डॉ. सोमनाथ मुटकुळे हे संगमनेर येथील एक नाट्यलेखक आहेत. वैद्यकीय व्यवसायात यशस्वी कारकिर्द गाजवणार्या डॉक्टर मुटकुळे यांची वैविध्यपूर्ण विषयावरील दहा नाटके तीन पुस्तकांच्या रूपाने एकाचवेळी प्रकाशित होत आहेत, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. 5 जानेवारी 2025 रोजी संगमनेर येथे या पुस्तकांचे लोकार्पण आणि दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याचे समारंभपूर्वक प्रकाशन होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नाट्यलेखन परंपरेतील ही विलक्षण आणि ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. मुख्य म्हणजे यातील सर्व नाटकांचे प्रयोग सर्वत्र धुमधडाक्यात होत असून राज्य नाट्य स्पर्धेत आणि अन्य महत्त्वाच्या स्पर्धेतही त्यांना उत्तुंग यश मिळाले आहे.
प्रस्तुत पुुस्तकात डॉ. मुटकुळे यांच्या ‘चक्र’, ‘सावट’ आणि ‘जू’ या तीन कलाकृतींचा समावेश आहे. ही तीनही नाटके म्हणजे समाजाला दाखवलेला आरसा आहे. गेल्या शे-दीडशे वर्षातील सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे तटस्थपणे नोंदवण्याचे अफाट सामर्थ्य डॉक्टर मुटकुळे यांच्या लेखणीत आहे. त्यांची लेखणी पुरोगामी परंपरेचा पुरस्कार करणारी आणि सत्यान्वेषी आहे. लेखणीच्या माध्यमातून समाजचित्रण करत प्रबोधनाच्या मार्गावर अव्याहतपणे चालणारे वाटसरू म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. त्यांची दृष्टी व्यापक आणि दृष्टिकोन उदात्त आहे.
‘चक्र’ या नाटकातून त्यांनी जातीय संघर्षाचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. अस्सल नगरी शैलीतील हे नाटक मनाचा ठाव घेते. ‘जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत, राष्ट्र यांच्या नावाने आम्ही लढतच राहणार का? माणसांनी माणसांना मारतच राहायचं का? हे चक्र किती दिवस आणि का फिरत राहणार?’ असा प्रश्न या नाटकाच्या माध्यमातून विचारला आहे. यातील सुंदरीचं जाणं चटका लावणारं आहे. त्यातून एकनाथच्या मनात क्रांतिचं बीज पेरलं जातं. सुंदरीला कोण आणि तिच्या मुलाला कोणी मारलं, असं विचारल्यावर तो म्हणतो, मी, माझ्या याच हातांनी तिला मारलं. तात्यांचा खून, वस्तीला आग लावणं याची शिक्षा मला मिळाली. त्या उद्रेकातून पाटलाची जुलूमशाही संपुष्टात येते. गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत अनेक गावात दिसणारं हे चित्र डॉ. मुटकुळे यांनी अतिशय सुस्पष्टपणे मांडलं आहे. जणू त्यामुळेच या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे फाटक लोकानी उखडून टाकले.
‘सावट’ या नाटकाला आदिवासी समाजाची पार्श्वभूमी आहे. सत्ता ही एक संधी असते; मात्र सत्तास्थानी कुणीही आले तरी दुर्दैवाने ते सामान्य माणसाचे शोषणच करतात. जुलूमशाहीच्या विरूद्ध सर्वस्व पणाला लावत संघर्ष केला जातो पण एकदा का यात विजयश्री संपादित केली की त्यांनाही आधीच्या परिस्थितीचा विसर पडतो आणि तेही त्याच बेधुंदशाहीचे घटक बनतात. यातील सरकार आणि रझाक जागोजागी दिसून येतात. इंदीसारख्या अनेक जणी अशाच नागवल्या, पिचवल्या जातात. त्यांचा आक्रोश, त्यांच्या वेदना, त्यांचे दुःख समजून घेण्याइतका समाज प्रगल्भ नाही. शिक्षणाने काही सकारात्मक बदल घडलेत असे म्हणावे तर आजही आजूबाजूला अशा अनेक घटना घडताना दिसतात.
श्रद्धेचा बाजार मांडून मातृसुखापासून वंचित असलेल्या इंदीचा काळूआईच्या नावानं जो गैरफायदा घेतला जातो, तिच्यावर जे अत्याचार होतात ते समाजातील तथाकथित नेतृत्वाच्या वांझोटेपणाचं प्रतीक आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे समाजाची प्रगती होईल, विकासाची दालणं उघडी होतील हा आशावाद कधीच संपला. काहीही करून गोरगरीब, वंचित, उपेक्षितांची लूट कशी करता येईल इतकेच बघितले जाते. गरिबी, बेरोजगारीच्या दुष्टचक्रात अडकल्यानंतर पिढ्या न पिढ्या भोगावे लागणारे दारिद्य्र या नाटकातून दिसून येते. शिक्षण घेऊ पाहणार्या नव्या पिढीतील उमलत्या अंकुराच्या भावभावनांचाही बळी घेतला जातो. इतके सगळे भोगून, सरकारचं साम्राज्य उलथवून लावल्यानंतर हाती काय येतं? ‘स्वातंत्र्याच्या वेदीवर, अनेक शहीदांनी आपल्या रक्ताचे शिंपण करुन पारतंत्र्य घालविले ओ…’ या आरोळीने नाटकाचा शेवट करताना लेखकाने जे मांडले आहे त्याचे घाव काळजात खोलवर रुजतात. सत्तेचे परिवर्तन झाले तरी जुलूमशाहीच्या बेड्या तोडणे आपल्याला भविष्यात कधीतरी जमणार आहे का?
आजही अनेक खेड्यात एकतरी म्हातारा आपल्याला असा भेटतो की तो सांगतो, ‘मी भूतासोबत कुस्ती खेळलीय!’ विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी अंधश्रद्धा, कर्मकांडं, भूत-प्रेत, स्वर्ग-नरक याच्या पुढे आपली गाडी जात नाही. यात सामान्य-गरीब माणूस, कामगार वर्ग सर्वाधिक भरडला जातो.
‘‘भूत पाहायचं आहे का?’’ या दामूच्या प्रश्नावर केशव म्हणतो, ‘‘नुसतं पाहायचं नाय, त्याच्याबरुबर तुझ्यावानी कुस्ती खेळून त्याचं पाय मोडून लोकासमोर आणायचं हाय त्येला…’’ प्रत्यक्षात केशवच्या स्वप्नाचं काय होतं हे जाणून घेण्यासाठी ‘जू’ हे नाटक मुळातूनच वाचायला हवं. वाचकांचं (आणि अर्थातच रसिक-श्रोत्यांचंही) रंजनातून प्रबोधन करताना डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी नाटकासाठी आवश्यक असणारी संवादशैली प्रभावीपणे वापरली आहे. यातील पात्रांची बोली ग्राम्य असल्याने इथल्या मराठमोळ्या संस्कृतीचा स्पर्श तिला झालाय.
नाटक या संज्ञेत ‘नट’ महत्त्वाचा असतो. लेखक जे लिहितो ते अभिनयाच्या माध्यमातून सादर करता यायला हवे. त्यासाठी लेखनात मानवी भावभावनांची गुंतागुत, आपापसातील संघर्ष पात्रांच्या माध्यमातून साकारता यायला हवा. डॉ. सोमनाथ मुटकुळे या दृष्टीने कमालीचे यशस्वी ठरले आहेत. यातील अनेक पात्रांचे संवाद वाचताना आपल्या मनातील विविध भाव जागे होतात, काही रस निर्माण होतात हेच त्यांच्या लेखणीचे यश म्हणावे लागेल.
या सर्व नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत. आधी रंगभूमीवर आणि मग पुस्तकरूपाने असा यांचा प्रवास आहे. डॉ. मुटकुळे यांची लेखनशैली चित्रदर्शी असल्याने यातील पात्रांचे संवाद वाचतानाही सगळे प्रसंग आपसूकपणे आपल्या डोळ्यासमोर येतात. ‘चक्र’, ‘सावट’ आणि ‘जू’ ही तिनही नाटके सामान्य माणसाच्या व्यथा-वेदना समजून घेण्याची एक नवी दृष्टी आपणास देतील. डॉक्टर मुटकुळे यांच्या लेखनप्रपंचाचे हेच मोठे फलित म्हणावे लागेल.
– घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
प्रसिद्धी – दै. पुण्यनगरी १२ जानेवारी २०२५