समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा एक किस्सा सांगितला जातो. एके ठिकाणी त्यांचे व्याख्यान होते. त्यासाठी तरूणांनी गर्दी केली होती. आगरकर महाराज म्हणाले, “आपल्याला समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी जातीअंताची लढाई लढावी लागेल. त्यासाठी सर्वेात्तम पर्याय म्हणजे आंतरजातीय लग्नं! ती जितक्या मोठ्या प्रमाणात होतील तितके लोक एकत्र येतील. त्यांच्यात नातेसंबंध निर्माण झाल्याने कटुता कमी होईल. सगेसोयरे म्हणून ते एकमेकांना स्वीकारतील. त्यामुळे तरुणांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.”
त्यांचे व्याख्यान ऐकणारा एक तरूण अत्यंत प्रभावीत झाला होता. कार्यक्रम संपताच त्याने आगरकरांची भेट घेतली. त्यांना सांगितले की, “माझे एका मुलीवर प्रेम आहे. तिचेही माझ्यावर तितकेच प्रेम आहे. ती दलित असल्याने घरून कडवा विरोध आहे. त्यामुळे आमची द्विधा मनःस्थिती होती. तुमच्या आजच्या व्याख्यानाने माझे डोळे उघडले. आता कितीही विरोध झाला तरी मी तिच्याशी लग्न करणार! आमच्या घरच्यांचा जातीयगंड दूर झाला पाहिजे.”
आगरकरांनी त्याला सांगितलं, “सभ्य तरूणा, असे काही करू नकोस! तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांनी जे स्थळ बघितलं असेल तिच्याशीच लग्न कर! तिलाही तिच्या घरच्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायला सांग.”
हे ऐकून तो तरूण गडबडला. उद्वेगाने म्हणाला, “मग गेली दीड-दोन तास तुम्ही जे प्रवचन देत होता ते खोटं होतं का? का आमच्या भावनांशी खेळताय? तुम्ही बोलता एक आणि वागता वेगळेच!”
त्यावर आगरकर म्हणाले, “हे बघ मित्रा, तुमच्या दोघांच्याही घरातून तुमच्या लग्नाला विरोध आहे हे तू सांगितलंस. तरीही तुम्ही लग्न केलं तर काय होईल? तुझ्या घरचे तिच्या घरच्यांचा बळी घेतील. तुमच्या तगड्या शक्तिपुढे तिच्या घरचे खचतील, उद्ध्वस्त होतील. मग तुम्ही दोघे सुखी राहू शकाल का? अशावेळी एकच पर्याय आहे. तुम्ही दोघेही तुमच्या घरच्यांचे ऐका. आपापले संसार नेटाने करा. भविष्यात तुम्हाला जेव्हा मुलं होतील, त्यांना मात्र त्यांचे जोडीदार निवडण्याचा अधिकार द्या. त्यांच्या पाठिशी उभे रहा. जे तुमच्याबाबत झाले ते त्यांच्यासोबत होऊ नये याची काळजी घ्या. त्यालाच तर परिवर्तन म्हणतात! कारण कोणतेही परिवर्तन हे एका रात्रीत होत नसते. त्यासाठी पिढ्या न पिढ्या खपावे लागते. त्यातूनच समाजसुधारणा घडते!”
हे आठवण्याचे कारण म्हणजे आजची भव्य सभा. दोन लाखाहून अधिक समाजबांधव केवळ माझ्या शब्दावर एकत्र आले होते. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. तो एका रात्रीत कमावला नव्हता. त्यासाठी मला आयुष्यभर झगडावं लागलं. स्वतःला सिद्ध करावं लागलं. आयुष्याचे सहावलोकन करताना मला माझा संघर्ष आठवतो. एखाद्या चलचित्राप्रमाणे आज तो माझ्या डोळ्यासमोर येतोय.
आजची सभा माझ्या जीवनाचं फलित होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझं कौतुक केलं म्हणून हा आनंद नव्हता. हा आनंद शून्य फोडून विश्व निर्माण केल्याचा होता. आपण कुठे आहोत यावर माणसाच्या आयुष्याचं मूल्यमापन होत नसतं. आपला प्रवास कुठून सुरू झालाय त्यावर यश-अपयश ठरवलं जातं. म्हणूनच आजचा अफाट जनसागर टाळ्यांचा कडकडाट करत असताना मी माझ्या बालपणात गेलो होतो.
मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर हे माझे गाव. खरंतर ही आंध्र-कर्नाटकची सीमारेषा. आंध्रची सीमा तर हाकेच्या अंतरावर. त्यामुळे तेलगू बोलता यायचं. अनेक संस्कृतींचा संगम या गावात दिसून येतो मात्र माझ्या लहानपणाचं तिथलं चित्र फार वेगळं होतं. आजही त्यात खूप बदल झालेत असं नाही पण त्यावेळची आव्हानं आणखी मोठी होती. एकेक रूपया बैलगाडीच्या चाकासारखा मोठा वाटावा, असे ते दिवस! त्यात मी वडार समाजातला. वंचित आणि कायम उपेक्षित! जातीपातीची बंधनं होतीच. अनेक मर्यादा होत्या. सामाजिक मागासलेपणामुळं आमचे नैसर्गिक हक्क डावलले गेले होते. दैनंदिन जीवनात टोकाचा जातीयवाद अनुभवास यायचा.
जातीयवादाबरोबरच तेव्हा आणखी एक मोठं ग्रहण होतं. ते म्हणजे अंधश्रद्धेचं! आमचा वडारवाडा गावाबाहेर होता. वडिलांचं गावात उठणं-बसणं होतं. ही गोष्ट आहे 1948 ची! देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. आता काही सकारात्मक बदल घडतील, या आशेनं जो तो आपापल्या परीनं स्वप्नं रंगवत होता. माझ्या वडिलांनी देगलूरमध्ये त्यांच्या ओळखीनं वडार गल्लीसाठी जागा मिळवली. प्रत्येक कुटुंबाच्या गरजेप्रमाणे जागावाटप केली. त्यानंतर तिथे झोपड्या टाकून या सगळ्यांचे संसार सुरू झाले. गल्लीत लहान मुले उघडी-नागडी असत. तसेच सगळेजण एकत्र खेळत असत. मोठी माणसं पहाट होताच दगड फोडायच्या कामासाठी निघून जात. दुपारपर्यंत गावात ठरलेल्या ठिकाणी पोहचत. बायका भाकऱ्या बडवून पुरुषांसाठी जंगलात पोहोचवत. मुलं पाच-सहा वर्षांची झाली की, त्यांना जनावरे चारायच्या कामाला पिटाळले जायचे. ती थोडी मोठी झाली की त्यांना दगड फोडायच्या कामाचं प्रशिक्षण दिलं जायचं. आलेला दिवस ढकलायचा असाच शिरस्ता होता. त्यात काही बदल नव्हता. सुधारणेची चिन्हं नव्हती. वडारवाड्याच्या आजूबाजूला व मध्ये उंच उंच दगड होते. वस्तीला लागूनच घाण पाण्याचा एक छोटा तलाव होता. त्याला तेलूगुत ‘कुंटा’ असे म्हणत. आम्ही लहान मुले तिथे मासे पकडण्यासाठी जायचो. या तलावातलं पाणी जसं गढूळ होतं तसंच आमचं भवितव्यही धूसर होतं.
व्यवसायानुसार वडार समाजाच्या तीन प्रमुख उपजाती आहेत.
एक – गाडी वडार, ज्यांच्याकडे भरीव चाकाच्या गाड्या असतात व त्याला उभ्या दोन फळ्या असून त्यातून निरनिराळ्या आकाराचे दगड वाहण्याचे काम ते करत असत. या गाड्या ओढण्यासाठी बैल कवा रेड्याचा उपयोग केला जायचा. गाडी वडाराकडे काम करण्यासाठी सुतकी (सुत्या, सब्बल गॅरपडा) व घन (गन्नू) असे हत्यार असत.
या फोडलेल्या उपलब्ध दगडांना व्यवस्थित आकार देण्याचे काम करावे लागायचे. शिवाय खलबत्ता व जाती बनवणे असे काम करावे लागायचे. त्यांना ‘पाथरवट’ कवा ‘जाती वडार’ म्हणत. पाथरवटांना छन्नी-हातोडा लागतो.
वडारातील तिसरी उपजात म्हणजे ‘माती वडार’. ते खोदकाम करतात आणि गाढवावरून ती माती दुसरीकडे नेऊन टाकतात.
यांच्यात आधी रोटी-बेटी व्यवहार होत नसत. बऱ्याच ठिकाणी गाडी वडार व पाथरवट यांच्यात बेटी व्यवहार होतो. गाडी वडार व माती वडार यांच्यात मात्र बेटी व्यवहार होत नाहीत. आता शिक्षणाचा प्रसार आणि जागरुकता यामुळे काही ठिकाणी असे संबंध जुळलेले दिसतात.
