पुलंच्या कथनातील प्रसिद्ध किस्सा या निमित्ताने आठवला. धाकटा भाऊ मोठ्या निष्पाप कुतूहलाने मोठ्या भावाला विचारतो, ‘‘व्हिस्की म्हणजे काय रे भाऊ?’’
मोठा भाऊ मोठ्या समंजस, समजूतदारपणे सांगतो, ‘‘जी घेतल्याने माणूस न थांबता कितीही वेळ बोलू शकतो ते!’’
त्याच चालीवर आज धाकट्या भावाने जर विचारले, ‘‘प्रवक्ता म्हणजे काय रे भाऊ?’’ तर आजचा मोठा भाऊ तेच उत्तर देईल, ‘‘न थांबता कितीही वेळ जो बोलू शकतो तो प्रवक्ता!’’
यात मला थोडी भर घालाविशी वाटते. ‘कोणत्याही वेळी, कितीही, कुठेही जो न थकता रेटून बोलू शकतो तो प्रवक्ता.’
संस्थेचा, पक्षाचा, धर्माचा, जातीचा असा विभाग कोणताही असो प्रवक्ता हा लागतोच… ‘प्रवक्ता’ ही एक नवी जमातच गेल्या दहा-वीस वर्षांत फोफावलेली आहे, हे आपणास सहज लक्षात येईल आणि दिवसेंदिवस ‘प्रवक्ता’ पिकाचं हे शेत सर्व सीमा काबीज करणार आहे, हे निश्चित. अगदी लवकरच – झपाटलेल्या तरूण तरूणींसाठी ‘प्रवक्ता’ हे एक नवे करिअर खुले होणार असे दिसते किंवा एव्हाना ते झालेही असेल.
प्रवक्ता कोणत्याही पक्षाचा वा संघटनेचा असो; त्याच्याकडे खास गुण असावेच लागतात. ते विशेष गुण नसतील तर तो सामान्य कार्यकर्ता म्हणूनच आसपास संधीची वाट पाहत राहील. त्याप्रमाणे त्याच्यात काही गुण असूनही चालत नाहीत. ‘प्रवक्ता – एक चिंतन’ साकारताना या दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल. प्रवक्ता हा शांतपणे मत मांडणारा, समंजस वृत्तीचा, भाषेची सभ्यता असून चालणारच नाही. असा इसम फार तर एखाद्या राजकीय नेत्याचा ‘स्क्रिप्ट रायटर’ होऊ शकतो. मुद्दे देणं ही नेत्यांची गरजच असते आणि ते मुद्दे पुरवणं ही सुद्धा गरज आहे परंतु हा ‘मुद्दे-माल’ देणारा प्रवक्ता होऊ शकत नाही. प्रवक्ता होण्यासाठी तुमच्या जवळ मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता अत्यंत आक्रमकपणे आणि तेही आक्रस्ताळेपणे, बिनधास्तपणे बोलण्याची क्षमता असावी लागते. कितीही संताप आला तरी, कुणी कितीही बेछुट आरोप केले तरी अतिशय कणखरपणे, पोलादी छातीने सारे वार परतवण्याची ताकत ‘प्रवक्ता’ होण्यासाठी गरजेची आहे. केस पिंजारून, लाल डोळ्यांनी माध्यमांपुढून सरकताना समोरच्या प्रेक्षकांच्या नाडीचे ठोके तर धाड्धाड् वाढले पाहिजेत पण स्वतःचे ‘ब्लड प्रेशर’ अर्थात रक्तदाब तर वाढू द्यायचा नाही, हे कसब लागते.
प्रवक्ता होण्यासाठी अभिनयगुणाची प्रचंड गरज असते. चेहर्यावर प्रतिपक्षाबद्दल तुच्छता, कधी छद्मी भाव, कधी खोटी कीव, कधी बेपर्वाई तर कधी ‘जा रे! बघून घेईनऽऽ’ हा बेडरपणा असावाच लागतो. हा महत्त्वाचा गुण जर नसेल तर तुम्ही ‘प्रवक्ता’ होऊच शकत नाही. बुद्धिमान आहात, अभ्यासही बर्यापैकी आहे पण चेहर्यावर आणि देहबोलीत जर समोरच्याला चिरडून टाकण्याचा अभिनिवेश नसेल तर तुम्ही ‘प्रवक्ता’ म्हणून अगदीच निरूपयोगी आहात.
