चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता म्हणून आपण श्रीगणेशाकडे पाहतो. त्याच्या वरदहस्ताने मिळालेल्या आशीर्वादातून कुणाला विद्येची प्राप्ती होते, तर कुणाला कलेची देणगी मिळते. जेव्हा एखाद्याच्या घरी विद्येचा वारसा तोही वैद्यकीय क्षेत्रातला असताना, स्वतःकडे अनुभवाची कुठलीही शिदोरी नसताना सध्याच्या डिजिटल जमान्यात डिजिटल पोर्ट्रेटची कला अवगत करून त्यात आपली निपुणता सिद्ध करणं, याला काय म्हणायचं? तर यालाच म्हणतात गणरायाच्या आशीर्वादातून मिळालेली देणगी. या देणगीचा वसा जोपासणारा कलाकार म्हणजे प्रणव सातभाई.
पत्रकारितेच्या निमित्ताने सतत समाजमाध्यमांवर काय काय नवं येतंय, हे पाहण्याचा आम्हा पत्रकारांचा जणू एक शिरस्ताच असतो म्हणा की! त्यातूनच नजरेस पडला तो एका तरूण डिजिटल पोर्ट्रेट तयार करणार्या कलाकाराचा नजराणा. प्रणवने आत्तापर्यंत हजारो पोर्ट्रेट साकारली असतील; पण दरवेळी येणारं नवं पोर्ट्रेट एक आगळीवेगळी ओळख देऊन जाते. फेसबुकच्या माध्यमातून मी नेहमीच त्याने टाकलेले पोर्ट्रेट कुतुहलाने पाहत आलो. त्यात साकारलेल्या प्रत्येक चेहर्याकडे मी आपुलकीने पाहायचो. अप्रुप वाटायचं त्याच्या या कलेचं. चित्रकार म्हटलं की, त्याच्या हातात रंगांचे पॅलेट आणि कुंचला अशी प्रतिमा आपल्यासमोर येते परंतु इथे प्रणवकडे तसं काहीच नाही. मग नेमकं हे चित्र तो कसं साकारतो, याची उत्सुकता मला प्रचंड लागून राहिली.
माझ्या वाढदिवसादिवशी त्याने फेसबुकवरच असलेल्या माझ्या एका फोटोचं सुंदर पोर्ट्रेट साकारून मला मेसेंजवर पाठवलं होतं. मेसेंजरवर मी फार काही सक्रिय नव्हतो पण काळाच्या चलनवलनाप्रमाणे मीही त्याच्या सक्रियतेमध्ये सहभागी झालो. हे सगळं पाहण्याआधी प्रणवने माझ्या अनेक मित्रांची सुंदर चित्रं साकारली होती. मलाही असं वाटून गेलं की, आपणही आपलं एखादं छानसं पोर्ट्रेट काढून घ्यावं का? (शेवटी काय, मनुष्य स्वभाव ना! मोह कसा आवरेल?) असा विचार मनात सुरू असताना मी मोबाईलवर प्रणवनेच रेखाटलेलं एक अतिशय सुंदर पोर्ट्रेट पाहत होतो. तेवढ्यात मेसेंजरवर त्याचा मेसेज धडकला. ‘हाय सर, तुमचे काही चांगले फोटो पाठवा ना, छानसं पोर्ट्रेट तयार करूया.’
त्याचा मोबाईल नंबर काही माझ्याकडे नव्हता. त्याला त्याच मेसेजवर माझा नंबर पाठवला आणि त्याचाही नंबर मागून घेतला.
आणि मग इथून सुरू झाला आमचा संवाद! पहिल्याच फोन कॉलवर आम्ही जणू काही खूप वर्षांपासूनचे मित्र असाच संवाद झाला. त्याचं कारण असं की, प्रणव हा मुलगा अत्यंत लाघवी आणि प्रेमळ आहे. संवादातून समोरच्या व्यक्तिच्या मनात स्वतःचं घर कसं तयार करायचं याबद्दलचं नितांत प्रेम त्याच्याजवळ आहे.
सर्वसामान्य व्यक्ती ते अनेक दिग्गज कलाकारांची मनाला भावतील अशी चित्रे त्याने रेखाटली आहेत. प्रणवच्या घरात आजोबांपासून ते त्याच्या वडिलांपर्यंत सगळे डॉक्टर आहेत. त्यांचीही इच्छा होती की, त्यांच्या माघारी ही सगळी जबाबदारी प्रणवने डॉक्टर बनून सांभाळावी! पण प्रणवला त्याच्या आत दडलेला चित्रकार शांत बसू देत नव्हता. त्याने वडिलांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्याचं हे असं वागणं वडिलांना काही पटलं नाही पण चित्रकार बनण्याची जिद्द काही प्रणवने सोडली नाही. त्याने तो विडा उचललाच आणि त्यानंतर आपल्याला भेटला तो डिजिटल पोर्ट्रेटचा विक्रम करणारा प्रणव.
कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणार्या लोकाना आत्तापर्यंत त्यांच्या शिक्षणाचा, गुरूचा किंवा घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तिचा वारसा लाभलेला आपण पाहिला आहे परंतु प्रणवच्या बाबतीतील गोष्ट थोडी निराळीच. कुठलाही वारसा नसताना कोविडच्या काळात घरी बसून युट्यूबच्या साहाय्याने या कलेतील बारकावे अवगत करून घेऊन, त्या क्षेत्रात वाटचाल करायची ही काही सोपी गोष्ट बिलकूलच नाही. त्याच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. जिनियस वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने त्याला गौरविण्यातही आले आहे.
चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचे पोर्ट्रेट त्याने साकारले आहेत. एकदा रात्रभर जागून त्याने नाना पाटेकरचे पोर्ट्रेट काढले आणि त्याला फेसबुकवर पोस्ट केले. काही दिवसांनी स्वतः नाना पाटेकर यांनी त्याला आपल्या धीरगंभीर आवाजात फोन केला आणि म्हणाले, ‘‘प्रणव, नाना पाटेकर बोलतोय.’’
प्रणवला काही क्षण त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्यावेळी त्याच्या डिजिटल कुंचल्याने आकाशाला गवसणी घातली होती. नानांनी त्याला थेट येऊन भेटण्याची ऑफर दिली. असे एक ना अनेक किस्से आणि उदाहरणं त्याच्या कलेच्या बाबतीत सांगता येतील.
3500 पेक्षा अधिक डिजिटल पोर्ट्रेट काढण्याचा विश्वविक्रम प्रणवच्या नावावर आहे. विविध तंत्रज्ञान, संगणकावरील ग्राफिक्सची मदत सोबतीला असूनसुद्धा फोटो समोर ठेवून एक पोर्ट्रेट साकरण्यासाठी किमान 5-6 तास लागतात, असं प्रणव सांगतो. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा निश्चितच प्रणवच्या पाठीशी असणार यात दुमत नाही पण फावला वेळ मिळाला म्हणून एखादा तरूण मोबाईलवर गेम खेळण्यात आपला किमती वेळ वाया घालवतो. तोच वेळ सोशल मीडियावर विविधांगी आणि खासकरून कौशल्याधिष्ठित शिक्षण घेण्यासाठी घालवला तर त्यातून प्रणवसारखा उत्तम कलाकार तयार होऊ शकतो, ही यातून शिकण्यासारखी गोष्ट आहे. प्रणव, हम तो आपके फॅन बन गये यार!
– राजेंद्र ल. हुंजे
मासिक ‘साहित्य चपराक’ ऑक्टोबर २०२४
फारच कौतुकास्पद