te chincche zaad

ते चिंचेचे झाड

Share this post on:

वृंदाचे वडील फॉरेस्ट खात्यात आय.एफ.एस.ऑफिसर होते. त्यावेळी त्यांची पोस्टिंग बिहारमधील चंपारण्य ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी होती. आता बिहार म्हटले की, तेथील राजकारण, गरिबी, कामाच्या शोधार्थ दुसर्‍या राज्यात जाऊन कमाई करणारे कारागीर, कर्मचारी मजूर, अशिक्षित समाज, गुन्हेगारी वर्ग, तेथील जाती, जातीत असलेला जाती द्वेष, वर्ण द्वेष असेच चित्र डोळ्यासमोर येते. येथील काही वर्ग सोडला तर एकूणच येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक स्थिती भयंकर आहे. हाताला काम नाही, पोटाला पुरेसे अन्न नाही, शैक्षणिक क्षेत्र पुरेसे विकसित नाही. त्यामुळे येथे गुन्हेगारी अनेक वर्षांपासून  फोफावलेली आहे. नाही म्हणायला येथील गरीब, अशिक्षित जनता पोटासाठी इतर राज्यात स्थलांतर करून आपले जीवन कसेबसे जगत असतात. तोच काय तेथील लोकाना दिलासा! एखाद्या छटसारख्या पूजेला स्थलांतरित झालेली मंडळी आपापल्या गावी जाऊन आपली संस्कृती, चालीरीती जपताना दिसतात अथवा गावी असलेल्या आपल्या आप्तस्वकियांना भेटी देतात. एवढाच काय तो त्यांचा आपल्या मायभूमीशी संपर्क! तरीही येथील कामगारवर्ग मात्र अतिशय कष्टाळू! कोणतेही काम करायला येथील लोकाना लाज वाटत नाही. मग ते काम बिगार्‍याचे असू देत, मजुराचे असू देत, सुताराचे असू देत. ते मन लावून काम करतात म्हणूनच इतर राज्यातील व्यावसायिक बिहारी कामगारांना विशेष प्राधान्य देताना दिसतात.

तसे इतर राज्यातील लोक बिहारला फारसे पसंत करत नाहीत कारण तेथे गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे पण काही सरकारी कर्मचार्‍यांना मात्र नाईलाजाने तेथे जावे लागते.
वृंदाचे वडील भाऊसाहेब जाधव असेच एक सरकारी वरिष्ट अधिकारी! त्यांची बदली चंपारण्य ह्या शहरात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून झालेली होती. भाऊसाहेबांना दोन शाळकरी मुली होत्या. ते फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्यांना रात्री-अपरात्री सुद्धा ड्युटीवर जावे लागत होते. अशा परिस्थितीत कुटुंबाला नोकरीच्या ठिकाणी घेऊन जावे का जाऊ नये? अशा विचित्र विवंचनेत भाऊसाहेब अडकलेले पण आता तीन वर्षे तरी त्यांची तेथून सुटका होणार नव्हती. त्यांनी तेथे बदली होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले तरी सरकारी आदेश त्यांना धुडकावता आला नाही. अखेरीस मुलींची परीक्षा संपल्यावर त्यांनी चंपारण्यला जायचा निर्णय घेतला. अर्थात भाऊसाहेब धाडसी होते. जंगलराजमध्ये वावरण्याची त्यांना सवय होती. शिवाय त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्रही उपलब्ध होते. त्यांना जे ठिकाण अथवा घर दिले जात असे तेथे वनखात्याचे अनेक कर्मचारी, रखवालदार, गार्ड देखील तैनातीस होते. तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. समस्या होती ती मुलींच्या सुरक्षितेची! कारण त्यांचा बंगला शहरापासून दूर होता पण मुलींच्या शाळा तर शहरात होत्या. तेथे जाणे-येणे मात्र त्यांना तितकेसे सुरक्षित वाटत नव्हते कारण ते वन अधिकारी होते आणि तसे पाहता गुन्हेगारांचे संबंध वन अधिकार्‍याशी चांगले नसतातच. गुन्हेगारी कृत्ये नेहमीच वन विभागात सुरु असतात. तेथे गुन्हेगारांना लपायला आश्रय मिळत असतो. त्यांच्या हितसंबंधाच्या आड एखादा ऑफिसर आला की वैर निर्माण होत असते आणि मग त्या गुन्हेगारांची नजर त्या ऑफिसरच्या सॉफ्ट टार्गेटवर म्हणजेच त्यांच्या कुटुंबियांवर असतेते गुन्हेगार अतिशय क्रूर असतात. वेळप्रसंगी ते खून करण्यास देखील मागे-पुढे पाहत नाहीत. नेमकी तीच काळजी भाऊसाहेबांना लागून राहिली होती पण आता ह्या समस्येवर उपाय शोधून काढावा लागणार होता. त्यांनी मुलींच्या शाळेच्या वेळी आपल्या एका गार्डची नेमणूक केली होती. तो गार्ड मुलींच्या बरोबर त्यांच्या शाळेत जायचा आणि शाळा सुटल्यावर त्यांना सुखरूप घरी घेऊन यायचा.
भाऊसाहेबांच्या मुली इंग्रजी माध्यमात शिकत होत्या म्हणून तेथील केंद्रिय स्कुलमध्ये त्यांना सहजच प्रवेश मिळाला. केंद्रिय स्कुल अशाच नोकरीसाठी आलेल्या ऑफिसरांच्या, कर्मचार्‍यांच्या मुलांना प्रवेश देण्यास बांधील असते.
भाऊसाहेबांच्या मुलींना देखील केंद्रिय स्कुलमध्ये विनासयास प्रवेश मिळाला आणि त्यांचे रुटीन सुरु झाले. त्यांच्या सुरक्षेसाठी भाऊसाहेबांनी गार्डची नेमणूक केल्याने त्यांची काळजी कमी झाली आणि ते ड्युटीवर हजर झाले.
ते वन अधिकारी असल्याने त्यांना चंपारण्य शहरापासून थोडेसे दूर असलेल्या वनविभागाचा प्रशस्त बंगला राहायला मिळाला होता. तेथेच आजूबाजूला अन्य ऑफिसरांचे बंगले आणि इतर कर्मचार्‍यांचे निवासस्थान होते. सर्वत्र वनराई पसरलेली होती. अनेक वर्षांच्या मोठमोठ्या वृक्षांनी तो परिसर आच्छादलेला होता. शुद्ध प्राणवायूचा पुरवठा होत होता. प्रत्येकाच्या बंगल्यासमोर सुंदर बगीचे संवर्धित केले होते. अखेरीस तो वनविभाग होता. तेथे नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन केलेले ठिकठिकाणी दिसत होते. वनविभागाचा तेथे क्लब होता. संध्याकाळी ड्युटीवरून परतल्यावर अनेक ऑफिसर त्या क्लब हाऊसवर टेबल टेनिस, बिलियर्ड्स, कॅरम, बुद्धिबळ, पत्ते, सापशिडी, लुडो इत्यादी खेळण्यासाठी येत असत. आऊटडोअर खेळांसाठी बाहेर मोठे मैदान होतेतेथे क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, गोल्फ, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळण्याची सोय होती. ऑफिसर आणि त्यांची मुले येथे संध्याकाळी खेळण्यास येत असत. संध्याकाळी हा परिसर विविध खेळ आणि विविध माणसांनी फुलून येत असे. पलीकडेच गोल्फचे मैदान होते. गोल्फचे शौकीन काही जण आपला मनपसंत खेळ खेळण्यात तेथे व्यग्र असत. त्यांच्या दिमतीला तेथे कर्मचारी वर्ग देखील उपस्थित असे.
संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात ड्युटी करून आलेले असताना देखील तेथील वातावरणात उत्साह ओसंडून वाहताना दिसत असे. नाहीतरी वनखात्यातील लोक व्यायामाला अधिक महत्त्व देत असतात कारण त्यांना शारीरिक तंदुरुस्ती जतन करून ठेवणे जरुरीचे असते. त्याचवेळी आसपासच्या वृक्षांवर पक्षांची घरटी पक्षी परतल्यावर जिवंत झालेली असतात. आपापल्या घरी पिल्लांना खाणे देऊन विश्रांती देण्याची त्यांना घाई झालेली असते. तत्पूर्वी तेथे त्यांचे सामूहिक गायन देखील होत असे. त्यांचा तो मधुर गुंजारव वातावरणात अधिकच उत्साह आणि ऊर्जा देणारा ठरत असे.
येथील सकाळ देखील प्रसन्न असे. सकाळच्या उत्साहवर्धक वातावरणात ह्या ऑफिसरांच्या बायका मॉर्निग वॉकसाठी निघत असत. त्यांची एकमेकींशी ओळख होऊन त्यांचा मस्तपैकी ग्रुप तयार झालेला असे. सकाळी पाच-सहा किलोमीटरचा फेरफटका मारून त्या एखाद्या कट्ट्यावर विसावत. मग गप्पांचा फड रंगत असे अन विविध प्रदेशातून आलेल्या ह्या महिलांची एकमेकीशी ओळख होऊन मैत्र फुलत असे. सकाळी त्यांना नवर्‍यांना डबे देण्याची लगबग नसे कारण सकाळी भरपेट नाश्ता झाल्यावर ही मंडळी आपापल्या जीपने दुपारी जेवणासाठी घरी येत असत किंवा जर येणे शक्य नसेल तर एखाद्या ऑर्डरली बरोबर त्यांचा डबा त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात येत असे. एकंदरीत ऑफिसरांचे नसले तरी त्यांच्या कुटुंबियांचे जीवन अतिशय शांत आणि आरामदायी असेच होते. महिला खूश होत्या. ज्या घरात महिला खूश आणि आनंदी राहतात ते घर नक्कीच स्वर्गासमान प्रतित होत असते.