प्रवक्त्याकडे अजून एक गुण आवश्यक आहे तो म्हणजे – विशिष्ट भाषाशैली. हल्ली कित्येक प्रवक्ते त्यांच्या मतांपेक्षा त्यांच्या भाषेच्या लकबीसाठी लोकप्रिय आहेत. सिरिअल्सचा कंटाळा आला (नि तो तर येतोच) की लोक गंमत म्हणून प्रवक्तापुराण बघायला ‘चॅनेल’ बदलतात. प्रवक्त्याच्या भाषेतही बोली भाषेचा रांगडेपणा असावा लागतो. बरे, मराठी असो की इतर कुठलीही भाषा, तुम्हाला एका भाषेतून सहजपणे दुसर्या भाषेत गर्रकन गिरकी घ्यावी लागते. म्हणजे पटकन उर्दू शेर पेरावा लागतो, मध्येच बोली भाषेतली म्हण किंवा एखादा वाक्प्रचार, एखादी दंतकथा पेरावीच लागते. बरे, भाषाशैली अशी की बंदुकीची गोळी सुटावी अशी वर्मी लागावी. हल्ली वर्मी लागणं अवघड कारण मनंच बुलेटप्रुफ जाकीट घालून फिरत आहेत. त्यामुळे प्रतिपक्षाच्या वर्मी घाव बसणं अवघड! पण प्रेक्षकांचा रक्तदाब वाढविण्यात जरी प्रवक्ता यशस्वी झाला तरी वृत्तवाहिनीचा टीआरपी वाढतो. त्यामुळे वाहिन्यांचे प्रवक्तेही अशा बेताल, आक्रमक, मुजोर प्रवक्त्यांची मागणी करू लागले आहेत, असे सूत्रांकडून कळले…
प्रवक्ता हा जवळजवळ सर्वज्ञच असावा लागतो. 15-20 वाहिन्यांचे पत्रकार प्रवक्त्याला उचकवण्याचा साग्रसंगीत प्रयत्न करीत असतात. त्यांना प्रश्न आणि ते कोणतेही विचारण्याची मुभा असते. त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचे प्रवक्त्याकडे अगदी तडकाफडकी उत्तर असते. पुढे त्या उत्तराची खातरजमा करण्याची कुणाला गरज नसते. चॅनल्सना एक चमचमीत न्यूज दिवसभर चघळायला दिली की काम भागते. सर्व चॅनल्सवर चोवीस तास दर दहा मिनिटांनी दिसण्याचे कसब या खणखणीत उत्तरात प्रवक्त्याकडे असते. उदाहरणार्थ – पत्रकाराने विचारले, ‘‘तुमच्याकडचे दोन आमदार – त्या झेंडू पक्षाशी संपर्कात आहेत हे खरं आहे का?’’
‘‘आश्चर्य आहे, ते दोन आमदार झेंडूकडे वीस आमदारांशीच बोलायला नि ते वीस आमदार आमच्याकडे घेऊन यायला गेले होते. आत्ता या क्षणी एका रिसॉर्टमध्ये सारे काही नक्की झाले आहे.’’
आता प्रश्न फेक! पण प्रवक्त्याकडे त्या फेकू प्रश्नाला डबल फेक उत्तराची तयारी लागते. कुठले वीस? कुठले रिसॉर्ट? हे पुढे सिद्ध करायची गरज नसते. अतिशय आत्मविश्वासाने चंद्राला हा ‘सूर्य’च म्हणण्याची प्रवक्त्याची हिंमतच त्यास पुढे नेते.
