kids stories in marathi, balkatha, children stories

विचित्र कोडे : बालकथा

Share this post on:
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी-पक्षी राहत होते. जंगल बाराही महिने हिरवंगार असे. भरपूर पाऊस आणि भरपूर सूर्यप्रकाश. यामुळे गवतावर उपजीविका करणार्‍या प्राण्यांची संख्या खूप होती. ससे, हरीण, हत्ती, जिराफ… किती म्हणून नावं सांगू? जंगलातील नद्या बारमाही वाहत असत. त्याच्या काठानी बगळे, बेडूक, कासव, घार, चिमणी, कावळे यांनी आपली वस्ती केली होती. लांडगे, तरस, वाघ, सिंह, कोल्हे असे हिंस्त्र प्राणीही राहत होते. थोडक्यात काय तर जंगलात पशू-पक्षी यांची रेलचेल होती. फळे, पाणी, गवत यांची सुबत्ता होती. जंगलात मंद वारा नेहमी वाहत असे. म्हणून या जंगलाला झुळझुळ वन म्हणून ओळखलं जाई. सिंह महाराज स्वतः जंगलचा फेरफटका करून जंगलावर लक्ष ठेवत असत. सारे प्राणी, पक्षी गुण्यागोविंदाने तिथे राहत होते.
पण काय झालं कुणास ठाऊक! या शांत वनात प्राणी बिथरले. त्यांच्यात भांडणे, मारामार्‍या सुरु झाल्या. पक्षी पण भडकले. झुळझुळ वनातलं वातावरण बिघडलं. सिंह महाराज काळजीत पडले. त्यांनी तातडीने त्यांच्या विश्वासातील प्राण्यांना आणि पक्ष्यांना सभेसाठी आमंत्रित केलं.
वाघ, हत्ती, अस्वल, ससा, पोपट, घुबड, बगळेबुवा, खारुताई सारे जमले. सिंह महाराजांनी जंगलाची खरी परिस्थिती सर्वांसमोर सांगितली आणि चर्चेला सुरुवात झाली. हत्तीने प्रस्ताव मांडला. ‘जंगलाचा कायदा मोडणार्‍या पशू-पक्ष्यांना कडक शिक्षा करूया.’ अस्वल म्हणाले की, ‘जंगलातील गस्त वाढवायला हवी.’ भित्रा ससूल्या म्हणाला, ‘कायद्यापेक्षा युक्तीने, प्रेमाने ही समस्या सोडवावी.’ पोपट म्हणाला की, ‘महाराज माणसांच्या राज्यात अशा समस्येला वेगळं वळण देऊन हाताळतात. लोकाचं लक्ष दुसर्‍याच विषयाकडे वळवून दुसरीच समस्या पुढे आणतात.’
वाघोबा आणि सिंह महाराजांना ही युक्ती आवडली पण जंगलवासियांचं लक्ष कुठे वळवायचं यावर विचार-विनिमय सुरु झाला. खारुताईची कल्पना सर्वांना आवडली. कल्पना अशी होती की, एक विचित्र आणि अवघड कोडं त्यांना घालायचं. जो सोडविल त्याला मोठ्ठं बक्षीस द्यायचं.
सगळ्यांनी बसून, विचार विनिमय करून एक भन्नाट, गंमतीशीर कोडे तयार केले.कोडं असं होतं की, स्पर्धकानं अर्धा लिटर पाणी आणायचं. स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना एक चाळणी दिली जाईल. पाणी चाळणीत ओतून पंचवीस पावलं स्पर्धकानं धावत जायचं. सीमारेषेपर्यंत पोहोचल्यावर चाळणीत निम्मं तरी पाणी राहिलं पाहिजे. पाण्याव्यतिरिक्त स्पर्धकानं काही आणायचं नाही. स्पर्धेत जिंकणार्‍या प्राण्याला, पक्ष्याला एक लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. यासाठी स्पर्धकाला विज्ञानाची मदत घेता येईल.
अजब कोड्याची ही स्पर्धा ऐकून प्राणी विचारात पडले. चाळणीत पाणी टिकणार कसं? सगळेच युक्त्या शोधू लागले. स्पर्धा आठ दिवसांनी होती. सगळे विचारात गढून गेल्यामुळे जंगल शांत होते. स्पर्धेचा दिवस उजाडला. 30 स्पर्धकांनी भाग घेतला होता. 29 स्पर्धक हरले पण ट्रिंकू कोल्हा मात्र विजयी ठरला… पडलात ना विचारात? चाळणीत पाणी राहिलंच कसं? त्याच्याच तोंडून ऐका.
kids stories in marathi, balkatha, children stories
महाराजांच्या हुकूमावरून ट्रिंकू आपली युक्ती सांगण्यासाठी उभा राहिला. सगळे कान देऊन ऐकू लागले. ट्रिंकू म्हणाला,  ‘‘स्पर्धेसाठी हे अजब कोडं ऐकून मी चकरावून गेलो. खूप विचार केला पण काही सुचेना. मग मी स्पर्धेची सूचना नीट वाचली… ‘विज्ञानाची मदत घेता येईल’ याच वाक्यात गोम असावी असं मला वाटलं. पाण्याची रूपं मी शोधू लागलो. पाणी हा द्रव पदार्थ आहे. तो पातळ आहे. चाळणीतून तो खाली पडायला नको असेल तर त्याचं दुसरं रूप पाहणं महत्त्वाचं होतं. पाण्याचं बाष्प रूप, ज्याला आपण वाफ म्हणतो ते पण उपयोगाचं नव्हतं असं माझ्या लक्षात आलं… आणि मी पाण्याच्या घन रुपाकडं वळलो. बर्फ हेच ते रूप! मग लक्षात आलं की, पाण्याचं हे रूप चाळणीतून खाली पडणार नाही!! आणि फ्रीजमध्ये अर्धा लिटर पाण्याचा मी बर्फ बनवला आणि अशा तर्‍हेने स्पर्धा जिंकली.’’
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बक्षीस समारंभ आणि जंगी सत्कारानंतर कार्यक्रम संपला.- गोविंद गोडबोले9822350549

मासिक ‘लाडोबा’ दिवाळी अंक २०२४
https://shop.chaprak.com/product/ladoba-diwali-2024/

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!