पुण्यातल्या भरतनाट्य मंदिरात मी व सौ. गीता भुर्के यांनी ‘खुमासदार अत्रे’ हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम खूपच रंगला. संपताना श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेक जण रंगमंचावर आले. अभिनंदनचा वर्षाव केला. त्यात एक जण होते श्री. अशोक सुलाखे! त्यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांचे ‘शारदेची पत्रे’ हे पुस्तक भेट दिले. ते देताना मोबाईलमध्ये फोटोही काढला. ही पुस्तक भेट मौल्यवान होती. एक मोठे विचारधन त्यांनी कायमस्वरूपी मला दिले होते. खूप आनंद झाला. ही सुलाखे यांची खासियत आहे. कार्यक्रम चांगला झाला की ते त्याप्रसंगी व वक्त्याला एक छान पुस्तक देतात. पुण्यात पूर्वी क्रिकेट मॅचमध्ये बॅट्समनने सेंच्युरी मारली की त्याला बाबू टांगेवाला हार घालत असत. त्याचं कौतुक आचार्य अत्रे यांनी जाहीर सभेत केलं होतं. तसंच पुण्यात उठावदार कार्यक्रम झाला की वक्त्याला अशोक सुलाखे पुस्तक भेट देणारच.
पुस्तकप्रेमी अशोक सुलाखे पुण्यात पीडब्ल्यूडी या सरकारी नोकरीत सेवक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर घरातील वातावरणामुळे त्यांना स्वतंत्र राहावे लागले. त्यामुळे ते निराश झाले नाहीत. त्यांनी दर्जेदार वाचनीय पुस्तकांची सोबत घेतली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात सांस्कृतिक वातावरणात एक खोली भाड्याने घेतली. साधी राहणी, साधा पोशाख, लेंगा, शर्ट आणि पांढरी टोपी. स्वतःचे कपडे स्वतः धुणार, खानावळीत जेवणार आणि सकाळी आवडीने वर्तमानपत्रे वाचणार! त्यात सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सामना ही वृत्तपत्रे असतात. त्यातून ते आज पुण्यात कोणते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत हे शोधणार.
पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे कार्यक्रमाची रेलचेल असते. पुण्यात रोज एक हजार कार्यक्रम होतात. त्यातील किमान 700 कार्यक्रम मंदिरातून होतात. एकसष्ठी, अमृतमहोत्सव साजरे करण्यासाठी 200 कार्यक्रम कार्यालयातून होतात, थिएटरमध्ये तिकिटातून होणारे 60 कार्यक्रम असतात. सस्नेह स्वागत म्हणून 40 कार्यक्रम होतात. ह्यात पुस्तक प्रकाशन, स्मृतिदिन व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अनेक प्रकार असतात. निवेदने बारकाईने वाचतात. ठिकाण पाहतात. एस. एम. जोशी, पत्रकार भवन, टिळक स्मारक, सावरकर अध्यासन, न्यू इंग्लिश स्कूलचा गणेश हॉल, मसाप, एस. पी. कॉलेज, भावे हायस्कूल, भरतनाट्य, भांडारकर सभागृह यातील घराजवळच्या कार्यक्रमाला प्राधान्य देतात पण त्यांची आवड आहे ती बौद्धिक खाद्याची. तसा वक्ता असला तर ते यशवंतराव चव्हाण, अंबर हॉल, स्वामीकृपा सभागृह, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अशा दूरवरच्या कार्यक्रमालाही जाणार. चारुदत्त आफळे, डॉक्टर गो. बं. देगलूरकर, धनश्री लेले, अविनाश धर्माधिकारी अशा अभ्यासू व्यक्तिंची व्याख्याने ते चुकवत नाहीत. दिवसा दोन व्याख्यानांनाही जायची तयारी असते. सायकल हे स्वतःचे वाहन हाती असल्याने कार्यक्रमापूर्वीच ते सभास्थानी पोहोचलेले असतात.
स्वतःच्या पेन्शनवर ते चरितार्थ भागवितात. स्वावलंबनामुळे फारसा खर्च नसतो. समर्थ रामदास स्वामींचा पुढील उपदेश ते जाणून असतात.
मिळवती तितुके भक्षिती
ते कठीण काळी मरोन जाती
दीर्घ सूचनेने वर्तीती
तेची भले
बचतीतून ते नवनवीन पुस्तके खरेदी करतात. कार्यक्रम संपताच वक्त्याला सप्रेम भेट देतात. एक मध्यवर्गीय माणूस स्वखर्चाने विकत घेतलेले पुस्तक आपल्याला भेट देतोय याचं त्या व्यक्तिला कुतूहल वाटतं. त्याचबरोबर अशोकजींबद्दल प्रेमही निर्माण होतं.सारस्वत दरबाराचा आदर अशोकजी लेखकाची जडणघडण लक्षात घेऊन तसे पुस्तक देण्याचा प्रयत्न करतात. अनेक लेखक त्यांच्याबरोबर आनंदाने फोटो काढू देतात. काही वक्ते त्यांना मेल करून धन्यवाद देतात.
