जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी ‘गोकुळ वाटा’ची नवी आवृत्ती आली. यावेळी ही आवृत्ती पुण्याच्या ‘अनुबंध प्रकाशन’च्या अनिल कुलकर्णी यांनी प्रकाशित केली. हे माझे पंचवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले पुस्तक!
हे पुस्तक म्हणजे गीतकमालिका आहे. या गीतकमालिकेचे लेखन माझ्याकडून 1998 ते 1999 या वर्षभरात होऊन गेले होते. राधा आणि कृष्ण हा माझा आकर्षण विषय. त्यातून उभयतांच्या नात्यातील गूढ समजून घेण्याचा ध्यास मला सदैव लागलेला होता. या ध्यासातूनच मला या गोकुळ वाटा गवसत गेल्या होत्या. जे काही आले ते सगळे उस्फूर्त होते तरी परिष्करणातून सिद्ध होऊन गेले होते. कुठेही जुळवाजुळव करायची गरज पडली नव्हती. सगळे आपोआप जुळून आलेले होते. तेव्हा प्रारंभी ही कृष्ण हृदय आणि राधा हृदय हे लेखन केले. एका अर्थाने पाहिले तर ही राधा कृष्णाची मनोगते आहेत. स्वगतेही आहेत. परस्परांशी संवाद आहे. उभयतांच्या संवादाची कल्पना करून मी राधाकृष्ण अनुबंध शोधण्याचा माझ्यापुरता प्रयत्न केला होता. उभयतांच्या हृदयातील आर्त मला शब्दात किती पकडता आले ते जाणकार रसिकांनी ठरवावे हा माझा मनोदय होता. पुढे कित्येक जाणकार रसिकांनी पसंतीची पावतीही दिली होती.
‘गोकुळ वाटा’मधील प्रत्येक गीतकाच्या आधी मी थोडे ललित गद्यही लिहिले होते. यामागची माझी भूमिका म्हणजे माझ्या चिंतनाची दिशा वाचताना जाणवावी एवढाच त्यामागे हेतू होता. आपण ललित गद्य म्हणतो तशीच ललित कविता असते काय?, असली तर ज्या जाणिवेतून माझ्या हातून जे निर्माण झाले ते वाचकांना आवडेल काय? याबाबत मी साशंक होतो. मनातली ही शंका दूर लोटत, कवीने आपल्या अनुभवाने आपला रूपबंध स्वतःच शोधावा या सूत्राचा आधार घेत मी लिहून टाकले. बाकीचे वाचकांवर सोपवून दिले.
खरेतर फार पूर्वी गद्य-पद्य मिश्रित अशा काव्याला चंपू काव्य म्हटले जायचे. तसा कोणताही हा प्रकार नव्हता, एवढेच मला तेव्हा सांगायचे होते. रसिकांनीही ते समजून घेतले. पुढे गोकुळवाटाची पाचशे प्रतींची पहिली आवृत्ती संपून गेली. गोकुळ वाटाची पहिली आवृत्ती सिद्ध होण्याआधी ही गीतकमालिका सर्वप्रथम ‘लोकमत’च्या अक्षररंग पुरवणीतून दिनांक 30 ऑगस्ट 1998 ते 29 नोव्हेंबर 1998 या दरम्यान प्रसिद्ध होऊन गेली. पुढे ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाने 16 जुलै 99 पासून क्रमशः राधा हृदय या नावाने प्रसिद्ध केली होती. त्यावेळी दोन्ही ठिकाणी वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचा आनंद सोबत होता. दरम्यान कृष्ण हृदय आणि राधा हृदयात मिळून गोकुळ वाटा नावाने या रचनांचे जाहीर संहितावाचन माझ्यासह अनेकांद्वारे केले गेले होते. गोकुळवाटेवर मी चालण्याआधी माझ्या मनात जो कृष्ण होता तो उलगडून दाखवताना मी लिहून गेलो, कृष्ण हा पूर्ण अवतार. कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुष. कृष्ण लीला-पुरुषोत्तम. कृष्ण भगवान.
‘चोरजार – शिखामणी’ या दूषणापासून मुरहरपंकज पाणी या विशेषणापर्यंत कृष्णचरित व्यापलेले. विशेषणे हीच ज्याची विशेषनामे झाली असा हा लोकविलक्षण प्रकार.
