सातत्याने नवनवीन विषयांच्या आणि तसे लेखन करणाऱ्या लेखकांच्या शोधात असणारे, नावीन्यपूर्ण विषय देऊन लेखकांना लिहिते करणारे, प्रयोगशील व धडाडीचे प्रकाशक अशी ख्याती असलेल्या घनश्याम पाटील यांनी चपराक प्रकाशनातर्फे नुकताच एक समीक्षासंग्रह प्रकाशित केला आहे… पुस्तकानुभव!
साहित्य क्षेत्रात चमचमणारा आणि संशोधन वृत्तीचा एक हिरा घनश्याम पाटील ह्यांनी हेरला तो म्हणजे प्रा. दिलीप फडके! दोन तपस्वी, दोन अभ्यासक आणि त्यांचा चमू यांच्या अथक परिश्रमाने सजलेला समीक्षा संग्रह म्हणजे साहित्याच्या दालनात उगवलेले जणू ब्रह्मकमळ! वाचकरुपी देवतेला लेखक, प्रकाशक यांनी अर्पण केलेले हे पुष्प तितक्याच आत्मीयतेने शृंगारित केलें असल्याचे वाचकांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. इतके ते आकर्षक आहे. ज्यांची कवयित्री, अनुवादिका, गीतकार आणि मुखपृष्ठकार अशी ख्याती आहे त्या चपराक परिवाराच्या ज्योती घनश्याम यांनी चितारलेले मुखपृष्ठ मनोवेधक आहे. एखाद्या इमारतीत, घरामध्ये प्रवेश करताना दाराजवळ रेखाटलेली सुंदर रांगोळी मन प्रसन्न करते तसे हे मुखपृष्ठ आहे.
मुखपृष्ठावरील ‘१८३० ते १९९० या काळातील निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण’ हे ठळक वाक्य पुस्तकाचे अंतरंग अधोरेखित करताना जे पट्टीचे वाचक आहेत, त्यांना आपल्यासाठी ही वाचनाची पर्वणीच आहे असे वाटून ते वाचक अंतरंगात जसेजसे खोलवर शिरतात तसतशी त्यांची तृष्णा अधिकाधिक वाढत जाते. असा हा वाचनपट वाचनीय, अनुभव समृद्ध आहे. १९२ पानांमध्ये तब्बल ४५ पुस्तकांची समीक्षा लेखक फडके यांनी केली आहे. प्रथमदर्शनी वाचकांना एक प्रश्न निश्चित पडतो, तो म्हणजे इतकी पुस्तके लेखकाने कुठून उपलब्ध केली असणार? प्रश्नाच्या उत्तरात प्रत्येक लेखाच्या शेवटी लेखकाने ‘ग्रंथसंदर्भ सौजन्य’ अंतर्गत विविध संस्थांची नावे दिली आहेत. अशी जवळपास दोन शतकांपूर्वीची पुस्तके काळजीपूर्वक जतन करणाऱ्या या संस्थांचे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. ह्या संस्था आहेत, न्या. रानडे मोफत वाचनालय, www.archiv.org, सार्वजनिक वाचनालय नाशिक, नाशिकरोड महाविद्यालय, नाशिकरोड, श्री अरविंद जोशी, ठाणे यांचा ग्रंथसंग्रह, हं. प्रा. ठा. महाविद्यालय, नाशिक!
या समीक्षा लेखसंग्रहाच्या माध्यमातून वाचकांना त्या कालखंडातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, पर्यटन, विवाह , महिलांविषयी लेखन इत्यादी अनेक विषयांची माहिती मिळते, तो एक ज्ञान संवर्धक अनमोल ठेवा आहे.
मला जाणवलेले एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक लेखासोबत त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ छापले आहे. त्यावरून त्या काळातील मुद्रण कला, अक्षर जुळणी अशा विविध कलांची जाणीव वाचकांना होते.
पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर एक दृष्टीक्षेप टाकला की, लेखकाची विविध विषयांवरील पुस्तकांची निवड समजून येते. छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन, अफजल खान, जावजी दादाजी चौधरी, महाराणी लक्ष्मीबाईसाहेब, सर दिनकरराव राजवाडे, लक्ष्मण बापूजी कोल्हटकर, ग्यारिबाल्डी इत्यादी व्यक्तिंविषयक लेख, तसेच जपान, हिंदुस्थान देशाविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकांवरील लेख, मराठी साहित्य, वक्तृत्व कला, नशीब, उद्योग दारिद्र्य, ब्राह्मण, कर्तव्य नि संसार सुख, म्हणी, विद्यार्थी इत्यादी अनेक विषयांवरील पुस्तकांवर लेखक प्रा. दिलीप फडके यांनी सखोल, अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले आहेत. ‘वाचले, निवडले, अभ्यासले, लिहिले’ असा या समीक्षा संग्रहाचा आत्मा आहे, हे एक फार मोठे संशोधनात्मक महत्त्वाचे कार्य आहे.