देगलूरची वस्ती ही गाडी वडारांची होती. गाडी वडार स्वतःला थोडे उच्चस्तरीय समजतात. त्यामुळे इतर जातीत सोयरसंबंध करणे टाळतात. वडार समाजात विवाह करण्यासाठी ‘गोत्र’ बघितले जाते. समाजात साधारण शंभर गोत्रं आहेत. गोत्र पाहून विवाह होतात. भावकीच्या गोत्रात मात्र विवाह होत नाहीत. पूर्वी शिक्षणाचा प्रसार नसल्याने जवळच्या जवळ आपापसात सोयरसंबंध होत. आता शिक्षणाचा प्रसार वाढल्यामुळे लांबचे पण सगेसंबंध होताना दिसतात.
वडार समाज हा मूळचा ओरिसाचा. पूर्वीच्या उत्कल कलग प्रांतातून दक्षिणेत आंध्र प्रांतातून स्थलांतरित झाला. काही समाज तिथून उत्तरेत देखील स्थलांतरित झाला. दक्षिणेत प्रामुख्याने आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू व महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. ‘ओड’ या शब्दापासून ‘वडार’ हा शब्द निर्माण झाला आहे.
आमचे देगलूर हे पूर्वी हैदराबाद संस्थानात होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला पण हे पूर्ण सत्य नव्हते. आम्ही अजूनही निजामाच्या अखत्यारित होतो. स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यासाठी जंग जंग पछाडले. देशात स्वातंत्र्योत्सव सुरू असतानाच आमचा मात्र निकराचा लढा सुरू होता. त्यासाठी अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. शेवटी या लढ्याला यश आलं आणि 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा निजामाच्या क्रूर अत्याचारापासून मुक्त झाला. हा 13 महिन्यांचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याइतकाच देदीप्यमान आहे. तब्बल 13 महिन्यांनी आम्ही भारताच्या स्वातंत्र्यात सहभागी झालो. आधीच मागासलेला प्रदेश! त्यात तेरा महिने उशिराने स्वातंत्र्य मिळालं. म्हणूनच तर ‘दुष्काळात तेरावा’ अशी म्हण रूढ झाली असावी.
हा आंध्रचा सीमाभाग असल्याने अनेकांना तेलुगु भाषा उत्तम येत असे. काहींची तर ती मातृभाषाच होती. वडार समाजाची वडारी ही तेलुगु भाषेची अपभ्रंशित भाषा आहे. विशिष्ट शब्दांवर जोर देऊन ती बोलावी लागते. वडार वस्तीत जशी वडारी भाषा वेगळी आहे तशी नावेदेखील वेगळी आहेत. जवळपास प्रत्येकाच्या नावासमोर अण्णा लावलेले असते. उदाहरणार्थ राम हे नाव असेल तर रामण्णा, गंगाराम असेल तर गंगण्णा कवा व्यकटेश असेल तर व्यंकण्णा वगैरे.
इतर प्रगत समाजाप्रमाणे मुलांची नावे ठरवून कवा विचारपूर्वक ठेवली जात नसत. घराघरात भरपूर मुलं असायची. त्यामुळे एकच नाव परत परत यायचे. अशावेळी त्यांच्या वयाप्रमाणे मोठा कवा छोटा सांगितले जायचे. मोठा असेल तर त्याला पेद्दा म्हणण्याचा कवा छोटा असेल तर त्याला चिन्ना म्हणण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ गंगाराम हे नाव दोन-तीन वेळा आले तर पेद्दा गंगाण्णा कवा चिन्ना गंगण्णा असे संबोधण्यात येई. एकच नाव सारखे येत असेल तर त्याच्या रंगावरून कवा व्यंगावरूनही ओळखले जायचे. जसे दोंगा (चोर) रामा, गुड्डी (अंधळा), गुरवडू कऱ्या गंगडू (काळा कुळकुळीत), लट्ट्ठ्या तिम्मा (तसे वडार समाजात उन्हात कामे केल्याने जवळपास सगळे काळे असतात.) मला मात्र घरी व गल्लीत सगळे ‘रातान्ना’ म्हणायचे. रातान्ना म्हणजे लिहिता-वाचता येणारा कवा शिकलेला.
स्त्रियांची नावे देखील अशीच ठेवली जायची. वेशभूषा व राहणीमान पाहिल्यास वडार समाजाच्या दारिद्य्राची कल्पना येते. पुरूष असो की स्त्री, अंगावर फाटके-तुटके कपडे, डोक्याला मुंडासे, काम करताना पुरूष उघड्या अंगाने काम करतात, स्त्रियांचे केस विस्कटलेले, डोक्यात भरपूर उवा व लिखा, कधी सणावाराला केस धुतले तर धुतले… घरात लग्नकार्य असेल तरच नवा कपडा येतो. इतर वेळेस शक्यता नाही. लहानपणी मुलांच्या नशिबी ड्रेस वगैरे काही नसते. मुलगा तीन-चार वर्षाचा होईपर्यंत नागडाच असतो. मुलीच्या मात्र कमरेला गोलाकार चधी व मागेपुढे कापड बांधून इज्जत झाकलेली असते. त्याला ‘गोशीबट्टा’ म्हणतात. अर्थात ही परिस्थिती माझ्या लहानपणी बघितलेली. कदाचित आता काही बदल झाले असतील.
