यु.के.चे हवामान लहरी आहे. कधी ढगाळ, कधी पाऊस, कधी लख्ख ऊन, कधी गार वारे, कधी थंडी. मोबाईलवर दिसणारा हवामानाचा अंदाज मात्र पुष्कळ परफेक्ट असतो. त्यामुळे कोठेही पर्यटनाला जायचे असेल तर पहिल्यांदा हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो. आम्हाला वेस्ट मिडलँड सफारी पार्कला जायचे होते. तेथे पाऊस असेल तर जाऊन उपयोग नव्हता. बिगर पावसाचा दिवस शोधून आम्ही सफारी पार्कला निघालो.
आपल्याकडे जसे शैक्षणिक वर्ष जून ते मे असते आणि 15 एप्रिल ते 15 जून शाळांना उन्हाळी सुट्टी असते तसे इंग्लंडमध्ये सप्टेंबर ते ऑगस्ट असे शैक्षणिक वर्ष असते. 22 जुलै ते 3 सप्टेंबरपर्यंत सर्व शाळांना समर व्हेकेशन्स असतात. शाळांना सुट्टी म्हणजेच पर्यटनाचा हंगाम असतो. येथेही सध्या पर्यटनाचा हंगाम चालू आहे. पालक कामावर रजा टाकून आपल्या लेकराबाळासह सहलींचा आनंद घेताना दिसताहेत.
वेस्ट मिडलँड सफारी पार्क हा इंग्लंडमधील सर्वात मोठा सफारी पार्क आहे. बेवडले, वूस्टरशायर येथे सुमारे दोनशे एकर परिसरात हे पार्क आहे. हा इंग्लंडमधील सर्वात मोठा सफारी पार्क आहे. सफारी पार्कचे तिकीट एका व्यक्तिला 19.90 पौंड आहे. एक पौंड म्हणजे आपले किमान 110 रुपये. म्हणजे आपल्या चलनात विचार केला तर, 2190/- रुपये तिकीट आहे. आपल्याला ते खूप महाग वाटते पण येथील लोक पौंडमध्ये व्यवहार करतात. त्यांना ते फार वाटत नाही.
सफारी पार्कमध्ये आपण एकतर त्यांच्या जंगल जीपमध्ये जाऊ शकतो किंवा आपली स्वतःची फोर व्हीलर घेऊन जाऊ शकतो. बहुसंख्य पर्यटक स्वतःच्या फोर व्हीलरने पार्क पाहतात. आम्हीही आमच्या फोर व्हिलरने सफारी पार्क पाहायला निघालो. येथील शाकाहारी प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी गेटवरच फुड विकत मिळते. खाजगी फूड चालत नाही.
आम्ही आत प्रवेश करताच रांगेत संथ गतीने गाड्या पुढे पुढे सरकत होत्या. थोडे पुढे गेले की, बाजूला धिप्पाड एकशिंगी गेंडा दिसला. तो जवळच्या मैदानात दिमाखात चरत होता. एवढ्या गाड्या पण तो हु की चू हलला नाही. सगळे थांबून त्याला न्याहाळत हळूहळू पुढे जात होते. त्याच्या जवळपास आणखी गेंडे दिसत होते. थोडे पुढे जाताच रानगायी, हरणं, शहामृग गाड्यांच्या जवळ आशाळभूतपणे उभे राहत. गाडीतील पर्यटक गाडीच्या काचा खाली करून हरणं, शहामृग यांना फुड स्वहस्ते खाऊ घालण्याचा आनंद घेत होते. पर्यटकांना गाडी बाहेर उतरण्यास बंदी आहे. त्यामुळे गाडीत बसूनच आनंद घेता येतो. नागमोडी आणि चढ उताराचे चांगले रस्ते, आजूबाजूला हिरवळ, उंच सखल टेकड्या, भरपूर सूर्यप्रकाश याने सगळा माहोल प्रसन्न होता.
सुरुवातीला जिराफ, झेब्रे, गेंडे, हरणांच्या अनेक जाती, बारसिंगा, काळवीट, उंट इ.बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या आफ्रिकन आशियायी गाय, म्हैस, मेंढ्या पाहत पाहत आपण हिंस्र प्राण्यांसाठी संरक्षित केलेल्या अनेक क्षेत्रात पोहोचतो. तेथे स्वयंचलित उंचच उंच फाटक आहेत, लाल हिरवे सिग्नल आहेत. एकेका क्षेत्रात एकावेळी फक्त सात-आठ गाड्या सोडतात. सर्वप्रथम आम्ही चित्ते व टायगर क्षेत्रात गेलो पण निराशा झाली. ते आम्हाला दिसलेच नाहीत. त्यानंतर सिंहाच्या क्षेत्रात अनेक सिंह मोकळ्या आकाशात इकडे तिकडे भटकत होते. त्यानंतर पांढरे सिंह पाहून तर मन हरखूनच गेले. त्यांच्या विविध लीला पाहायला मिळाल्या. तेथे रानकुत्रे देखील होते. येताना अनेक झेब्रे, जिराफ जवळून पाहता आले. चार-पाच हत्ती देखील दिसले. जवळपास दोन तास वन्य प्राणी पाहत होतो. येथे 161 प्रकारचे 600 पेक्षा अधिक वन्यप्राणी पाहायला मिळाले. अनेक प्राण्यांना स्पर्श देखील करता आला.
त्यानंतर डायनसोरचे संक्रमण कसे झाले याच्या 25-30 प्रतिकृती, सांगाडे असलेल्या क्षेत्रातून आम्ही सी लायन हा शो पाहिला. सील, वालरससदृश दिसणार्या एका सी लायनने अर्धा तास आमची करमणूक केली. विविध उड्या, फेर्या, आवाज, टाळी आदी कृती तो सूत्रधार सांगेल तसे करून दाखवत होता. असा शो जगात इतरत्र पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता नाही. पेंग्विनदेखील पाहिले. अजगर, मगर, साप, घोरपड पाहिले. आणखी बरेच शो होते पण आम्हाला आमच्या नातवासाठी अॅडव्हेंचर गेमकडे जायचे होते. त्यानुसार आम्ही अॅडव्हेंचर गेमकडे गेलो. अजस्त्र, विराट, चित्तथरारक पाळण्यांचे अनेक प्रकार होते. भीती आणि साहस यांच्या पाठशिवणीचा आनंद शेकडो तरुण, लहान मुलं, पर्यटक घेत होते. भीतीचे चित्कार तर सुटकेचे निःश्वास ऐकत वृद्ध मंडळी आपल्या लेकरांची काळजी करीत उभे होते.
तिथे ब्रिटनचे प्रतिबिंब दिसत होते. उंच, धिप्पाड, गोरे गोरे जोडपे, नाजूक साजूक आशियायी वर्णाची मध्यम रंगाची जोडपी, कपाळाला कुंकू असलेल्या भारतीय महिला, कृष्णवर्णीय आफ्रिकन जोड्या, काही चायनीज, काही जापनीज लोक होते. सगळे गुण्यागोविंदाने एकत्र दिसत होते. वर्ण, रंग, धर्म, वंश, भाषा यांची आनंददायी विविधता पाहून ‘वसुधैव कुटुंबकं’ची अनुभूती घेऊन आम्ही घरी परतलो.
– हिरालाल पगडाल
लॅमिंगटन स्पा, यु. के.
व्हाट्सअप्प नं. 9850130621
मासिक ‘साहित्य चपराक’ ऑक्टोबर २०२४