marathi katha

आगंतुक : हृदयस्पर्शी कथा

Share this post on:
शिरीष आपटे. साहित्य क्षेत्रातील खूप मोठं नाव होतं. मराठी प्रकाशनाबरोबरच त्यांनी इंटरनेटच्या माध्यमाद्वारे जगात स्वत:च्या प्रकाशनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला होता. साहित्याशिवाय माणसाचे जीवन निरर्थक असे त्यांना वाटायचे. मराठी साहित्य जपण्याचे त्यांनी जणू व्रत घेतले होते. लेखनात तसेच प्रकाशन क्षेत्रात अनेक पारितोषिकं मिळवली होती. अनेक भाषेतील अनुवादित साहित्य त्यांनी प्रकाशित केलं होतं.
नेहमीप्रमाणे ते आपल्या कार्यालयात बसले होते. त्यांनी देसाईंना इंटरकॉम केला.
‘‘देसाई, कॅबिनमध्ये या.’’ काही सेकंदात देसाई आत आले. त्यांनी खूणेनेच त्यांना बसायला सांगितले.
‘‘देसाई, आज भेटायला कोण येणार आहे का?’’
‘‘हो सर… तो पण आला आहे. बसलाय निवांतपणे!’’
‘‘ हं… आज परत आलाय तर… कोण आहे कोणास ठाऊक? तो म्हणतो, मी त्याला भेटायला बोलावलं आहे पण माझं मलाच कळत नाही याला कधी मी हो सांगितले?’’ आपटे विचारात पडले.
‘‘ सर… एकदा भेटूनच घ्या ना! गेल्या तीन महिन्यातून दहावेळा आला असेल. पिशवीतून काहीतरी कागद काढतो. त्यावर काहीतरी लिहितो, वाचतो आणि ठेवून देतो. बस्स! एवढंच त्याचं कार्य मी पाहतो आहे.’’
‘‘देसाई, तुम्ही त्याची कादंबरी वाचली आहे ना! कशी वाटली?’’
‘‘ खरं सांगू सर! त्याच्या कांदबरीचा काही भाग माझ्या डोक्यावरुनच गेला आहे. तो काय सांगू पाहतोय तेच कळत नाही.’’
‘‘ देसाई, किती वेळा सांगितलं, सगळ्या लेखकांच्या लेखनाचा आदर करावा. लेखक आपल्याला आवडेल-भावेल तसं नाही लिहू शकत. एखादा लेखक प्रवाहाच्या विरुद्ध लिहिण्याचे धाडस करतोच. त्याला वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे आपले कार्य आहे. आपण वाचकांच्या आवडीचं साहित्य प्रकाशित करतो कारण तो आपला व्यवसाय आहे. तरीदेखील वर्षातून आपण अशा धडाडीच्या साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करतोच ना! तेथे व्यवसाय नसतो करायचा. साहित्याचं जतन करायचं असतं. वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमांतून… कांदबरीकार, कथाकार, नाटककार यांची लिहिण्याची शैली वेगळी असली तरी देखील ती तपस्याच आहे. देसाई, ते लिहिणं म्हणजे… मनातलं…  डोक्यातलं उतरवून काढून त्याला लिखितरुप देणंच असतं. मनात तर ते कधीच आकारलेलं असतं. एका क्रमवारीत सर्व ठरलेलं असतं. ह्या मागे काही तासांचं, दिवसांचं चिंतन, मनन असतं. आलं मनात की कागदावर उतरवून नाही ठेवता येत. मी कादंबरी चाळतो आज… पण असं करा, तुम्ही कादंबरी पुन्हा एकदा वाचा. आजचा माझा काय कार्यक्रम आहे?’’
‘‘सर, आज तुम्हाला दुपारी चार ते पाचमध्ये कर्नाटकाचे लेखक गणेशन भेटायला येणार आहेत. तो पर्यंत काहीच काम नाही…’’
‘‘एक मिनिटं… म्हणजे मी चारपर्यंत मोकळा आहे. तर चला, आज त्याला भेटूनच घेतो. पाहू तर खरं कोण आहे ते! काय?’’