संध्याकाळी सूर्य अस्ताला गेल्यावर थोडासा अंधार पसरल्यावर मैदानावरून एक एक जण आपापल्या निवासस्थानी  परतत असत. काहींच्या घरी पार्टीचे आयोजन केलेले असे. घरी जाऊन फ्रेश होऊन ही मित्रमंडळी परत एकत्र जमत आणि गप्पांचा आनंद घेत. क्वचित प्रसंगी काही जण पेग रिचवीत पण तेही प्रमाणातच! मग रमीचा डाव रंगत असे. अधूनमधून काही फर्माईशी होत असत. प्रत्येकाच्या घरी ऑर्डरली असल्याने त्यांना हवे असलेले पदार्थ तात्काळ बनवून पेश केले जात असत. अशाप्रकारे एक परस्पर आनंदविभोर करणारा माहोल तेथे प्रत्ययास येत असे.


भाऊसाहेब खाण्याचे आणि खिलवण्याचे शौकीन होते. त्यांच्या पत्नी मीराताई देखील सुगरण होत्या. त्यांना आपल्या नवर्‍याच्या मित्रांना महाराष्ट्रीयन पुरणपोळी, श्रीखंड, कोल्हापुरी तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असे मराठमोळे जेवण करून खाऊ घालण्यात आनंद वाटत असे. बर्‍याचवेळा पार्टी त्यांच्याच घरात होत असे. मित्रांचा गोतावळा जमला की गप्पांना, चेष्टामस्करीला उधाण येत असे आणि रात्रीचे बारा कधी वाजले? याचा पत्ताच लागत नसे.
भाऊसाहेबांचा एक पंजाबी मित्र होता, सुखविंदर टंडन! तो खाण्याचा तर शौकीन होताच पण तो अतिशय आनंदी होता. सरदार जमातीवर नाना जोक्स करून तो सगळ्यांना हसवायचा. त्यामुळे पार्टीत रंगत येत असे. तसेच मुश्ताक सैय्यद म्हणूनही एक मित्र होता. तो थोडा गंभीर प्रवृत्तीचा होता. मनाने कवी होता. त्याच्या कविता आणि शेरोशायरीचा दर्जा उत्कृष्ट होता. घसा खाकरून तो जेव्हा आपली उर्दू शायरी पेश करायचा तेव्हा तेथे साहित्यिक वातावरणाची निर्मिती होऊन एका वेगळ्याच साहित्य जगतात ही मंडळी पोहोचत असत. मीराताई देखील संगीत विशारद होत्या. त्यांना देखील मैफिलीत सामील करून घेऊन गाण्याचा आग्रह केला जात असे. त्यांच्या कोकिळकंठी गळ्यातून जेव्हा साहीर लुधियानवी, नौशाद यांची सुमधुर गाणी गायली जात असत तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होऊन त्या गायकीचा आस्वाद घेत असत. अशाप्रकारे बिहारमध्ये येऊन सुद्धा भाऊसाहेबांचा चांगलाच जम बसला होता. एकतर मनासारखी नोकरी, मुलींच्या शाळेचाही प्रश्न सुटलेला आणि जिवाभावाचे मैत्र निर्माण झालेले! आणखी सुखी, आनंदी, समृद्ध जीवन जगायला माणसाला काय हवे असते? त्या प्रांतात भाऊसाहेब अतिशय समाधानी दिसत होते.
भाऊसाहेबांची मोठी मुलगी शलाका यंदा दहावीत होती. तिची ह्यावर्षी बोर्डाची परीक्षा होती. वर्षाच्या सुरुवातीपासूनच तिने नियमित अभ्यासाला सुरुवात केली होती. तिला देखील वडिलांप्रमाणे प्रशासकीय सेवेत करिअर घडवायचे होते. त्यांची दुसरी मुलगी कालिका आठवीत शिकत होती. ती मात्र बिनधास्त होती. तिला डिफेन्समध्ये जायचे होते. आर्मफोर्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर व्हायचे होते पण त्याला अजून अवकाश होता. तसेच तिला क्रीडा क्षेत्र देखील पसंत होते. कॅम्पसमध्ये असलेले इनडोअर, आऊटडोअर खेळ ती नियमित खेळायची. सकाळी उठून पळायला जायची. भरपूर व्यायामही करायची. त्यामुळे तिला ओळखीतून बर्‍याच मैत्रिणी मिळाल्या होत्या. शलाकाला देखील खेळाचे विशेष आकर्षण होते. शालेय जीवनात तिने खेळात प्रावीण्य मिळवून स्टेट लेव्हलची बरीच पारितोषिके पटकावली होती पण ह्या वर्षी मात्र तिने आपली आवड प्रयत्नपूर्वक बाजूला सारली होती कारण तिला बोर्डाच्या परीक्षेत देखील चांगले मार्क मिळवायचे होते.
रात्री सुमसाम झाल्यावर ती अभ्यासाला बसायची. शांततेत तिचे अभ्यासात मन लागायचे. ती एकपाठी होती. शांततेत वाचलेले एक न एक शब्द तिला तिला पाठ होत असत. तिचे बेडरूम बंगल्याच्या दक्षिण दिशेले होतेतेथे दोघी बहिणी झोपत असत पण कालिका झोपेत अतिशय चळवळ करीत असे. दिवसभरात जे काही झाले ते झोपेत बडबडत असे. मध्येच हसत देखील असे. अर्थात हे सर्व नॉर्मल होते पण तिच्या चळवळीने शलाकाला अभ्यासात व्यत्यय येत असे. मग ती बंगल्याचा दरवाजा उघडून मोकळ्या व्हरांड्यात येऊन अभ्यासाला बसत असे. सर्वत्र निरव शांतता, बागेत फुललेल्या निशिगंध, जाई, जुई, मोगरा आणि रातराणीचा सुगंधी दरवळ, मंद, शीतल वारा अशा वातावरणात  तिच्या चित्तवृत्ती बहरत असत आणि अभ्यास करण्यास उत्साह अंगी संचारत असे. नाही म्हणायला लांबवरून कधी कुत्र्यांचे ओरडणे आणि रातकिड्यांची किरकिर तिच्या एकाग्रतेत व्यत्यय आणित असत पण कालिकाच्या रात्रभराच्या चळवळीपेक्षा आणि बडबडण्यापेक्षा हे अधिक सुसह्य असे. म्हणून ती रात्री बाराच्या नंतर व्हरांड्यातच अभ्यास करीत बसत असे. तसा कॉलनीचा रखवालदार काही अंतराने गस्त घालायला येत असे म्हणून तिला घराच्या बाहेर बसून अभ्यास करण्यास कधीच भीती वाटली नाही कारण वनविभागाची ही कॉलनी अतिशय सुरक्षित होती. वनापासून ती दूर अंतरावर होती आणि वन्यप्राणी येथे फिरकण्याची शक्यता देखील नव्हती. चुकून एखादे श्वापद आलेच तरी बंदुकधारी रखवालदार तिच्या दिमतीला होताच. तशा सूचना भाऊसाहेबांनी थापा, त्यांचा रखवालदार याला देऊन ठेवल्या होत्याच.
रात्रीच्या साधारणपणे एक वाजता मात्र शलाकाला एक विचित्र अनुभव गेल्या काही दिवसांपासून येत होता. एक वाजता तिच्या बेडरूमसमोरील झाडाची प्रचंड सळसळ व्हायची. वार्‍याचा पत्ता नसताना देखील त्या झाडाच्या फांद्या प्रचंड हलायच्या. त्या झाडावरून कोणीतरी सरसरत खाली उतरतेय, पुन्हा वर चढतेय असा भास तिला व्हायचा. तो प्रकार जवळजवळ एक तास चालायचा. एखाद्या वादळात झाड सापडावे आणि वार्‍याच्या झंझावातात वाकडे तिकडे हलावे असे ते झाड, त्याच्या फांद्या हलत असत अन त्याचवेळी इतर वृक्ष एखाद्या तपाला बसलेल्या ऋषी मुनींसारखे स्थितप्रज्ञ असलेले दिसायचे. खरंतर वारा सुटल्यावर प्रत्येक झाडी, वृक्ष, पाने, लहान झाडे, रोपे देखील हलायला पाहिजे. एखादी मंद झुळूक जरी आली तरी त्या झुळूकेसरशी पाने, फुले डोलू लागतात पण येथे ना वारा वाहत होता, ना इतर झाडे हालत, डोलत होती. याचेच शलाकाला कित्येकदा आश्चर्य वाटत असे पण असेल  एखादी अशी निसर्गाची किमया! म्हणून ती त्याकडे दुर्लक्ष करीत होती. ही घटना दररोज घडत होती. रात्रीच्या एक वाजता त्या वृक्षाच्या पानांची सळसळ सुरु व्हायची. वारा असो अथवा नसो, ते झाड जणू सोसाट्याचा  वारा सुटलाय अशापद्धतीने हलायचे, डोलायचे. मग ती नेहमीची सरसर ऐकू यायची. कोणीतरी सूरपारंब्या खेळत आहेत, झाडावरून सरसर उतरून परत झाडावर चढत आहे, अशी जाणीव शलाकाला प्रत्येक दिवशी होत असे. जणू एखादे लहान मूल आपल्या  सवंगड्यांबरोबर लपाछपी अथवा सूरपारंब्या खेळत आहे असा आभास होत असे.
