ते 1996 चे साल होते. मे महिन्याच्या शेवटी मी ‘सचिव, राजशिष्टाचार’ या पदावर काम करीत असताना मला अचानक मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले. त्यानी सांगितले की, ‘शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेबांना मला भेटण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घ्यावी.’ मला या निमंत्रणाचा काही केल्या संदर्भ लागेना. त्यावर त्यांनी स्पष्ट केले की, ‘मंत्रीमंडळाच्या शपथविधीमध्ये प्रत्येक मंत्र्यांच्या मागे तुम्ही उभे दिसता. ते फोटो बघत असताना त्यांना समजले की तुम्ही सैन्यात सेवा बजावली आहे. म्हणून त्यांना अनौपचारिकरित्या तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.’
त्यानुसार मी ठरलेल्या वेळी ‘मातोश्री’ बंगल्यावर पोहोचलो. दहा-पंधरा मिनिटे स्वागत कक्षात वाट पाहिल्यानंतर मला बाळासाहेबांच्या दालनात बोलविले गेले. उंच सडपातळ बांधा, पांढरी शुभ्र लुंगी, तसाच झब्बा आणि शिस्तीत मागे वळवलेले दाट केस. डोळ्यावर गडद रंगाचा चष्मा आणि खास ठाकरीपण दाखवणार्या रुद्राक्षाच्या माळा. मी त्यांना अनेकदा विविध कार्यक्रमात बघितले होते. त्यांचे दसर्याचे झंझावाती भाषणही ऐकले होते पण प्रत्यक्ष भेट मात्र आज होत होती. मला ही व्यक्ती मनापासून आवडली. नमस्कार चमत्कार झाला. मला समजेना की यांनी मला का बोलावले असावे?
त्यांनी आपुलकीने माझ्या सैन्यातील कामगिरीविषयी माहिती घेतली. चहापान झाल्यावर त्यांनी मुद्याला हात घातला. ते म्हणाले, ‘‘हे पाहा गोखले, आमच्या मुंबई महापालिकेच्या कारभारात बेशिस्त माजली आहे. कामगार संघटना मनमानी करत आहेत. तिथे आयुक्त पदावर एका करड्या शिस्तीच्या अधिकार्याची गरज आहे. तुम्ही नागपूर विद्यापीठाचा कारभार सहा महिन्यात सुधारला असं मला समजलं. मुंबईसारख्या महानगराचं आव्हान स्वीकारणार का?’’
मी त्यांना नम्रपणे उत्तर दिले, ‘‘साहेब, खर्या सैनिकाप्रमाणे मी आदेशाचं पालन करत आलो आहे. माझ्यावर जर ही जबाबदारी शासनाने सोपविली तर मी ती पूर्ण ताकतीनीशी पार पाडण्याचा प्रयत्न करीन.’’
त्यांनी मला शुभेच्छा दिल्या व आमची भेट संपली. अशी माझी ही पहिलीच भेट आनंददायी ठरली. मुंबई मनपा म्हटल्यावर माझ्यासमोर नेहमी व्हीटीला जाताना समोर दिसणारी ऐटबाज ब्रिटीशकालीन इमारत झळकली.
यथावकाश शासनाचे आदेश निघाले आणि 10 जून 1996 रोजी मी बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झालो. त्या आधी 1988 ते 1990 ही दोन वर्षे मी याच महापालिकेत अपर आयुक्त पदावर काम केले होते. श्री. स. शं. तिनईकर तेव्हा आयुक्त होते. त्यांच्या हाताखाली मला नागरी कारभाराबद्दल खूप शिकता आले होते.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी समजली जाते. चहूकडून पाण्याने वेढलेल्या या बेटसदृश शहराचे क्षेत्रफळ 438 चौ. कि.मी. असून त्या काळात लोकसंख्या 1 कोटी 20 लक्ष इतकी होती. मूळ मुंबई शहर (कुलाबा ते माहीम) पश्चिम उपनगरे (वांद्रे ते दहिसर) व पूर्व उपनगरे (कुर्ला ते मुलुंड) असे तीन स्पष्ट भाग प्रशासकीय सोयीसाठी पाडलेले आहेत. या शहराला लागणारे सुमारे 3400 दशलक्ष लिटर्स पाणी मुख्यत्वे ठाणे व नाशिक या दोन जिल्ह्यातून प्रचंड पाईपांमधून आणले जाते. महापालिकेचा अर्थसंकल्प तेव्हा 15000 कोटी रुपयांपर्यंत असे. (आता 35000 कोटीवर गेला आहे) गोवा, केरळ, मणिपूर, नागालँड अशा छोट्या छोट्या राज्यांचे अर्थसंकल्प यापेक्षा निश्चित कमी असतात. महापालिकेत कर्मचार्यांची एकूण संख्या 1,05,000 असे.
‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तिप्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर कामगार संघटना मागण्या पुढे ठेवून संपाची नोटीस देत असत. मुंबई महापालिकेत ‘मुंबई मजदूर युनियन’ (एम. एम यू.) ही सर्वात मोठी व शक्तिशाली संघटना असे. श्री. शरद राव हे त्याचे प्रमुख होते. त्यांचा खाक्या म्हणजे वाटाघाटी करताना ते आरडाओरडा करून आपला मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करीत. मी त्यांना स्पष्ट कल्पना दिली की, ‘आदल्या वर्षी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लाभ कामगारांना देण्यात आले असल्यामुळे संप अनाठायी आहे.’ तरीही त्यांनी संप पुकारला. त्याला तोंड देण्याची तयारी मी माझ्या सहकार्यांच्या मदतीने सुरु केली. दोन दिवस संप झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी श्री. राव यांना बोलावून घेतले व मध्यस्थी केल्याचे दाखवून संप मागे घ्यायला लावला. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की श्रेय उपटण्याची वेळ आली की राजकारणी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, सदैव पुढे असतो.
पुढच्या वर्षी म्हणजे 1997च्या पावसाळ्यात एम. एम. यू कडून संपाची नोटीस येताच मी सावध झालो. त्यांना वाटाघाटीमध्ये गुंतवून ठेवून मी सरळ ‘मातोश्री’वर फोन लावून मा. बाळासाहेबांकडे भेटीची वेळ मागितली. त्यांनी मला त्वरित भेटीसाठी बोलावून घेतले. मी त्यांना आधीच्या वर्षात मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीबाबत अवगत करून विनंती केली की ‘‘चालू वर्षात मुख्यमंत्र्यांनी मध्ये पडू नये व मला माझ्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्याची मोकळीक मिळावी.’’
त्यांनाही शरद राव यांची मनमानी पसंत नसावी. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, ‘‘त्या रावचं कंबरडं तुम्ही मोडू शकाल याची खातरी आहे का?’’
मी होकारार्थी उत्तर देताच त्यांनी माझ्यादेखत मुख्यमंत्र्यांना फोनवर सूचना दिल्या. ‘‘पंत, त्या महापालिकेच्या संपापासून तुम्ही दूर राहा. ते आयुक्त बघून घेतील.’’
माझे काम झाले होते. आम्ही जिद्दीने तो संप मोडून काढला. शरद रावांनी दिल्लीवरून त्यांचे नेते जॉर्ज फर्नांडीस यांना बोलवून घेतले. त्यांच्याशी माझी चर्चा झाली परंतु ‘प्रशासन आता कोणतीही अधिकची मागणी मान्य करणार नाही’ असे सांगून मी त्यांच्या सर्व अवास्तव मागण्या फेटाळून लावल्या. खरे तर श्री. जॉर्ज फर्नांडीस यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर होता परंतु त्यावेळी त्यांच्या मागण्या अवास्तव होत्या.
दुसर्या दिवशी संध्याकाळी ‘भर पावसात सभा घेऊन मुंबईच्या नागरिकांची गैरसोय होते म्हणून हा संप आम्ही मागे घेत आहोत’ असे शरद राव यांना जाहीर करावे लागले. त्यानंतर स्व. बाळासाहेबांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. अधिकार्यांवर ते नाराजही होत असत आणि चांगले काम करणार्या अधिकार्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा दिलदारपणाही त्यांच्याकडे नक्कीच होता.