‘‘मी पण हेच म्हणत होतो. एकदा भेटून तर घ्या.’’
‘‘ठीक आहे. पाठवून द्या त्याला! आणि हो अर्धा तास फक्त. तसं त्याला ठामपणे सांगून ठेवा.’’
‘‘बरं बरं… सर…’’ हसत हसत देसाई कॅबिनच्या बाहेर आले. त्यांनी पाहिलं तर तो हातात वही घेऊन बसला होता.
‘‘ओ महाशय, साहेबांनी बोलावलं आहे.’’
खरं तरं देसाईना त्याचा खूप राग आला होता. तो गेल्या तीन महिन्यांपासून येत असे. तो आला की नुसता बसून राहायचा. ‘साहेबांना वेळ नाही’ सांगितले तर म्हणायचा, ‘‘काही हरकत नाही. माझ्याकडे भरपूर वेळ आहे. त्यांना वेळ मिळाला की सांगा मला भेटायचं आहे. माझ्या कादंबरीच्या बाबतीत चर्चा करायची आहे. तसं त्यांनी मला कबुल देखील केलं आहे.’’
देसाईंच्या सांगण्यावर तो भानावर आला. थोडसे विस्कटलेले केस हातानानेच सारखे करत तो उठला. ‘‘अखेर माझा नंबर लागला तर… खर्‍याची दुनिया आहे अजून शाबूत…’’ असे काहीतरी पुटपुटत तो कॅबिनच्या दाराजवळ येऊन ऊभा राहिला. दारावर टक्टक् करणार तेवढ्यात त्याचे लक्ष नावाच्या पाटीवर गेले. ‘शिरीष आपटे’. त्याचे दडपण वाढले. त्याने हळूच दार उघडले तसा आतून धार धार आवाज आला, ‘‘या… या… तुमचीच वाट पाहत आहे.’’
तो आत आला. कॅबिनमधे त्याला प्रसन्न वाटते. पूर्ण कॅबिनमधे प्रकाशित पुस्तकांची एका विशिष्ट शैलीत मांडणी केली होती. नामांकित साहित्यिक, प्रकाशक ‘शिरीष आपटे’यांना भेटण्याचं त्याचं स्वप्न साकार होत होतं. तो गोंधळून तसाच उभा राहिला.
‘‘बसा’’ आपट्यांनी खूणेनच त्याला बसायला सांगितलं.
‘‘सर… कांदबरीच्या बाबतीत…’’ त्याचं वाक्य तोडत आपटे म्हणाले, ‘‘बसा, बसा… काय लेखक का?’’ आपटे खुर्चीत जरा रिलॅक्स होत म्हणाले.
‘‘ होय. म्हणजे मी लेखक आहेच.’’
‘‘ कसं आहे… लेखक महाशय, कुणीही उठून स्वत:ला लेखक म्हणवून घेऊ शकतो कारण आपल्याकडे लेखक होण्यासाठी कोणातीही परीक्षा नाही. पदवी पण नाही! पण  खेटे मारुन काय मिळाले हो तुम्हाला?’’ आपटे जरा कुचकं बोलले पण त्याचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांच्याशी आपण बोलतोय हेच भाग्य आहे म्हणून तो आपट्यांकडे फक्त पाहत होता.
‘‘लेखक महाशय, कादंबरी हा प्रकार फार मोठा आहे. एखादी चळवळ चालवावी तसा. तुम्ही माझ्याकडे किती वेळा येता त्यावर कादंबरीवर काय परिणाम होणार? तिला काही फरक पडणार आहे का?’’
तो पुन्हा मख्खासारखा आपट्यांच्या बोलण्यात गुंतलेला.
‘‘अहो, लेखक महाशय… तुमच्या कादंबरी लिहिण्यामागचा हेतू विचारतोय… असे पाहत काय बसलात?’’
