एकूणच राजकारणातील स्त्रियांचा समग्र कालपट पाहता केवळ राजकारणातील स्त्रियांचा टक्का तेवढा वाढला आहे. प्रत्यक्षात तिच्या वाटा खडकाळच आहेत. ‘राजकारणातील स्त्री म्हणजे शोभेची बाहुली’ असे तिच्याबाबत बोलले जाते पण ही परिस्थिती किती काळ टिकते? नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, फार फार तर आमदारकीपर्यंत तिची झेप आणि पुरुषांच्या राजकारणासाठी तिचा केलेला सोयीचा वापर असे सामान्यत: स्त्रीकडे पाहिले जाते.
तुम्ही म्हणाल, वकूब असलेल्या महिला महाराष्ट्राच्या राजकारणात नाहीत का? आणि पुरोगामी, आधुनिक विचार करणार्या महाराष्ट्राच्या राजकारणात जर नेतृत्वगुण असणार्या, योग्य पात्रता, चांगला वकूब असणार्या स्त्रिया जर असतील तर मग त्या महाराष्ट्राच्या शिरोभागी का नाहीत? देशाचे स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तरी झाली आणि राज्याला अस्तित्वाला येऊन इतकी वर्षे झाली तरी मग एकही महिला आमदार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेली नाही, असे का? याचे उत्तर सरळ आहे, सत्तेचा सोपान चढताना एक तर स्वबळावर त्या निवडून येत नाहीत. कुणाच्या तरी आधारावर म्हणण्यापेक्षा घरातील पुरुषाच्या आधारावर ती निवडणूक लढवते आणि कुणाच्या तरी आधारावर निवडून आल्यावर पुरुष नावाच्या झाडाच्या आधाराने वेलीसारखी ती तग धरते! राजकारणात बाहुबली असलेल्यांची हुकूमत चालते. इथे आमची स्त्री टिकाव धरु शकत नाही. एखादीच सूर्यकांता पाटील, एखादीच यशोमती ठाकूर, एखादीच नीलम गोर्हे व्यवस्थेशी झुंज देऊन आपलं राजकारणातील स्थान टिकवते. तेव्हा तिला कुणी बळ देत नाही.
महाराष्ट्राचं राजकारण मोठं चमत्कारिक आहे. इथली परिस्थिती वेगळी आहे. सत्तेसाठी जातीय समीकरणे वेगळी आहेत. जातबाहुल्य हा फॅक्टर मोडून काढणेही अवघड आहे. मुख्यमंत्र्याला सगळे आमदार सांभाळावे लागतात तरच निभाव लागतो. पुन्हा पैशांची गणितं वेगळी आहेत. इथेही आमच्या स्त्रियांना बळ नाहीय. चिवटपणे राजकारणात येणार्या आणि पाय रोवून उभ्या राहणार्या स्त्रियांना एखादे मंत्रीपद अगदी फेकून मारल्यासारखे दिले जाते. तेही महिला व बालकल्याणसारखे दिले जाते. यात कुणाचे कल्याण होते ते सांगता येत नाही. मंत्रीपद देताना पुन्हा दुय्यम दिले जाईल याची काळजी घेतली जाते. यापाठी पुरुषी मानसिकता असते… ‘तिला काय समजते?’ किंवा ‘बाईमाणूस आहे, तिला झेपणार नाही…’ हेही पुरुषांनी ठरवूनच टाकलेले असते!
दुसरे म्हणजे जे सामान्य घरात चित्र असते तेच चित्र राजकारणात देखिल पाहावयास मिळते. ‘आम्ही काय बायकांच्या हाताखाली काम करावे का?’ हा पुरुषी अहंकार असतो. स्त्रियांमध्ये पात्रता आहे, धाडस आहे. असे असूनदेखील बेमालूमपणे तिला बाजूला सारण्याची हिकमत पुरुष घडवून आणतो. ही किमया पुरुषी मानसिकतेतून घडते आणि अशा मानसिकता दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होताना दिसतात. यातून चुकून-माकून एखादी स्त्री बंड करुन पुढे आलीच तर तिला हरविण्यासाठी तिच्या चारित्र्याचा आरसा दाखवला की ती यशस्वी माघार घेते आणि हे फार सोपे असते. पुरुषांच्या जगात स्त्री चारित्र्यहनन करणे अगदी सोपे… ते शस्त्र उगारले की आमची स्त्री आपोआप म्यान होते किंवा केली जाते! कारण आमची स्त्री चारित्र्याला घाबरते.
चाळीस वर्षांपूर्वी शालिनीताई पाटील, नीलम गोर्हे राजकारणात होत्या. मीही तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात होते. आमचा सक्रिय सहभाग असे. प्रश्र्न विचारणार्या या स्त्रिया होत्या. त्यांना चांगली समज होती. शालिनीताई तर वसंतदादा यांच्या पत्नी होत्या पण प्रश्र्न विचारणार्या स्त्रिया राजकारणात नको असतात. त्या शोभेची बाहुली म्हणून ठीक वाटतात. मुख्यमंत्रीपद राहूच देत, शालिनीताईंच्या नंतर या महाराष्ट्राने कोणत्याही स्त्री आमदाराला महत्त्वाचं महसूल खातं कधीही दिलेलं नाहीं.