सारेच समीक्षा लेख वाचनीय आहेत, आस्वादात्मक आहेत. काही लेखांचा उल्लेख मी करणार आहे. ‘शूचिर्भूतपणा’ हे पन्नास पृष्ठांचे पुस्तक गोविंद नारायण मडगावकर यांनी लिहिले आहे. या पुस्तकाचा मुख्य भागा हा स्वच्छता आहे. मनाची स्वच्छता या विषयी मडगावकर यांचे एक वाक्य प्रा. फडके यांनी उद्धृत केले आहे,’मनुष्याच्या शरीरामध्ये अंतःकरण हे राजा आहे आणि तेच जर स्वच्छ नसेल तर त्याचा बाह्य स्वच्छपणा काहीच उपयोगाचा नाही. असला स्वच्छपणा प्रेतावर नानाप्रकारचे अलंकार घालून शृंगारण्यासारखा आहे किंवा टोणग्याच्या गळ्यांत फुलांचे हार घालण्यासारखा आहे असे समजावे.’ जितके समर्पक तितकेच धाडसी विधान आहे.
महादेव गोविंदशास्त्री यांनी लिहिलेल्या ‘प्राकृत कवितेचे पहिले पुस्तक’ या पुस्तकाची समीक्षा करताना समीक्षक प्रा. फडके लेखकाची ओळख करून देतात. कवी महादेव यांच्या एका विशेष गुणाचा समीक्षक उल्लेख करतात, ‘ह्या पुस्तकाचा वापर कसा करावा याबद्दल लेखकाने तपशीलवार सूचना दिल्या आहेत. कविता कशा शिकाव्यात व शिक्षकांनी कशा शिकवाव्यात याबद्दल ह्या सूचना आजही उपयोगी पडणाऱ्या आहेत.’ यावरून एक गोष्ट लक्षात येते, साहित्यातील अस्सल विचार, बारकावे, मार्गदर्शन हे कालबाह्य ठरत नाही, तर ते नेहमीच उपयोगी पडते. प्रा. फडके यांनी कवीच्या साधेपणाचे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले आहे. कवी महादेव प्रास्ताविकात लिहितात, ‘कविता करण्याचा हा प्रथमच प्रसंग आहे आणि कविता शक्ती जशी असावी तशी नाही ह्याजकरता ह्या चुका पडलेल्या असतील. त्यांच्याकडे ताद्दत लक्ष न देता गुणालेशावर नजर देऊन ह्या पुस्तकाचा आदर करावा ही विद्वांनास प्रार्थना आहे.’ खरेतर हा कवीचा मोठेपणा आहे. चुका आहेत किंवा असतील ह्याची लिखित कबुली देण्यासाठी मन फार मोठे असावे लागते. आजच्या परिस्थितीत स्वतः तर सोडा पण वाचकाने काढलेली चूक अनेक लेखकांच्या पचनी पडत नाही, या पार्श्वभूमीवर कवी महादेव यांचे निवेदन मनाला भिडते.
ईश्वर चंद्र विद्यासागर यांनी लिहिलेल्या ‘विधवाविवाह’ या पुस्तकाची लेखकाने सखोल चर्चा केली आहे. विधवा विवाहाला पूर्वीच्या काळात मान्यता होती का नाही ह्याचा शोध विद्यासागर यांनी घेतला असता प्राचीन काळातील ऋषींना असे विवाह मान्य होते,हे त्यांनी प्रतिपादित केले आहे. त्यासाठी त्यांनी ‘पराशर’ संहितेतील एक श्लोक उद्धृत करून त्याचा भावार्थ सांगितला आहे. त्याप्रमाणे पतीचा पत्ता लागेनासा झाला, पती मृत्यू पावला, संन्यस्त झाला, नपुंसक निपजला अथवा पतित झाला अशा प्रसंगी स्त्रीने अन्य पति वरावा असे स्पष्ट केले आहे. यातील ‘पतित झाला’ हा शब्द मोठा विशाल दृष्टिकोन ठेवून वापरला असल्याचे मला स्वतःला जाणवते. कारण पतित शब्दाचे अनेक अर्थ समोर येतात, दुष्ट, खलनायक वृत्तीचा, अन्यायी, महापापी, समाजाने बहिष्कृत केलेला, दुर्गुणी इत्यादी!
