भारतीय राजकारण्यांचा साहित्यगंध…

Share this post on:

साहित्य आणि राजकारण यांचा संबंध काय? तसा संबंध खरोखर असतो का? राजकारण्यांनी वाङ्मयीन व्यासपीठावर जावे का? असे अनेेक प्रश्न अनेकदा विचारले जातात पण असे प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, साहित्याला काहीही वर्ज्य नाही. सामाजिक जीवनात सगळेच विषय समाविष्ट असतात. मग राजकारण हाही सामाजिक जीवनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ज्या साहित्यात जीवनाचे समग्र दर्शन घडते किंवा घडणे अपेषित आहे, त्यात राजकारणाचेही दर्शन घडणे साहजिकच आहे. म्हणजेच साहित्याला राजकारण वर्ज्य नसेल तर साहित्यिकाला तरी राजकारणी लोक वर्ज्य का असावेत? राजकारणी लोक आणि साहित्य यांच्यातील अनुबंधही अनिवार्य असाच मानावा लागेल. राजकारण करीत असताना साहित्यनिर्मिती करणारे राजकारणी आणि साहित्य निर्मिती करीत असताना राजकारण करणारे अनेक महनीय लोक जगात होऊन गेलेले आहेत.

भारताच्या प्राचीन इतिहासावर दृष्टिक्षेप टाकल्यास असं दिसतं की, अकराव्या शतकात होऊन गेलेला महापराक्रमी राजा भोज परमार हा एक श्रेष्ठ योद्धा आणि राजकारण धुरंधर असण्याबरोबरच एक महान विद्वानही होता. त्यानं धर्म, खगोलशास्त्र, कला, कोशरचना, औषधशास्त्र, स्थापत्य शास्त्र अशा अनेक विषयांवर ग्रंथरचना केली. ‘समरांगण सूत्रधारा’ हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.  अलीकडेच ह्या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्यात आलेला आहे. भोज राजानं अनेक ग्रंथकार, कवी, कलावंतांना आणि विद्वानांना आपल्या पदरी आश्रय दिला होता.
पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांचा मित्र आणि मुत्सद्दी मंत्री चंद बरदाई हा एक प्रतिभावंत कवी होता. पृथ्वीराज रासो  या बृहत्काव्याचा कवी म्हणून चंद बरदाई प्रसिद्ध आहे. पृथ्वीराज रासोच्या साठांवर हस्तलिखित प्रती आढळल्या आहेत आणि या सर्व सोळाव्या शतकानंतरच्या असाव्यात असे मानले जाते. चंद बरदाई हा स्पष्टवक्ता, निर्भीड, गंभीर स्वभावाचा होता. त्याच्या वाणीत ओजस्विता, प्रवाहीपणा आणि रसाळपणा आहे. वीर व शृंगार रसांची पखरण त्यांच्या काव्यात आहे.

मराठ्यांच्या स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी आणि राजकारण धुरंदर असण्याबरोबरच एक श्रेष्ठ कवीदेखील होते. बुधभूषण (संस्कृत), नायिकाभेद नखशीख, सातशतक (ब्रज भाषा) हे ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांना संस्कृत, फारसी, उर्दू, अरबी, ब्रज, इंग्रजी इतक्या भाषा अवगत होत्या. कलश हा संभाजी महाराजांचा मित्र हा राजकारणी आणि कवीदेखील होता.
आधुनिक काळात डोकावलं तर राजकारणात अग्रभागी असलेले अनेक नेते साहित्यिक होते, असं दिसतं.


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ‘गीतारहस्य’ हा  तत्त्वज्ञानाचा महान ग्रंथ आहे. आपले राजकीय विचार त्यांनी लेखांमधून मांडले. त्यांचे अग्रलेख हे उच्च साहित्यमूल्याचे आहेत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक श्रेष्ठ दर्जाचे कवी आणि लेखक होते. माझी जन्मठेप, काळे पाणी हे त्यांचे ग्रंथ उच्च दर्जाचे साहित्यमूल्य बाळगतात. साहित्यिक या नात्याने सावरकरांनी अनेक प्रकार हाताळले. कवी, नाटककार, शाहीर, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, इतिहासकार, पत्रकार अशा विविध भूमिकांतून त्यांनी आपली साहित्यसंपदा सृजन केली. मराठी भाषेत 10000 हून अधिक पाने व इंग्रजीत 1500 हून अधिक पाने भरेल इतके लिखाण केले.
महात्मा गांधी हे पत्रकार आणि साहित्यिकही होते. आपले सत्य, अहिंसा, सविनय कायदेभंग, सत्याग्रह, अस्पृश्यता निवारण याचे तत्त्वज्ञान त्यांनी लेखनातून मांडले. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हा त्यांचा ग्रंथ बहुचर्चित आहे.

रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) हे तर महान कवी होते. भारतीय राजकारणाला चालना देणारे ते राजकीय नेतेही होते. गांधीजींना ‘महात्मा’ असं रवींद्रनाथ यांनीच पहिल्यांदा संबोधलं. ‘गीतांजली’ ह्या त्यांच्या काव्याला जागतिक दर्जाचं नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांनी लिहिलेलं ‘जन गण मन’ हे भारताचं राष्ट्रगीत आहे.
बंगालमधील थोर राजकारणी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची ‘आनंदमठ’ ही कादंबरी राष्ट्रकार्याला प्रेरणादायी ठरली. याच कादंबरीतील ‘ंवंदे मातरम्’ हे गीत असंख्य क्रांतिकारक आणि देशभक्तांचे स्फूर्तीगीत ठरले. हेच पुढे देशाचे राष्ट्रीय गान ठरले. ‘वंदे मातरम्’ हा समस्त देशवासीयांचा वंदनीय मंत्र ठरला.
भारतीय राजकारणातील अग्रगण्य नेत्या सरोजिनी नायडू ह्या प्रथम कवयित्री आणि नंतर राजकारणी होत्या. त्यांनी बालवाङ्मयाची निर्मिती केली. त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया (भारताची कोकिळा) म्हणून ओळखले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या आणि भारतातील चौथ्या क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.


भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘फॉरवर्ड’ हे वृत्तपत्र व्यवस्थापक आणि पत्रकार म्हणून एका चळवळीसारखे उपयोगात आणले. सुभाषबाबूंचे गुरू देशबंधू चित्तरंजन दास यांनी हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यात सुभाषबाबूंनी राष्ट्रीय चळवळीविषयी विपुल लेखन केले. त्यांनी लिहिलेला ‘द इंडियन स्ट्रगल’ हा ग्रंथ खूप गाजला. ब्रिटिश सरकारनं त्यावर बंदी आणली.
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते असण्याबरोबरच लेखकही होते. ते प्रवासात वाचन-लेखन करायचे. ‘इंदिरेस पत्रे’, ‘द डिस्कवरी ऑफ इंडिया’ हे त्यांचे साहित्य लोकप्रिय ठरले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले कायदामंत्री. ते पत्रकार होते आणि लेखकही. त्यांनी अस्पृश्यांच्या अधिकारांसाठी अनेक चळवळी चालवल्या. घटनेचे शिल्पकार म्हणून मागासवर्गीयांच्या हितासाठी कायदे केले. ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र त्यांनी चालवलं. बाबासाहेबांनी विविध विषयांवरील तेवीस ग्रंथ लिहिले.
स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे थोर लेखकही होते. ‘आपले नवे मुंबई राज्य’, ‘ॠणानुबंध’ (ललित लेख), ‘कृष्णाकाठ’ (आत्मचरित्र), ‘भूमिका’ (1979), ‘महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक’, ‘विदेश दर्शन’ हे त्यांचे ग्रंथ असून, ‘सह्याद्रीचे वारे’ हा भाषणसंग्रह आहे.

प्रबोधनकार के. सी. ठाकरे हे एक परखड लेखक होते. त्यांची ‘हिंदू धर्माचे दिव्य’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’, ‘कोदण्डाचा टणत्कार’ ही पुस्तके गाजली.
कम्युनिस्ट विचारांचे नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांच्या ग्रंथांमधून मांडलेल्या विचारांना तत्त्वचिंतनाचे रूप प्राप्त झालेले आहे. तसेच श्रीपाद अमृत डांगे ह्या कम्युनिस्ट नेत्याच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. राम मनोहर लोहिया हे समाजवादी नेते हेही मोठे लेखक होते. समाजवादी नेते ना. ग. गोरे यांचे ‘शंख आणि शिंपले’ हे शैलीदार भाषेतील लेखांचे पुस्तकही वाचकप्रिय ठरले. आचार्य नरेंद्र देव, बी. टी. रणदिवे यांच्या लेखनाने त्यांच्या सामाजिक कार्याची उंची वाढली.
स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते पांडुरंग सदाशिव साने, अर्थात साने गुरुजी यांची ‘श्यामची आई’ कोण विसरेल? त्यांच्या ह्या अजरामर कादंबरीबरोबरच त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. समाजवादी नेते मधु लिमये यांचे ‘सौहार्द’ हे पुस्तक विशेष गाजले.

रात्री वेषांतर करून फिरणारे शिवसेनेचे नेते प्रमोद नवलकर यांनी ‘भटक्याची भ्रमंती’ हे सदर लिहून अमाप नाव मिळवले.
देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद केला. ‘इनसायडर’ हे त्यांचे आत्मचरित्र होय.
आणखी दोन माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आणि इंद्रकुमार गुजराल हेही कवी होते. त्यांनी  राजकीय लेखनही पुष्कळ केलं.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक स्तरावरील अर्थतज्ज्ञ. त्यांनी अर्थशास्त्रावर तर अनेक ग्रंथ लिहिलेच, शिवाय ‘चेंजिंग इंडिया : 1950-2014’ हा पाच खंडांचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याशिवाय त्यांनी गुरू ग्रंथ साहिब यावर स्वतःचे चिंतन मांडणारा ग्रंथ लिहिलेला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली यांनी भगवान बाहुबली यांच्या जीवनकार्यावर लिहिलेल्या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांनी ह्या ग्रंथात अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे सखोल आणि सविस्तर विवेचन केलेले आहे.
आपले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे तर कवी म्हणून प्रख्यात आहेत. त्यांचे अनेक काव्यसंग्रह, भारतीय संस्कृतीविषयी केलेले भाष्य, भाषणांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.
काँग्रेसचे उच्चविद्याविभूषित नेते जयराम रमेश यांनीही विविधांगी लेखन लेखन केलेलं आहे. इंदिरा गांधी यांची पर्यावरण विषयक भूमिका विशद करणारे वेगळे चरित्र त्यांनी वाचकांना दिलेलं आहे. जागतिकीकरणानंतर देशावर झालेल्या परिणामांचे चित्रण करणार्‍या ग्रंथासह त्यांचे अन्य लेखनही प्रसिद्ध आहे.
सॅम पित्रोदा, शशी थरूर, कमलनाथ, नटवरसिंग, शिवराज पाटील, शीला दीक्षित ही आणखी काही राजकारणी लेखकांची नावे सांगता येतील.
हा लेख खरं म्हणजे एक झलक आहे. यात उल्लेखलेल्या राजकारणी लेखकांबरोबरच इतर अनेक राजकीय नेत्यांनी वैचारिक आणि ललित लेखनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे. तो एका स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे.

– श्रीराम ग. पचिंद्रे
ज्येष्ठ संपादक, कोल्हापूर

पूर्व प्रसिद्धी : मासिक ‘साहित्य चपराक’ फेब्रु. २०२५

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!