त्याने एक दीर्घ श्वास घेतला. खोलीत सर्व ठिकाणी नजर फिरवली आणि म्हणाला… ‘‘सर… आयुष्य म्हणजे काय हो? माझ्या लेखी आयुष्य म्हणजेही एकदम निरर्थक, एक प्रचंड आणि दीर्घ वाटणारा कंटाळा आहे. तरी देखील कोणीही मान्य करीत नाही. अनादी कालापासून हे चालत आलं आहे. आपल्याला म्हणूनच आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि आनंदातच आयुष्य जगायला हवं… मला माझ्या कादंबरीत हेच म्हणायचं आहे.’’
त्याच्या बोलण्याने आपटे एकदम चमकले. त्याच्याकडे पाहत राहिले.
‘‘सर… तुम्हाला पण माहीत आहे की, कोणीतरी आपल्याला ढकललं आहे या पृथ्वीतलावर… आजवरच्या जशा पिढ्या जगल्या तशा आपल्या पिढ्यांनी कुढत कुढत आयुष्य जगायचं आणि पुन्हा एकदा… चार खांद्यावर स्मशानात जायचं. जळायचं. राख होऊन एखाद्या नदीच्या डोहात विलीन व्हायचं. आपले कोणी दिवस केलेच तर… दहाव्या दिवशी पिंडाला शिवण्यासाठी यायचं… आणि पुन्हा एकदा या जन्मात राहिलेल्या इच्छा, आकांक्षांसाठी पुन्हा गर्भ शोधण्यात काही दिवस व्यतित करायचं. कधी कधी असह्य होतंय हल्ली… तुम्हाला भेटायला यायचो तर देसाई म्हणायचे, सरांना वेळ नाही. उशीर होईल. मी म्हणायचो, थांबतो की उशिरापर्यंत! कारण सर जो कंटाळा इथे होता ना तोच कंटाळा बाहेर देखील… मग इथंच बसत होतो. यात मला आनंदच मिळतो किंबहुना मी आनंद शोधतो. आनंद शोधला की मिळणारच!’’
आपट्यांना हे अनपेक्षित होतं आणि त्यांच्या गोंधळलेल्या चेहर्‍यावरुन हे स्पष्ट दिसत होतं. हा काहीसा बावळट, विचित्र दिसणारा माणूस असा काही विषय काढेल हे त्यांना अपेक्षितच नव्हतं. तो आता काय बोलू शकतो हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्यांच्या दृष्टीनं हा माणूस वेगळा नि कलंदर होता. त्याची गंमत करण्याच्या मूडमधे ते त्याला प्रश्न विचारुन बसले, ‘‘तुम्ही काय करता?’’
‘‘आयुष्याच्या कोर्‍या कॅनव्हासवर मी अनेक रंग भरण्याचा प्रयत्न करतो.’’
‘‘म्हणजे ?’’
‘‘मी ग्राफिक्स डिझायनर आहे..’’ त्याने शांतपणे उत्तर दिलं. आपट्यांच्या मनात आलं बाप रे! हा डिझायनर आहे… म्हणजे हा वल्ली पण असणारच. त्याची आणखीन फिरकी घेण्याच्या मूडमध्ये त्यांनी त्याला परत एक प्रश्न विचारला, ‘‘माझे अनेक मित्र आहेत डिझायनर… ते सर्व त्यांचे काही विचार चित्रांच्या माध्यमातून मांडतात. तुम्ही तुमचे कोणते विचार मांडता? आणि ते ब्लॅक अ‍ॅड व्हाईटमध्ये मांडता का रंगीत?’’
‘‘सर… मूळ रंग तीनच आहेत. त्यात काही टक्के इकडे तिकडे केले की वेगवेगळ्या छटा आपण निर्माण करु शकतो. मी तशा अनेक छटा निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. सर… त्या देवाने म्हणजे ज्याने आपल्याला निर्माण केले त्याने (हात आकाशाकडे दाखवत) आपल्याला एक कॅनव्हास दिला आहे. म्हणजे हे आयुष्य. त्या कॅनव्हासवर कसे रंग भरायचे हे मात्र त्याने आपल्यावर सोडलंय… आपण म्हणतो हे तर सगळं आपल्या जन्मापासून त्याने ठरवलेलं असतं. आपल्याला वाटतं हे मी केलं… ते मी केलं पण हट… काहीच आपण करत नसतो. आपण निमित्त मात्र असतो.’’
