांसाठी मार्ग प्रशस्त करून ठेवले. ‘हेल्लारो’  हे अशा तरुणाईच्या सर्जनशीलतेचे एक महत्त्वाचे उदाहरण बनून सामोरे आले.

उत्तम कहाणी, लोकेशन, रखरखीत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे रंगाचे पॅलेट, लोकसंगीत, नृत्य आणि विनोदी जोडगोळीचा वावर असला तरी ‘हेल्लारो’हा रूढ अर्थी मनोरंजनात्मक चित्रपट नाही तसाच तो सामाजिक रुढींवर प्रहार करणारा प्रायोगिक चित्रपटही नाही, या दोन्ही प्रवाहांना कवेत घेणारी त्याची आपली वेगळीच वाट आहे. भारतीय भाषिक चित्रपटांच्या मांदियाळीतला एक कलात्मक प्रयोग म्हणून त्याचे  महत्त्व आहेच शिवाय भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’त अवतरण्याआधी तो देशभरात प्रदर्शित करण्यात आला  हाही गुजराथी व्यावसायिकतेचा एक धाडसी प्रयोग होता. 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय  चित्रपट  महोत्सवा ‘इफ्फी’तल्या ‘इंडियन पॅनोरामा’च्या उदघाटनाचा चित्रपट म्हणून निवडला जाण्याचा मान, तसेच देशोदेशातल्या रंगकर्मींच्या प्रयोगांची दखल घेण्यासाठी  आयोजित ‘पदार्पण’ (ऊशर्लीीं ऋळश्रा उेाशिींळींळेप) या  विभागात त्याचा समावेश झाला. सारथी प्रॉडक्शन्स आणि हरफनमौला  फिल्म्सची निर्मिती असणार्‍या ‘हेल्लारो’चे नाव 66व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा पहिला गुजराथी चित्रपट म्हणून इतिहासात कायमचे कोरले गेले. या चित्रपटातल्या या ‘नायिकां’च्या सहजसुंदर अभिनयाबद्दल या तेरा जणींनी राष्ट्रीय पुरस्कारांमधला ‘विशेष ज्युरी’ पुरस्कार पटकावला. हा त्यांनी घडवलेल्या स्रीशक्तीच्या आविष्काराचा  गौरव होता. भारतीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात अशा मानकर्‍यांमध्ये  ‘हेल्लारो’चा समावेश होणे, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही केवळ गुजराथीच नव्हे तर सगळ्या चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट होती.
अंतरंगात उतरणारा चित्रपट आहे, कुठे बघायला मिळाला तर चुकवू नका.

– यशोधरा काटकर

प्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ जानेवारी २०२५

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

2 Comments

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!