प्रवक्त्याची आणखी खासियत म्हणजे तो ‘एनी टाइम अॅव्हेलेबल’ असतोच. मध्यरात्री वाहिन्यांवाल्यांनाच थोडी झोपेची गरज असते, म्हणून अगदी नाईलाजाने प्रवक्ता थोडी डुलकी घेत असेल तेवढीच! पण तेवढीच झोप प्रवक्त्याला पुढले वीस तास फ्रेश ठेवते. प्रवक्ता जेवतो केव्हा, झोपतो केव्हा हे जसे कधीही कोणाला कळत नाही, त्याप्रमाणे प्रवक्त्याला बायको, मुलं असतात का? ‘प्रवक्तीण’ असेल तर नवरा, सासू-सासरे, मुलं असतात का? याचा कोणाला शेवटपर्यंत पत्ता लागत नाही. प्रवक्त्याला बिचार्याला स्वतःचे घर, सण समारंभ, आजारपण, काही म्हणजे काही नसते. प्रवक्ता आपला 20-22 तास जागा मिळेल तेव्हा – कुठल्याही वेळेला उत्तर कार्यासाठी गुरुजींप्रमाणे आपल्या नि मित्रपक्षाचा कैवार घ्यायला नि प्रतिपक्षावर जमेल तेवढे तोंडसुख घ्यायला मोकळा असतो. प्रवक्ता हा सर्व संचारी, सर्वच आणि सर्वांगीण बुद्धिमत्तेचा असावाच लागतो. पुराण, वेद ते अगदी हिंदी सिनेमातील संदर्भ तो इतके फटाफट देतो की आपण आश्चर्याने तोंडात घातलेले बोट तोंडातून बाहेर काढण्याचेही विसरतो.
प्रवक्त्याची सर्वात जबरदस्त अदाकारी आणि कौशल्य केव्हा पणाला लागते, त्याचीही गंमत आहे. तो एखाद्या पार्टीचा अष्टप्रहर वकील असल्यासारखा हिरीरीने वागतो खरा पण पार्टी जेव्हा एखाद्या हॉटेल पार्टीत सामंजस्याचे चिअर्स झाल्यावर आपली भूमिका ‘काळ्याचे पांढरे व्हावे’ इतक्या टोकाची बदलते तेव्हा मात्र प्रवक्त्याचे प्रवक्तापण कसून पणाला लागते. स्वतःच्या काळ्या आक्रमक विधानाचा 360 अंशात बदल करताना प्रवक्त्याला कुठलाही संकोच वाटल्याचे रेषभरही दिसून चालत नाही. पत्रकारांच्या उचकवणार्या प्रश्नांना ज्या सराईतपणे प्रवक्ता बगल देतो त्या सराईतपणावर प्रवक्त्याची पक्षाची पुढील वाटचाल, प्रगती व ‘प्रमोशन’ अवलंबून असते. स्वतःच्या मालकाची इतक्या इमाने-इतबारे समर्थनबाजी करण्याचे बक्षीस प्रवक्त्याला कुठल्या कुठल्या स्वरूपात मिळते, याची यादी मोठी होऊ शकते. विविध मंडळे, महामंडळांची पदे ते अगदी आमदार, नगरसेवकपदाची तिकिटे ते सभापती, सभागृह नेते असे कुठलेही पारितोषिक त्यांचे प्रवक्तापण किती प्रभावी आहे त्यावर अवलंबून असते.
प्रवक्त्याची स्थिती काही प्रसंगी अत्यंत दयनीय होते. बिचारा प्रतिपक्षातील बड्या आसामीला चारी मुंड्या चित करण्याची महाप्रचंड तयारी करतो. आता समाजातील सर्वात लोकप्रिय चेहर्याला, प्रतिपक्षाच्या प्रमुख नेत्याला असे उभे-आडवे कणीस भाजावे तसे भाजण्याचे मनसुबे प्रवक्ता आखतो. आता इतक्या बड्या चेहर्यावरच आपले परजलेले वाकबाण फेकून घायाळ केल्यानंतर माध्यमात सर्वात लालभडक, गुळगुळीत, तुर्रेवाल्या कोंबड्याप्रमाणे आपण कसे पुढील दहा-बारा दिवस चर्चेत राहणार, नि पक्षश्रेष्ठींच्या उबदार हातांची आणि लांबलचक हास्याची शाब्बासकी आपल्यास कशी मिळणार याचे इमले एकावर एक… एकावर एक असे आभाळाला भिडत असतानाच अचानक रिमोट सूचना करतो… ‘घुम जाव! ज्याला आपण टार्गेट करतोय तो चेहरा आता आपल्याशी हातमिळवणी करतोय बरं! थोड्या काळापुरते तरी हे गठबंधन ठरले बरं का! तेव्हा उद्या पहाटेपासून पहिल्या आंघोळीनंतर पत्रकारांना नि असंख्य नामिक व अनामिक वाहिन्यांना सामोरे जाताना धिक्कार जरा जरासा डायल्यूट करावा बरं!’
