सध्या मराठीत नाटक हा साहित्यप्रकार मागे पडत चालला आहे. नाटकांची पुस्तके प्रकाशित करायला प्रकाशक धजावत नाहीत. अशा वातावरणात ‘चपराक प्रकाशन’ने डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या दहा नाटकांची तीन पुस्तके वाचकांच्या भेटीस आणली आहेत. उल्लेखनीय म्हणजे या तीनही पुस्तकांना प्रकाशक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभली असून त्यातील ‘राजर्षी’ची ही एक महत्त्वपूर्ण प्रस्तावना…
एखादी कथा-कादंबरी आणि नाटकाचे पुस्तक यात एक महत्त्वपूर्ण फरक असतो. कोणत्याही दर्जेदार साहित्यप्रकारात ‘वाचनीयता’ हा गुण तर असतोच पण नाटकाच्या संहितेचे पुढे दृक-श्राव्य माध्यमात रूपांतर होणार असते. त्यामुळे ते लिहिणार्या नाटककारापुढील आव्हान तुलनेने मोठे असते. आपल्याकडे रंजन करणारी, प्रबोधन करणारी विनोदी-ऐतिहासिक नाटके अनेक आली. काळानुसार त्याचा ढाचा बदलत गेला. रसिक-श्रोत्यांच्या अभिरुचीनुसार नवनवे विषय पुढे आले. ते दमदारपणे सादरही केले गेले. यातूनच नाटकासारखी लोकपरंपरा सशक्त होत गेली. संगमनेर येथील नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे यांची एकाचवेळी दहा नाटके असलेली तीन पुस्तके प्रकाशित होत आहेत. दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचे प्रकाशन होेतेय, ही मराठी साहित्याच्या दृष्टीने निश्चितच दखलपात्र बाब आहे. प्रस्तुतच्या पुस्तकातील ‘असूड’, ‘राजर्षी’, ‘खेळ मांडियेला’ आणि ‘राज्य रयतेचे व्हावे’ ही नाटके आपली इतिहासाची एक सफर तर घडवून आणतीलच पण आपली दृष्टीही व्यापक करतील.
डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी ऐतिहासिक महापुरुषांविषयी लिहिताना कालसुसंगत भूमिका घेतल्या आहेत. या महापुरुषांचे महत्त्व आजच्या पिढीपुढे विषद करतानाच त्यांचा संघर्ष, त्यांनी सोसलेले, सहन केलेले परिश्रम, समाजाला दिशा देण्यासाठी केलेला त्याग याविषयी प्रभावी मांडणी केली आहे. डॉ. मुटकुळे यांचा वाचनाचा आवाका आणि केवळ मनोरंजनात न अडकता किंवा कुणाचा मुलाहिजा न राखता केलेली सत्यनिष्ठ आणि चिकित्सक मांडणी यामुळे ही पुस्तके महत्त्वपूर्ण ठरली आहेत.
महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाईंचा जीवनपट उलगडून दाखविणारे ‘असूड’ हे मराठीतील पहिलेच नाटक असावे. विविध ठिकाणी याचे प्रयोगही झाले असून अभ्यासकांकडून या नाटकाला उत्तम दाद मिळाली आहे. ब्राह्मण्यवादी वृत्तीवर कठोर प्रहार करतानाच कुठेही जातीय कटुता येणार नाही आणि सत्याशी फारकतही घेतली जाणार नाही, याची दक्षता डॉ. मुटकुळे यांनी घेतली आहे. महात्मा फुले यांना अडचणीत आणणार्या जातियवादी मानसिकतेचा समाचार घेतानाच त्यांच्या बाजूने जे ब्राह्मण उभे होते त्यांचीही सुयोग्य दखल घेतल्याने हे नाटक ऐतिहासिक तथ्याच्या जवळ गेले आहे. फुले दाम्पत्याची टोकाची गरिबी दाखवतानाच उद्योजक महात्मा फुले हा पैलूही अधोरेखित केल्याने याचे संदर्भमूल्य वाढले आहे. आज समस्त पुणेकर ज्या खडकवासला धरणाचे पाणी पितात आणि पुढे हे पाणी उजनीच्या माध्यमातून सोलापूर-मराठवाड्यापर्यंत जाते ते धरण महात्मा फुले यांच्या कंपनीने बांधले होते, हे वाचताना आपसूकच अंगावर शहारे येतात. इतिहासाची पाने उलगडून दाखवतानाच वर्तमानाचा अचूक वेध घेतल्याने या माध्यमातून समाजजागृतीस हातभार लागला आहे.
आपल्या जातीय अस्मिता कधी नव्हे इतक्या टोकदार झालेल्या असताना आणि अनेक जाती समूहांचे आरक्षणाचे विषय चव्हाट्यावर आलेले असताना ‘राजर्षी’ या नाटकातून समतेचे नायक श्री. छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका समजून घेता येतात. दस्तुरखुद्द शाहू महाराजांनाही त्या काळात कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले हे वाचताना कोणताही विचारी माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ. मुटकुळे यांनी या माध्यमातून लोकमान्य टिळक यांच्याही काही चुकीच्या भूमिका सूचित करण्याचे धाडस दाखवले आहे. आपल्या राज्यघटनेतील तत्त्वांची कागल संस्थानात कशा प्रकारे अंमलबजावणी केली गेली आणि जातिअंताची लढाई लढताना कशाकशाला सामोरे जावे लागले हे या नाटकाच्या माध्यमातून विशेषतः आजच्या तरूण पिढीने काळजीपूर्वक वाचायला हवे.