प्रा. दिलीप फडके यांनी समीक्षा करताना निवडलेली पुस्तके केवळ वाचनानुभव मिळावा, मनोरंजन व्हावे एवढाच हेतू ठेवून निवडलेली नाहीत तर त्या पुस्तकातून ज्ञान मिळावे, उद्बोधन व्हावे, विविध गुणांचा विकास व्हावा या दूरदृष्टीने निवडलेली आहेत. या समीक्षा संग्रहातील ‘वक्तृत्वकलाविवेचन’ हे १८८७ साली प्रकाशित झालेले काशिनाथ त्रिंबक खरे यांचे पुस्तक आजही तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. वक्तृत्व कलेची व्याख्या करताना खरे लिहितात, ‘माणसास एका वाणीची न्यूनता असती तर आपणास आजची स्थिती प्राप्त न होता केवळ पशुतुल्य स्थितित राहावे लागले असते; पण आपणावर परमेश्वराची मोठी कृपा असल्याने त्याने उत्कृष्ट वाणी दिली आहे. चांगली कामे घडून येतील अशा उपयुक्त कार्यातच वाणीचा उपयोग करावा, हे बोलक्या मनुष्याचे कर्तव्य आहे.’ या वाक्यातील ‘चांगली कामे’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा वाटतो. त्या काळातील हे विधान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. असे म्हणतात की, सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाही. त्यासाठी ‘अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर झाकोनी असावे…’ संत रामदास स्वामी यांच्या संदेशाप्रमाणे ‘विचार करोनी बोलावे’ हाही एक खरे यांचा संदेश जरुरीचा वाटतो.
‘लेखमाला अथवा नाना फडणविसांचे निवडक पत्रांचा संग्रह’ १८८७ साली प्रकाशित झाला. अवघ्या दोन वर्षांमध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. लेखक सहसा दुसरी आवृत्ती काढताना, पहिल्या आवृत्तीच्या पुस्तकावर झालेल्या साधकबाधक चर्चा लक्षात घेऊन थोडेबहुत बदल करीत असतो. १८९० साली दुसरी काढण्यासंदर्भात लेखक अंताजी रामचंद्र हरडीकर लिहितात, ‘गिऱ्हाईकांच्या मागण्यावर मागण्या येत असल्यामुळे प्रस्तुतची आवृत्ती फार लवकर छापून काढणे भाग आले आणि यामुळे वेळेची सवड न राहून शुद्धाशुद्धते पलीकडे जास्त सुधारणा आम्हास सापडले नाही याबद्दल दिलगिरी वाटते.’ अशी प्रांजळ कबुली लेखक देतात हा त्यांचा सद्गुण आहे.
काही पुस्तकांची शीर्षकं किंवा मुखपृष्ठं, चित्रपटांची आणि नाटकांची नावे अशी असतात की, वाचक, प्रेक्षक क्षणभर तिथे थांबून पुढे जातात. त्यातच नाविन्याचा शोध घेणारी प्रा. फडके यांच्यासारखी अभ्यासूवृत्तीची माणसं असतात ती अशाच नाविन्यपूर्ण बाबींकडे आकर्षित होतात. लेखक प्रा. दिलीप फडके यांच्या दृष्टीस एक पुस्तक पडले आणि शीर्षक वाचून ते थबकले. पुस्तकाचे नाव होते, ‘शोकिन नानूजीशेट आणि तारा नायकीण!’ या लेखाच्या वाचकांना ‘शोकिन आणि नायकीण’ या दोन शब्दांमध्ये एकूण नाट्यसंहितेची छोटीशी झलक नक्कीच दिसून येईल. विशेष म्हणजे १८९९ वर्षी छापलेल्या या नाटकाच्या पुस्तकावर लेखकाचे नाव कुठेही छापलेले नाही परंतु प्रस्तावना मात्र आहे. त्यातील एक वाक्य जे नाटकाचा उद्देश सांगते, ते वाक्य फडके यांनी जशास तसे मांडले आहे, ‘मनुष्य स्वाभाविक रीतीने दुर्गुणाने भरलेला असतो. ते दुर्गुण वारंवार शिक्षा, उपदेश व उदाहरणे यांनी कमी केले पाहिजेत. या दुर्गुणात भयंकर दुर्गुण म्हणजे मद्य आणि वेश्या यांच्या नादी लागणे होय. प्रस्तुत दोहोंची वृद्धी इतकी झाली आहे की त्याला योग्य वेळी दाब न दिल्यास राष्ट्राला मोठी हानी होईल; कारण जे नियमप्राय: व्यक्तीला लागू आहेत ते राष्ट्रालादेखील लागू आहेत.’
पुढे निनावी लेखकाने केलेले एक धाडसी विधान फडके उद्धृत करतात, ‘जिथे सुराबाई आपला पगडा बसविते तिथे तिच्या मागून अखंड सौभाग्यवती रंडीबाजी आहेच व दोघी मिळून आपला पगडा ज्या मनुष्यावर बसवितात त्याच्या बायकोस लवकरच गंगा भागिरथी केल्यावाचून राहत नाही. एकदा सुरबाईने आपले चुंबनाने गोडी लावलेला मनुष्य कितीही विद्वान असो तरी त्याच्या त्या चुंबनाला भुलून तिच्या नादी लागतो व पाशबद्ध होतो.’
याचप्रमाणे ‘रंडीबाजी’बद्दलही नाटकात अत्यंत जळजळीत शब्दात भाष्य केले आहे. प्रा. फडके यांचा ह्या पुस्तकाचे समीक्षण करण्याचा हाही उद्देश असू शकतो की, आजही नशा आणि वेश्या यांनी जो धुडगूस घातला आहे त्याला आळा बसावा.
‘पुस्तकानुभव’ हा समीक्षा संग्रह एका अर्थाने वाचनसंस्कृतीला बळकटी देण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण यात ज्या ४५ पुस्तकांची समीक्षा फडके यांनी केली आहे, ती वाचून वाचक नव्या पुस्तकांसह जुन्या पुस्तकांकडे निश्चितच आकर्षित होतील. या समीक्षा संग्रहातील पुढील लेख कृष्णाजी परशुराम गाडगीळ यांनी १९०४ साली लिहिलेल्या ‘कर्तव्यसुख अथवा संसारसुख’ या पुस्तकाविषयी लिहिलेला आहे. प्रकाशक बळवंत दाभोळकर हे स्वतःच्या व्यवसाय विषयाविषयी सडतोड लिहितात. मी जे छापीन ते वाचकांनी कुरकुर न करता घेतले पाहिजे याचा दुसरा अर्थ ते त्या काळात वाचकांना सर्वोत्तम देण्याचा ध्यास घेतलेले प्रकाशक होते हे सुजाण वाचकांच्या लक्षात येते. दाभोळकर सांगतात, ‘हे ग्रंथ आधुनिक शास्त्रांवर विद्वानांस श्रमांचा मोबदला देऊन भाषांतर रुपाने अगर स्वतंत्र ग्रंथरुपाने मी मुद्दाम लिहवितो… मजकडून प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक ग्रंथाच्या अमुक प्रती घेत जाऊ अशाबद्दल सुमारे ५०० सभ्य गृहस्थांचे मजजवळ लेखी वचन आहे… आणि जोपर्यंत त्यांत कमतरता येणार नाही तोपर्यंत माझी उमेद आहे.’ केवढा हा स्वतःच्या कृतीबद्दलचा आत्मविश्वास आणि वाचकांप्रती असलेला विश्वास! लक्षात यावे.”
१८९५ मध्ये महादेव शिवराम गोळे ह्यांनी ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ हा ग्रंथ लिहिला आहे. लेखक म्हणून प्राचार्य गोळे त्यांच्या या ग्रंथाकडे किती गांभीर्याने पाहत होते हे त्यांच्या पुढील विवेचनावरून लक्षात येईल,”अनुभवाच्या व अवलोकनाच्या गोष्टी येताच वाचकास अडखळल्यासारखे होईल व क्षणभर डोळे मिटून विचार केल्यावर पुढे जावेसे वाटेल व अशा रीतीने वाचकांनी हा ग्रंथ वाचावा. तो भर्रकन एकदा वाचून टाकू नये अशी त्यांस माझी प्रार्थना आहे.” किती छान विवेचन आहे ना हे! आजच्या एकूण परिस्थितीत हे विधान किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते हे समजते. या लेखात प्रा. गोळे ब्राह्मण विषयक विविध विषयांवर चर्चा करतात ती अनाठायी आहे असे वाटत नाही. ते लिहितात,
“जर ही ब्राह्मणजात वेळेवर सावध होऊन स्वतःचे खरे सामर्थ्य व खरे कर्तृत्व दाखविण्याच्या स्वतंत्र खटपटीस लागली नाही तर मिशीस लावण्यापुरताही तुपाचा अंश घरात नाही अशी स्थिती येईपर्यंत आतल्याआत हाल सोसावे लागतील व पुढे जी स्थिती येईल ती शब्दांनी कशास लिहावी!” इतकी स्पष्ट धोक्याची घंटा ते वाजवीत आहेत.
आजच्या घडीला आपण जरी शिक्षण क्षेत्रात क्रांती करत असलो तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानांची जी कमतरता किंवा दुरावस्था आहे, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते जेव्हा प्रा. दिलीप फडके हे बडोदा संस्थानाच्या देशी शाळा खात्याने लेखक अनंत बालाजी देवधर यांनी लिहिलेल्या तब्बल ३८२ पानी पुस्तकाची समीक्षा करतात तेव्हा! या पुस्तकाचे दोन भाग आहेत, पैकी पहिला भाग मुलांच्या खेळाविषयी भाष्य करणारा तर दुसरा भाग आहे… मुलींसाठी! यात दिलेले खेळांचे प्रकार शिकविणे, शिकणे, खेळणे हे तर सोडा पण नावेही माहिती आहेत की नाही हे विचार करायला लावणारे आहेत. लेखक देवधर यांनी इतक्या एकाग्रतेने हे पुस्तक लिहिले आहे की, गल्लीतील मुलांचा आवडता खेळ म्हणजे गोट्या! या खेळासाठी देवधरांनी तब्बल नऊ पाने खर्ची घातली आहेत यावरून लेखकाच्या तळमळीची जाणीव होते, त्याच जाणिवेतून फडके यांनी या पुस्तकाची खूप छान समीक्षा केली आहे.
आजार आणि शुश्रूषा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू! आजार छोटा असो वा मोठा आजारी व्यक्तीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्नीने डॉ. सविता आंबेडकर यांनी केलेल्या शुश्रुषेबाबत लिहितात, “डॉ. सविता आंबेडकर यांनी केलेल्या औषधोपचारामुळे आणि घेतलेल्या काळजीमुळे माझे आयुष्य अनेक वर्षांनी वाढले.” यावरून शुश्रूषा किती महत्त्वाची भूमिका बजावते हे समजणे सोपे जाते. हीच बाब हेरून प्रा. फडके जेव्हा डॉ. गोपाळ रामचंद्र तांबे यांचे ‘शुश्रूषा’ हे पुस्तकाची निवड करतात तेव्हा या गोष्टीचे महत्त्व अधोरेखित होते. लेखक तांबे यांचे अनन्यसाधारण असे वाक्य ते ‘कोट’ करतात,
“शुश्रूषा या शब्दाचा अर्थ केवळ औषध पाजणे किंवा शेकशेगडी करणे अथवा हातपाय रगडणे इतकाच नव्हे. रोग्यास स्वच्छ व विपुल हवा, प्रकाश पुरविणे, त्याला थंडी लागू न देणे, त्याच्या अंगाची काहिली न होऊ देणे, त्याला शांत राखणे, त्याला स्वच्छ ठेवणे, त्याला पथ्याचे काय देणे व काय न देणे इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश शुश्रूषा या शब्दात झाला पाहिजे. रोग्यास जीवरक्षणासाठी जे जे काही करावे लागेल ते सर्व शुश्रूषेमध्ये समजले गेले पाहिजे.”
असा हा ‘पुस्तकानुभव’ वाचताना आलेला प्रसन्नतेचा अनुभव, मिळालेले ज्ञान इत्यादी बाबींवर वाचकांशी हितगुज साधावे या हेतूने हा शब्द प्रपंच केला आहे. लेखक प्रा. दिलीप फडके, प्रकाशक घनश्याम पाटील यांचे अभिनंदन! दोघांच्याही समन्वयातून आणि परिश्रमातून अशीच पुस्तके वाचायला मिळावीत या सदिच्छा!
००००
पुस्तकानुभव : समीक्षा
लेखक : प्रा. दिलीप फडके
(९४२२२४९३५४)
प्रकाशक: घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन, पुणे
(७०५७२९२०९२)
पृष्ठ संख्या : १९२
मूल्य : ₹ ३००/-
आस्वादक: नागेश शेवाळकर
(९४२३१३९०७१)
प्रसिद्धी : दैनिक हिंदुस्थान, अमरावती ३० मार्च २०२५
खूप खूप धन्यवाद!