बरोबर एक तासानंतर मात्र आश्चर्यकारकरित्या सरसर थांबायची अन् सर्व काही शांत व्हायचं! पण त्याची शलाकाला कधीच भीती वाटली नाही. तेवढ्यापुरते तिचे ध्यान विचलित व्हायचे पण लागलीच ती आपले लक्ष अभ्यासात केंद्रित करायची.
पुढे पुढे झाडाची सळसळ सुरु झाली की कोणाच्या तरी हसण्याचा आवाज तिला ऐकू येऊ लागला. लहान मुले खेळताना जसे चित्कारतात, असा तो आवाज असायचा. अशाप्रकारचे आवाज निसर्गात येत असतात याचा शलाकाला अनुभव होता कारण लहानपासूनच ती वडील वन खात्यात असल्यामुळे आणि त्यांचे बंगले जंगलाच्या जवळ असल्याने तिने घेतला होता. बालपणापासूनच पक्षी, जंगली हिंस्त्र पशू ह्याचे आवाज तिला परिचयाचे झाले होते. त्यातील काही आवाज मधुर असत. काही भेसूर असत. काहींच्या आवाजात रडण्याचा सूर असे तर काहींचे आवाज एकमेकांशी बोलण्याचे असत. ती त्या पक्षी, पशुंची बोलिभाषा होती. त्यांच्या भाषेत ते एकमेकांना साद घालत असत. काही धोका निर्माण झाल्यावर आपल्या स्वकियांना सावध करीत असत. हे नित्याचेच होते. तिला ह्या सर्वाची सवयच झाली होती. एवढेच नव्हे तर विणीच्या हंगामात त्यांचे सूर बदलल्याची माहिती सुद्धा तिला होती. त्यावेळी मादीचा अनुनय करण्याची, तिला आकर्षित करण्याची नराची भाषा, साद वेगळाच असायचा. त्यात मार्दवता असायची, गोडवा असायचा. त्यामुळे तो हसण्याचा आवाज तिला विचलित करत नव्हता. ती नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करीत आपला अभ्यास करत राहायची. तिचा हा अनुभव तिने कधीच आईवडिलांशी शेअर केला नाही कारण तिच्या दृष्टीने हे सारे नॉर्मल होते. जसजसी सहामाही परीक्षा जवळ येऊ लागली तसतसा शलाकाने अभ्यास जोरात सुरु केला. आता तिला अभ्यासावर जास्तीत-जास्त लक्ष केंद्रित करायचे होते. पावसाळा सुरु होता. आल्हाददायक वातावरण होते. मधूनच पावसाच्या एक-दोन सरी बरसायच्या. सभोवताली असणार्‍या वृक्षांवर सळसळ जाणवायची. कधी मंदपणे वारा वाहायचा तर कधी सोसाट्याचा वारा सुटायचा. काही क्षणापुरते  पुस्तके, वह्या यांची पाने फडफडायची. ती आवरताना शलाकाची त्रेधातिरपीट उडायची. नंतर सर्व सामान्य व्हायचे. अंगणात आणि बगीच्यात असणार्‍या विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात पावसांच्या कोसळणार्‍या थेंबांचे सुरेख नर्तन सुरु असायचे. एका सरळ रेषेत चालू असणारे हे पावसाचे नर्तन कधी वार्‍यामुळे वार्‍याच्या दिशेने बदलत राहायचे. त्याला लेहरिया प्रकारचे स्वरूप प्राप्त व्हायचे तेव्हा शलाकाला खूपच आनंद व्हायचा. तो नजारा ती भान हरपून पाहत राहायची. अशाप्रकारे निसर्गाच्या सानिध्यात कधी निसर्गाची किमया अनुभवत तिचा अभ्यास सुरु होता. त्यावेळी तिला असे वाटायचे की पूर्वीचे ऋषी, मुनी उगाचच नाही जंगलात जाऊन तप करायचे! निसर्गाचा हा खेळ पाहत त्यांचे तप नक्कीच सुखद होत असेल. सलग करण्यात येणार्‍या तपाच्या काळात थोड्या थोड्या वेळाने येणारा निसर्गातील हा बदल त्यांना उत्साहवर्धक वाटत असणार म्हणूनच त्यांना सलगपणे करण्यात येणार्‍या तपाचा कंटाळा येत नसावा.

एके दिवशी असाच पाऊस पडत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. शलाकाचे काही कागद विखूरलेले होते. त्यातील काही कागद त्या चिंचेच्या झाडाजवळ उडून पडले. कागद खराब होऊ नयेत म्हणून शलाका भर पावसात ते गोळा करण्यासाठी त्या झाडाजवळ आली तेव्हा तिला कोणाच्यातरी रागावण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज एका स्त्रीचा होता. पावसात खेळणार्‍या आपल्या मुलांना ती स्त्री त्यांनी पावसात भिजू नये म्हणून आवर घालत होती. रागावत होती. ‘‘चला, पावसात भिजू नका, आजारी पडाल, घरात चला’’ म्हणून ती त्यांना बळजबरी करत होती पण मुले खेळण्याच्या मुडमध्ये होती. ती अजिबात आईचा आदेश मानायला तयार नव्हती. त्यामुळे वैतागून ती करवादत होती आणि तिचे ते ओरडणे पाहून मुले अधिकच उच्छाद मांडत होती. हसून तिची खिल्ली उडवत होती. हे सारे आवाज शलाकाला ऐकू येत होते पण कोणीच दिसत नव्हते. एरव्ही दिवसा असा नजारा तिला नेहमीच दिसत होता. कॉलनीतील तृतीय वर्गाच्या कर्मचार्‍यांची मुले अशीच झाडावर चढून कधी चिंचा काढ, पेरू काढ, आंबे काढ असा उच्छाद मांडायची. पिकण्याआधीच फळांचा फडशा पाडायची तेव्हा रखवालदार त्यांच्यापाठी धावून त्यांना तेथून हुसकून लावायचा पण तेच दृश्य एवढ्या रात्री घडत असताना ती प्रथमच पाहत होती, अनुभवत होती. तिला तेथे मात्र कोणाचीच उपस्थिती जाणवत नव्हती.
आता मात्र शलाकाची चांगली टरकली होती. एक अनामिक भीतीचा काटा तिच्या अंगावर उभा राहिला होता. काहीतरी अनाकलनीय असे तेथे घडत होते, जे अमूर्त होते, भीतीदायक होते. थोडा वेळ विचार करत ती तेथेच उभी होती. तिला आकलन होत नव्हते की इतक्या रात्री ही मुले भर पावसात येथे कशाला आली असतील? आणि  त्या झाडाला अजून चिंचा तर आल्याच नव्हत्या मग त्यांचे ह्या झाडावर येण्याचे प्रयोजन काय असावे? आणि त्यांची आई देखील इतक्या रात्री त्यांचा मागोवा काढत येथे कशाला आली असावी? तिने तर ह्यावेळी घरात, झोपेत असायला पाहिजे. तिला काहीच उमगत नव्हते पण आता यावर फारसा विचार करणे योग्य नाही म्हणून तिने आपले अभ्यासाचे कागद घेऊन तेथून काढता पाय घेतला आणि पुन्हा व्हरांड्यात येऊन अभ्यासात मग्न झाली. तरीही तिला राहून राहून आश्चर्य वाटत होते की इतक्या भर पावसात तिचे कागद कसे भिजले नाहीत? हा देखील एक अजुबा ती आज अनुभवत होती.
अर्थात शलाका एका आय.एफ.एस. अधिकार्‍याची मुलगी होती. लहानपणापासूनच तिचा वन आणि वन्यजीवनाशी परिचय होता. अशा कित्येक दुर्गम ठिकाणी ती बालपणापासूनच वावरली होती. त्यामुळे अशा गोष्टींना ती घाबरत नव्हती. ते विचार बाजूला सारून ती परत अभ्यासात मग्न होत असे.
उद्यापासून तिची सहामाही परीक्षा सुरु होणार होती. परीक्षेला जाण्यासाठी शलाका तयार होत होती. शाळेचा युनिफॉर्म घालून तिने आरशात डोकावले आणि त्यातील चित्र पाहून ती चरकली. एक स्त्री तिचे आरशातील प्रतिबिंब न्याहाळत होती. तिने पटकन पाठीमागे वळून पाहिले तर तेथे कोणीच नव्हते. बहुतेक आज घरकामासाठी नवीन बाई कामाला आली असेल आणि फक्त आरशात डोकावून पाहून आपल्या कामासाठी निघून गेली असेल असे तिला वाटले. तोच बाहेर गाडीचा हॉर्न ऐकू आला. कालिका शाळेत जाण्यासाठी उतावीळ झाली होती आणि दीदीला परीक्षेला जायला उशीर होईल म्हणून जोरजोराने हाक मारत होती. म्हणून घडलेल्या घटनेबद्दल फारसा विचार न करता ती गाडीत येऊन बसली आणि परीक्षेत येणार्‍या संभाव्य प्रश्नांची मनातल्या मनात उजळणी करू लागली.
