tarkateertha lakshamnshastri joshi

तर्कतीर्थांचा साहित्य-संज्ञाप्रवाह

Share this post on:

98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात होत आहे. नवमहाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी ऑक्टोबर, 1954 मध्ये दिल्लीत 37 वे मराठी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे अध्यक्ष होते, गेल्या शतकातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि संस्कृतपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. संस्कृत भाषेतील प्रकांडपंडित असूनही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले, याचे कारण तर्कतीर्थांची सर्वव्यापी प्रज्ञा हे होते. तसं ज्याला ‘साहित्य’ या सदरात आपण गणतो तसं त्यांचं मराठी साहित्य त्यावेळी आणि नंतरही प्रकाशित झालेलं नव्हतं; पण त्यांनी संस्कृत आणि मराठी साहित्याची समीक्षा अनेकवेळा भाषणांमधून मांडली होती.
वैदिक संस्कृतीचा विकास आणि हिंदू धर्माची समीक्षा या विषयांवरील भाषणांनी पन्नासच्या दशकात ते खूप प्रसिद्धीस आले होते. या दोन्ही विषयांवरची त्यांची भाषणे पुस्तकरूपातही प्रसिद्ध झालेली आहेत. मराठीत अशा प्रकारची धार्मिक संशोधनात्मक समीक्षा फारशी प्रसिद्धीस आली नव्हती. या दोन्ही समीक्षांवर मार्क्सवादी विचारांची छाप असली तरी शास्त्रीजींनी ती सूत्ररूपाने मांडली असल्याने ती तत्कालीन विद्वानात मान्यता पावली होती कारण त्या काळात सुशिक्षितांचा मोठा वर्ग डाव्या विचारसरणीकडे आकृष्ट झाला होता. वैदिक संस्कृती किंवा भारतीय धर्मशास्त्र या आधुनिक वैचारिक भूमिकेशी सुसंगत असल्याचे या विवेचनातून लोकाच्या नजरेत येत होते. शास्त्रीजींनी हा विषय नेमकेपणाने मांडलेला असल्याने साहित्य-समीक्षा वर्तुळात त्यांचे नाव झाले होते आणि त्यामुळेच त्यांच्या नावाचा विचार होऊन एक संस्कृत भाषाकोविद मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.

या घटनेला आता 71 वर्षे झाली असून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची 125 वी जयंतीही नुकतीच झाली. या दोन घटना आणि याच वर्षात मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत होत असल्याने त्याचे औचित्य साधून तर्कतीर्थांचं जीवन, दिल्लीतलं त्यांचं अध्यक्षीय भाषण आणि तत्पूर्वीच्या आणि नंतरच्या काळातीलही त्यांचे साहित्यविषयक विचार यांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात करतो आहे.