मृणालिनी चितळे म्हणतात, ‘माझ्या पुस्तक प्रकाशन समारंभास येऊन तुम्ही मला पुस्तकाची अनमोल भेट दिलीत याबद्दल मी तुमची आभारी आहे. आजकाल मराठी वाचकांची संख्या कमी होत असताना तुम्ही जोपासत असलेला हा जगावेगळा छंद स्तुत्य आहे आणि अनुकरणीयही. सध्या ‘पियूची वही’ माझ्या नातीला वाचून दाखवत आहे. तुमच्या उपक्रमासाठी लाख लाख शुभेच्छा!’ मराठी शब्दकोश महामंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित म्हणाले, ‘तुम्ही पुस्तके विकत घेऊन वाटता हा स्तुत्य उपक्रम आहे. तुम्हाला खूप छान छान कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळते. मोठ्या लोकाचा सहवास मिळतो. तुम्ही स्वतः काही लिहा. प्रयत्न केल्यास जमेल कारण खूप बरे-वाईट अनुभव तुम्हाला मिळाले आहेत. जगात दोनच गोष्टी माणसाला शहाणे करतात ‘वाचलेली पुस्तकं’ आणि ‘भेटलेली माणसं.’’
नामवंत प्रकाशक राजेंद्र बर्वे म्हणतात, ‘धन्य आहे तुमची अशोकजी, तुम्ही आजही मला र. घों. चे ‘बुद्धीप्रामाण्यवाद’ हे पुस्तक भेट दिले. मानले पाहिजे तुम्हाला. त्यामध्ये आमच्याकडून खरेदी केलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या पुस्तकाचे बिल होते. आपली भेट झाली असती तर मी तुम्हाला पैसे न घेता पुस्तक दिले असते. पदरमोड करून खूप छान काम करता तुम्ही.’
वाचकप्रिय लेखिका मंगला गोडबोले यांनी मेल करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘उसवण’ हे पुस्तक तुम्ही भेट दिलं याचा मोठा फायदा झाला. मला वाचायचं होतं. आयतं मिळालं. खूप खूप आभार. तुम्ही मला ए. आय. बाबतही पुस्तक दिलंत, ‘पियूची वही’ मी वाचले, वयोमानाप्रमाणे वाचन कमी होतं. (पंच्याहत्तरी ओलांडली) तरी पुस्तक घरात, आसपास असली की वाचून होतात. पुनश्च धन्यवाद!
साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे म्हणतात, ‘परवा तुम्ही सासण्यांचे पुस्तक ‘भूतबंगला’ दिलेत. मला खूप आवडले. दोन्ही पुस्तके वाचली पाहिजेत. तुमचा हा छंद अपूर्व असा आहे. तो अखंड चालू राहण्यासाठी परिस्थितीची आणि प्रकृतीची साथ तुम्हाला मिळत राहो.’
आयएएस विद्यार्थी घडविणारे चाणक्य मंडळाचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनीही अशोकजींचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘तुम्ही भेट दिलेले पुस्तक’ आरोग्य सेवेतील डिजिटल आणि ए.आय. क्रांती’ हा महत्त्वपूर्ण विषय आहे. पुस्तकभेट ही उत्तम भेट आहे. मनापासून धन्यवाद!’
डॉक्टर स्नेहल तावरे या प्रकाशिका म्हणतात, ‘श्रीयुत अशोक सुलाखे हे एक पुस्तकप्रेमी सद्गृहस्थ आहेत. पुण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्यातील एखाद्या कार्यक्रमाला तरी सुलाखे हजेरी लावतात. केवळ हजेरी लावतात असे नाही तर येथील अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वक्ते, संयोजक यांना पुस्तके भेट देत असतात आणि ही सर्व पुस्तके ते विकत घेऊन भेट देतात. हे महाराष्ट्रातील दुर्मीळ असे उदाहरण आहे. एक वाचनवेडा माणूस दुसर्याला वाचनाचे वेड लावतो हेही कौतुकास्पद आहे. त्यांचे वय लक्षात घेता त्यांचा हा उपक्रम खरोखरच अतुलनीय असा आहे. मला वाटत नाही असे कोणी करत असेल. सूर्यदेवाने त्यांना त्यांची शताब्दी साजरी करण्याचे भाग्य द्यावे. तोपर्यंत अनेक जणांना पुस्तकाचा लाभ व्हावा. त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा!’