आज तिचा इंग्रजीचा पेपर होता. पेपर संपल्यावर दोघी बहिणी आज लवकरच घरी परतल्या होत्या. उद्या गणिताचा पेपर होता. त्यामुळे घरी आल्यावर जेवण करून दोघीही अभ्यासाला बसल्या. आपल्या बेडवर बसून कालिका अभ्यास करत होती आणि स्टडी टेबलवर बसून शलाका अभ्यास करत होती. कालिकेचा देखील दुसर्‍या दिवशी गणिताचाच पेपर होता. अधूनमधून काही अडचणी आल्यास कालिका शलाकालासारख्या शंका विचारीत होती. त्यामुळे शलाकाला डिस्टर्ब होत होते. तिला सारखे टेबलवरून उठून कालिका जेथे बेडवर बसली होती तेथे जावे लागत होते म्हणून आता शलाका देखील स्टडी टेबलवरून उठून तिच्याजवळ येऊन बसली होती. आता शलाकाने भूमितीचा अभ्यास सुरु केला होता. तिला कंपासची गरज होती म्हणून ती बेडवरून उठू पाहत होती तोच कंपास तिला बेडवर दिसले. तिला चांगल्या प्रकारे आठवत होते की, तिचा कंपास टेबलवरच होता पण आता तो बेडवर कसा आला? तिला थोडेसे आश्चर्य वाटले पण कालिकानेच तो तिच्या उपयोगासाठी बेडवर ठेवला असेल, असे वाटले आणि ती भूमितीची प्रमेये सोडवू लागली. बरीच प्रमेये सोडवल्यावर शलाकाने हातातील पेन्सिल खाली ठेवली आणि आळोखे देत सहजच समोर असलेल्या आरशात तिची नजर गेली. तो सकाळी दिसलेली बाई तिला आरशात दिसली पण ती बाई आरशासमोर दिसत नव्हती. तिने इकडे तिकडे नजर फिरवली पण तेथे कोणीच नव्हते. तिने खिडकीतून बाहेर डोकावून देखील पाहिले पण खिडकीच्या बाहेर देखील कोणीच नव्हते. तिने कालिकाला ‘‘आपल्या घरी कोणी नवीन बाई कामाला आली आहे का?’’ असे देखील विचारले पण कालिकाने देखील ‘‘मला काही कल्पना नाही’’ असे उत्तर दिले. गेले असेल कोणीतरी डोकावून, अशी मनाची समजूत घालून शलाकाने आपला मोर्चा परत अभ्यासाकडे वळवला.
पाहता पाहता शलाका आणि कालिकाची सहामाही परीक्षा संपली. दोघींनाही पेपर सोपे गेले होते. परीक्षेदरम्यान शलाका रात्रीचा अभ्यास आपल्या ठरलेल्या जागी म्हणजेच व्हरांड्यातच करत होती पण त्या दरम्यान असे काहीच घडले नव्हते. त्यामुळे ती त्या घटना विसरूनही गेली होती.
हायस्कुलच्या परीक्षा संपल्यावर आता शाळेत चौथी ते सातवीच्या परीक्षा सुरु झाल्या होत्या. एके दिवशी शाळेत जाताना शलाका आपले कंपास आणि पेन शोधत होती पण तिला तिचे कंपास आणि पेन कुठेच सापडत नव्हते. शलाका नेहमीच आपल्या शालेय वस्तू तिच्या अभ्यासाच्या टेबलवरच ठेवायची. कदाचित कालिकेने तिच्या ह्या वस्तूंना हात लावला असेल म्हणून तिने कालिकेला देखील विचारून पाहिले पण कालिका तिला उत्तर देत नव्हती. यावरून ही बदमाशी नक्कीच कालिकेने केली असावी ह्याची तिला खातरी पटली पण कालिका जाम उत्तर देत नव्हती. शाळेला उशीर होत असल्याने शलाका आता कालिकेवर भडकली होती. ‘‘अगं मूर्ख मुली, लवकर सांग तू माझ्या वस्तू कुठे लपवून ठेवल्या आहेस? शाळेला उशीर होतोय. बर्‍या बोलाने माझ्या वस्तू दे नाही तर…!’’
आता कालिकाही चिडली होती. ती म्हणाली, ‘‘दीदी मला माहीत नाही. मी तुझ्या वस्तू घेतल्या नाहीत. तूच कुठेतरी ठेवल्या असतील.’’
हे तिचे बेपर्वाइचे उत्तर ऐकून शलाका जाम चिडली आणि धुसफुसतच गाडीत जाऊन बसली. रस्त्याने दोघी बहिणी एकमेकींशी बोलल्या देखील नाहीत. त्यांच्यातील तो अबोला पुढे बरेच दिवस चालला.
तब्बल पंधरा दिवसांनी कालिकाने आपली चुप्पी तोडली आणि ती शलाकाला घेऊन त्या चिंचेच्या झाडाखाली आली आणि काय आश्चर्य? शलाकाचा कंपास, पेन, पेन्सिल झाडाखाली विखूरलेल्या दिसल्या. हेही कारस्थान कालिकाचेच असेल म्हणून शलाका तिच्यावर भडकली. तिने एक जोरदार थप्पड तिच्या मुखात मारली आणि आपले साहित्य घेऊन ती घरात आली कारण शलाकाला तिचे साहित्य कालिकाने इतक्या दिवस लपवून ठेवले याचा संताप आला होता. कालिका आपला गाल चोळत तेथेच रडत बसली होती. हे दृश्य शलाकाच्या आईने पाहिल्यावर ती धावतच कालिकाजवळ गेली आणि ‘‘काय झाले बाळा?’’ म्हणून तिला विचारू लागली पण कालिका तिला उत्तर देऊ शकली नाही. अखेरीस कालिका तिला काय उत्तर देणार होती? तिला तिचेच समजत नव्हते की तिने असे का केले? परीक्षेपूर्वी एक महिला कालिकेकडे येऊन तिने तिला, ‘‘माझ्या मुलांच्या परीक्षा सुरु होणार आहेत, आम्ही खूप गरीब लोक आहोत. माझ्याकडे शालेय साहित्य खरेदी कारण्यासाठी पैसे नाहीत. आता तुमच्या परीक्षा संपल्या आहेत तर तुमचा कंपास, पेन, पेन्सिल माझ्या मुलांना परीक्षेपुरत्या वापरायला द्या, परीक्षा झाल्यावर मी त्या तशाच तुम्हाला परत करीन’’ या बोलीवर कालिकाकडून घेऊन गेली होती.
कालिकाला त्या बाईची कणव आली.  शलाकाची परीक्षा संपली होती म्हणून तिने तिचे कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल त्या बाईच्या पोरांना परीक्षेपुरत्या वापरायला दिल्या होत्या. कालिका चित्रकार होती. तिला कंपास, पेन्सिल लागणार होते म्हणून तिने दीदीचे साहित्य त्या बाईला दिले होते आणि त्यात ती काही गुन्हा करतेय, असे तिला अजिबात वाटले नव्हते. ‘‘तू असे का केलेस बेटा?’’ असे मीराताईंनी रडणार्‍या कालिकेला विचारल्यावर तिने ही बाब आईला सांगितली होती. खरंतर यावर शलाकाने चिडण्याचे काहीच कारण नव्हते पण आता तिचा राग शांत करून तिला सत्य परिस्थिती सांगणे मीराताईंना भाग होते. म्हणून त्या शलाकाची समजूत घालण्यासाठी कालिकाला घेऊन तिच्याजवळ आल्या. आईने शलाकाला हे सांगितल्यावर ती थोडी शांत झाली आणि तिने कालिकेला विचारले, ‘‘कोण बाई? आणि कोण आहेत तिची मुले?’’
‘‘अगं दीदी, तीच बाई कधी खिडकीतून डोकावून बघायची, कधी घरात दिसायची, कधी चिंचेच्या झाडाखाली विमनस्क परिस्थितीत बसलेली दिसायची. खूप गरीब दिसत होती गं ती! मला तिची दया आली म्हणून मी हे सर्व केले.’’
त्या अनामिक बाईचा विषय निघाल्यावर शलाका हादरलीच. कारण तिला सुद्धा अशीच बाई कधी खिडकीबाहेर, घरात दिसत होती. आईने नवीन मोलकरीण ठेवली असावी म्हणून तिने जास्त चौकशी केली नव्हती पण आता तिने आईला विचारले, ‘‘मम्मा त्या बाईला तू कामाला ठेवले आहेस का?’’
मुलींचा प्रश्न ऐकून आता मीरा पण विचारात पडली कारण तिने अशी कोणतीच मोलकरीण अलीकडे कामावर ठेवली नव्हती. म्हणून शलाका अधिकच विचारात पडली. तिने कालिकाला तिचे चित्र काढायला सांगितले आणि चित्र पाहताच शलाका ओरडली, ‘‘हीच ती बाई आहे, जी मला अनेकदा दिसली होती. मम्मा ह्याच बाईला तू कामावर ठेवले आहेस का?’’ असे ही तिने आईला विचारले पण मीराने नकार दिल्यावर मात्र शलाका आणि कालिका चांगल्याच घाबरल्या आणि त्यांची आई देखील विचारात पडली. ही कोण बाई असावी? जिने परस्पर आपल्या मुलींशी संधान साधून त्यांच्याकडून मदत घेतली असावी. वास्तविक पाहता तिला अशा मदतीची आवश्यकता होती तर तिने सरळ येऊन आपल्याला विनंती केली असती तर तिच्या मुलांसाठी आपण कंपास, पेन, पेन्सिलच काय, पुस्तके आणि वह्या देखील दिल्या असत्या.