तर्कतीर्थांची जडणघडण
तर्कतीर्थांचं मूळ नाव लक्ष्मण बाळाजी जोशी. त्यांचा जन्म रथसप्तमीचे दिवशी दि. 27 जानेवारी, 1901 रोजी खान्देशातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे झाला. त्यांचं घराणं याज्ञिकी करणारं देशस्थ यजुर्वेदी होतं. वडिलांचा वेदांचा आणि संस्कृत वाङ्मयाचा गाढा व्यासंग होता. लक्ष्मणशास्त्रींच्या मातोश्री चंद्रभागाबाई यांचे निधन झाले तेव्हा ते तीन वर्षांचे होते. गाव अगदी लहान. आधुनिक शिक्षणाचा पर्याय नव्हता. त्यांनी घरी, गावातच तत्कालीन प्रथा व कौटुंबिक वारसा या नात्याने आवश्यक ते वैदिक व संस्कृत शिक्षण घेतले. ते तल्लख बुद्धिमान असल्याने एवढ्या शिक्षणावर समाधान होणे शक्यच नव्हते. पुढील शिक्षण काशी, हरिद्वार वगैरे ठिकाणी मिळत असे; पण इतक्या दूरवर जायची वेळ त्यांच्यावर आली नाही आणि ते पुढील शिक्षणासाठी वाई येथे 1914 साली आले. तेव्हा वाईत नारायणशास्त्री मराठे हे व्युत्पन्न विद्वान प्राज्ञमठ चालवीत होते. त्यांची मोठी ख्याती होती. लक्ष्मण यांनी तिथे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हा तर्कतीर्थ झालेले अनेक जण असत पण शास्त्रीजींच्या नावामागे तर्कतीर्थ ही पदवी अशी चिकटली की, तर्कतीर्थ म्हटले की लक्ष्मणशास्त्री जोशी हे समीकरण इतके रूढ झाले आणि आजही ते तसेच आहे. एखाद्या पदवीला एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे मोठेपण येणे हे लक्ष्मणशास्त्रींच्या बाबतीत घडले. प्राज्ञमठाचे नाव पुढे प्राज्ञपाठशाळेत रूपांतरीत झाले. तिथे 1917-18 साली आचार्य विनोबा भावे तर्कतीर्थांचे सहाध्यायी होते. विनोबांमुळेच ते इंग्रजी शिकू शकले.
प्राज्ञपाठशाळेत त्यांना गुरुंकडून खूप बौद्धिक संपदा जशी मिळाली तशी तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती याचे भानही मिळाले. ती राष्ट्रीय शाळाही होती, त्यामुळे पुढे तत्कालीन राजकीय आंदोलने विशेषतः म. गांधींच्या चळवळीत ते सामील झाले. 1930 साली त्यांनी कारावासही भोगला.
प्राज्ञपाठशाळेत अनेक भिन्न विचारसरणींची माणसं त्यांना भेटल्यामुळे त्यांची विचारसरणी व्यापक बनली. त्यामुळेच गांधीवाद, मार्क्सवाद, रॉयिस्ट (मानवेंद्र नाथ रॉय), काँग्रेस असा त्यांचा मोठा वैचारिक प्रवास घडला. त्यांनी प्राज्ञपाठशाळेत अध्यापनही केले. नारायणशास्त्री मराठे जे पुढे केवलानंद सरस्वती झाले, त्यांचा शास्त्रीजींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आणि पुढे ते त्यांचे उत्तराधिकारीही बनले.
1960 साली महाराष्ट्र हे मराठीभाषक राज्य झाल्यावर पहिले मुख्यमंत्री ना. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षस्थान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर सोपवले. या मंडळाचे मुख्य काम इंग्रजी एनसायक्लोपीडिया  प्रमाणे  ‘मराठी विश्वकोश’ बनवणे हे होते. त्याचे प्रमुख संपादक म्हणून शास्त्रीजींनी 1961-1994 म्हणजे मृत्युपर्यंत काम केले. त्यांच्या कारकीर्दीत मराठी विश्वकोशाचे पंधरा-सोळा खंडांचे काम पूर्ण झाले होते. दरम्यान स्वामी केवलानंद सरस्वती यांनी सुरू केलेल्या संस्कृत भाषेतील ‘धर्म कोशा’चे संपादनही त्यांनी अखेरपर्यंत केले. हे खूप मोठे काम असून अजूनही चालू आहे.
तर्कतीर्थांचे कुटुंबीय आणि जवळचे स्नेही-सुहृद त्यांना आबा म्हणत पण ते स्वतः मात्र तो उच्चार ‘अबा’ असाच करीत. त्यांच्या पत्नी सत्यवती यांची त्यांना चांगली साथ मिळाली. दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार त्यांनी पाहिला. पत्नीच्या निधनानंतर ते काही दिवस अस्वस्थ होते पण पुढे त्यातून ते सावरले आणि  अखेरपर्यंत ज्ञानाच्या कक्षेत  राहिले.
त्यांचा मित्रपरिवार प्रचंड होता आणि त्यात सामान्य ते असामान्य सर्वांचाच समावेश होता!
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वयाच्या 95 व्या वर्षी दि. 27 जानेवारी, 1994 रोजी वाईपासून जवळच श्रीकृष्णा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे पंचपंच उषःकाली कोणालाही कळू न देता अगदी शांतपणे या भौतिक जगाचा निरोप घेतला. जीवनाचा आनंद त्यांनी आयुष्यभर स्वतः उपभोगला आणि दुसर्‍यांच्या जीवनातही तो उमटवण्याचा प्रयत्न केला. पद्मभूषणसारख्या अनेक पदव्या पुढे त्यांना मिळाल्या असल्या तरी आधी म्हटल्याप्रमाणे ‘तर्कतीर्थ’ हा शिरताज अजूनही कायम आहे आणि तो तसाच राहील!