एकदा बाळासाहेबांचा फोन आला आणि त्यांनी एका विभाग अधिकार्याची बदली अंधेरी पश्चिम येथे करता येईल का? ते तपासण्यास सांगितले. शिवसेनेच्या एका खासदाराने त्यांना तशी विनंती केल्याचीही माहिती त्यांनी दिली. अधिक माहिती घेतली असता मला समजले की, या अधिकार्याला अंधेरी पश्चिम या सधन विभागात काम करायची सार्थ (!) इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खासदारांच्या शिडीचा वापर केला होता. तसेच चार महिन्यापूर्वीच एका अधिकार्याची अंधेरी पश्चिम या विभागात नेमणूक झाली होती व तो एक मागासवर्गीय आधिकारी होता. त्याचे कामही चोख होते. त्याला बदलून दुसर्याला त्याच्या जागी नेमण्याचे काही कारण नव्हते. ही वस्तुस्थिती मी त्यांच्या निदर्शनाला आणल्यावर त्यांनी आपली सूचना मागे घेतली. ते म्हणाले, ‘‘हे आमदार-खासदार रोज आमच्याकडे अनेक मागण्या घेऊन येत असतात. प्रत्येकाची सत्यासत्यता पडताळणं आम्हाला शक्य नसतं. ते काम तुम्ही करून उचित निर्णय घेत जावे.’’
त्यांच्या या शब्दांनी माझा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. त्यांनी जेव्हा जेव्हा फोन केले तेव्हा साठलेले कचर्याचे ढीग आणि तुंबलेली गटारे याबद्दलचे सर्व विषय असत. ते एखाद्या कार्यक्रमाला जात-येत असताना ज्या गोष्टी त्यांच्या नजरेला पडत त्याबद्दलच ते कळकळीने बोलत. प्रश्न सोडवून त्याचे फोटो त्यांच्याकडे पाठवले की शाबासकीचा फोन येई.
बाळासाहेबांच्या सोबतचा एक प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. महापालिकेमध्ये उपायुक्त (सुधार) हे पद एका अधिकाराच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार होते. पालिकेच्या मालकीच्या जमिनीवरील दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याचे बरेच करार त्या काळात नूतनीकरणासाठी प्रलंबित होते. त्यासाठी मला एका हुशार, कार्यक्षम व प्रामाणिक अधिकार्याची गरज भासत होती. तशात मला स्कॉटलंडवरून श्री. अजेय मेहता या आय.ए.एस. अधिकार्याचा फोन आला. त्यांचं वर्षभराचं प्रशिक्षण संपत आलं होतं आणि त्यांना भारतात परतल्यावर चांगल्या पदी नियुक्ती हवी होती. मेहता यांनी माझ्यासोबत 5/6 वर्ष काम केलेल असल्यामुळे ते या पदावर उत्तम काम करतील याची मला खातरी वाटली. तेवढ्यात पालिकेच्या सेवेतील उपायुक्त शाहू डांगे मला भेटले. सेवा ज्येष्ठतेचे कारण सांगून उपायुक्त (सुधार) पदावर मी त्यांना नेमावे अशी त्यांनी मला विनंती केली. त्यानंतर मी त्वरित हालचाल करून तत्कालीन मुख्य सचिव पी. सुब्रह्मण्यम यांना भेटलो. मेहता यांना शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठवावे असे मी त्यांना सुचविले. माझी कारणमीमांसा त्यांना पटली असावी कारण त्यांनी तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचे कबूल केले. मला अशी एक बातमी मिळाली की मला अस्वस्थ वाटू लागले. शाहू डांगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे मला मुख्यमंत्री कार्यालयातून कळले. मुख्यमंत्री मुंबईचे महापौर होते तेव्हापासून डांगे यांचे त्यांच्याशी सख्य होते. योगायोगाने एका कार्यक्रमात माझी श्री. उद्धव ठाकरे यांच्याशी गाठ पडली. ते त्या काळी सक्रीय राजकारणात नव्हते पण नागरी समस्यांविषयी त्यांना आस्था होती. त्यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली व मेहतांना प्रतिनियुक्तीवर महापालिकेत पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकण्याची विनंती केली. त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे मान्य केले. आता माझी चिंता बरीच कमी झाली.
त्या वेळी श्री. अजित वर्टी हे ‘प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय’ या पदावर होते. ते माझ्याप्रमाणेच भारतीय लष्करात सेवा बजावून आले असल्यामुळे माझे जवळचे मित्र होते. त्यांनी मला फोन करुन वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, ‘‘दादा, मुख्य सचिवांच्या प्रस्तावात मुख्यमंत्र्यानी बदल केला आहे. अजय मेहता यांना विक्रीकर विभागात अपर आयुक्त पदावर पाठविण्याचे आदेश आहेत. माझं नाव कुठे घेऊ नका. तुम्हाला काय हालचाल करायची असेल ती लगेच करा.’’
हे बोलणे रात्री 9च्या सुमारास होताच मी मातोश्री बंगल्यावर फोन लावून बाळासाहेबांची भेट मागितली. मला दुसर्या दिवशी 11 वाजताची वेळ मिळाली. मी बाळासाहेबांना पूर्ण घटनाक्रम विशद केला आणि अजेय मेहता यांची सेवा महापालिकेला मिळणे किती आवश्यक आहे ते पटवून दिले. त्यांनी उद्धवजींशी बोलणे होताच ‘वर्षा’ या मुख्यमंत्री निवासस्थानी फोन लावण्यास सांगितले. मुख्यमंत्री दौर्यावर संभाजीनगर येथे गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. जिथे असतील तिथे मुख्यमंत्र्यांशी ताबडतोब फोन जोडण्यास त्यांनी आदेश दिले. संपर्क होताच त्यांनी पहिला प्रश्न ‘उद्धवजींनी मेहता यांच्याबदल काही बोलणे केले होते की नाही?’ असा विचारला. त्याचे काय उत्तर आले ते मला ऐकू आले नाही पण त्यावर बाळासाहेब गरजले, ‘‘पंत, आज तुम्ही उद्धवच्या सांगण्याकडे कानाडोळा केळात. उद्या आमचे आदेश धाब्यावर बसवाल. तुम्हाला या पदावर काम करायचा कंटाळा आला असेल तर पायउतार व्हा.’’
यावर पलीकडून काय उत्तर आले ते कळायला मार्ग नाही पण बाळासाहेब काहीसे शांत झाले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही दुपारी विमानतळावर याल तेव्हा ती फाईल मागवा आणि योग्य ती दुरुस्ती झाल्याचे मला कळवा. त्यानंतरच परत घरी जा!’’
अजेय मेहता यांचे महापालिकेत प्रतिनियुक्तीचे आदेश त्याच संध्याकाळी निघाले आणि दुसर्या दिवशी मेहता रुजू झाले. हा सर्व प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडला आणि मी थक्क झालो. बाळासाहेबांचा पक्षातील दरारा मला ठाऊक होता पण त्यांचे प्रत्यंतर मला अशा प्रकारे येईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे माझ्या महापालिकेतील तीन वर्षाच्या काळात एकही काम त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितले नाही पण मुंबई महानगरावरचं त्यांचं प्रेम छोट्या छोट्या गोष्टीतून जाणवत असे.
जून 1999 मध्ये मी प्रकृतीच्या कारणास्तव अडीच वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. मधुमेहाची देणगी वडिलोपर्जित होती. त्यात रोजच्या ताण-तणाव व मतभेद याच्या परिणामस्वरूप उच्च रक्तदाबानेही शरीरात शिरकाव केला होता. निवृत्तीनंतर मी स्वतःच्या गाडीने बाळासाहेबांचा निरोप घेण्यासाठी गेलो. त्यांनी मला पाहुणचार करून एक भेटवस्तू दिली. निघताना मी त्यांना वाकून नमस्कार केला व सांगितले की, ‘‘यापूर्वी शासकीय पदाचे ओझे खांद्यावर असल्यामुळे इच्छा असून सुद्धा माझी आदरभावना व्यक्त करू शकलो नव्हतो. आज मी एक स्वतंत्र नागरिक आणि तुमचा चाहता म्हणून आलो आहे.’’
त्यांनी मला हाताला धरून प्रवेशदारापर्यंत नेले. गाडीपर्यंत सोडायला आले आणि कुठल्याही अडचणीच्या वेळी त्यांना साद घालण्याची मुभा दिली. त्यांच्या निधनामुळे मला मनापासून दुःख झाले व नकळत डोळे ओले झाले.
– गिरीश गोखले
निवृत्त आयुक्त, मुंबई महापालिका
मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२४
Opposing political moves using political links, seems to be modus operandi of Girish Gokhale ji ! 😁