आता ती बाई कोण होती? याचा तर उलगडा झाला होता. ती शलाकाला दिसत होती, कालिकाला देखील दिसत होती. कदाचित ती आपल्याला विचारायला घाबरत असेल म्हणून तिने त्या दोघींशी संपर्क साधला असेल, हेही ठीक होते पण तिचा वावर आपल्या घरात होता आणि तरीही ती आपल्या नजरेस पडली नाही, याचा मात्र मीराला अचंबा वाटत होता. आता ही काय भानगड आहे, त्याच्या मुळाशी जाण्याचे मीराने ठरविले होते कारण कोण कोणाची ती बाई? ती आपल्या मुलींना दिसते काय? आपल्या मुलींकडून मदत मागते काय? उद्या आपल्या भोळ्या मुलींच्या भोळेपणाचा फायदा घेऊन ती घरातील वस्तू, पैसे, दागिन्यांवर डल्ला मारणार नाही कशावरून? याची काळजी मीराला पडली होती. मुलींना विश्वासात घेत तिने विचारले, ‘‘बरं, आता झाले ते झाले. कालिका तू तिच्या मुलांना योग्य मदत केलीस, ही चांगलीच गोष्ट आहे पण त्या बाईला अजूनही काही बर्‍याच अडचणी असतील. आपण तिला भेटू, तिच्याशी बोलू, तिच्या समस्या जाणून घेऊ मग आपल्याला तिला अधिक मदत करता येईल. तेव्हा ती तुम्हाला दिसल्यावर मला लागलीच सांगा’’ यावर तिघींचेही मतेक्य झाले. आता शलाका आणि कालिकामधील अबोला संपला होता. त्या आता एकमेकींशी आपले अनुभव शेअर करू लागल्या होत्या. त्यांना दिसणारी बाई एकच होती आणि ती त्यांना चिंचेच्या झाडाच्या आसपास अथवा अंगणात दिसत होती.
आज दोघी मुलींना विश्वासात घेऊन मीराने त्या झाडाच्या आसपास बराच शोध घेतला. कॉलनीत अशा स्वरूपाची कोणी बाई आहे का, जिला चार मुले आहेत ह्याचा पण शोध घेतला पण तिला उपयुक्त माहिती मिळाली नाही. मग रात्रीची ती शलाकाला दिसू शकते, अशी शक्यता शलाकाने व्यक्त केल्यावर कालिका आणि मीरा आज रात्रीच्या शलाकाबरोबर जागण्यास तयार झाल्या.


रात्रीचा बरोबर एक वाजला होता. वातावरणात निरव शांतता पसरली होती. वारा स्थब्ध झाला होता आणि तोच चिंचेच्या झाडाची विचित्र सळसळ सुरु झाली. मुलांच्या धुडगूस घालण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. इतक्या रात्रीची ही मुले येथे कसले खेळ खेळताहेत? म्हणून सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली. वास्तविक पाहता ही सर्वांचीच झोपेची वेळ होती पण ही मुले तर येथे दंगा घालण्यात मग्न होती. तोच त्यांच्या आईचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ती त्यांना ‘दंगा घालू नका’ म्हणून दरडावीत होती. तोच कालिकाने तिला शुक, शुक केले. आवाजासरशी तिने मागे वळून पाहिले. समोर कालिका, शलाका आणि मीरा उभ्या होत्या. त्यांना पाहताच ती सर्द झाली आणि पुढे येत तिने कालिकाला हात जोडले आणि म्हणाली, ‘‘माफ करा ताईसाहेब, माझ्यामुळे तुम्हाला मोठ्या ताईसाहेबांचा ओरडा खावा लागला. आता येथून पुढे मी कसलीही मागणी तुमच्याकडून करणार नाही. झाली माझ्याकडून चूक, एक डाव माफ करा.’’
तेव्हा पुढाकार घेत मीरा म्हणाली, ‘‘अगं, माफी कशाला मागतेस? तुझ्या मुलांची ती आवश्यकता होती. केली ताईने मदत! त्यात माफी मागण्याचे कारण नाही पण हिच गोष्ट जर तू मला सांगितली असतीस तर मी लागलीच तुझ्या मुलांना शालेय साहित्य घेऊन दिले असते. बरं, आता ते जाऊ देत. कुठे आहेत तुझी मुले? कितवीत शिकत आहेत? त्यांच्या काय गरजा आहेत? मला सांग. उद्या मी त्यांना ह्या सर्व वस्तू घेऊन देते आणि इतक्या रात्री तुम्ही सर्व जण येथे काय करत आहात? कुठे आहे तुमचे घर? अन तुझा नवरा कुठे आहे? ही तर वन खात्याची कॉलनी आहे. तुझा नवरा येथे नोकरीला आहे का?’’
एकामागून एक प्रश्नांचा भडीमार मीरा करत होती आणि  निश्चलपणे उभी राहून ती महिला ते सर्व ऐकत होती. मीराचे बोलणे थांबल्यावर ती महिला म्हणाली, ‘‘अहो, बाईसाहेब आम्हा गरिबांना कसले आलेय हो घर? हे झाड हेच आमचे घर अन हाच आमचा निवारा. माझी कर्मकहाणी अतिशय दर्दनाक आहे. माझा नवरा ह्याच वनखात्यात चतुर्थ कर्मचारी म्हणून काम करत होता. एका हादस्यात तो मारला गेला. त्यावेळी रात्री जंगल तोडण्यासाठी आलेल्या माफियाच्या टोळीने तो गस्त घालत असताना त्याला गोळ्या घातल्या कारण त्यांना जंगलातील झाडे तोडून न्यायची होती पण हा आडवा आला! आपल्या ड्युटीला जागला म्हणून त्यांनी त्याचा खून केला अन पळून गेले. पंधरा दिवस त्याचा पत्ता नव्हता. म्हणून मी वनखात्याकडे तक्रार करायला गेले तर त्यावेळचा वनखात्याचा अधिकारी माझ्यावरच गुरकवायला लागला. म्हणाला, ‘‘दारू पिऊन पडला असेल जंगलात कुठेतरी! साले, ड्युटीवर असताना दारू पितात, आपली ड्युटी नीट करत नाहीत अन त्यांची बायका,  पोर येथे येऊन आम्हाला त्रास देत बसतात. चल, चालती हो येथून! असेल जिवंत तर येईल तो परत!’’ असे म्हणून त्याने अक्षरशः हाताला धरून बाहेर हाकलून दिले. मी बिचारी बाई माणूस! इकडे नवर्‍याचा पत्ता नाही, पोटी लहान कच्चीबच्ची! म्या कशी व ह्यांच्याशी काय बोलणार? ती मोठी माणसं होती. त्यांच्यापुढे माझा कसा हो निभाव लागणार? मी दोन महिने वाट पाहिली पण माझा नवरा घरी आला नाही पण त्याच्या जिवाचे काही बरे-वाईट झाले असावे, यावर ईश्वास तरी हो कसा ठेवणार? त्याचा मृतदेह देखील सापडला नव्हता. कदाचित त्याचे कोणी अपहरण केले असावे म्हणून मग मीच त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आणि जंगलाच्या दिशेने निघाले.
मी अन माझी पोरं, आम्ही दररोज जंगलात त्यांचा शोध घेत होतो. जी काही कंदमुळे, फळे जंगलात मिळायची ती खाऊन भूक भागवत होतो अन् संध्याकाळी वन खात्याने दिलेल्या एका रूममध्ये येऊन झोपत होतो. नवरा बेपत्ता, हातात पैसा नाही, खात्याकडून त्याचा शोध घेण्याचा कोणता प्रयत्न नाही अशा स्थितीत असताना एके दिवशी त्या ऑफिसरने मला खोली  खाली करायला सांगितली अन् आम्ही बेघर झालो. जंगलाचा आधार घेतला अन् तेथे झोपडी बांधून राहू लागलो. ही गोष्ट त्या ऑफिसराच्या लक्षात आल्यावर त्याने एका रात्री माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी इतरही बरेच जण तेथे उपस्थित होते पण ते वनखात्यातील दिसत नव्हते. बहुधा ते जंगलतोड करून लाकडांची चोरी करणारे चोर होते आणि तो ऑफिसर त्यांना सामील होता. माझ्या मुलांच्या देखत त्यांनी मला निर्वस्त्र करून एकेकाने माझ्यावर अतिप्रसंग केला होता. त्यावेळी असे वाटले होते की, हे विटाळलेले शरीर आता नष्ट करावे अन् आत्महत्या करावी पण ह्या कच्च्याबच्चाकडे पाहून मन धजावत नव्हते. एक तर त्यांचा बाप जिवंत होता की नाही, ह्याची शाश्वती नव्हती. आता मी पण त्यांना सोडून गेले तर त्यांचे काय होणार? याची भीती वाटत होती पण त्या दिवसानंतर दररोजच तो ऑफिसर त्या लोकाना घेऊन येऊ लागला आणि माझ्यावर दररोज बलात्कार होऊ लागला. आता मात्र माझा संयम सुटू लागला होता. मी परत मला न्याय मिळावा म्हणून वन खात्याच्या ऑफिसमध्ये गेले. तेथे त्या ऑफिसरच्या हाताखाली काम करणार्‍या दुसर्‍या ऑफिसरला आपली कर्मकहाणी सांगितली पण त्याने माझे म्हणणे फारसे मनावर घेतले नाही कारण तो ऑफिसर त्याचा वरिष्ठ होता. तो त्याच्या विरोधात जाऊच शकत नव्हता. इकडे बलात्काराचे सत्र सातत्याने सुरु होते. त्यावेळी माझी मुले त्यांना विरोध करत असत. तेव्हा ती माणसे त्यांना देखील बेदम मारत असत. असे बरेच दिवस चालले होते. माझ्या नवर्‍याला ना त्याचे गाव होते, ना कोणी नातेवाईक! मी कुठे जाणार होते? माझ्यापुढे भविष्यातील अंधार पसरला होता.