तर्कतीर्थांचा  साहित्यविचार
1954 साली शास्त्रीजी नवी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. त्या आधीची त्यांची साहित्यविषयक तीन भाषणे उपलब्ध आहेत. त्यातले पहिले भाषण 1943 साली मुंबईत गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेले आहे. त्याचे शीर्षक ‘ललित कला व ललित वाङ्मय यांच्या समीक्षेत उत्पन्न होणारे प्रश्न’ असा आहे. दुसरे भाषण ‘जीवनाचे तत्त्वज्ञान व कला’ असे असून ते मुंबई व उपनगर मराठी साहित्य संमेलनातील  1944चे अध्यक्षीय भाषण आहे. तिसरे  भाषण ‘काव्य व सामाजिक उत्क्रांती’ या विषयावर असून ते 1949 साली बेळगाव येथील वाङ्मय चर्चा मंडळात केलेले आहे. चौथ्या भाषणाचा विषय ‘कलात्मक वाङ्मयाचे स्वरूप व विचार’ असा आहे आणि ते 1953 सालच्या बडोदे येथे झालेल्या मराठी वाङ्मय  परिषदेतील अध्यक्षीय भाषण आहे. पाचवे भाषण हे दिल्ली येथील 37 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण आहे.
आता या पाचही भाषणांमधील शास्त्रीजींच्या साहित्यविषयक विचारांवर ओझरता दृष्टीक्षेप टाकल्यास त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट होऊ शकेल. पहिल्या भाषणात त्यांनी विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला असून विचारस्वातंत्र्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य असे ते मानतात.
याच भाषणात ते म्हणतात की, ‘‘सामाजिक विकासाचे  प्रतीक, युगप्रवर्तक संघर्षाचा आदर्श आणि जीवनातील किंवा आत्म्यातील सर्व भावनांचा विशद आविष्कार करणारी अशी कला उदयास येण्याच्या अगोदर समाजाच्या विचारामध्ये क्रांती व्हावी लागते. जुनी मूल्ये, जुनी ध्येये, जुन्या संस्था व जुनी शास्त्रे बुद्धिच्या निकषावर तपासून घेण्याची प्रवृत्ती अशा कलेचे सामाजिक अधिष्ठान आहे. आपली प्रवृत्ती अजून अशी संशोधक बनली नाही.’’ (पृ. 68 : साहित्याचे तर्कशास्त्र)
इथे जरी ‘कला’ असे म्हटले असले तरी, ललित कला आणि ललित वाङ्मय या दोन्हींच्या समीक्षेसंदर्भात ते हा मुद्दा मांडतात. आज 82 वर्षांनीही तो बराचसा लागू होतो.
पुढच्याच वर्षी 1944 सालीही ते विचारस्वातंत्र्याच्या मुद्यालाच प्रमुख मानतात. याच भाषणात ते म्हणतात, ‘साहित्य संमेलने आणि साहित्यपत्रिका ज्ञानमार्गाचे रक्षण करणार्‍या शिलेदारांच्या संस्था आहेत. ज्ञानमार्गावर आक्रमण करणारे वाटमारे आणि पुंड पाळेगार यांचा बंदोबस्त करण्याचे काम करणे हेच या संस्थांचे कर्तव्य आहे. विशिष्ट संप्रदाय, विशिष्ट तत्त्वज्ञान, विशिष्ट राजकीय पंथ इत्यादिकांच्यापासून अलिप्त राहून केवळ वैचारिक संस्कृतीची सर्वांगीण उन्नती होण्यास आवश्यक अशी खबरदारी घेण्याचे काम अशा संस्थांनी करावयाचे असते.’ ( पृ. 96 : तत्रैव) आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही शास्त्रीजींची ही अपेक्षा दुर्दैवाने तशीच राहिल्याचे दिसून येते!
आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या अडीच वर्षांनी 1949 साली त्यांनी केलेले एक भाषण पाहू! यात काव्य आणि सामाजिक उत्क्रांती हा विषय मांडताना ते मर्ढेकरांवर ‘बावरलेले कवी’ असा शिक्का नाव घेऊन मारतात. इथे ते तुकारामांचा गौरव करून  म्हणतात, ‘‘मध्ययुगात अधोगतीला चाललेल्या  महाराष्ट्राला अशा कवींनी (तुकाराम महाराज) सावरून धरण्याचा प्रयत्न केला. आज माझा देश, माझा महाराष्ट्र अशा संकुचित दृष्टीने पहाणारे कवी नकोत. सबंध मानव्याला आशा देणारे कवी हवेत. ‘ट्रिंग ट्रिंग’ करणारे (मर्ढेकर) नकोत.’’ (पृ. 102 : तत्रैव) शास्त्रीजींची अशी परखड मीमांसा त्यांच्या नित्य चिंतनातून व्यक्त होते.
दिल्लीतील संमेलनाच्या एकच वर्ष आधी बडोद्यास 1953 साली कलात्मक वाङ्मयावर त्यांनी भाषण केले आहे. एकूणच साहित्य आणि कलेतील अभिन्नत्व हा तर्कतीर्थांच्या चिंतनाचा विषय बहुतेक सर्व भाषणांमधून अभिव्यक्त झाला आहे. ‘‘वाङ्मयाच्या श्रेष्ठतेचा अंतिम निकष नैतिक आहे’’ असं त्यांचं 1953 चं प्रतिपादन आजच्या मराठी आणि जवळपास सर्वच वाङ्मयाच्या जवळपास तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
1954 चे दिल्लीचे तर्कतीर्थांचे अध्यक्षीय भाषण तोपर्यंतच्या सर्व अध्यक्षीय भाषणांतील सर्वांत मोठे म्हणजे 1/8 डेमी आकाराच्या चोपन्न छापील पृष्ठांचे आहे. त्यानंतरही बहुतेक कुणाचे एवढे प्रदीर्घ भाषण असले तर ते अपवादात्मकच असावे. या भाषणाला आपल्या ‘वाङ्मयाचा क्रियाकलाप’ असे शीर्षक ‘साहित्याचे तर्कशास्त्र’ या ग्रंथात दिले आहे.
या भाषणात अनेक मुद्यांवर ते प्रकट झाले आहेत. तोपर्यंतच्या मराठी वाङ्मयासंबंधीचे तर्कतीर्थांचे विचार मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे आहेत. ते म्हणतात, ‘‘भारताच्या संघराज्याच्या जन्मास ज्या विविध प्रकारच्या चळवळी कारणीभूत झाल्या, त्या चळवळींचा एक प्रेरक मध्यबिंदू म्हणून आधुनिक मराठी साहित्य जन्मले आहे. मराठी साहित्याचा एकंदरीत उगम व विकास, चिरंतन अशा भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानावर झाला आहे. दुसरे असे की, आधुनिक काळातील मराठी वाङ्मयाच्या मुळाशी असलेली एक महत्त्वाची प्रेरणा भारतीय स्वातंत्र्याच्या जन्मास कारणीभूत झाली आहे. त्या प्रेरणेनेच भारतीय एकराष्ट्रीयत्वाची रचना  केली आहे. एकराष्ट्रीयत्वाच्या प्रसूतिवेदना व संवेदना महाराष्ट्रभूमीने अनुभवल्या आहेत व ती अनुभवीत आहे. त्या अनुभवातच मराठी वाङ्मय विकास पावत आहे.’’ (पृ. 133 : साहित्याचे तर्कशास्त्र)