समाजात जात पंचायत असायची. कुणाचे काही भांडण-तंटा असेल, घटस्फोटासारखे प्रकरण असेल तर आपल्याच लोकातील पंच निवडून किंवा भोईद्वारे निकाल घ्यायचा. म्हणजे कोणत्या तरी एका पक्षाला दोषी ठरवून दंड आकारायचा. त्याला त्यावेळी दंड भरणे शक्य नसल्यास जामीन घेऊन दंड वसूल केला जायचा. त्यानंतर ही मंडळी सदी, दारू पिण्यास जात असत. जर चोरी झाली तर मंतरलेला तांदूळ खाण्यास देत असत व खाऊन तो थुंकण्यास सांगत. जो थुंकण्यास असमर्थ असे त्याला दोषी समजून त्याच्यावर दंड आकारण्यास येई. भीतीने त्याच्या तोंडात लाळ तयार होत नसे. त्यामुळे तांदूळ चिकटून जाई. अशा अनेक अंधश्रद्धातून हे काम चालायचे.
संध्याकाळी मात्र पुरूष मंडळींचे काम वेगळेच असे. ते दिवसा काम करत आणि रात्री दारू पिऊन मारामारी करत. दगड, धेोंडे, गाडीचे खुंट अशा कशानेही मारून घेत. हे भांडण अनेकदा समोरील मुख्य रस्त्यापर्यंत येई. त्यावेळी तावातावाने हातवारे केले जायचे. अश्लिल शब्द वापरले जायचे. स्त्रियाही याला अपवाद नव्हत्या. भांडण रस्त्यावर आल्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांचे मात्र मनोरंजन होई. मारामारी झाल्यावर ही मंडळी महिनाभर तरी एकमेकांना बोलणार नाहीत, असे वाटायचे. व्हायचे मात्र उलटेच. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच ही मंडळी आश्चर्यकारकपणे एकमेकांशी गप्पा मारत बिडी ओढताना दिसायची. यांचे हे अजब रसायन बघून मला आश्चर्य वाटायचे. आज विचार करताना जाणवते की, एकमेकांना असे सहजपणे गुण-दोषांसह स्वीकारणे आपल्याला अजूनही का जमत नाही? कितीतरी गोष्टी मनात साठवून ठेवल्याने, एकमेकांचा द्वेष केल्याने, राग धरल्याने आपल्या मनावर आणि शरीरावर किती वाईट परिणाम होतात? आजच्या जीवनशैलीचा विचार केला तर कितीतरी आजार अशा वृत्ती आणि प्रवृत्तीमुळे बळावतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. कोणतीही गोष्ट अशी सहजपणे सोडून देता येणे ही केवढी मोठी किमया होती! आम्ही लहान मुले तेव्हाच्या अशा अनेक घटनांचे साक्षीदार असायचो.
या सगळ्या वातावरणात शिक्षण घेणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. मागासलेपणाबरोबरच अंधश्रद्धाही प्रचंड होत्या. अंगात येणे, बकरे-कोंबड्या कापणे हे नित्याचे होते. एवढेच काय माझ्या घरी लक्ष्मी देवी म्हणजे तिला आम्ही ‘लक्ष्यम्मा’ म्हणायचो ती ठरावीक दिवशी आमच्या आईच्या अंगात येई. अंगात आल्यावर गल्लीतील बहुतांश स्त्रिया आपापले प्रश्न घेऊन त्याची उत्तरे घ्यायला येत. एकेकजण प्रश्न विचारी. आई डुलत असे व विचारमग्न होऊन भूतबाधा व जादूटोणा वगैरे झाल्याचे सांगे. लोकांच्या विनंतीप्रमाणे भूतबाधा व जादूटोणा काढून टाके. आश्चर्य म्हणजे ते भूतदेखील वेगवेगळ्या भाषांत बोले. आईला कन्नड येत नव्हती तरी ती ‘भूतं कर्नाटकातून आली’ असे सांगून कानडीत बोले. मी लहान होतो. त्या वेळेला बाजूला बसून हे सगळं पाहत असायचो. अनेकदा बरेचजण भूतबाधा कमी झाल्याचे येऊन आवर्जून सांगायचे. वडार समाजात सगळीकडेच थोड्या-फार फरकाने हे चित्र असेच असायचे. यावरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की, हा समाज नागरी संस्कृतीपासून कोसो मैल दूर आहे. वडार समाजात आजही भरपूर अंधश्रद्धा आहेत.