माझी आई अंजनाबाई जयवंतराव पाटील 1962 ते 1967 या काळात आमदार होती. तेव्हा बावीस महिला आमदार होत्या. तो काळ यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांचा होता. आदिवासी समाजाच्या देखील महिला आमदार होत्या. माझ्या आईनंतर मी अठरा वर्षांनी 1980 साली आमदार झाले. स्त्रिया आपला संसार, अध्यात्म, मुलंबाळ सांभाळून राजकारण करीत असत. तो काळ स्त्री सन्मान करण्याचा होता. तरीही या महाराष्ट्राने स्त्रीला मात्र मुख्यमंत्री केले नाही!
राष्ट्रीय म्हणजे देशाच्या राजकारणाकडे पाहिले तर देशाच्या राजकारणात पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी, राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील आणि वर्तमानात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची नाममुद्रा कोरली गेली, या गोष्टीचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो. देशाच्या राजकारणात आलेल्या स्त्रिया आणि मुख्यमंत्री म्हणून ज्या स्त्रियांनी आपली मोहर उमटवली त्यांचा अभिमान आहेच. इंदिरा गांधी यांना राजकारणातील धडे घेण्यासाठी प. नेहरुंनी मोरारजी देसाई यांच्याकडे पाठवले होते. असा एखादाच नेहरु असतो. कमला नेहरु ते अगदी सोनियाजीपर्यंत नेहरु घराण्यातील स्त्रिया राजकारणात आल्या. याला भलेही परिवारवाद म्हणू देत पण खरे तर हे प्रोत्साहन म्हणायला हवे. मिसा भारती, मुलायमसिंह किंवा लालूप्रसाद यांच्या घरातील स्त्रिया पण राजकरणात आहेत. महाराष्ट्रात आरक्षणाकरता किंवा सत्तालालसा म्हणून मुलींना पुढे केले जाते. बहुतेक वेळा नवराच कारभारी असतो पण अलीकडे हे चित्र बदलले आहे. हल्ली त्या महिला छान काम करताहेत पण आमची कुबुद्धी नको तिकडे आमचा समाज लक्ष देतो. नाईलाजास्तव आम्ही मालकीण! तेही सातबारा, शाळेचा दाखला या दस्तावर आम्ही आलो हेच काय ते समाधान. मुली शिकताहेत, चांगल्या हुद्द्यावर महत्त्वाची कामगिरी करीत आहेत ही समाधानाची बाब आहे.
उत्तर प्रदेशात मायावतींनी मुख्यमंत्री म्हणून सत्ता स्थापन केली. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग त्यांनी केला पण दुसर्यांदा तिला जमू दिले नाही. पश्चिम बंगालमध्ये साम्राज्यवाद चिरस्थायी आहे. ममतादीदी तर निर्धन स्त्री. युथ जनरेशन त्यांच्या मागे होती. गरिबी, दारिद्य्र, नोकर्या नाहीत. अशा स्थितीत त्या तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या.तामिळनाडूमध्ये जयललिता मुख्यमंत्री झाल्या. ही हुशार, चाणाक्ष स्त्री, शिवाय भक्कम संपत्ती होती. रामचंद्रन यांची पत्नी म्हणून राहिली. खर्या आयुष्यात रामचंद्रन आणि त्यांच्या दुसर्या पत्नीमधे कमालीचा दुरावा होता मात्र जयललिता चतुर असल्यामुळे मुख्यमंत्री झाल्या.
केरळ सुशिक्षित पण त्या राज्यानेही महिलांना स्थान दिले नाही.
उत्तरेत तर गुंडा राज होते. दिवसाढवळ्या बायांना, मुलींना पळवून अत्याचार करीत असत. मग बाई कशी उंबरा ओलांडून येणार? पण हे चित्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बदलून टाकले आणि आपली हुकूमत गुंड प्रवृत्तीच्या विरुद्ध वापरली, हे सांगताना मला आनंद आहे कारण राजकारणात मतमतांतरे असतात पण मी समाजकारण करते. या अवाढव्य प्रदेशात मायावतीनंतर मुख्यमंत्री नाहीच. पंजाबमध्ये स्त्रिया मोठे शेतीचे काम करतात. व्यवस्थापन करतात. खरे तर निगुतीने घर चालवू शकतात तर मग राज्य चालवणार नाहीत का? त्या चांगले ई गव्हर्नन्स देऊ शकतात अशी स्त्रियांची कामगिरी आहे पण पंजाब अजूनही ‘उडता पंजाब’मध्येच अडकला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हा स्त्रियांवर खूप उपकार आहेत पण बाबा तुम्ही आणखी एक कायदा करायला हवा होता. तुम्ही घटनेतच स्त्रीचे मुख्यमंत्री पदावर आरक्षण ठेवले असते तर कदाचित या पुरोगामी म्हणविणार्या महाराष्ट्राने महिलेला मुख्यमंत्री केले असते पण तसे झाले नाही. ‘भविष्यात कोणी महिला मुख्यमंत्री होऊ शकेल का?’ असे मला विचारले तर तसे वाटत नाही. बळेबळे मी कोणाला प्रमोट करु इच्छित नाही. या प्रश्नाचे उत्तर उद्याचा काळच देऊ शकेल आणि काळाच्या उदरात काय लपले आहे, ते मात्र सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी 33%आरक्षण दिलं म्हणून स्त्रिया राजकारणात संख्येनं वाढल्या. पैसा आणि पाशवी बळ हे दोन ‘पी’ आणि पुरुषी मानसिकता यामुळे या महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत आमची एकही आमदार पोहचू शकलेली नाही, हेच खरे आहे.
– सूर्यकांता पाटील
माजी केंद्रीय राज्यमंत्री
(शब्दांकन : आशा पैठणे)
मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी २०२४