प्रांजळ अनुभव कथन : कथा एका प्रत्यावर्तनाची! – नागेश शेवाळकर

Share this post on:

धर्मांतर आणि पुन्हा स्वधर्मात परतणे ही बाब तशी पुरातन आहे. वेळोवेळी अशा घटना घडल्याची इतिहासात नोंद आहे. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांचेही कार्य अविरत सुरू आहे.
जिहाद, लव जिहाद आणि धर्मांतर या घटनांविषयी वेळोवेळी चर्चा होत असतात. त्याचा कितपत उपयोग होतो हा वेगळा विषय होऊ शकतो परंतु जेव्हा एखादी व्यक्ती स्वधर्म-परधर्म असा प्रवास करुन पुन्हा स्वधर्मात परतते आणि तो प्रवास बारीकसारीक तपशीलांसह विस्तृत, सप्रमाण पुस्तक स्वरुपात जनतेसमोर ठेवते तेव्हा त्यात व्यक्त झालेल्या भावनांचा, अनुभवांचा वाचकांनी जरूर विचार करून ते सकारात्मक विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच या घटनांवर अंकुश बसू शकतो. ज्या कुणी व्यक्ती धर्मांतराचा विचार करत असतील परंतु द्विधा मनःस्थितीत असतील त्यांच्यापर्यंत असे स्वानुभव पोहोचले तर निश्चितपणे थोडा तरी बदल घडू शकतो.


हे सारे लिहिण्यामागे ‘कथा एका प्रत्यावर्तनाची’ हे श्रुती भट्ट ह्यांचे प्रामाणिक अनुभव असलेले कथनात्मक पुस्तक वाचण्यात आले आणि या घटनांच्या संदर्भात अनेक शंकांची उत्तरे मिळाली. एखाद्या घटनेवर चर्वितचर्वण होणे वेगळे, तिथे जिवंत अनुभव नसतात. त्या घटनेशी संबंधित वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते आणि ते व्यक्त होताना दिसतात परंतु स्वानुभवातून जे विचार, लेखन व्यक्त होते त्याला सत्यांशाचा स्पर्श झालेला असतो. ते विचार, ते लेखन कल्पनेचा आधार न घेता वास्तवाचे खरेखुरे चित्र उभे करते. तसं पाहिलं तर हे स्वानुभव श्रुतीचे आहेत परंतु हे लेखन धर्मबदल करणार्‍या हजारो महिलांचे आहे. हे नमूद करताना श्रुती लिहितात, ‘धर्मांतराचा प्रवास करुन स्वधर्मात आलेल्या स्त्रिया स्वतःच्या दाहक अनुभवांची चर्चा कुठेही करीत नाहीत.’ मग श्रुतीने हे लेखन का करावे? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणतात, ‘आपल्याला आलेले वाईट अनुभव इतर कोणाच्या वाट्याला येऊ नयेत असा मी निर्धार केला. काही गैरसमजामुळे धर्मांतर झालेल्या तसेच धर्मांतराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या लोकाना माझ्या आयुष्याचा दाखला देऊन त्यांना परत सन्मार्गावर आणणे गरजेचे आहे असे मला वाटले.’ श्रुतीचा असा प्रामाणिकपणा ‘कथा एका प्रत्यावर्तनाची’ या पुस्तकात ठिकठिकाणी दिसून येतो. अगदी तिने धर्म बदलताना, बदलल्यावर आणि पुन्हा हिंदू धर्मात परत आल्यावरही!