देगलूर येथे असतानाचे अंधश्रद्धेचे अनेक किस्से आहेत. त्यातील काही मला आठवतात आणि ते सांगावेसे वाटतात. दरवर्षी अनेक देवी-देवतांना बळी देण्याचा प्रघात आहे. अनेक प्रकारच्या ग्रामीण देवी-देवता आहेत. पोशम्मा, मरगम्मा अशा देवी-देवतांना बकरी व कोंबड्याचे बळी दिले जायचे पण हुरडाम्माला मात्र रेड्याचा बळी दिला जायचा. असे प्रकार केल्याने दुष्काळ येणार नाही, अशी सगळ्यांची समजूत होती.
हुरडाम्माला रेड्याचा बळी देण्याचा प्रकार हा अत्यंत भीतीदायक, भयंकर असायचा. हुरडाम्माच्या नावाने आधी एका रेड्याला देचीच्या नावे सोडले जाई. तो रेडा गावात कुठेही, कोणतेही खाद्य खाण्यास मोकळा असे. ह्या रेड्याला कोणी खाण्यासाठी अडवत नसल्याने तो खाऊन मस्त तयार होत असे. ज्या वर्षी दुष्काळ पडला त्या वर्षी त्याचा बळी दिला जाई. बळी देण्याचा मान मांग व्यक्तिला असे. बळी देण्याच्या दिवशी भल्या पहाटेच मान दिलेला मांग व्यक्ती त्या रेड्याचे शेपूट धरून त्याला गावभर फिरवित असे. शेपूट सोडायचे नाही, नाहीतर अपशकून होईल असा समज होता. त्यानंतर त्या रेड्याला देवीच्या गाभाऱ्यात आणले जाई. तिथे मांग व्यक्ती तलवारीने एका झटक्यात रेड्याचे मुंडके धडावेगळे करी. त्यानंतर त्या मांग व्यक्तिला विवस्त्र करून रेड्याचे पोट फाडून त्याचे आतडे त्याच्या भोवती गुंडाळले जाई व रेड्याचे काळीज त्याच्या तोंडात दिले जाई. आतड्यातील उरलेले अन्न एका टोपल्यात घेऊन दुसरा गृहस्थ त्याच्या मागून चालत असे.
एक असा समज होती की, टोपल्यातील फेकलेले अन्न गोळा करून शेतात टाकायचे. त्यामुळे पीक चांगले येते. ही फेरी देवीच्या मंदिरापासून निघून गावभर फिरे आणि लोकांचा जत्था त्यामागे चालत येई. मानकरी मांग व्यक्ती उपाशीपोटी असल्यामुळे आणि त्याच्या अंगावर सगळे आतडे गुंडाळलेले असल्याने, शिवाय त्याच्या तोंडात रेड्याचे काळीज असल्याने कधीकधी त्याला घेरी येई. त्याचप्रमाणे टोपली घेतलेल्यालाही घेरी येई. फेरीदरम्यान गावभर हे वारंवार होई. असे होण्याचे कारण म्हणजे बाहेर बाधा झाली म्हणून सोबत असलेली मंडळी लाठ्या, काठ्या, भाले व तलवारी उंच करून जोरात गलका करीत. या आवाजामुळे मानकरी भानावर येत. लहान असताना हा प्रकार मला फारच भयानक वाटायचा.
याप्रमाणे ही मिरवणूक पुन्हा मंदिरात यायची. मानकऱ्याला आंघोळीनंतर नवीन कपडे देण्यात येत. त्याच्या बायकोचे आदल्या दिवशी मंगळसूत्र काढलेले असे. ते त्याला परत देण्यात येई. अशा अंधश्रद्धा जपणाऱ्या गावात आणि विशेषतः वडार समाजात शिक्षणाचा विचार कुणाच्या मनातही यायचा नाही. काहीवेळा मात्र चमत्कार घडतात. माझ्या बाबतही असाच चमत्कार घडणार होता. तो घडला. त्याचे फलित म्हणजेच माझे आजचे यश आहे.
-डॉ . लक्ष्मणराव देगलूरकर
हा लेख ‘चपराक’ प्रकाशित डॉ . लक्ष्मणराव देगलूरकर लिखित ‘ओड आणि ओढ’ या आत्मचरित्रातून घेतला आहे
हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा