गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास पाहता महाराष्ट्रात कोणतीही घडामोड घडली की लोक म्हणायचे, यामागे शरद पवारांचा हात आहे! काहीही, म्हणजे अगदी काहीही झाले तरी त्याचे खापर पवारांवर फोडण्याचा शिरस्ता सुरूच होता. याबाबत खुद्द शरद पवारच एकदा म्हणाले होते की, ‘उद्या लोकानी म्हटलं की, किल्लारीचा भूकंपही माझ्यामुळेच झाला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही.’ राज ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या ‘अदृश्य हाता’विषयी जाहीर टिपण्णी केली होती.
सध्या मात्र ही परिस्थिती बदललीय. राजकारणातली, समाजकारणातली कोणतीही लक्षवेधी, चांगली-वाईट घटना घडली की लोक म्हणतात, ‘हे फडणवीसांनी केलं!’ शरद पवार ते देवेंद्र फडणवीस असा हा आपल्या महाराष्ट्राचा प्रवास आहे. तो चांगला की वाईट हे ज्यानं त्यानं ठरवायचंय. या सगळ्यात शरद पवार यांची जागा फडणवीसांनी घेतलीय, हे मात्र लख्खपणे दिसणारं वास्तव आहे. फडणवीसांचं हे यश की अपयश हे सुद्धा त्यांच्या त्यांच्या अनुयायांनी पडताळून पाहावं.
गेल्या काही वर्षातल्या महाराष्ट्राच्या वाटचालीवर लक्ष दिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपल्याकडे कधी नव्हे इतका जातीय कट्टरतावाद वाढलाय. लोकाच्या भावना टोकाच्या असतात. छोट्या-छोट्या गोष्टीवरून त्यांच्या भावना दुखावतात. ‘जाती-जातीत अशी उभी फूट पाडण्याचं हे कारस्थान कोणी केलं?’ असं विचारल्यास आजवर पवारांकडं बोट दाखवलं जायचं. यातली वस्तुस्थिती लक्षात न घेता जे आरोप-प्रत्यारोप व्हायचे त्यातून कुणाचंच भलं झालं नाही. भलं होणं शक्यही नव्हतं.
‘पवारांनी खरंच जातीयवाद केला का?’ किंवा त्याही पुढे जाऊन मांडायचं तर ते ‘ब्राह्मणविरोधी आहेत का?’ हे एकदा चिकित्सकपणे पडताळून पाहिलं पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून त्यांनी त्यांचं सरकार गमावलं. नामांतर की नामविस्तार हा मुद्दा चर्चेला आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला आक्षेप असण्याचं खरं तर काहीच कारण नव्हतं पण त्यावरूनही राजकारण झालं. ‘घरात नाही पीठ आणि म्हणे हवे विद्यापीठ’ असे अग्रलेख लिहिले गेले. अशा सगळ्या परिस्थितीतही शरद पवार तसूभरही ढळले नाहीत. आपल्या सत्तेची किंमत मोजून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार त्यांनी धाडसानं केला. त्या घटनेपासून दलित आणि मराठा संघर्षाची बिजे रोवली गेली. यात ब्राह्मण समाजाने उडी घेतली आणि शरद पवारांना खलनायक ठरले. सततच्या आरोपांनी घायाळ झालेल्या पवारांनीही मग काही ठिकाणी उघडपणे ब्राह्मणविरोधी भूमिका घेतल्या.
शरद पवार नेहमी सांगत असतात की, मी राजकारणी आहे, संत नाही. त्यामुळे संतपदाच्या अपेक्षा माझ्याकडून ठेवूच नका. तरीही अनेक जण आपापले तराजू घेऊन त्यांचं मूल्यमापण करत असतात. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे ते आजचे देवेंद्र फडणवीस अशा कित्येकांच्या यशात ‘पवार विरोधा’चा मोठा वाटा आहे. ज्यांनी ज्यांनी शरद पवारांवर कठोर टीका केली त्या सर्वांना राजकारणात एक वेगळी ओळख मिळाली. पवारांना शिव्या घालून मोठं होता येतं हे लक्षात आल्यानं राजकारणातली पवारविरोधी एक पिढीच तयार झाली.
शरद पवारांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आदर केला. ग. दि. माडगूळकर यांच्या नावानं बारामतीत नितांतसुंदर नाट्यगृह उभारलं. वि. का. राजवाडे यांच्या नावानं संशोधन केंद्र सुरु केलं. इतकंच काय प्रल्हाद भागवत हे किती तरी काळ त्यांचे दिल्लीतले सचिव होते. गुरूनाथ कुलकर्णी हे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे पहिले प्रदेश सचिव होते. त्यांचे अनेक सहकारी, भागीदार ब्राह्मण आहेत. मग असं सगळं असताना त्यांना ब्राह्मणविरोधी कुणी आणि का ठरवलं?
रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी प्रारंभीच्या काळात आदर बाळगणार्या पवारांनी पुढे त्यांना टोकाचा विरोध केला. या आणि अशा अनेकांविषयी त्यांच्या भूमिका बदलल्या. ‘भूमिका बदलणं’ हे राजकारणात वर्ज्य आहे का? त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार नाही का? ही मते पटत नसतील तर संबंधित क्षेत्रातील विद्वानांनी अभ्यासाच्या बळावर खोडून काढावीत. आपल्यासाठी वंदनीय असलेल्या अशा काही महापुरूषांना केलेला विरोध हा संपूर्ण जातीला केलेला विरोध कसा असू शकेल? पवारांनी फडणवीसांवर टीका करताना पेशवाई आणि शिंदेशाही पगडी असा भेद निर्माण करून नवा वाद निर्माण केला. मतदारांनी त्यानुसार त्यांच्या पक्षाला कौलही दिला. आपल्या प्रत्येक मतासाठी मोजावी लागणारी किंमत त्यांनी मोजलीय. त्यामुळे त्यांना एखाद्या जातीचा, एखाद्या घटकाचा विरोधकच समजणे आणि त्यांच्यावर तुटून पडणे थांबवायला हवे.
शरद पवार हे मुरलेले राजकारणी आहेत. कोणत्या वेळी काय बोलावं, कुणाशी कसं वागावं, कुणाला किती अधिकार द्यावेत, कुणाचं कोणत्या वेळी खच्चीकरण करावं, कुणाला आतून मदत करावी, कुणाला बाहेरून विरोध करावा हे त्यांच्या नसानसात आहे. मनोज जरांगे यांच्या पाठिशी शरद पवार आहेत की नाहीत हे ते दोघेच जाणोत! मात्र सार्वजनिक जीवनात जाहीरपणे बोलताना ते नेहमी म्हणतात की, ‘‘जातीयवाद आपल्याला परवडणारा नाही. महाराष्ट्र ज्या स्थित्यंतरातून जातोय त्यात सगळ्यात जास्त मराठवाडा भरडला जातोय. सर्वप्रथम मराठवाडा जातीपातीतून बाहेर आला पाहिजे!’’
याउलट देवेंंद्र फडणवीसांचं होतंय. अतिशय आक्रस्ताळेपणे जे पाच नेते सातत्याने फुटीची भाषा करतात, वादग्रस्त विधानं करतात त्यांना ते थांबवत नाहीत. आपल्या नेत्यांनी काही चुकीची विधानं केली तर त्यांना किमान जाहीरपणे फटकारलं पाहिजे, थांबवलं पाहिजे हे त्यांच्याकडून होत नाही. मराठी साहित्य, नाट्य, संस्कृतीशी संबंधित घडामोडीकडं शरद पवार यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांचंही काळजीपूर्वक लक्ष असतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत महाराष्ट्र सदन मिळत नाही, याबाबतची बातमी वाचल्या-वाचल्या त्याची लगेच सगळी माहिती मिळवणं, आपल्या सचिवांना सांगून पाठपुरावा करणं आणि त्याच दिवशी तो विषय मार्गी लावून आयोजकांना बळ देणं अशी सकारात्मक कामं ते कुणीही सांगण्याच्या आधी करतात. एक व्यासंगी आणि समर्थ नेतृत्व म्हणून अशा घटनांमधून त्यांचं लुभावणारं व्यक्तिमत्त्व दिसून येतं. ‘कोणत्याही गुन्हेगाराला पाठिशी घालणार नाही’, याची स्पष्टोक्ती करतानाच ते त्याची अंमलबजावणीही करतात. गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलावा यासाठी योजना आखतात. ‘मी पुन्हा येईन’ असं सांगितल्यावर कितीही टिंगलटवाळी झाली तरी ते निश्चयापासून ढळत नाहीत. जे साध्य करायचं ते शांत डोक्यानं आणि स्थिर मनानं हा त्यांचा विशेष गुण आहे. त्यांच्या जवळचे काही सहकारी मात्र विद्वेषाची भाषा करत असताना त्यांना तंबी देणं, आवर घालणं गरजेचं आहे.
शरद पवार त्यांची मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षाची कारकिर्द एकदाही पूर्ण करू शकले नाहीत मात्र फडणवीसांनी ते केलं हाही या दोघातला एक महत्त्वाचा फरक आहे. शरद पवार यांच्या नावामागे महाराष्ट्रात आणि दिल्लीत कायम अविश्वासाचा शिक्का मारला गेला. आज पवारांची स्पेस फडणवीसांनी भरून काढली असं म्हणताना पवारांच्या चुका फडणवीसांनी टाळाव्यात, असं वाटतं. हे दोन्ही नेते चूक की बरोबर हे काळाच्या ओघात पुढे येईलच पण हे दोघेही मराठी आहेत, संघर्षातून पुढे आले आहेत, स्वतःचं स्थान निर्माण करताना त्यांनी अहोरात्र महाराष्ट्रासाठी दिला आहे आणि दोघांच्याही सकारात्मकतेचा महाराष्ट्राला वेळोवेळी लाभ झाला आहे, हे विसरता येणार नाही. भिन्न विचारधारेच्या या दोन्ही नेत्यांकडून महाराष्ट्राचं बरंचसं हित साधलं गेलं आहे. ‘यामागं कुणाचा हात?’ याचा विचार आपण करूच पण नजिकच्या काळात हे दोन्ही नेते महाराष्ट्राला आपापल्या पद्धतीनं पुढं नेतील, असा आशावाद ठेवूया.
-घनश्याम पाटील
7057292092
प्रसिद्धी – दै. पुण्यनगरी दि . १ ३ जाने. २ ० २ ५