‘सिटी ऑफ लव्ह’ म्हणून जगभरात आपली ओळख निर्माण करणार्या पॅरिसमध्ये प्रेमाचा… एकतेचा संदेश देत ऑलिम्पिकचा सोहळा संपन्न झाला. पॅरिसमधील समारोप सोहळ्यातून बाहेर पडताना हजारो आशा-आकांक्षांना हृदयात सामावून मी निघत होतो. पत्रकार म्हणून पॅरिस हे माझे सहावे ऑलिम्पिक. प्रत्येक ऑलिम्पिकच्या काही खास आठवणी आहेत पण हे ऑलिम्पिक लक्षात राहीले ते अश्रुंच्या परिस्पर्शाने… पॅरिसमधिल या अश्रुंचा ओलावा आपल्यापर्यंत पोहचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न…
वैसे तो इक आसूं ही बहाकर मुझे ले जाये
एसे कोई तूफान हिला भी नही सकता…
वसीम बरेलींचा हा शेर पॅरिस ऑलिम्पिकमधील रोलँड गॅरोसमध्ये अक्षरशः जगलो. टाय ब्रेकवर सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने स्पेनच्या कार्लोस अल्कारेझविरुद्ध विजयी गुण वसूल केला आणि लाल मातीवर अश्रुंचा महापूर आला. एरव्ही कणखर वाटणारा 37 वर्षीय जोकोव्हिच लहान मुलासारखा ढसाढसा रडला. जिंकणारा जोकोव्हिच रडला अन् हरणारा कार्लोसही रडला आणि या दोघांचे अश्रू पाहून रोलँड गारोसवर उपस्थित प्रत्येक टेनिसप्रेमींच्या डोळ्यात अश्रू दाटले. या अश्रुंत विजय-पराजयाचा भेदभाव नव्हता… होता तो एका ऐतिहासिक क्षणांचा हुंकार…
ऑलिम्पिकच्या इतिहासात पुरुष एकेरीचे गोल्ड मेडल जिंकणारा जोकोव्हिच सर्वाधिक वयस्क खेळाडू ठऱलाय. त्याने सर्वाधिक कमी वयात ऑलिम्पिकची फायनल गाठणार्या स्पेनच्या कार्लोसचा 6-7.6-7 असा पराभव केला. ऑलिम्पिक मेडलसाठी त्याने जंग जंग पछाडले होते. 24 ग्रण्डस्लॅम जिंकूनही ऑलिम्पक गोल्ड मेडलने त्याला आजवर हुलकावणी दिली होती.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जोकोव्हिचला ऑलिम्पिकच्या ब्राँझ मेडलवर समाधान मानावे लागले होते. स्पेनच्या राफेल नडालने सेमीफायनलमध्ये जोकोव्हिचचा पराभव केला होता आणि नंतर चिलीच्या फर्नांडो गोन्झालोझला पराभूत करीत गोल्ड मेडल जिंकले होते. नियतीने पॅरिसमध्ये एक वर्तुळ पूर्ण केले. नडालचा वसा सांगणार्या स्पेनच्याच कार्लोसचा पराभव करीत जोकोव्हिचने अखेर ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल जिंकले.
या मॅचच्या अवघ्या 21 दिवसापूर्वी याच जोकोव्हिचला पराभूत करीत विम्ब्लडनचे विजेतेपद कार्लोसने जिंकले होते. विम्बल्डनच्या फायनलचा रिमेक म्हणून या पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलकडे पाहिले जात होते. कार्लोस तुफान फार्ममध्ये होता. टेनिमधील अनुभव विरुद्ध सळसळते तारुण्य असा तुफानी मुकाबला होता. अनुभवाने तारुण्यावर मात केली असे मी म्हणणार नाही तर त्या तारुण्याला दीपस्तंभासारखे पुढील वाटचालीसाठी जोकोव्हिचने आदर्श घालून दिला. पॅरिसमधील रोलँड गारोसवरील तांबड्या मातीवर जोकोव्हिचने ढाळलेल्या प्रत्येक अश्रुतून टेनिसमधील नव्या कळ्या फुलतील आणि बहरतील…
अवघे अश्रू एक जाहले…
आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या शुटींग रेंजवर दीडशे कोटी भारतीयांनी असाच ऐतिहासिक क्षण अनुभवला. पॅरिसची परी मनू बाकरने स्वप्नवत कामगिरी करीत ऑलिम्पिकचे ब्राँझ मेडल जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे आजवरचे ते पहिले मेडल ठरले. मेडल जिंकल्यानंतर अभिमानाचे, आनंदाचे अश्रू पुसण्यासाठी मनू भाकरने जेव्हा हात पापण्याजवळ नेले तेव्हा अवघ्या भारतीयांचे अश्रू त्यात मिसळले होते. अवघे अश्रू एक जाहले होते…
मला आठवतेय तब्बल 24 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या अंजली भागवतने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये शुटींगची फायनल गाठत तमाम भारतीयांना ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न दाखविले होते. त्यानंतर 20 वर्षापूर्वी सुमा शिरुरने ऑलिम्पिकमध्ये महिला शुटींगमध्ये शेवटची फायनल गाठली होती. गेली 20 वर्षे भारतीय महिला शुटर्सने पाहिलेले स्वप्न आज अखेर मनू बाकरने पूर्ण केले. अंजली भागवत, सुमा शिरुर आणि दीपाली देशपांडे या त्रयींनी रचलेल्या पायावर मनू बाकरने कळस बांधला.