कृष्णाने सांगितलेली गीता तर तुमच्या आमच्या जीवनातील काळोख उजळवणारा आलोक. शंकरभाष्यापासून गीतारहस्यापर्यंत, ज्ञानदेवीपासून गीताईपर्यंत असे कितीतरी ग्रंथ गीतेच्या निमित्ताने सिद्ध होऊन गेले. वेद-उपनिषदांचे सार म्हणजे गीता आणि ती गीता सांगणारा हा भगवान श्रीकृष्ण.
‘नित्य नूतन देखिजे ते गीता तत्त्व’ हे अगदी खरे. महाभारत, श्रीमद्भागवत, हरिवंश इत्यादी आर्ष आणि अभिजात काव्यातून प्रगटलेला कृष्ण म्हणजे एक तत्त्वज्ञ, शस्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ. तसाच तो रसज्ञ आणि मर्मज्ञदेखील!
गीतगोविंद, राधामाधवविलास यातला प्रेमरस पुढे शृंगाररस झालेला. भक्ती आणि रती यांचा मधुर संगम म्हणजे कृष्णचरित.
सर्वज्ञ, रसज्ञ, मर्मज्ञ अशा पायर्यांनी शांताकार कृष्ण.
रांगणारा, रंगणारा, रंगवणारा श्रीरंग, रमणारा, रमवणारा राधारमण, गीताची गीता करणारा नि गीता गाणारा वेत्रधारी, सारथी आणि अनुसंधान साधणारा असा कृष्ण म्हणजे कवेत न मावणारे नितळ निळे आकाश. एक निळे लाघव.
याच कृष्णावर संतांनी गौळणी लिहिल्या. शाहिरांनी लावण्या रचल्या, तमासगिरांनी गणगौळणीत बांधले. किती स्तोत्रे, किती आरत्या, किती पदे आणि किती गाणी! कृष्णाचा किसन – किसन्या, किसनदेव झाला. कृष्ण असा अनेक अंगांनी पसरत, विस्तारत, जनमानसात ठसत गेला. मुनी जनमानस राजहंस कृष्ण हा भक्तीचा विषय झाला. वल्लभाचार्यांपासून चैतन्य महाप्रभूपर्यंत, राधेपासून मीरेपर्यंत, एकनाथांपासून कृष्णदासापर्यंत, प्रेमभाजन कृष्ण भजन-कीर्तनातून नामघोष झाला.
कुलशेखराच्या कृष्णेतिष्ठेति सर्वमेत दखिलम् पासून श्रीमदवल्लभाचार्यांच्या ‘मधुराधिपते रखिलम् मधुरम्’ पर्यंत विराटरूप बनला. संस्कृतातील जयदेवाचे गीत गोविंद आणि सूरदासाचा वज्र भाषेतील सूरसागर तर कृष्णभक्तीचा परमोच्च, परमोत्कट आविष्कार. प्राकृत-संस्कृतातला जन-अभिजनाला असा लळा लावणारा हा कृष्ण. हे कृष्णकौतुक दशांगुळे उरलेलेच. संगीतातील रागबंदिशीत तो आला. कितीतरी चित्रांचा विषय झाला. होरी, टप्पा, ठुमरी, कजरी, फाग होऊन प्रगटला. श्लोक, ओवी यातून निघून थेट कव्वालीतही जाऊन बसला. नृत्य, गायन, वादन यांचा आधार बनला. कान्हा, कन्हैया, किसन, लल्ला, लाल, बन्सीवाला अशा लडिवाळ नावांनी मिरवला. कृष्णाचा हा अभिजात रूपालेख म्हणजे भारतीय संस्कृतीतील जन, अभिजन, आदिम, अभिजात, ग्रामीण, नागर अशा द्वंद्वांचा द्वंद्वातितम मनोहारी आविष्कार होय. आपल्या लीलांमधून झुंबरातील लोलकातून फाकणार्या तेजोरेषेसारखी त्याची चरितरेखा… मुग्धमधुर… मद मंथर… उदात्त उन्नत… वर्तुळाकार!
हा काही रामकथेसारखा सरळसोट एकमार्गी चढता आलेख नाही. आहे ते त्याच्या हातातील सुदर्शन चक्रासारखे स्वयंचलित, गतिमान, कंगोरे असलेले, लक्ष आणि लक्ष्यवेधी अद्भुत चरित्र. स्वयंभू, तरीही नियंत्रित सामर्थ्य. स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारा, संभवामि युगेयुगे असा आश्वासक कृष्ण आपल्या श्वासातून न भिनला तरच नवल. जन्मतःच आपल्या बाळमुठीत दूध न वाळल्या ओठात विराट बळ घेऊन आलेला बाळकृष्ण पुत्रप्राप्तीसाठी पुढील काळात देही मे तनय कृष्ण असा मंत्रजप झाला. म्हणून तर आपल्या बाळाचे नाव गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या असे उच्चारून ठेवतो. जनसामान्यांचे हे नामकरण. योगेश्वर, भगवान हे तात्त्विक पातळीवरचे आविष्करण. बाळकृष्ण, नंदकिशोर हे सहज स्वाभाविक अवतरण. लल्ला, कान्हा, किसन हे मात्र बहुजनांचे नामसंबोधन. उरला तो राधेचा कृष्ण, जो ऋषीमुनी, योगी, तपी, तापडी यांना कधीच गवसला नाही.
तो… राधाधर मधुमिलिंद, गोपीमनकमलभृंग, मदनगोपाळ, श्यामसुंदर, राधारमणश्रीरंग… मदनाचा मद हरण करणारा, मधुराभक्तीत आराध्य झालेला. त्या कृष्णाच्या हृदयाचा वेध कसा घ्यायचा? त्याला राधेच्या दृष्टीनेच न्याहाळायचे. आपण राधा व्हायचे. अलगद कृष्णमिठीतच शिरायचे…
बालपणी मी भजन कीर्तन, पोथ्यापुराण खूप ऐकले. ‘गोपाल कृष्ण राधे कृष्ण’, ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असे भजन टाळ्या वाजवून उंच हात करून केलेले. काल्याच्या कीर्तनात फुगड्या खेळणे, उड्या मारणे, दहीहंडी फोडणे पाहिलेले. काल्याचिये आशी देव जळी झाले मासे हा अभंग मनी ठसलेला. काल्याच्या लाह्यांचा लाहो आगळाच.
चरित्र ते उच्चारावे, केले देवे जे गोकुळी या अभंगातून एवढेच कळले की कृष्णचरित्र केवळ उच्चारावे, आचारू नये. कृष्णासारखे वागणे त्यालाच शोभते, ते तुमचे माझे काम नोहे. कारण ‘सोळा सहस्त्रनारी भोगोनिया ब्रह्मचारी’ हा पराक्रम तोच करू जाणे. तरीही कृष्णाचे आकर्षण संपले थोडेच! तो आपला जिथे तिथे भेटतच होता. थोड्या कळत्या वयात डोक्यावर टोपी आली ती देखील ‘कृष्ण छाप’च होती. शाळेत तो ‘वनी खेळती बाळ ते बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवाचे’, या वामनपंडिती वळणाने भेटला होता.
आजी, मावशी, आत्या, मामी, काकी, आई यांनी गायिलेल्या ‘नको वाजवू कान्हा मुरली – तुझ्या मुरलीने तहानभूक हरली’ अशीही त्याची ओळख आहेच. वाङ्मयातून देखील कृष्ण पाठीशीच लागलेला आहे. कन्हैया बजाव बजाव मुरली या गोविंदाग्रजांच्या गाण्यामधून कायम गळ्यात पडलेला तो हा असा- मुकुंदा रुसू नको इतुका, राधा गौळण करिते मंथन – मनात हरीचे अविरत चिंतन, गौळणींनो जाऊ नका बाजारी, दे रे कान्हा चोळी अन लुगडी, आज गोकुळात रंग खेळतो हरी, किती गाणी सांगावीत? त्यात कहर केला मनमोहन नातू या कवीने – कसा गं गडे झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा? ही ओळ तरुण वयात भलतेच सुचवून गेली. अंबाडा सैल व्हायला काहीतरी वेगळे व्हायला लागते, हे भाऊसाहेब पाटणकरांनी किती छान उलगडले आहे. तसाच आणखी एक प्रकार. एका गोपिकेच्या प्रश्नाला राधिकेने दिलेले उत्तर – घनश्याम नयनी आला, सखे मी काजळ घालू कशाला? एकूण असे हे कृष्णगारुड. सर्वात वरताण एकनाथांची गवळण – ‘वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले.’