केरळ राज्यात कासरगोड जिल्ह्यातील मुळियार (कानत्तूर) या गावी शंकर भट्ट त्यांची पत्नी शारदाम्मा यांच्यासह राहत. त्यांची श्रुती नावाची मुलगी अत्यंत चौकस! तिला असंख्य प्रश्न पडायचे. जसे… महिला वेद, मंत्र म्हणू शकत नाहीत, हिंदू धर्मात जातीव्यवस्था का आहे?, हिंदू धर्माचे प्रशिक्षण का मिळत नाही? हिंदू लोक अनेक देव-देवतांची पूजा का करतात? देवाला कोणी प्रत्यक्ष बघू शकतो का? हिंदू धर्मात विविध विधी आणि प्रथा का? नैवेद्य न घेतल्यास देवी-देवतांचा कोप होतो का? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात घोंघावत होते परंतु अगदी बी.ए.च्या वर्गात गेल्यावरही हे प्रश्न अनुत्तरित होते. लहानपणी असे प्रश्न जेव्हा श्रुती आईवडिलांना विचारायची तेव्हा तिच्यावर काही तरी परिणाम झाला आहे, कुणी तरी झपाटले आहे या विचाराने वडील तांत्रिक, मांत्रिक यांना बोलावून श्रुतीला काळा दोरा बांधून घ्यायचे. यावेळी अंता नावाच्या मांत्रिकाशी चर्चा करताना बाबा म्हणत, ‘सर्व धर्म सारखेच आहेत’ परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असायची कारण सहावीला असताना श्रुतीला शिकविणार्‍या लता नावाच्या शिक्षिकेच्या घरी तिने फराळ केला तेव्हा तिचे बाबा म्हणाले, ‘त्यांच्या घरी खाऊ नये कारण ते खालच्या जातीतील आहेत.’ हा विरोधाभास कुठेतरी श्रुतीच्या मनात खोलवर परिणाम करीत होता. कदाचित या दुटप्पी विचाराचा वेगळा परिणाम श्रुतीच्या भविष्यातील निर्णयाची नांदी ठरला…
प्राथमिक शिक्षण घेत असताना छोट्या मोठ्या घडामोडी घडल्या असल्या तरीही बी.ए. शिकत असताना वेगळ्या घटना घडत गेल्या. वर्गात मुस्लीम विद्यार्थिनींशी श्रुतीची जवळीक निर्माण झाली. त्या मुली फावल्या वेळात धार्मिक पुस्तके वाचत. श्रुतीने औत्सुक्याने इस्लाम धर्माबद्दल त्या मुलींना काही प्रश्न विचारले. त्यांचे धर्माविषयी ज्ञान पाहून ती अचंबित झाली आणि जेव्हा त्या मुलींनी त्यांच्या धर्माची विस्तृत माहिती सांगताना श्रुतीला हिंदू धर्माविषयी प्रश्न विचारले तेव्हा श्रुतीला उत्तरं देता आली नाहीत. ती खजिल झाली. तेव्हा नकळत ती स्वतःची, स्वतःच्या धर्माची त्या मुलींशी आणि त्यांच्या धर्माशी मनोमन तुलना करू लागली. श्रुती ब्राह्मण कुटुंबातील असल्यामुळे ती शिवभक्त होती परंतु शिवकथेच्या बाबतीत ती पूर्णतः अनभिज्ञ होती. तिने हिंदू मैत्रिणीकडून ‘शिवलिंग महात्म्य’ वाचायला घेतले परंतु त्यातील दंतकथा वाचून तिच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली. श्रुती लिहिते, गुगलवर हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांविषयी शोध घेतला असता श्रुतीला इस्लाम धर्माची सर्व माहिती स्पष्ट व सोप्या भाषेत उपलब्ध सापडली. दुसरीकडे हिंदुत्त्वाबद्दल प्रत्येक साईटवर भिन्न नि परस्परविरोधी संकल्पना मांडलेल्या होत्या. त्यात काहीही सुसूत्रता नसल्यामुळे माझा गोंधळ आणखी वाढला.
मनात गोंधळ वाढतो, असमंजस स्थिती निर्माण होते तेव्हा जे सोपे आणि स्पष्ट भासते तिकडे मानवाचा कल वाढत जातो. विशिष्ट बाबींविषयी द्वेष निर्माण होतो. श्रुतीचेही तसेच झाले. मनातील प्रश्नांचे घरातून आणि इतर माध्यमातून निराकरण होत नसताना त्याचवेळी एखादी सुस्पष्ट बाब पुढे आली की, तिचे आकर्षण वाढते.