मनू बाकरचे रौप्यपदक अवघ्या 0.01 फरकाने हुकले पण मेडल जिंकून तिने इतिहास घडविला. मनू बाकरला मी सगळ्यात आधी टोकीयो ऑलिम्पिकला पाहिले होते. 18 वर्षे सरलेली एक अल्लड मुलगी तिच्यात दडली होती पण पॅरिसमध्ये मनू भाकरचे प्रगल्भ रुप पाहायला मिळाले. मोक्याच्या क्षणी दडपण झुगारण्याचे तिचे कौशल्य वादातीत आहे. अर्थात तिच्या या यशात जसपाल राणाचे योगदान खूप मोठे आहे. गंमत पाहा, नेमबाजीत भारताला पहिली ओळख करून दिली ती जसपाल राणाने. त्याने वयाच्या 18 व्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड करीत 25 मीटर पिस्तुल प्रकारात गोल्ड मेडल जिंकले होते पण त्याच्या दुर्दैवाने त्यावेळी पिस्तुल प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला नव्हता. त्याने एशियन गेम्स, राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धेत पदकांची लयलूट केली पण ऑलिम्पिक मेडल काही तो जिंकू शकला नाही. आज तो कोच असणार्या भारताच्या महिला खेळाडूने भारतासाठी ऑलिम्पिकचे पहिले-वहिले मेडल जिंकत गुरुला अनोखी दक्षिणा दिली. जसपाल तसा स्पष्टवक्ता आणि करारी आहे पण या ऐतिहासिक मेडलचे आनंदाश्रू पापण्याआड दडवण्यात तो कमी पडला हेच खरे. त्याच्या आजवरच्या संघर्षाचे यापेक्षा उत्तम फलित असूच शकत नाही. मनू बाकरनेही आपल्या विजयाचे श्रेय आपले गुरु जसपाल राणा आणि भगवतगीतेला दिले आहे. कृष्णाने अर्जुनाला दिलेला ‘कर्म कर, फळाची अपेक्षा बाळगू नकोस’ हा संदेश तिने स्वतः आचरणात आणलाय. वेळ मिळेल तसे ती गीता वाचते आणि हो आम्हा पत्रकारांनाही तिने गीता वाचण्याचा सल्ला दिलाय. इतकेच नव्हे तर ऑलिम्पिकची तयारी करताना तिने स्वतःवर एक बंधन घालून घेतले होते की, जेवढे पॉईंट विजयासाठी ज्या देशात कमी पडतील तेवढी रक्कम त्या-त्या देशातील चलनात विविध आश्रमांना आणि गोशाळेला दान करायची. या दान पुण्यातून ती स्वतःला कणखर बनवत गेली आणि आज तिने ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली. चंद्रावर निल आर्मस्ट्राँगनंतर अनेक जणांनी चढाई केली पण लक्षात राहिला तो पहिल्यांदा चढाई करणारा नील आर्मस्ट्राँग. तसेच यापुढे महिलांच्या नेमबाजीत ऑलिम्पिकमध्ये अनेक जण मेडल जिंकतील पण ऑलिम्पिकचे पहिले मेडल जिंकणारी मनू भाकर हा किताब तिच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही.
मनू, आम्ही सारेजण तुझे आभारी आहोत. हा एतिहासिक क्षण आम्हास अनुभवायला दिलास आणि माझ्यासाठी तर खासच आहे कारण माझे हे सहावे ऑलिम्पिक आहे आणि भारताने आजवर जिंकलेल्या शुटींगमधिल सर्वच्या सर्व पाच मेडलचा साक्षीदार असणारा मी एकमेव पत्रकार ठरलोय.
अधुरी एक कहाणी…
एकोणतीस वर्षांच्या क्रीडा कारकिर्दीत अनेक संस्मरणीय प्रसंगाचे वार्तांकन केले. विजय-पराजयाच्या अश्रुने ओलेचिंब भिजलेले लेख लिहिले… पण अर्ध्यावर मोडलेल्या डावाची ही अधुरी कहाणी लिहायला मनच धजावत नाही… या कहाणीची सुरुवात कुठून करायची… आणि शेवट कसा करायचा… महिना लोटलाय या घटनेला तरी आजही ते क्षण आठवले की मन सुन्न होते. माझी जर ही अवस्था असेल तर ज्या विनेश फोगटचा ऑलिम्पिक फायनलचा डाव विस्कटला तिच्या मनाची स्थिती काय झाली असले? जेव्हा तुमचे अवघे आकाश तुमच्याकडून हिरावून घेतले जाते तेव्हा या धरणीने पोटात सामावून घ्यावे अशी भावना मनात येत नसेल का?
पॅरिसमधील त्या दिवशीचा सूर्य मावळला तोच मुळी भारताच्या कुस्तीला ऐतिहासिक पहाट देण्याचे वचन देऊन. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिच्या 50 किलो वजनी गटाची फायनल गाठत मेडल नक्की केले होते. दुसर्या दिवशी सकाळी फक्त सहा मिनिटांचा खेळ होता आणि भारताचे पहिले-वहिले कुस्तीतील ऐतिहासिक गोल्ड मेडल नक्की होते! पण नियती किती क्रूर असावी? त्याच रात्री तिचे निर्धारित अशा 50 किलो वजनापेक्षा दीड किलो वजन जास्त भरले. अख्खी रात्र तिने व्यायाम – सायकलिंगपासून अगदी केस कापण्यापर्यंत जे जे शक्य होते ते सारे काही केले पण तरीही वजन जास्त भरलेच. परिणामी तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले. तिने ज्या क्युबाच्या खेळाडूला सेमीफायनलला हरवले होते तिला फायनलला पुढे चाल देण्यात आली आणि भारताचे एक हक्काचे मेडल मिळता मिळता राहिले.
विनेश फोगट रिओ आणि टोकीयो ऑलिम्पिकमध्येही खेळली होती. मी रिओला जेव्हा होतो त्यावेळी अचानक तिच्या दुखापतीची बातमी आली आणि तिला माघार घ्यावी लागली. टोकीयोत तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आणि यंदा सेमीफायनलला जाऊनही रिकाम्या हाताने तिला परतावे लागले.
विनेशला मी पहिल्यांदा पाहिले ते दक्षिण कोरियातील इंचेनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत. 48 किलो वजनी गटात तिने भारताला ब्राँझ मेडल जिंकून दिले होते. त्याचवेळी तिच्यातील चुणूक दिसून आली होती. त्यानंतर तिने 53 किलो वजनी गटात राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल जिंकून दिले होते. एक ऑलिम्पिक सोडले तर जवळपास तिच्याकडे प्रत्येक स्पर्धेतील मेडल होते. पॅरिसमध्ये स्वप्न साकार होता होता ते तुटले. डाव अर्ध्यावरती मोडला आणि ऑलिम्पिकची कहाणी अधुरीच राहिली.
तिच्या वजनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कुणाची? सपोर्ट स्टाफने इमाने इतबारे काम केले का? प्रश्न अनेक आहेत. त्याची उत्तरे मिळतीलही कदाचित पण मिळणार नाही तो विजयाचा क्षण, ज्यासाठी हा देश आसुसलेला आहे…
जोकोव्हिच, मनू बाकर आणि विनेश फोगट… या तिन्ही खेळाडूंच्या संघर्षाची कथा रोमांचित करणारी आहे. पॅरिसमध्ये ऐतिहासिक सेन नदीवर एक ब्रिज आहे. ‘लव्ह लॉक ब्रिज’ असे त्याचे नाव. जगभरातून आलेले प्रेमी या ब्रिजवर आपल्या प्रेमाला स्मरण करून त्या ब्रिजवर टाळं ठोकायचे आणि त्या टाळ्याची चावी सेन नदीत फेकून द्यायचे. आपली प्रेयसी अथवा ज्यावर तुमचे अतीव प्रेम आहे त्याला स्मरून हे टाळे ठोकले जायचे. असे केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात अशी येथे भावना आहे. लक्षात घ्या, तब्बल पाच कोटी प्रवासी दरवर्षी जगभरातून पॅरिसमध्ये दाखल होतात. त्यांच्या प्रेमाचे टाळेरुपी ओझे सहन करून या ब्रिजचा काही भाग कोसळला आणि सरतेशेवटी प्रशासनाने ही प्रेमाची परंपरा खंडित करत ब्रिजवरून टाळे हटवले. यंदा ऑलिम्पिकच्या निमित्ताने या ब्रिजवर मलाही एक टाळे ठोकायचे होते. टाळे ठोकता आले नाही पण मर्मबंधातील आठवणींच्या कप्प्यात हे अश्रू कायमचे बंदिस्त झालेत.
– संदीप चव्हाण
अध्यक्ष, मुंंबई मराठी पत्रकार संघ
मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२४