या नाटकातील स्वाती आणि अब्दुल जागोजागी दिसतातच पण व्यवस्थेची झळ बसणारे काही सकारात्मक पोलीस अधिकारीही अनुभवास येतात. अजून सगळे काही संपलेले नाही, हा सकारात्मक आशावाद पेरत डॉ. मुटकुळे यांनी विषयाची मांडणी केल्याने कुठेही कटूता येत नाही. छत्रपती शाहू महाराजांची व्यापक दृष्टी आणि त्यांचा न्यायनिवाडा याची प्रचितीही या नाटकातून येते. या नाटकातील स्वाती आणि अब्दुलची प्रेमकथा सफल होत नसली तरी त्यांचे ‘जेवढी माणसं माराल त्याच्या शतपटीने विचार त्यांचा मुकाबला करतील. इन्कलाब जिंदाबाद!’ हे विचार आपल्याला परिवर्तनाच्या मार्गावर घेऊन जातात.
‘खेळ मांडियेला’ या नाटकातून संत तुकाराम महाराजांच्या जीवन आणि कार्याचे व्यापक दर्शन घडते. त्यांची जीवनमूल्ये आणि त्याग आपल्याला प्रेरणा देतात. छत्रपती शिवरायांची आणि बुवांची भेट असेल किंवा आवली व तुकाराम महाराजांतील तरल संवाद असतील, त्यांची गाथा बुडवण्याचा प्रसंग असेल किंवा त्यांच्या मृत्युचे विदारक चित्रण असेल अशा कोणत्याही प्रसंगातून डोळ्याच्या धारा थांबवणे अवघड जाते. त्यांचा सामाजिक, आध्यात्मिक संघर्ष आपल्याला जगण्याचे बळ देतो. विद्रोहाची आपली संकल्पना विस्तारत नेतो. आजच्या काळातील एक सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून या नाटकाकडे पाहावे लागते.
काळाच्या ओघात झालेली काही संशोधने पाहता यातील काही गोष्टी आपल्याला खटकू शकतात. उदाहरणार्थ, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरु मानले होते. पुण्याच्या आसपास असलेल्या देहूत जर तुकाराम महाराजांचा खून झाला असता तर शिवाजी महाराज शांत राहिले असते का? त्यांनी त्यांच्या मारेकर्यांना मोकाट सोडले असते का? आणि तसे झाले असते तर इतिहासात त्याचा नामोल्लेखही नाही असे कसे शक्य आहे? असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे तुकाराम महाराज यांची हत्या की नैसर्गिक मृत्यू अशा काही प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर या नाटकाची मांडणी जबरदस्त झाली आहे.
‘राज्य रयतेचे व्हावे’ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नाटक या पुस्तकात सर्वात शेवटी ठेवले आहे. किंबहुना अतिशय कल्पकतेने मुखपृष्ठावरही शिवाजी महाराज तळाशी आले आहेत. त्याचे कारण या सगळ्याचा भरभक्कम पाया छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी घालून दिलाय. आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपसूकच आपल्या तोंडून अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने ‘जय’ असा घोष बाहेर पडतो, हे त्याचेच प्रतीक आहे. आजच्या काळात शिवसंस्कार किती मोलाचा आहे आणि आजच्या बरबटलेल्या परिस्थितीतून बाहेर पडायचे, देशाला परत सुजलाम-सुफलामतेकडे न्यायचे तर शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहणे किती गरजेचे आहे हे यातून स्पष्ट होते.
सध्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती पाहता हे नाटक प्रत्येकाने वाचायला हवे. याचे प्रयोग सर्वत्र मोठ्या प्रमाणात आणि धुमधडाक्यात व्हायला हवेत. छत्रपती संभाजी महाराजांनी घेतलेल्या काही भूमिकांतील तथ्येही या नाटकाच्या माध्यमातून मांडली आहेत. आजचे भ्रष्ट राजकारण, तरुणाईची भूमिका, जाती-धर्मातील संघर्ष अशा सर्व प्रश्नांवर शिवरायांनी सुचवलेले आणि अंमलात आणलेले तोडगे स्पष्ट करणारे हे नाटक आपल्या जगण्याला बळ देते, आपल्यात नवे चैतन्य प्रज्वलित करते.
सध्या नाटक हा साहित्यप्रकार मागे पडत असताना डॉ. सोमनाथ मुटकुळे यांची दहा नाटकांची तीन दणदणीत पुस्तके प्रकाशित होत असल्याने या साहित्यप्रकाराला आलेली मरगळ दूर होणार आहे. अनेकांचे मळभ दूर सारणारे डॉ. मुटकुळे यांचे लेखन तरूण पिढीसाठी दिशादर्शक, प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की. त्यांच्या भावी लेखनप्रवासास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
– घनश्याम पाटील
7057292092
दै . संचार ५ जानेवारी २०२५