एके दिवशी नवर्‍याचा शोध घेत असताना मला त्याचे प्रेत सापडले. प्रेत कुजले होते. फक्त सांगाडा उरला होता पण त्याच्या हातात देवीच्या मंदिरात गेलेले असताना त्याने एक कडे घेतलेले होते, तोच एक पुरावा मला मिळाला होता. आता मी रागाने बेभान झाले होते. तो कडा घेऊन मी त्या ऑफिसरकडे गेले. ते पाहून तो जरासा चरकला अन् माझ्याशी नरमाईने बोलू लागला. मला ‘ह्याचा बोभाटा करू नकोस, मी तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतो’ असं म्हणू लागला. आता नवर्‍याचा आधार तर तुटलाच होता. निदान मुलांच्या पोटापाण्याची तरी सोय होईल म्हणून मी त्याच्या गोड बोलण्याला भुलले आणि त्याचा प्रस्ताव मान्य केला पण आता ती चोरांची टोळी त्याचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्यांना माझ्या शरीर उपभोगाची चटक लागली होती. उद्या काही कमी-जास्त झाले तर ही बाब आपल्यावर शेकणार, ह्याची त्याला भीती वाटू लागली होती. म्हणून एके दिवशी त्याने गोड बोलून मला डोंगराच्या कडेला नेले आणि बेसावध क्षणी मला अन् माझ्या पोरांना दरीत ढकलून दिले. एका मागोमाग एक किंकाळ्या तेथे गुंजल्या पण त्या कोणालाच ऐकू गेल्या नाहीत अन् माझा संपूर्ण वंश माझ्यासह संपून गेला’’ अन् ती जोरजोराने रडू लागली.
‘‘मग त्यानंतर तू काय केलेस? अन् आता ह्या अदृश्य अवस्थेत तू काय करायचे ठरविले आहेस?’’ मीराने तिला विचारले. आता मीराला ही महिला अन् तिची मुले हयात नाहीत तर त्यांचे आत्मे आपल्यापुढे उभे आहेत, ह्याची जाणीव झाली होती पण जसे दुष्ट आत्मे ह्या जगात आहेत तसेच सुष्ट आत्मे देखील ह्या जगात आहेत, याची जाणीव होती म्हणून ती भ्यायली नाही. तिने त्या स्त्रीशी संवाद पुढे चालूच ठेवला.
‘‘मग काय करणार बाईसाहेब? तेव्हापासून मी माझ्या पोरांना घेऊन ह्या सुरक्षित स्थानी आले आणि आता माझा मुक्काम ह्या चिंचेच्या झाडावर आहे. माझ्यावर कुकर्म करणार्‍या त्या नराधमाचा मला बदला घ्यायचा आहे. त्याला शिक्षा करायची आहे. त्याचे खरे स्वरूप जगापुढे आणायचे आहे, तोपर्यंत आमच्या जिवाला मुक्ती मिळणार नाही. मला माहीत आहे, आज तुम्ही ज्या बंगल्यात राहत आहात, तेथेच तो नराधम राहत होता. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठीच मी येथे थांबून आहे पण पुढे असे कळले की, त्याने आम्हाला संपवल्यावर येथून पळ काढला होता अन् दुसर्‍या लांब ठिकाणी आपली बदली करून घेतली होती अन् त्या ठिकाणी आपल्या यजमानांची नियुक्ती झाली होती. आता मला त्यांच्या मदतीने त्या नराधमाचा शोध घ्यायचा आहे, न्याय मिळवायचा आहे.’’ एवढे बोलून ती बोलायची थांबली.
थोडावेळ तेथे स्मशानशांतता पसरली. मीरा देखील विचारमग्न झाली. तिला आता त्या महिलेची कणव वाटू लागली होती. जगात किती दुष्ट लोक असतात की जे निरपराध लोकाना आपल्या अधिकाराच्या जिवावर जीव नकोसा करुन टाकतात, ह्याची जाणीव झाली होती. ह्या प्रकरणाचा परदाफाश झालाच पाहिजे, असे मीराला प्रकर्षाने वाटू लागले होते पण स्पष्ट आराखडा तिच्या मनात आकारास येत नव्हता. ती फक्त त्या महिलेला आश्वस्त करीत एवढेच म्हणाली, ‘‘तुला, तुझ्या नवर्‍याला अन् मुलांना न्याय नक्कीच मिळेल. हा मी तुला शब्द देते. तोपर्यंत शांत राहा. तुला काही मदत लागल्यास नि:संकोच मला सांग. मी तुला नक्कीच मदत करेल.’’
त्याच रात्री मीराने आपण येथे येण्यापूर्वी कोण वन अधिकारी येथे नोकरीस होता, याची चौकशी केली. आता त्याची बदली कुठे केली आहे? हे देखील विचारले. खरं तर मीराचा ह्या गोष्टींशी काहीच संबंध नव्हता. तरीही ती चौकशी करत होती. म्हणून भाऊसाहेब जरा विचारात पडले. त्यावेळी त्या महिलेची संपूर्ण कथा तिने भाऊसाहेबांना सांगितली आणि त्याची येथून बदली झाली नव्हती तर त्यानेच आपली बदली विनंती करून करवून घेतली होती, असे मीराने नवर्‍याला सांगितले. हे सर्व ऐकून भाऊसाहेब विचारात पडले. त्यांच्या 15-20 वर्षांच्या नोकरीच्या कार्यकाळात असा अनुभव कधीच आला नव्हता आणि वन अधिकार्‍याच्या महत्त्वपूर्ण पदी नेमलेल्या एका अधिकार्‍याने असे वर्तन केल्याचेही स्मरत नव्हते कारण वनअधिकारी तर तेथील सर्वोत्तम पदावर विराजमान असलेला जबाबदार अधिकारी असतो. वनसंपदेचे चोरट्यांपासून रक्षण करणे, वन संवर्धन करणे, आपल्या हाताखालील कर्मचार्‍यांचे हित पाहणे, हेच त्याचे मुख्य काम असते. जर वनअधिकारीच असे वागू लागला आणि चोरट्यांना सामील होऊन वनाची नासधूस करू लागला तर ते अतिशय ऑब्जेक्शनेबल काम होते आणि एक जबाबदार वन अधिकारी असल्याने त्यांना ह्या बाबतीत लक्ष घालणे महत्त्वाचे वाटत होते. त्या वन अधिकार्‍याची नियुक्ती आसामच्या एका दुर्गम भागात झाली होती. नव्हे त्यानेच आपले कुकर्म जगाला कळू नये म्हणून जाणीवपूर्वक तेथे बदली करून घेतली होती. आता भाऊसाहेबही गंभीर झाले होते. त्यांनी पण ह्या प्रकरणाचा छडा लावण्याचा निश्चय केला आणि दुसर्‍या दिवसापासून तपासास सुरुवात केली.


तपासाअंती असे लक्षात आले होते की, रामबिहारी नावाचा चतुर्थ श्रेणी कामगार त्यावेळी ह्या वन खात्यात नोकरीला होता. वन खात्यातर्फे त्याला एका रूमचे क्वार्टर देखील देण्यात आले होते. त्याला बायको व चार मुले देखील होती. एके दिवशी रामबिहारी आश्चर्यकारकरित्या गायब झाला. प्रथमत: असे वाटले की, गावाकडे काही गंभीर समस्या निर्माण झाली असेल म्हणून तो तातडीने निघून गेला असेल. येईल परत दोन-तीन दिवसांनी! म्हणून त्याच्याबद्दल कोणीच चौकशी केली नाही. त्यानंतर त्याची बायको, नवरा गायब झाला म्हणून तक्रार करायला ऑफिसमध्ये आली होती पण नागराज, त्या वन अधिकार्‍याने तिला ‘पडला असेल दारू पिऊन कुठेतरी जंगलात! येईल दोन-तीन दिवसांनी परत’ असे उत्तर देऊन वाटे लावले होते. नंतर काही दिवसांनी त्याची बायको देखील मुलांसह दिसेनासी झाली. एव्हाना रामशरण बिहारी देखील परत आला नव्हता. बहुधा गावाकडे काही बरे-वाईट घडले असेल म्हणून ती देखील मुलांसह गावी निघून गेली असेल, असेच सर्वांना वाटत होते. शिवाय नागराजसाहेब वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी ह्या प्रकरणात लक्ष घातले होते म्हणून इतर अधिकारी आणि कर्मचारी ह्या भानगडीत पडले नव्हते. त्यानंतर नागराज साहेबांची बदली आसामच्या वन खात्यात झाली व त्या जागी भाऊसाहेब जाधव या वरिष्ठ वन अधिकार्‍याची नेमणूक झाली. त्यांनी चार्ज घेतल्यावर एक-दोनदा मस्टरवरील रामशरणची अनुपस्थिती पाहून हाताखालील कर्मचार्‍यांना विचारले देखील होते पण तो एकदा काही कामानिमित्त गावाला गेला तो परत आलाच नाही अन त्यानंतर त्याची बायको, मुले देखील गावाकडे निघून गेली, असे त्यांना सांगण्यात आले होते. शिवाय रामशरणचा गावाकडील पत्ता देखील कोणाकडे नव्हता म्हणून आता तो परत आल्यावर बघू, असा विचार करून भाऊसाहेब देखील स्वस्थ बसले होते. आज एक वर्ष होत आले तरी रामशरण परतला नव्हता. त्यातच मीराने त्यांना त्याच्या कुटुंबियांविषयी ही नवीन बातमी सांगितली होती. आता तर ह्याचा तपास करणे त्यांच्यासाठी गरजेचे ठरले होते. एखादा कर्मचारी तब्बल एक वर्ष गायब आहे आणि त्याची वनखाते दखल देखील घेत नाही, ही बाब वनखात्यासाठी लज्जास्पद होती.
