महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ठाकरे’ ब्रँड धोक्यात?

Share this post on:

ठाकरे ह्या आडनावाबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही. ‘ठाकरे’ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक शक्तिशाली नाव आहे. प्रबोधनकार ठाकरे ते आजच्या पिढीतील आदित्य आणि अमित ठाकरेपर्यंत असलेल्या ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या ह्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आणि अनपेक्षितपणे सर्वांना आश्चर्याचा धक्का देत विविध एक्झिट पोलचे अंदाज चुकवित महायुतीने प्रचंड बहुमत मिळविले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या तिघांनी ज्या प्रमाणात यश मिळविले तेवढ्या मोठ्या यशाची कदाचित त्यांनासुद्धा अपेक्षा नसेल. असो.
निवडणूक निकालानंतर निवडणूक पद्धतीवर नेहमीप्रमाणे होणारी टीका सुरु असताना अजून एक चर्चा देशभरातील माध्यमांमध्ये सुरु आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे ब्रँड धोक्यात आला आहे काय?
ठाकरे ह्या आडनावाबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही. ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक शक्तिशाली नाव आहे. प्रबोधनकार ठाकरे ते आजच्या पिढीतील आदित्य आणि अमित ठाकरेपर्यंत असलेल्या ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या ह्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ठाकरे नावाचे गारुड संपूर्ण देशभर असे झाले होते की, देशातील कोणताही मोठा नेता महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत आला की त्याने मातोश्रीवर आलेच पाहिजे हा अलिखित नियम शिवसेनाप्रमुखांच्या संपूर्ण हयातीत मोडण्याची हिंमत कोणत्याही नेत्याने केली नाही. दुर्दैवाने नोव्हेंबर 2012 मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर ठाकरे नावाभोवती असलेले वलय हळूहळू कमी होत आता ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात राहील की नाही इथपर्यंत शंका घेण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही आपल्या पद्धतीने चालवित आहेत. दोघांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी, लोकाना संबोधित करण्याची पद्धत वेगळी, संघटना चालवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. परंतु ह्या दोघांमध्येही लाखोंची गर्दी खेचण्याचे सामर्थ्य आहे हे नाकारून चालणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ आपल्या मतभेदामुळे जरी वेगवेगळे पक्ष चालवित असले तरी दोघांच्याही मागे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. मग हे सर्व सोबतीला असताना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार होण्याच्या चर्चा होण्यापर्यंतची वेळ ठाकरे बंधूंवर का आली हा प्रश्न कोणत्याही मराठी माणसाला पडल्याशिवाय राहत नाही.
आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. लाखोंची गर्दी जमविण्याचे सामर्थ असलेले दोन्ही नेते आपल्या पक्षाला राजकीय यश का मिळवून देऊ शकले नाहीत हे पाहावे लागेल.
कोणत्याही राजकीय पक्षाचे यश आणि अपयश हे निवडणुकीतील यशावर मोजले जात असल्यामुळे राजकीय पक्ष चालविणार्‍या नेत्यांनी निवडणुकांना अत्यंत गांभिर्यपूर्वक घेणे आवश्यक असते. निवडणुका जर जिंकण्यासाठी लढवायच्या असतील तर आर्थिक पाठबळ आणि मजबूत संघटना बांधणी ही महत्त्वाची असते. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष निवडणुकांना गांभिर्याने घेताना कधीही दिसले नाहीत. केंद्रात आणि देशातील विविध राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासोबत स्पर्धा असताना ज्या त्वेशाने आणि इर्शेने निवडणुकांच्या रिंगणात उतरायला हवे होते ते ह्या दोन्ही पक्षांकडून कधीही झाले नाही.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात निवडणूक पद्धतीवर टीका करताना निवडणुका ह्या देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात कायम सुरू असतात. राजकीय पक्षांना निवडणुका लढविण्याशिवाय दुसरे काही कामच नाही, असे विधान अनेकदा केले आहे. वास्तविक पाहता राज ठाकरे ह्यांची टीका बरोबर असली तरी ते एक राजकीय पक्ष चालवित आहेत आणि ज्या व्यक्तिला निवडणुकांचा इतका तिटकारा आहे त्या व्यक्तिने राजकीय पक्ष काढलाच कशाला? हा साधा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो.
निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुकांचे सूक्ष्म नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. मतदारसंघांची लोकसंख्या, जातीचे समीकरण, मागील दहा-पंधरा वर्षातील निवडणुकांचे ट्रेंड आणि खर्च करण्याची क्षमता असलेले उमेदवार ह्या गोष्टी कोणत्याही पक्षाला निवडणुकीत विजयापर्यंत घेऊन जातात परंतु राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणतात की, मी जातीपातीची गणिते बघून उमेदवार देत नाही.  राज ठाकरे यांची जातीविरहित महाराष्ट्र धर्माचे विचार अत्यंत प्रगत आहेत पण आपण ज्या देशात राहतो त्या देशात वैदिक काळापासून जातीव्यवस्थेवर आधारित वर्णव्यवस्था निर्माण झाली आहे. सहजासहजी ती तोडता येणार नाही. जी जात नाही, ती जात, असे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेपासून ते मतदारसंघांपर्यंत प्रत्येक ठिकाणी जात पाहिली जाते ह्या वास्तवाचे भाग राज ठाकरेंना होणे आवश्यक आहे. राज ठाकरे यांचे विचार, त्यांचा अभ्यास आणि महाराष्ट्र उद्धारासाठी काहीतरी करण्याची तळमळ हे योग्य असले तरी त्यांच्या जातीविरहीत समाजाच्या कल्पनेला पेलण्याची ताकत अजून महाराष्ट्रात आली नाही हे तितकेच खरे आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना कायम अवास्तव जागांची मागणी करताना आणि त्या लढविताना दिसते. आपण लढवित असलेल्या जागा निवडून आणण्यासाठी काय केले पाहिजे? आपल्या पक्षाची खरंच मतदारसंघात ताकत आहे काय? ह्याचा कोणताही अभ्यास त्यांच्या पक्षाचे नेते करीत नाहीत. महाराष्ट्राशिवाय गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील विधानसभा निवडणुका शिवसेना लढविते आणि अनामत रक्कम जप्त झाल्यानंतर स्वतःचे हसे करून घेते. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून असाच प्रकार पाहावयास मिळाला होता.
निवडणुकांच्या तयारीच्या बाबतीत भारतीय जनता पक्षापेक्षा दुसरा तरबेज पक्ष शोधून सापडणार नाही. मतदारसंघाचा अभ्यास करणे, त्याच्यानुसार यादी प्रमुखांची नेमणूक करणे आणि विविध निमित्त काढून लोकाच्या घरी जाणे हे काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते वर्षभर करीत असतात. आपल्या उमेदवारांच्या विरोधात विरोधी पक्षाचा सक्षम उमेदवार रिंगणात उभा असेल तर विरोधी उमेदवाराच्या नावाच्या समकक्ष नाव असलेले उमेदवार उभे करणे, विरोधी उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाच्या समकक्ष निवडणूक चिन्ह मैदानात उतरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि पैशाचा प्रचंड वापर करुन साम-दाम-दंड-भेद नीतीच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचे काम भारतीय जनता पक्ष गेली दहा वर्षे करतो आहे. नैतिक आणि मुल्यांच्या दृष्टीकोनातून कोणाला हे चुकीचे वाटू शकते पण राजकारण ह्यालाच म्हणतात. जेव्हा तुम्ही निवडणुकांच्या राजकारणात उतरता तेव्हा त्या जिंकण्यासाठीच असतात हे समजणे आवश्यक आहे.
शिवसेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी अशाप्रकारे निवडणुका लढविल्याचे ऐकिवात नाही. दोन्ही पक्षांकडे याद्यांवर काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नाही. मुंबई, ठाणे, कोकण असा तुरळक भाग सोडला तर शिवसेनेचे कार्यकर्ते लोकामध्ये मिसळत नाहीत. जे कार्यकर्ते काम करतात त्यांना दाबण्याचे काम पक्षातीलच विरोधी गटाकडून केले जाते. बाळासाहेबांची पोलादी आणि शिस्तबद्ध असलेली शिवसेना आज गटबाजीच्या वाळवीने पोखरली आहे. दुर्दैवाने राज ठाकरेंच्या पक्षाची अवस्था ह्यापेक्षा काही वेगळी नाही.
निवडणुकीच्या प्रश्नानंतर संघटनात्मक बांधणीवरसुद्धा दोन्ही पक्षांनी युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे. संघटना जर मजबूत असेल तरच निवडणुका लढविण्याला अर्थ आहे. मुंबई, ठाणे, कोकणाचा ठरावीक पट्टा सोडला तर शिवसेनेच्या शाखा ह्या अत्यंत दुर्मीळ झाल्या आहेत. जिथे नामफलक आहे तिथे कार्यकर्ते नाहीत आणि जिथे कार्यकर्ते आहेत तिथे नामफलक नाहीत अशी विचित्र परिस्थिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या शाखांचे जाळे महाराष्ट्रभर निर्माण केले होते ते बनविण्यात आणि टिकविण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती तर ह्याहून बिकट असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक ही काही ठरावीक शहरे सोडली तर उर्वरित महाराष्ट्रात मनसेचे अस्तित्व नगण्य आहे.
दोन्ही पक्षात दुसर्‍या फळीचे नेते तयार झालेले नाहीत. प्रचाराची संपूर्ण धुरा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्यांच्याच खांद्यावर असते. शिवसेनेत आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते सभा घेऊन प्रचार करु शकतात पण मनसेत राज ठाकरेंशिवाय सभा घेऊ शकणारा आणि गर्दी खेचू शकणारा दुसरा नेता नसल्यामुळे निवडणुकीच्या काळात राज ठाकरेंच्या एकट्याच्या खांद्यावर सर्व भार पडतो.
माझा विठ्ठलाशी नाही तर विठ्ठलाच्या भोवती असलेल्या बडव्यांशी वाद आहे, असे सांगत राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते पण आज दोन्ही पक्षात काही ठरावीक लोक पक्षाच्या मुख्य नेतृत्वाच्या अवतीभोवती चोवीस तास वावरताना दिसतात. दुर्दैवाने पक्षाच्या वाढीत ज्या लोकाचे काहीच योगदान नाही असे लोक शीर्षस्थानी असल्यामुळे कर्तृत्ववान लोकाची पक्षात कायम कुचंबना होते.
किंबहुना आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या प्रमुख नेत्यांची यादी तपासली तर त्यात मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक ह्यांच्याच मुलांचा अधिक भरणा पाहावयास मिळतो आणि त्यात सुद्धा मुंबईतील लोकाची संख्या ही अधिक आहे. परिणामी संघटनेत चुकीचा संदेश जातो. मुंबईबाहेरील शिवसेनेला किंवा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांना ठाकरेंच्या लेखी महत्त्व नाही काय? हा प्रश्न निर्माण होतो.
संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकांचे सूक्ष्म व्यवस्थापन यावर दोन्ही ठाकरेंनी खूप काम करणे आवश्यक आहे. लेखकांनी राजकीय नेत्यांचे दोष दाखविण्याचे काम केले पाहिजे, असे शिवसेनाप्रमुखांनी म्हटले होते. दोन्ही पक्षातील दाखविलेल्या ह्या उणिवा ह्या त्यांच्यावरील टीका नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ठाकरे ब्रँड’ हा टिकला पाहिजे ह्या तळमळीतून आलेला हा विचार आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील किंवा नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु शिवसेनाप्रमुखांचा वारसा चालविणारे दोन्ही ठाकरे आणि त्यांचे पक्ष महाराष्ट्रात टिकले पाहिजेत.

– स्वप्निल श्रोत्री
मासिक साहित्य चपराक, डिसेंबर 2024

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!