राधेला पाहून भुललेला आणि गायीऐवजी बैलाचेच दूध काढणारा कृष्ण आणि ती राधा – तीही कृष्णाला पाहून भुललेलीच! बिचारी रिकामा डेरा घुसळतेच आहे. असे परस्परांना वेडे करणारे, वेढ्यात नि कोड्यात पाडणारे प्रेमजाल हे सर्व काही संचित म्हणून गाठीशी असलेले… त्यातूनच हे कृष्ण हृदय…
माझ्या अंतर्मनात ठसलेल्या कृष्णाविषयी लिहिताना पुढे मला जे आकलन झाले त्यात राधा आणि राधेच्या हृदयाचा प्रश्न होता. तेव्हा मी ते लिहून गेलो. राधा कृष्णाहून काय वेगळी आहे? पण तिचेही काही हृदगत असणारच! नक्कीच आहे. घरोघरी सत्यभामा आणि रुक्मिणी भेटतातच. राधा मात्र भेटत नसते. आपल्यापैकी कुणाला ती भेटली असेल तर तो भाग्यवान! नसेल तर मनातली राधा सांभाळायचीच असते. राधेला वांधा होईल असे काही करायचे नसते. नाही तरी आपण आपल्या घरातील सत्यभामा किंवा रुक्मिणीला सांगायला मोकळे असतोच की, नारी मज बहु असती, परि प्रीती तुजवरती’
रुक्मिणी आणि सत्यभामा यांना आपले प्रेम त्यांच्यावर असल्याचे पटवून द्यावे लागते. राधेला मात्र त्याची गरजही नसते.
ही जाणीव घेऊन राधाहृदय शोधताना एक लख्ख तथ्य सापडले.
राधा ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती नाही. ‘गाथा सप्तसई’ किंवा ‘गाथा सप्तशती’मध्ये ती आपल्याला भेटते. लोककथेची नायिका झालेली ही गोपी. गोपिकारमण गोविंदाची आराध्य झालेली. राधा शब्दाचा अर्थच मुळी ‘जी चित्त प्रसन्न करते ती राधा’. श्रीमद्भागवतात केवळ एक गोपी एवढा तिचा उल्लेख आहे. भागवतातील ही एक विशेष गोपी म्हणजेच आपली सर्वमान्य राधा! आपली राधी…
जनमानसाने पिढ्यानपिढ्या, युगानुयुगे जपलेली राधाराणी. लोकमानसाने अभिजनांना दिलेली ही देणगी. पुढे तीच देवी, देवता बनली आणि आपण सारे तर इतके भारावलो की तुलसी विवाह लावताना चक्क राधा दामोदर असा गौरव करू लागलो. जयदेवाच्या गीत गोविंदापासून थेट आपल्या पु. शि. रेगे यांच्या त्रिधाराधापर्यंत राधेने आपली मुद्रा ठाम उमटवलेली आहे.
गौळणी, लावण्या, पदे, अष्टके, आरत्या, भजने, स्तवने, आहाणे आणि उखाणे अशा नानाविध परी आणि तर्हा निर्माण झाल्या. एकनाथ हे तर गृहस्थ कवी.
‘वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले,’ असे त्यांनी लिहिणे समजू शकते परंतु ज्ञानेश्वरही ‘वल्लव – वल्लभा, कांतु- कांता अशा उपमा, दृष्टांतांचा मांड मांडतात तेव्हा केवळ थक्क व्हायला होते. संस्कृतीला आणि एकूणच आपल्या मानसिक जडणघडणीला गवसलेले सुंदर लेणे म्हणजे राधा!
राधा समजलेल्या प्रत्येक कवीने आपल्या काव्याने हे सौंदर्य शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला नसता तरच नवल! अभिजाततेचा मानदंड म्हणजे उदात्तता. ‘रती’चे ‘भक्ती’त रूपांतर होते ते अशा कल्पकथातूनच.
म्हणून तर राधेची गाथा लिहायची तर तिच्या हृदयात असलेल्या कृष्णाचे प्रगट होणे!
मला जे राधाहृदय सापडले त्यातून मी राधेच्या अंत:करणाने कृष्णवेध घेत गेलो. राधाकृष्ण हा अनुबंध म्हणजे प्रेमभावाची अम्लान नित्यनूतन आणि लोकविलक्षण गाथा असल्याचे मला भान होते. गाथा म्हणजे पोथी नसते किंवा पुराण नसते. गाथा म्हणजे गुंफण! ही गुंफण दोन मनांची होती. हा गोफ तीपेडी वेणीसारखा गुंतत जाणारा आणि अगदी तसाच उलगडत जाणारा. गोवायचे आणि मोकळे व्हायचे.