पुढे श्रुती शिक्षिका असताना एक घटना घडली. ती शाळा मुस्लिम व्यवस्थापनाची होती. शाळेतील बहुतांश विद्यार्थी मुस्लिम होते. सहाव्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने श्रुतीने इस्लाम धर्म स्वीकारला तर लाख रुपये मिळवून देतो, अशी ऑफर दिली. सहाव्या वर्गातील विद्यार्थी परंतु त्याची स्वधर्माबद्दलची तळमळ ही कुठेतरी श्रुतीच्या मनात मूक चाललेल्या द्वंद्वाला पोषक ठरली. शाळेतील सहकार्‍यांसोबत तिची इस्लामविषयक विविध विषयांवर चर्चा होऊ लागली. त्यांनी दिलेली पुस्तके वाचून, सीडीज ऐकून तिला भरपूर माहिती मिळाली. त्यातून इस्लाम धर्मच हा खरा धर्म आहे, इस्लामिक धर्मातील देव सर्वज्ञ आहे याबरोबरच कुराणासंबंधीची अनेक पुस्तके वाचून ‘स्त्रियांवरील अत्याचार आणि त्यांचे शोषण हे बहुसंख्य हिंदुत्वाच्या प्रभावामुळे होत आहे, हिंदू धर्मात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वाईट आहे,’ असा श्रुतीचा ठाम समज करवून देण्यात तिचे सहकारी यशस्वी झाले. हिंदू धर्मातील परंपरा कशा वाईट आहेत हे तिच्या मनावर वारंवार ठासून सांगू लागले. एकदा का कोणती गोष्ट मनाने विचारपूर्वक वा अविचाराने स्वीकारली की ती पक्की डोक्यात बसते.
अशा असमंजस अवस्थेत असताना बर्‍याचवेळा एखाद्या गोष्टीबाबत दोन्ही बाजूंनी वैचारिक युद्ध सुरू होते. श्रुतीला दोन बाजूंशी झुंजावे लागत होते. एक बाजू इस्लामिक विचारांची होती तर दुसरी बाजू हिंदू धर्माची होती. लहानपणापासून मिळालेल्या हिंदू संस्कारांवर, बैठकीवर इस्लाम धर्म अतिक्रमण करीत होता. हळूहळू श्रुती नवीन शिकवणीच्या इतकी अधीन झाली की, ज्या शिवाची ती पूजा करीत होती त्याच शिवाला मंदिरात जाऊन वेडंवाकडं बोलू लागली. एकदा तर ती चक्क शिवाकडे पाहून थुंकली. इस्लामिक विचारांचा पगडा इतका परिणामकारक होता की, ती घरी नमाज पडू लागली. हिंदू धर्म आणि तो धर्म मानणार्‍या लोकाना ती शत्रू समजू लागली. एवढेच नाही तर आई बाबांकडे बोट दाखवून, रोखून पाहताना घालून-पाडून बोलू लागली. कदाचित तिची विकृत अवस्था झाली होती. एकदा तिला नमाज पडता आला नाही आणि तिच्यासाठी खाण्याचा पदार्थ घेऊन आलेल्या आईमुळे अजान ऐकता आली नाही म्हणून तिने आईला झिडकारले आणि चक्क जन्मदात्या आईला थप्पड लगावली. श्रुती आईवडिलांना दुष्मन समजू लागली कारण ते इस्लाम विरोधक आणि हिंदुत्त्ववादी होते. श्रुतीने दररोज धिकर व सालाथ पाठ करताना कपाळाला कुंकू, बिंदी लावणे, देवाजवळ दिवा लावणे, हात जोडून प्रार्थना करणे हे सारे सोडून दिले कारण ह्या गोष्टी आर.एस.एस.