थोर विचारवंत आणि लोकसत्ताच्या गिरीश कुबेर यांनीही अशोकजींना धन्यवाद दिलेत. याच जातकुळीतले विचारवंत माजी खासदार कुमार केतकर यांनीही अशोकजींचे कौतुक केले. केसरीचे संपादक दीपक टिळक यांनी टिळक पुण्यतिथी समारंभात सुलाखेंकडून पुस्तक स्वीकारले. त्यांच्या ज्ञानेश्वरी वाटपाचं कौतुक केलं. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठवाड्यातील लेखक देवीदास सौदागर ‘उसवण’ पुस्तकामुळे लोकप्रिय झाले. त्यांच्या सत्कार समारंभात अशोकजींनी त्यांना पुस्तक भेट दिलेच पण असेही सांगितले, ‘मी उसवण पुस्तकाच्या दहा प्रती नामवंतांना भेट दिल्या.’ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड झाली की त्यांच्या सत्काराचा मान प्रथम मसापला असतो. तेव्हा मिलिंद जोशींनी सुलाखेंची ओळख प्राध्यापक रवींद्र शोभणे यांना करून दिली. त्यांनीही पुस्तक भेट आनंदाने स्वीकारली. अनेक नामवंत कलाकारांनी ही पुस्तकभेट स्वीकारून सुलाखे यांचे कौतुक केले. शाहू महाराजांच्या भूमिकेमुळे अधिक लोकप्रिय झालेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुस्तक भेटीचा आनंद व्यक्त केला. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेंनी पुस्तक स्वीकारताना छायाचित्र काढले. देशमुख प्रकाशनतर्फे नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन जब्बार पटेल यांच्या हस्ते झाले तेव्हा त्यांना सुलाखे यांनी पुस्तक भेट दिली. विशेष म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भैरप्पा यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमावेळी ग्रंथ भेट दिला. साहित्यिक समीक्षेचा दबदबा असणार्या विजय हार्डेकरांनीही पुस्तक स्वीकारले. प्राध्यापक मिलिंद जोशींना अनेक वेळा त्यांनी ग्रंथ भेट दिले. अभिनेते मोहन जोशींनी पुस्तक स्वीकारताना आश्चर्य आणि आनंद या मिश्रित भावना व्यक्त केल्या. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही पुस्तक भेट स्वीकारली.
बराक ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मेल करून सुलाख यांचे कौतुक केले. ते म्हणतात, ‘आपल्याला आपला देश आपले जग पुन्हा योग्य मार्गावर आणायचे आहे. मी लवकरच पुन्हा तुमच्याशी बोलेन पण अशोक, मला एक सांगू देत हे सारे तुझ्यामुळे घडले. तुमच्यामुळे घडले. धन्यवाद!
– बराक
हा मेल वाचल्यापासून मी व सौ घरात सुलाखे यांचा उल्लेख ओबामामित्र असाच करतो. माजी खासदार, साहित्य संशोधक प्रदीप रावत सुलाखेंचा उल्लेख ‘पुस्तकांची भेट देऊन पुस्तक प्रसार करणारे पुस्तक प्रेमी’ असा करतात. मंत्री महोदय मुरलीधर मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील, डॉक्टर जालिंदर सुपेकर-कमिशनर, येरवड्याचे तुरुंग अधिकारी साळुंखे, प्रल्हाद कचरे-उप जिल्हाधिकारी, डॉक्टर सतीश देसाई, मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, शिक्षणमहर्षी डॉक्टर शिवाजीराव कदम, डॉक्टर शंतनू चिंधडे, डॉक्टर मधुसूदन अंबर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र शेंडे, गोखले इन्स्टिट्यूटचे डॉक्टर अजित रानडे, साहित्यिक मधुकर भावे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, योगगुरू संप्रसाद विनोद, ‘स्फूर्तीवादी नीतीशास्त्र’ या ग्रंथाचे लेखक राजीव साने, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील, संतसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर अशोक कामत, ‘उत्कर्ष’चे सुधाकर जोशी अशा अनेक मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून त्यांना ग्रंथ भेट देण्याचा आनंद सुलाखेंनी लुटलाय. या छंदाने ते किती मोठ्या लोकापर्यंत पोहोचले हे पाहून आश्चर्य वाटते.
नामवंत उद्योजिका लीला पुनावाला यांना त्यांनी पुस्तक दिले, भारत आणि परदेशातील सुमारे तीस डिलीट प्राप्त केलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथराव माशेलकरांनी त्यांना शाबासकी दिली, एअरमार्शल भूषण गोखलेंनी कौतुक केले.
सुलाखे यांनी ज्यांना ग्रंथ भेट दिले त्या मान्यवरांची एक सूची तयार केली तर तो महाराष्ट्रातील ज्ञानी कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या नावाचा संग्राह्य, प्रेरणादायी ग्रंथ होईल. या पुस्तककाकांना खूप खूप शुभेच्छा!
– प्राचार्य श्याम भुर्के
9422033500
मासिक ‘साहित्य चपराक’, ऑक्टोबर 2024