कृष्ण लीलेतील रासक्रीडेत गोफ आहेच. एका बाजूने गुंतत जायचे, दुसर्या बाजूने त्यातून सुटायची धडपड करायची आणि अंततः अडकून पडायचे!
आनंद तेवढा रास क्रीडेत.
नाचायचे, डुलायचे, झुलायचे आणि त्या नादात भुलायचे. म्हटले तर हा भुलभुलेय्या. दोन हात, दोन पाय, दोन टिपर्या, दोन देह आणि दोन हृदय शेवटी एकाकार होणे महत्त्वाचे. समरस होणे ही या क्रीडेची प्रतिज्ञा. इथे हार-जीत नाही. अहंकार नाही. आहे ते सर्वस्वी विरुन जाणे! कोण किती मुरला, किती अंगुळे उरला याला अर्थ नाही. द्वैताच्या पार उभे राहणारे अद्वैताचे एक गोकुळ. साक्षीला खळखळणारी यमुना नि सळसळणारा कदंब… दोन टिपर्या एक नाद… दोन हृदये एक श्वास… राधाकृष्ण म्हणजे राधा आणि कृष्ण असे नाही तर राधाकृष्णच किंवा कृष्णराधाच!
राधा आतुर तर कृष्ण चतुर.
कृष्ण चित्तचकोर तर राधा मनभावन. दोन हृदयाच्या मिळणीची अशी ही भावगाथा. ना कथा, ना कहाणी…
प्रीतीची एक अविरत धारा… राधा!
स्पष्टपणे म्हणायचे झाले तर आध्यात्मातील माया – ब्रह्म, सांख्याचे प्रकृती – पुरुष असे जंबाल उभे न करता स्त्री – पुरुष, प्रियकर – प्रेयसी, तो आणि ती, नर आणि नारी इतक्या साधेपणाने याकडे पाहायचे की आणखी काही परिमाणे शोधायची हा ज्याचा त्याचा प्रांत समजून मी गोकुळवाटा लिहित गेलो. माझ्या सर्जनशील जाणिवाचा हा एक आविष्कार आहे इतकेच मी या गीतक मालिकेबाबत म्हणू शकतो. माझ्या या जाणिवांचा आविष्कार पुस्तकरूपात वीस वर्षाखाली गोकुळ वाटा या नावाने जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा या जाणिवांचे चांगले स्वागत झाले होते. वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. कृष्ण हृदय आणि राधाहृदय ज्यात शब्दबद्ध होते त्या गोकुळवाटांच्या संहितेचे वाचन माझ्यासह काही साहित्यिकांनी केले होते. श्रीकांत उमरीकर, रंजन कंधारकर, प्रसाद चौधरी आनंदी विकास या मराठवाड्यातील अनेक साहित्यिक-कलावंतांनी काही गावी गोकुळवाटांचे सादरीकरण करून रसिकांपर्यंत हे हृद्गत पोहोचवले होते. ही पहिली आवृत्ती 2004 मध्ये प्रकाशित झाली होती. आमच्या नांदेडचाच एक नामवंत कलावंत असलेला कै. नयन अर्थात कै. नयन बाराहातेने त्या गोकुळ वाटाचे अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ केले होते. ती आवृत्ती संपली.
ती आवृत्ती संपण्याआधीच कै. यशवंत देव यांनी तेव्हा माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांना या गोकुळवाटामधील गीतकांना संगीतबद्ध करायचे होते. या संदर्भात माझ्या आणि त्यांच्या काही भेटीही झाल्या. त्यांच्या दादर-माहीम रस्त्यावर असलेल्या वंदन या इमारतीत आम्ही भेटत गेलो. काही ना काही कारणाने त्यांचा तो संकल्प मागे पडला. पुढे त्यांचे निधनही होऊन गेले. गेल्या दशकात गोकुळवाटाच्या प्रतीही संपून गेल्या. अधून-मधून या पुस्तकाच्या उपलब्धतेची विचारणा होत गेली मात्र या गोकुळवाटा पुनः उजळवण्याचे मनावर घेतले ते अनुबंध प्रकाशनाच्या अनिल कुलकर्णी यांनी! त्यांनी रवीमुकुल कुलकर्णीसारख्या संवेदनशील चित्रकाराला मुखपृष्ठ आणि आतील चित्रे करायला लावली. आपलीच कलाकृती या वेळीही आकर्षक अशी दिसल्याने गोकुळवाटा पुन्हा उजळून निघाल्याची प्रचिती मिळाली.