पुढे जाता भाऊसाहेबांनी नागराजची  कुंडली शोधून काढली. त्यावेळी त्यांच्या हे देखील लक्षात आले की, नागराज चांगल्या चालचलनचा व्यक्ती नव्हता. त्याने कित्येकदा आदिवासी मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. कर्मचार्‍यांच्या बायकांवर देखील त्याची वाईट नजर होती. काही कामानिमित्त तो उगाचच कर्मचार्‍यांच्या बायकांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्या अंगचटीला यायचा पण तो वरिष्ठ अधिकारी होता म्हणून कोणीच कर्मचारी त्याच्याविरुद्ध बोलायला अथवा काही अ‍ॅक्शन घ्यायला धजावत नव्हते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते कारण त्यांना सरकारी खात्यातील आपल्या नोकरीची चिंता होती.
त्याने रामशरणच्या बायकोच्या बाबत देखील तसेच गलिच्छ वर्तन केले. त्याला माहीत होते, रामशरण त्या गुंडांच्या टोळीकडून मारला गेला आहे पण त्या चौर्यकर्मात तो देखील सामील होता. आपले हे कृष्णकृत्य बाहेर येऊ नये म्हणून तो रामशरणच्या बायकोची दिशाभूल करत होता. दारूची नशा उतरल्यावर तो घरी येईल म्हणून त्याच्या बायकोला समजावीत होता पण आता रामशरणच्या बायकोकडून भाऊसाहेबांना असली हकीकत समजली होती. नागराजने केवळ रामशरणचीच हत्या केली नव्हती तर त्याच्या बायकोवर कित्येक दिवस अत्याचार करून तिला आणि तिच्या अबोध मुलांना यमसदनी पाठवले होते. हे त्याचे कृत्य नक्कीच आक्षेपार्ह तर होतेच, असमर्थनीय होते आणि क्षमा करण्यायोग्य देखील नव्हते. त्यांचा संताप वाढत चालला होता. केव्हा एकदा त्या नागराजला गाठतो अन् त्याने केलेल्या कुकर्माची जबानी घेतो, असे त्यांना होऊन गेले होते पण रामशरणच्या हयात नसलेल्या बायकोवर आणि तिच्या कथनावर कोणीच विश्वास ठेवला नसता. त्यासाठी भक्कम पुराव्याची गरज होती. आता हा पुरावा कसा उपलब्ध करायचा? या विवंचनेत भाऊसाहेब पडले होते कारण त्यांना सरळ नागराजवर आरोप करता येत नव्हता आणि केला असता तर त्याने तो स्वीकार देखील केला नसता. त्यांनी हे प्रकरण सबुरीने हाताळायचे ठरविले होते. तोपर्यंत रामशरणच्या बायकोला शांत राहण्यास मीराकरवी सांगितले होते.
पुढच्या आठ दिवसातच ते वन खात्याचे काम काढून आसामला पोहोचले. तेथील वनखात्याच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरले. आता एक ऑफिसर आपल्या इलाक्यात गेस्ट हाऊसमध्ये आला आहे, हे समजल्यावर नागराजला त्याची भेट घेणे प्रोटोकॉलप्रमाणे भाग होते. म्हणून नागराज त्यांना भेटायला आला. त्याने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. आग्रहाने आपल्या घरी जेवायला बोलविले. त्याचे आदरातिथ्य  स्वीकारल्यावर भाऊसाहेबांनी त्याला चंपारण्यला आग्रहपूर्वक बोलाविले. त्या भेटीदरम्यान त्यांनी रामशरण आणि त्याच्या कुटुंबीयांविषयी चकार शब्द देखील काढला नाही. त्यामुळे ही भाऊसाहेबांची सदिच्छा भेट होती, उगाचच आपण घाबरलो होतो, अशी नागराजची समजूत झाली. त्याने खुशीखुशी भाऊसाहेबांना विदा केले आणि चंपारण्यला येण्याचे कबूल केले. असे म्हणतात की, गुन्हेगार जीवनात एकदा तरी गुन्हा केला आहे, त्या ठिकाणी सर्व काही अलबेल आहे ना? हे पाहण्यासाठी येतच असतो. नागराजची देखील तशीच स्थिती होती पण त्याला येण्याचे धाडस होत नव्हते पण आता आयतीच संधी चालून आली होती. भाऊसाहेबांनी त्याला आग्रहाने चंपारण्यला बोलविले होते.

पुढच्याच महिन्यात नागराज चंपारण्यला भाऊसाहेबांकडे आला. भाऊसाहेबांनी त्याचे अगत्यपूर्वक स्वागत केले. त्याला गेस्ट हाऊसमध्ये उतरू न देता आपल्या घरीच त्याचा मुक्काम ठेवला. त्याच्यासाठी जंगी पार्टीचे आयोजन केले. त्या दिवशी मीराने देखील विविध प्रकारचे पदार्थ बनवून सुग्रास जेवण बनवले होते. पार्टीत मदीरेचा देखील वापर करण्यात आला होता. भाऊसाहेब स्वतः नागराजला आग्रह करून त्याचा पेग बनवीत होते. एका पाठोपाठ चार-पाच पेग रिचवल्यावर  आता नागराजला चांगलीच चढली होती. तो भाऊसाहेबांचे कौतुक करत होता. ‘असा उमदा आणि मोठ्या मनाचा ऑफिसर मी जन्मात पाहिला नव्हता’ म्हणून त्यांच्याबद्दल गौरवाचे शब्द काढत होता.
आता रात्रीचा एक वाजायला आला होता. एक-एक करून सगळे ऑफिसर जेवणाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी निघून गेले होते. फक्त नागराज आणि भाऊसाहेबच व्हरांड्यात बसून मद्यप्राशन करत होते. सोबतीला मटण चॉप्स, चिकन लॉलीपॉप होतेच. नागराज मद्यसेवनाने आता चांगलाच झिंगला होता. त्याचा त्याच्या बोलण्यावर आणि शरीरावर ताबा राहिला नव्हता. घड्याळात एकचा ठोका पडल्यावर अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आकाशात मेघांची गर्दी होऊ लागली. बंगल्यासमोरील झाडे हेलकावे खाऊ लागली अन नागराजसमोर रामशरण, त्याची बायको झुमरी अन चार मुले हजर झाली. अचानक त्यांना तेथे पाहून नागराज सर्द झाला. थंडीतही त्याच्या चेहर्‍यावर घर्मबिंदू चमकू लागले. त्याच्या हातापायाला कंप सुटला, त्याची बोबडी वळली अन तो अभावितपणे बोलून गेला, ‘‘अरे, रामशरण तुम? तुम यहाँ कैसे आये? तुम्हे तो वोह टोलीवालोंने मार दिया था ना?’’
‘‘हा साहब, बात बिल्कुल सच है। मुझे उन टोलीवालोंने वाकई मार दिया था पर मुझे मारने के लिए आदेश तो आपनेही दिये थे ना?’’ रामशरण म्हणाला.
त्यावर ‘‘यह तुम क्या बक रहे हो रामशरण?’’
‘‘बिलकुल सही बोल रहा हू साब. आपनेही उन्हे मुझे मारने को कहा था।’’
आता नागराज गडबडला. तो भाऊसाहेबांकडे पाहू लागला. भाऊसाहेब शांतपणे त्यांच्यातील संवाद ऐकत होते.
