बाळंतिणीची खोली

Share this post on:

त्या खोलीबद्दल मला नेहमी लहानपणापासूनच कुतूहल होतं कारण वाड्यात तशी ती खोली थोडी अंधारी आणि माजघराला लागून होती. त्या खोलीत दिवसाही थोडा अंधारच असायचा. त्यामुळे लहानपणी जेव्हा ती खोली मोकळी असेल तेव्हा लपाछपी खेळताना आम्ही त्या खोलीत लपायचो पण तसं त्या खोलीत वर्षातून आठ-नऊ महिने कोणी ना कोणी असायचंच. सगळे त्यामुळे त्या खोलीला ‘बाळंतिणीची खोली’ म्हणायचे.

वाड्यात एकत्र कुटुंब असल्यामुळे माहेरीवासीनी बर्‍याच होत्या. चुलत बहिणी सुद्धा त्यात समाविष्ट होत्या. त्यामुळे कोणी ना कोणी वाड्यात बाळंतीण असायचंच. जेव्हा बाळंतीण त्या खोलीत असायची त्यावेळी ती खोली उबदार असायची कारण बाळंतिणीच्या कॉटेखाली सकाळ-संध्याकाळ शेक-शेगडी केलेली असायची. तिथेच शेजारी पाळणा असायचा. त्यात दुपट्यात गुरफटून ठेवलेलं बाळ असायचं. मग लहानपणी आम्ही त्या बाळाभोवती त्याच्या पाळण्याला झोका देत वेळ काढायचो.
सकाळी-सकाळी आजी त्या कॉटखाली पाटीमध्ये विस्तव ठेवायची. त्यावर थोड्या वावडिंगा शेपवा टाकलेल्या असायच्या. त्यामुळे त्याचा एक मंद वास खोलीत दरवळत असायचा. कॉटवर आमचीच आत्या किंवा मोठी बहीण कानाला रुमाल बांधून भर उन्हाळ्यातही अंगात एकादा स्वेटर घालून बसलेली असायची. खाली घातलेल्या विस्तवामुळे कॉटवरचं अंथरून उबदार भासायचं. मग त्या बाळंतीण आत्याची किंवा बहिणीशी बोलत आम्ही हळूच तिच्या शेजारी अंथरुणावर बसायचो.
खालून गरम झालेलं ते अंथरून शरीराला उब द्यायचं. मस्त वाटायचं. तेवढ्यात जर आजी आली तर मात्र आम्हाला ओरडायची. ‘‘अरे इथं बाळंतिणीच्या खोलीत तुमचं पोरांचं काय काम आहे? बाहेर चौकात खेळा जावा.’’ म्हणून आम्हाला बाहेर पिटाळायची.
वाड्याच्या परसात पारिजातकाच्या झाडाखाली बर्‍याच बाळांच्या नाळा पुरल्यात असं आजी सांगायची. तेव्हा ‘नाळ’ म्हणजे काय? हेही आम्हाला माहिती नव्हतं. कधी-कधी त्या बाळंतिणीच्या खोलीत आजी, आई वगैरे बायका बसलेल्या असल्या की त्यांच्यातल्या गप्पा आमच्या कानावर पडायच्या. कधी कधी ती बाळंतीण तिच्या सासरचे अनुभव सांगत असायची. त्यात मग तिचा सासुरवास कसा होतो याचाही उल्लेख असायचा. कधी नणंद, कधी सासू काय म्हणाली, कधी नवरा पण काय म्हणाला हे सांगताना ती डोळे पण पुसायची. त्यावेळी आजी तिला जवळ घ्यायची. म्हणायची, ‘‘अगं सगळीकडे असं थोडा सासुरवास असतोच! घ्यायचं सांभाळून थोडं. आता बाळंतीण झालीस ना! बाळाला घेऊन गेलीस की सगळे त्यात रमतील बघ!’’
त्यावर मग ती बाळंतीण जरा सावरल्यासारखी व्हायची. म्हणायची, ‘‘आजी सगळ्यांचं सोड नवर्‍याने तरी बायकोची बाजू घ्यायला नको का? तो पण त्यांची बाजू घेऊन बोलायला लागला की मग काय करायचं?’’
आजी हसायची.
त्यावर ‘‘मग तुला हसायला काय जातंय? भोगायला मला लागतंय!’’ म्हणत ती बाळंतीण एक सुस्कारा टाकायची.
मग बोलता बोलता आजी एक गोष्ट तिला सांगायची. ‘‘एक भाऊ बहिणीच्या सासुरवाडीला तिला भेटायला आला होता. जेवणखाण झाल्यावर एकटी बहीण भेटल्यावर त्यानं विचारलं, ‘‘काय बहिणाबाई ! कसं चाललंय?’’
तेव्हा त्या बहिणीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, ‘‘काय सांगू भाऊराया माझा सासुरवास कसा! चित्ताकाचा फासा उरी रुते ठसा ठसा!’’
‘‘सगळ्याचा सासुरवास सांगता येतो. नवर्‍यानं त्रास दिला तर कोणाला सांगायचं?’’
त्यावर माझी ती बहीण आजीच्या गळ्यात पडून रडली होती.
बाळंतिणीच्या खोलीत अशी बरीच सुख-दुःखं मुरली होती. बाळंत झाल्यावर माहेरी एक-दोन महिने निवांत राहायला मिळायचं. सासरी गेलं की मग कामातून उसंत नसायची. नंतर मोठे झाल्यावर कळलं आजीनं जी ओवी सांगितली होती ती लोकसाहित्यामधील होती. ‘चित्ताकाचा फासा’ म्हणजे मंगळसुत्राचा फासा.
त्या बाळंतिणीच्या खोलीत कायम एक वेगळा वास साचून असायचा. आम्ही फार वेळ बसलो की आजी आमच्यावर ओरडायची. ‘‘पुरुषांचं बाळंतिणीच्या खोलीत काय काम?’’ म्हणायची.
आठ-नऊ वर्षाची आम्ही पोरं या बाबतीत तिच्या लेखी पुरुष असायचो.
एकदा त्या खोलीत एक मांजरीण व्याली होती. त्यावेळी ती खोली मोकळीच होती. तिथल्या कोनाड्यात ती मांजरीण व्याली. ती पाळलेलीच होती. त्यामुळं कदाचित तिलाही यासाठी ही खोली सुरक्षित वाटली असावी. छोटी-छोटी डोळे न उघडलेली तिची तिनं पिलं म्यांव म्यांव करत होती त्यावरून सर्वांना ते ध्यानी आलं. आम्हीही पोरं ते पाहायला गेलो तेव्हा मात्र ती मांजरीण फिस्कारून आमच्या अंगावर आली. तिला आम्ही तिच्या पिलांना काही इजा करू असं वाटलं असावं.
ती फक्त आजीला तिच्या पिलांना हात लावू द्यायची. तिला आजीची खातरी वाटत असावी. ‘‘सारखं बाळंतिणीच्या खोलीत पिलांजवळ जाऊ नका रे! दरवाजा पण उघडा टाकू नका. एखादा बोका जाईल खोलीत आणि पिलू खाईल’’ आजी म्हणायची.
मग काहीतरी खेळत दरवाजात राखण करत बसायचो पण कसं कोणाला माहिती बोक्यानं तिचं एक पिल्लू पळवलं. त्या रात्रभर मांजरीण करुण स्वरात ओरडत होती.
आजीनं बशीत ठेवलेल्या दूधाला तिनं तोंड लावलं नाही. आजीनं त्यावेळी पदरानं स्वतःचे डोळे पुसले. त्या वेळी त्या बाळंतिणीच्या खोलीत आम्हाला जावंसं वाटलं नाही.
त्यावेळी रात्री आजीनं त्या खोलीविषयी आणखी एक घटना सांगितली आणि मग काही दिवस आम्हाला त्या खोलीची भीतीच बसली. आजीला ती घटना तिच्या सासूनं सांगितली होती. याच वाड्यातली एक माहेरवासीन बाळंतपणाला माहेरी वाड्यात आली होती. यापूर्वी तिला तीन मुलीच झाल्या होत्या. सासरच्या माणसाकडून त्याबद्दल तिला सारखं बोललं जायचं.
‘यावेळी मुलगा झाला तरच परत ये’ असं तिच्या नवर्‍यानं तिला सागितलं होतं. तिला चौथी मुलगीच झाली. त्या बाळंतिणीने दुसर्‍याच दिवशी या बाळंतिणीचे खोलीत फास लावून घेतला व स्वतःला संपवलं.
तेव्हापासून दर आमावस्येला त्या खोलीच्या कोपर्‍यात नारळ फोडला जायचा. वर्षातून एकदा कोपर्‍यात ओटी ठेवली जायची. आजीही ते सर्व करायची. आम्ही ते पाहायचो पण त्याचं कारण त्या दिवशी कळालं. ते कळल्यापासून काही दिवस त्या खोलीकडे जायला आम्हाला भीती वाटायची .
तशी ती खोली माजघराला लागून होती. रात्री आम्ही माजघरातच झोपायचो. रात्री जाग आली तरी त्या खोलीकडं पाहायची भीती वाटायची. डोक्यावरून पांघरुण घेऊन झोपायचो आम्ही. अर्थात त्या नंतरही वाड्यातल्या बर्‍याचशा बाळंतिणी त्या खोलीत राहिल्या.
इतके वर्षे गेली तरी अजून ती बाळंतिणीची खोली, अनेक बालकांना जोजावलेला तो लाकडी पाळणा, खोलीतला शेकशेगडीचा उबदारपणा, वावडिंगा शेपवाचा वास सगळं स्मरणात आहे.
मध्यंतरी वाडा जीर्ण झाला. भिंती थकल्या. वासे वाळवी लागलेने क्षीण झाले. मग वाडा पाडून तिथं अपार्टमेंट उभी राहिली. काडेपेटीसारखे एकावर एक खचलेले फ्लॅट तीन-तीन रुमचे. आजच्या भाषेत वन बीएचके. वाटलं आता यात कुठे असणार बाळंतिणीची खोली?
नवीन पिढीला हे नावही माहिती नसणार.
आता शेकशेगडी, पोटपट्टा ते शब्दही डिक्शनरीत पाहावे लागतील. आता त्या अपार्टमेंटपुढून जाताना उगाचच आजीचं ते बोलणं, पाळण्याचं किरकरणं आठवलं आणि त्या कोणा अभागी बाळंतिणीचं स्वतःला संपवणंही.
सगळं हळूहळू काळाच्या प्रवाहात लुप्त होईल आणि कधीतरी नातवंडं विचारतील, ‘‘आजोबा, बाळंतिणीची खोली म्हणजे काय असतं?’

-डॉ. राजेंद्र माने

मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२४

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!