महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आले आणि आपण चक्रव्यूह भेदून बाहेर आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महायुतीच्या नेत्यांसाठी, समर्थकांसाठी ही खरी दिवाळी आहे. आघाडीचे नेते या धक्क्यातून सावरायला किती काळ घेतील हे सांगता येणार नाही. राज ठाकरे यांच्या भाषेत केवळ एका शब्दात सांगायचे तर त्यांच्यासाठी हे केवळ ‘अनाकलनीय’ आहे.
लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर महायुतीने जोरदार आत्मपरीक्षण केले होते. त्या चिंतनातून त्यांनी त्यांच्या काही चुका सुधारल्या आणि त्याचे कल्पिताहून अद्भूत असे फळही त्यांना मिळाले. 105 जागा जिंकूनही उपेक्षा वाट्याला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ची घोषणा दिली होती. पुढच्या पंचवार्षिकला मी पुन्हा येईन, असे त्यांना सांगायचे असावे हे यातून सिद्ध होते.
शरद पवार यांनी या वयातही केलेला झंजावाती प्रचार, उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती सभा, नाना पटोले यांनी पिंजून काढलेला महाराष्ट्र हे सगळे पाहता युती किंवा आघाडी कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असाच अनेकांचा कयास होता. या सगळ्यात जो तो इतरांना गृहित धरत होता. हे गृहित धरणे अंगलट आल्याने महाआघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत वाटलेल्या पैशांचा पूर, इव्हीएम अशी काही कारणे सांगून या निकालावर असामाधान व्यक्त करावे लागत असले तरी हा जिव्हारी लागणारा पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारून पुढे जाणे आणि 2029 च्या विधानसभेची तयारी करणे एवढेच आता त्यांच्या हातात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत आपलीच खरी शिवसेना हे सातत्याने सांगितले होते. या निकालानंतर हीच बाळासाहेबांची सेना असे अनेकांना वाटत आहे. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर प्रचार केला त्यांच्यासोबत अभद्र मार्गाने जाणे योग्य वाटत नाही, असे सांगत त्यांनी आपली वेगळी चूल थाटली होती. जवळची माणसे सोडून जात असतील तर ती का जात आहेत, त्यांना थांबवण्यासाठी काय करता येईल याचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांना मिंधे आणि गद्दार ठरवल्याने मूळचा शिवसैनिक दुखावला गेला होता. त्याचा स्वाभिमान दुखावला गेल्याने तो आणखी त्वेषाने कामाला लागला होता. त्यात आनंद दीघे यांच्यावरील ‘धर्मवीर’सारख्या चित्रपटांनी तर एकनाथ शिंदे आणि महायुतीला सहानुभूती मिळावी याबाबत मोठी भूमिका बजावली होती.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारचे सगळ्यात मोठे यश म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. सुरूवातीला या योजनेची टर उडवली गेली. पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झाल्यावर या इतक्याशा रकमेने काय होणार? ही लाच घेणे योग्य आहे का? सरकारला हे परवडणारे आहे का? अशी भीक देऊन मते मिळतात का? बायका स्वतःच्या नवर्याचे ऐकत नाहीत आणि 1500 रूपयांसाठी त्या यांना मते देतील का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ‘आम्ही 3000 रूपये महिना देणार’ असे सांगण्यात आले.
महिलांना एसटी प्रवासात सूट दिल्यावरही असाच प्रकार घडला. आधी त्यांना पन्नास टक्के सूट देणे राज्याला परवडणारे नाही, म्हणून कठोर टीका करण्यात आली. त्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्ही महिलांना एसटी प्रवासात शंभर टक्के सूट देऊ, असे जाहीर करण्यात आले. मूळात सुरू असलेल्या योजनांना विरोध करायचा आणि त्याच योजना आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने चालवू असे म्हणायचे, हे कुणाही विचारी माणसास न पटणारे, न पचणारे होते.
मुस्लिमांसाठी त्यांच्या धर्मगुरूकडून ‘मत जिहाद’ करण्याचे फर्मान काढण्यात आले होते. त्यामुळे झाडून ते सगळे महाआघाडीला मतदान करतील, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात लाडकी बहीणच्या लाभार्थी या महिलाही होत्याच. शिवाय ‘ट्रिपल तलाक’सारख्या जाचातून त्यांची सूटका झाल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या सल्ल्यांना फारसा प्रतिसाद न देता युतीला कौल दिल्याचे सांगण्यात येते.