तर्कतीर्थांनी या अध्यक्षीय भाषणात समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख मोठ्या गौरवाने केलेला दिसतो. अनेकांना हे आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे पण त्यांची यामागील कारणमीमांसा पटण्याजोगी आहे. तो सविस्तर परिच्छेद मुद्दामच देत आहे. ते म्हणतात, ‘‘ज्ञानेश्वरांपासून टिळकांपर्यंत मराठी वाङ्मय भगवद्गीतेच्या चिंतनात वाढले. श्रीमद्भागवतालाही महत्त्व पूर्वी आले होते परंतु त्यातील कृष्णचरित्र सांगणारा दशमस्कंध गौण ठरला. एकादशस्कंधावरच एकनाथी भागवत उभे राहिले. भगवद्गीतेच्या खालोखाल रामायणाचा महिमा मराठी भाषेत गाजला. मराठीत छंदोबद्ध रामायणे अनेक आहेत परंतु तुलसीदासांच्या ‘रामचरितमानसा’ची बरोबरी करणारे रामायण मात्र मराठी भाषेत होऊ शकले नाही. भगवद्गीता व महाभारत यांनीच महाराष्ट्र-मनावर चिरंतन विजय मिळवला. ‘दीनानाथ हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी। जनां वाक्य नेमस्त। हें सत्य मानी॥’ अशी नैतिक शौर्याला आव्हान देणारी रामोपासना रामदासस्वामींनी देशात फैलावून दिली, हे जरी खरे असले तरी रामदासस्वामींचा दासबोध महाभारताच्याच प्रभावाने प्रभावित झाला आहे. त्यातील राजकारण म्हणजे शांतिपर्वातील राजनीतिपर्व होय. त्यात इह आणि परत्र किंवा प्रपंच आणि परमार्थ या दोहोंनाही महत्त्व देण्याची कल्पना महाभारतावरून आलेली आहे. विदुरनीतीच्या छटा दासबोधावर स्पष्ट उमटल्या आहेत. त्यातील उत्तमपुरुषाची लक्षणे चांगल्या सद्गृहस्थांचा आदर्श दाखवितात.’’ (पृ. 150 : तत्रैव) हा परिच्छेद स्वयंस्पष्ट आहे.
दिल्लीतील हे तर्कतीर्थांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे अपूर्व असा वाङ्मयीन विलास आहे, हे सांगताना तर्कतीर्थांचा आणखी दीर्घ परिच्छेद देण्याचा मोह आवरत नाही. ते लिहितात, ‘‘भारतीय राष्ट्रीयत्त्वाचा जन्म सांस्कृतिक पूर्वपरंपरेच्या अधिष्ठानावर झाला, आधुनिक भारताचे हे पहिले व मुख्य लक्षण होय. भारतीय राष्ट्रीयत्वाची मनोभूमिका पुष्ट करावयाची आणि राष्ट्रीय राजकारणाच्या  चळवळीचा उठाव करावयाचा या मुख्य उद्दिष्टाने प्रेरित होऊन इ. स. 1881 मध्ये चिपळूणकरांनी टिळक-आगरकरांच्या सहकार्याने ‘केसरी’ वृत्तपत्र सुरू केले. ‘केसरी’ हे प्रतीक उन्नत अहंकाराने अभिनिविष्ट अशा राष्ट्रीय राजकारणाचे उत्कृष्ट द्योतक आहे. भारतीय राजकीय चळवळीच्या प्रारंभी हे प्रतीक मोठ्या दीर्घदर्शी प्रज्ञाशाली प्रतिभेतून प्रकट झाले. आता हाच केसरी भारतीय संघराज्याच्या अधिकृत मुद्रेवर चतुर्मुख असा आरूढ होऊन आपणास भारतीय राष्ट्रीयत्वाच्या  सामर्थ्याचे दर्शन देऊ लागला आहे. हा योगायोग नाही. हे अंतर्मनाचे तर्कशास्त्र कळत वा नकळत सुसंगतपणे माणसाच्या हातून कृती घडवीत असते. आता हा केसरी जागृत होऊन चारी दिशांवर दृष्टिक्षेप करीत भारताच्या सर्वांगीण रक्षणाकरिता सिद्ध झाला आहे.’’ (पृ. 159 : तत्रैव) अध्यक्षीय भाषणात इतका स्वैर कल्पनाविलास प्रकांडपांडित्याशिवाय व्यक्त होऊच शकत नाही.
मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी वाङ्मय इत्यादींचा साकल्याने अभ्यास करणार्‍यास तर्कतीर्थांचे दिल्लीचे हे भाषण आणि साहित्यविषयक त्यांची अन्य भाषणे टाळून पुढे जाता येणारच नाही! दिल्लीतील या भाषणात संतवाङ्मय, मराठी कादंबरी, मराठी नाटकसृष्टी, मराठी वाङ्मयाचा समग्र  इतिहास (तत्कालीन काहीसा वादग्रस्त विषय), प्रादेशिक भाषांच्या वाढीचा कठीण प्रश्न, साहित्य अकादमी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषा इत्यादी अनेक विषयांवर तर्कतीर्थांनी विचारमंथन केले आहे. शास्त्रीजी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले असले तरी मुळात संस्कृत पंडित असल्याचे विस्मरण त्यांनी होऊ दिले नाही. दिल्लीचे संमेलन ऑक्टोबरमध्ये म्हणजे शारदोत्सवाच्या काळात झाले असल्याने महाकवी कालिदास यांच्या शारदीय शोभेचे वर्णन करणार्‍या श्लोकाने आणि त्याच्या तितक्याच प्रसन्न मराठी गद्य अनवट अशा अनुवादाने शास्त्रीजींनी आपले हे भाषण संपविले आहे.
त्यानंतर 1958, 1962 (आकाशवाणी, पुणे), 1962 (पणजी – गोवा) 1971 पुणे, व्हीनस व्याख्यानमाला, 1978 पणजी, 1981 अ. भा. दलित साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणाखेरीज शास्त्रीजींनी वेळोवेळी साहित्य या विषयावर आपली मते व्यक्त केली आहेत. तर्कतीर्थांचे हे विचार प्रदीर्घ कालखंडातील असले तरी त्यात एक समान सूत्र, विचारांची सलग गुंफण असल्याचे अनुभवास येते. साहित्याची सर्जनशीलता अनुभवत, साहित्यसमीक्षा करीत, साहित्याचा रसास्वाद घेत सर्व प्रकारच्या साहित्यावर, त्यातील अंतर्प्रवाह, अंतर्विरोध या सर्वांवर चिकित्सक प्रेम करणारे ज्येष्ठ आणि प्रतिभासंपन्न दिवंगत साहित्यॠषी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आणि दिल्लीत भरत असलेल्या साहित्य संमेलनानिमित्त माझ्या अल्पमतीनुसार त्यांच्या साहित्यविषयक विचारांचा हा परामर्श त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच विरमतो!
संदर्भ :
साहित्याचे तर्कशास्त्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची साहित्यविषयक अध्यक्षीय भाषणे
संपादक : सीताराम रायकर, द. दि. पुंडे, पंडित टापरे
प्रकाशक : प्राज्ञपाठशाळा मंडळ, गंगापुरी, वाई 412803 जि. सातारा. दूर. संपर्क  : 02167/220006

– मधु नेने, वाई
सज्जनगड मासिक पत्रिकेचे संपादक
भ्रमणध्वनी : 9834806387

पूर्व प्रसिद्धी : मासिक ‘साहित्य चपराक’ फेब्रु. २०२५

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

One Comment

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!