नागराजची नजर आता रामशरणच्या बायकोकडे झुमरीकडे गेली. त्याने तिच्याकडे पाहत, ‘‘और यह झुमरी यहाँ क्या कर रही है? उसे और तेरे बच्चों को तो मैने उसी दिन खाई मे धकेल दिया था। वोह अभी भी जिंदा कैसे है? साली, कुत्तिया, बहुत परेशान किया मुझे इसने।’’
आता झुमरी पुढे आली आणि म्हणाली, ‘‘हमने कब आपको परेशान किया साहब? मेरा पती गायब हुआ है यह देखकर आपही एक असहाय्य नारी को कई दिनो तक अपने हवस का शिकार बनाते रहे और जब मन भर गया तो मुझे खाई मे धकेल दिया। इतनाही नही, मेरे बेगुनाह बच्चों को भी नही छोड़ा। मेरे साथ इन नन्ही जानो को भी मार दिया। नागराज तुम पापी हो। तुमने अपनी पोल ना खुले इसलिए मेरे सारे वंश को हो खत्म कर दिया। कहा फेड़ोगे यह पाप?’’
‘‘ये कुत्तिया! बहुत जबान चला रही हो कैची की तरहा। चूप हो जा। नही तो इस नागराज को तुम जानतीही हो। उस दिन मेरे चंगुल से भलेही बच गयी, लेकिन अब मै तुझे नही छोड़नेवाला। देख मै अब तेरा क्या हश्र करता हू’ असे बोलून तो तिच्या अंगावर धावून गेला.
‘‘ना ना साहेबजी, ऐसा बिल्कुल मत करना। अब हम तुम्हारे वश में नही आनेवाले। अब तुम हमे छु भी नही सकते तो मारने की बात तो छोड़ही दो।’’ झुमरी म्हणाली.
‘‘मतलब?’’ नागराज म्हणाला.
‘‘मतलब यह है साबजी, अब हम इस धरती के निवासी नही है। हम तो परलोक सिधार गये प्राणी है। अब तुम हमारा कुछ भी बिगाड़ नही सकते। अब तो यहाँ हमारी चलेगी। जो तुमने हमारे साथ कुकर्म किये है ना, उसका हिसाब अब चुकता करना है। तुम्हारे पापों का घड़ा भर चुका है। हम यहाँ तुमसे बदला लेने आये है, और आज बदला लेकेही रहेंगे।’’
आता मात्र नागराजची पुरती फाटली होती. तो भीतीने पांढरा फटक पडला होता. थरथर कापत होता. त्यांच्यापुढे लोटांगण घालत होता. म्हणत होता, ‘‘ना ना बहना, ऐसा मत करो। मै बालबच्चेदार आदमी हू। मेरी गृहस्थी मत उजाड़ो। मै तेरे पाव पडता हू। तुमसे माफी मांगता हू।’’
‘‘अब तुझे सूझी है माफी मांगने की। जब मेरे साथ जबरदस्ती कर रहा था तब कहा गयी थी तेरी अस्मत? तब तो मेरे ऊपर एक बहशी दरिंदे माफक टूट पड़ा था ना तू? यह तेरेही हाथ है ना, जिससे तू मेरे शरीर को नोच रहा था? अरे, तुझ से तो वह जंगल के जानवर अच्छे जो अपने और पराये का मतलब जानते है। किसी पे जादती नही करते। तू तो इंसान के रूप मे भेड़िया है दुष्ट। जो दुसरों पर अपनी अफसरी का रौब जताके उनकी इज्जत के साथ खिलवाड़ करता है। इतने पर भी तेरी वासना रूकती नही तो तू मारने पर उतर आता है। क्या मिला तुम्हे हमे मारकर? क्या पा लिया तूने हमे नष्ट करकर? अरे जन्नत तो छोड़, तुझे नरक मे भी जगह नही मिलनेवाली।’’ अन् झुमरी त्याच्या अंगावर तुच्छतेने थुंकली.
आता मात्र नागराज हताश होऊन मटकन खाली बसला. त्याला असे किंकर्तव्यमूढपणे बसलेले पाहून भाऊसाहेब पुढे बोलू लागले, ‘‘तो नागराज, अब क्या कहना है आपका? अब भी आप अपने को निर्दोष मानते हो?’’
‘‘हा जाधवसाहब, मै बिलकुल निर्दोष हूँ। यह औरत झूठ बोल रही है। मैने नही मारा इसे! मै तो इनको जानता तक नही। कभी इनको देखा तक नही। ये कोई साजिश है, जो मुझे फसाने के लिए रची गई है और इसीलिए इन बहिरुपियों को आपके सामने पेश किया गया है।’’ नागराज सफाई देत म्हणाला.
‘‘नागराज, ये बहिरुपिए नही है। असल आत्माए है जिन्हे आपने बेरहमी से मार डाला है। पहले तो मुझे भी आत्मा वगैरा इसपर विश्वास न था पर इन्होने न्याय पाने के लिए मेरी बेटियों से गुहार लगाई थी। खुद प्रकट होकर अपनी दर्दभरी कहानी सुनाई थी। मरने के बाद भी इन्हे ना शांति मिली, ना मुक्ति। ये तुम्हे सबक सिखाने के लिए दरदर भटकती रही। जब तुम तबादला करकर भाग खड़े हुए तो इस आशा से यहाँ बैठी रही की, कभी तो आप इसकी पकड़ मे आओगे। सो आज उन्हे मौका मिल गया और आपकी काली करतूतोंका कच्चा चिठ्ठा उन्होंने सबके सामने खोलही दिया। अब तो सारी बाते साफ हो चुकी है। बोलो, अब भी आप अपने आपको बेगुनाह मानते हो?’’
‘‘नही जाधव साहब, मैने ऐसा कुछ भी नही किया है। यह लोग झूठ बोल रहे है। मुझे फसाने की कोशिश कर रहे है। प्लीज आप उनपर विश्वास मत कीजिए। मै आपके पाव पड़ता हू। मुझे इनसे बचाइए। मै बाल बच्चेदार आदमी हू। एक अफसर हू। मेरी इज्जत मिट्टी मे मिल जाएगी। मै दुनिया को मुह दिखाने के काबिल भी नही रहूंगा। मेरी नौकरी भी चली जाएगी। मुझे जेल हो जाएगी।’’ नागराज हात जोडून विनंती करत होता.
‘‘अब आपको इज्जत की पड़ी है? जब इस औरत की इज्जत लूट रहे थे तब इसका खयाल नही आया? अब कहते हो, मै बाल बच्चेदार आदमी हू? क्या यह गरीब बाल बच्चेदार नही था? अरे, लानत है आपपर! एक वन अधिकारी किसलिए होता है? वन की रक्षा के लिए। आपने ना वन की रक्षा की, ना अपने कर्मचारी को मदद की। आप तो इंसान के रूप मे एक दरिंदे निकले। अब आपका खेल खत्म हो चुका है नागराजजी। आपका बयान भी इस कैमरे मे बंद हो चुका है और इस वन के तमाम अधिकारी आपकी जबानी सुन चुके है। अब आपको कोई बचा नही सकता।’’ आणि त्यांनी शलाकाने शूट केलेला व्हिडीओ नागराजाला दाखवला. वनखात्याचे जे अधिकारी घरी गेल्याचा बहाणा करून लपून बसले होते ते पण तेथे एकत्र झाले. तसेच पोलिसांची व्हॅन देखील हजर झाली. त्यांनी नागराजला हातकडी घातली अन् पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
एव्हाना पहाटेचे चार वाजायला आले होते. आता रामशरण, झुमरी आणि मुले दिसेनासी झाली होती.
त्याच दिवशी भाऊसाहेबांनी विधिवत रामशरण, झुमरी अन त्यांच्या मुलांचा दिवस घातला. त्यांना सुग्रास पक्वान्नाचा भोग दाखवला. रामशरणच्या मुलांसाठी नवे कपडे, शालेय वस्तू चिंचेच्या झाडाखाली ठेवल्या. थोड्याच वेळात तेथे ठेवलेले अन्नपदार्थ गायब झाले. याचा अर्थ रामशरणच्या कुटुंबियांनी ते सेवन केले होते. त्या सहाही जणांच्या आत्म्याला आता शांती मिळाली होती. एका नराधमाला त्याने केलेल्या पापकर्मांची शिक्षा मिळाली होती. आता त्यांचा मोक्षाचा मार्ग मोकळा झाला होता.
त्यानंतर रात्री अभ्यास करताना चिंचेच्या झाडाची सळसळ थांबली होती. कोणाचेही आवाज ऐकू येत नव्हते. रामशरण अन त्याच्या कुटुंबियांचा त्या झाडावरील रहिवास संपला होता ह्याचा मीराताई, शलाका आणि कालिकाला कमालीचा आनंद झाला होता. त्यांच्या वडिलांनी युक्तीने नागराजला पकडले होते. त्याच्या तोंडून त्याच्या गुन्ह्यांची कबुली घेतली होती. आता पुढील कार्यवाही पोलीस अन न्यायालय करणार होते. भाऊसाहेबांच्या चेहर्‍यावर समाधान झळकत होते. गुन्हेगार मग तो कोणीही असो, अगदी आपल्या जवळचा देखील असो, त्याने गुन्हा केल्यावर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे अन् निरपराध लोकाना न्याय मिळालाच पाहिजे, भाऊसाहेबांच्या  अशा विचारांना आज झळाली मिळाली होती.
पुढे नागराजला सहा जणांची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपावरून आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती. त्याच्यावरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे होते. त्यासाठी ही शिक्षा अगदीच कमी होती पण रामशरण अन त्याच्या कुटुंबियांना थोडासा तरी न्याय मिळाला होता. त्यात भाऊसाहेब अन कुटुंबियांचा मोलाचा वाटा होता.

– चंद्रलेखा जगताप-बेलसरे

मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी २०२४

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!