असा वरून आदेश आला रे आला की प्रवक्ता त्वरेने ‘राजकारणात खरं वैर कोणाशीही नसतं, देशाला जर पुढं न्यायचं असेल तर झालं गेलं विसरून हातमिळवणी ही करावीच लागते,’ असा सूर धरून आपले मुद्दे त्वरेने तयार ठेवतो. प्रवक्त्याने जर एखाद्या बड्या रावस माशाचा काटा काढण्यासाठी जर त्याच्या खूप सार्या भानगडींचा ढीग पक्षाच्या साहाय्याने तयार केला असेल तरीही मुखवटा बदलताच तो काही खचत नाही. तो काही दिवस किंवा दोन-तीन महिने लंडन, न्यूयॉर्क किंवा स्वित्झर्लंडला पक्षाच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी सेवन स्टार हॉटेलमध्ये ‘सब का साथ’ देण्याचा व ‘आत्मविकास’ करण्यासाठी आत्मशांती करून घेतो. वर्ष-दीड वर्ष राष्ट्राच्या विकासासाठी खूप सारी आरडाओरड केलेली असल्यामुळे प्रवक्ता आवडत्या द्राक्षासवांनी आपला कोरडा घसा ओला करून घेतो आणि पुन्हा स्वतःचे नूतनीकरण करून नव्याने बदललेल्या धोरणाला जागत प्रवक्तापद भूषवू लागतो.
काही वेळा प्रवक्ता फारच थोर असेल तर त्याला सभापती इत्यादी बढती देऊन पत्रकारांच्या मार्यापासून दूर ठेवण्याची काळजी घेतली जाते. प्रवक्ता हा त्या त्या पक्षाचा चेहरा असल्याने तो चेहरा कसा गुळगुळीत, फ्रेश राहील याची आवर्जून काळजी घेतो. क्वचित प्रवक्त्याला अधिवेशन इत्यादी काळात मोकळा वेळ मिळतो पण त्याचा चेहरा माध्यमे विसरु नयेत म्हणून एखाद दुसर्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी साखळी उपोषणाला कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसवले जाते. प्रवक्त्याचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्याचे काम दक्षतेने घेतले जाते. हे आपल्या भारतीय पक्षप्रणालीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
प्रवक्त्याला सुद्धा अन्य पक्षाकडून धूर्तपणे इतर पक्षात पाचारण केले जाते. प्रवक्ता जितका आक्रमक, बिनधास्त, शेकडो कोर्ट केसेस मांजरीच्या पिल्लांप्रमाणे अंगा-खांद्यावर खेळण्याची त्याची महाताकत जितकी महान तितक्या किमतीच्या खरेदी-विक्रीत प्रवक्ता अचानक निष्ठेच्या रंग बदलाची सुतळ आपल्या मनगटावर यथा समारंभ बांधून घेतो. कोण काय म्हणेल याची अर्थातच हाडाच्या प्रवक्त्याला काळजी नसते. मध्ये दहा-पंधरा दिवस फक्त बदललेल्या घरातल्या जागतिक कीर्तीच्या स्थानिक वा प्रादेशिक घरप्रमुखाच्या सोबत वावरत राहतो. चेहरा पुन्हा पुन्हा दिसेल अशी चोख व्यवस्था केली जाते. ‘हे सारे राष्ट्राच्या विकासासाठी आहे’ किंवा ‘माझी आधीच्या मालकाने घनघोर निराशा केली, तिथे आता नव्या विकासाला संधीच नाही’ असे एक ठोक विधान करून लगेच तो तेवढ्याच हमरीतुमरीने नव्या कामावरही तितक्याच छातीठोकपणे काम करतो. प्रवक्त्याचे हे घरबदलू सराईतपण, नव्या मालक पक्षाची तेवढ्याच धडाक्याने तरफदारी ही अर्थातच प्रचंड कौतुकास्पद असते.