मराठवाड्यात मनोज जरांगे यांच्यामुळे बहुजन समाज दुखावला गेला होता. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. आम्ही जाती-पातीचे राजकारण करत नाही असे सांगायचे आणि प्रत्यक्षात जाती-जातीत फूट पाडायची असे यामागचे कारण आहे का? असा संभ्रम निर्माण झाला होता. मनोज जरांगे यांनी महाआघाडीच्या नेत्यांचे सल्ले ऐकणे, आधी मराठा समाजाचे उमेदवार जाहीर करणे आणि नंतर केवळ महाआघाडीला मदत होईल म्हणून त्यांना माघार घ्यायला सांगणे, फडणवीसांवर वैयक्तिक आकसातून टीका-टिपण्णी करणे हे अनेक मराठा बांधवांनाही रूचत नव्हते. छत्रपती संभाजीनगरमध्ये कालिचरण महाराज यांनी जरांगेना ‘राक्षस’ संबोधल्यानंतर ज्या पद्धतीने फडणवीस आणि एकूणच ब्राह्मण समाजाला ट्रोल केले गेले ते अनेकांना आवडले नव्हते. सरकार मराठा विरोधी आहे, हे सातत्याने सांगताना याच सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे, त्यांचे सहकारी अजित पवार असे अनेक नेेते मराठाच असल्याचे समाजाचे नेतृत्व करणार्यांना विसर पडला. त्यामुळे समाजात फूट तर होतीच पण दहशतीमुळे अनेक जण हे बोलण्यास घाबरत होते. जरांगेंच्या भूमिका, संजय राऊतांसारख्या अनेक नेत्यांची अनेक वादग्रस्त विधाने हे सगळे महायुतीसाठी पोषक ठरले.
या सगळ्यात मला विशेष उल्लेखनीय वाटते ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे काम. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी अत्यंत समर्पित भावनेने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी आणि गरजूंना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले. ओळख-पाळख, जात-धर्म असे कोणतेही निकष न लावता त्यांनी जी आरोग्यक्रांती घडवली ती अभूतपूर्व आहे. अनेक गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करणे, काही ठिकाणी संबंधित रूग्णालयाकडून बिलात सवलत मिळवून देणे, अपघातासारख्या गंभीर प्रसंगात तातडीने धावून जाणे हे त्यांनी मोठ्या निष्ठेने केले. शब्दशः लाखो लोकाना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने जीवदान दिले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या नादात सरकारच्या अशा विधायक कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला त्यांना हे सरकार ‘देवदूत’ वाटले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते.
आता स्पष्ट बहुमतातले युती सरकार स्थापन होईल. ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या पदरात भरघोस मतांचे दान टाकले त्यांच्यासाठीची लाडकी बहीण योजना अव्याहतपणे सुरू ठेवणे आणि अर्थातच सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना त्यासाठीच्या रकमेची तरतूद करणे हे सरकारपुढचे मोठे आव्हान असणार आहे. राज्यातून बाहेर जाणार्या प्रकल्पाची मीमांसा करून ते थांबवणे आणि रोजगारवृद्धिला हातभार लावणे हे त्यांना आणखी निगुतीने करावे लागणार आहे.
सलग आठवेळी निवडून आलेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशा अनेक धुरिणांना पराभवाला सामोरे जावे लागले. ज्याप्रमाणे युतीत एकसंघपणा होता तसा तो आघाडीत दिसत नव्हता. केवळ सत्ताधार्यांवर टीका करणे यातच ते धन्यता मानत होते. त्यामुळे या वादळात असे काही चांगले नेते पराभूत झाले. हे त्यांच्या एकंदरीतच भूमिका आणि अंतर्गत धुसफुसीमुळे घडले. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा योगी आदित्यनाथांनी दिलेला नारा सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात युतीला यश आले. त्यामुळे नाही म्हटले तरी एक सुप्त भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आघाडीकडून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर संविधान बदलण्याचे आरोप करण्यात आले होते. त्यातील फोलपणा एव्हाना अनेकांच्या लक्षात आल्याने महायुतीला विजयश्री संपादित करता आली.
निवडून आलेल्यांचे अभिनंदन आणि जे पराभूत झालेत त्यांना त्यांच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देताना भविष्यातील महाराष्ट्र राज्याचा वाटचालीचा प्रवास सुकर होवो आणि आपल्या राज्याची प्रतिमा आणखी उंचावत जावो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.
– घनश्याम पाटील
7057292092
प्रसिद्धी – दै. पुण्य नगरी 25 नोव्हेंबर 2024