आपटे चारी मुंड्या चित झाल्यासारखे त्याच्याकडे पाहत होते. हे रसायन त्यांना भारी पडत होते. त्याचा आवाज थोडासा वाढला होताच. शेवटी तो त्याच्या कादंबरीकडे वळला.
‘‘सर, खरं सांगा माझी कादंबरी तुम्ही वाचलीत!!’’
आपटेंनी त्याच्या नजरेला नजर न भिडवता नकार दिला.
‘‘ पण देसाईंनी वाचली आहे. त्यांचा अभिप्राय आला आहे.’’ पोकळ बचाव आपटे करत होते.
‘‘सर… त्यांनी कादंबरी नाही, फक्त शब्द वाचले असतील. कारण त्यांच्या डोक्यात एक कादंबरीचा ढाचा आहे तो मी मोडला आहे. काही गोष्टी अस्तित्वातच नसतात, हे होणारच नाही, हे अशक्यच आहे, अवघडच आहे… पण अस्तित्त्वात नसणार्‍या त्या गोष्टी जेव्हा कोणी अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण मुर्खात काढतो. समाज देखील मूर्ख समजतो. तसंच माझ्या कादंबरीच्या नायकाचं आहे.’’
‘‘सर, मी माझ्या बायकोला एकदा म्हणालो होतो, आपल्यात फुललेलं निसर्गाचं नवीन नातं जपणं हल्ली जास्त महत्त्वाचं वाटतंय. माझी सेल्फी तुझ्या डोळ्यात, तुझी सेल्फी माझ्या डोळ्यात आहे. मग आणखीन काय हवे आहे आपल्याला नियतीकडून! पण सर तिला नियतीकडून काही वेगळं हवं होतं.’’
‘‘म्हणजे? आणि तुमचं लग्न झालं आहे?’’ आपट्यांनी आश्चर्याने आणि कुतूहलाने चेहर्‍यावर हावभाव दाखवत विचारलं.
‘‘झालं होतं!’’
‘‘होतं म्हणजे?’’
‘‘माझ्याशी तिनं लग्न केलं पण तिचा जीवनसाथी मी नव्हतोच. दुसरा कोणी होता. दुसर्‍याच दिवशी माझ्या लक्षात आलं. मी तिला विचारलं, तिनं कबुल केलं. मी फार विचार न करता त्याला भेटलो. त्याला बरोबर झापला. म्हणालो, ‘कोणत्या काळात जगतोस?’ पण सर आज देखील आपल्या समाजात जात, शिक्षण, वगैरे घटक लक्षात घेऊन लग्न निश्चित होतात. मुलगा-मुलगी एकमेकांना अनुरुप आहेत का नाही याचा देखील विचार केला जात नाही पण सर, मी त्या स्त्रिला न्याय मिळवून द्यायचं ठरवलं आणि लगेचच त्या पवित्र स्त्रीला मी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. कोर्टात देखील स्पष्टपणे सांगितलं, ‘कायद्याचा आदर करतो मी पण कशाला नको ते वांझोटे प्रश्न विचारत बसायचे! मी आणि तिने कशासाठी हा संसार करायचा जो कधी फुलणारच नव्हता… माझं काहीही मागणं नाही तिच्याकडे… तिने सुखी रहावं… बस्स! अन सर घटस्फोट झाला.’’
‘‘तुला दु:ख नाही झालं?’’
‘‘लग्न मोडल्याचं झालं दु:ख!! पण काही क्षणच! कारण जो देण्यात आनंद आहे तो ओरबाडण्यांत नाही… नाही नं सर…’’
‘‘हं…’’ आपटे काहीच बोलू शकत नव्हते. त्यांची बोलती बंद झाली होती.
‘‘सर… खरंतर जिच्याशी माझं लग्न झालं होतं तिला काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्याच्या कॅनव्हासवर रेखाटलेली एक कविता ऐकवली होती.
तू बोलत असताना
थांबवतो मी तुला
आपली भेटण्याची वेळ
क्षणभर तरी वाढवतो मी जरा…
काल रात्री तुझ्यावरुनच
कागदांशी मोठा वाद झाला
ते म्हणाले, तू लिहितोस
अन् ती वाचते
त्यानंतर तिच्या डोळ्यातून
येणार्‍या अश्रूंमुळे आम्ही ओलेचिंब होतो
नेहमीच आमच्यावर लिहिलेल्या
शब्दांनी तुम्ही प्रेम करता
आता तरी शिकून घ्या ना!
दोघांनी
एकमेकांचे प्रेम एकमेकांच्या
डोळ्यात वाचायला…
ही कविता ऐकवली तर ती खूप रडू लागली होती. मला वाटलं माझ्यावर तिचं अतोनात प्रेम होतं म्हणून ती रडत होती पण माझा भ्रम लग्नाच्या दुसर्‍या दिवशीच तुटला होता. सर, मला तर भाग्य नाही लाभले बायकोच्या डोळ्यातले प्रेम वाचायला. तुम्ही वाचलंय, तुमच्या बायकोच्या डोळ्यातलं प्रेम…?’’
आपटे एकदम चाट पडले. हा असा काही प्रश्न विचारेल असे त्यांना स्वप्नात पण वाटले नव्हते अन् त्यांना एकदम सुमित्रेची आठवण झाली. तीव्र आठवण.
…सुमित्रा त्यांची धर्मपत्नी. काही महिन्यांपूर्वीचे त्यांचे संवाद त्यांना आठवले.
‘‘किती बुडून जाऊन तुम्ही लेखन करता! किती वर्षांपासून पाहते आहे. आता तरी थांबा! थोडेसे माझ्याकडे पण पाहा ना! टिपणं काढणं, टाचणं तयार करणं… एकेक प्रकरणं लिहिणं… काय? तुमचं मनं रमतं हो… रमतंच ना! पण…’’
‘‘ आता हा पण कशासाठी तेही सांगून टाक ना!’’
‘‘मलाच गप्प गप्पच राहावं लागतं माझ्याच घरात. दोन्ही मुलं परदेशी. मी एकटीच. तुम्हाला कशाचा अडथळा नको म्हणून काळजी घ्यायची. माहेरी पण जाता येत नाही. मैत्रीणींकडे गेले तरीही वेळेची चौकट ही असतेच. बोलणं, हसणं, ओरडणं काहीच नाही.’’
‘‘मी कधी नाही म्हणालो तुला…’’
‘‘तसं कसं म्हणेन मी? पण या वयात आपण दोघांनी मिळून चहा घ्यावा, गप्पा माराव्यात. फिरुन यावं, कोणाकडे जाऊन यावं असं वाटतं. इतर जोडप्यांचे मी पाहते… माणूसच आहे ना मी! भावना जपता तुम्ही पण फक्त तुमच्या लेखनामध्येच. बायकोच्या भावनांचं काय? तुम्हाला कसलाच रस राहिलेला नाही. तुम्हाला तुमची पुस्तकं… पांढरे कागद, पेन, टेबल आणि तुम्ही आणि तुम्हीच… आपला प्रेमविवाह झाला आहे यावर पण माझा हल्ली विश्वास बसतच नाही.’’
काही वेळ कॅबिनमध्ये शांतता झाली. आपटे निस्तब्ध झाले होते. स्वत:मधेच हरवले होते. त्यानेच शांततेचा भंग केला.
‘‘सर, सर कोठे हरवलात?’’ त्याच्या मोठ्या आवाजाने आपटे भानावर आले.
‘‘सर, तुम्हाला पण तुमच्या आयुष्याचा कॅनव्हास आठवला का?’’ तो अचानक उठला. आपट्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. आपटे त्याच्याकडे फक्त पाहत राहिले. त्याने त्यांच्या खांद्यावर थोपटले. थोपटता थोपटता तो बोलू लागला, ‘‘सर, त्या तुमच्या आयुष्यातील कॅनव्हासमधील पुसट होत चाललेले रंग दिसत आहेत का? मग सर, असे रंग पुसट होऊ देऊ नका. ज्याच्याकडे असे रंग नसतात त्यालाच या रंगाची किंमत जास्त असते असे नाही वाटत! सर, आयुष्याचा कॅनव्हास पुन्हा रंगू शकतो. तुम्ही रंगवू शकता. माझ्या कादंबरीच्या नायकाला हेच सांगायचे आहे. तो हेच सांगू पाहतोय, सर्व मानव जातीने कशाला दु:खं जोपासत बसायची, कवटाळून बसायची! दु:ख तर येणारच आहे. सुखाच्या मागे लपलेलचं असतं नेहमी ते… पण सुखाच्या एका वार्‍याच्या झुळूकीने देखील त्या दु:खाचा नायनाट आपण करु शकतो…’’
आपट्यांना मिळालेली काही पारितोषिके, सत्कारातील काही छायाचित्रे, जी भिंतीवर फ्रेम करून लावली होती त्यातील एक शिल्ड घेत तो टेबलावर पुन्हा बसला.
‘‘सर, हे शिल्ड कसले मिळाले होते? आठवतं? तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पर्पज तर माहिती होता. मग कोठे विसरलात? तुम्हीच माझी कादंबरी समजू शकता म्हणून तर तुमच्याकडे मी पाठवली. तुम्ही एवढे मोठे महान लेखक! पण हल्ली कोठे मेला आहे तो तुमच्यातील लेखक? काटेकोरपणे लिहिणारा… शिस्त पाळणारा. गेल्या दहा वर्षांपासून तुम्ही एक पण कादंबरी लिहिली नाही. हे शिल्ड तुम्हाला मराठीतील नामांकित कादंबरीकार म्हणून मिळाले होते ना दहा वर्षापूर्वी! तो कादंबरीकार कोठे आहे सर? अहो तुमच्यासारखे कादंबरीकार जगणे आजच्या काळाची गरज आहे. कादंबरी हा साहित्यप्रकार मृत्युच्या उंबरठ्यावर आहे. तुम्हाला तर हे सर्व माहीत आहे. व्यासपीठावरुन फक्त भाषणे देण्यात उर्वरीत आयुष्य घालवणार? एवढ्या व्यवहारात गुंतलात तुम्ही? स्वत:ला पैसा पैसा करत राहिलात. संसार झाला आहे ना चार चौघासारखा! मुलं मोठी झाली, पंख फुटले, गेले उडून… जाऊ द्या न! ते त्यांच्या आयुष्याचा कॅनव्हास बरोबर घेऊन आले आहेत. तुमचं काय? त्यांचा विचार नका करु… तुम्ही तुमच्या आयुष्याचा पर्पज, कॅनव्हास विसरलात बहुतेक. उठा सर, अजून वेळ गेली नाही. माझी कादंबरी वाचा. माझा नायक हेच सगळ्यांना सांगत आहे.’’

आपटे काही बोलण्याच्या मनःस्थितीच नव्हते. ते फक्त त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. तो जे सांगत होता ते तंतोतंत बरोबर होतं. म्हणजे हा आहे तरी कोण? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उभा होता. तेवढ्यात तो म्हणाला, ‘‘सर… मी तुम्हाला यापूर्वी देखील एकदा भेटलो आहे. आठवा जरा…’’
आपटे शब्दांची जुळवाजुळव करीत कसबसे म्हणाले, ‘‘म्हणजे यापूर्वी आपण भेटलो आहोत असं म्हणणं आहे तुझं? कसं शक्य आहे? तुझं वय साधारण चाळीस, पंच्चेचाळीस… मी साठीला आलो आहे. तू आहेस तरी कोण? आणि कोठे झाली आपली भेट?’’
‘‘ सर… साधारण दहा वर्षांपूर्वी आपली भेट झाली होती. त्यानंतर तुमचं साहित्य प्रकाशित होणं बंद झालं होते. फुटकळ काही पुस्तकांच्या समीक्षा, नवोदित लेखकांच्या कथासंग्रहांना प्रस्तावना… आणि पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायामुळे तुमचं लेखन बंद झालं. तुमचं साहित्य प्रकाशित होत नव्हतं. शिरीष आपटे लेखक संपला, असे जेव्हा समाजात होऊ लागले तेव्हा मला राहावलं नाही गेलं. म्हणूनच मी निश्चय केला की तुम्हाला भेटायचं… तुम्ही माझी कादंबरी वाचली नाही. मला माहिती आहे. म्हणूनच मी स्वत: तुम्हाला भेटायला आलो. सर, तुम्ही मोठे प्रकाशक झाला आहात. तुम्हाला तर माहीत आहेच पण तरी देखील कळकळीने सांगतो, साहित्य जगात पुन्हा एकदा हा काळ मोठा कठीण आला आहे. लेखकाला मनाजोगे लिहिण्याचा अवकाश कुठे उरला आहे? लेखकांनी लिहिण्याजोग्या विषयांची यादीच करायला घेतली तर संवेदनशील याद्या खूप बनतील. खरं तर हीच परिस्थिती कादंबरीतली कल्पिकता फुलवण्यासाठी, कादंबरी फुलवण्यासाठी जास्तच जास्त पोषक असते पण मराठीत होतंय उलटचं. सामाजिक आणि राजकीय मुस्कटदाबीमध्ये चांगला लेखक मरत चाललाय. कांदबरी देखील अबोल होते आहे. सर, कादंबरी मृत्युच्या दारावर आहे. सर उठा, जागे व्हा. कादंबरीला हे वातावरण पोषक आहे. या वातावरणातच कादंबरी पूर्णपणे सक्रिय होऊ शकते. उद्या समाजात काय काय घडू शकते याचं एक दु:स्वप्न मांडू शकता जे वाचकाला हादरवून सोडणारं असू शकतं. भाबडेपणाने आणि मूर्खपणाची चांगली स्वप्नं या काळात पाहताना असं एखादं दु:स्वप्नं पाहण्याची क्षमता तरी निर्माण करण्याची गरज आहे. त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग देखील तो चांगला कादंबरीकारच दाखवू शकतो. सर कादंबरीकडे कानाडोळा करुन चालणार नाही. जर का कादंबरी आज वाचली जात नसेल, लिहिली जात नसेल तर तो फक्त आणि फक्त सामाजिक आजार समजून त्यावर उपाय शोधायलाच पाहिजे. कादंबरीशिवायच्या समाजाला काहीच अर्थ नाही. त्या भाषेला देखील अर्थ राहणार नाही. सर, तुम्ही खूप मोठे हुशार आहात. पुन्हा हातात पेन घ्या सर… एवढीच कळकळीची विनंती करायला आलो होतो. माझी कादंबरी तर फक्त एक माध्यम होते. आता मी निघतो. मी परत येणार नाही पण माझी कादंबरी तुम्ही वाचा… सर, तुमच्या पुढील आयुष्याचा कॅनव्हास तुमची वाट पाहत आहे. चलतो मी.’’
आपटे काही बोलायला जाणार त्यापूर्वीच तो निघून गेला.
आपटे काही न बोलता स्थिर नजरेने कॅबिनच्या बंद दाराकडे पाहत राहिले. एकदम त्यांना जाणवलं, कॅबिनमध्ये आपण एकटेच आहोत. मग तो कोठे गेला? ते धडपडत धडपडत उठले. कॅबिनच्या बाहेर आले. देसाईंना हाका मारल्या.
‘‘देसाई, धावत जा… पळा खाली आणि त्याला ताबडतोब बोलवून आणा…’’
‘‘सर… कोणाची गोष्ट तुम्ही करत आहात?’’
‘‘अरे, गेल्या दोन-तीन तासांपासून माझ्या कॅबिनमध्ये बसला होता तो… तुम्हीच पाठवले होते ना! त्याच्या कादंबरीच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आला होता तो… काय असे करतात देसाई?’’
‘‘सर… सर… काहीतरी गडबड आहे!’’
कार्यालयातील बाकीची मंडळी जमा झाली होती. जो-तो आपट्यांकडे विचित्र नजरेनं पाहत होता. आपट्यांना काय झालं हे कोणालाच कळत नव्हतं.
‘‘देसाई, तुम्हाला काय म्हणायचं आहे?’’
‘‘सर… सकाळापासून तुमच्या कॅबिनमध्ये कोणालाही मी पाठवलेलं नाही. सर तुम्हाला श्वास लागतो आहे. चला कॅबिनमध्ये चला पाहू…’’
‘‘हं… म्हणजे?’’ आपटे विस्फारलेल्या चेहर्‍याने… काहीच कळत नसल्यासारखे… भांबावलेल्या अवस्थेत खुर्चीत बसले. देसाईंनी त्यांना पाणी दिलं. त्यांनी एकाच घोटात ते पाणी संपवलं. पंखा वेगाने वारा सोडत होता. तरी त्यांना घाम आला होता.
‘‘ सर… नक्की काय झालं आहे?’’
‘‘अरे तो… काय त्याचं नाव! त्याच्या या कादंबरीच्या बाबतीत विचारायला आला होता ना! तुम्ही देखील त्याची कादंबरी वाचलीत. थांबा त्याला फोन लावा… त्याचा ह्या कादंबरीच्या शेवटी नंबर लिहिला आहे…’’ आपटेंनी तो नंबर दाखवला तर देसाई हसत हसत म्हणाले, ‘‘सर, काय हे… अहो, हा नंबर तर तुमचाच आहे आणि ही फाईल म्हणाल तर गेल्या आठवड्यात वरच्या माळ्यावरून काही अडगळ काढली होती त्यात ही फाईल मिळाली. ती तुमचीच हस्तलिखित आहे. तुम्ही विसरला होतात बहुतेक म्हणून तर काल संध्याकाळी मी घरी जायच्या आधी तुमच्या टेबलवर ठेवून घरी गेलो होतो. सर आणखीन एक, या फाईलवर आजची तारीख आहे पण वर्ष मात्र दहा वर्षापूर्वीचं… सर तुम्ही तुमचे लेखन झाल्यावर शेवटी तारीख लिहिता तसेच या कादंबरीच्या शेवटी लिहिलेलं आढळतंय… चमत्कारच म्हणता येईल नं सर. दहा वर्षानंतर त्याच तारखेला ही फाईल तुमच्या हातात आली… काही तरी दैवी संकेत असावा. सर तुम्ही आता शांत व्हा. मी चहा घेऊन येतो.’’
देसाई कॅबिनच्या बाहेर निघून गेले.
अन् आपटे हतबल होऊन खुर्चीत बसून राहिले. आपल्या खुर्चीत बसून पंख्याच्या वार्‍याने फडफडणार्‍या आपल्याच दहा वर्षापूवी लिहिलेल्या कादंबरीच्या कागदांकडे एकटक पाहत राहिले. किती तरी वेळ… काही सेकंदानंतर खिशातील पेन हातात घेतला आणि तेव्हाच डोळ्यातून येणारे अश्रू त्यावर पडले.
आपटे स्वत:ला सावरु शकत नव्हते. ते खूप वर्षानंतर मोकळे होते हे मात्र खरं होतं…

– अनिल लक्ष्मण राव, बडोदा.
97144 07436
मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी २०२४
‘साहित्य चपराक’ मासिकाचा सभासद होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!