प्रवक्त्याचे अगदी कोणाशी म्हणजे कोणाशीही वैर नसते. त्यामुळे खरे तर प्रत्येक प्रवक्ता हा अजातशत्रू असतो. त्यामुळे कधीही कुणाशी आरोप-प्रत्यारोप झाले की तो म्हणतो, ‘आमची लढाई ही विचारांची आहे!’ विचार हे हाडामांसाचे नसल्याने तो हाडामांसाच्या विरोधकाला जाहीर अलिंगन देतो. लग्न समारंभाला उपस्थित राहतो, वाढदिवसाचे केक कापतो. ‘अरे काल तर तुम्ही याला देशाचा एक नंबरचा शत्रू म्हटले होते’ असे पत्रकारांनी विचारताच ‘हो, पण माझा शत्रू असे मी कुठे म्हटले होते’ असा चमकदार प्रतिप्रश्न करून प्रश्नकर्त्याला अंग झुलत ठेवून शेकहॅन्ड करतो. अन्न, पाणी, प्रदेश, प्रवास, तुरुंगवारी, कोर्टबाजी अशा कुठल्या म्हणजे कुठल्याच गोष्टी यशस्वी व वर्षानुवर्षे सतत अटेंशनमध्ये राहिलेल्या प्रवक्त्याच्या मानसिक स्वास्थ्याच्या आड येत नाहीत. देशभर व्यापून उरलेले हजारो प्रवक्ते खरंच कुठल्या च्यवनप्राशामुळे एवढे बलदंड राहतात हाच आता आयुर्वेदातील संशोधनाचा विषय झाला आहे.
काही वेळात तर प्रवक्त्यांची एक फौजच्या फौज वाहिनींवर आलटून पालटून शब्दांची तलवार गाजवीत असते. खूप महाभयंकर गोंगाट करून कोणाचेच कोणाला ऐकून न देणे आणि अँकरने म्हणजे संवादकाने त्यांना ‘भांडू नका, भांडू नका’, ‘त्यांना बोलू द्या’, ‘यांचे ऐका’ म्हणत जाहिरातींसह मिळालेला अर्धा-पाऊण तास वाया घालवायचा नियम ‘काटेकोर’पणे पाळायचा असतो. मध्येच प्रवक्त्याला घरातली माणसं चहा देतात. त्याचे चहा घेणे आपण आपल्या घरात चहा घेत चूपचाप बघायचे असते तर मध्येच प्रवक्त्याला कोणीतरी मोबाईल देत नवा मुद्दा पुरवते. त्या मुद्यावर तो पुढे काही मिनिटे खिंड लढवतो. मुद्दा सुचला नाही की काही प्रवक्त्यांना सोयीस्कर ऐकू येत नाही. काहींना काहीच ऐकू आले नाही तरी एखादा मुद्दा रेटून आणि पेटून बोलावा लागतो. आपापल्या रोजीरोटी पुरवणार्या पक्षाला सामाजिक चेहरा व संरक्षण देण्याचे खूपच महत्त्वाचे कार्य आजचा प्रवक्ता करीत असतो.
इमाने-इतबारे प्रवक्तागिरी करीत असल्यामुळे प्रवक्त्याची कमाई ही काही करोडोंनी वाढते. दिवस-रात्र निढळाचा घाम गाळून, घशाला कोरड पाडून, सारी आतडी पिळवटल्यासारखे भासवून प्रवक्ता माध्यमे व आपापले नेते जगविण्याचे कार्य अहोरात्र करीत असतात.
आता करिअरची शेकडो क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यातले महत्त्वाचे क्षेत्र ‘प्रवक्ता’ हेही आहे. लवकरच वृत्तपत्रात व अन्य माध्यमात जाहिराती झळकू लागतील,
‘यशस्वी प्रवक्ता व्हायचंय!’
‘तीन महिन्याचा सर्टिफाइड कोर्स!’
‘नोकरीची हमी, पैशाला नाही कमी!’
‘प्रवक्ता व्हा, वलय मिळवा, संपत्ती कमवा!’
– प्रवीण दवणे