च्या लोकासंबंधित आहेत असे तिच्या मनात बिंबविण्यात आले. तिच्या विचारात, आचरणात आमूलाग्र बदल झाला. ती पूर्णतः इस्लामिक झाल्याप्रमाणे वागू लागली. कुराणात असलेले नरकाचे वर्णन, अल्लाह सर्वशक्तिमान आहे हे सांगणारी वचने यामुळे तिची इस्लाम धर्मावर अढळ श्रद्धा बसली. शेवटी तिच्या मनाची तयारी इतकी धाडसी होती की, ती आईवडील, भाऊ, नातेवाईक ह्यांचा त्याग करून हिंदू धर्माला अव्हेरुन ‘केरळची मक्का’ अशी ओळख असलेल्या पोन्नानी येथील  मौनतुल इस्लामिक सभा येथे पोहोचली परंतु तेथील वागणूक पाहता ‘प्रथम ग्रासे मक्षिका पात’ असा तिला अनुभव आला परंतु तिचा निश्चय डळमळला नाही. ती ठाम राहिली. त्या संस्थेतील काही गोष्टी तिला नव्याने समजल्या, ज्या इस्लामचा अभ्यास करताना तिच्या समोर आल्या नव्हत्या. त्या संस्थेत श्रुतीसारख्या इतर धर्मातील अनेक महिला आलेल्या होत्या. तिला रहमत हे नाव मिळाले. मौनतुलमधील वातावरण पाहून अनेकदा रात्री तिला आईची आठवण येत असे परंतु लगेच ती निर्धाराने त्या आठवणी काढून टाकत असे. एका रात्री तिला झोपेत असताना परमेश्वराची एक मूर्ती दिसली, ज्या मूर्तीची ती लहानपणी पूजा करीत असे. ती खडबडून जागी झाली. स्वप्नात ती मूर्ती का आली? त्याचा अर्थ काय? या जाणिवेने ती गोंधळली परंतु निर्णयापासून तसुभरही ढळली नाही. जे हिंदू धर्माला, परमेश्वराला मानतात त्यांच्या दृष्टीने यामागे एक संकेत निश्चित असतो. भविष्यात घडणार्‍या घटनांचा वेध असतो परंतु श्रुती या सर्वाच्या फार पुढे गेली होती.
श्रुती तिच्या इच्छित स्थळी पोहोचली. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत शोकाकूल होती. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या शोधकार्यात श्रुतीच्या मोबाईलचा IMEI नंबर कामी आला. पोलिसांना तिच्या वास्तव्याचे ठिकाण समजले आणि पोलीस तिच्या आईवडिलांसह, काही हिंदू संघटनांचे प्रतिनिधी घेऊन तिथे पोहचले. पोलिसांजवळ न्यायालयाचा आदेश होता त्यामुळे श्रुतीला घेऊन पोलीस गाडीत बसताच ‘बेटा’ असा हृदय फोडणारा टाहो तिच्या कानावर पडला. तिने मागे पाहिले. तिच्या बाबांचा तो आक्रोश होता…
श्रुतीला घेऊन दुसर्‍या दिवशी सारे कासरगोड येथील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तो दिवस विजयादशमीचा! काय होते नियतीच्या मनात? पोलीस स्टेशनमध्ये अनेकांनी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु श्रुती ‘मला परत जायचे आहे’ यावर निश्चल होती. तिला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तिला विचारण्यात आले, ‘‘तुझा निर्णय काय?’’
‘‘मी आत्ता आई-वडिलांसोबत जाते परंतु दोन दिवसांनी मात्र इस्लामच्या अभ्यासासाठी पोन्नानीला परत जावे लागेल.’’
जबाब देऊन बाहेर आल्यावर आईने प्रेमाने तिला मिठीत घेतले. तितक्यात तिचे लक्ष वडिलांकडे गेले. त्यांनी काही तरी दूर फेकले होते. ती विषाची बाटली होती हे श्रुतीला समजताच तिला धक्का बसला. घरी येताच तिचे मन वळविण्यासाठी चर्चा, ज्योतिष, मांत्रिक हे प्रयोग झाले. गावाबाहेरच्या एका टेकडीवर नेऊन तिथे दहा-पंधरा ग्लास कडूलिंबाचा रस पाजण्यात आला. लगोलग श्रुतीला उलट्या सुरू झाल्या. तशा अवस्थेत श्रुतीला वाटले, ‘उलट्यांमुळे माझे पोट साफ होऊ शकेल परंतु मी स्वीकारलेला धर्म आणि श्रद्धेपासून मला कसे परावृत्त करता येईल?’ तशा अघोरी कृत्यामुळे श्रुतीच्या मनात हिंदुत्वाचा द्वेष, असहिष्णुता आणखी तीव्र झाली. तरीही तिने एक निर्णय घेतला, सर्वांशी गोडगोड बोलून, फसवून सुटका करून घेतली पाहिजे आणि मौनतुल संस्थेकडे जायला पाहिजे.
परंतु चाणाक्ष वडिलांनी आणि इतरांनी श्रुतीला एर्नाकुलम येथील विश्व हिंदू परिषदेच्या समितीच्या कार्यालयात नेले. तिथे अनेकांनी तिचे समुपदेशन केले. दोन दिवसांनी तिथल्या लोकाच्या सल्ल्याने तिला त्रिप्पुणीत्तुरा येथील ‘शिवशक्ती योग विद्या केंद्रम्’ येथे नेण्यात आले. तिथे ‘आर्ष विद्या समाजम्’ पाटी होती. आत गेल्यावर तिला एका पूजा केंद्रात एक भव्य मूर्ती दिसली आणि श्रुती दचकली कारण इस्लामिक संस्थेत तिच्या स्वप्नात तीच मूर्ती आली होती. ते पाहून ती गोंधळली परंतु जसा त्यावेळी तो संकेत श्रुती ओळखू शकली नाही तसाच यावेळीही ती संकेत ओळखू शकली नाही कारण असे संकेत ओळखण्यासाठी व्यक्तिची तशी पात्रता असावी लागते.
आर्ष विद्या समाज केंद्रात तिची भेट आचार्य मनोजजी यांच्याशी झाली. त्यावेळी आचार्य माझे समुपदेशन करण्याऐवजी मीच जिहादीच्या भूमिकेतून त्यांचे मन वळवून त्यांना इस्लाम धर्मात घेऊन जाईल असा एक विश्वास श्रुतीला प्राप्त झाला. दोन परस्परविरोधी भूमिका असलेल्या व्यक्ती एकमेकांशी संवाद साधताना आपापल्या भूमिका स्पष्ट करणार होत्या. आचार्य मनोज यांचा केवळ हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास सखोल होता असे नाही तर इतर धर्मांचाही त्यांनी तितक्याच बारकाईने अभ्यास केला होता. दुसरीकडे श्रुती स्वतःची इस्लाम प्रचारकाची आणि सोबत हिंदू धर्म विरोधकाची भूमिकाही ठोसपणे मांडत होती. तिचा अभ्यास एकांगी वाटत असला तरीही तयारी पूर्ण होती, आत्मविश्वास होता परंतु प्रत्येकवेळी चर्चा होताना श्रुतीचा आत्मविश्वास डळमळीत होत होता. ती तसे दाखवत नव्हती. तिचा अहंकार आडवा येत होता. तिचा प्रत्येक दावा आचार्य सप्रमाण आणि अभ्यासकाच्या दृष्टीने खोडून काढत होते. त्या चर्चेतून हिंदू, इस्लाम धर्माची चिकित्सा होऊ लागली. ती सारी चर्चा श्रुतीने आपल्या लेखनात वाचकांसाठी खुली केली आहे. ही चर्चा वाचताना वाचकाला विविध प्रकारची माहिती तर मिळतेच परंतु एक आत्मिक आनंद मिळतो. आचार्य मनोज आणि श्रुती यांची ज्या विषयांवर सुदृढ, अभ्यासपूर्ण अशी चर्चा झाली त्या विषयांचे शीर्षक (आणि त्या-त्या ग्रंथातील संदर्भ क्रमांक) वाचकांसाठी देत आहे…
अल्लाह, सर्वात दयाळू?, अल्लाची असहिष्णुता, कुराणातील संदेश, ज्यू व ख्रिश्चनांचा विरोध, ख्रिश्चन लोक श्रद्धाहीन, इतर देवांची निंदा/ तीव्र द्वेष, इतर सर्व देव नरकाचे इंधन, इतर देवांना प्रश्न करणार, अल्लाह अनेकेश्वरांना शिक्षा देणार, गैर मुस्लिमांची व्यभिचार्‍यांशी तुलना, कुराणातील काही जिहादी संदेश वचने, विश्वास प्रणालीमध्ये परस्पर विरोधाभास, इस्लाम आणि स्त्रिया, कुराण किती वैज्ञानिक आहे, कुराणिक खगोलशास्त्र, अंधश्रद्धा : जिन्नवरील विश्वास, इस्लामिक न्यायशास्त्र चुकीचे आहे तर मग एवढा फोफावला कसा?, सनातन धर्माचा अभ्यास (सांगोपांग माहिती नि चर्चा) इत्यादी अनेक विषयांवर साधकबाधक, मनमोकळी चर्चा झाल्यानंतर, सर्व शंकांचे निरसन आणि स्वतःचे समाधान झाल्यानंतर श्रुतीने पुन्हा हिंदू धर्मात परत येण्याचा निश्चय केला. तिने आचार्य मनोज यांचे शिष्यत्व पत्करून प्रायश्चित्त म्हणून ‘आर्ष विद्या समाज’मध्ये पूर्ण वेळ सेविका म्हणून कार्य करण्याची इच्छा व्यक्त करताच आचार्य मनोज शांतपणे म्हणाले, ‘‘मुली, आपल्या चुका मान्य करून तू असा निर्णय घेत आहेस याचा आनंदच आहे परंतु प्रत्येक निर्णय खूप विचार करून घ्यायचा असतो. मी तुला आता या क्षणी कोणताच शब्द देत नाही. तू तरुण आहेस. जीवनात तुला इतर बर्‍याच गोष्टी करायच्या आहेत ना? नोकरी, लग्न, पती, मूल, संसार इत्यादी. तुला पण ही स्वप्नं पडली असतीलच ना? या सर्वांचा त्याग करण्यास तयार असशील तर या क्षणी एकच वचन मी देऊ शकतो. इथे माझ्याबरोबर काम करणार्‍या सर्वांचे मी आपला जीव गमावून पण रक्षण करणारच…’’
शेवटी श्रुती आर्ष विद्या समाजमध्ये पूर्ण वेळ समाजसेविका म्हणून कार्य करू लागली… श्रुती स्वामी विवेकानंदांचे वाक्य अभिमानाने सांगते. विवेकानंद म्हणतात, या जगात जन्मलेल्या लोकामध्ये मी सर्वात अभिमानी हिंदू आहे. जेव्हा जेव्हा हिंदू हा शब्द ऐकताक्षणी तुमच्या शरीरात विद्युतप्रवाह सळसळल्याची जाणीव होते तेव्हा तेव्हा तुम्ही खरे हिंदू होतात.
श्रुती यांनी लिहिलेले स्वानुभव ए. आर. नायर आणि जे. ए.  थेरगावकर यांनी मराठी भाषेत अनुवादित करून मराठी वाचकांना एक अनमोल भेट दिली आहे. या लेखनामागचा प्रमुख उद्देश तिने प्रतिपादन केला आहे, ‘माझे वाईट अनुभव इतरांच्या वाट्याला येऊ नयेत.’ श्रुती यांच्या या प्रामाणिक भूमिकेला शतशः शुभेच्छा! त्यांचा हेतू यशस्वी होवो अशा लक्ष लक्ष शुभेच्छा!

लेखिका –  ओ. श्रुती
अनुवादक – ए. आर. नायर, जे. ए. थेरगावकर
प्रकाशक – बौद्धिकम बुक्स अ‍ॅन्ड पब्लिकेशन्स
तिरुअनंतपुरम, केरळ
7356613488
पृष्ठ संख्या – 219
किंमत – 300/-

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!